Pages

Sunday, February 26, 2012

वाचकसंख्या ३००००! सर्वांचे आभार!

नमस्कार वाचकहो! ’अभिलेख’ या माझ्या ब्लॉग अर्थात जालनिशीने वाचकसंख्या ३०००० हा महत्वाचा टप्पा ओलांडला आहे! आपले आभार! आभार!! आभार!!!
’अभिलेख’ ची सुरवात झाली १३ फेब्रुवारी २००८ या दिवशी! चार वर्षं उलटून गेली. एवढ्या काळात खरंतर अनेकांनी हा टप्पा आधीच पार केलाय. काही तर लाखाच्या आणि त्यापुढच्या घरात गेलेत. त्यामुळे अप्रूप नाही पण तीस हजारचा पहिला टप्पा पार केल्याचं समाधान जरूर आहे! ही सुरवात आहे. कशी झाली सुरवात?
तुम्ही म्हणाल झालं स्मरणरंजन सुरू! स्मरणरंजनात रमण्याबद्दल अनेक प्रवाह आणि प्रवाद आहेत. आपल्याला बुवा आवडतं त्यात रमण्यात आणि रमतो तर रमतो असं कबूल करायलाही आवडतं.
’अभिनयातून लेखनाकडे’ असा ’अभिलेख’ चा अर्थ मला अभिप्रेत आहे. केवळ रोजच्या जगण्यामधनं मी बाहेर पडलो ते अपघातानं अभिनय करायला लागल्यामुळं. लिखाणाचं बीज आत कुठेतरी होतं. ते माझ्या आईमुळेच पडलं असा माझा ठाम विश्वास आहे. संघर्ष करणं आणि त्यातून बाहेर पडणं असं चक्र माणसाच्या आयुष्यात सतत चालूच असतं. पुढे एक टप्पा असा आला की एका गर्द काळोख्या काळात अचानक कविताच फुटून बाहेर येऊ लागल्या. त्या कविता गोष्टरूप होताएत असं माझ्या लक्षात यायला लागलं. मग कथा- जशा जमतील तशा लिहिणं सुरू झालं.
दुसर्‍या बाजूला, साधारण दहा-एक वर्षाचा अभिनयाचा अनुभव असेल म्हणून म्हणा, कथेत संवाद येऊ लागले. मग कथा लिहिण्यापेक्षा नाटक लिहिणं जास्त सोपं (?) असं काहीतरी मनानं घेतलं आणि नाटक लिहिलं, ते चांगलं वाटलं म्हणून राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धेला पाठवलं. तिथे ते पहिलं आलं. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेला ते पात्र ठरलं आणि प्रकाशित झालं! ते नाटक म्हणजे आवर्त!
हे नाटक लिहिताना किंवा या लेखनाचं पुनर्लेखन करताना असं लक्षात आलं कि पुन्हा पुन्हा लिहिणं फार जिकीरीचं काम आहे आणि आता संगणकाशिवाय पर्याय नाही. पण संगणक घेणं परवडत नाही अशी परिस्थिती. लिखाण चालूच राहिलं. मुद्रित माध्यमात ते छापून येण्यासाठी प्रयत्न चालू झाले. मुद्रित माध्यमातही परिचयाचं कुणीच नव्हतं, नाट्यमाध्यमात तरी कुठे कोण होतं? नियतकालिकांमधे लेख छापून येऊ लागले, दिवाळी अंकात कथा  येऊ लागल्या. पुलाखालून बरंच... ही छोटी कादंबरीही प्रकाशित झाली. पुनर्लेखनाचं कसं तरी जमवावं लागत होतं किंवा मग एकटाकी लिहूनच त्याचं काय ते करावं लागत होतं. छापून आणण्यातलं परावलंबनही जाणवत होतं.
मग एके दिवशी तडक कर्ज घेऊन संगणक घेतला! हा क्रांतीकारी निर्णय असावा! :)
घेतला खरा पण तो चालवायचा कसा माहित नव्हतं. मराठी फॉन्ट्स कसा मिळवायचा माहित नव्हतं. तो सर्वत्र दिसण्यासाठी युनिकोड पद्धतीचा असावा लागतो हे माहित नव्हतं. एवढंच काय माझा पहिला मेल आयडी मी एका जुजबी ओळखीच्याला बोलावून करवून घेतला. तो बिचारा माझा मित्र झाला आणि त्यानं आयडी तयार केला, तो कसा करायचा ते दाखवलं. मग झुंज सुरू झाली. आधी सीडॅकचं iLEAP मिळालं! झुंज पराकोटीला गेली. मग शिवाजी फॉन्ट एका भावानं शोधून दिला आणि टाईप करणं सुसह्य झालं.
माझ्या कविता लोकांसमोर यावात असं खूप मनापासून वाटत होतं. एकतर त्या अतिसंघर्षाच्या काळात झाल्या होत्या आणि त्या बर्‍या आहेत असं मला वाटत होतं, तसे अभिप्रायही इतरांकडून मिळाले होते. ते कसं करायचं?
मग नेटवर शोधताना सुषमा करंदीकर या नाशिकच्या ब्लॉगर बाईंचा पाचोळा हा कवितांना वाहिलेला ब्लॉग सापडला. ब्लॉगचं झालेलं हे पहिलं दर्शन. हे असं करता येतं तर! मग अभ्यास सुरू झाला. उलट उलट जात, शोधत बराहा हे सॉफ्टवेअर एकदाचं मिळालं आणि मग सुटलोच!
..मध्यंतरी कुणीतरी- आता कुणीतरी म्हणजे कुणी जाणकारच असणार म्हणा- ब्लॉगची क्रमवारी की काय ती लावली. त्यात त्याने म्हणे कविता, कथा इत्यादी म्हणजे- ललितलेखनाचे ब्लॉगच वर्ज्य ठरवले म्हणे! अशी क्रमवारी-ब्रिमवारी लावण्याचा अधिकार कोण कुणाला देतो? आणि तो अमुक वर्ज्य, तमुक त्यज्य असं कसं काय ठरवतो? असा प्रश्न पडला. विचार करता असं उत्तर सापडलं की ब्लॉग किंवा आंतरजाल हे असं माध्यम आहे की इथे ’सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे!’ ह्या उक्तीप्रमाणे काहीसं आहे. अर्थात मी ब्लॉग लिहितो म्हणजे काही चळवळ करतोय असं म्हणण्याचं धाडस मी अजिबात करणार नाही पण मी हेच लिहितो कविता, कथा, लेख, नाटक वगैरे. मग माझ्या ब्लॉगवर तेच दिसणार. दुसरं असं आहे की माणूस आला की व्यक्त करणं आलं. व्यक्तं करणं आलं की गोष्टं आलीच. बघा पटतंय का, पण प्रत्यक्ष संवाद, लेखन आणि इतर माध्यमातून कुणीतरी कसलीतरी गोष्टंच एकमेकाला सांगतो की! असो! निंदा अथवा वंदा आमचा आपला सुचेल ते लिहिण्याचा धंदा! अर्थातच ’अभ्यासोनि प्रकटावे!’ हे आम्ही विसरणार नाही!
ज्याचा त्याचा पिंड असतो. ज्याचा त्याचा वाचकवर्ग असतो. कुणी एकाच विषयावर लिहितं. तेच बरोबर असं सांगतं. माझ्यासारख्या अनेकांना माणसं, त्यांचे स्वभाव, मन, नाटक, चित्रपट असं आवडतं. माझ्या आत आणि माझ्या सभोवताली काय चाललंय याकडे बघायला आणि जमेल तसं व्यक्तं व्हायला आवडतं. मी ते करतो. विषयाचं अमुकच असं बंधन नाही. असो!
या प्रवासातला आणखी एक टप्पा म्हणजे ’अभिलेख’ ची स्टार माझ्या वाहिनीच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेत झालेली निवड! या निवडीनं मला ब्लॉगर मित्रमैत्रिणी दिल्या. त्यातल्या काहींनी त्याआधी ’अभिलेख’ वर येऊन माझा हुरूप वाढवला होताच. मग आंतरजालावरच्या विशेषांकांतून लिहिता आलं. देवकाकांनी ध्वनिमुद्रणाचं तंत्र शिकवलं... शिकण्याचा प्रवास चालू राहिला. हा प्रवास असाच चालू राहो! असं आज अगदी मनापासून वाटतं. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वाचकांनी ’अभिलेख’ ला भेट दिली. अभिप्राय देणार्‍यांचे आभार. असं लक्षात येतं की अभिप्राय न देताही अनेक वाचक इथे येत असतात. नेमानं वाचत असतात. त्या सर्वांचे, सर्वांचे मनापासून आभार! सरतेशेवटी मला हवं ते, हवं तेव्हा, व्यक्तं करू देण्याचं स्वातंत्र्य आणि त्याच बरोबरीनं येणार्‍या जबाबदारीचं भानही देणार्‍या या माध्यमाचे शतश: आभार! धन्यवाद!


