Pages

Saturday, August 7, 2010

भवितव्य

शहरात एक दोन दिवसात महाविद्यालयीन प्रवेशाची पहिली यादी लागेल.मग दुसरी, तिसरी आणि मग कोण जाणे कितवी! बेस्ट ऑफ फाईव्ह्चा गोंधळ असेल न लक्षात? या सगळ्याच्या निमित्ताने मला आठवली एक गोष्टं.तशी जुनी पण…
दहावी किंवा बारावी असेल, परिक्षांचा मौसम.अशा वेळी परीक्षाकेंद्र हा किती संवेदनशील भाग असेल! मनूला मी नेहेमी आचरट म्हणतो हे कदाचित तुम्हाला आवडत नसेल पण असंख्य मुलं आणि त्यांचे पालक अतिशय कासावीस अवस्थेत असतील अशावेळी कुणी परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या फूटपाथवर चक्कं आनंदात पत्ते पिसत असलेला दिसला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? बरं, ते पत्ते पिसत उभं रहाणंही असं की जणू बघणारय़ाला आवाहनच करतोय! मी त्याला बघून कपाळाला हात लावला.
जुन्या हिंदी सिनेमात राजेंद्रनाथ असायचा.आचरटांचा बादशहा.इथे मनू.त्याच्यापेक्षा काकणभरही कमी नसणारा.मी हे पुन्हा एकदा ओळखलं आणि तिथून कट मारायच्या प्रयत्नात होतो आणि पत्ते पिसण्याचा जोरदार आवाज करून- खाचखाचखाच असा- मनूनं मला बोलवलंच!
कुणी समोरून बोलावलं तर जायलाच हवं.त्यात हा मनू.इकडे तिकडे बघत मी चाचरत त्याला म्हणालो, अरे हे शोभतं काय तुला? मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भवितव्याची नाजूक वेळ ही! हे काय चाललंय तुझं? मनूचं त्यावरचं उत्तर म्हणजे स्टायलिश हसणं.पत्ते पिसणं चालूच! माझ्या लक्षात आलं मनू आज बोलतही नाहिए! मला बघितल्यावर नेहेमीसारखी आरोळी ठोकली नाही.बरं हसणंही आवाजविरहित.फक्त फवारा.
मी त्याच्या पत्ते असलेल्या हातावर हात मारला आणि प्रवेशकेंद्राच्या त्या प्रवेशद्वारापासून त्याला लांब खेचलं.करवादलो, हे काय नाटक? अरे बोल तरी! मनूनं शूऽ शूऽ करून माझा हात सोडवला.मला गप्पं बसायची खूण केली.पत्त्याच्या जोडामधून एक पत्ता काढला.मला दाखवला.त्या पत्त्यावर एक चित्र होतं.मुलं परिक्षेचा पेपर लिहित असल्याचं.मी मनूकडे बघितलं.त्यानं जादूगारासारखं ते कार्ड उलटं केलं.उलट्या बाजूला आणखी एक चित्र होतं.मुलगा आपलं डोकं गच्च धरून ते पुस्तकात खुपसतोय.वर ढणढणीत दिवा लागलाय.आई त्याला वारा घालतेय.वडील बर्फाची पिशवी घेऊन उभे आहेत.मी पुन्हा मनूकडे बघितलं. तोंडावर बोट धरून त्याने पुन्हा शू:ऽऽ केलं.मला कळलं परिक्षा चालू आहे, शांतता पाळा.ठीक आहे मी म्हटलं, पुढे? मनूनं पुन्हा जादूगार के लालसारखा पत्त्यांवरून हात मारला.आणखी एक पत्ता काढला.माझ्यासमोर धरला.
