Pages

Tuesday, September 13, 2011

राज्य (१२)

भाग ११ इथे वाचा!
दुसरय़ा दिवशीची सकाळ.गंजीफ्रॉक आणि घोट्याच्या वर येणारा लेंगा घातलेला बाप, दात कोरत अगदी बारकाईने खिडकीतून बाहेर बघतोय.बाहेरच्या दरवाज्यातून राजू, डोक्यावर पुस्तकाची चवड घेऊन आत आलाय.
अव दादाऽ.. अव दाऽदाऽ जरा हात लावा की वाईच!”
बाप लक्ष नसल्यासारखं करतो.
अऽव दाऽदाऽऽ
बाप चकीत झाल्यासारखे अविर्भाव करतो.उड्या मारत राजूजवळ जातो.  
येऽये पाटीवाल्या! दे! दे मी उतरवतो!.. तुझं स्वागत असो!”
दादाऽ पोटाला द्या कायतरी वाईच!”
बस बस बाबा बस! या खुर्चीत बस!.. हं! रात्री बिर्याणी हाणलीस त्याचं काय झालं?”
डास मारून मारून पचली ती दादा!”
हांऽऽ हाऽहाऽहाऽ.. आता कसं वाटतंय?”
बाबा खरंच फार गार वाटतंय बाहेर!”
आणि काय?”
काऽऽय! टिव्ही आला..”
बघतोय!”
आता दोन झाले!”
काऽय?”
आपल्या टकलाकडे बघत राजू स्वत:च्या डोक्यावरून हात फिरवतोय हे बघून बापाचं तोंड जरासं खट्टू होतं पण आज बापाचं लक्ष खिडकीकडे आहे.
बाबा! तुम्ही कुठे गूल?”
बाप हसत खिडकीजवळ गेलाय.बारकाईने बाहेर बघतोय.
चाहत्यांची गर्दी राजू! मुलाखती! वेळच नाही!”
एव्हाना राजू खुर्चीत पेंगायला लागलाय.तो हुंकार देतो.
अरे! अरे! पडशील बाबा खुर्चीतून! सवय नाहीये तुला खुर्चीत बसून झोपायची! तुझी जागा तिकडे! त्या तिकडे! नेहेमीची! झोप तिथे! सतरंजी अंथर आणि-”
नको!!!” राजू शहारून उभा रहातो.
झोप रे झोप! तो- ह हऽह- तो नाहीए आता! झोप!”
पेंगुळलेला राजू आपल्या नेहेमीच्या जागी सतरंजी अंथरतो आणि पडतो.त्याचवेळी आत आई गार्गीच्या नावाने खडे फोडत तिला उठवतेय.
उठ गं कारटे! एऽऽ गार्गेऽ ऊठऽऽ ऊऽऽठ!”
बाप कानोसा घेतोय.पुन्हा खिडकीतून बाहेर बघत दात कोरायला लागतो.आई बाहेर येते.
राजूऽ.. राजू-झोपला वाटतं पोरगा! या पोराचे मात्र हाल चाललेत!.. होऽहोऽऽ अलभ्य लाभ!ऽ आज कुठे जायचं नाही वाटतं?”
हॅऽहॅऽहॅ.. तुम्ही म्हणालात, मुलाखती देऊन या! देऊन आलो!ऽऽ आज्ञा शिरसावंद्य! आता मुलाखती संपल्या! इकडची काय खबरबात!"
मजेऽऽत! ऐशमधे!ऽऽ दोन दिवस नुसते गिळायला येत होता! अगदी स्वऽऽस्थं वाटत होतं घरात!”
पण आज कुठेच जायचं नाही!
आमचं दुर्दैव! जन्मगाठी! आमचे हात बांधलेले! तुम्ही उंडारायला मोकळे!- गार्गीऽ उठलीस का?
गार्गी दात घासत स्वैपाकघरातून बाहेर येते.बाप कौतुकाने पुढे होतो.
मग काय म्हणतंय आमचं पिल्लू?”
गार्गी जोरजोरात मान हलवते.बापाने चेहेरा भावूक केलाय.
दोन दिवसात केवढी मोठी दिसायला लागली!”
हो! हो! खिसा खाली गं बाबांचा! कळलं ना?” आई आत निघून जाते
 “काय नवीन घडामोडी गार्गे!”
गार्गी बापाला हाताने थांबायला सांगते.आत जाते.बाप शिटी वाजवत, लांड्या लेंगाच्या दोन्ही खिशात हात घालून पुन्हा खिडकीजवळ.गार्गी तोंड घुऊन बाहेर आलीय.
काय? एकदम खुशीत! शिट्टी वाजवताय!”
बाप तिच्याकडे वळून हसतोय.
हॅऽ हॅऽ हॅऽऽ.. तुझं कधी वाजवतेयस?”
कॅऽऽऽय?”
बाप तिच्याजवळ जात चौघडा वाजवल्यासारखी बोटं नाचवतो.
नाही! आता वाजायला हवं तुझं! मोठी दिसायला लागलीस!”
तुम्हाला टेन्शन! पालक नं तुम्ही आमचे! कुठे दडी मारली होतीत? सगळी कामं खोळंबली माझी! कुणी करायची ती?
लग्नं झाल्यावर राणीसारखी रहाशील! मग कसली कामं?”
काय हो सारखं लग्नं! लग्नं! दुसरा धंदा नाही काय?”
आहे ना! हॅऽहॅऽ फास्टफूडचा! चालला तर! हॅऽहॅऽहॅऽऽ
तुम्हाला सगळंच कसं छान नाई? नुसतं खायचं आणि ख्यॅक्ख्यॅक्करत बसायचं! उद्योग काय दुसरा!”
रागारागाने आत निघून जाते.बापाचा मोहरा आता झोपलेल्या राजूकडे.
चिरंजीवऽ ओऽ चिरंजीऽव! कॉलेजला जायचंय की नाही आज?”
आई हात जोडत बाहेर आलीय.
ओऽऽ हात जोडते तुम्हाला!ऽ झोपलाय तर झोपू दे! कशाला उठवताय?”
अगं, जो झोपतो.. त्याचं नशीब झोपतं!
आई बापाच्या अगदी जवळ जाते.
आज अगदी सकाळपासून मूडमधे आहात! परवापर्यंत एरंडेल पिऊन होतात! आणि- तुमच्या राज्यात आणि काय करणार हो आमचं नशीब!”
बाप मानभावीपणे विनम्र होत वाकून उभा रहातो.
सॉरी! आय एम सॉरी! बाई! राज्यं माझं नाही गुंडूचं आहे! हॅऽहॅऽहॅऽऽ
शाब्दिक खेळ करण्यात तुमचा हात कोण धरणार?”
पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही धरलात! हॅऽहॅऽऽ
आई थाडकन कपाळावर हात मारून घेते.
त्याची फळं भोगतेय! तुम्हाला नाही धंदा, मला पडलीत सकाळची हजार कामं मी-”
त्याचवेळी चार पाच भयानक गुंडं घरात घुसतात.बाप त्यांच्या मार्गातून आधीच बाजूला होतो.गुंडाना अडवायला पुढे झालेली आई अहोऽ अहोऽ असं म्हणेपर्यंत ते तिला बाजूला ढकलतात आणि भिंतीला लावलेला हाय डेफिनेशन उचकटू लागतात...

No comments:

Post a Comment