8 comments:

  1. मनःपूर्वक अभिनंदन! आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. धन्यवाद महेंद्रजी! अगदी मनापासून आभार! शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. निसर्गवार्ताFebruary 28, 2012 at 8:27 PM

    तुमच्या लेखन प्रवासाला मनापासून शुभेछ्या! तुमचे लेखन असेच बहरत राहो!

    ReplyDelete
  4. धन्यवाद प्रविण! अगदी मनापासून आभार!

    ReplyDelete
  5. खरं आहे तुमचं म्हणणं - लेखनाची वर्गवारी करून त्यानुसार पहिला दुसरा असा क्रम ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही. प्रत्येकाचंच लेखन हे युनिक असतं. स्वत:ला व्यक्त करणं महत्त्वाचं. तीस हजारी टप्पा पार केलात, मन:पूर्वक अभिनंदन! तीन लाखाचाही टप्पा लवकरच पार कराल.

    ReplyDelete
  6. तुमचं स्वागत कांचन! वर्गवारीचं तर आहेच पण लक्षातच घेत नाही वगैरे मला फारच वाटलं.:) असो! तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय, व्यक्तं होणं महत्वाचं आहे, व्यक्तं होत रहाणं महत्वाचं आहे. शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! माझ्या वाटचालीमधे तुमच्या मदतीचाही हात आहे, आभार!

    ReplyDelete
  7. मनःपुर्वक अभिनंदन..पुढच्या लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  8. तुमचं स्वागत उमा.. आणि अगदी मनापासून आभार!

    ReplyDelete