फाईव्ह स्टार कोचिंग क्लासमधलं चित्र.सरांनी पुस्तकं-वह्या बाजूला सारल्या आहेत आणि कॉम्प्युटरसारख्या यंत्रातून ते नमुना प्रश्नपत्रिका काढताहेत, मुलांना वाटताहेत.हे झालं मोठ्या सरांचं.छोटे सर दुसरय़ा यंत्रातून नमुनेदार उत्तरं काढताहेत, मुलांना वाटताहेत.मुलांच्या चेहेरय़ावर आनंद.तोपर्यंत मनूनं ते कार्ड, तो पत्ता उलटला.या बाजूचं चित्र बघून मला भरून आलं.एक पालक ऑफिसमधे मरमरून ओवरटाईम करतोय.दुसरा मारवाड्याकडे, असलेलं सगळं गहाण टाकतोय.कुणी पालक हातगाडी खेचतोय.कुणी साहेबाचा ओरडा खातोय.कुणी वाणी, वीज, दूध इत्यादी बिलं थकवली आहेत.मी मनूकडे बघितलं.मनूनं जोरात भुवया उडवल्या- काय? या अर्थी.हे चित्र जरा वास्तवाला सोडूनच होतं पण माझी उत्सुकता मात्र आता चाळवली गेली होती.मी कसलेल्या जुगारय़ासारखं म्हटलं, नेक्स्ट? पुढे?
द ग्रेट गँबलरसारखा मनूने पुन्हा पत्त्यांवर हात मारला.आणखी एक पत्ता बाहेर काढला, दाखवला.ही गरीब वस्तीतली पोरं होती.कुणी रस्त्यावर झाडाखाली फाटकं पुस्तक घेऊन बसला होता.कुणी बागेत फिरत पिपाण्या, अनेक लहान मुलं, आजूबाजूची रहदारी यांच्या गोंगाटात लक्ष एकाग्र करायचा प्रयत्न करत होता.एका पोराला त्याचा दारूडा बाप, पैसे कमवून आण म्हणून मारत होता.एक पोरगी शाळेत जायचं सोडून धुणी-भांड्याचा ढीग उपसत होती.पाणी सांडलं म्हणून एक वेटर मुलगा गिर्हाईकाचा मार खात होता.मनूनं ते चित्र उलटलं.मागच्या बाजूला अनेक चित्रांचा कल्लोळ होता.कुणाला ४०-५० फार फार तर ७०-८० टक्के मिळालेले.कुणी नाक्यावर गर्दी करून चेष्टामस्करी करतंय.तर कुणाच्या हातात चाकू, कुणाच्या गन, कोणकोणाच्या उरावर बसलेलं, कोणकुणाची अब्रु लुटणारं.मला पुढे बघवेना.माझा चेहेरा फारच करूण झालेला असावा.खाच खाच पिसून मनूनं रंगीत चकचकीत कार्ड बाहेर काढलं.त्यावर सगळी गोरी गोरी, घारय़ा घारय़ा डोळ्यांची मुलं.सगळी सुटाबुटात.साडे नव्याण्णऊ, पावणे नव्याण्णऊ, सव्वा नव्याण्णऊ, नव्याण्णऊ टक्के मार्क मिळवलेली ही गोजिरवाणी फुलं! मी खूष झालो.
मनूनं लगेच ते कार्ड उलटलं.या बाजूला परदेशी जाणारं विमान.विमानाभोवती जमलेले आनंदित आई-बाप.खिडक्या-खिडक्यांमधून त्यांना अलविदा करून परदेशी जाणारी हुशार मुलं.
मनू मला आता उसंतच देत नव्हता.पुढच्या पिसलेल्या पत्त्यावर एका बाजूला ७० ते ९० टक्के मिळवलेल्या मुलांनी मनासारखं झालं नाही म्हणून केलेल्या आत्महत्त्या.कुणी कुरियर सेवेत दारोदार भटकतंय.गवर्न्मेंट जॉब- नाही.बॅंक जॉब- नाही.कायम नोकरी- नाही.असे बोर्ड लावलेले आणि एका बाजूला परममहासंगणकाचं चित्र.मनूकडे अजून अनेक पत्ते होते पण त्यांच्यावर दोन्ही बाजूला चित्रं होती संगणकांची.वेगवेगळ्या प्रकारच्या संगणकांची.माणसं कुठेच दिसत नव्हती…

No comments:

Post a Comment