romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, September 28, 2012

उत्सव...४

इथे वाचा उत्सव १, उत्सव २, उत्सव ३ आणि त्यानंतर...
दुसर्‍याच म्हणजे दसर्‍याच्या दिवशी सकाळी वाजवणारी मंडळी दमून भागून वस्तीत परतली आणि कुणीतरी सांगत आलं, वस्तीपाठीमागच्या रेल्वेलायनीत कुणीतरी कटलं...
चिमणचा अंदाज खरा ठरला. ती रात्रीची मुलगी होती. चिमण हादरला पण यावेळी पोलिसांकडे सरकला आणि बायकोसकट वस्तीतल्यानी त्याला मागे खेचलं. कुणालाही मागे पोलिसांचा ससेमिरा नको होता. चिमणला त्यानी वस्तीत आणून डांबलं. चिमणची झोप उडाली...
वस्तीतल्यांचा भर ओसरल्यावर, मुलीचे दिवस उरकले आहेत हे बघून आतल्या आत धुमसणार्‍या चिमणनं सगळ्यांच्या नकळत त्या मुलीचं घर शोधून काढलं. आईवडलांना भेटला. मुलीला पळवून नेणार्‍यांचे चेहेरे लक्षात आहेत. आपण काहीतरी करू म्हणून विनवलं. ते सतत हात जोडत राहिले. मुलगी गेल्यावर त्यांची ताकदच गेली. कुठे विषयसुद्धा काढू नका म्हणून त्यानी चिमणलाच बजावलं आणि वाटेला लावलं. त्या दिवशी... चिमण पहिल्यांदा दारू प्याला आणि लास झाला...
त्यानंतर डुलकी जरी लागली तरी त्या मुलीचं लोकल खालचं शरीर डोळ्यासमोर येऊन तो दचकायला लागला...
पुढे मग मुलीची केसच उभी राहिली नाही. ती पोरं मानानं फिरू लागली. एवढंच काय वर्ष सरून पुढच्या नवरात्रीचा पेंडॉलसुद्धा पडला. रोषणाई झाली. वस्तीतला बाजासुद्धा रूजू झाला. चिमण त्यात नव्हता...
भान हरवणं आणि भानावर येणं हा खेळ चिमणला जास्त महत्वाचा वाटत होता. आपण त्या मुलीला सावध केलंय, त्या टग्या पोरांना पोलिसांची भीती घालून आवाज दिलाय, वस्तीतल्याना, बायकोला झुगारून पोलिसांत गेलोय, मुलीच्या आईवडलांना तयार केलंय, कमीतकमी, अंधारात त्या पोरांच्या गाडीवर उडी मारली आहे... मुलीला ट्रेनखाली उडी घेण्याआधी मागे खेचलंय... काहीही करून मुलीला वाचवलंय अशी दृष्यं नजरेसमोर आणत तो कुठेतरी नजर लाऊन बसत होता. स्वत;शीच हसत होता. भान हरवत होता...
भानावर आला की लोकांनी साजरी केलेली गटारी, श्रावणी सोमवारचे देवळातले अन्नकोट आणि बाहेर भिकार्‍यांची रांग, गोकुळाष्टमीतला रस्ताजाम आणि अडकलेल्या ऍंब्युलन्स, पितृपक्ष आणि सोनेखरेदीची झुंबड, दिवाळी, नाताळ, नववर्षाचे कानठळी फटाके... लग्नसोहोळे, वाढदिवस, जयंत्या, मयंत्या... पूजा... वेगवेगळे ’डे’ज, खेळातले विजय, निवडणुकीतले विजय, मिरवणुका, रथयात्रा, गौरवयात्रा... हे सगळं बघून पुन्हा भान हरवत होता...
...आत्ताही त्या रस्त्यावरचा माणसांचा पूर आटत नव्हता... कचर्‍याचा ओला लगदा कणकेसारखा मळत रस्ताभर पसरत होता... तीन चार फूट वर ध्वनीचा लगदा... वेगवेगळे लोक अजूनही गणपती आणत होते... सगळं जसच्या तसं होतं...
त्या सगळ्यात रूतलेला चिमण स्वत:शीच हसत होता... आत्ताच पुन्हा एकदा त्यानं त्या मुलीला वाचवलं होतं...
त्याच्या पुढ्यात अंथरलेलं गोणपाट तसंच होतं... त्यावर ऍस्टरच्या विटलेल्या निळ्या, जांभळ्या, राखाडी फुलांचे वाटे तसेच बेवारशासारखे विखुरलेले होते...      
(पूर्वप्रसिद्धी: "अक्षर" दिवाळी २००२, संपादक, निखिल वागळे)      

Thursday, September 27, 2012

उत्सव...३

इथे वाचा उत्सव १, उत्सव २ आणि त्यानंतर... 
... दरम्यान चाळीच्या किंवा सोसायटीच्या अंगणात मातीच्या घड्यात दिवा लाऊन, अंबेमातेची तसबीर लाऊन, ती पुजून त्याभोवती खेळलं जाणारं नवरात्र भल्या मोठ्या पेंडॉलमधे आलं. ड्रमसेट मधल्या पाच ड्रम्स बरोबर स्पर्धा करत चिमणचा बाजा तरीही टिकून राहिला खरा...
तरूण मुलामुलींचा उत्साह चिमण ढोल वाजवता वाजवता बघायचा. हळूहळू हा उत्साह प्रमाणाबाहेर वाढायचा. मुलामुलींची प्रकरणं व्हायची. त्रासदायक छेडाछेडी सुरू झाली की चिमणच्या कपाळावर आठी उमटायची. त्याला तसल्या त्या उद्दाम मुलांकडे दुर्लक्ष करता यायचं नाही. आतल्या आत संतापणं, जास्तच दिसलं तर संतापानं जळत रहाणं- आतल्या आत- याशिवाय चिमणसारखा माणूस करू तरी काय शकत होता?... बारीक लक्ष मात्रं ठेऊ शकत होता...
एका नवव्या रात्री याच त्याच्या बारकाईने त्याला मंडपामागच्या अंधारात खेचून आणलं. वाजवायचं सोडून देऊन. गेले आठ दिवस तीन चार पोरं एका शाळकरी पण बाई झालेल्या मुलीच्या मागे. हात धुऊन. त्या मुलीला सावध करावं तरी पंचाईत. आज त्या पोरांनी तिच्याभोवती कडं केलं. तिला ते मंडपामागे नेताहेत हे चिमणच्या नजरेतून सुटलं नाही. तो लगेच धावला. अंधारात कडमडला. दोन चार पोरांच्या लाथा, गुद्दे पोटात खाल्ले. त्या काळ्या अंधारात त्या पोरांच्या कारचा नंबरही बघता आला नाही. पोरीच्या तोंडावर आणि कमरेभोवती हात घालून गाडीत कोंबलंय हे न समजायला तो दुधखुळा नव्हता. तसाच पडत धडपडत तो मंडपात यायला बघतोय तर आता सिक्युरिटीवाला कुणास ठाऊक आडवा आला आणि चिमणलाच झापायला लागला. चिमणला कशीतरी स्बत:ची ओळख पटवायला लागली. ती सुरक्षारक्षकांनी सहजासहजी पटवून घेतलीच नाही. पुढे चिमण झाल्या प्रकाराबद्दल, अंधारातल्या, सांगायला लागला तर त्या रखवालदाराना वाद्यमेळाच्या आवाजाचं चांगलंच कारण मिळालं. प्रचंड डेसिबल्स गाठत असलेल्या. तरीही सांगायचा प्रयत्न करणार्‍या चिमणला त्यानी इतक्या जोरात मंडपात ढकललं की तो झेलपाटलाच. पुढे ते सुरक्षारक्षक त्याला कुठे दिसलेच नाहीत...
चिमणनं वाजवणार्‍या सहकार्‍यांना सांगायचा प्रयत्न केला. मंडळाच्या पदाधिकार्‍यांना शोधायचा, सांगण्याचा प्रयत्न केला. संबंध पेंडॉल फक्त बेहोषीत न्हाऊन निघालेला. त्यातून बाहेर पडायची कुणाचीच इच्छा दिसत नव्हती...
चिमणच्या डोक्यात वीज चमकली आणि त्यानं त्या मुलीबरोबरच्या ग्रुपकडे बघितलं. गायब. त्यानं शोध शोध शोधलं पण त्या मुलीबरोबरच्या ग्रुपमधलं कोणीही दिसत नव्हतं.
त्याचं पाऊल लाकडी खुर्च्यांमधे रेलून थंडा पिणार्‍या पोलिसांच्या दिशेनेही पडलं. पण तो अडखळला. मागच्याच वर्षी कुणी चाकू काढला म्हणून वाजवणार्‍यांनी पोलिसांना त्याची चेहेरेपट्टी सांगितली तर पोलिसांनी मेहेतर वस्तीत येऊन वाजवणार्‍या पोरांच्यातल्याच एकाला चांगलंच कानपटवलं, आतही टाकलं. चिमणला ते आठवून धीर होईना. तो सारखा पोलिसांपर्यंत जायचा. परत यायचा. स्वत:वरच चिडायचा. पोरीचं नाव गाव काही माहित नाही काय सांगणार पोलिसांना?...
रात्रभर जल्लोष चालू राहिला. वाजवणारे चेवून वाजवत राहिले. नाचणारे पृथ्वीतलावर राहिले नव्हतेच. गाणार्‍यांचे स्वर आकाशाला भिडलेले. ’अंबा मातं कीऽऽ... जयऽऽ’ या घोषानी आसमंत दणाणून जात होता आणि चिमण झुटुकपाण्या घालत होता. सहकार्‍यांपासून पोलिस बसले होते तिथपर्यंत आणि पुन्हा मागे सहकार्‍यांपर्यंत. सहकारी वाजवणं सोडत नव्हते आणि पोलिस वाजवतील या भीतीनं चिमणला त्याना भेटता येत नव्हतं. काय गरज होती चिमणला नाही त्या लफड्यात अडकायची? तो काय करू शकणार होता? एकटा! सगळं जग छान आनंदात होतं. चिमण एकटा स्वत:ला वांझ त्रास करून घेत होता...   क्रमश:    

