romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label गोष्टं. Show all posts
Showing posts with label गोष्टं. Show all posts

Saturday, April 7, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (११)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १० आणि त्यानंतर... 
महेशची अवस्था अत्यंत दारूण झालीए. अंकित महेशचा सेलफोन घेऊन घरभर पळत सुटलाय. अंकितनं आता महेशला ब्लॅकमेल करायला सुरवात केलीए. महेशची झोप पार उडालीए आणि त्याला अंकितच्या मागे पळत सुटण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही!
"अर्‍ये- अर्‍ये थांब- थांब-"
"मोनाला सांगता काय?"
"नाही- नाही रे माझ्या सोना- सोन्या!"
"मी दिवटा काय?"
"नाही रे कुलदीपका नाही!"
"आम्ही उध्वस्त केलंय तुम्हाला, काय?"
"नाही नाही रे मस्त मस्त- यायलारे- मस्त आहात तुम्ही दोघं- तू आणि तुझी आई- असं म्हणायचं होतं मला. हात जोडतो बाबा तुला- तुझ्या आईला यातलं काही सांगू नकोस- प्लीऽऽज- काय मागशील ते देईन पण आवर- तुझ्या भावना आवर- आवर भावना!"
अंकित आता महेशला दरडावू लागलाय.
"मगाशी मोना म्हणाला होतात ना? आता भावना काय?"
"अब मुझे कुछ नही होना- सच्चीमें- मापी करो-"
"मग... मागाल ते द्यायचं!"
महेशला आता मान डोलवण्याशिवाय पर्याय नाही.
"हं! आईस्क्रिम... पिझ्झा... बर्गर... टॉयगन... कार... सेलफोन... होंडासिटी... टोयोटा... सॅन्ट्रो... एसेलवर्ल्ड... बिग बझार..."
प्रत्येक वेळी महेश पेंगत मान डोलवत रहातो.
"खाना.. खजाना.. सोना.. मोना.. मोना.. मोना.." अंकित आता फिदीफिदी हसत काय वाट्टेल ते बडबडू लागलाय.
"घे बाबा तुला काय घ्यायचं ते घेना- पण मला सोड-"
अंकित आता खो खो हसू लागलाय. महेशचा सेलफोन वाजू लागलाय आणि महेश पुन्हा झोपेच्या आधीन होऊन बडबडू लागलाय.
"मोना- मोना- आता तू का बरं पुन्हा पुन्हा फोन करकरून त्रास देते आहेस? तू सुद्धा मला सोड- एकटं रहायचंय मला-"
महेशची अवस्था वेड्या माणसासारखी होऊ लागलीए. त्याला बघून अंकित कपाळावर हात मारतो.
"आयशप्पत! यांचं टाळकं सरकलं वाटतं... हॅलोऽऽ- हॅ- हॅ-लॉऽऽ- ओऽऽ बोला नाऽऽ ऍंऽ ऍंऽ हां- थांबा- प्लीज वेऽऽट! वेऽऽट प्लीऽऽज!"
धावत महेशकडे येतो. त्याच्याकडे बघतच रहातो. महेश स्वत:शीच पुटपुटतोय.
"च्यक च्यक च्यक... आधी बरे होते.. कामातून गेली केस! च्यक च्यक.. मोना काय, सोना काय, भावना काय- ममा येऊदे मग बरोब्बर करतो तुम्हाला-"
महेश आता झोपेत वेगळ्याच दिशेला बघत बडबडू लागलाय.
"मोना अगं कोण आहे? कोण आहे फोनवर?- मला फसवू नकोस. मी जागाए.. अजिबात झोपेत नाही- आऽआऽआईगंऽऽ मोना-मोना-बोलना-गप का मोना- बोल ना!"
"ओऽऽ पपाऽऽ मोनाबिना कुणी नाईएऽ इथेऽ- मोना- कोना- टोना- फोना- अरे हो! हा फोना- आपलं हा फोनए तुमच्यासाठी- पपा- डॅडी- बाबाऽऽ येडे झाले माज्ये बाबाऽऽ पपाऽऽऽऽ"
महेश त्या भोकाडाने जरासा सावध झालाय.
