Pages

Wednesday, February 13, 2008

मी...झाड...संध्याकाळ...

तू माझ्यावर ओठंगून
समुद्र किनारयावरच्या वाळूत
लाट झिरपत जावी तशी

आधीच अफाट संवेदनानी भारलेला मी
तुझं वाहनच बनून जातो
अतृप्त आत्मा जसं एखादं
झाड शोधत असतो
सततची अतृप्ती संपवण्यासाठी- तशी तू

अचानक वाहू लागतात वारे
आणि काळोख झाला आहे सर्वत्र म्हणावं
तरी मला नीट दिसत असतो
आभाळाचा साईक
त्यावर डोलणारी सिल्हाउट भासणारी सुसाट झाडं

मी घरातून कुंपणापर्यंत
कुंपणाच्या बाजूबाजूनी
पुन्हा घरात
कृत्रिम उजेडातल्या माझ्या म्हणवल्या जाणारया
सांदिकोपरयातून कोरी नजर फिरवत
कुंपणापर्यंत गेल्यावर घराची आठवण आणि
घराच्या गोतावळ्यात कुंपणाची हाक
तुझ्या अमलाखाली मी
हालता निःशंक लंबक
दमून आजचा दिवस संपवतो
बरया वाईट स्वप्नांच्या राज्यात रमण्यासाठी
पुन्हा दचकून जाग येईपर्यन्त
तेव्हा माझ्यावरचं तुझं राज्यं पुन्हा सुरू व्हायला
एक वर्कींग डे बाकी असतो...