romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, July 27, 2023

वरुन...

गेली काही वर्षं तू दिलीस मला संधी
वरुन सगळं जग बघायची
अलीकडे मला शिक्षा केल्यासारखा
वरूनच बघत असतो सगळं 
डोळे उघडे असेतो फिजिकली 
ते ॲक्च्युअल उघडतील तेव्हा उघडतील
खाली दिसते गिचमिड सगळी
कौलांवर ताणताणून बसवलेली
शॅबी निळी मेणकापडं
दगड, कुजक्या फळ्या 
आणि काय काय चोपून रोखलेली
खरंतर स्पष्टं काहीच दिसत नाही खालचं
वाटाही दिसतात त्या 
लुप्त होण्यासाठी दिसत असल्यासारख्या
रात्री भासमान इलुमिनेट 
आणि आणखी खोट्या
दुरून डोंगर दिसायचे साजरे पूर्वी
आता स्कायक्रापरस् 
आकाशाला टोचणाऱ्या खिळ्यांसारख्या
आणि अगदीच काही नाही 
बरंका निगेटिव्ह, असं सांगणारी
एक रांग टेकडीची, कोपऱ्यात
त्यावरची छत्रीही मोठी वाटायची
लहानपणी, आता खुजीच
हां, पॉझिटिव हिरवळ आहे रे बाबा
किर्र करणारे पोपटथवे
लुप्त होणारे झाडाच्या शेंड्यात 
त्याचा बुडखा नाही दिसत 
इतक्या वरुन
आणि, ते येतात भुकेने कळवळलेले
आपले पूर्वज
वाकुल्या दाखवत
पोटात पडलेली आग लपवत
कसरती करत
आपाआपली पुच्छे सोडून पॅरॅपिटखाली
आणि त्यांच्यासारखाच चेहेरा असणारी
एक मॅड मेड धुण्याची काठी उगारत
ची ची करून त्यांना धाक दाखवत
एकदा एक पूर्वज हसलासा वाटला
तिला बघून, तशा पवित्र्यात
आणि एकदा...
मेड आणि कुटुंबपिता 
दोघे वेगवेगळ्या दिशेला 
कमरेत वाकून
आयुष्य शोधत होते म्हणे 
खालच्या केरात
आणि एका पूर्वजाने 
मलबारी लवचिकतेने 
ग्रिल्सच्या गजातून
घेतली एन्ट्री, दिली चापट म्हणे
हाडाची काडं उरलेल्या 
कुटुंबपित्याच्या तुणतुण्यावर
आणि पळवलं केळं
पित्याचं नव्हे 
त्यानं ठेवलेलं जपून 
रात्री गिळण्यासाठी ते
ग्रिलकेळ्याचा बेत पार पाडून
तो पूर्वज गेला अंतरिक्षात
तरी हे दोघे
शोधत होते म्हणे केरात
आयुष्य...
मग मला पुन्हा 
लावावा लागला उर्ध्व
पण नजर खालीच सारखी
इगो मोठा झाला की
अधोमुख होतो मी बहुतेक
पण दिसलं मग अथांग
मेणकापड निळं चुकून
ते नक्की मेणाचं की शेणाचं 
याचा विचारंच करु दिला नाही त्यानं
म्हटलं यार, 
तू तर असशील त्याच्याही वर
तिथून तुला तसंच दिसत असेल?
जसं मला दिसतं तसं?
माझ्या लेवलवरुन खाली?
त्यावर बायको फक्त एवढंच म्हणाली
कंपेअर करतोस ना सतत
स्वतः ला कुणाशीतरी
मग असंच दुर्बीण लाऊन 
बसून राहावं लागतं
तू म्हणजे काय तो नव्हेस
ये, खाली ये!
नुसतं वरुन खाली बघत बसून
वेगळं नाही दिसत काही
वरच्याची गोष्टं वेगळी आहे... 
                         विनायक पंडित
#कविता
#poem 
#marathi 
#मराठी
#marathipoems 
#मराठीकविता
#विनायकपंडितच्याकविता
#vinayakpanditwrites 




 

Sunday, April 22, 2018

दूरदर्शन मालिका... जाडूबाई जोरात, शौर्य

#जाडूबाई जोरात 
#शौर्य
#जाडूबाई जोरात
#दूरदर्शन #मालिका #अभिनय
#झीमराठी #झीयुवा मन:पूर्वक  आभार!

Tuesday, April 3, 2018

"घरटं" :साहित्यसौरभ... अस्मिता वाहिनी... २ एप्रिल २०१८

महानगरासारख्या ठिकाणी घरात चिमण्या शिरणं ही शक्य कोटीतली गोष्टं नाही वाटत! खरं तर असल्या जादुई नगरीत काय शक्यं नाही? अशक्य ते शक्य करणं ही महानगराची खासियत. मात्र इथे निसर्ग आणि माणूस यातलं वाढणारं अंतर रोखणं ही गोष्टं निश्चित काळजी करण्यासारखी आहे. इथे जंगल आहे, पण कॉंक्रिटचं!..

