romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, March 26, 2012

गुरूजनां प्रथमं वंदे! कादंबरी.. भाग.. मधलाच..

आण्णा
आण्णाचं लक्ष नानाकडे होतं तसं ते श्रीगुरू दत्तात्रयाच्या विशाल मूर्तीकडे होतंच. एकावेळी अनेक गोष्टी करणं, निभावणं, आणि त्यात यशस्वी होणं आण्णाच्या व्यक्तिमत्वातच होतं. खरंतर आण्णाचं लक्ष श्रीगुरू दत्तात्रयाच्या मूर्तीतल्या त्या मूर्तीच्या अजस्त्र पंजाकडेच असायचं. उजव्या हाताचा पंजा. भला मोठा तळहात. उभारलेला. आशिर्वादासाठी. अखिल मानवजातीवर, अखंड विश्वावर मायेने पसरलेला आशिर्वादाचा हात. तो त्याच्या मनी, स्वप्नी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असायचाच.
नानाचं हे किती दिवस चालायचं? नाना.. जराजर्जर नाना. दाढीचे खूंट वाढलेला. अस्ताव्यस्त वाढलेलं शरीर. थरथरत्या, कंप पावणार्‍या अवस्थेला न पेलवणारं. वर घातलेली स्लिवलेस बंडी, पोटावर तिरपा खिसा असलेली. काढता काढता यायची नाही. त्याला स्वत:लाही नाही. दुसर्‍या मदत करणार्‍यालाही नाही. लाल किंवा हिरव्या, निळ्या जाड काठाचा गुढग्याखाली पोचणारा पंचा कसातरी सावरत, विस्कटत सगळ्या हालचाली, बसणं, उठणं, फिरणं. सगळं जवळजवळ परस्वाधीनच. आण्णाच्या मल्टीटास्किंग अंतरंगातला एक धागा. नानाचा. त्याच्या सद्य अवस्थेबाबतचा.. नानाचं चालेल तितके दिवस चालेल. चालूदे. आपण आहोतच. नानानं दीक्षा दिली. आता त्याला सांभाळणं हे आपलं कर्तव्य. कर्तव्य व्यवसायासारखंच निभवायचं.
आण्णानं आपल्या पांढर्‍याखड लांबलचक आणि पसरलेल्या जटांवरून हात फिरवला. त्या पाठीवर एकत्र केल्या आणि सोडून दिल्या. मग लांबलचक पांढर्‍याखड दाढीवरून तीन चार वेळा हात फिरवला. तिचं टोक धरून दोन-तीन वेळा ती खेचली. वाळलेल्या केळीच्या पानाच्या पुडी आणि त्या आतली औषधी पूड यांची आठवण होण्याआधीची ही लकब. त्यानं डोळ्याच्या कडांमधून इकडे तिकडे पाहिलं. हि ही लकबच. पुडी खिशातच. पण हे स्थान नव्हे. तिच्यातल्या औषधाचा लाभ घ्यायचं. मग त्यानं कॉटनच्या मुंड्याच्या अर्ध्या बाह्यांच्या कडांवरून बोटांची चिमूट फिरवली. आलटून पालटून दोन्ही हातांच्या आणि पायघोळ लेंग्यावर दोन्ही मांड्यांच्या बाजूनी ताल धरला. त्याची कमावलेली बोटं तिथं वाजू लागली. तो हळूहळू निश्चिंत झाला. विसावला.
काय रूबाब होता नानाचा एकेकाळी. कपडे पांढरेधोप. परीटघडीचे. कपड्यांचा अवतार आता सारखाच. पण आता आली ती अवकळा. कपडे कितीही पांढरेधोप घाला ते काढण्याच्या वेळी मलूल, मळकट. नाना वयोवृद्धं झाला. जराजर्जर झाला हे खरंच पण मनानं तो जास्त खचत चालला. शक्य असतं असं. माणूस वयोमानापरत्वे खचत जातोच. मनोबलोपासना या विषयात कितीही तज्ज्ञ असला, ते ज्ञान दुसर्‍याला वाटण्यासंबधातला कितीही थोर अधिकारी असला तरी त्यालाही मन नावाची जादुई वस्तू असते. त्याचंही वय होतं. संध्या छाया भिववू लागतात. केवळ संध्याछाया की आणखी काही? संध्याछायांबरोबर येणारं अपरिहार्य असं काही..
