romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Thursday, October 6, 2011

"या देवी सर्व भुतेषू"

           या देवी सर्व भुतेषू
           मातृ रूपेण संस्थित:
           नमस्तस्यै नमस्तस्यै
           नमस्तस्यै नमो नम:

प्रिय आईस!
खरं तर आज तुझा स्मृतिदिन नव्हेच..
तू घडवलंस, शिकवलंस, सीमोल्लंघन करवलंस..
केवळ माणूसपणातून बाहेर आणलंस,
माणुसकी मात्र कायम ठेवलीस..
लिहायला हात धरून शिकवलंस..
अलिकडे जगाच्या या जगड्व्याळ व्यापात
शब्द सोडून देतोय..
ते केवळ तुझ्यामुळेच..
सुरवातीची एक कविता.. तुझी आठवण..


तो अनुभव..
तो अनुभव
बाहेर पडू शकत नाही त्यातून
ते.. तीन महिने..
परत उगाळायला नको असतात..
सुखावह न वाटणारय़ा आठवणी
सारख्या का डोकावत असतात?..
मनाची सहाण तहानलेली
त्यावर आठवणींचं चंदन घासलं जातं
अश्रू करतात वंगणाचं काम
तरी सुवास कसा जाणवत नाही?..
आतल्या गाभारय़ात
मनाच्या नकळत
पूजा चालू असते तुझी
तुला अर्पिलेल्या चंदनाचा गंध
फक्त तुलाच जाणवत असावा..
पण तू तर आता जाणिवांच्या पलिकडे गेली आहेस
मग कळणार कसं?
उगाळलेल्या चंदनाचा गंध तुला अर्पिल्याशिवाय
आम्ही घेणार कसा?..
आठवणींचं चंदनखोड झिजत मात्र नाही
एवढं उगाळून उगाळून थकत अजिबात नाही
मनाची सहाण मात्र पार थकून गेलीए..
लडखडत लडखडत निर्जिव झालीए..
तू असताना जेवढं शिकवलं नसशील
तेवढं जाता जाता शिकवून गेलीस
पण आहुती द्यावी लागली तुला..
कारण, आम्ही मथ्थड होतो
ते.. तितकंच क्लिष्टं होतं..
तुला वेळ नव्हता..
तुला वेळ नव्हता
दुसरा मार्गच नव्हता
सगळ्या वाटा बंद होत्या
तू आपली वाट शोधलीस..
आता ही कोडी उलगडणार कशी?
कोण आता बोट धरून चालवणार?
एक गूढ मात्र कालालाही उलगडणार नाही..
आम्ही आकार घेतला ती जागा..
खेकड्याला इतकी का आवडावी?...
 
’अभिलेख’ च्या सगळ्या वाचकांना विजयादशमीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा!!!

Tuesday, August 16, 2011

"जालवाणी २०११" जालरंग प्रकाशनाचा अंक!

जालरंग प्रकाशन या आमच्या महाजालावर साहित्यविषयक अंक प्रकाशित करणार्‍या प्रकाशनाचा नवीन अंक जालवाणी २०११ प्रसिद्ध झालाय!
लेखकांनी लिहिलेलं आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळालं तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित केलेला आहे. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आम्ही सर्वजण आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत आहोत.
अंकात समाविष्ट झालेल्या माझ्या आवाजातल्या ध्वनिमुद्रणांचे दुवे खाली दिले आहेत!


संपादकीय!

उड्डाण! (विनोदी लेख)

मीलन! (कविता)

गाव! (कविता)

१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात!
लेखन: रोहन चौधरी
अभिवाचन: मीनल गद्रे आणि विनायक पंडित

