स्वातंत्र्याचा आणखी कितवा तरी वर्धापनदिन साजरा झाला आणि आपणही काही निश्चय करावा असं आमच्या मनानं घेतलं.माझ्या आणि मनूच्या.मनूचा आणि माझा दिवस एकदमच सुरू होतो.वजन वाढतं म्हणून आम्ही दोघांनीही कामावर येता-जाता चालत जायचं ठरवलं.अर्थात रेल्वेस्टेशनपर्यंतच.
मनूचं तोंड सतत चालू असतं.झोपेतही ते कितपत बंद रहात असेल कुणास ठाऊक? माझं त्याच्या उलट.काय बोलायचं हेच मला अनेक वेळा कळत नाही.माझ्याशी जो बोलत असतो त्याचं बोलणं मला नेहेमीच खरं वाटतं.मनूसारखा हुशार माणूस असेल तर मी भारावतोच.बहुतेक वेळा मनू सतत माझ्याबरोबर असतोच.चल रे? तेवढाच टाईमपास! असं मनूचं म्हणणं.मनू झटकेबहाद्दर.रोजचा झटका निराळा.
आज कामावर जायला म्हणून आम्ही दोघं बाहेर पडलो, मनू मला विचारतो; “जागा आहेस का?”
मनूसमोर मी माझ्या चेहेरय़ावरचा गोंधळ लपवू शकत नाही. (माझा चेहेराच तसा आहे असं म्हणून मनू नेहेमी फिदीफिदी हसतो.) “जागा म्हणजे? काल सुट्टी होती स्वातंत्र्यदिनाची.रात्री झोप येईना उशिरापर्यंत म्हणून टीव्हीचे चॅनल्स दाबत बसलो होतो म्हणून डोळे लाल झालेत.” मी प्रामाणिकपणे सांगितलं.माझ्या प्रामाणिकपणाला मनू नेहेमीच हसतो तसा आत्ताही तो खिदळत म्हणाला, “डोळ्याला सूज, डोळे लाल म्हणजे काल रात्री भक्त प्रल्हाद!” नवीन काहीतरी काढण्यात मनू उस्ताद.ते काय ते मला कधीच कळत नाही, मनू उलगडून सांगत नाही.भक्त प्रल्हादचंही तसंच.
माझ्या चेहेरय़ावरचा मूर्तिमंत गोंधळ पुसून टाकण्यासाठी मी जोरदार जांभई दिली. “हे जागे आहेत का?” समोरून सकाळचं फिरणं आटपून गप्पाटप्पा करत परत येणारे म्हातारे बघत मनूनं विचारलं.माझा जांभईचा आऽ तसाच राहिला.मनूचं पुराण सुरू झालं.“आयुष्यभर धावत राहिले.पैसा कमवला.संसार केला.आता मुलासुनानातवंडांचं सगळं सहन करताएत.सकाळी मारे गप्पा हाणतात.संध्याकाळी बघितलंस यांना कट्ट्यावर बसलेलं? मावळता सूर्य आणि यांचा चेहेरा दोन्ही सारखेच दीनवाणे दिसत नाहीत?” मी कालच्या त्या जागरणामुळे चालतानाही डुलक्या काढतोय.मनू बहुतेक आता मला आख्खी कादंबरी ऐकवणार असं वाटून मी घाईघाईनं म्हणालो, “चालायचंच.आपलंही असंच होणार आणखी काही वर्षांनी” – “अरे पण जागे आहेत का ते? अजून जाग आली आहे का त्याना?” मनू म्हणाला.
मी हातानेच माझा चेहेरा खसाखसा चोळला.त्रास झाला की स्वत:लाच आणखी त्रास द्यायची ही सवय.साला हा काय सारखी जाग जाग करतोय- मी मनाशी म्हणतोय न म्हणतोय तोपर्यंत नशिबानं स्टेशन आलंच.
लोकल ट्रेनचं बिघडलेलं वेळापत्रक आणि इतस्तत: धावणारी, कामावर जायची घाई असणारी माणसं बघून मनू पुन्हा पुटपुटला- “यांना कधी जाग येणार कुणास ठाऊक?” मी उखडलोच.म्हणालो, “अरे या रेल्वेवाल्यांना जन्मात कधी जाग येणं शक्यं आहे का? काय बोलतोएस खुळ्यासारखा?” मनूनं आता असा चेहेरा केला की माझाच चेहेरा खुळ्यासारखा झाला.