"ये रेड्याऽऽ रडतोस काय माझ्या नावानं- गळा काढून! अजून आहे मी जिवंत! गेलेलो नाही! वर!- झोपतोय नुसता!- घरी दिवसपाळी आणि ऑफिसात रात्रपाळी करून करून! जीव जायची पाळी आलीए आता!- पण गेलेला नाहीए अजून!... अर्‍ये गप! गऽऽप!"
महेश अंकितच्या तोंडावर हात ठेवतोय आणि त्याचवेळी अंकित ’तुमचा फोन’ तुमचा फोन’ असं ओरडायला जातोय.
:अर्‍ये- अर्‍ये- चावतोस काय कारट्या-" महेश आपला हाय चोळतोय.
"मग काय करू? तुमचा फोनए फोनए असं सांगतोय तर तुम्ही माझंच तोंड-"
"द्ये! द्ये इकड्ये!... कोण ए? काय ए? ऑं? काय ए? काय चाललंय काय? ऑं? काय वेळाकाळाचं भान आहे की नाही? ऑं? काय काय काय? वर मलाच विचारताय काय?- काऽऽऽय? अहोऽऽ मी तुम्हाला विचारतोय काय? का- काय- काय म्हणजे?- आं- आं- हां हां आपलं ते हे- हां! काय समजतं की नाही तुम्हाला? कधीही फोन करता? अहो इथे काय काय झालंय!- नाही ऐका तुम्ही- तुम्ही- तुम्हाला ऐकायलाच लागेल- नाही मी फोन सोडणारच नाही तोपर्यंत!"
अंकितनं कपाळावर- पुन्हा- हात मारून घेतलाय.
"अहोऽऽ माझी आई गेली- सासू गेली- ऑं? अहोऽ गेली म्हणजे तशी नाही हो - पळून गेली- गेल्या- च्यक च्यक च्यक... कुणाबरोबर नाही होऽऽ- म्हणजे झालंय काय- मला मुलगी झाली- मुलगी! मुलगी!- मुलगा?- अहो‍ऽ मुलगा होताच आधी, असं काय करता?.. तर.. दोघांना कुणी सांभाळायचं- च्यक च्यक.. दोघांना म्हणजे त्या दोघींना नव्हे होऽ आईला आणि सासूला नव्हे! मुलांना! मु लां ना! हां! मुलांना कुणी सांभाळायचं म्हणून पळून गेल्या त्याऽ- मुलांना घेऊन?- हे कुणी सांगितलं तुम्हालाऽऽ मी? - यायला कोण यडचॅप बोलतोय पलिकडून-"
अंकित आता कपाळावर हात मारून घेऊन दमलाय, "अहोऽऽ मला काय विचारताऽऽयऽ त्यानाच विचारा नाऽऽ"
"अहोऽऽ मला सांगाल काऽऽ मी कुणाशी बोलतोयऽऽ ऑं? ऑं? तुम्हाला काहीच समजत नाहिएऽ -अहोऽ मगऽ तुम्हीऽ माझ्याशीऽ का बोलत राह्यलाय मगासपासूनऽऽ हां हूं का करत बसलाय माझ्या बोलण्यावर? ऑं? तुम्हाला- तुम्हाला मराठीही कळत नाही!- अहोऽ मग काय सूड उगवताय माझ्यावर हां हूं करूऽऽन!- मऽऽग?.. हे शहाण्यासारखं झालं की वेड्यासारखं- हां हां!- ये श्यान्येजैसा हुवा की पागलजैसा- म्येरेको बोलोऽऽ- क्या? कोनसा?... परपरांतीय लालनपालन बालन संघ!- हे काय आहे?.. काय आहे म्हणजे नाव आहे की गाणं आहे?.. ऑं? येऽऽ क्या करताय क्या तुम- तुमारा ये- ये- बालन लालन पालन- ऑं? क्या बोलताय?- मैंने? कबी?ऽऽ- ऑं- ऑं- हां हां- मेरी बायकोने! आपलं हे बीबीने- बीबीने- हां हां!- म्येरे बीबीने फोन किया होगा आपकोऽऽ- मैईं? मैईं बीबी का मकबरा- आपलं ह्ये नवरा- नवरा- आदमी- मरद- यायलारे- हां हां- बच्च्येका बाप- पिता- हां हां तो- तो- हां- घरमेंच दोनो बच्चेकू- हां- घरमेच संभालनेका! हां रे हां- आंग्गाश्शीऽऽ क्या बराब्बार बॉलताय रे बाबाऽऽ हां हां वहीच! उसके वास्तेच फोन किया आपकोऽ- ऑं? फिर बोलोऽ किसको भेजताय? ऑं? टी मंजू?... हां टी मंजू! कोन है कोन? अहो म्हंज्ये- औरत या मरद? हां! हां! किदरका है? - आरे मेरा मतलब है साऊथका- यूपी या बिहार- नक्की किदरका- हां हां- हां साब!... मापी करना हम वो सुरवातमें आपको- हां-हां-हां- मंगताय उतना लो पैसा बाबा- हमारे आंगनमें झाड है पैसेका- हां हां- आता ठेव बाबा ठेव- ऑं- द्येव भ्येज द्येव बाबा मंजू टी- या टी मंजू कोन हय उसको! जल्दी जल्दी हांऽऽ हां! हांऽऽऽ... हाऽ हाऽ हाऽ हाऽ"
"पपाऽऽ काय झालं काऽऽय?"