दूर उपनगरात सदनिका असणं, ती तळमजल्यावर असणं, त्या सदनिकेला मागचं दार असणं, मागच्या दारात चार बाय आठचं का होईना परसू असणं या अगदीच शक्य कोटीतल्या गोष्टी नव्हेत. पण असल्या तर त्यांचं महत्व जाणवतं का? यंत्रवत झालेले आपण त्या यांत्रिकतेतून बाहेर पडतो का?

बहुतेक वेळा सुटीच्या दिवशीच घराचं हे मागचं दार पूर्ण उघडलं जातं. पण त्या लाकडी दारामागेही असतं एक जाळीचं लोखंडी दार. नक्षीदार जाळीचं, भक्कम आणी बंद. पहिल्यांदा केव्हातरी या जाळीतून उन्हाचे कवडसे आले तेव्हा बाप झालेला असूनही मी खुळावलो. लहानपण, आजोळ, छपरावरच्या पन्हाळी कौलातून माडीवरच्या खोलीत येणारे कवडसे, त्या कवडश्यात बागडणारे धुलिकण. तो जादुमय झोत. मला सगळं पुन्हा दिसलं. मुलगी अगदीच लहान होती तेव्हा. लोखंडी जाळीतून भिंतीवर, बिछान्यावर पडणारे कवडसे तिच्या मऊ हातांनी पुसायचा प्रयत्न करत होती. मनासारखं होत नाही म्हणून चिरकत होती. शेवटी कंटाळून तिनं नेहेमीप्रमाणे तोंडात बोटं घातली आणि ऊं ऊं करत पडून राहिली...

मग मुलगी सात-आठ वर्षाची झाली. जाळीचा लोखंडी दरवाजाही आता मुडपून बाहेरच्या बाजूला अर्धा का होईना उघडण्यायोग्य केला. आता कुठल्यातरी ऋतूत, सूर्याच्या अयनानुसार कधीतरी आत येणार्‍या या उन्हाची सवय झाली होती.

सुटीचा दिवस. मी लोळत वाचत पडलेला. पायाशी मुलगी चित्रं काढत आणि रंगवत. माझा पाय हलवत शक्य तितक्या सौम्य सुरात उद्गारली, “पपा स्पॅरोSS..”. त्या आधी ती कशाने तरी दचकली हे मला अर्धवट जाणवलं होतं. तिनं दुसर्‍यांदा माझा पाय हलवला आणि मी तंद्रीतून जागा झालो. तिनं दाखवलं तिकडे बघितलं. एक चिमणा- चोचीपासून गळ्यापर्यंत काळा मफलर घातला असल्यासारखा- अंतराअंतरानी चिवचिवत होता. ’आत येऊ का?’ असं विचारत होता किंवा ’टू बी ऑर नॉट टूबी’ असं स्वत:शीच पुटपुटत होता. शेपटी उडवत. अर्धवट उघड्या लोखंडी दाराच्या, एका जाळीच्या भोकात तो मावला होता. मग अचानक आजूबाजूच्या दोन-तीन भोकांमधे त्याच्या मित्रमैत्रिणी पोहोचल्या. चिवचिवाटाची आता कुचकुच झाली. मी नकळत मुलीकडे पाहिलं. ती माझ्यासारखीच दंग. फडफड झाली आणि त्या जाळीतल्या दोन-तीन चिमण्या आणखी आत आल्या. एक आत उघडलेल्या लाकडी दाराच्या कडीवर बसली. दोन दाराच्या वरच्या कडेवर. पुन्हा कुचकुचाट सुरू झाला. मी मुलीला अडवलं. ती शूSS.. करून त्याना उडवण्याच्या बेतात होती. आगंतुकाला घरात घ्यायचं नाही. दाराचा कडेकोट बंदोबस्तं करायचा. कुलुप, लॅच, पीपहोल.. असल्या संस्कृतीत ती जन्माला आलेली, तसं करण्यात तिची काहीच चूक नव्हती. अडवल्यावर मग ती नेहेमीसारखी तोंडात बोटं घालून बसली. अशावेळी मुलं मनन करत असतात असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं..

आमचं अस्तित्व जाणवल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं आपापसात काही ठरल्यामुळे चिमण्या एकाएकी अचानक भुर्रकन उडून बाहेर निघून गेल्या. आपल्या मननामधून बाहेर यायला मुलीला थोडा वेळ लागला मग तिची चौकसबुद्धी जागी झाली, “इतक्या सगळ्या स्पॅरोज- सॉरी चिमण्या- आजच आपल्या घरात कशा घुसल्या?”



काहीही न बोलता मी हळूच तिला खिडकीत आणलं. दाराच्या चौकटीपासून फूटभर अंतरावरच्या. घरं म्हणजे कोंडवाडे, असं म्हणण्यापेक्षा ते तुरुंगच झालेत. लाकडी दाराबाहेर लोखंडी जाळीचं दार आणि खिडकीला आतून डासप्रतिबंधक जाळी आणि बाहेरून लोखंडी नक्षीचा सांगाडा. अशा खिडकीतून मी मुलीला बाहेर, वर बघायला लावत होतो.

