Pages

Thursday, December 25, 2008

मी जागा आहे…

मला आठवतं

तेव्हांपासून मी जागा आहे!

जेव्हा माझ्या ढुंगणावर

पदवीचा (खोटा) शिक्का मारून

त्यानी मला ढकलून दिलं

जगाच्या लाथा खायला

आणि रोजगाराच्या प्रतिक्षेत

मी जागायला लागलो…

त्यानंतर मला आठवतं

मी जागायला लागलो

तोंडावरचा रंग पुसून

मन रंगवत

डोकं धुंदवत

स्वप्नं रचत

धुंदीचा चढउतार

स्वप्नांचा विस्कोट

आणि भलतीच लचांडं!!

सुरक्षित कोषातून

एकदम असुरक्षित दलदलीत

जागण्याचा स्टॅमिना वाढला…

मला आठवतं

माझा जागण्याचा स्टॅमिना वाढला

आणि जगण्याचा कमी झाला

ग्लॅमरची वलंयं

वास्तवाचं जळजळीत चरक

यातून जात

जोडीदाराची वाट पहात

जागणं हेच जगणं बनलं…

मला आठवतं

जागणं हेच माझं जगणं बनलं

आणि मला जोडीदार मिळाला

काही शांत रात्रींचं मध्यंतर

मी जागणं विसरूनच गेलो!!...

मला आठवतं

मी जागणं विसरूनच गेलो

जणू त्याचं प्रायश्चित्तच मिळालं

जगण्याची कुतरओढ थांबेना

अस्तित्वाचं स्वतंत्र भूत मानगटीवरून उतरेचना

आणि मी जागायला लागलो

रात्रं वैऱ्याची असल्यासारखा

सततचा…

मला आठवतं

मी सततचा जागा आहे

विचारांच्या गर्तेत

नपुसंक विचारांचे डोंगरच्या डोंगर उपसत

विनाकारण

कारण अजून तसं काहीच होत नाही

माझ्या मनासारखं

खरोखरीची जाग मला कधी येणार?

पिकून जख्खड झाल्यावर?...

अजूनही

मी जागा आहे

विचारांच्या वावटळीतून

चिंतांच्या जंजाळातूनही

कधीतरी लक्ष्मीची हाक

मला ऐकू येईल

आणि मी तिला म्हणेन

मी जागा आहे…

मी जागा आहे

रोजची रात्रं

कोजागिरीचीच असल्यासारखा

कोजागिरीचं अक्षय्य व्रत घेतल्यासारखा…

2 comments: