romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, June 24, 2008

आम्हाला आभाळाकडे बघायची उसंतच नव्हती…

आम्हाला आभाळाकडे बघायची उसंतच नव्हती…
त्यांनी केलेली चांदाची, आकाशगंगांची वर्णनं
वाचायला सवडच नव्हती…
आयुष्य उपसून वर आणत होतो,
दुसरय़ा मजल्यावर
रहात होतो अधांतरी
सगळे दोर कापले गेल्यावर
झाडानंच फुलाचं जगणं मातीमोल करावं
इर्ष्या मनातच दाबून असं किती काळ जगावं?...
आणि अचानक आभाळ बरसलं
गवताचं पातं न पातं सरसरलं
मनाच्या छोट्या खिडकीतून डोकावताच दिसली
गवताच्या असंख्य पात्यांनी
डोईवर मिरवलेली आकाशगंगा
आणि दूर डोंगरावर उमलणारं
एक देवगणी नक्षत्र!
आम्हाला आभाळाकडे बघायची उसंतच नव्हती!

Wednesday, June 4, 2008

“झुलवा” देवदासींच्या समस्येवरचं प्रायोगिक नाटक

“झुलवा” हे माझ्या आयुष्यात, माझ्याप्रमाणेच अनेकांच्या आयुष्यात आलेलं खूप महत्वाचं नाटक.या नाटकात मी जयंता, गावच्या सभापतीचा रंगेल मुलगा ही नायकवजा भूमिका केली.फार मोठी नसली तरी महत्वाची आणि लक्षात राहील अशी ही भूमिका होती.१९८७ च्या डिसेंबरमधे हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं.झुलवाचा पहिला प्रयोग संगीत नाटक अकादमी,दिल्ली च्या लोककलेवर आधारित नाट्यमहोत्सवात भारत भवन, भोपाळ इथे सादर झाला.
मुळात नाटक हे माध्यम अपघातानंच माझ्या आयुष्यात आलं.माझा, या माध्यमाचा संबंध येईल असं मलाच काय माझ्या परिचयातल्या कुणालाच कधीही वाटलं नव्हतं.काही छुटपुट समजल्या जाणाऱ्या पण नवोदिताला नक्कीच शिकवत रहाणाऱ्या एकांकिका-नाटकांतून काम केल्यावर झुलवा हे नाटक माझ्याकडे आलं.झुलवा या नाटकामुळे रंगभूमी या माध्यमानं माझा कब्जा घेतला.माझ्याजागी कुणीही असता तर त्याचं असंच झालं असतं.महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरच्या देवदासींच्या समस्येवरचं हे नाटक सत्यघटनेवर आधारित कादंबरीवरचं होतं.
हे माध्यमांतर होतं.कादंबरी या माध्यमातून नाटक निर्माण करायचं होतं.यात काही वेगळी, प्रसंगी अवघड आणि कसब मागणारी प्रक्रिया असते हे मला नंतर, आता लिहायला लागल्यावर लक्षात येतंय.त्यावेळी माझ्यागाठी तीन-चार वर्षांचं नाटक-एकांकिका यात भूमिका करणं होतं, याला अनुभव म्हणता येणार नाही.तर ते रूपांतर आमच्या समोर आलं.मी उत्सुकतेने कादंबरी आधीच वाचली होती.कादंबरीतलं बरचसं नाटकमाध्यमात आणता येणं या माध्यमाच्या मर्यादांमुळे शक्य नसतं, काही येत नाही हे मला हळूहळू समजत गेलं.चांगली भूमिका मिळाली मी तालमींमधे ओढला गेलो.
मला प्रचंड आवडणारी आणखी दोन माध्यमं माझ्यासमोर तालमीत अवतरत होती.संगीत आणि लोकनृत्य ही.एकाच जागी तीन तालमी सुरू झाल्या.प्रोज-म्हणजे नाटकातले संवाद आणि हालचाली, गीतं आणि संगीतरचना, नृत्यरचना आणि नृत्याची तालीम असं भारून टाकणारं वातावरण होतं!मी आलटून पालटून सगळ्याच ठिकाणी हपापल्यासारखा धावत होतो.त्यावेळी नाट्यशिक्षणाचं फारसं वारं नव्हतं.माझ्या दृष्टीनं हेच नाट्यशिक्षण होतं.
भूमिका करण्याबरोबर गाण्यांसाठी कोरसमधे साथ करणं, संवादांमधे येणाऱ्या आणि कथानक पुढे नेणाऱ्या समूहनृत्यांमधे सहभागी होणं हे माझ्यादृष्टीने अपूर्व होतं.रंगमंचावर हेही करायला मिळणं म्हणजे दुधात साखर होतं.पुढच्या प्रवासात भूमिकेबरोबरच याही कामाबद्दल चार कौतुकाचे शब्द नक्कीच कानावर पडले.त्यावेळी मात्र या सगळ्या वातावरणाने मंत्रून जाऊन झपाट्याने कामाला लागणं एवढंच डोक्यात होतं.बॅकस्टेजची कामं हे नाटकाचं महत्वाचं अंग.सगळे प्रायोगिक रंगकर्मी ते आपलं कर्तव्य मानतात.आम्हीही ते त्याच निष्ठेने केलं.या नाटकामुळे भोपाळ, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद, महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर अश्या ठिकाणी जाता आलं.जे पडेल ते काम आम्ही सगळेच उत्साहानं करत होतो.प्रायोगिक वातावरणात हे अर्थातच अभिप्रेत असतं.एकूण जवळ जवळ पस्तीस-चाळीस जणांचा आमचा संच होता.
या माध्यमाशी संबंध नसणाऱ्या आणि (त्यावेळी) नव्यानेच संबंध आलेल्या माझ्यासारख्यांना वर सांगितलेल्या गोष्टींव्यतिरिक्त या माध्यमात असलेल्या आव्हानांचा पत्ता नसतो.ह्या आव्हानात्मक गोष्टी एकूणात नगण्य वाटत असतात.वैयक्तिक पातळीवर ती आव्हानं असतात, कधीकधी ती नामोहरम करणारी त्यावेळी वाटतात.त्यावेळी मी नुकताच वैयक्तिक आयुष्यात अचानक झालेल्या आघातातून सावरत होतो.माझ्यासमोरही अशी आव्हानं आली.मी स्वत: त्यातून अत्यंत यशस्वीपणे बाहेर पडलो.मुख्य म्हणजे रंगभूमी आणि तिच्याशी संबंधित कुणाचाही अवमान न करता आणि अर्थातच आत्मसंमान न गमवता.या अनुभवांतून ह्या माध्यमातल्या वास्तवाचं मात्र भान आलं.