Saturday, September 22, 2012

उत्सव...२

इथे वाचा उत्सव...१ हा या आधीचा भाग!
नवीन होता शहरात चिमण... बॅंडचा ठॅण ठॅण आवाज कानाचे पडदे चेपटून टाकणारा... ’मैं तो भूल चली बाबुल का देस...’ ही धून चिमणनं लगेच ओळखली. बॅंडवाले पुढे सरकतच नव्हते. पुढे हीऽऽ गर्दी. बॅंडवाले साधेसुधे नाहीत. लाल वेलवेटसारख्या कापडाच्या पॅंट्स. गमबुटासारख्या गुडघ्यापर्यंतच्या बुटांत खोचलेल्या. त्याना दोन्ही बाजूला सोनेरी पट्ट्या. पांढराशुभ्र जाड शर्ट पॅंटम्धे इन केलेला. त्या शर्टावर चामडी पट्ट्यांचं जाळं. खांद्यावर झुलणार्‍या झिरमिळ्या. झोकदार कॅपलासुद्धा झिरमिळ्या. हातात चमकणारी वाद्यं. चिमणची बोटं शिवशिवायला लागली. सगळ्यात शेवटचा, खांद्यावर हेऽऽ भलं मोठं ट्रंपेट घेतलेला नजरेपुढून नाहीसा होईपर्यंत चिमण डोळे फाडून त्या बॅंडकडे पहात राहिला. बॅंडमागे पुन्हा गर्दी...
ह्या मागच्या गर्दीतले उड्या मार मारून काहीतरी झेलत होते. झेलल्यावर झेलणारा आणि त्याच्या आजूबाजूचा घोळका हेऽऽहोऽऽ करून ओरडत होता. विकेट गेल्यासारखा किंवा गोल झाल्यासारखा. ते काय झेलताएत ते चिमण निरखून निरखून बघू लागला. काहीतरी झेलायला हपापलेली ती गर्दी पुढे सरकू लागली. चिमण वाकवाकून निरखू लागला. गर्दीत अचानक एक चांदीचा रथ आत्ताच अवतीर्ण झाल्यासारखा चकाकू लागला आणि चिमणचं झेलणार्‍या गर्दीवरचं लक्ष उडालं...
चांदीचं प्लेटिंग असलेली ती बग्गी होती. खाकी कपड्यातला चाबुकवाला आणि त्याच्या मागे तो होता. जाड काचांची नाजूक फ्रेम घातलेला. त्यानं वाकून, खाली हात घालून पटकन काहीतरी काढलं. ती फुलपॅंट होती. तिची भरभर गुंडाळी करून त्याने ती गर्दीवर भिरकावली आणि पुन्हा विकेट गेली.. किंवा गोल झाला... सीमारेषेवरून जिवाच्या आकांताने थ्रो करावा तसा तो जाड चष्मेवाला कपडे फेकत होता... झेलायला हपापलेली गर्दी ते सगळं सगळं हर्षोल्हासात झेलत होती... चिमणच्या तोंडाचा आ तसाच राहिला. हे नक्की काय? त्याला काही समजेना. तो आणखी पुढे होऊन बघायला लागला तेव्हा फाटकाच्या बाजूने ख्यॅऽऽक ख्यॅऽऽकऽ आवाज आला. दोन कॉलेजची पोरं ते बघत उभी होती.
"अर्‍ये असा काय हाऽऽ-" पहिला.
"चूप! चूप बस! आता संन्यास घेणार आहे तो म्हणून कपडे वाटतोय आपलेऽऽ" दुसर्‍यानं पहिल्याला दटावलं. चिमणला हे नवीन होतं. गर्दीतले सगळे पुरूष, बायका, मुलं थटून सजून मिरवत होती. त्या चष्मेवाल्याला निरोप देत होती. हपापल्यासारखे त्याचे कपडे झेलत होती. हातात झाडू घेऊन चिमण ती मिरवणूक पहात तसाच उभा होता... अवाक होऊन...
... मग दिवसभर त्याच्या डोक्यात गिरमिट फिरत राहिलं... संन्यास घ्यायचा मग तो एवढा वाजत गाजत का? बॅंडबिंड लाऊन? कपडे कशाला फेकायचे असे श्रीमंती गर्दीत?.. आणि गर्दीनेही ते झेलायचे?... एवढा सगळा गाजावाजा करून संसार सोडायचा?... शेवटी न रहावून त्याने बॅंकेतल्या त्या जाड्या हेडक्लार्कला विचारलंच. तो खेकसला, "तमे तमारा कामथी मतलब राखो ने झाडू मारवानू! होलो बेचारो सर्वसंगपरित्याग करे छे ने तमे पुछोछो एम केम? एम केम? झाडू मार सारी रितेऽऽ"...
चिमण ही आठवण झाल्यावर आता पुन्हा हसला. त्याला तो जाडा हेडक्लार्क पुन्हा पुन्हा आठवत राहिला. येणाजाणार्‍यावर सतत खेकसणारा आणि मग पर्युषणासाठी रजा घेणारा. नववर्ष सुरू होण्याआधीचे हे कडक उपास जाड्या कसा करत असेल? रजा घेऊन, घरी बसून? घरच्यांची हालतच... चिमण आता जरा जोरातच हसला. जाड्यानेही पांढरेशुभ्र बेदाग कपडे घातले असतील. टिळा लावला असेल. तोही- कचकन गर्दीतल्या कुणाचा तरी पाय चिमणच्या पायावर पडला आणि तो भानावर आला...
तरीही गणपती येतच होते... अवती भोवतीनं... मेरी गो राऊंडमधे बसल्यासारखे... चिमणभोवती फेर धरून...
चिमण निर्धाराने एकटक त्यांच्याकडे बघत बसला. अशाने कदाचित भोवंडल्यासारखं होणार नाही म्हणून... गणपतींचा फेर त्याला आता वाढल्यासारखा वाटायला लागला... नवरात्रीच्या गरब्याचा तो विशिष्ट ताल त्याला प्रतिध्वनीसकट ऐकायला यायला लागला... आणि चिमण पुन्हा आपलं भान हरवला... त्याचे हात ताल धरू लागले... हळूहळू आपल्या हातात ढोल वाजवायच्या वेताच्या छड्या आहेत असं त्याला वाटायला लागलं...
चिमणला त्याच्या एका गाववाल्यानं वापीहून इथे आणलं. इथल्या मेहतरांच्या वस्तीत तो सहज सामावून गेला. गाववाल्यानं त्याला कामालाही लावलं. अर्धवेळ सफाई कामगार म्हणून बॅंकेत. चिमण मग रात्रशाळेत गेला पण मॅट्रीक काही पास झाला नाही. पाच दहा वर्षांत बॅंकेत शिपाई मात्र झाला. मग ल्गेच लग्न. त्या मेहतरांच्या वस्तीत स्वत:चं झोपडं. आधी कच्चं बांधून घेऊन मग त्यावर सरकारचा नंबर पाडून घेऊन. चिमण स्मार्ट होता. नशिबानंही त्याला साथ दिली. तो काळ बरा होता.
जोडीला वस्तीतले मेहेतर नवरात्रीत वाजवायचे. त्यांचा बाजा होता. बेंजो होता. चिमण माणूसघाणा नव्हता. नसते कसलेही नाद लाऊन न घेता तो वस्तीत रूजला होता...                                                                                क्रमश:    