मनू म्हणाला, “मी रेल्वेवाल्यांच बोलत नाहिए रे!” असं म्हणत असताना त्याची नजर समोरच्या बाकड्यावर स्थिरावली.गणवेशातला एक सखाराम डोळे मिटून हातावर गोळी चोळतोय- तंबाखूची.दुसरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून पाय पसरून निजलाय आरामात.माझी नजर लगेच तिकडे वळून स्थिर होतेय हे बघून मनू म्हणाला, “मी यांनांही म्हणत नाही, हे जागे आहेत का म्हणून.मी या उंदरासारख्या इतस्तत: धावणारय़ांना बघून म्हणतोय हे कधी जागे होणार?”
मला जाम झोप येत होती.मनूच्या सततच्या या जागण्याच्या चर्हाटानं वीट आणला होता.मी गाडीची वाट बघू लागलो.मनू आज विचारमग्नं होता.जरा जास्तच.आज तो हमखास जागा पकडणारय़ा ग्रुपकडे नुसता बघत राहिला.त्यांच्यात मिसळून पुढे गाडीत जागा मिळवायची पूर्वतयारी करायची इच्छा त्याला अजिबात दिसत नव्हती.नेहेमीचा तो ग्रुप लहान मुलांसारखा, याला चिमटे काढ, त्याची कॉलर ओढ, त्याला टपलीत मार, हूऽऽ करून ओरड असे नेहेमीचे उपद्व्याप करत होता.माझ्या कानाशी पुटपुटणं ऐकू आलं- हे जागे कधी होणार?... मी वळूनसुद्धा बघितलं नाही.जागरणाने माझे डोळे आधीच चुरचुरत होते.मी ते घट्ट मिटून घेतले आणि गाडी आली.
नेहेमीप्रमाणे मी ढकलला गेलो आणि मग डोळे उघडले.दोघा दांडग्यांच्या बेचक्यात मी उभा.मनू जागा शोधण्याच्या प्रयत्नात असेल म्हणून आजुबाजूला बघितलं.मनू दिसला नाही.मला काळजी वाटायला लागली तशी माझी नजर भिरभिरायला लागली. “जागा झालाएस का?” मनू माझ्या पुढ्यातच.मला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय.माझं तोंड वाकडं झालेलं बघून तो पुढे म्हणाला, “अरे स्टेशनवर डोळे मिटून उभा होतास बराच वेळ म्हणून विचारलं.गाडी सुरू झाली की दोनपाच मिन्टात पुन्हा उभ्या उभ्या घोरायला लागशील.” मी मनूकडे पाहिलं.तो हसत नव्हता.चेष्टा करत नव्हता नेहेमीसारखा.
आज याला झालंय तरी काय? मला जाम झोप येत होती पण मनूमुळेच मी जागा रहात होतो.हे सगळं भयंकर होतं.मी आतल्याआत चरफडत राहिलो नेहेमीसारखा.माझ्या हातात नेहेमी चरफडण्याव्यतिरिक्त काहीच नसतं पण आज मला सहन होत नव्हतं.मी ओरडलो, “अरे काय काय करायचं माणसानं? किती जागं रहायचं? किती अवधानं सांभाळायची? अरे, आमच्यासारख्या सामान्य माणसानं किती गोष्टीत जागरुकता दाखवायची? सगळं आम्हीच करायचं? मग ही व्यवस्था कशाला? वेगवेगळी खाती कशाला? राजकारणी कशाला? बस, रेल्वेसारखी आस्थापनं कशाला? सेवाभावी संस्था कशाला? महाविद्यालयं कशाला? आणि तो परमेश्वरही कशाला?”
माझ्या या शेवटच्या ’कशाला?’ वर दोन्ही बाजूंच्या दांडग्यांनी मला चेपलं.झोपमोड होतेय म्हणून.
सुरू झालेल्या लोकलमधे सर्वत्र निजानिज झाली होती.मनू आता मात्र माझ्याकडे मिश्कीलपणे पहात, हसत उभा होता…
2 comments:
सही...छानच. रोजच्या जगण्यातलं एकदम..
आभारी आहे नचिकेत! तुमचा ब्लॉग तुफान आहे.आम्हाला विमानं फक्त जमिनीवरून वर आकाशात बघायची सवय.तुम्ही विमानाच्या आतली सफर घडवून आणताय! एक वेगळा, अर्थपूर्ण ब्लॉग आहे तुमचा मराठीत.अभिनंदन!
Post a Comment