Pages

Tuesday, July 19, 2011

राज्य (२)

त्याची बेरकी नजर आता डोळ्यांच्या कोपरय़ातून तिच्या भोकाडावर.तिचं भोकाड विरू लागतं तसा तो सरसावतो.
“काही.. काही झालेलं नाही.. अजून मी आहे!.. मी आहे जिवंत!”
“कशाला?”
“आहे, आहे, म्हणजे एवढे दिवस जे काही केलं-”
“काय केलंत? ही एवढी तीन-तीन मुलं जन्माला घातलीत!”
“त्याना काय कमी लागतं?”
“नणंदांची लग्नं, दिरांच्या मुंजी.. कर्जाचा हा डोंगर.खिशात नाही काय आणि रूबाब हाय फाय!”
वाद नेहेमीच्याच रस्त्यावर येतोय हे बघून त्याची भीड चेपते.तो आणखी सरसावतो.
“कुणासाठी मर मर मरत होतो एवढा? कुणासाठी-”
“अंगावर येऊ नका! काय उपकार केलेत? आपल्या प्रजेला खायला, प्यायला, ल्यायला कुणी शेजारय़ांनी घालायचं? काय गरज होती ऐपत नसताना एवढे सण, समारंभ, लग्नं-मुंजी एवढ्या थाटामाटात करायची? कर्ज वाढवायची?”
तो हात झटकतो, “झालं ते गेलं!”
“कुठे? काशीत?”
त्याला पर्याय नाही, तो हात चोळत कॉटवर बसतो.तिचं चालूच.
“मोठ्याला लाडावून ठेवलंत.तो आपला पुतळ्यासारखा सतत नाक्यावर!”
“शिंग फुटली त्याला आता! कुणी तोंडाला लागायचं त्याच्या?”
“मी आहे की! मी आहेच इथे सगळ्यांचं सगळं सहन करायला वर्षानुवर्षं!”
तो निर्लज्ज झालेला, “मग आता काय करायचं? सांग!”
ती क्षणभर त्याच्याकडे पहाते.तो दचकून न दचकल्याचं दाखवत अंदाज घेतोय.आत्तापर्यंत बसलेली ती उठून त्याच्याजवळ येते.
“केशीऽऽवाऽऽ माधीवाऽऽ.. करायचं! एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन! पेटी वाजावा तुम्ही, मी गाते! शेजारी आहेतच भीका द्यायला! नाहीच पुरलं तर लोकल ट्रेनमधे जाऊ! तरीही नाही झालं तर..” ती मुद्दाम थांबते.
“तर काय?”
ती त्या संधीची वाटच पहात असलेली.महारोग्यासारखी हाताची बोटं आत वळवते, “स्वयंरोजगार योजनेसाठी अर्ज करू! मग काय कमी आहे?”
“तुझ्यापुढे बोलायचं म्हणजे अगदी-”
“काही बाकी ठेवलंत?”
तो लगेच साळसूद झालाय.
“हे बघ! आता जे झालं ते झालं! त्याला काही इलाज आहे?.. काय करायचं सांग! सतत तेच तेच बोलून काय उपयोग आहे? आहे त्या परिस्थितीत मी काय कमी केलं घरासाठी? आता वेळंच तशी आली त्याला कोण काय करणार? मला काय काळजी नाही तुम्हा सगळ्यांची? होईल काहीतरी! पडू यातूनही बाहेर!बाबा आजारी पडले.. एवढं मोठं आजारपण! त्यावेळी कफल्लक नव्हतो झालो! नाही सावरलो त्यातून? मग? काय कठीण आहे? फारसं काही झालेलं नाहीए! बघू.. काही तरी करू.. होईल काही.. जमेल बहुतेक.. आपल्याला काहीतरी करावं लागेल.. करू!ऽऽ.. आता असं एकदम-”
त्याचं बोलणं ऐकत ती अवाक् झालेली.अचानक त्याच्या पायाशी साष्टांग लोटांगण घालते.
“अगं अगं हे काय? मला काय-”
ती उठते.शांतपणे हात जोडून उभी रहाते.डोळे मिटून.तो भांबावल्यासारखा.ती उजवा हात वर करते.तो घाबरलेला.ती घंटा वाजवल्यासारखा हात हलवते.तो दचकतो.ती पुन्हा मनोभावे हात जोडून उभी रहाते.तो उदास.ती आतल्या खोलीत जायला वळते.त्याचवेळी बाहेरून यायचं दार हळूच किलकिलं होतं.दोन्ही दरवाज्यांमधून एक बारीक केलेल्या, उभ्या राहिलेल्या केसांचं, जाड काचांच्या चष्म्याचं डोकं आत डोकावतं.
“मी आत येऊ?.. की नको येऊ?”
तो आणि ती दोघांचंही तिकडे लक्षं नाही.
“शुक् शुक्! येऊ ना?.. की नकोच येऊ?.. आई, बाबा.. सांगा ना?”
बाप कॉटवर स्वस्थं बसतो.घाम पुसत.आई पुजेहून घरी निघाल्यासारखी, उचललेल्या तळहातावर पुजेचं ताह्मण घेऊन.परंपरागत पोजमधे थांबते.पाठीवर ओझं असलेला कॉलेजवयीन मुलगा डोकं पूर्ण बाहेर काढून हमालासारखा वाकत आत येतो.
“काही झालंय?.. की काहीच झालेलं नाहीये?.. आई तू तरी.. आणि बाबा! तुम्ही या वेळेला घरी?.. सहज की मुद्दाम?.. थांबणार की परत जाणार?” दोघांकडे बघत राहिलेला.आई यांत्रिकपणे एकदम खालच्या आवाजात बोलू लागते.
“राजू तू जेऊन घेतोस नं? ये चल् आत ये!”
राजू बापाकडे पहात पहात आईच्या हाताला धरून लहान मूल जातं, तसा आत जातो...

5 comments:

  1. उत्कंठा वाढली आहे... :)

    जीवनाषुंगाने येणार्‍या अनेक " (भ्र पासून... )चारां " वर सूचक...

    ReplyDelete
  2. प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद भाग्यश्री! :)

    ReplyDelete
  3. ह्म्म्म...वाचते आता पुढचा भाग. :)

    ReplyDelete