Monday, September 17, 2012

उत्सव...१

ब्लॉगवर लिहिण्याची एक पद्धत म्हणजे थेट लिहिणं. थेट लिहिता लिहिता चिकित्सा करत लिहिणं. एक एक मुद्दा घेऊन त्याचा वेगवेगळ्या अंगानं वेध घेत लिहिणं. बर्‍याच वेळा एकरेषीय होत जाणारं हे लिखाण. परखड, वास्तव, वाचणार्‍याला समृद्ध जरूर करणारं. वाचकाच्या माहितीत भर टाकणारं. पण काहीवेळा वाचकाचा संयम पहाणारं...
दुसरी पद्धत ललित अंगानं जाणारी. कदाचित समीक्षा करणार्‍यांशी जरा फटकूनच असणारी. रंजक म्हणून म्हणा किंवा इतरही काही असतील निकष. पण ललित लिहिताना लेखकाच्या बोध मनात असलेलं आणि नसलेलं महत्वाचंही काही अचानक सांडून जातं लिहिता लिहिता...  ललित हे कदाचित अनेक अंगानं जास्त फुलत जाणारं, अर्थबद्ध होत जाणारं.. कथा माध्यमातून महत्वाचा सामाजिक आशय व्यक्त होण्याची परंपरा तशी जुनीच..
दहा वर्षापूर्वी लिहिलेल्या कथेतलं वास्तवही आज जसंच्या तसं किंवा त्याहूनही गंभीर होत गेलेलं. ’उत्सव’ कथेचा हा भाग पहिला...


