Pages

Thursday, January 8, 2009

माझं पहिलं पुस्तक_“आवर्त”_नाटक_नवलेखक अनुदान योजना, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई


 आवर्त_प्रवेश तिसरा

(वेळ दुपारची.रंगमंचावर झगझगीत उजेड येतो, तेव्हा प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला माई आणि बंटू जमिनीवर बसल्या आहेत.माई बंटूला गोष्टं सांगतेय)

माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?

बंटू: (गोष्टीत रंगलेली) काय?

माई: तिनं-(’बोकील’ असं नाव पुकारलं जाऊन घराच्या प्रवेशद्वारातून पोस्टाचं मोठं पाकीट आत पडतं.बंटू पटकन उठते.) उठली! उठली लगेच! बस! बस तू! गोष्टं सांगतेय ना मी? एक मिनिट जागेवर बसायला नको!

बंटू: काय गं आजी! (बसते)

माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?

बंटू: (अनिच्छेनेच) कॅऽऽय?

माई: तिनं किल्ल्यावरून उडी मारली-

बंटू: (डोळे विस्फारून) बाप रे!... पण किल्ला किती उंच असतो गं?

माई: (तिची लिंक तुटते, जराशी रागावून) आता किल्ला! (काय सांगावं ते समजत नाही) असेल… आपल्या चाळीएवढा!

बंटू: बाप रे! त्याच्यावरून उडी मारली?

माई: (डोळे मोठे करून) होऽऽ मग!

बंटू: आजी! आणि तिचं बाळ?

माई: हो तर! तिचं बाळ होतं नं-

बंटू: तिच्याबरोबर?

माई: मग! पाठीशी घट्ट बांधून घेतलंन होतं तिनं तिच्या शेल्यानी!

बंटू: बाप रे काय ग्रेट असेल नं ती!... पण काय गं?एवढ्या उंचावरून… तिला-बाळाला काही झालं नाही?

माई: अगं (हात वरून खाली आणून, डोळे मोठे) डायरेक्ट घोड्यावरून उडी मारलीन तिनी! मऽऽग! (बंटू भारावल्यासारखी पहातच रहाते.तेवढ्यात उघड्या प्रवेशद्वारातून बंटूचे आजोबा, बापू येतो.चपला काढतो.समोर पडलेलं पोस्टाचं पाकीट दिसतं, ते उचलतो.उलटसुलट पहातो.कॉटवर टाकतो.माईचं तिकडे लक्ष गेलंय, बंटूचं नाही.)

बंटू: (तंद्रीतून बाहेर येत) पण काय गं आजी, त्या बाळाचे बाबा गं?

माई: (बाथरूमकडे जाणाऱ्या बापूकडे पहात) गेले असतील गं कुठेतरी उलथायला! (बापू स्वैपाकघरात जाऊन थांबतो, मग बाथरूमकडे जातो)

बंटू: असं काय बोलतेस आजी?युध्दं चालू होतं नं?

माई: (बापू गेला त्या दिशेने नजर टाकत) हो बाई, रात्रंदिन युध्दंच!

बंटू: मग त्या बाळाचे बाबा-

माई: (चिडते) काय गं? बाबा! बाबा! इथे मी गोष्टं कुणाची सांगतेय?... त्याच्या बाबांबद्दल काही बोलतेय का मी? (बंटू वरमते, नाही अशी मान हलवते) नाही नं? मग? तुझे नं आपले नसते प्रश्न.तू जरा मी सांगते ते ऐक! (बापू बाहेर आलाय) कळलं ना? (माईचं बापूकडे लक्ष जातं) मी सांगतो तसं वागतो ना, त्याचंच भलं होणार, ऐक तू बंटू!

बंटू: आजी, भलं म्हणजे? (बापू गालातल्या गालात हसतो, माई वैतागते)

माई: झालं मेलं तुझं सुरू!... का? कसं? कुठे? कुणाला? कशाला? तुला काय करायचं गं हे सगळं? सांगितलं नं मघाशी? मोठ्या माणसाचं (लक्षात येऊन) म्हणजे माझं-ऐकायचं! (उठत) चऽऽला बाईऽऽ

बंटू: आता कुठे गं? आणि गोष्टं अर्धीच राहिली! (बापू ते पोस्टाचं पाकीट उघडून वाचतोय, त्याच्याकडे लक्ष जाऊन) अय्या! आजोबा, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही! (त्याच्या अंगाला झोंबते.तो ’अगं अगं थांब वाचू दे’ असं म्हणतो.माई तिटकाऱ्याने पहातेय)

माई: (गरजते) बंटू! (बंटू घाबरते.आजोबाला आणखी घट्ट मिठी मारते.माई हातवाऱ्याने) चल! पहिले आत चल! हातपाय-तोंड धू! बाथरूममधे दुसरा फ्रॉक ठेवलाय! बदल! आणि चल माझ्याबरोबर! (बंटू आजोबांकडे पहाते) चल म्हणते ना! (बापू बंटूला थोपटतो.तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.’आत जा’ अशी खूण करतो.बंटू आत जाते.माईही तरतरा आत जाते.)…     

(प्रकाशक: मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ३९, प्रकाशन दिनांक: गुढीपाडवा २६ मार्च, २००१) 

No comments:

Post a Comment