बाहेर, दार आणि खिडकीच्या वर इमारतीचा स्लॅब. त्यामुळे झालेला आयताकृती आडोसा. त्या आडोशात दोर्‍या बांधून वाळत घातलेले कपडे. त्या कपड्यात असंख्यं चिमण्या भुरभुरत होत्या. चिवचिवत होत्या. कुचकुचत होत्या. इकडून तिकडे पळत पकडापकडी खेळत होत्या. मिळेल त्याला लोंबकळत होत्या... तुरुंगातल्या कैद्यांनी, बाहेर खुलेआम फिरणार्‍या, बागडणार्‍या आयुष्याकडे बघत रहावं तसं त्या खिडकीतून मी आणि माझी मुलगी त्या चिमण्यांकडे बघत होतो...

सुटीचा दिवस नकळत संपतो आणि रूटीनचा राक्षस लगेच मानगुटीवर स्वार होतो. नको त्या विचारांचं मोहोळ घोंगावू लागतं. पण त्या दिवशी मात्र विषयांतर झालं होतं. अधूनमधून त्या चिमण्या माझ्या मनात सतत डोकावत राहिल्या. नुसत्या डोकावल्याच नाहीत तर त्यांच्या पंखांनी त्यानी मला भूतकाळात नेलं...

ही इमारत उभी राहिली त्याला साताठ वर्षं होऊन गेली होती. या जागेवर त्यावेळी असलेल्या चाळीला अंगण होतं. शेणानं सारवलं जाणारं. त्यावर शेकडो चिमण्या उतरायच्या. आईनं भाजलेल्या शेंगदाण्याच्या मधला कडक टाकाऊ भाग, जो खाल्ला तर पित्त होतं असं ती सांगायची, तो किंवा तांदूळ निवडता निवडता त्यातले खडे किंवा भाताची तूसं उडवली की चिमण्या गर्दी करायच्या ते टिपायला. लहानपणी तेव्हाच कधीतरी आईने चिमणा आणि चिमणीमधला फरक दाखवला होता.

अंगणात कावळे यायचे, साळुंक्याही यायच्या. समोर बंगला होता. आमच्या दारासमोर त्याची मागची बाजू यायची. फळबागच होती ती. कैर्‍या, जांभळं, पेरू, काजूची बोंडं, जांब... उन्हाळ्यात कुंपणाच्या तारा वाकवून चोरुन त्या बागेत जाताना गंजीफ्रॉक फाटायचा. पाठीवर ओरखडे उठायचे. वर शिव्याशाप. बंगल्याच्या मालकांचे. मग घरच्यांचे. बागेत पोपट तर यायचेच. भारद्वाजही यायचा. तो दिसला की म्हणे भाग्योदय व्हायचा...

तेरा बाय अकराच्या खोलीला दारात लाकडी फळी आडवी लावावी लागायची. अंगणात सहज फिरणारे साप, धामण, सापसुरळ्या, पावसाळ्यात बेडूक आत येऊ नयेत म्हणून. पावसाळ्यात त्या फळीला टेकून बसल्यावर काळंभोर कोसळणारं अमर्याद आभाळ दिसायचं. पागोळ्या कोसळत रहायच्या. झाडं, पानं हिरवीगार ओथंबायची, झावळ्या झुलायच्या.. अंगणात जास्वंद होती, तगर होती, अनंत होता. आवळा, केळी, सोनटक्का, गुलबक्षी, पावसाळ्यात टाकळ्याचं रान, साचलेल्या डबक्यात फडक्यानं मासे पकडणं...

असा खोल खोल जात मी थेट माझ्या आजोळातच पोहोचतो. पण तो दिवस त्या आधीच संपला. रहाटगाडग्याचं ओझं ढकलत घरी पोहोचलो. भूतकाळाची साखळी तुटली. आल्यावर मग बिछान्यावर लोळण्याचा कार्यक्रम. त्यासाठी बिछान्यावर जागा करायला लागणार. पसरलेल्या धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ते कपाटात ठेवायची पाळी माझी. पहिलाच माझा टिशर्ट हाताला लागला. तो सुलटा करण्यासाठी आत हात घातला आणि दचकलो. बहुतेक झुरळ- नाही- खरखरीत मोठं असं काहीतरी- अरे घरटं?... आत व्यवस्थित तयार केलेलं घरटं हातात आलं. मी पहातच राहिलो...

दुसरा दिवस. रुटीनच्या राक्षसानं कालचं घरटं विसरायला लावलेलं. संध्याकाळी घरी आल्यावर वर्तमानपत्र, छोटा पडदा अशा टिवल्याबावल्या करत बिछान्याजवळ आलो. आजही कपड्यांच्या घड्या करण्याची पाळी माझीच. आलेली जांभई आवरत दोन कपड्यांच्या घड्या घातल्या. पॅंट सुलटी करण्यासाठी आत हात घालून तिचा एक लांब पाय ओढायला जातो तर हातात घरटं. ओरडलोच, “हे काय चाललंय काय?” बाहेर दिवाणखान्यात छोट्या पडद्यासमोर तोंडात बोट घालून रमलेल्या मुलीलाही ते ऐकू आलं. ती धावत माझ्याजवळ आली. विचित्रं प्राणी बघावा तसं ती घरट्याकडे पहात राहिली. मग पुन्हा तिचं मनन सुरु झालं..