उत्सव... १

...शेवटी चिमणच्या बायकोनं चिमणला कुठूनतरी शोधून धंद्यावर आणून बसवलं तेव्हा चिमणच्या तोंडाला दारूची घाण मारत होतीच. आजूबाजूचे काही बाप्ये वेगळे नव्हते, ते ही तसलेच.
"बेहो अहिंयां हवेऽऽ.. बेहोऽऽ केऽऽम?ऽऽ.. जवानू नई किंयांऽऽ"
चिमणच्या बायकोनं चार चार वेळा बजावून सांगितलं आणि आपल्या झोपड्याकडे निघाली तेव्हाही तिला खात्री नव्हती चिमण उठून कुठे निघून जाणार नाही याची...
चिमण तोंडातली लाळ गिळत इकडे तिकडे पहात राहिला. मग हसला. कुणाकडे बघून नव्हे, असाच...
त्याच्या पुढ्यात अंथरलेलं गोणपाट. त्यावर निळ्या मेणकापडासारखं काहीतरी.. ऍस्टरच्या विटक्या निळ्या, जांभळ्य़ा, राखाडी फुलांचे वाटे त्या मेणकापडासारख्या अंथरीवर बेवारशासारखे विखुरलेले...
हे सगळंही क्षण दोन क्षण दिसणारं. त्या रस्त्यावर माणसांचा पूर लोटलेला. रस्त्याच्या जाळ्यात मासळीसारखी फडफडणारी असंख्य माणसं. फुलांचा, पानांचा, कागदांचा आणि आणखी कशाकशाचा कचरा तुडवत चालणारी. ओला लगदा कणकेसारखा मळत चाललेला रस्ताभर. त्याच्या मधोमध कुठेतरी बसलेला चिमण. तारवटलेल्या डोळ्यांचा. निगा न राखल्यानं पिंगट झालेल्या अस्ताव्यस्त केसांचा. पण दाढीमिशी सफाचट उडवलेला. गुळगुळीत चेहेर्‍याचा...
"गणपतीबाप्पाऽऽ मोरयाऽऽ... मोरयाऽऽ रेऽऽ बाप्पाऽऽ... मंगलमूर्तीऽऽ..." ... एकात एक मिसळलेल्या असंख्य घोषणा... "चलोऽ चलोऽऽ आगे चलोऽऽ पुढे बऽऽघऽऽ" असा ओरडाही त्यात मिसळलेला. रस्त्याच्या तीन चार फूट वर हा असा कचरा. ध्वनींचा. ओला लगदा. मधेच कुणी शेंबडं पोर "पुढच्या वर्षीऽऽ" असं म्हणून दात चावणारं. दर दोन तीन माणसांआडच्या माणसाच्या हातालाच जणू गणपती फुटलेला. तीही एवढीशी मूर्ती नव्हे! चांगली दोन सव्वा दोन फुटी मूर्ती. सगळ्या तेवढ्याच जवळ जवळ. वाट मिळावी म्हणून समोरच्या पाठीला स्पर्श करावा, तो मुर्दाडासारखा बाजू का होत नाही म्हणून पुढे डोकावण्याचा प्रयत्न करावा तर त्याच्या हातात गणपती. त्या गणपतीचा मुकुट जबड्यात रूतवून त्याचं वाट काढणं चालूच...
माणसांच्या पुराच्या रेट्यानं अदृष्य झालेला रस्ता. पुढे मागे सतत ढवळत चाललेला ओल्या कचर्‍याचा लगदा. त्यातच रूतून बसलेले धंदेवाले. काय काय बारीक मोठं विकायला घेऊन बसलेले. त्यांच्या वेड्यावाकड्या लाईनी. त्यामुळं फुटलेल्या असंख्य वाटा. वाळवीच्या अनेक शाखांसारख्या. त्यातनं, अशा सगळ्यामुळे झालेल्या जंतरमंतर म्धनं, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाण्यासाठी हपापलेली माणसं. आडवी आडवीतिडवी होणारी. भलत्याच फुटपाथला लागणारी. दातओठ खात वाट काढणारी. अनेक वयोगटातली, गरीब, श्रीमंत, अधली, मधली, जाती, धर्मांची. आज सकाळी सगळी जणू त्याच रस्त्यावर लोटलेली...
त्या बेंबीच्या देठापासून होणार्‍या घोषणांमुळे, भयानक रेट्यामुळे चिमण हळूहळू भानवर येत असावा. भानावर येत रहाणं आणि भान हरवणं याची चांगलीच सवय झालेला चिमण. त्याची अंतराळी लागलेली नजर जागेवर आली आणि नकळत तो गर्दीतला एक एक माणूस न्याहाळू लागला. त्यात भय्ये होते, मारवाडी होते, नेपाळी होते आणि अनेक गुजरातीही होते. सगळ्यांकडे गणपती. तो वापीहून इथे आला तेव्हा मराठीच गणपती आणत होते.. तो पुन्हा शोधक नजरेने वेगळा कुणी दिसतो का म्हणून पहात राहिला.. मग हसला.. स्वत;शीच.. गणपती तो सबका भगवान है.. त्याच्या मनात पुन्हा एकदा, कुणास ठाऊक कितव्यांदा येऊन गेलं.. माणसांच्या चेहेर्‍यांवरची त्याची नजर केव्हा खाली उतरली त्यालाच कळलं नाही... त्याला लोटणार्‍या, ओलांडणार्‍या आणि प्रसंगी तुडवणार्‍या लोकाना सहन करत तो समोर बघत राहिला. एक एक गणपती एकेका माणसाच्या दोन हातांवरच्या पाटावर बसून पुढे पुढे सरकत होते. जरा वेळानं त्याला जाणवलं, अवतीभवतीनंच गणपतींची येजा चालू होतेय.. मेरी गो राऊंडमधे बसल्यासारखे गणपती. जरा वेळानं त्या गणपतींनी चिमणच्या भोवती फेरच धरला आणि त्याला भोवंडल्यासारखं झालं.. आपोआप त्याची नजर वळली आणि रस्त्याच्या या टोकापर्यंत फिरली...
रस्त्याच्या या टोकाला उड्डाण पुलाचा कठडा एखाद्या सिनेमाच्या पडद्यासारखा पसरलेला. कठड्याखाली प्रचंड जनसागर.. लोढेंच लोंढे.. त्यांचं मूळच त्याला दिसेना. नुसता माणसांचा धबधबा.. काहींच्या डोक्यालाच फुटलेले गणपती... त्याचे डोळे दिपल्यासारखे झाले. नजर जागेवर आणावी तर गणपतींचा फेर. त्याची नजर आपोआप रस्त्याच्या दुसर्‍या टोकाकडे वळली...
रस्त्याच्या या टोकाला माणसांच्या समुद्राला बांध घातला गेला होता चकचकीत पोलिसी वॅन्सनी. त्याना टेकून, आजूबाजूला, रांगडे शस्त्रधारी शिपाई, अधिकारी. लोंढे तिथपर्यंत येत, त्या बांधामुळे थबकत, एकमेकाला टकरत, एकमेकांवर आदळत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथांकडे लोटले जात. दोन्ही फुटपाथांवर माणसं, धंदेवाले, स्टॉल्स, त्यामागच्या दुकानांची एक्सटेन्शन्स या सगळ्यामुळे ढकलाढकली. प्रत्येकाला वाट पाहिजे म्हणून चेंगराचेंगरी...
त्या पोलिसी बांधापलीकडे असलेला कबुतरखाना शांत वाटत होता म्हणून चिमणनं तिकडे टक लावली. कुणीतरी त्या शांतीदूतांनाही शांत बसू द्यायचं नाही असं ठरवल्यासारखी फाडफाड करत ती कबुतरं उडाली. उंच. काही समोरच्या जैन देरासरच्या सज्जात जाऊन बसली. ’मिच्छामि दुक्कडम’ लिहिलेल्या कापडी फलकावर. एक त्यावर शीटलंसुद्धा. चिमणला हसू आलं. त्या बिचार्‍या मुक्या जिवाला काय समजणार जैन नववर्ष सुरू झालंय ते! देरासरच्या सज्जावर तीन चार तसले फलक ताणून बसवलेले. नववर्ष शुभचिंतनाचे. खाली देरासरच्या आत काय गडबड चालली असेल हे चिमण कल्पनेनेसुद्धा पाहू शकत होता. पांढरेशुभ्र कपडे घातलेले अनेक बांधव लगबगीने येजा करत असतील. कपड्याचा परमोच्च पांढराशुभ्र रंग. पांढर्‍या रंगाची परम उत्कट छटा. डोक्याला, कपाळावर अष्टगंधी टिळे. देरासर गजबजलेलं असेल माणसांनी, ध्वनिक्षेपकावरच्या प्रार्थनांनी. प्रवेशद्वारावर जाकीट घातलेला धान्य विकणारा. त्याच्याकडचं धान्य विकत घेऊन ते कबुतरांवर उधळायचं की कबुतरं फडफडून उडणार आणि पुन्हा आधाशासारखी धान्याचे दाणे टिपण्यासाठी झेपावणार. पांढरेधोप कपडे घातलेली माणसं पुण्यवान होणार. चिमण पुन्हा हसला...
असा तो हसला की लोकं त्याच्याकडे विचित्र नजरेने बघायची. चिमणला त्याचं काहीच नसायचं, तो स्वत;शी आणखी हसत रहायचा. आत्ता, या क्षणी त्याला हसू आलं ते एका आठवणीमुळे.. तेव्हा तो पार्ट टाइम स्वीपर होता बॅंकेत. अर्धवेळ सफाई कामगार. सकाळी लवकर जाऊन बॅंकेची साफसफाई करत असताना एक दिवस कानठळ्या बसवणारा बॅंडचा आवाज आला म्हणून तो बाहेर आला...                                                                   (क्रमश:)                             
  