आण्णा गुरू दत्तात्रयांच्या हाताकडे एकटक बघत होता. असं बघता बघता त्याला अनेकवेळा लक्षात येई की हळूहळू त्राटक होऊ लागलंय. हस्तत्राटक? नाना विश्रामधामात आणि इतरत्र तसबिरत्राटक करायचा. विचारून विचारून त्यानं काय करतोय, कशासाठी करतोय हे तोंडानं कधी सांगितलं नाही...
दत्तात्रयांच्या हस्ताकडे एकाग्र होता होता त्याला जाणवलं की हे आपण एरवी करतो त्या ध्यानापेक्षा सरस होतंय. फार बरं वाटतंय. मन शांत होतंय. एरवी वाळलेल्या केळीच्या पानातली पूड स्वत:च्या पंज्यावर घेऊन मग ती ईऽऽ केलेल्या, घट्टं जोडलेल्या दंतपंक्तींवरून फिरवायची आणि ध्यानस्थ अवस्था अनुभवायची. बरं वाटतं. चांगलंच वाटतं. आरशात बघता बघता कधी ध्यान लागतं कळत नाही. आपल्या मस्तिष्कावर रेटून ओढलेल्या भस्माची पूड वाळलेल्या केळीच्या पानातल्या भस्मावर पडतेय हे ही समजायचं नाही आधी. समजल्यावर ध्यान नेमकं कशाने? वाळलेल्या केळीच्या पानाच्या पुडीतल्या त्या पूडरूपी भस्माने की त्यात सामावत असलेल्या मस्तिष्कावरच्या पूडरूपी भस्माने? असा संभ्रम निर्माण व्हायचा. ध्यान आणि संभ्रम दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत असल्यासारख्या.
इथे प्रत्यक्ष दत्तमहाराजांसम्मुख, ते ही त्यांच्या विशाल अशा पूर्णाकृती प्रतिकृतीसमोर सगळं गळून पडतं. ध्यान, संभ्रम सगळंच. हो. त्याही पलिकडचं काही जाणवू लागतं. आशिर्वादासाठी उभारलेल्या त्या श्रीगुरूहस्ताचं अवलोकन करता करता. पलिकडचं काय? ते शब्दात सांगता येत नाही. कुणालाच. या आपल्या पायाजवळ खडकाला टेकून विश्रामस्थ झालेल्या जराजर्जर शरीरालासुद्धा. शरीराला काय म्हणतोय? या आत्म्यालासुद्धा. शरीर कधीच संध्याछायांच्या आधीन झालं. संध्याछाया शब्दातला श्लेष जाणवून आण्णाला हसू फुटलं. हम्म असा बारीक आवाजही आला. तो आसमंतात कुठेही उमटणार नाही. कुणालाही जाणवणार नाही. श्रीगुरूदत्तांना सगळंच ज्ञात असतं. आण्णानं मग डोळ्यांच्या दोन्ही कडातून इकडेतिकडे पाहिलं नाही. तो ठाम होता. मनातल्या निष्कर्षावर. त्यामुळे निर्माण झालेल्या उद्गारावर.. शरीर कधीच संध्याछायांच्या आधीन झालं नानाचं.. आयुष्यभर संध्या, छाया आणि कुणाकुणाच्या आधीन आणि आता तर काय.. अपरिहार्य संध्याछाया. वयोमानानुसार. हे कळत नाही पण माणसाला आधीच. तरूणपणीच. किमानपक्षी प्रौढपणी तरी. नाहीतर म्हातारपणाच्या सुरवातीला तरी. किर्तनकाराला, प्रवचनकाराला, अध्यात्म सांगणार्‍यालाही? काय कळतं आणि काय नाही.. कळतं ते वळतं का? कळून सवरून कुणीही असं वागतो का? कॉन्शसचं काय? विवेकाचं गुंडाळं- कमरेच्या विवेकाचं गुंडाळं- डोक्याला की आणखी कुठल्या वळचणीला? अध्यात्माच्या.. आणखी कुठल्या
काय रूबाब होता नानाचा.. या रूबाबावरच तर.. आण्णाच्या बोटाची चिमूट पुन्हा त्याच्या मुंड्याच्या बाह्यांच्या कडांशी फिरली. कमावलेली बोटं पुन्हा लेंग्यावर. मांड्यांच्या दोन्ही बाजूनी ताल धरू लागली...