तिसरा दिवस. आज घड्या करण्याची पाळी बायकोची. “अरे हे काय आहे काय?” म्हणून तीही ओरडली. बाहेर दिवाणखान्यात रमलेले मी आणि मुलगी आत तिच्याजवळ पळालो. तिच्याही हातात, माझ्याच एका शर्टाच्या आतून निघालेलं... घरटं...

मग माझ्याच कपड्यात नेमकं ते घरटं कसं सापडतं, मी घरात कसा अडकलो आहे यावरुन विनोद आणि त्याहीपेक्षा जास्त हसणं...

असं आणखी दोनचार दिवस झालं आणि मग बंद झालं. विनोदही संपले. पण एरवी मी एकटा असताना, राक्षसी रुटीनमधेसुद्धा डोक्यातलं घरटं काही जाईना. पक्षी हुशार असतात. चिमण्या असतातच. दोरीवरचे कपडे रोज बदलत असतात हे त्याना कळत नसेल?.. हाताएवढ्या मोठ्या घरट्यासाठीचा कच्चा माल त्या रोज कुठून, कुठून, कसा जमवत असतील? घरटं जमवायची मूळ जागा म्हणजे वळचण किंवा झाडाच्या फांदीतलं बेचकं. दोन्हीही आता राहिलेली नाहीत!... काय करतील त्या?... रोज हातात आलेलं घरटं फेकून देताना जीवावर यायचं. नंतर ते आठवत रहाताना त्रास व्हायचा...

लहानपण चाळीत गेलं. अंगणात चिमण्या यायच्या. वळचणीला रहायच्या. लग्न झाल्यावर शहरापासून पार दूर रहायला गेलो. तिथे पाण्याचा प्रश्न. घर बंदच रहायचं जास्त वेळ. उघड्ल्यावर बाथरुमच्या गिझरमागे घरटं. ते काढून टाकायला लागायचं. जीवावर येऊन. लगेच नाही काढलं तर आत जीव धरतील मग ते आणखीच कठीण होऊन जाईल सगळं...

अशीही वेळ आली की आम्हाला कोकिळेसारखा दुसर्‍याच्या घरी राहून आपला संसार निभवायला लागला.   

चिमण्यांची हातात आलेली घरटी फेकून देताना मला माझी बदलावी लागलेली घरं आणि त्यावेळचे ते त्रास आठवत राहिले...

आता माझी मुलगी इतर अनेक मुलांप्रमाणे शिक्षणासाठी परदेशी उडून गेलीय. तिला भेटायचं म्हणजे आम्ही तिच्याकडे उडत जायचं की तिनी उडत इथे यायचं याच्यावर आमच्यात चर्चा चालू असतात.

परवा संध्याकाळी मी आणि बायको एका सहनिवासाच्या दगडी कुंपणाबाहेरुन चाललो होतो. कुंपणालगत आत ओळीने अशोकाची झाडं. त्यांची पानं आणि फांद्या वेगळ्या ओळखू येत नाहीत. त्यांची ती रचना  उतरती होऊन प्रत्येक फांदीआड एक सुरक्षित आडोसा तयार होतो. बायकोनं दाखवल्यावर लक्षं गेलं. कुचकुचाट करत असंख्य चिमण्या त्या फांद्यांआडच्या आडोश्यात आत घुसत, बाहेर येत आनंदानं बागडत होत्या. ते आपलंच घर असल्यासारख्या. आता त्याना आपलं घरटं जमवायचीही गरज नव्हती... ते दृष्य आम्ही मी डोळे भरुन पहात राहिलो..
जग खूप जवळ आलंय. प्रचंड घडामोडीचा हा काळ आहे. घरातून उडून दूर जायचं. तिथे घर करायचं. पुन्हा कारणपरत्वे उडून राहून नव्या नव्या घरांकडे झेपावत रहायचं हे आजचं वास्तव आहे. आजच्या या कोलाहलाच्या वास्तवात अशोकाच्या झाडांच्या त्या आडोश्यात आनंदानं स्वत:चं घर शोधून बागडणार्‍या चिमण्यांचं ते दृष्य अजिबात पिच्छा सोडत नाही. आनंदच आनंद म्हणजे काय याची ते नेहमीच साक्ष देत रहातं...


२ एप्रिल २०१८ रात्री ९.३० वाजता अस्मिता वाहिनीवर साहित्यसौरभ या कार्यक्रमात "घरटं" अभिवाचन स्वरुपात सादर केलं...
 (छायाचित्र.. आंतरजालावरून साभार..)

Saturday, October 22, 2016

देवाणघेवाण: एल्विस प्रिस्ले टू पास्कल बाॅलिवूड!