Friday, September 14, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१५)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४ आणि त्यानंतर...
"आईं आईं मैंई! आईं रे बाबां- ऐसा क्या करतांय?" मंजू दार उघडते आणि समोर महेशचं लाकडासारखं ताठ झालेलं ध्यान बघून दचकते, "आं?"
सरसरून महेशही दचकतो, "आं?"
मंजू घाईघाईने दार लाऊन घेते, "बाबां रें! कैसे कैसे लोग आतें! बेल बजातें- ऐसे- ऐसे ताठ होतें!" एकदा कानोसा घेते आणि आत निघून जाते.
महेश रागाने अजून सरसरतोय. सरसरून तावदारत असताना त्याचा तोल जातो. तो दारावरच आपटतो. आपटल्याबरोबर तोल जाऊन त्याची दिशा बदलते आणि तो पायर्‍यांवरून उलटा खाली येऊ लागतो.
"अर्‍ये ये- कडल्या काक्या- अर्धवटाऽ- मूर्खाऽ कुणाच्या घरी आणलंस मलाऽ पाज्याऽ हलकटाऽ कुठे आहेस तू? दिसेनासा झालास? गचकलास रे इतक्याऽऽतऽ-"
कडले टुणकन उडी मारून पुढे येतात, " अरे आई शप्पत महेश तुझंच घरए हे-"
महेश लडखडत जमेल तितका घरापासून लांब जातोय, " ओऽऽ बारबाला र्‍हातेय तिकड्ये काकाऽऽ मला काय मुरलीधरन समजलात मुत्तैय्या! अरे या ताठ, कडक झालेल्या माझ्या हातात काहीसुद्धा धरता येत नाहीए मलाऽऽ का च्येष्टा करताय माजीऽऽ  कुटल्या जन्मीचं पाप-" अचानक भोकाड पसरून रडायलाच लागतो.
कडले त्याचं सांत्वन करत त्याच्या भोवती फिरू लागतात आणि तो भोकड पसरत त्यांच्या अवतीभोवती फिरू लागतो.
"उगी उगी माझ्या राज्या- मी असं कसं करीन?"
"ओऽऽऽ मग माझी गौरी कुटाऽऽय?ऽऽ"
"अरे ऑफिसला-"
"बोऽऽ माझा अंकित कुटाऽऽयऽऽ?"
"अर्‍ये तो गेला शाळेत-"
"आंऽऽ कुणी सोडलं त्याला शाळेऽऽत?"
"अरे असं काय करतोस- गौरीनं-"
"होऽऽऽ न्हेमी मी सोडतोऽऽ"
 कडलेना आता त्याच्या भोवती फिरून फिरून वैताग आलाय, "आर्‍ये बाबाऽ आसा ताठ होऊन गावभर उंडारत फिरला नसतास बोंबलत, तर तूच सोडलं असतंस-"
"वोऽऽऽ माझी अवनी कुटाऽऽय?ऽऽ"
"तिच्या कडेऽऽवर-"
"ओऽऽ कोण ती?ऽऽ"
"ती घरातली-"
" अं अं.. मूर्ख माणसा ती बारबाली- बाला- बारबाला-"
""अर्‍ये बाबा तीच ती तू ठेवलेली बाई-"
"ओ‍ऽऽ काकाऽऽ आरोप करतायऽऽ मी बाई ठेवत नाईऽऽ"
"दमलो बाबा आता खरंच दमलो.. ए बाबाऽऽ तुझं ओऽ बोऽ होऽ आणि वोऽ तुझं- तुझं भोकाड कंप्लीट थांबव बाबा आता! गप! गप! गप अरे!-" त्याचं भोकाड थांबत नाही. मग कडलेंच्या लक्षात येतं आणि ते महेशच्या कपाळावर आणि हनुवटीवर आपलं बोट बटणावर दाबावं तसं दाबतात. महेश चूप. कडले खूष. नुसते खूष होत नाहीत तर आता महेश बटणं दाबल्याशिवाय बोलू शकणार नाही ही संधी साधून त्याचा चार्जच घेतात.
"चूऽऽऽप! एकदम चूऽऽप! रडायचं नाही! अजिबात! ओरडायचं नाही! अजिबात! वाऽऽ काकांवर ओरडतोऽऽ प्रसंग आलाय बाका अऊर मेरेको बोल्ताय काका अऊर अऊर- छ्या: हे काय भलतंच कडले? कुठे वहावत चाललाय?-" घसा आणि गळ्याचं बटणं ठाकठीक करत ते समजूतदार पवित्रा घेऊन महेशला लहान मुलाला समजवावं तसं समजावू लागतात.
"हं हे बघ.. मुलांना सांभाळायला- छ्या: हे समजावणं बिमजावणं काय खरं नाय यार- अर्‍येऽऽ मुलांना सांभाळायला तुम्ही ती बाई ठेवलीए नं बाईऽ ती बाईऽ तुम्ही ठेवलीए तीऽ तीऽ विचित्र तीऽ आहे तीऽ बारबाला पूर्वी होतीऽ तीऽ आता घरबाला झालीए तीऽ तीऽ आताऽ आता ऐकलं नाहीस माझं नं तर तर तर- तर काय करणार मी?ऽऽ डोंबल! तुझं कपाळावरचं आणि हनवटीवरचं, दोन्ही बटणं दाबली की तिरशिंगराव होतोस तूऽ... तिरशिंगराव की नरशिंगराव? तेच ते- तिरतिरणारा नरसिंगराव.. तेव्हा हे बघ राज्याऽऽ ते घर तुझंच आहे. बाईही तूच- म्हणजे तुम्हीच ठेवलेली. तेव्हा बरं का.. आता आत जा.. सरळ आत.. आत जा आणि झोप.. झोपून टाक.. सकाळी उठलास की झालास तू माणूस.. सोप्पं आहे.. नाई का? हं हं.. ह हा. हुहू.. बरं का महेश.. आता मीऽ तुझं चालायचं आणि बोलायचं अशी दोन्ही बटणं दाबणार बरं! तुला दिशा देणार! तुला दरवाज्यापर्यंत नेणार.. डोअरबेल वाजवणार.. हो, आणिऽ टांग टुंगही म्हणणार बरंका माज्या राज्याऽऽ रेडीऽऽ टांग टुंग!- अरे हो! बटणं दाबून म्हटलं पायज्ये टांग्टुंग!- हं! टांगटुंग!!! जा आता!"
कडल्यांच्या समजवण्याचा योग्य परिणाम लगेच दिसू लागलाय. महेशला दिशा मिळते आणि तो बोबडं बोलत अर्धवट, मतिमंद मुलाप्रमाणे चालू लागतो.
"ताता ताता आता मी माध्या घली जानाल!"
"हो राजू हो!"
"लाजू नाई काईऽ महेत! महेत जावलेकल! ताता ताता-"
कडल्यांना भवनावेग अनावर होतो, " ओ रे फुटाण्या- हे पुतण्या! बोल!"
"आत ती मंदूदेवी अतनाल!"
कडले त्याला थांबवतात, "आता कोन ले ही मंदूदेवी महेत?"
"ती हो ताता. आत घलात. आदी बालबाला आता घलबाला!"
"ती होय थान आहे ले नाव. मंदू- मंदू- मंदू? कोण मंदू? थान! खूपच थान!"
"हऽअऽह अऽ मंदूदेवी हो ताताऽ मंदूदेवी! मग मी आत जायल उभा लहानाल, तुमी तांगतुंग कलनाल. हेऽई हे ईऽऽ इते माज्या हुनुवतीवल नाई काय, दालावल! तांग्तुंग! ताग्तुंग! म ती वितालनाल कोन आहे ले तिकले? मी बालाला आंदोल घालते-"
"हमम्म.. तला आता.. मंदूदेवी मंदूदेवी दाल उघल.."
"मी माध्या बालाला आंदोल घालते.."
"मंदूदेवी मंदूदेवी दाल उघल!"
"हऽ अऽ ह अऽ तांब माध्या बालाला तीत लावते..."
कडले ज्याम कंटाळलेत, "हं पुले पुले.. तांबा हं- काय काय करावं लागतं कडले एकेक!- हं हं महेत- आहे लक्थ्याथ! आहे लक्थ्याथ! तांग्तुंग! तांग्तुंग! तांग्तुंग!..
कडले डोअरबेल वाजवत कंटाळत उभे राहिलेत आणि ताठ होऊन आता अगदी लहान बाळच झालेला महेश त्या तशा अवतारात टाळ्या पिटत सगळ्या माहोलची मजा घेतोय.. मंदूदेवीची वाट बघत...           
(क्रमश:)