"अर्‍ये बछड्याऽऽ टी मंजू येणारेय टी मंजूऽऽ तुम्हाला सांभाळायलाऽऽ"
"याऽऽ येऽऽ पपाऽऽ"
त्याचवेळी पाळण्यातली अवनी जोरजोरात रडू लागलीय आणि दोघे तिच्या दिशेने धावत सुटलेत...     क्रमश:     


 

Friday, March 30, 2012

चक्रव्यूह

ही गोष्टं अशी जराशी बदलली, तर कसं होईल?
नाही, नाही! रेकॉर्डसमधे ढवळाढवळ करायची नाही.
संदर्भ बदलायचे नाहीतच.
मुख्य म्हणजे इश्यू अजिबात करायचा नाहिये!
तरी पण सहज.
ठीक आहे! गंमत म्हणून म्हणा-
तर सर्वप्रथम
तो पोटात असताना चक्रव्यूह भेदायचं, तो फोडून आत घुसायचं तत्वज्ञान त्यानं ऐकलं, हे कुणी ठरवलं?
त्याची आई जेव्हा हे सगळं ऐकत होती. त्यावेळी तिच्या डोक्यात भलतीच अवधानं.
ज्याच्याशी संसार मांडला तो कसा आहे याची पहिली जाणीव, खच्ची करणारी. कष्टं. अपार कष्टं. अगदी पोटूश्या स्थितीतही मैलावरनं भरलेले हंडे पाणी व्हायचं. नवरा घरी आल्यावर रात्री अपरात्री त्याला वाढायचं. वर त्याचा विचित्र स्वभाव आपलं कर्तव्य मानून सोसायचा. त्यावेळी कुणी ते तत्वज्ञान तिला ऐकवलं असं जर आपण गृहीत धरलं तर. तर या सगळ्या परिस्थितीत त्या गर्भापर्यंत ते पोहोचलं का? हा मूलभूत प्रश्न!
मूलभूत प्रश्नं विचारलेले आवडत नाहीत? राग येतो? मग ठीक आहे, हेही गृहीत धरू.
पुढे ते सिद्ध झालंच म्हणा.
एक नाही अनेक चक्रव्यूहांत त्याला घुसावं लागलं. जेव्हापासून समज नावाची काही एक वस्तू त्याला मिळालीए अशी बातमी सर्वदूर पसरली होती त्यावेळपासूनच.
बरय़ाच वेळा त्याच्या वडीलधारय़ानीच त्याला तो नाही नाही म्हणत असतानाच त्या चक्रव्यूहांत ढकललं होतं आणि आपल्यावरची जबाबदारी तर झटकलीच होती पण किनारय़ावर काठ्या घेऊन त्याला पुन्हा आत ढोसायला डोळ्यात तेल घालून उभे होते.
आई: वरच्या लेव्हलवरच्या चक्रव्यूहातच सापडलेली. लढता लढता जिवानिशी संपली. त्याला आता, आत काय बाहेर काय, सारखंच असं वाटायला लागलं. काहीही त्याच्या हातात नव्हतंच. शिवाय तो सूज्ञ, समंजस, महत्वाकांक्षी. वडीलधारय़ानाच काय कुणालाच न दुखावणारा. आता त्याच्या पाठीवरचे भाईबंदही त्याला खुळ्यात काढायला लागले. त्याना समज नाही ते परिपक्व झालेले नाहीत असं तो म्हणू शकत होता. पण वडीलधारय़ांचं काय?