वाॅट्सअॅप या लोकप्रिय माध्यमावर वायरल झालेल्या दोन चित्रफीती हे या ब्लाॅगनोंदीचं कारण... एक सुप्रसिद्ध पाश्चात्य गायक एल्विस प्रिस्लेची, दुसरी पास्कल बाॅलिवूडची...
पाकिस्तानी कलाकारांना इथल्या चित्रपट, मालिका या माध्यमांमधे संधी द्यायची/नाही द्यायची हा वाद चालूच राहील. वादांवर सर्वमान्य तोडगे निघाले तर समाज माध्यमं चालणार कशी?
सरकारने काही निश्चित कायदेधोरण इत्यादी ठरवावं या मतापासून कोणत्याही मानवाला जगात कुठेही जाऊन योग्यप्रकारे अभिव्यक्त होण्याचा मूलभूत अधिकार आहे, त्यात विरोध करण्यासारखं काहीच नाही; इथपर्यंत मतमतांचा गल्बला आहे. छाट्! अज्याबात नाही!!! हे मत लोकप्रिय दिसतं आहे...
चित्रपट व्यवहार हा बराचसा कुणाच्या मागे पैसा ओतायला कोण तयार आहे? या विचारावरुनच पुढे सरकतो आणि कोण किती पैसे कमावून देतो? यावर स्थिरावत असतो... असो...
या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सुवर्णकाळासंबंधातल्या दोन संगीत चित्रफीतींबद्दल काही बोलायचे आहे...
संगीताची देवाणघेवाण जगभरात चाललेली असते. हिंदी चित्रपटसंगीताने पाश्चिमात्य संगीत सरळ सरळ उचललं अशी अनेक उदाहरणं ज्ञात आहेत. काही संगीतकार देशीय- आंतरदेशीय उचलाउचलीतूनच महान झालेले आहेत...
इथे कलाकृतीचं बीज कुणालाही सुचू शकतं. सुचू शकणारं एकसारखंही असू शकतं. त्याचा घाट ज्याच्या त्याच्या नावावर जाऊ शकतो असं तत्व मांडलं जातं. कुठल्याही हिंदी चित्रपटावरुन जगात कुणी त्याचा पिच्चर उचलला असं उदाहरण अपवादात्मक आहे. माझ्याच एका जुन्या नोंदीत आशियाई चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या 'डेस्परेडो स्क्वेअर' या 'संगम' या हिंदी चित्रपटावर आधारित चित्रपटाबद्दल लिहिलं होतं...
याउलट उदाहरणं खूप आहेत.
रामायण, महाभारत, शेक्सपियरीन नाटकं इत्यादी कालातीत कलाकृती हा तर सगळ्यांसाठीचाच ठेवा आहे...
शंकरजयकिशन या सुवर्णयुगातल्या एका काळाच्या अनिभिषिक्त सम्राट द्वयीने एल्विस प्रिस्ले या गायकनटाच्या चित्रपटातल्या गाण्यावरुन 'झुक गया आसमान' या ज्युबिली राजेंद्रकुमार अभिनीत चित्रपटासाठी गाणं उचललेलं दिसतं. राजेंद्रकुमार यांचा गाण्यातला अभिनय हातवा-यांचा किंवा दोन्ही हात आळीपाळीने खालीवर करण्याचा असे. त्यात या गाण्याचा उपयोग दिग्दर्शक मेलोड्रामासाठी करतो...
एल्विस स्वत: गायक असूनही काहीच करताना दिसत नाही. पण त्याचं व्यक्तिमत्व आणि वावरणंच लाजवाब आहे. दिग्दर्शकानं यात केलेला लेवल्सचा आणि छोट्या मुलीचा वापर परिणामात भर टाकतो. त्यात एल्विसचं गाणं...
इथे इंडियन एल्विस प्रिस्ले म्हणवल्या गेलेल्या लोकप्रिय हिरोचीही आठवण येते. त्याला काय काय घुसळून नवनीत (?) काढावं लागत असे. इथे एल्विस लीलया परिणाम घडवतो. उर्सुला अँड्रेस आणि सगळं जग त्याच्याकडे बघत राहील यात नवल काय?...


दुसरी चित्रफीत पास्कल बाॅलिवूड या फ्रेंच कलाकाराची... 'भाभी' या १९५७ सालच्या चित्रपटातलं राजेंद्रकिशन रचित आणि चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेलं 'चली चली रे पतंग मेरी चली रे' हे गाणं पास्कल हेनी उर्फ पास्कल बाॅलिवूड ज्या तन्मयतेनं गातो ते बघण्याऐकण्यासारखं आहे. वाद्यवृंद आणि सहगायिका परिणामात इतकी सुयोग्य भर टाकतात की गाण्याच्या शेवटी पास्कल जितका खूष होतो तितकेच आपणही खूष होतो...
पास्कलचा देश फ्रान्स. तो कलेच्या मुक्त वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. बाॅलिवूडसंगीताला कला म्हणा, नका म्हणू पण पास्कलनं त्याच्या देशात संगीत आणि नाटक यांचं रितसर शिक्षण घेतलं. एका दौ-यासाठी तो मलेशियाला गेला असता 'जिंदगी एक सफर है सुहाना' हे किशोर-शंकरजयकिशनचं गाणं ऐकलं आणि तो भारावून गेला. परत जाऊन त्याने भारत, हिंदी भाषा इत्यादीचं शिक्षण घेतलं. आज तो भारतात येऊन बाॅलिवूडसंगीताचेच नव्हे तर बंगाली आणि तमिळ गाण्यांचेही कार्यक्रम करतो...
हिंदी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसंगीत आशियात लोकप्रिय आहे. परवा कुणी मलेशिया दौ-यावर गेलं असता तिथे सैराटची गाणीही सतत वाजत होती. इराण, अफगाणिस्तान, इजिप्त इत्यादी देशातही हिंदी चित्रपट लोकप्रिय आहेत. रशिया आणि राजकपूर हे जुनं नात आठवत असेलच.
हिंदी चित्रपटांचं मोठं ओवरसीज मार्केट आहे.
भारत ही सगळ्याच दृष्टीने जगाची मोठी बाजारपेठ आहे हे आपल्याला लागोपाठ झालेल्या भारतीय जगतसुंद-यांवरुन पूर्वीच लक्षात आलेलं आहे...
राहता राहिला प्रश्न राजकारण्यांचा. भले मोठे फ्लेक्सबोर्डस् , गळ्यात पाट्या अडकवणे आणि चित्रपटांवर बहिष्कार घालणं हे मतांच्या जोगव्यासाठी आहे...
मग काय करताय येत्या निवडणुकीत? ;) :p :D :D
तोपर्यंत पाहिल्या नसतील तर पहा या चित्रफीती!