Sunday, August 5, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१४)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२,  भाग १३ आणि त्यानंतर...
सकाळचे दहा वगैरे वाजलेत. रिकामजी तिरूपती कडले यांची सकाळची गस्त चालू आहे. हातात रंगीबेरंगी वेष्टन असलेली वेताची छडी घेऊन. मागे त्यांच्या घरात, घराचाच एक भाग असलेल्या पाळणाघरात नेहेमीप्रमाणे नुसता कोलाहल चाललाय. कडले चिंतेत दिसताएत. त्यांना पाळणाघरातला कोलाहल असह्य होतो आणि नेहेमीप्रमाणे ते स्वत;शीच बोलू लागतात.
"अरे बाबांनोऽ शांत व्हा शांत व्हा... अरे- शांत व्हा म्हणतोय मी तर तुम्ही जास्तच ओरडताय!.. शांतपणे.. गस्त तरी घालू द्याल की नाहीऽ या गुप्तहेरालाऽऽ... तुम्ही जमता त्या घराचा मालक आहे रे मीऽऽ  अर्‍ये चिमण्यांनोऽऽऽ- नाही मी त्यांच्यासारखं परत फिरा रे- नाही म्हणणार. फिरा कुठे वाट्टेल तिथे फिरा. पण गपचूप फिराऽ अं?- हां हां! कडले! आता कसं? हे वेगळं झालं तुमचं.. इतरांपेक्षा.. हं! वेगळे आहातच तुम्ही कडले! या कॉलनीलतला सर्वोत्कृष्ट गुप्तहेर म्हणून मानांकन झालंय तुमचं! मानांकन की नामांकन?- त्येच त्ये काय त्ये! ते झालंय! शी चॅनलवर! शी! शी!.. अं हं! अगदीच शी नाहीए तो चॅनल! शेरलॉक होम्स इंटरॅशनल- SHI- होय! हा हा! शी! शी! शी! आणि नॉमिनेशनही काही पपलू नाहीए. केवढी स्पर्धा होती. कॉम्पिटिशन होती कटथ्रोट- गुरख्यांची, भैयांची, आंडुपांडूंची. आंडूपांडू म्हणजे तसले नव्हेत- खात्यातले! खात्यातले! खा त्यातले- ह्या त्यातले- मरिनड्राईववरचे, सहार विमानतळावरचे, सगळेच- दया, प्रदीप, राजेश, सचिन, लोहार, सिंग- सगळेच! स ग ळे च! तरीही मला मानांकन! तेच ते काय ते नामांकन!... तर ते असो!"
कडले अचानक बुबुळं डोळ्याच्या एका कोपर्‍यात वर फिरवतात आनि चेहेर्‍यावर गूढ भाव आणायचा प्रयत्न करू लागतात.
"प्रसंग बाका आहे... हा काका इथे आहे- कडलेकाका- म्हणून ठीक! नाहीतर रात्र वैर्‍याची असूनही.. राज्या झोपलेला का? झोपलेला का? का? का? डाव्या तळहातावर उजव्या हाताची मूठ आपटून आपटून डावा हात पार कामातून गेला माझा, पण अजून हा झोपलेला का? का? का- ऑं??????"
कडलेंचा वासलेला आऽऽ तसाच रहातो. वसाहतीच्या आवारात महेश दाखल झालाय. ओळखू येऊ नये इतका बदललेला. त्याचे हात पाय ताठ झाल्यासारखे हलताएत. केस एखाद्या ऍंटिना समूहासारखे उभे राहिलेत. डोळे आणि डोळ्यांच्या कडा लालेलाल. तो कडलेंना ओलांडून सरळ पुढे आपल्या घराच्या दिशेने चालू पडतो. कडले तो दिसल्यापासून वा वाकून त्याच्याकडे पहाणारे. तो समोरून पुढे निघून जाताच धडपडतात.
"अरे असा काय हा? म-महेऽऽश! एऽमहेऽशऽऽ"
कडले महेशला वेगवेगळ्या प्रकारे हाका मारत त्याच्या मागून धावताएत पण महेशवर त्याचा काहीही परिणाम नाही. मग ते त्याला हात लावतात. हात लावल्याबरोबर महेशची दिशा बदलते. त्याचा मार्ग बदलतो. महेशचे डोळे तसेच सताड उघडे. कडले हात लावताताएत. महेशचा मार्ग बदलतोय. कडलेंना आता ह्या खेळाची मजा वाटू लागलीए. ते अरे- अरे- करत त्याच्यामागोमाग गोल गोल फिरताएत. शेवटी महेश कंटाळतो. त्याचा चेहेरा सारखं फिरून फिरून वेडावाकडा झालाय. तो अचानक यंत्रमानवासारखे तुटक तुटक उच्चार करत ओरडू लागतो.
"येऽऽ कोण आहे रे तो गद्धा? का मला फिरव- फिरव-" चिडून स्वत:च गोल गोल फिरू लागतो.
"अरे! हा बोलतो सुद्धा! थांब! थांब! थांब..." कडलेही त्याच्याबरोबर फिरू लागलेत. मग चपळाईने त्याच्या कपाळावर आपल्या उजव्या हाताची तर्जनी खुपसतात. तो थांबतो. कडले स्वत:च्या या अद्भुत शोधाने स्वत:च आश्चर्यचकित होतात. त्यावेळचा त्यांचा चेहेरा खरंच पहाण्यासारखा असतो पण आता आपला नायक महेश तो बघण्याच्या परिस्थितीत नाही. तो थांबतो. अचानक थांबायला लागल्यामुळे जागच्याजागी डोलू लागतो.
"येस! येस्स! यंत्रमानव झालाय तुझा महेशाऽऽ यंत्रमानव! होय ना? होय ना मित्रा? होय ना रे? बोल ना रे गुलामा? यंत्रमानवा! हा तंत्रमानव तुला साद घालतोय- थांब! थांब! जाऊ नको लांब!- तुझं तंत्र आता मला व्यवस्थित कळलंय! थांब माझ्या उजव्या हाताचं हेच बोट आता तुझ्या हनुवटीवर मारतो... हं! हा हा! हाआऽऽ येस्स्स! कशामुळे? बोल बोल रोबोमहेश! हे कशामुळे?ऽऽऽ"