नैसर्गिक प्रक्रिया खरी असते. तिला अर्थातच काही नियम असतात. तिचा वेगही खूप कमी असतो.
कित्येक वर्षं तो नुसताच धुमसला. यानं धुमसून एकूण एक आचरटांच्या डोक्यात काहीच शिरणार नव्हतं. शेवटी एका ज्येष्ठ आचरटेआझमच्या पायावर त्यानं अक्षरश: डोकं आपटून घेतलं. अर्थात त्या आचरटेआझमनं काही त्याच्या डोक्यावरून हात फिरवला नाहीच. उलट नको ते विचार करतो म्हणून हळवा अशी शिवी दिली.
कोणालाही न दुखवणारय़ा, वडीलधारय़ांसमोर नेहेमीच मान तुकवणारय़ा त्याला, आता हे कळलं की या आचरटांच्या नादाला आपल्यासारख्यानं लागणं पूर्णत: चुकीचंच. आईची अवस्था तो बघतच आला होता. असं डोकं आपटून घेतल्यावरच कळतं, डोकं आपटून घेऊन आपल्याच कपाळाला जखम होते; दुसरय़ाचं काही जात नाही.
पुन्हा आईच्या पोटात जाऊन उरलेला मध्यंतरानंतरचा भाग ऐकायला आई तर नव्हतीच. शिवाय आणखी एक जन्म घ्यावा लागणार.
तेव्हा या माणसांनीच- आपल्या असं म्हणावं लागतं अशांनीच- चक्रव्यूह तयार केले, सापळे तयार केलेत; ते भेदणं ही एक अकर्मक क्रिया होय.
अगदी शेवटची काडी पडताच त्यानं आपण स्वत:, आपलं लक्ष्य यांकडेच लक्ष द्यायचं ठरवलं.
आता तुम्ही म्हणाल, यात काय नवीन?
पण मी नाविन्य असेल या कथेत असं म्हणालो का?
नाही.
आताही मी तेच म्हणतोय, ती गोष्टं अशी जराशी बदलली तर कसं होईल? 

लोण्याच्या गोळ्याची गोष्टं!

तो रोज दुधाचा हंडा घेऊन बाहेर पडायचा आणि संध्याकाळी त्याचा मोबदला घेऊन परतायचा. फारशी झिकझिक नव्हती. सुखात झोप लागायची.
बरय़ाच वेळा या दिनक्रमाचा त्याला उबग येई. कधी कधी वेगळं काही करावसंही वाटे. काही रात्री झोप चाळवली जायची. -पुढे काही करायचं ते यातूनच मार्ग काढून- तेवढा security conscious अर्थात होताच तो.
तशी तीही होती. विरजण घालायची. कशावर?- I mean- विरजण लावायची, ते घेऊन बाहेर पडायची आणि संध्याकाळी येऊन आलेले पैसे वडलांजवळ जमा करायची. बाबा आदमच्या- sorry- आई इव्हच्या काळापासून तिचा हा दिनक्रम चालू होता.
निसर्गत:च ह्या दोन जीवांचा फिरण्याचा विभाग एकच असल्यानं दोघांची भेट व्हायचीच.
पुढे योगायोग म्हणा, चित्रपटात दाखवतात तसं म्हणा, त्या दोघांना कुणी सुचवलं म्हणून म्हणा, दूध आणि विरजण एकत्र आल्यावर ताक होतं आणि ताकाला market खूप आहे ह्यावर त्या दोघांचं एकमत झालं आणि तो व ती अवघ्या पंचक्रोशीत ताकवाले म्हणून फेमस झाले.
तिच्या विरजणाला चांगलाच भाव येऊ लागला. त्याचंही कर्तृत्व सिद्ध व्हायला लागलं. अर्थात जगाच्या दृष्टीने त्यांची इतिकर्तव्यता झाली!
पण हे असं एवढ्यावरच थांबलं असं झालं नाही. असं कधीच होत नाही, and they lived thereafter ही पाटी फक्त सिनेमापडद्यावरच दिसते.
