Pages

Saturday, September 22, 2012

उत्सव...२

इथे वाचा उत्सव...१ हा या आधीचा भाग!
नवीन होता शहरात चिमण... बॅंडचा ठॅण ठॅण आवाज कानाचे पडदे चेपटून टाकणारा... ’मैं तो भूल चली बाबुल का देस...’ ही धून चिमणनं लगेच ओळखली. बॅंडवाले पुढे सरकतच नव्हते. पुढे हीऽऽ गर्दी. बॅंडवाले साधेसुधे नाहीत. लाल वेलवेटसारख्या कापडाच्या पॅंट्स. गमबुटासारख्या गुडघ्यापर्यंतच्या बुटांत खोचलेल्या. त्याना दोन्ही बाजूला सोनेरी पट्ट्या. पांढराशुभ्र जाड शर्ट पॅंटम्धे इन केलेला. त्या शर्टावर चामडी पट्ट्यांचं जाळं. खांद्यावर झुलणार्‍या झिरमिळ्या. झोकदार कॅपलासुद्धा झिरमिळ्या. हातात चमकणारी वाद्यं. चिमणची बोटं शिवशिवायला लागली. सगळ्यात शेवटचा, खांद्यावर हेऽऽ भलं मोठं ट्रंपेट घेतलेला नजरेपुढून नाहीसा होईपर्यंत चिमण डोळे फाडून त्या बॅंडकडे पहात राहिला. बॅंडमागे पुन्हा गर्दी...
ह्या मागच्या गर्दीतले उड्या मार मारून काहीतरी झेलत होते. झेलल्यावर झेलणारा आणि त्याच्या आजूबाजूचा घोळका हेऽऽहोऽऽ करून ओरडत होता. विकेट गेल्यासारखा किंवा गोल झाल्यासारखा. ते काय झेलताएत ते चिमण निरखून निरखून बघू लागला. काहीतरी झेलायला हपापलेली ती गर्दी पुढे सरकू लागली. चिमण वाकवाकून निरखू लागला. गर्दीत अचानक एक चांदीचा रथ आत्ताच अवतीर्ण झाल्यासारखा चकाकू लागला आणि चिमणचं झेलणार्‍या गर्दीवरचं लक्ष उडालं...
चांदीचं प्लेटिंग असलेली ती बग्गी होती. खाकी कपड्यातला चाबुकवाला आणि त्याच्या मागे तो होता. जाड काचांची नाजूक फ्रेम घातलेला. त्यानं वाकून, खाली हात घालून पटकन काहीतरी काढलं. ती फुलपॅंट होती. तिची भरभर गुंडाळी करून त्याने ती गर्दीवर भिरकावली आणि पुन्हा विकेट गेली.. किंवा गोल झाला... सीमारेषेवरून जिवाच्या आकांताने थ्रो करावा तसा तो जाड चष्मेवाला कपडे फेकत होता... झेलायला हपापलेली गर्दी ते सगळं सगळं हर्षोल्हासात झेलत होती... चिमणच्या तोंडाचा आ तसाच राहिला. हे नक्की काय? त्याला काही समजेना. तो आणखी पुढे होऊन बघायला लागला तेव्हा फाटकाच्या बाजूने ख्यॅऽऽक ख्यॅऽऽकऽ आवाज आला. दोन कॉलेजची पोरं ते बघत उभी होती.
"अर्‍ये असा काय हाऽऽ-" पहिला.
"चूप! चूप बस! आता संन्यास घेणार आहे तो म्हणून कपडे वाटतोय आपलेऽऽ" दुसर्‍यानं पहिल्याला दटावलं. चिमणला हे नवीन होतं. गर्दीतले सगळे पुरूष, बायका, मुलं थटून सजून मिरवत होती. त्या चष्मेवाल्याला निरोप देत होती. हपापल्यासारखे त्याचे कपडे झेलत होती. हातात झाडू घेऊन चिमण ती मिरवणूक पहात तसाच उभा होता... अवाक होऊन...
... मग दिवसभर त्याच्या डोक्यात गिरमिट फिरत राहिलं... संन्यास घ्यायचा मग तो एवढा वाजत गाजत का? बॅंडबिंड लाऊन? कपडे कशाला फेकायचे असे श्रीमंती गर्दीत?.. आणि गर्दीनेही ते झेलायचे?... एवढा सगळा गाजावाजा करून संसार सोडायचा?... शेवटी न रहावून त्याने बॅंकेतल्या त्या जाड्या हेडक्लार्कला विचारलंच. तो खेकसला, "तमे तमारा कामथी मतलब राखो ने झाडू मारवानू! होलो बेचारो सर्वसंगपरित्याग करे छे ने तमे पुछोछो एम केम? एम केम? झाडू मार सारी रितेऽऽ"...
चिमण ही आठवण झाल्यावर आता पुन्हा हसला. त्याला तो जाडा हेडक्लार्क पुन्हा पुन्हा आठवत राहिला. येणाजाणार्‍यावर सतत खेकसणारा आणि मग पर्युषणासाठी रजा घेणारा. नववर्ष सुरू होण्याआधीचे हे कडक उपास जाड्या कसा करत असेल? रजा घेऊन, घरी बसून? घरच्यांची हालतच... चिमण आता जरा जोरातच हसला. जाड्यानेही पांढरेशुभ्र बेदाग कपडे घातले असतील. टिळा लावला असेल. तोही- कचकन गर्दीतल्या कुणाचा तरी पाय चिमणच्या पायावर पडला आणि तो भानावर आला...
तरीही गणपती येतच होते... अवती भोवतीनं... मेरी गो राऊंडमधे बसल्यासारखे... चिमणभोवती फेर धरून...
चिमण निर्धाराने एकटक त्यांच्याकडे बघत बसला. अशाने कदाचित भोवंडल्यासारखं होणार नाही म्हणून... गणपतींचा फेर त्याला आता वाढल्यासारखा वाटायला लागला... नवरात्रीच्या गरब्याचा तो विशिष्ट ताल त्याला प्रतिध्वनीसकट ऐकायला यायला लागला... आणि चिमण पुन्हा आपलं भान हरवला... त्याचे हात ताल धरू लागले... हळूहळू आपल्या हातात ढोल वाजवायच्या वेताच्या छड्या आहेत असं त्याला वाटायला लागलं...
चिमणला त्याच्या एका गाववाल्यानं वापीहून इथे आणलं. इथल्या मेहतरांच्या वस्तीत तो सहज सामावून गेला. गाववाल्यानं त्याला कामालाही लावलं. अर्धवेळ सफाई कामगार म्हणून बॅंकेत. चिमण मग रात्रशाळेत गेला पण मॅट्रीक काही पास झाला नाही. पाच दहा वर्षांत बॅंकेत शिपाई मात्र झाला. मग ल्गेच लग्न. त्या मेहतरांच्या वस्तीत स्वत:चं झोपडं. आधी कच्चं बांधून घेऊन मग त्यावर सरकारचा नंबर पाडून घेऊन. चिमण स्मार्ट होता. नशिबानंही त्याला साथ दिली. तो काळ बरा होता.
जोडीला वस्तीतले मेहेतर नवरात्रीत वाजवायचे. त्यांचा बाजा होता. बेंजो होता. चिमण माणूसघाणा नव्हता. नसते कसलेही नाद लाऊन न घेता तो वस्तीत रूजला होता...                                                                                क्रमश:    

No comments:

Post a Comment