Pages

Monday, August 30, 2010

“भगवा, हिरवा की लाल?...” कॉमेडी शो!

आठवडाभराचं रूटीन संपलं की माझ्यासारखा माणूस आख्ख्या देशाचं नव्हे तर जगाचं ओझं आपल्या डोक्यावरून उतरल्यासारखा जे तंगड्या वर करतो ते रविवारी रात्री नको तेवढ्या आरामामुळे तंगड्यांची चाळवाचाळव होत राहिली की खरय़ा अर्थाने जागा होतो असा माझा एक समज झालाय.तेव्हा त्याला मग काय काय आठवायला लागतं.काय काय जाणीवा व्हायला लागतात.कसले कसले साक्षात्कार व्हायला लागतात.आपली स्वप्नं साक्षात्कारांसाठीच आंदण दिली गेली आहेत असा काहीतरीही माझा आणखी एक समज त्यावेळी होत असतो.मी तो करून घेत असतो असं म्हणूया.
या वीकएन्ड अर्थात सप्ताहसमाप्तीच्या शेवटच्या चरणांत असंच होऊ लागलं.सप्ताह, चरण वगैरे शब्द इथे आलेत ते अनवधानाने असं समजू नका.लिहिणारा म्हणून शब्दांचा सोस आहे ते तर सोडाच पण एकाच वेळी श्रावण, रमजान आणि येऊ घातलेलं पर्युषणपर्व वगैरे या शब्दयोजनेमागे आहे असा माझा आणखी एक समज होऊ घातला आहे.असो.सांगायचा मुद्दा मी दीड दिवस ढेंगा वर करून करून स्वयंकेंद्रित विचार-आचारांमधे पूर्ण बुडून रविवारच्या उत्तररात्री जरा कुठे जगाचा विचार वगैरेच्या किनारय़ाला लागत होतो बहुतेक आणि तेव्हाच भगवा, हिरवा, राखाडी, काळा, लाल वगैरेंच्या विळख्यात कसा सापडत गेलो त्याची ही गोष्टं.
भगवा वगैरे हे काय नव्याने? असं मी माझ्याच अंतर्मनाला विचारत आढ्याकडे बघत बिछाना जागवू लागलो.कुटुंबियांचे घोरण्याचे आवाज विचारांना पार्श्वसंगीत पुरवत होते.बाहेरचा कुठलातरी इंग्रजीत डिझमल का म्हणतात तसला लाईट प्रकाशयोजना पुरवत होता आणि अचानक एक बायस्कोपवाला दिसायला लागला.
लहानपणी पत्र्याचा पेटारा डोक्यावर घेऊन एक माणूस फिरताना दिसायाचा.खांद्याला लाकडी फोल्डिंगचा स्टॅंड लावलेला.नाक्यावर स्टॅंड उघडून त्यावर तो पेटारा ठेवायचा.त्या पेटारय़ाला दोरय़ा लावलेली पत्र्याच्या डब्यांना त्यावेळी असायची तशी तीन झाकणं शेजारी शेजारी लावलेली असायची.मग तो गोंड्यांची टोपी घालायचा.सॅंटाक्लॉजसारखी किंवा सर्कशीतल्या जोकरसारखी.स्टॅंडवर लावलेल्या पेटारय़ाच्या मागे तो सूत्रधार उभा रहायचा.पेटारय़ावर खिळ्याने ठोकलेला भजनातल्या टाळाचा एक भाग, आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला धाग्याने घट्टं बांधलेल्या दुसरय़ा भागाने बडवायला लागायचा.’बंबई देखो! दिल्ली देखो!’ असं गाणं म्हणून लहान पोरांना गोळा करायचा.पोरं घरी हट्टं करून पैसे मागायची.त्या बायस्कोपवाल्याच्या हातात कोंबायची आणि झाकणं उघडून आत दिसणारय़ा सिनेमात रममाण व्हायची.बायस्कोपवाला पेटारय़ावरचं हॅंडल फिरवून चित्रं दाखवायचा.दात विचकून भोवताली जमलेल्या इतर मुलांकडे बघत हसायचा.