Wednesday, March 16, 2011

प्रेमाचा आधार

माणूस आयुष्यभर फक्त प्रेमाच्या अवतीभोवती असतो का? अनेक गोष्टी त्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.लहानपणी खेळ असतो. हळूहळू विचारशक्ती तयार होऊ लागते. जगाचं ज्ञान होत असतं.ध्येयं निर्माण होतात.प्रत्येक पातळीवर संघर्ष करावा लागतो.मानसिक, शारीरिक, आत्मिक विकास अपरिहार्यपणे होत असतो.या सगळ्यानी तयार होणार्‍या माणूसपणाच्या पायाशी प्रेमाचा आधार असावा लागतो, त्याशिवाय सगळं फोल असतं.
प्रेम हुरहूर लावतं, प्रेमाचं वादळ अनेक अडथळे पार करायला लावून माणसाला समंजस बनवतं.
या प्रवासातली मजा अशी असते की ’मी’ पणातून प्रेम उत्पन्न होतं, दोघांचं प्रेम हा सहअनुभव होतो.त्यातून तिसरा जन्माला आल्यानंतर प्रेमच पालकत्वाचं रूप घेतं.ज्याच्या किंवा जिच्या बरोबर सहजीवन जगायचं, तो किंवा ती आपल्यासाठी मित्र असतात, तत्वज्ञ असतात, मार्गदर्शक असतात.
स्त्री-पुरूष या विरूद्ध लिंगी आकर्षणातून जन्म घेणारं प्रेम आपली व्याप्ती वाढवत असतं.अनेक व्यापात गुंतलेला माणूस निवृत्तीकडे झुकतो.ही सगळ्या पातळ्यांवरची निवृत्ती असते.आयुष्यभर वाढवून ठेवलेल्या व्यापामुळे नवर्‍याला बायकोकडे खर्‍या अर्थाने बघण्याची फुरसतच झालेली नसते.खरा अर्थ त्याला कदाचित आता कळायला लागलेला असतो.त्याचवेळी कदाचित तिची रजोनिवृत्ती होत असते.तिच्या आयुष्यातला अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा काळ आलेला असतो.दोघांना वेगवेगळ्या कारणाने एकिकडे एकटेपणाची चाहूल लागत असते आणि त्याचवेळी सहजीवनाचा खरा अर्थ कळायला लागतो.आता सहजीवनाची गरज अपरिहार्य होऊ लागते.मुलांचं पालकांवर अवलंबणं संपून त्यांचं स्वतंत्र आयुष्य आकार घ्यायला लागतं.घरातली स्त्री अजून घरातल्या व्यवहारांत, नातवंडांत गर्क असते.निवृत्तीला आलेल्या, निवृत्त झालेल्या पुरूषासमोर काळ आ वासून उभा राहू लागतो.एकटेपणा ग्रासतो.तो आधार चाचपायला लागतो.अनेक दिव्यांमधून गेलेली त्याची स्त्री त्याला जपत असते.हळूहळू समोर दिसायला लागणार्‍या मृत्यूच्या छायेने हे दोन्ही जीव एकमेकाना अगदी घट्टं धरून ठेवायला लागतात.आयुष्यात कधी नव्हे तो एकमेकांचा आधार यावेळी जाणवायला लागतो.भूतकाळातले अनेक प्रसंग, भविष्यातली अनिश्चितता यांनी वर्तमानकाळ कातर होत असतो.आनंदी जोडपी तरीही एकमेकांच्या साथीने, प्रसंगी रूसत, भांडत, प्रेमाने जगत असतात.इतरांना ही करमणूक असते.तरीही या शेवटच्या प्रवासात एकमेकांच्या आधाराने चाललेलं सहजीवन हे भाग्याचंच म्हटलं पाहिजे.या वयातलेही अनेक आघात पचवण्याचं सामर्थ्य या सहजीवनात एकमेकांच्या प्रेमाच्या आधारानेच शक्य होतं.
दोघांमधला कुणीही एक निघून जाणं असह्य करणारं असतं.प्रेमाची महती या आधी कळलेली नसेल तर ती आता कळूनही उपयोग नसतो.