Saturday, February 6, 2016

रणातला जनमेजय आणि इतर... २

भाग १ इथे वाचा!
जनमेजयानं मनातलं प्रस्थान प्रत्यक्षात आणलं खरं पण सहनिवासाच्या मुख्य द्वारी येऊन तो थबकला...
मोर्चे, मिरवणूक, जथ्था, जत्रा, यात्रा, वारी… काय म्हणायचं या सगळ्याला? त्याला सहनिवासाच्या प्रवेशद्वाराच्याही पुढे जाता येईना. सगळे रस्ते प्रवेशद्वाराशी आल्यासारखे. सगळेच येणारे. जाणारा तो एकटाच. असं कसं? चिवट इच्छाशक्तीनं मार्ग काढायचं ठरवलं. समोर येऊन ठेपलेले सगळे काळ्या कपड्यातले होते. काळे शर्ट किंवा झब्बे आणि काळ्या लुंग्या. अनवाणी. शर्टाची बटणं उघडी. चेहेरे रापलेले. पण तेही अस्ताव्यस्त दाढ्यांमधून ते दिसत कुठे होते? डोळे लाल. ते कश्यामुळे? सगळ्याच चेहेर्‍यांवर आलेली गुर्मी नैसर्गिक होती? की वेषांतरामुळे तसं वाटत होतं? हे वेषांतर होतं की- मनाला भरपूर फुरसत असते. पण काट्यांना नसते. त्यांना घाई पार्श्वभाग बडवण्याची- हे जमलेले सगळे कसला निषेध करत आहेत? स्वत:चा?- मनाच्या फुरसतीला दाबून व्यवहारी जनमेजय मेंढा झाला. डोकं वाकवून गर्दीत खुपसल्यावर सगळं सोप्पं. काळ्या गर्दीच्या अंगचटीला येत किंवा तिचं अंगचटीला येणं थोपवत त्याला पुढे जायचं होतं. काळी गर्दी संपली आणि भगवी कधी सुरू झाली? तीही संपली आणि तेवलेले लामणदिवे, पांढर्‍या काचोळ्या आणि लाल किनारीच्या साड्या, गजरे घातलेल्या गरत्या काळ्या ओबडधोबड स्त्रिया फुरसतीतले पद्न्यास कधी करू लागल्या? एवढ्या सकाळी? आणि तोपर्यंत एक लांबलचक गाडी चालवणारी बाई आणि तिच्यामागे अबब- नग्नं देह, बरेचसे म्हातारे, एकामागोमाग, व्हीलचेअरसदृश गाड्यांवर बसलेले, नेमक्या जागी मोरपिसांच्या चवर्‍या ठेऊन- आता पुढे काय- आपण पुढे जातोय ते कुठे- जनमेजय फंबलला. गर्दी संपली. ती कधीच संपणार नाही हे शपथेवर सांगणारं मन नंतर आलेल्या लांबलचक मोकळ्या मैदानामुळे गचकन ब्रेक दाबून थांबल्यासारखं झालं. हे मैदान रोज लागतं आपल्याला? की सगळी गर्दी आधीच शोषून घेतली गेल्यामुळे आता सगळंच ओकंबोकं झालं होतं? पुढचं दृष्यं बघून तो आनंदला. सगळे एकजात रिक्षाचालक मुतायला किंवा हागायला लागलेय पण होत नाहीये, करवत नाहीये अश्या अवस्थेत उभे. उकीडवे, डोक्याला हात लाऊन बसलेले. असं कधी होईल म्हणून जन्मेजयाने वाट बघितली होती. सतत चिडचिडून स्वत:च्याच हृदयाला खार लाऊन घेतला होता. त्याने आनंदाने गर्दीचं मनापासून अभिनंदन करायला मागे वळून बघितलं. अवघा रंग एकचि झाला होत. गर्दीचा. आणि अलिकडे प्ले ग्रुप या नावाने  प्रसिध्द आणि नावारूपाला आलेली शिक्षणसंस्था सुटून चिमुकली टिमुकली त्या रंगीत गर्दीच्या मागे धावत असलेली. तो त्या गर्दीकडे बघत राहिला...
क्रमश:

Thursday, January 28, 2016

रणातला जनमेजय आणि इतर... १

जनमेजय
जनमेजयानं प्रस्थान ठेवलं. मनात ते सकाळपासूनच ठेवावं लागे. रात्रभर ते ठेवण्याच्या विचाराने अनेकदा जाग यायची, दचकून. तशी ती अनेक कारणांनी यायची अनेकदा. आकृतीताईचा पुरू, आठ वर्षाचा, गगनग्रास सहनिवासातच जास्त रमणारा, रात्रभर लोळ लोळ लोळे सर्वभर आणि पेकाटात लाथ हाणत राही. रात्रभर. तो नसेल तर विभूतीताईची शर्मिष्ठा, सहा वर्षाची, झोप झोप झोपत नसे रात्रभर. तीही इथेच रमणारी. ती चुकून झोपलेली असेल तर समीक्षाताई पुण्याहून आलेली असे. तिच्या जुळयांना घेऊन चार वर्षाच्या. त्याना बघायला, त्यांच्या लीलांचं कौतुक करायला आख्खा गगनग्रास सहनिवास लोटे. रात्रभर. किंवा मग बाळंतीण मीमांसाताईचं तान्हंबाळ असेच. रात्रभर. काहीच नसेल रात्रभर तर मग समिधाताईचं मित्रमंडळ असे ख्या ख्या करत हॉलमधे.
जवळजवळ रात्रभर. किंवा मग किचनमधे माधवस्वामी आणि कृपामाई- जनमेजयाचे जन्मदाते-समिधाच्या लग्नासकट कुठल्या न कुठल्या विषयाचा खल करत बसत. पहाटेपर्यंत. किंवा मग जनमेजयालाच झोप लागत नसे. उगाचच. पहाटेपर्यंत. पहाटे डोळा लागावा मस्त आणि ओटीपोटात हुरहूर सुरू व्हावी सुखद, आणखी खाली सरकणारी, तर दचकून जाग यावी प्रस्थान ठेवण्याच्या विचाराने. तर असं हे प्रस्थान.
सकाळी सकाळ झाली म्हणून मनातल्या मनात ते ठेऊन तो उठला तर त्याला कळलंच नाही आधी कुठल्या दिशेनं जावं. मग ते ध्यानात येतंय तर वाट सापडेना बाहेर पडायची. समिधाताईच्या मित्रमंडळींपैकी कुणीतरी, आकृतीताईचा नवरा, मीमांसाताईचा दीर, वरच्या चुलत चुलत गगनग्रासांकडचे पाहुणे अशी जनता आडवीतिडवी पसरलेली. नेहेमीप्रमाणे. बेसिनपर्यंत जातोय तर ब्रश कुणीतरी पळवलेला.  नेहेमीसारखा.  आंघोळीसाठी स्वतःचा टॉवेल शोधतोय तर तो आधीच ओलागिच्च. नेहमीच्या प्रथेप्रमाणे. चहाची वाट बघतोय तर आई योगाच्या क्लासला. आणि नाश्त्याचं बघावं तर विभूतीताई आंघोळीला आणि आता कुठे झोपेला आलेली शर्मिष्ठा याच्या कडेवर. अशी जनमेजयाची अवस्था. त्या धबडग्यात पोटात कळ. संडासात आधीच गेलेला. जाणार असणारा. त्यांच्यामधूनच तीर मारणारा भलता. असं करत करत करत शॉवरचे चार शिंतोडे अंगावर घेऊन तो पुन्हा बेडरूममधे येतोय तर दारातच आकृतीताईच्या सौभाग्याने तंगडया दोन दिशांना पसरवलेल्या. स्वतःच्या घरी असल्यासारखं खाजवणं. आकृतीताईचा प्रेमविवाह. ती पदवीधर होऊनही बुध्दिनं शालेयच राहिलेली. तिचा कथाकथनाचा चमू. त्याच्या ध्वनिफिती काढून विकणं हा सौभाग्याचा प्रमुख व्यवसाय. त्याच्या दोन टांगांवरून खापरी खापरी करत, मीमांसाताईचा दीर, समिधाताईचा मित्र नं.१ यांचे हातपाय चुकवत जनमेजय कपडयांच्या कपाटाजवळ आला. ते उघडल्यावर खरी कर्तबगारी होती. पँटशर्ट अमाप होते. ताया सगळया या ना त्या कारणाने तेच देत. ते प्रमाणाबाहेर वाढले की आई त्याचे पैसे घेई. हल्ली कपडयांवर भांडे मिळायचे बंद झाले होते. कर्तबगारी पुढे होती. पुढचं शोधण्यात. टयूब लावायला बंदी. अंधुक उजेडात, कपडयांच्या कपाटात, माझी कुठली आणि कुणाकुणाची कुठली? गोष्ट छोटी मुद्दा गौण पण हातात आली ती घातली आणि चालला असं एकदोनदा झालं तेव्हा रात्रीपर्यंत कोण पंचाईत झाली. आपल्या दोन टांगांमधला टॉवेल अर्धवट पकडत अर्धवट सोडत तो हातात आलेल्या- ती आपलीच आहे याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत- तिच्याशी झटापट करू लागला. भेलकांडू लागला. पुन्हा सावरू लागला. ते करत असताना पुन्हा पुन्हा त्याचं लक्ष दारात पसरलेल्या त्या आडदांड तंगड्यांकडे, हापपँटीतल्या, उगीचच जात राहिलं. सुखी माणसाची हापपँट अशी असते. आडदांड तंगड्यांवर चढलेली. काळ्या. मागे बुधबृहस्पती पुढे प्रजापती. एवढंच कर्तृत्व. हा विचार आला म्हणून जनमेजयाला कसंतरीच वाटलं मनात. लोखंडी कपड्याच्या कपाटावर हात हलके ठेवून दार बंद करताना अंगावर चरा उमटवणारं त्याचं कुरकुरणं दाबून टाकत त्यानं या विचाराचं प्रायश्चित्त घेतलं. तोपर्यंत त्या अंधुक उजेडात कुणीतरी धडपडत उठला. मीमांसाताईचा दीर किंवा समिधाताईचा मित्र नं.