"अन्नाड्या! कळत नाही?ऽऽ झोपेमुळे हे झोपेमुळे!!!"
"झोपेमुळे? की झोप न मिळाल्यामुळे???" तरीही कडलेंचे विनोद चालूच आहेत.
"तेच ते रे गद्ध्या! तेच ते!"
कडले उलटे वाकतात, "इतकं???"
महेश हातपाय हलवण्याचे निरर्थक प्रयत्न करतो.
"मग? तुला काय हे सोंग वाटलं?" 
कडले सराईत गुप्तहेराच्या उत्सुकतेने त्याचे हात, पाय, केस, डोळे न्याहाळू लागतात.
"होऽहोऽहोहोऽऽ ताठ झालंय की रे सगळं शरीऽऽर-"
"नाही! फक्त हात, पाय, केस आणि डोळेच!"
महेश पुन्हा ताठ झालेलं शरीर हलवण्याच्या प्रयत्नात.
कडल्यांना प्रेमाचं अतिरिक्त भरतं आलंय, "असू दे! असू दे!"
महेशचा आता अगदी तिळपापड झालाय, "काय असू दे? शुंभा.. बेरडा.. बेकल्या-"
कडले चतूर आहेत. गुप्तहेर तर ते आहेतच. ते आता टचकन महेशच्या त्याच त्या हनुवटीखाली आपलं तेच ते बोट मारतात. महेश चूप होतो आणि कासावीसही होतो.
"हंऽऽऽ हमसे पंगा लेताय? लेताय? अर्‍ये बाबाऽऽ तुमारा हनबटीका राज हमकू बराब्बर मालुमाय!.. अरे पण माज्या राज्या झोप नसल्यामुळे हे असं, एवढं होऊ शकतं? होऊ शकतं माज्या राज्या? हाऊ होऊ शकतं टेल मी!- अरे -अरे- हो-" लक्षात येऊन महेशच्या हनुवटीखाली पुन्हा बोट मारतात. महेश लगेच बोलू लागतो- नव्हे ओरडतोच.
"मूर्ख माणसा!ऽऽऽ डोळे उघडे ठेवून तू तरी बघ सगळीकडे! आख्ख्या कॉलसेंटर्सना लागलाय हा रोग!"
कडले विस्मयचकित होत, "ताठ होण्याचा?"
"होय रे होय!"
"मग यावर उपाय काय?"
"गाढवाऽ डुकराऽ कोण आहेस तरी कोण तू?ऽऽ हे तू मला विचारतोएस? मला?" अचानक रडू लागतो, "अरे मला माहित असतं तर सकाळपासून असे धक्के खात गावभर फिरलो असतो का रे मी?ऽऽऽऽ"
"टाईट होऊन?"
"अरे कोण टाईट झालाय इथे?ऽऽऽ गेंड्याऽऽ इथे रात्रंदिवस झोपत नाहिए मीऽऽ माझ्या मुलांना सांभाळायची ड्यूटी करायची आणि ऑफिसची ड्यूटी पण करायची म्हणूऽऽन हे असं झालंय माझंऽऽ तू काय रे मला- काय तू- मी- मी- माझ्या घरी- मला-"
प्रचंड संतापल्यामुळे महेशच्या तोंडातून कॅसेट अडकल्यावर जसे कचकचणारे आवाज यायचे तसे येऊ लागलेत. आता या आवाजांचं काय करायचं यावर कडले आपलं शरीर वेगवेगळ्या दिशांना हलवून हलवून विचार करताएत. शेवटी आठवून आठवून त्याच त्या त्याच्या हनुवटीखाली आपलं तेच ते बोट दाबतात. आवाज थांबतो. महेशची लुळी पडलेली जीभ आत जाते. महेश जागच्या जागी स्थिर.
"आं! हां रेऽऽ हां! बराच लोच्या झालाय रे! कसा होतास तू! काय झालास तू! अरे वेड्या असा कसा वाया गेलास- जाऊदे कडले! ही गाणं म्हणायची वेळ नाही!.. यावर उपाय काऽऽऽय?... उपा..य.. उ..पाय.. हां! झोप! झोप हाच यावर सोपा आणि जालिम उपाय! व्वा कडले व्वा! वाह व्वा! यू आर ग्रेट! तुस्सी ग्रेट हो पापाजी! थांब! आता जरा माझा चेहेरा, डोळे गूढ करतो.. हं हं हं! आता तुला घरी सोडतो.. तू झोप.. गाढ झोपलास तरी काही काळजी नाही.. तुझं रहस्य कळलंय आता मला! हा‍ऽहाऽहाऽहाऽऽऽ तुझ्या हनुवटीखालचं आणि वरचं बटण... येस्स! आय नो इट! आय गॉट ईट माय लव! आय गॉट इट! शी चॅनलवालोऽऽऽ निगा रख्खोऽऽ हुश्शाऽऽरऽऽ हाहाहाहाऽऽऽऽ.... व्वा वा! वाहव्वा कडले वाहव्वा! हसलात! पण खोकला नाहीत!- आता हा ठोकळा!... घरी पोचवायचा! हं चलरे ठोकळ्या टुणूक टुणूक! चल! चऽऽल!- अरे हो! आता दोन्ही बटणं दाबावी लागतील कडले! हनुवटीखालचं आणि वरचंही!.. हा हा हा.. टांग- टुंग!"
दोन्ही बटणं दाबल्याबरोब्बर महेश जोसात येऊन बडबडू लागतो, हालचाली करू लागतो, चालू लागतो. कडलेंची एकच तारांबळ उडते. महेश प्रचंड करवादलाय. त्याला शिव्याही सुचत नाहीएत. 
"अरे भ- अरे म- सा- आ- घोड्याऽऽ तुझे व्हरायटी एंटरटेनमेंट प्रोग्रॅम्स संपले असतील तर मला माझ्या घरी सोड! सोड! सोड रे!ऽऽ पापाजी.. कडल्या.. निमाचा पोपट.. टांग-टुंग करतोय!- माझा जीव चाल्लाय इथे-"
कडलेंना महेशच्या थयथयाटामुळे त्याच्या कपाळावर, हनुवटीखाली कुठेच बोट टेकवता येत नाहीए. महेशचं चालूच, "थांब सरळ होऊ दे एकदा मला! मग बघतो तुला! चोर! पाजी! डाकू! पुढारी! राजकारणी! मंत्री-"
शेवटी कडले कसेबसे महेशच्या हनुवटीखाली दाबतात. चपळाईने त्याला दिशा देऊन त्याला त्याच्या घराच्या दिशेने मार्गस्थ करतात. मग घाम पुसू लागतात.

