Pages

Saturday, January 21, 2012

आमच्या मुलांना सांभाळाऽऽ (२)

              भाग १ इथे वाचा!               
दोन्ही पायांचं जवळ जवळ धनुष्य झालेली आजी डोलत डोलत आल्यासारखी येते. त्रासलेली.  “आले रे आले 
बाबा! काय बोंबाबोंब तुझी अंकित गावभर आय आय गंऽ?”  गुडघे दाबत फ्लॅटकडे जाणारय़ा पायरय़ा 
चढतेय. पॅसेजमधल्या कट्ट्याकडे बोट दाखवत अंकित आजीला खेचतो. 
आज्जी इकडे! इकडे!
आजी चिडलेली. आजूबाजूला बघत हतबल झालेली.
अंकित! काय हे अंकित! अरे कसा वागतोस! कसा ओरडतोस! अं?
आजी प्लीऽऽज! प्लीज ना! बसूया ना कट्ट्यावर!
नकोरे! संध्याकाळ झालीय डास फोडून खातील! आत चल!
नाऽऽईऽ इतेच! गोष्ट सांग!
आत चल आत. सांगते गोष्टं!
अंकित विचित्र आवाजात भोकाड पसरतो. आजी कानावर हात ठेवते.
बस रे बाबा! बस! थांबव! थांबव तुझं भेकणं!.. हे जातात ऑफिसमधे मजेत!
सांभाळायला आहे म्हातारी!.. थांब रे बाबा!.. अगं आईऽऽगं!
कट्ट्यावर बसते. अंकित स्वीच ऑफ केल्यासारखा शांत.
आहे? हे रडणं तुझं!.. हसतोय! अगं आई गं! आहे ते सगळं छान आहे!
अंकित आजीला बिलगून कट्ट्यावर बसतो.
आईबाप सुखी रे तुझे! मारत असतील मजा!
सांगू! ममी पपाला सांगू हे?
सांग! माझा सासरा ना तू?
गोष्टं सांग!
अगं आई गं! हे आले नरभक्षक!
म्हणजे कोण आजी?
अरे मेल्या डास! आणि कोण?
आजी गोष्टं!
अंगठा तोंडात घालून तिच्या मांडीवर डोकं ठेवतो.
याची गोष्टं म्हणजे मला शिक्षा!.. आई गं! हा आणखी एक म्येऽऽला!
अंकित स्वत:च्या पायाकडे हात करतो.
आज्जड! इथे इथे पण!
आजी चिडून त्याच्याकडे बघते. त्याच्या पायावरचाही डास मारते.
हं! कुठली गोष्टं बाबा?
कृष्णबाळाची!
हं! तर ते छोटं बाळ आपल्या घरी आलेलं पाहून यशोदेला खूप आनंद झाला!
वसुदेवानं, कृष्णबाळाच्या बाबानं मोठ्या विश्वासानं बाळाला यशोदेच्या हातात दिलं!
तिचं पण पाळणाघर होतं आपल्या या निमामावशीसारखं?
डोंबल!
आजी मला का नाही पाठवत तिच्याकडे?
यशोदेकडे? आजी हसते.
डोंबल!
आजी चिडते.
अं!
अगं शेजारच्या निमामावशीकडे गं!
कशाला?
केवढी मुलं असतात तिच्याकडे! खूऽऽप!
हे बघ अंकित! आईऽ हा बघ! आणखी एक म्येऽऽला!– अरेऽ त्या मुलांना आजी
नसते घरी सांभाळायला! लाड करणारी! निमामावशी किती रागावते माहितीये ना
मुलांना? पैसे किती घेते वर! आईंगं! चल बाबा आत चल या डासांचं काही खरं
नाही!
गोष्टं!
देवा! सोडव रे बाबा या गोष्टीतून!
खडखड खडखड असा आवाज येतो. अंकित उठू लागतो.
काय वाजलं आजी? काय वाजलं?
आजी हसते.
देवानं ऐकलं की काय?
पुन्हा खडखड.
देवाऽऽ
खडखड खडखड अंकितच्या काय ते लक्षात येतं. आजी भारावलेली.
देवा रे!
खडखडखडखड.
येडीये!
तसाच बसून रहातो. कडलेंच्या दाराबाहेर दिवा लागतो. कडले ग्रीलचा दरवाजा
उघडायच्या खटपटीत, मागे निमा. तिचा आवाज खडा.
अहो काय हे रितिक! साधं दार उघडता येऊ नये तुम्हाला? नावाचे रिकामजी
आहात रिकामजी!
कडले तरीही खडखड करत रहातात.
अहोऽऽ रितिकऽऽ-
काय निमू?
अन्नाडी आहात अन्नाडी!
आता काय झालं निमा?
अहो ग्रीलमधून हात घालून बघा ना बाहेर!
का- काय बघू?
माझं टाळकं!
ते तर इकडे आहे, या बाजूला!
निमा हातवारे करून ओरडायला लागते.
अहोऽ ग्रीलमधून हात घालून बाहेरची कडी काढा!