त्याचे एकाडएक सोनेरी दात, पान खाऊन खाऊन लाल झालेले.जमलेल्या आणि आशाळभूतपणे त्याच्याकडे बघणारय़ा लहान मुलांच्या तोंडाजवळ आपलं तसलं ते तोंड नेऊन तो टोपीच्या वरच्या टोकाला असलेला लाल गोंडा टोपीभोवती गोल गोल फिरवायचा.त्याचं भयानक तोंड बघून घाबरायचं की गोंड्याची जादू बघून चकीत व्हायचं ते लहान मुलांना समजायचं नाही.भीती दाखवणं, जादूसम चमत्कार करतोय असं भासवणं या गोष्टी मुलांना फसवायला गरजेच्या असतात हे त्या अनाडी, गावंढळ दिसणारय़ा बायस्कोपवाल्याला पक्कं माहित असायचं.तो यशस्वी व्हायचा.दात आणखी विचकत हसून टोपीवरचा गोंडा आणखी गोल गोल फिरवत तो आणखी पोरं आणि पैसे गोळा करायचा.
मला आता दिसत असलेला बायस्कोपवाला तोच होता पण त्याच्याभोवती होती मोठ्या माणसांची हीऽऽ गर्दी! लहान मुलं हल्ली टीव्हीवरच्या विविध वाहिन्यांवर चालणारय़ा त्याच त्या स्त्रीकेंद्रित मालिका बघून मोठी होताएत हे मला माझ्या त्या अवस्थेतही समजत होतं पण ही मोठी माणसं मोबाईलवर किंवा इंटरनेट्वर एमएमएस क्लिप्स बघायच्या सोडून, एसेमेस पाठवून जग जिंकायचं सोडून किंवा छोटीमोठी फिक्सिंग्ज करायची सोडून बायस्कोपवाल्याजवळ का गर्दी करताएत हे न कळून मी चाट पडलो.शिवाय बायस्कोपचंही तिकीट पाचशे रूपये.मल्टिप्लेक्स सुविधा नसतानासुद्धा.बरं, बायस्कोपवाल्याचा तो खेळ बघून उठणारा प्रौढही भारावून जात ’सॉलिऽऽड सॉलिड…’ असं पुढच्याला सांगत आपल्या ’नेक्स्ट फिक्सिंग’ ला मोकळा होतोय!हे बघून मला रहावेना.
मी पुढे होण्याआधी त्या बायस्कोपवाल्यानं पुढे होऊन माझ्या तोंडासमोर तोंड आणून दात विचकले आणि पदोपदी चाट पडण्याचं सामान्य माणसाचं कर्तव्य मी आणखी एकदा पार पाडलं.माझ्या हातून पाचशेची नोट खेचून माझं डोकं त्या झाकणाच्या जागी खुपसणारा तो महाभाग आपला ’मनू’च होता!
पेटारय़ावरची झांज वाजवत मनूचं गाणं सुरू झालं आणि कांडी फिरवणंही- हॅंडलची. ’देखो देखो! इंडिया देखो! पाकिस्तान देखो! एकही देस के दो टुकडे देखो!’ हे गाणं म्हणत असताना मनू हिंदू-मुसलमानांच्या भयानक कत्तली डोळ्यांपुढून सरकवत होता.ही चित्रं जुन्या जमान्यातली काळ्या-पांढरय़ा रंगातली होती पण सगळीकडे सांडलेलं सामान्य माणसाचं रक्त मात्र लालेलाल दिसत होतं.दोन्ही देशांचे नेते खूष कसे दिसत होते? इंग्रजी माणसांनी भरलेली बोट हसत हसत हात दाखवून टाटा करत किनारा सोडत होती.झेंड्यांचे रंग वेगवेगळे होते पण रक्ताचा रंग लाल आणि राखेचा काळा ठिक्कर!
’आयोध्या देखो, मस्जिद देखो, मस्जिद की जगहा मंदिर देखो’ ह्या मनूच्या गाण्यावर माझे पाय थिरकताहेत- नाहीत तोपर्यंत ’दाऊद देखो, बम देखो, बम- बम- बंबई- नही- मुंबई द्येखो, आरडीएक्स देखो, राष्ट्रवादी दाऊद का कमाल द्येखो’ हे गाणं मनूनं सुरू केलं आणि रंगीत चित्रांची मालिका कधी सुरू झाली कळलंच नाही! पेटलेल्या मुंबईचा रंग भगवा होता की हिरवा होता? की लाल होता? मुंबईदर्शनच्या त्या सहलीत मी हरवून जात होतो.महानमाज, महाआरती, राधाबाई चाळ, डोंगरीतला कर्फ्यू… जळजळत राख राख होत चाललेली मुंबई… मग नेत्यांची चित्रं सुरू झाली, हात मिळवणी करणारी.तुझं सरकार.माझं सरकार.तुमचं-आमचं, आपलं-तुपलं चमचमीत युतीचं आणि आघाडीचं सरकार…
’दारासिंग देखो!- पहेलवान नही!!- जलती हुई गाडी द्येखो!’ असा पुकारा मनूनं सुरू केला आणि चित्रांचा नवा अध्याय सुरू झाला.ख्रिश्चन धर्मप्रसारकाच्या गाडीला लावलेली आग.होरपळलेली त्याची मुलं.रडणारी त्याची बायको आणि मुलगी. ’एम पी द्येखो, नन्स द्येखो! देखो देखो द्येखते ज्यावो!’ या गाण्यावर मध्यप्रदेशातल्या नन्स- ख्रिश्चन धर्मसेविका रडत रडत आपल्या कहाण्या सांगणारय़ा…
मनूच्या गाण्याचा जोर वाढला, वेग वाढला, चित्रं आणखी भराभर पुढे पुढे सरकू लागली.सहाजिक होतं.जागतिकीकरणाचा रेटा वाढला होता.कुणी खलिस्तान मागत होतं, कुणी गोरखालॅंड तर कुणी बनत होतं तामिळी वाघ.देशाचे दोन पंतप्रधान कुत्र्याच्या मौतीनं मेल्याचीही चित्रं होती.सगळ्या चित्रांच्या पार्श्वभूमीवर हकनाक मरणारे, जळणारे, राख राख होणारे असंख्य सामान्य…
मनू ओरडत होता.चित्रं दाखवतच होता.माझे झाकणाला लागलेले डोळे या कडेपासून त्या कडेपर्यंत नुसते भिरभिरत होते.एकही चित्र सुटू नये म्हणून धडपडत होते आणि चित्रं धरून ठेवता येत नाहीत म्हणून तडफडत होते.गंमत अशी की इतकी भयाण होत जाणारी भिरभिरणारी चित्रं बघून थकण्याऐवजी त्या बायस्कोपचं गारूड डोळे स्वत:वर स्वार करून घेत होते…
’देखो देखो मॅनहटन का ट्विन टॉवर द्येखो! उस पर घुसती हुई विमाने द्येखो! हजारो लोगों के शव द्येखो! लापता लोगों की लिस्ट द्येखो! दाढीवाला लादेन द्येखो! जल्दी द्येखो!’ मनू दमत नव्हता. ’गोधरा देखो! ट्रेनमें जलती हुये कारसेवक देको! जलता, टूटता गुजरात देको! इशरत देको! जल्दी जल्दी! नई तो सीएसटीसे आपकी गाडी छूट जाएगी! हाऽहाऽहा अजमल द्येखो! बुलेट प्रुफ जॅकेट द्येखो! ये सब चार दिन टीवीपर द्येखा! अब इदरबी द्येको!’ उध्वस्त झालेले असंख्य संसार, माणसं घाबरून हादरलेली, पार्श्वभूमीवर कोसळणारे स्वत:चे अश्रू पुसणारे नेते… माझं डोकं झाकणातून भिरभिरत सुटलंच… पण ते पुरतं सुटलं नाही… मनू आणखी माणसं जमवून, पैसे कमवून बायस्कोप दाखवण्याच्या आपल्या धर्माला जागत होता.
मी मात्रं भगवा? की हिरवा? की राखाडी? की काळा? की सरता शेवटचा लाल!!! या विळख्यात चांगलाच अडकत चाललो होतो…

1 comment:

  1. Is RANG badalati duniya me kya tera hai kya mera hai...

    Dekh bhai dekh

    ReplyDelete