अजूनही लग्न न करता एकटे राहिलेले दाखवत नसले, मानत नसले तरी पश्चातापाने पोळत असतात.माणसाला गोष्टी मनात दाबून ठेवायची खोड हसते.वरवर हसायची सवय तो करून घेतो.मनात दाबून ठेवलेल्या असंख्य गोष्टी जेव्हा गंभीर स्वरूप घेऊन बाहेर पडू लागतात तेव्हा या गोष्टींची स्पष्ट जाणीव त्याला, इतरांना होते.पन्नाशीनंतरच्या या कालखंडात आधार ही अपरिहार्य गरज असते.तो प्रेमाचा असेल तर सगळंच सुसह्य होतं.तहान लागल्यावर विहीर खणायला घ्यायच्या मानवी स्वभावाला अनुसरून या वयात तो अनेक गोष्टींत, नात्यांत, अनेक माणसांत, पाळीव जनावरांत प्रेम शोधू लागतो.प्रेमाची खोली त्याला आता दिसू लागते, कळू लागते.नारळाच्या आतल्या गोड पाण्या-खोबर्‍याप्रमाणे किंवा फणसाच्या आतल्या गर्‍याप्रमाणे माणसातलं प्रेम आता उफाळून येतं.
आता तो घेण्याचा विचार सोडून देतो.प्रेम देत, वाटत सुटतो.
सगळेच म्हातारे किंवा म्हातार्‍या अशा असतातच असं नाही.काहींच्या स्वभावानं इतकं उग्र रूप धारण केलेलं असतं की शेवटपर्यंत त्याना प्रेमाचा पाझर फुटतच नाही.एकांतात किंवा विशिष्ट व्यक्तीकडे तो कधी ना कधी मात्र फुटत असतो.
नातवंडांवरचं या आजी-आजोबांचं प्रेम दुधावरच्या साईसारखं असतं असं म्हणतात.नातवंडं, शेजारी, संपर्कात येणारी माणसं यांवर माया करणं लग्नाशिवाय राहिलेले, जोडीदार सोडून गेलेले यांनाही चुकत नाही.प्रेम हे सगळ्यांवर करण्याची गोष्ट आहे, ते सर्वव्यापी आहे याची जाण सर्वसाधारणपणे या वयात व्हायला लागते.सगळ्यांनाच ती येते असं नाही.माणसाच्या माणूसपणाला अनेक कंगोरे आहेत.त्याचं महत्व त्यातच तर आहे.
या वयातला सर्वसाधारण माणूस परमेश्वरावर प्रेम करायला लागतो.या आधी तो ते करत आलेला असतोच पण ते हे हवं, ते हवं यासाठी असतं.आता त्याला निरपेक्ष प्रेमाची महती कळायला लागते.जिला दुसर्‍या शब्दात तो भक्ती असं म्हणतो.
अध्यात्म असा बोजड शब्द वापरून तो त्याच्याही मागे लागतो.पण त्याच्याही मुळाशी काय असतं? निरपेक्ष प्रेम.
परमेश्वर, भक्ती असं म्हटल्यावर अजूनही ज्यांच्या अंगावर काटा येतो ते ’अज्ञात व्यवस्थेचं कोडं’ उलगडण्याच्या प्रयत्नाला आणखी जोमाने लागतात.मानवी जीवनाला परिपूर्णता येऊ नये यासाठी प्रयत्न करणारी अज्ञात व्यवस्था म्हणून अखेर परमेश्वरालाच नकारात्मक का होईला मान्यता देतात.त्या अज्ञात व्यवस्थेचं कोडं आजतागायत कोणालाही उकललेलं नाही, उकलण्याची शक्यता दुरापास्त आहे.सामान्य माणसाच्या तर आवाक्याबाहेरची ती गोष्ट आहे.आपल्याला सर्वार्थानं बळ देणारी एक शक्ती आहे असं सामान्य माणूस मानतो.त्या शक्तीवर निरपेक्ष प्रेम म्हणजे भक्ती करण्यात उरलेलं आयुष्य घालवणं त्याच्या हातात उरतं.
सामान्य माणसाला आयुष्यातल्या अनेक अवस्थांमधला प्रेमाचा आधार घेत जगणं अपरिहार्य असतं.सरतेशेवटी आपल्याजवळ असलेल्या प्रेमाच्या न संपणार्‍या साठ्याचं वितरण करत रहाणं त्याला सहज शक्य असतं.त्यानं देऊ केलेला हा प्रेमाचा आधारच त्याच्या पश्चात अमर रहाणार असतो.अनेकांचं जीवन फुलवत रहाणार असतो.

Sunday, February 27, 2011

समंजस प्रेम!

स्त्री-पुरूषांमधले नाजूक भावबंध किंवा नैसर्गिक आकर्षणातून त्या दोघांनी एकत्र येणं म्हणजे प्रेम असा सार्वत्रिक समज आहे.स्त्री-पुरूष वयात येत असताना त्यांना या प्रेमाची चाहूल लागते.मनात प्रेमाची हुरहूर निर्माण होते.या ना त्या प्रकारे प्रत्यक्ष प्रेमभावनेची अनुभूती घेणं ही त्यापुढची पायरी.हे प्रेम सर्वस्व व्यापून टाकणारं ठरतं.प्रेमाचं वादळ समोर ठाण मांडून उभं रहातं.गंमत म्हणजे परिस्थितीवश किंवा स्वत:हून ठरवून माणूस या प्रेमापासून वंचित राहिला तरीही हे वादळ ठाण मांडून रहातंच.
सहसा प्रेमाचं लग्नात रूपांतर होतं पण लग्न न करता प्रेम करत रहाणं, लग्नाशिवाय नवरा-बायकोच्या प्रेमाने एकत्र रहाणं हे पर्यायही अवलंबले जातात.दोघांनी उरलेलं आयुष्य अविवाहित राहून किंवा परस्परांच्या अधिकृत जोडीदाराशी संसार करत असतानाही एकमेकातला प्रेमाचा धागा टिकवून ठेवणं ही तारेवरची कसरत होते.प्लेटोनिक लव्ह असं या प्रेमाचं लोकप्रिय नाव.
माणसं आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे आपापल्या प्रेमसंबंधात वागत असतात.स्त्री-पुरूषांमधल्या फार पुढे गेलेल्या प्रेमात शारीरिक आकर्षणाचा भाग नाकारता येत नाही.लग्नाने अशा संबंधाला अधिकृत मान्यता मिळते.लग्न न करता आणि शारीरिक आकर्षणावर मात करत परस्परातला प्रेमाचा धागा तरीही टिकवून ठेवणं म्हणजे माणसाच्या परिपक्वतेची एक प्रकारे कसोटीच.
प्रेम हे एकमेकाच्या मनात घर करून राहिलेलं असतं.सतत करत रहाणं यासारखी ही गोष्टं नसते.
लग्न करून प्रेमावर अधिकृत मान्यतेची मोहोर उठवणं सहसा चुकत नाही.जे प्रेम न करता विवाहबद्ध होतात, अर्थात ठरवून लग्न करतात त्यांचा प्रेमाचा अध्याय लग्नानंतर सुरू होतो.आमचा प्रेमविवाह नाही तर विवाहानंतरचं प्रेम आहे! असं हे अभिमानाने सांगतात.आधी प्रेमाची हुरहूर, मग वादळ, मग लग्न या प्रवासात हे वादळ लग्नानंतरही चालू रहातं.सहजीवनाचा धागा आधाराला घेऊन ह्या वादळावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू होतात.समंजसपणा काही एकदमच येत नाही.त्यासाठी अनेक परिक्षांमधून जाणं अपरिहार्य ठरतं.काही वेळा या अग्निपरिक्षाही असू शकतात.सगळ्या अंगाने दोन जीव एकत्र आल्यावर एकमेकांच्या सवयी, स्वभाव यांची खरी जाण येते.एकमेकांच्या स्वभावधर्मानुसार जुळवून घेणं यात प्रेमाची कसोटी लागते.लहान लहान गोष्टी जुळवून घेणंही कधीकधी जीवघेणं होऊन बसतं.सतत एकत्र राहिल्यामुळे घर्षण वाढत रहातं.
दोघांपैकी कुणी एकानं फक्त स्वत:चाच विचार करून चालत नाही.प्रेम ही भावनाच सहभागाची आहे.बर्‍याच गोष्टी समजायला सोप्या असतात.कळतं पण वळतंच असं नाही.माणसाच्या विचार करण्यात, बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात अंतर रहातं.मग मागच्या काही पिढ्यामंधे होत होतं तसं कुणीतरी एकानं (स्त्रीनं?) पड खाऊन हे प्रेम (!) वाचवावं लागतं.
वैवाहिक आयुष्यात लैंगिकदृष्ट्या एकमेकांशी अनुरूप होत रहाणं ही परिणामकारक गोष्टं असते.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सगळा डोलारा याच गोष्टीवर अवलंबून असतो.जोडप्यांचे आपसातले उत्तम लैंगिक संबंध अनेक तणावांवर मात करू शकतात.तसंच आपसातल्या अनेक तणावांवर योग्यं उत्तरं शोधायचा सतत प्रयत्न करून माणूस प्रेम या भावनेचा शारीरिक, भावनिक परमोच्च बिंदू गाठू शकतो.शरीर आणि मन या गोष्टी वेगळ्या रहातच नाहीत.
मग मुलं होतात.त्याना सांभाळणं, वाढवणं, त्यांच्या संदर्भातले निर्णय घेणं ही त्यापुढची परिक्षा.दोघांच्या प्रेमाला फुटलेला हा अंकुर दोघांच्या प्रेमाची व्याप्ती वाढवतो.आता आईवडलांमधला विसंवाद आणखी एका आयुष्याला मारक ठरू शकतो किंवा आईबापांमधलं प्रेम त्या मुलाला सोन्यासारखं आयुष्य जगायला बळ देऊ शकतं.मुलं मोठी होऊ लागतात.एकमेकांच्या सततच्या सहजीवनामुळे जोडप्याच्या शारीरिक, भावनिक संबंधात एकसुरीपणा यायला लागतो.तो घालवणं पुन्हा एकमेकाच्याच हाती असतं.खरं प्रेम या एकसुरीपणावरही मात करतं.
फक्त नवरा-बायको हेच नातं असलेल्या संबंधात हळूहळू नवरा-बायको हे नातं लोप पावून दोघे एकमेकांचे मित्र होतात, एकमेकांचे पालक होतात.प्रेम म्हणजे फक्त प्रेमच, भांडण नाहीच असं नसतं.उलट भांडणातूनच प्रेम अधिक वाढतं.मनुष्यस्वभाव किंवा परस्परसंबंध यांचा एक आलेख असतो.तो वर-खाली होत असतो.त्यातही उत्पत्ती, स्थिती, लय असं चक्र असतंच.
आता एकमेकाचं वागणं, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं एकमेकांच्या अंगवळणी पडतं.आपल्याला जमत नाही ते आपल्या जोडीदाराला चांगलंच जमतं हे लक्षात यायला लागतं.’मी’ पणाची जागा ’आपण’ने घेतली जाते.दोघांची मिळून जी शक्ती निर्माण होते त्याचा प्रत्यय यायला लागतो.
सर्वसाधारणपणे तिशी ते पन्नाशीतला हा प्रवास.
काही अजून एकटे राहिलेले किंवा या प्रवासात एकटे झालेले असतात.ते मग स्वत:ला नोकरीत, व्यवसायात, सामाजिक कार्यात, छंदात स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात.झोकून देण्याचा प्रयत्न करतात असं म्हणावं लागतं कारण कितीही झालं तरी, कुणी कबूल करो वा न करो, सहजीवनाची पोकळी रहातेच.
एक संबंध जोडला.त्यातली जादू संपली की दुसरा जोडला.असं करूनही जगता येतं.पण त्याला प्रेम म्हणता येत नाही.प्रेमभावनेतली अखंडता त्यात नसते.
काही जोडपी नाईलाजाचं सहजीवन जगत असतात.कुठल्याही कारणाने असेल किंवा कुठल्यातरी कारणासाठी असेल.सहजीवनाचा जाच व्हायला लागतो.प्रेमाची आडकाठी व्हायला लागली की आयुष्याला अर्थ उरत नाही.माणूस मुळात एकटा असतो.सहजीवन हा त्याच्या आयुष्याचा आधार.तो खिळखिळा झाल्यावर किंवा नाहीसाच झाल्यावर तो एकाकी होतो.आयुष्य खेचत रहाणं हेच भागधेय उरतं.
नुसतंच नर आणि मादी म्हणून जगता येतं की! पण मग माणूस आणि जनावर यात फरक काय?
समंजस प्रेमाची महती ही अशी असते.मुलं-बाळं मोठी होतात.घरट्यात थांबेनाशी होतात.पन्नाशीपर्यंत करियरची धावाधाव शांत होते.आता एकमेकाला आधार असतो तो फक्त प्रेमाचाच!

Thursday, January 20, 2011

प्रेमाचं वादळ!...

Cyclone Warning ... [33/P365]कोवळ्या वयातली मुलं लैंगिक आकर्षणाला बळी पडली किंवा प्रेमातल्या नैराश्याने खचली तर आयुष्यभर असह्य ताणाखाली वावरतात.अशा वेळी त्यांच्या भोवतालचं वातावरण, घर, विशेषत: त्यांचे आईबाप फार मोठी भूमिका बजावत असतात.घरातलं भावनिक अस्थैर्य, आईवडलांमधला विसंवाद मुलाचा भावनिक पाया खिळखिळा करतात.त्यातच बाप आणि मुलगी किंवा आई आणि मुलगा या अतिमहत्वाच्या नात्यांमधे जरूरीपेक्षा जास्त तणाव असला तर ते मूल आधीच भावनिक ताण अनुभवत असतं.या परिस्थितीत या ना त्या कारणाने येणारं प्रेमातलं नैराश्य किंवा लैंगिक आकर्षणाला बळी पडणं फारच क्लेशकारक ठरू शकतं.
शाळेतून कॉलेजमधे जाताना आणि त्यानंतर नोकरी-व्यवसायात शिरताना माणसातल्या सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं.प्रेम या विषयात अनेक नवनवीन जाणिवा व्हायला लागतात.प्रथमदर्शनी प्रेम आणि पहिलं प्रेम यांच्या रोमांचकारी अनुभवाचं हे सर्वसाधारण वय म्हटलं पाहिजे.हिंदी सिनेमानं हा अनुभव आणखी रोमांचकारी बनवून टाकला.उदा. ’मेरे मेहेबूब’ ह्या सिनेमातली ती सुप्रसिद्धं आणि नंतर अनेकांनी अनेक रांगोळ्या घातलेली नायक-नायिकेची प्रथम भेट, ते अनवधानाने एकमेकांना धडकणं, ती पुस्तकं पडणं, त्यानं ती गोळा करणं, सगळं एकमेकांच्या नजरेत बांधलेल्या नजरा न सोडवता... काय? गेलात नं समाधीत?...
प्रथमदर्शनी प्रेमातून हटकून प्रेमाचं बस्तान बसण्याची कल्पना तशी वास्तवाला धरून मात्र नाही. ’पहिलं प्रेम’ हा मात्र माणसाच्या आयुष्यातला फार मोठा अनुभव.ज्यांचं पहिलं प्रेम यशस्वी होतं ते सुदैवी.अर्थात, प्रेमात यशस्वी होणं हा फार लांबचा पल्ला असतो.ते लग्नात परिणत होणं हा त्यातला पहिला टप्पा मानला जातो.
मागच्या पिढीत प्रेमविवाह हेच एक अप्रूप होतं तेव्हा पहिल्या आणि जराश्या आकर्षणाने झालेले विवाह नंतर खूप क्लेशदायी झालेले आढळले.प्रेमविवाहाबद्दल एक नको तेवढी रोमांचक कल्पना बाळगल्यामुळे हे झालं असावं.प्रेमविवाह अजून समाजात मुरले नसावेत.आजच्या पिढीत सर्वसाधारण अनुरुपता, शिक्षणक्रमातला समानधागा, समान करियर अशा मार्गाने एका अर्थाने कॅलक्युलेटेड (हिशोबी) प्रेमविवाह होतात.कालानुसार हे सुसंगत असावं.तरी प्रेम ही भावना त्यातही आपला प्रभाव दाखवल्याशिवाय रहात नाही.Love Love Loveआपल्याला आवडणारं माणूस छोट्या छोट्या गोष्टींतून आपली काळजी करतंय, आपल्याबद्दल त्याला खास काही वाटतंय असे अर्थ लावणं, मग ते खरे ठरणं, दोन्ही बाजूंना त्यांची संपूर्ण जाणीव होणं... यानंतरचा प्रवास स्वप्नातून जाणारा असतो!.रोजचं अर्थहीन आयुष्य चटकन्‌ रोमांचकारी वाटायला लागतं.मग एकमेकाला जपणं, एकमेकांचे हट्टं पुरवणं असं करता करता रूसवे-फुगवे, लटकी भांडणे, अबोला धरणं या मार्गांनी प्रेमाचं वादळ माणसाच्या आयुष्यात प्रवेश करतं.त्याला दिशा देणं या दोन्ही प्रेमिकांच्या हातात असतं.
निवडीची उलथापालथ करत रहाणं हा काही माणसांचा स्वभाव असतो.ठरवून प्रेमात पडता येत नाही हे त्याना मान्य नसतं.त्यांना कुणी आवडतच नाही.माणसातले दोष शोधत रहाणं, स्वत:बद्दलच्या अवाजवी कल्पना आणि प्रेमसंबंधातून अवाजवी अपेक्षा बाळगणं अशा वृत्तीमुळं ती प्रवाहापासून अलग पडतात.एखादा किंवा एखादी खूपच भिडस्त असते.समोरून आवाहन करणारं प्रेमही अशांना त्यांच्या कोषातून बाहेर काढू शकत नाही.काहींच्या बाबतीत प्रेमाचे योगच नसतात.प्रेम जुळण्यात सतत काहीतरी विघ्नं निर्माण होत रहाणं, उगाच गैरसमजच होणं, व्यावहारिक अडचणीत गुंतून प्रेमसंबंधासाठी अवकाशच न मिळणं अशा गोष्टींमुळे ते प्रेमापासून वंचित रहातात.हळूहळू अनावर होत जाणारं लैंगिक आकर्षण भुकेच्या स्वरूपात समोर उभं राहू लागतं.प्रेम आहे तरी वादळ, नाही तरी वादळ अशी परिस्थिती निर्माण होते.
समवयस्कांमधे प्रेम निर्माण होणं सहज असतं.कधीकधी आपल्यापेक्षा जास्त वयाची, वयात खूप अंतर असलेली व्यक्ती आवडायला लागते आणि तो समाजाच्या कुतूहलाचा विषय बनतो.यातल्या लहान भागीदाराच्या प्रेमाची गणती बालिश प्रेमात (काफ लव्ह) होऊन ते फारसं गंभीरपणे न घेण्यासारखं असतं असा सर्वसाधारण समज असतो.तर जास्त वयाचा जोडीदार पावलोपावली आपण करायला जातोय ते योग्य की अयोग्य या संभ्रमात पडायला लागतो.दोघंही एकमेकात इतकी गुंतलेली असतात की बाहेर पडणं दोघांनाही कठीण होऊन बसतं.लहान भागीदार कोवळ्या वयातला असेल तर त्याच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारी परिस्थितीच जणू त्याच्यासमोर उभी रहाते.संबंधातला जास्त वयाचा भागीदार जर विवाहित असेल तर फारच अडचणीचा मामला होतो.अशा विवाहबाह्य प्रेमातून अनेक माणसं दु:खी होऊ शकतात."killing love #2"
प्रेम कधीकधी जे राक्षसी रूप घेतं ती वादळाची परिसीमा ठरते.वर्गात शिरून किंवा भर रस्त्यात रॉकेल ओतून पेटवून देणं, तुकडे करून फेकून देणं, भररस्त्यात भरदिवसा सपासप वार करून बदला घेणं हे केवळ राक्षसच करू शकतात.त्यांना प्रेमिक वगैरे म्हणणं हा प्रेम या शब्दाचा अपमान होईल.याच्या बरोब्बर विरूद्ध असतं ते ’प्लेटोनिक लव्ह’.कुठलंही लैंगिक आकर्षण नसलेलं, निरपेक्ष असलेलं प्रेम.पृथ्वी सूर्याभोवती किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहिलेले आहेत अनंतकाळ तसं.
स्त्री-पुरूषांमधे निखळ मैत्री असू शकत नाही असं नाहीच.पण त्या दोघांत प्रेम निर्माण झालं तर त्यात लैंगिक आकर्षणाचा भाग नसतो हे पटणारं नाही.मुळात स्त्री-पुरूषात मैत्री व प्रेम यात फार पुसटशी रेषा आहे.
प्रेम जमतं आणि मग पुढचे निर्णय घेणं महत्वाचं ठरतं.त्यासाठी प्रेमाच्या धुंदीतून बाहेर यावं लागतं.त्या धुंदीत ही माणसं जास्तीत जास्त निकट येतात.एकमेकांच्या सवयी, दोष, एकमेकांना गृहीत धरणं, एकमेकांकडून अपेक्षा ठेवणं आणि त्यानंतर ’जेलसी’.आपल्याला आवडणारं माणूस फक्तं आपलंच ही ’पॅशन’.आपल्याच माणसावर बारीक नजर ठेवणं, त्यानं सतत आपल्याच अंकित असावं अशी अपेक्षा बाळगून त्याला जखडून ठेवल्यासारखं करणं, तो किंवा ती सतत आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असा समज (गैर) करून घेणं.तसं त्यानं करू नये असा ह धरणं असे प्रकार वादळात आणणारे ठरतात.sahara108प्रेमाचा एक मार्ग विवाहाकडे जातो.किंवा आजच्या युगात ’लिव इन’ कडे जातो.तसं झालं तर प्रेमातून काहीतरी निष्पन्न तरी होतं.तसं नसेल तर आणखीनच खोल भोवर्‍यात अडकणं चुकत नाही.’विशी ते तिशी’ हा माणसाच्या आयुष्याचा कालखंड या ना त्या कारणाने माणसाला प्रेमात बैचेन करणारा असतो.भावनिक वादळं उठवणारा असतो.सारासार विचार करून काहीएक निर्णय घ्यावे लागतात.माणसाच्या आयुष्यातलं प्रेम त्यामुळे समंजस होत जाणार असतं!

Friday, January 14, 2011

प्रेम: एक हुरहूर

Falling
माणूस आणि प्रेम यांचं नातं अतूट आहे.माणूस आपली परिस्थिती, भोवताल, आलेली वेळ, काळ, वाढणारं वय या सगळ्या आणि इतर कितीतरी परिमाणांमधून प्रेमाच्या अनेक छटा अनुभवतो.अनेक वेळा प्रेम होतंय हे समजेपर्यंत प्रेमाची जादू संपून गेलेली असते.माणसाला प्रेम करून घ्यायला खूप आवडतं.ते दिल्यानं वाढतं हे त्याच्या लक्षात येत नाही.निर्मळ प्रेमाचा ओघवता स्त्रोत असणारे म्हणूनच या जगात महान ठरतात.
प्रेमाबद्दल सतत इतकं सांगून झाल्यावरही अजून काही सांगायचं उरतंच.प्रेम नक्की काय आहे? माणूस अजून शोध घेतोच आहे.एवढा प्रगत झालेला असूनही प्रेम या शब्दाची व्याख्या करणं त्याच्या आटोक्याबाहेरचं राहिलं आहे.
सर्वसाधारणपणे ’प्रेम’ म्हटल्यावर स्त्री-पुरूषांमधले नाजूक भावबंध हेच त्याचं रूप डोळ्यांसमोर येतं.अनेक हिंदी सिनेमांनी, कथा-कादंबर्‍यांनी कवितांनी प्रेमाला सतत खतपाणी घातलेलं आहे.खरंच! प्रेमाचा हा एवढा भाग जरी विचारात घेतला तरी त्याचा पसारा बघून चकीत व्हायला होतं.स्त्री-पुरूषांमधलं प्रेम हे बाप-लेक, आई-मुलगा, आजी-नातू अश्या नात्यांमधलंही असतं पण आपल्याला प्रेम म्हटल्यावर सहजपणे दिसतं ते स्त्री-पुरूषामधलं आकर्षण.नैसर्गिकरित्या हे आकर्षण निर्माण होतं, वाढतं, खुंटतंसुद्धा.हे प्रेम म्हणजे केवळ लैंगिक आकर्षण असतं असं नाही.
In Love
पुरूषात जे आहे ते स्त्रीत नाही आणि स्त्रीत जे आहे ते पुरूषात नाही.नैसर्गिकरित्याच पूर्णपणे परस्परावलंबी असे हे जीव आहेत.त्यामुळे ’प्रेमबिम सब झूठ आहे’, ’आपल्याला प्रेम वगैरे काही ठाऊक नाही’ असं म्हणणारे लोकांपेक्षा स्वत:लाच फसवत आलेले आहेत.प्रेमात नैराश्य आल्यानंतर काही काळ असं वाटणं स्वाभाविक आहे.दुर्दैवाने ज्यांच्या वाट्याला मात्र सतत प्रेमातल्या दु:खाचीच बाजू आली आलीय किंवा हेकेखोरपणे, आपल्या स्वभावाला मुरड न घालता आल्यामुळे जे सतत या दैवी देणगीपासून लांबच राहिलेत त्यांच्याएवढं दु:खी या जगात कोणीच नसेल.
पैसा, मानमरातब, दर्जा असं काहीही नसलं तरी एक वेळ चालेल, पण प्रेम नाही, ते देण्या-घेण्याची पात्रता नाही म्हणजे माणसाकडे काहीच नाही.
माणूस वयात येतो आणि त्याला प्रेमाची हुरहूर लागते.मुली मुलांकडे बघितल्यावर उगीच कॉन्शस होतात.मुलं आजुबाजूला एखादी जरी मुलगी असेल तर उगाच आपण स्मार्ट असल्याचं दाखवतात.आजकाल मुलं-मुली अधिक मोकळेपणानं मिसळतात.तो मोकळेपणा निखळ मैत्रीचाही असतो.मोकळेपणाने दुसरंच टोक गाठलंय की काय असंही काही वेळा जाणवतं.
पूर्वी एकमेकांना अहो-जाहो करणं, वर्गात मुलामुलींना वेगवेगळं बसवणं किंवा सरळ सरळ मुला-मुलींच्या वेगवेगळ्या शाळा काढल्या गेल्या.एकत्र शिक्षणपद्धतीत वर्गात गप्पा वाढतात म्हणून एक मुलगा, एक मुलगी एका बाकावर बसवण्याची शिक्षा (?) दिली जायची.मग एकाचवेळी नकोनकोसं आणि हवंहवसं वातावरण तयार व्हायचं.आज मोकळेपणानं एखादी मुलगी एका मुलाला तू मला आवडतोस असं म्हणू शकते.तो आवडतो म्हणजे लगेच झालं असंही नसतं.आज मैत्रीचा धागा दिसतो तो पूर्वी लुप्त होता.मैत्री आहे असं सांगणंसुद्धा ईऽऽऽ असा प्रकार होता.The child like look, Indiaविरूद्ध लिंगाच्या व्यक्तीशी मैत्री करावीशी वाटणे ही हुरहूरीची सुरवात.मजा म्हणजे पूर्वीपासून आजतागायत सगळेच जण या स्थितीतून गेलेले असतात आणि तरीही बारा-तेरा वर्षाच्या मुला-मुलीसंदर्भात निखळ असं जरी काही दिसलं तरी प्रत्येक माणसातले आई-बाप लगेच जागे होतात.काय ही पोरं! काय यांचं वय! अभ्यास करायच्या वयात हे काय?... पण हे वयच तसं असतं.प्रेमानं आपली जादू दाखवायला सुरवात केलेली असते.हे प्रेम अर्थात असं लगेच जुळतं असंही नाही.कुठेही गेल्यावर, कुणीही आवडल्यावर हुरहुरणं, तिचं किंवा त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का नाही ते बघणं, असेल तर ते आणखी वेधून घेणं, हसणं, बोलणं, चेष्टामस्करी करणं इथपर्यंत या वयात प्रेमाची मजल असते.शाळा-कॉलेजातला ’अभ्यास’ नावाच महाप्रचंड राक्षस हे वय, ही हुरहूर गिळण्याच्या पवित्र्यात नेहेमीच असतो.या राक्षसाला वळसा घालून किंवा त्याला खाकोटीला मारून पुढे जाणारेही असतात.पण प्रेम लगेच सापडत नाही.काही काळ हुरहूरीचा जो सिलसिला चालू रहातो त्याला ’क्रॉसवायर्स’ असं म्हटलं जातं.आपल्याला जो किंवा जी आवडत असते, ती-तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नसतात.ज्यांना-जिला आपण आवडत असतो त्यांचा पिच्छा सोडवणं यात आपल्याला नाकेनऊ येत असतात.
Torn
या वयातल्या प्रेमाची व्याप्ती दिसणं, हुशार असणं किंवा स्मार्ट दिसणं, बोलणं, मनापासून मदत करणं आणि ग्रुपमधल्यांनी चिडवणं किंवा डिवचणं यापुरती असते.मग डेट्स, भ्रमणध्वनि किंवा शक्य असेल तर चॅटवर तासनतास घालवणं.रूसवे फुगवे, आणा-भाका घेणं, पुढच्या आयुष्याचे बेत (!) ठरवणं इथपर्यंत सगळं ठीक असतं.हा एक प्रकारचा भातुकलीचा खेळ असतो.तो अतिशय सच्चा असतो.पण आयुष्यात त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आहे याचं भान तेव्हा नसतं.स्वभावानुसार जवळ आलेले हे प्रेमी अतिजवळकीने परस्परांमधले दोष कळून वेगळेही होतात.पण नैराश्य रहातं आणि या वयातलं हे नैराश्य आयुष्यावर फार मोठा आघात करू शकतं.दोन जीवांनी या वयात प्रेमात पडून हा असा प्रवास पूर्ण केल्यावर माणसामाणसांत जागे झालेले आई-बाप खरे असतात असं अशावेळी वाटायला लागतं.हे आई-बाप आणखी प्रकर्षाने खरे वाटतात, जेव्हा ही कोवळ्या वयातली मुलं लैंगिक आकर्षणाला बळी पडतात.आता प्रेमाच्या वादळाला सुरवात झालेली असते!...
Nouméa, 13 janvier 2011, Vania