Pages

Sunday, July 6, 2008

नाटक, साहित्य आणि मनोरंजन होणं, विचार करायला लावणं…

मला एक माणूस म्हणून, एक प्रेक्षक म्हणून विचार करायला लावणारं नाटक आवडतं.एक लेखक,अभिनेता म्हणून मात्र असं वाटू लागलं आहे की विचार करायला लावणारं आणि करमणूक करणारं असे दोनच स्पष्ट भेद या माध्यमात नाहीत.विचार करायला लावणारं नाटक फक्त जे संवेदनशील म्हटले जातात त्यांच्यापर्यंत किंवा केवळ विचारवंतांपर्यंत पोहोचून उपयोगी नाही.सामान्य लोकांपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार करायला लावणारा हा विचार पोहोचवायचा असेल तर सामान्य प्रेक्षकांना पचेल असं ते नाटक असायला हवं.ते तसं आहे हे त्यांच्यापर्यंत पोचायला हवं तरच ते नाट्यगृहाकडे येतात.

अभिनेता म्हणून माझा ज्या पहिल्या मुख्य धारेतल्या नाटकाशी संबंध आला ते ’झुलवा’ हे नाटक (१९८७) देवदासींच्या समस्येवरच्या कादंबरीवर आधारित आहे.लेखक श्री.उत्तम बंडू तुपे यांनीं एका जोगती जमातीतल्या कुटुंबाबरोबर राहून त्या अनुभवावर ती कादंबरी लिहिली असं ते मनोगतात म्हणतात.
अजगर वजाहत यांच्या मूळ उर्दू नाटकाचं रूपांतर ’राहिले दूर घर माझे’ या व्यावसायिक नाटकात (१९९६.कलावैभव) ’कासिम’ या मुस्लिम कुटुंबप्रमुखाची भूमिका माझ्याकडे आली.फाळणीनंतर पुन्हा पाकिस्तानात गेल्यावर आणि तिथल्या हवेलीत आश्रय घेतल्यावर हवेलीतली न हटणारी ताबेदार वृध्द हिंदू स्त्री या दोघांमधला झगडा या नाटकात आहे.

माझ्या मनाला भिडणारे विषय नाटक, वृत्तपत्रातलं सदर, कथा, कादंबरी याद्वारे मी प्रकट केलं आहे, करतो आहे.पहिलं लिखाण ’आवर्त’ हे दोन अंकी नाटक (प्रकाशक: म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मार्च२००१, नवलेखक अनुदान योजना) आहे.यात “करियर आणि संसार” हा आज सनातन होत जाणारा झगडा मांडायचा प्रयत्न आहे.अगदी अलिकडे बंगळूरू इथल्या सर्वेक्षणात आयटी क्षेत्रातल्या विवाहविच्छेदांचं गंभीर स्वरूप उघड झालं आहेच.
संभोग या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ (दोन्ही भागीदार सारखेच समाधानी) समाजामधे अजिबात दिसत नाही.’विषमभोग’ या दोन अंकी नाटकात हे वास्तव एक स्त्री जेलर आणि एक बलात्कारी खुनी कलाकार यांच्या झगड्यामधून मांडायचा प्रयत्न आहे.नेहरू सेंटर नाटककार कार्यशाळा, मे २००२ मधे ज्येष्ठ नाटककार श्री.सतीश आळेकर यांच्यासमोर या नाटकाचं वाचन केलं.याच नाटकाला जाने’०८ मधे गंगामाई वाचन मंदिर, आजरा या शंभर वर्षें जुन्या संस्थेचा नाट्यलेखन पुरस्कार मिळाला.
’संघटन’ या दोन अंकी नाटकात आजच्या तरूणाईला सार्वजनिक उत्सवामधून संघटित करून ज्या स्वार्थी आणि मूल्यहीन राजकारणाचा भाग बनवलं जातं त्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे.
अगदी अलिकडे २१ जून’०८ ’कन्या’ या दीर्घांकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे झाला त्याची पार्श्वभूमी एका गाजलेल्या बलात्कार प्रकरणाची होती.त्या घटनेतली सनसनाटी वगळून एका स्त्री आश्रमशाळेच्या पार्श्वभूमीवर विविध वयोगटातल्या स्त्री पात्रांद्वारे आजवरच्या एकूण स्त्रीच्या प्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.ती शोषित मुलगी स्वत: स्वत:च्या पायावर उभी रहाण्याचा निर्णय कसा घेते हा प्रवास आहे.सध्या या दीर्घांकाचं दोन अंकी नाटकात रूपांतर करण्याचं काम चालू आहे.

२००१ हे वर्षभर ’वृत्तमानस’ या सायंदैनिकात ’माणूसपण’ हे साप्ताहिक सदर लिहिलं ज्यात मनू हे एक वरवर विनोदी वाटणारं पात्र घेऊन बदलत्या मूल्यांचं, नागरी समस्यांवर सोपी सोल्युशन्स काढणारया मानसिकतेचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे.

’उत्सव’ ही माझी पहिली लघुकथा अक्षर दिवाळी २००२ (संपादक: निखिल वागळे) या अंकात प्रकाशित झाली.आजच्या उत्सवांचं वाढतं भयानक होत जाणारं स्वरूप पाहणारय़ा, अनुभवणारय़ा तळागाळातल्या एका संवेदनशील माणसाचा दुभंग मानसिक अवस्थेपर्यंतचा प्रवास यात आहे.
’डेडलाईन’ ही लघुकथा ग्रंथाली चळवळीच्या रूची मासिकाच्या मे २००३ च्या अंकात प्रकाशित झाली.यात एका वृध्द स्वातंत्र्यसेनानीचं आजच्या परिस्थितीवरचं उपरोधिक दु:खं आणि १५ ऑगस्टची मुलाखत केवळ डेडलाईनसाठी असणारी पत्रकारिता असा विषय आहे.
गेल्या वर्षीच्या ’मुक्तसंवाद’ दिवाळी अंकात ’अनावृत्त’ ही कथा प्रकाशित झाली आहे.ही एक काल्पनिका आहे.समाजातली लैंगिकता अचानक एक दिवस समाजात वावरून गेलेल्या नग्नं स्त्री देहाद्वारे उघड होते (अश्लीलता पूर्ण टाळून, केवळ मानसिक प्रवास) असा या कथेचा विषय.

’पुलाखालून बरंच’ ही कादंबरिका, जुलै २००६.अक्षर मानव, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित झाली आहे.यात उड्डाणपूल संस्कृतीद्वारे महानगरात होणारी घडामोड चित्रित आहे.पुलाखाली तयार होणारं अवकाश, ते व्यापणारे वंचित, जगडव्याळ अजगरी यंत्रणा आणि भविष्यात वंचितांकडून वाढत जाणारी आंदोलनं आणि आक्रमणं यांचं सूचन आहे.
मनोरंजन हा मूळ पाया असणारय़ा साहित्य, नाटक, चित्रपट (उदा.आशुतोष गोवारिकरांचे चित्रपट) ह्या माध्यमांमधे प्रेक्षकाला विचार करायला लावण्याची ताकद निश्चितपणे आहे.

No comments:

Post a Comment