आयला! लक्षातच नाही आलं!
कशाला लावलीत बाहेरून कडी? 
मी-मी- मी कुठे लावली? 
मला कोण पळवून नेतंय?... आता काय होतंय?
विग अडकतोय ग्रीलमधे! कडले केविलवाणे झाले. निमा हातवारे करत ओरडू
लागते.
अहोऽ काढून हातात घ्या तोऽऽ
आयला रे! लक्षातच नाही आलं!
आता चला बाहेर!... अजून लक्षात येतंय की नाही?
आई गं! येतंय! येतंय! कडले बाहेर थेट उडी मारता.
माझ्याच लक्षात येत नाही मी कशाला लग्नं केलं!
पण कडी कुणी लावली?
तिरूपतीरावानी!
पण ते जाऊन तर दहा वर्षं झाली- माझे बाबा- ते कसे येतील?
भूत होऊन!
आयला! दोन दोन? घरात एक बाहेर एक?
काय म्हणालात?
नाही नाही काही नाही का- अरे शांताबाई! अशा काय बसला आहात आभाळाकडे
बघत? आले आले आलेऽ अंकुडीऽ अंकुडी- अंकुडी अंकुडी अंकुडी!
मागे व्हा मागे व्हा मागे व्हा!
कडले उड्या मारत मागे होतात.
आधी त्याना विचारा! बाहेरून कडी कुणी लावली?
अगं त्याना कसं माहित असणार?-
विचारा!
-बरं! बरं!
वळून जुळवाजुळव करत, लाचार हसत कडलेंचं सुरू होतं.
हऽहऽ शांताबाई! मी काय म्हणतो-
आजी- शांताबाई आधीच वैतागलेल्या. वर डासांचं आक्रमण चालूच.
अगं आई गं- मी काही वॉचमन नाही मी काही बघितलं नाही! 
अगं निमूऽऽ त्या म्हणतात-
अहोऽऽ त्याना विचाराऽऽ कोणतं भूत आलं होतं मग?
अंकित हसतो. निमा जळफळू लागते.
हा! हा! पोरटा! यानं लावली कडी!
शांताबाई वैतागलेल्या.       
एऽ पोरटा-बिरटा म्हणायचं काम नाही!
कडलेंचा सामोपचार सुरू होतो.
अगं असं काय करतेस? अंकुडी कसा लावेल? हात तरी पोचेल का त्याचा?
तुम्ही मला सांगा! चांगला पोचलेलाए तो!
शांताबाई उसळलेल्या.
एऽऽ तुझी पोरं- म्हणजे तुझ्या पाळणाघरातली पोरं काय कमी आहेत काय गं?
बोंबाबोंब काय! धडाधडा धावणं काय! रडणं काय!
माझ्या पोरांबद्दल बोलयचं काम नाही! तुमचा हा एकटा भारी आहे त्याना! पायात
पाय घालून त्याना कोण पाडतं? विचारा तुमच्या लाडक्याला! विचारा!
कडले अस्वस्थ.    
निमू जाऊ दे गं जाऊ दे! चल लवकर! ब्युटी पार्लर बंद व्हायचं नाहीतर!
शांताबाई चार्ज्ड झालेल्या.
काही विचारायला नकोय कुणाला! आख्या जगाला दिसतंय सगळं! मुलं सांभाळून
पैसे कमवायला लागलीस म्हणजे आभाळाला हात लागले काय गं?
पैसे कमवायला अक्कल लागते! असं नुसतं कट्टयावर बसून-
रिकामजीऽ
ओऽ
सांगून ठेव तुझ्या बायकोला! अक्कल काढतेय माझी!
रितिकऽ
ओऽगंऽ
पुन्हा बाहेरून कडी लावली तर परिणाम भयंकर होतील म्हणावं!
अगं जा ग! चल रे अंकित!
रितिक! फालतू वेळ नाहिये माझ्याकडे रिकामटेकडा!
ते तुझ्या या रिकामजीलाच सांग! रितिक म्हणे रितिक!
चला चला! बघून घेईन!
जाऊ दे गं निमू तू स्वत:ला-
तोपर्यंत निमा तरातरा निघून जाते, मागोमाग कडलेही. शांताबाई अजूनही
धुमसताएत.       
अगं जा गं जा! बघून घेईन म्हणे! पोटचं पोर नाही म्हणून माझ्या पोरावर दात
ठेऊन असते सारखी! चल रे!
पायरय़ा चढून फ्लॅटचं लॅच उघडतात. घरात येतात. पाठोपाठ रूबाबात चालणारा
अंकित. शांताबाई दार लाऊन घेतात.
काय रे तू लावलीस कडी?
हो!
तू पायात पाय घालून पाडतोस त्या मुलांना?
हो!ऽऽ
देवा रे!
आजी, आता काय वाजलं?
शांताबाई कपाळाला हात लावतात.
माझं नशीब! (क्रमश:)

No comments:

Post a Comment