२ किंवा आणखी कुणीतरी. अंधारात सगळे सारखेच. अंधारात म्हणजे अंधुक उजेडात. तर तो उठला. घड्याळात बघितलं. सुटला तो उलट्याच दिशेने. जनमेजयाला आडवा. दोघांच्या आट्यापाट्या. नंतर त्याला योग्य दिशा सापडणं. मागोमाग जनमेजयालाही. जनमेजय थोडा थबकलेला. किचनमधे जावं की सरळ बाहेरच पडावं आता. आईचा योगा म्हणजे बाहेरच पडावं. बा- बाहेर- ही निजलेले- या बहुतेक निजलेल्या. समिधाताईचा चमू. जरा जपूनच उड्या मारल्या नाहीत तर थेट विनयभंग. टींग- टॉंग- टींग- आलंच कुणीतरी- अजून?- जनमेजयानं दार उघडलं. दारात माधवस्वामी- जन्मदाते आणि त्यांचे बैठकीतले मित्र. पीजे. आता एकापाठोपाठ. हं! सुरू… असं जनमेजय मनात म्हणाला आणि माधवस्वामींच्या दोस्तांनी जनमेजयाला समोर बघताच त्याचं नाव, त्याचं वय, घरातलं स्थान, क्रम, त्याचं वागणं, रहाणं सगळ्यावर विनोद सुरु केले. त्याची वाट अडवून. पूर्वाश्रमीचे स्वयंसेवक आता आपला वेगळा गट बनवून प्रात:बैठका घेणारे. बरेचसे एका उपासना ट्रस्टचे विश्वस्त. आपल्या बहुमूल्य मताला धार्मिक आधार असणारे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. त्यांच्या अध्यात्मिक विनोदातून फिल्टर होऊन जनमेजय सदनिकेबाहेर पाय ठेवतोय तर कानांवर जन्मदात्याचा खाकरा आवाज, आरे… लवकर ये आज! बंड्या- मग दोस्तांकडे नजर जाऊन माधवस्वामी कंटिन्यू- बंडू रे- आज बंडू गगनग्रासाच्या मुलीला पहायला येणारेत… हा बंड्या गगनग्रास म्हणजे नक्की कोण? चुलत चुलत चुलता की- याचा शोध एकदा घेतलाच पाहिजे- हा बंड्या तर मग तो- नाही नाही- तड लावलीच पाहिजे- असं मनाला समजावत आणि मानेने जन्मदात्याला होकार भरत तो टणाटण गगनग्रास सहनिवासाच्या पायर्‍या उतरु लागला. वाटेत अनेक गगनग्रास किंवा इथून तिथून गगनग्रास, मागावर असल्यासारखे किंवा वाट अडवल्यासारखे- तेच चुलत चुलत इत्यादी- त्याना चुकवत, हुलकावत, वेळच तशी, सगळ्यानाच घाई, कामवाल्यांना, चुकारांना, बेकारांना आणि रिकामांनाही. तड जनमेजयाला आत्ताच लावता आली असती हा रवि आणि हा जयद्रथ करुन. कुठला गगनग्रास नक्की कुठला याची. कारण सगळे याच वेळी एकमेकाला आडवेतिडवे होणारे. पण घडाळ्याचे काटे जनमेजयाच्या पार्श्वभागी रुतत तरी होते, घुसत होते किंवा पार्श्वभाग ते बडवून तरी काढत होते. नेहेमीप्रमाणे. तो रस्त्यावर उघडणार्‍या मुख्य फाटकाजवळ थडकला त्यांचा मार खात- गगनग्रासांचा आणि काट्यांचा- आणि थबकला...
क्रमश:

Friday, January 22, 2016

युनिक फीचर्सच्या अनुभव जानेवारी २०१६ अंकात ’गुरुजनां प्रथमं वंदे’ कादंबरीबद्दल...

युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांचे मन:पूर्वक आभार.
लेखकानं स्वत:चं पुस्तक प्रकाशित करणं हे एकांड्या शिलेदारीचं काम असतं. 
युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांनी अनुभवच्या जानेवारी २०१६ च्या अंकात गुरुजनां प्रथमं वंदे या कादंबरीची 'पुस्तक शिफारस' या स्तंभात तत्परतेने दखल घेतली. 
वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या कामात अशा प्रकारचं सहाय्य हा सगळ्यात मोठा हातभार असतो. 
युनिक फीचर्स तुमचे मन:पूर्वक आभार!