Pages

Tuesday, September 2, 2008

गोष्टीतली गोष्टं पुढे चालू...

पुराण सांगताना गाडगीळबुवाचं गोष्टीतल्या गोष्टीची गोष्टं असं सुरू झाल्यावर आम्हा मुलांचं आजुबाजूचं निरीक्षण चालू व्हायचं… डांबरी रस्ते व्हायच्याही आधी मातीचे रस्ते होते.मळलेल्या पाऊलवाटांवर मऊ मऊ माती असायची.त्या मऊ मऊ मातीत आम्ही किड्यांची घरं आणि मग किडे शोधायचो.हातात बारीकशी काडी घेऊन.माती नाजुकपणे उकरून.हळूवार भोवरा फिरवल्याप्रमाणे त्या लहान भोकांभोवती मऊ मातीचा भोवरा किड्यांनी आधीच तयार केलेला असायचा.या घरात ’मोर’ असं नाव असलेले किडे असतात असं मोठी पोरं सांगायची.मग त्या भोकात हळूहळू ती काडी गोल गोल फिरवत ’मोरा,मोरा ये! ये!’ असं म्हणत आम्ही त्या ’मोरा’ला शोधायचो.मोर किडा सापडला की आणखी बरंच काही अनपेक्षित आणि मौल्यवान(त्या वयात तसं वाटणारं)मिळणार असायचं.मोर त्याच्या त्या घरात क्वचितच सापडायचा.मऊ मातीचे भोवरे सोडलेली भोकं मात्रं जागोजागी दिसायची… पुराणातल्या गोष्टीतल्या गोष्टींच्या गोष्टी ऐकत आत आत जाणं तसं असायचं आम्हा लहान मुलांना.मग आम्ही कुठे वर झुंबरांकडे बघतोय,देवळात कोण जातंय,कोण कोण बाहेर येतंय,देवळातली घंटा कोण कशी वाजवतंय ते बघत,ऐकत बसायचो.आणखी कंटाळा आला की आळस देताना लक्ष पाठीमागे जायचं.भला मोठा दगडी पार.भल्या मोठ्या वडाच्या झाडाखालचा.त्याच्या पारंब्या जाडजूड,लांबलचक,जमिनीवर लोळणारय़ा.चिक्कार वांड पोरं या पारंब्यांना सतत वाघळांसारखी लटकलेली.झोके घेत असलेली.वडाला लालभडक फळांचे गुच्छ.झाडाखाली,पारावर आणि त्याही खाली सिमेंट कॉंक्रीटच्या आवारावर पक्षांनी चोचून आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या लालभडक फळांचा खच.त्यांचा वास.कुणीतरी बद्द झालेले घुंगरू झाडावर बसून अखंड वाजवत असल्यासारखी पक्षांची कुचकुच… ते बघत असताना माझ्या तोंडून चुकून आळस दिल्याचा आवाज निघायचा.आजीचं लक्ष जायचं.डोळे मोठे व्हायचे.मग मी शहाण्या मुलासारखा त्या गोष्टीतल्या,गोष्टीतल्या… गोष्टीकडे एकाग्र(?)होण्याचा प्रयत्न करायचो...

No comments:

Post a Comment