मजा अशी झाली की मागणी तसा पुरवठा असला तरी ताकसंचय खूप व्हायचा आणि मग ते टिकावं म्हणून घुसळून ठेवायला लागायचं.
असं रोज करता एक दिवस त्यातून एक आकर्षक गोळा वर आला. आता त्या दोघांना आणखी पुढचे वेध लागायला लागले. गोळ्याच्या रूपानं मनोराज्य फुलायला लागली. अर्थात ती प्रत्येकाची होती, तशीच दोघांची एकत्रही होतीच. त्यामुळे तो गोळा ते नीट जपून ठेवत.
सगळं काही आलबेल असतानाच आताशा मात्र अघटीत घडायला लागलं होतं. त्या दोघांच्या छातीत धडधडायला लागलं होतं. जीवापाड जपलेला तो गोळा हळूहळू कमी कमी होऊ लागला होता. आधी त्याला वाटलं तो आपोआपच विरून जातोय. नीट लक्ष ठेवून बघताना कळलं, नाही, त्या गोळ्यावर कुणीतरी घाला घालत होतं.
बरय़ाच त्रासाअंती, खूप विचाराअंती त्याचं कारण त्याना समजलं. तो सोकावलेला बोका गोळ्यावर रोज ताव मारत होता. तेही त्याना स्पष्टपणे कधीच दिसत नव्हतं आणि तरीही त्यांची त्या बोक्याबद्दलची आणि त्याच्या कर्माबद्दलची खात्री मात्र पक्की होती. पण अघटीताचं कार्यकारण त्याना अजिबात उमगत नव्हतं.
गोळ्यावरून आपण कधी भांडलो नाही. ना न्याय करायला त्या बोक्याकडे गेलो. वा मुद्दाम त्या बोक्याच्या वाटेला गेलो नाही. त्याच्या नादी तर मुळीच लागलो नाही.
थोडक्यात मागच्यांसारखं काहीच केलं नाही. मग तो लोण्यावर ताव मारतो कसा? आमच्या अंत:करणावर घाव घालतो कसा?
काही केल्या त्याना उत्तर सापडेना. बोकाही जेमतेम दिसे अस्तित्व जाणवण्यापुरता पण लोण्याचा गोळा आणि पर्यायानं पुढचं सगळंच खोल अंधारकोठडीत ढकलल्यासारखं झालं.
त्या अदृष्य कठोर शत्रुशी ते अंदाजपंचे वेडेवाकडे हात करत राहिले आणि हे काय आपल्यापुढे वाढून ठेवलंय या विचाराने किंकर्तव्यमूढ झाले.
त्या अदृष्य, अतर्क्य. कठोर शक्तीशी झगडायचं सोडून; दांपत्यगुणाच्या मूळ स्वभावानुसार एकमेकांशीच झगडायला लागले.
जेव्हा सूर्य माथ्यावर तळपायला लागला तेव्हा दोघांच्या काही गोष्टी लक्षात आल्या- आधी कुणाच्या आल्या हा मुद्दा गौण- की इतकं सगळं होऊनही आपण जगतो आहोतच.
पुन्हा फार तर त्यानं दुधाचा आणि तिनं विरजणाचा असे व्यवसाय स्वतंत्रपणे परत सुरू केलेत. तरीही आणि बोक्यानं सतत खाऊनही थोडं थोडं का होईना लोणी तयार होतच आहे!
त्या लोण्याची जिद्द एवढी? मग आपली अंत:करणं तर केवढी कणखर आहेत! अभेद्य आहेत! त्या अदृष्य, अतर्क्य, कठोर बोक्याचे घावसुद्धा आपण हो नाही म्हणता म्हणता पचवले आहेत, पचवतो आहोत! मुख्य म्हणजे लोणी उरतंय..
..हल्ली ती दोघंही तुपाचा, तुपातल्या मिठायांचा आणि लोण्यापासून बनणारय़ा इतर पदार्थांचा आस्वाद तर घेतातच. शिवाय ते पदार्थ घेऊन दोघंही रोज सकाळी एकत्र बाहेर पडतात आणि संध्याकाळी- नव्हे रात्री- एकत्रच परतून सुखासमाधानाने झोपी जातात...

ही कथा आणि तिच्यावरचे अभिप्राय आपण इथेही वाचू शकता!