"ये कडल्या भी किसी कच्च्या गुरूका चेला नय महेशराऽव... झोपर्‍या महेश. रोब्या महेश. ताठक्या महेश. उभा महेश. आडवा महेश... हा हा हा हा... स्वत:वर जास्त खूष होऊ नका कडले... पण पण.. त्या गावातल्या मारूतींसारखं झालंय रे तुझं महेश! अरे चल! चाऽल! तुझी सगळी बटणं आता माझ्या हातात आहेत! जा! जाऊन झोप! हा कडल्या आहेच नजर ठेवायला बाहेर आणि आत.. आत.. हा हा हा हा..स्वत:च बघ आत कोण आहे त्येऽऽ टांग- टुंग!!!"  घराची डोअरबेल आणि महेशच्या हनुवटीखालची कळ जोरात दाबतात आणि पायर्‍या उतरून यशस्वी गुप्तहेराच्या चपळाईने घराच्या आडोश्याला येऊन दबा धरून बसतात.
डोअरबेलचा आवाज ऐकून महेशच्या घरात असलेली टी मंजू कडेवरच्या अवनीला थोपटत बेडरूममधून बाहेर येते आणि दार उघडू लागते...                                                              (क्रमश:)   

Tuesday, June 26, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१३)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२ आणि त्यानंतर...
अंकितकडे प्रेमभरे पहात राहिलेल्या कडलेंना प्रेमपान्हाही फुटतो.
"आले- आले- अंकुडीऽऽ.. काय काय आणलं बाजारातून?"
अंकितला गौरीबरोबर ओढला जातोय. तो कडल्याना चिडवून दाखवतो.
"ऍऽ ऍऽ तुम्हाला काय करायचंय? तुम्हालॅ कॅय-"
तोपर्यंत गौरी अंकित, खांद्यावरच्या अवनीसह आपल्या घराच्या दिशेला आणि निमा तत्परतेने तिला पाठ करून विरूद्ध ब्युटीपार्लरला जाण्याच्या दिशेला निघून जाताएत. निघता निघता निमाचा कडलेना शेवटचा डोस.
"तुम्हाला यायचं तर या रितिक, नाहीतर इथेच बसा- मी चाल्ले-"
ती निघून चाललीए हे कडलेंच्या जरा उशीराच लक्षात आलंय. नेहेमीप्रमाणे.
"निमू निमू आलो गं! थांब! एकटीच कशी सोडू तुला भर बाजारात निमूऽऽ"
गौरीचा पुरता पिट्ट्या पडलाय अंकित, अवनीला सांभाळता सांभाळता. ती दमलेली. अंकितची भुणभुण चालूच आहे.
"ममा- ममा- माजं बेब्लेड राहिलं बेब्लेड!"
’अरे हो रे बाबा! नुसती कटकट लावलीए-"
"ममा- बेब्लेऽऽड-"
"अरे किती आणायची किती तुला बेब्लेड"
"ममाऽऽ"
गौरीचा पेशन्स संपलाय.
"आता मलाच फिरव- अय्यो देवा चावी? चावी कुठेय?"
"ममा चावी- नाय बेब्लेड- बेब-"
"चूप रे!" कडेवरच्या अवनीला सांभाळत, हातातल्या सामानात गौरीची चावीची शोधाशोध चालू होते.
"आता होती- पर्समधे- बापरे हा- महेश- घेऊन गेला की काय- काय रे पपानं नाय ना नेली? गेली कुठे?.. उगी उगी अवनीऽ- आलं हां बाबू घर- आलं- हो‍ऽहो- गप गं! - गप- चावी- चावी- अरे अंकित! हे काय?"
अंकित शांतपणे आपल्या खिशातून चावी काढून आईच्या हातात देतो.
"हे काय? तुझ्याकडे कशी आली?"
"पपानी दिली- जाता जाता-"
गौरी घ्यायला जाते तो हुलकावणी देतो.
"अरे दे! दे रे! गाढवा खेळतोएस काय?"
"आधी बेब्लेड!-"
"दिलं बाबा दिलं-"
"कधी?-"
"देते रे बाबा देते उद्या! नक्की! माझ्या राज्या दे आता चावी! लवकर आत जायचंय! सगळं करायचंय! दे! दे!"
गौरीला अंकितकडून चावी खेचूनच घ्यावी लागलीए.
"ममा उद्या नाय दिलंस ना बेब्लेड-"
"अरेऽऽ देत्ये रे बाबा देत्ये! ये आत ये! टीव्ही लावू- टीव्ही?"
"मी लावतो! मला येतो लावता!" अंकित टीव्ही लावतो.
"च्यला च्यला पप्पूऽऽ आता ममं कलायचंऽऽ कलायचं नाऽऽ" गौरी कडेवरच्या अवनीला चुचकारत किचनमधे निघून जाते...
तोपर्यंत बाहेर सोसायटीच्या आवारात एक स्त्री दाखल झालीय. चकमक लावलेला भडक जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलेली, हेअरस्टाईल केलेली, कपाळावर, गालावर बटा काढलेली, चेहेर्‍यावर मेकप लावलेली. ही स्त्री लचकत मुरडत कुठलं तरी घर शोधतेय. घुटमळतेय. ओढणीने वारा घेत हातातला पत्ता बघतेय. मग नक्की ठरवून जावडेकरांच्या फ्लॅटची डोअरबेल दाबते.
"ममाऽ इस्त्रीवालाऽ"
"आलेऽ रे बाबाऽऽ" गौरी कडेवरच्या अवनीला थोपटत किचनमधून बाहेर आलीय, " झोप पपू. झोपायचं!-"
दार उघडते आणि बाहेर बघतच रहाते.
"क- कोण- कोण पाहिजे?"
स्त्री दाराबाहेरच उभी राहून उजव्या हाताच्या तर्जनीने लाडीक खुणा करून ’आत येऊ का?’ असं विचारतेय.
"अगं बाईऽ वोऽ होळीऽ- होळीको टाईम है अजून-"
स्त्री लाडिकपणे पण विचित्र हसते. खुणा चालूच.
"अगं बाई हे काय? रस्ता चुकलाय का तुम्ही?" तोपर्यंत अंकित उत्सुकतेने धावत दाराजवळ आलाय.
"बघू बघू कोणेय? हॉ हॉ हॉ..."
"अंकित- ए- ए- अरे- गप!"
स्त्री आता अंकितला बघून मोहरल्यासारखे विचित्र हावभाव करते.
"पयचाना नई पिंट्या?ऽ"
"ये चल चल पुढे हो! मी- मी- पिंट्या बिंट्या कोणी नाही!"
"ओऽ स्मॅर्ट बओय!.. भाबी भाबी मला ओळकलं नाई- ओळकलं नाई?"
"नाही हो खरंच नाही.. ह ह.. देवाशप्पत-"
"मी हॉ हॉ- मंजू!ऽऽ" दोन्ही हात समोर पसरून उभी रहाते.
"आईशप्पत नाही हो मंजू- बिंजू- कोणी-"
अंकित स्त्रीला न्याहाळत राहिलेला. अचानक ओरडतो.
"टी. मंजूऽऽ"
"बलोबल! अगदी बलोबल पिंटूऽऽ" मंजू अंकितला जवळ घ्यायला जाते.
"अरे हाड हाड!"
"अंकित! अरेऽ- ए-"
"असू द्ये! राहू द्ये भाबी! मी लालन पालन बालन संघातून-"
"ओळखलं! ओळखलं! पुढे टी लावल्यावर लगेच ओळखलं!.. ह ह.. काय घेणार?"
मंजू तीन बोटं नाचवतेय, "इतके!"
"ह ह.. तीनशे?-"
"हजार!" तीन बोटं मंजू जोरजोरात नाचवू लागलीए. गौरी आता ओरडतेच.
 "तीन हजारऽऽ- जेवणा-खाणा सकट?"
मंजू लगेच पाठ फिरवते, " देता की जाऊ?"
गौरीला आता जिवाच्या आकांतानं ओरडावं लागतं.
"ओऽबाईऽऽ नका जाऊऽऽ नका जाऊऽऽ"
गौरी स्तब्ध होऊन मंजूला नीट न्याहाळते. ’ध्यान आहे, काय करेल काय माहिती’ असं मनात पुटपुटते.
"जाऊ नका बाई.. जाऊ नका!"
"ठीक हाय!" मंजूनं एक हात कंबरेवर ठेऊन एक झांसू पोज घेतलीए.
"ओ पण.. द्या नं काहीतरी सूट- कन्शेशन- द्या नं!"
"हीच सूट!"
"ओ द्याना प्लीज थोडीतरी सूट द्या ना, बाईऽऽ-"
"चला भाबी! चला आपण दोघीही जाऊ या का? त्या मंदिराशेजारी उभे राहू. द्या द्या करत!"
"असं हो काय करता मंजू!"
"मी अजून काहीच केलेलं नाहिए!" मंजू गौरीच्या डोळ्यात रोखून बघत राह्यलीए.
"म्ह- म्हणजे?"
"हॉ हॉ हॉ... म्हंज्ये उंटाच्ये पंज्ये!"
"येऽ हड! उंटाच्ये नाय! उंटाच्ये नाय, वागाच्ये वागाच्ये!" अंकित नाचायला लागलाय. मंजू त्याचा गालगुच्चा घेते.
"हो ले हो बबुडीऽऽ"
"ये गप! रंग लागेल तुझ्या मेकपचा!"
"अरे बाबा अंकूऽऽ" तो काय करेल-बोलेल या विचाराने गौरी अस्वस्थ झालीए.
"असू दे हो! गोगोड आहे पोगा! गोगोड! ये ये!"  मंजू अंकितचा हात धरते.
"ये सोड! सोड!"
"हॉ हॅ हू खू खू.. तर मी काय म्हणत होतो- होता- होते- होते- तुम्ही अजून काहीच दाखवलं नाहिए मला?"
"काऽऽय? काय म्हणायचंय-"
"ओऽ ओऽ सॉरीऽ हा हा मोठा ना तुमचा! गोगोड- आणि ही ही तुमच्या कडेवर- घाबरू नको भाबी. हिला बगत होत्ये मी- गुड्डीला- गुड्डी गुड्डी- डि-डी-डू-डू-" गौरी मान वळवून वळवून दमलीय.
"अहोऽ झोपलेय तीऽ ह ह ह.. झोपलेय हो.."
"हो नईऽ किती स्वीऽऽट! चला तर ह्या दोघांना दाखवून झालं! आता काय दाखवता- घर दाखवता का घर- नक्की आहे ना माजं कॉन्ट्रक्ट! सांगा ना भाबीऽऽ-"
"हो हो हो!- काय दिवे लावणारे कुणास ठाऊक- आहे ना आहे! चला चला- दाखवते ना घर- दाखवते-"
गौरी अजूनही मंजूच्या अपरोक्ष तिला चमत्कारिक नजरेने न्याहाळतेय.
"ह ह ह... चला ना चला- हेऽऽ किचन-"
"ओऽ मामाय! बगू! बगू!ऽऽ"
गौरी, तिच्या कडेवरची अवनी, मागोमाग मंजू, तिच्या मागावरच असल्यासारखा अंकित अशी सगळी वरात किचनमधे जाते. बाहेर येते. हॉलभर फिरते. मग बेडरूममधे शिरते. मंजू बारकाईने सगळं न्याहाळतेय. विशेषत: किंमती वस्तू वगैरे. बेडरूम गाठल्यावर मंजूची नजर जास्तच शोधक होते. कपाटाचं हॅंडल वगैरे ती गौरीच्या नकळत हलवून बिलवून बघतेय. गौरी तिला सूचना द्यायच्या नादात हॉलमधे आलीय तरी मंजू अजून बेडरूममधेच शोधक नजरेने वावरतेय. अंकित ती संधी साधून आईला एकटी गाठतो.
"ममा ममा तो काका आहे काकाऽ"
"आं??" गौरीला चटकन जे समजलं नाहिए ते मंजूनं नेमकं ऐकलंय. ती वेगात अंकितच्या दिशेने धावते.
"आलेऽ बबुडी बबुडी बबुडीऽऽ"
मंजू पकडायला आलेली बघताच अंकित पळत सुटलेला. दोघांची घरभर पळापळ. पकडापकड. मधे ’अरे, अरे’ करत त्यांचे धक्के खाणारी गौरी, अवनीला कडेवर घेऊन, दमलेली, घामाघूम होत असलेली...                               क्रमश: