Pages

Sunday, May 8, 2011

मोहिनी आणि कबीर (२)

भाग १ इथे वाचा.
“कबीर?” सिंगचा चेहेरा सगळ्या जेलची काळजी डोक्यावर पडल्यासारखा झालाय...
“होय सिंगजी, कबीर!”
सिंग अचानक घाईघाईने निघलाय.
“पण तुम्ही आत्ताच कुठे निघालात?”
“माझा चोवीस घंट्याचा पहारा सुरू झालाय मॅडम!”
“कुठे?”
“इथे मॅडमसाब!”
“माझ्यावर?” मोहिनी हसायला लागल्यावर सिंग नर्वस.
“मॅडम तुम्हाला काळजी नाही वाटत कशाचीच!”
“वाटते ना! तुमची, बाईजींची-” मोहिनीचं हसू आणखी वाढलंय आणि सिंग कपाळाला हात लावतो.मोहिनीची लकेर वाढत चाललीए.
“नाही वाटत का सिंगजी? आणि- तुम्ही या जेलची ड्युटी करायची!”
“माफ करा मॅडम मी जेलचीच-”
“तुम्ही माझी जास्त काळजी घेताय!”
“ते काय आपल्याला समजत नाय्! गेली तीस वर्षं मी या जेलची आणि जेलचा सबसे बडा साब या दोघांचीही हिफाजत करतोय, तिच माझी ड्युटी!” मोहिनी गंभीर झालीय.IPS Beret“सिंगजी... फार करता तुम्ही माझ्यासाठी... तुमच्या सारख्यांमुळेच माणूसकी हा शब्द तरी अजून जिवंत आहे असं वाटतं! नाहीतर...”
“तो... कधी येणार आहे इथे?”
“कोण?” मोहिनी अजून त्याच तंद्रीत आहे.
“कबीर, मॅडम!”
“येईल इतक्यात-”
“इतक्यात?”
“हो! का?... जन्मठेपेचा कैदी हायकोर्टातून सरळ इथेच येतो सिंगजी! आणि- ते कितीसं लांब आहे!”
सिंगचे डोळे चमकतात.तो मान वेळावतो.
“छान! जन्मठेप झाली तर!”
“हायकोर्टात!... कबीरलाल हे काही साधंसुधं प्रकरण समजू नका तुम्ही!... सुप्रीम कोर्ट, मग राष्ट्रपती या पुढच्या पायरय़ा त्याच्या दृष्टीनं फार कठीण नाहीत!...” मोहिनी विषय संपलाय असा संकेत देते.पुन्हा टेबलावरची विशिष्टं कागदपत्रं चाळू लागलीए.
सिंगचा चेहेरा स्थिर.डोळे रोखलेले.
“हिफाजत करणारय़ाना कुठल्याच पायरय़ा नाहीत मॅडम!”
मोहिनी हातातल्या पेपर्सवर एकाग्र.तंद्रीत, “काय?” सिंग मुद्दा स्पष्टं करण्याच्या तयारीत असतानाच, “एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं तत्वं आहे-”
सिंग आता चर्चा करण्याच्या मूडमधे आलाय.
“निरपराध! खरंय मॅडम! पण कडक शिक्षा दिलेल्या आरोपीची शिक्षा सौम्य करणं, शिक्षेत सवलत देणं-”
“सिंगजी... तुम्ही म्हणताय ते अजिबात चूक नाहीए! पण सिस्टीम- यंत्रणा- ही जी गोष्टं आहे त्याच्याबाहेर-”
सिंग मधे बोलायचा प्रयत्न करतोय, त्याला अडवते,
“माहितीए मला सिंगजी- तुम्ही म्हणाल मी नेहेमीचं कारण पुढे करतेय पण हे तुम्हालाही निश्चित माहित झालंय की आपल्यासारख्यांच्या सेवांना एका मर्यादेतच काम करावं लागतं.त्या बाहेरच्या गोष्टी-”
मोहिनीला बोलणं थांबवणं भाग पडलंय.
केबिनच्या बाहेर गडबड सुरू झालीए.सिंग दरवाज्याजवळ पोचतो.मोहिनी स्वत:च्या नकळत उभी रहाते.प्रथम एक पोलिस अधिकारी केबिनमधे आलाय.तो मोहिनीला सॅल्यूट करतो.त्या पाठोपाठ एक शिपाई.त्याच्या एका हातातल्या बेडीत अडकवलेला कबीर- सहा फूट उंच, पांढरा फटक गोरा, डोक्यावर आणि चेहेरय़ावर केसांचे फक्तं खूंटं, घामानं थबथबलेला, सावकाश आत येतो.मागे आणखी दोन शिपाई, त्याच्या हातातली दुसरी बेडी पकडून.कबीर मोहिनीकडे पहातो.तिच्यावरून त्याची नजर सापासारखी फिरायला लागते.मोहिनी प्रथम आक्रसून गेलेली.मग मुठी घट्टं आवळते.रूबाबात खुर्चीत बसते.तिच्या हालचालीने कबीरची तंद्री भंगलीय.तो स्वत:शीच हसतो.शर्टाच्या बाहीने घाम पुसू लागतो.मोहिनीला सॅल्यूट करणारा तो अधिकारी आणखी पुढे झालाय.त्याच्या हातात एक जड फाईल.ती तो मोहिनीकडे सुपूर्द करतो.अदबीनं वाकून हलक्या आवाजात ब्रीफ करायला सुरवात करतो...

No comments:

Post a Comment