Pages
▼
Wednesday, August 27, 2008
पुराण आणि आम्ही...
पोथीला मनोभावे हात जोडून गाडगीळबुवा पुराण वाचायला-सांगायला सुरवात करायचे.त्यानी हात जोडले रे जोडले की सगळे श्रोते एकसाथ हात जोडायचे.मोठ्यांनी हात जोडले की आम्ही लहान पोरंही हात जोडायचो.पुराणात देवाचं नाव आलं रे आलं की श्रोते लगेच हात जोडणार आणि मुलांना ती गंमत वाटून ती हसणार.पुन्हा हसणं उघड होऊ नये म्हणून धडपडताना मुलं आणखी काही मजेशीर प्रकार करणार आणि त्यांचं हसणं उघड होणार ते होणार.पुराणातली बुवा सांगत असलेली गोष्ट सरळ चालू असली की समजायची.त्यात रंगून जायला व्हायचं.त्या गोष्टीत एक गोष्टं सांगणारा आणि दुसरा ऐकणारा असायचा.ऐकणारा गोष्टीत अमुकाने अमुक का केलं?किंवा अमुकाचं असं का झालं?असं विचारायचा.त्यानं असं विचारल्यावर गोष्टीतला गोष्टं सांगणारा म्हणायचा,असंच एकदा अमुकानं तमुकाला विचारलं तेव्हा अमुकानं तमुकाला जी कथा सांगितली ती आता तुम्हाला सांगतो.असं होत दुसरी गोष्टं सुरू व्हायची.तीही चांगलीच असायची पण असं तीन-चार वेळा झालं की आम्हाला कंटाळा यायचा.कोण काय सांगतंय,ते कशाला सांगतंय तेच समजेनासं व्हायचं.खरे म्हातारे कोतारे श्रोते मात्र पुराणात रंगून गेलेले असायचे.मधनंच काहीतरी पटल्याचा सार्वजनिक हुंकार.गोष्टीतल्या विनोदावर किंवा बुवांच्या गोष्टीवरच्या मार्मिक भाष्यावर माफक सार्वजनिक हसणं.तसं इतरही बरंच सार्वजनिक चालू असायचं.वाती वळणं,माळ ओढणं,चुटक्या वाजवत बुवांना कळणार नाही अश्या आवाजात जांभया देणं आणि फारच अनावर झालेल्यांनी माना टाकणं…
No comments:
Post a Comment