आता ही लकब आपलं शरीर का निर्माण करतंय आण्णाला कळेना. आता तर केळीच्या पानातल्या पुडीची आठवण होत नाहीये. आठवणी भलत्याच फेर धरताएत..
किर्तनकार नाना.. परराज्यातला असून मातृभाषेत इतकं अस्खलित गाणारा, निरूपण करणारा नाना.. अप्रूप होतं श्रोत्यांना, श्रवणभक्तांना.. मधेच अस्खलित राष्ट्रभाषेची धारा चालू व्हायची. आधीच्या धारेला कुठेही विचलित न करणारी. त्याचंही कौतुक. नानाच्या दिसण्याचं कौतुक. त्याच्या उच्चारांचं कौतुक. आचारांचं कौतुक. किर्तनकाराच्या त्याच्या त्या विशिष्टं पेहेरावाचं कौतुक. एवढं सगळं असूनही त्याच्या जवळ असणार्‍या विनयशीलतेचं कौतुक. कौतुक स्विकारण्याच्या त्याच्या त्या अनोख्या शैलीचं कौतुक.. कौतुक, कौतुक, कौतुक..
माझ्यासारख्या हौशी तबला वाजवणार्‍याला साथीला घेण्याचं कौतुक. नवख्या तबलजी साथीदाराला सांभाळून घेण्याचं कौतुक. साथीदाराचं मनापासून कौतुक करण्याचं कौतुक.
हा सगळा कौतुकसोहोळा न्याहाळणारी आपली बायको.. तिचंही.. कौतुक.. नाना करत असलेलं.. ते एकिकडे आणि आपण आपल्या बायकोचं करत असलेलं कौतुक.. आपण.. आपल्याला.. संसारधर्म.. पार पाडता येत नाही.. तरीही आपल्याला चिकटून बसली आहे आपली अर्धांगी याचं.. कौतुक.. आपलं कौतुक.. नानाचं कौतुक.. कौतुकस्थान आपली बायको कॉमन.. आण्णा तबलजीची बायको.. नानामहाराजांचं किर्तन, प्रवचन, निरूपण मन:पूर्वक ऐकणारी.. भारून जाणारी.. त्यांच्याशी चर्चा करणारी..
हळूहळू माझं कौतुक आणि नाना.. नानामहाराजांचं कौतुक यात फरक करू लागलेली अर्धांगी.. माझी.. नानामहाराजांची.. माझी.. नाना.. ची..
आण्णाचा चेहेरा आर्त आर्त होऊ लागलेला.. बोटं मांड्यांच्या दोन्ही बाजूंना घट्टं चिकटून तालध्वनि काढत असलेली.. व्यग्रं.. नजर श्रीगुरूंच्या हस्ताकडेच.. मुखातून अतीव आर्त असं गुणगुणणं सुरू झालं आण्णाच्या.. आसमंतातल्या कुणालाही डिस्टर्ब न करणारं.. अगदी पायाजवळच्या त्या कृत्रिम, बेतीव पण सुघडित, कोरीव खडकाला टेकून बसलेल्या त्या नानारूपी जिवातल्या अंतरात्म्यालासुद्धा.. त्या आत्म्याची मान लटकलेली.. छातीवर.. स्वत:च्या…..
लवकरच.. ई-बुक स्वरूपात..                                                                                   संदर्भ दुवा: नॅनोरिमो

No comments: