romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label आकाशवाणी. Show all posts
Showing posts with label आकाशवाणी. Show all posts

Tuesday, April 3, 2018

"घरटं" :साहित्यसौरभ... अस्मिता वाहिनी... २ एप्रिल २०१८

महानगरासारख्या ठिकाणी घरात चिमण्या शिरणं ही शक्य कोटीतली गोष्टं नाही वाटत! खरं तर असल्या जादुई नगरीत काय शक्यं नाही? अशक्य ते शक्य करणं ही महानगराची खासियत. मात्र इथे निसर्ग आणि माणूस यातलं वाढणारं अंतर रोखणं ही गोष्टं निश्चित काळजी करण्यासारखी आहे. इथे जंगल आहे, पण कॉंक्रिटचं!..

दूर उपनगरात सदनिका असणं, ती तळमजल्यावर असणं, त्या सदनिकेला मागचं दार असणं, मागच्या दारात चार बाय आठचं का होईना परसू असणं या अगदीच शक्य कोटीतल्या गोष्टी नव्हेत. पण असल्या तर त्यांचं महत्व जाणवतं का? यंत्रवत झालेले आपण त्या यांत्रिकतेतून बाहेर पडतो का?

बहुतेक वेळा सुटीच्या दिवशीच घराचं हे मागचं दार पूर्ण उघडलं जातं. पण त्या लाकडी दारामागेही असतं एक जाळीचं लोखंडी दार. नक्षीदार जाळीचं, भक्कम आणी बंद. पहिल्यांदा केव्हातरी या जाळीतून उन्हाचे कवडसे आले तेव्हा बाप झालेला असूनही मी खुळावलो. लहानपण, आजोळ, छपरावरच्या पन्हाळी कौलातून माडीवरच्या खोलीत येणारे कवडसे, त्या कवडश्यात बागडणारे धुलिकण. तो जादुमय झोत. मला सगळं पुन्हा दिसलं. मुलगी अगदीच लहान होती तेव्हा. लोखंडी जाळीतून भिंतीवर, बिछान्यावर पडणारे कवडसे तिच्या मऊ हातांनी पुसायचा प्रयत्न करत होती. मनासारखं होत नाही म्हणून चिरकत होती. शेवटी कंटाळून तिनं नेहेमीप्रमाणे तोंडात बोटं घातली आणि ऊं ऊं करत पडून राहिली...

मग मुलगी सात-आठ वर्षाची झाली. जाळीचा लोखंडी दरवाजाही आता मुडपून बाहेरच्या बाजूला अर्धा का होईना उघडण्यायोग्य केला. आता कुठल्यातरी ऋतूत, सूर्याच्या अयनानुसार कधीतरी आत येणार्‍या या उन्हाची सवय झाली होती.

सुटीचा दिवस. मी लोळत वाचत पडलेला. पायाशी मुलगी चित्रं काढत आणि रंगवत. माझा पाय हलवत शक्य तितक्या सौम्य सुरात उद्गारली, “पपा स्पॅरोSS..”. त्या आधी ती कशाने तरी दचकली हे मला अर्धवट जाणवलं होतं. तिनं दुसर्‍यांदा माझा पाय हलवला आणि मी तंद्रीतून जागा झालो. तिनं दाखवलं तिकडे बघितलं. एक चिमणा- चोचीपासून गळ्यापर्यंत काळा मफलर घातला असल्यासारखा- अंतराअंतरानी चिवचिवत होता. ’आत येऊ का?’ असं विचारत होता किंवा ’टू बी ऑर नॉट टूबी’ असं स्वत:शीच पुटपुटत होता. शेपटी उडवत. अर्धवट उघड्या लोखंडी दाराच्या, एका जाळीच्या भोकात तो मावला होता. मग अचानक आजूबाजूच्या दोन-तीन भोकांमधे त्याच्या मित्रमैत्रिणी पोहोचल्या. चिवचिवाटाची आता कुचकुच झाली. मी नकळत मुलीकडे पाहिलं. ती माझ्यासारखीच दंग. फडफड झाली आणि त्या जाळीतल्या दोन-तीन चिमण्या आणखी आत आल्या. एक आत उघडलेल्या लाकडी दाराच्या कडीवर बसली. दोन दाराच्या वरच्या कडेवर. पुन्हा कुचकुचाट सुरू झाला. मी मुलीला अडवलं. ती शूSS.. करून त्याना उडवण्याच्या बेतात होती. आगंतुकाला घरात घ्यायचं नाही. दाराचा कडेकोट बंदोबस्तं करायचा. कुलुप, लॅच, पीपहोल.. असल्या संस्कृतीत ती जन्माला आलेली, तसं करण्यात तिची काहीच चूक नव्हती. अडवल्यावर मग ती नेहेमीसारखी तोंडात बोटं घालून बसली. अशावेळी मुलं मनन करत असतात असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं..

आमचं अस्तित्व जाणवल्यामुळे म्हणा किंवा त्यांचं आपापसात काही ठरल्यामुळे चिमण्या एकाएकी अचानक भुर्रकन उडून बाहेर निघून गेल्या. आपल्या मननामधून बाहेर यायला मुलीला थोडा वेळ लागला मग तिची चौकसबुद्धी जागी झाली, “इतक्या सगळ्या स्पॅरोज- सॉरी चिमण्या- आजच आपल्या घरात कशा घुसल्या?”



काहीही न बोलता मी हळूच तिला खिडकीत आणलं. दाराच्या चौकटीपासून फूटभर अंतरावरच्या. घरं म्हणजे कोंडवाडे, असं म्हणण्यापेक्षा ते तुरुंगच झालेत. लाकडी दाराबाहेर लोखंडी जाळीचं दार आणि खिडकीला आतून डासप्रतिबंधक जाळी आणि बाहेरून लोखंडी नक्षीचा सांगाडा. अशा खिडकीतून मी मुलीला बाहेर, वर बघायला लावत होतो.

बाहेर, दार आणि खिडकीच्या वर इमारतीचा स्लॅब. त्यामुळे झालेला आयताकृती आडोसा. त्या आडोशात दोर्‍या बांधून वाळत घातलेले कपडे. त्या कपड्यात असंख्यं चिमण्या भुरभुरत होत्या. चिवचिवत होत्या. कुचकुचत होत्या. इकडून तिकडे पळत पकडापकडी खेळत होत्या. मिळेल त्याला लोंबकळत होत्या... तुरुंगातल्या कैद्यांनी, बाहेर खुलेआम फिरणार्‍या, बागडणार्‍या आयुष्याकडे बघत रहावं तसं त्या खिडकीतून मी आणि माझी मुलगी त्या चिमण्यांकडे बघत होतो...

सुटीचा दिवस नकळत संपतो आणि रूटीनचा राक्षस लगेच मानगुटीवर स्वार होतो. नको त्या विचारांचं मोहोळ घोंगावू लागतं. पण त्या दिवशी मात्र विषयांतर झालं होतं. अधूनमधून त्या चिमण्या माझ्या मनात सतत डोकावत राहिल्या. नुसत्या डोकावल्याच नाहीत तर त्यांच्या पंखांनी त्यानी मला भूतकाळात नेलं...

ही इमारत उभी राहिली त्याला साताठ वर्षं होऊन गेली होती. या जागेवर त्यावेळी असलेल्या चाळीला अंगण होतं. शेणानं सारवलं जाणारं. त्यावर शेकडो चिमण्या उतरायच्या. आईनं भाजलेल्या शेंगदाण्याच्या मधला कडक टाकाऊ भाग, जो खाल्ला तर पित्त होतं असं ती सांगायची, तो किंवा तांदूळ निवडता निवडता त्यातले खडे किंवा भाताची तूसं उडवली की चिमण्या गर्दी करायच्या ते टिपायला. लहानपणी तेव्हाच कधीतरी आईने चिमणा आणि चिमणीमधला फरक दाखवला होता.

अंगणात कावळे यायचे, साळुंक्याही यायच्या. समोर बंगला होता. आमच्या दारासमोर त्याची मागची बाजू यायची. फळबागच होती ती. कैर्‍या, जांभळं, पेरू, काजूची बोंडं, जांब... उन्हाळ्यात कुंपणाच्या तारा वाकवून चोरुन त्या बागेत जाताना गंजीफ्रॉक फाटायचा. पाठीवर ओरखडे उठायचे. वर शिव्याशाप. बंगल्याच्या मालकांचे. मग घरच्यांचे. बागेत पोपट तर यायचेच. भारद्वाजही यायचा. तो दिसला की म्हणे भाग्योदय व्हायचा...

तेरा बाय अकराच्या खोलीला दारात लाकडी फळी आडवी लावावी लागायची. अंगणात सहज फिरणारे साप, धामण, सापसुरळ्या, पावसाळ्यात बेडूक आत येऊ नयेत म्हणून. पावसाळ्यात त्या फळीला टेकून बसल्यावर काळंभोर कोसळणारं अमर्याद आभाळ दिसायचं. पागोळ्या कोसळत रहायच्या. झाडं, पानं हिरवीगार ओथंबायची, झावळ्या झुलायच्या.. अंगणात जास्वंद होती, तगर होती, अनंत होता. आवळा, केळी, सोनटक्का, गुलबक्षी, पावसाळ्यात टाकळ्याचं रान, साचलेल्या डबक्यात फडक्यानं मासे पकडणं...

असा खोल खोल जात मी थेट माझ्या आजोळातच पोहोचतो. पण तो दिवस त्या आधीच संपला. रहाटगाडग्याचं ओझं ढकलत घरी पोहोचलो. भूतकाळाची साखळी तुटली. आल्यावर मग बिछान्यावर लोळण्याचा कार्यक्रम. त्यासाठी बिछान्यावर जागा करायला लागणार. पसरलेल्या धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ते कपाटात ठेवायची पाळी माझी. पहिलाच माझा टिशर्ट हाताला लागला. तो सुलटा करण्यासाठी आत हात घातला आणि दचकलो. बहुतेक झुरळ- नाही- खरखरीत मोठं असं काहीतरी- अरे घरटं?... आत व्यवस्थित तयार केलेलं घरटं हातात आलं. मी पहातच राहिलो...

दुसरा दिवस. रुटीनच्या राक्षसानं कालचं घरटं विसरायला लावलेलं. संध्याकाळी घरी आल्यावर वर्तमानपत्र, छोटा पडदा अशा टिवल्याबावल्या करत बिछान्याजवळ आलो. आजही कपड्यांच्या घड्या करण्याची पाळी माझीच. आलेली जांभई आवरत दोन कपड्यांच्या घड्या घातल्या. पॅंट सुलटी करण्यासाठी आत हात घालून तिचा एक लांब पाय ओढायला जातो तर हातात घरटं. ओरडलोच, “हे काय चाललंय काय?” बाहेर दिवाणखान्यात छोट्या पडद्यासमोर तोंडात बोट घालून रमलेल्या मुलीलाही ते ऐकू आलं. ती धावत माझ्याजवळ आली. विचित्रं प्राणी बघावा तसं ती घरट्याकडे पहात राहिली. मग पुन्हा तिचं मनन सुरु झालं..

तिसरा दिवस. आज घड्या करण्याची पाळी बायकोची. “अरे हे काय आहे काय?” म्हणून तीही ओरडली. बाहेर दिवाणखान्यात रमलेले मी आणि मुलगी आत तिच्याजवळ पळालो. तिच्याही हातात, माझ्याच एका शर्टाच्या आतून निघालेलं... घरटं...

मग माझ्याच कपड्यात नेमकं ते घरटं कसं सापडतं, मी घरात कसा अडकलो आहे यावरुन विनोद आणि त्याहीपेक्षा जास्त हसणं...

असं आणखी दोनचार दिवस झालं आणि मग बंद झालं. विनोदही संपले. पण एरवी मी एकटा असताना, राक्षसी रुटीनमधेसुद्धा डोक्यातलं घरटं काही जाईना. पक्षी हुशार असतात. चिमण्या असतातच. दोरीवरचे कपडे रोज बदलत असतात हे त्याना कळत नसेल?.. हाताएवढ्या मोठ्या घरट्यासाठीचा कच्चा माल त्या रोज कुठून, कुठून, कसा जमवत असतील? घरटं जमवायची मूळ जागा म्हणजे वळचण किंवा झाडाच्या फांदीतलं बेचकं. दोन्हीही आता राहिलेली नाहीत!... काय करतील त्या?... रोज हातात आलेलं घरटं फेकून देताना जीवावर यायचं. नंतर ते आठवत रहाताना त्रास व्हायचा...

लहानपण चाळीत गेलं. अंगणात चिमण्या यायच्या. वळचणीला रहायच्या. लग्न झाल्यावर शहरापासून पार दूर रहायला गेलो. तिथे पाण्याचा प्रश्न. घर बंदच रहायचं जास्त वेळ. उघड्ल्यावर बाथरुमच्या गिझरमागे घरटं. ते काढून टाकायला लागायचं. जीवावर येऊन. लगेच नाही काढलं तर आत जीव धरतील मग ते आणखीच कठीण होऊन जाईल सगळं...

अशीही वेळ आली की आम्हाला कोकिळेसारखा दुसर्‍याच्या घरी राहून आपला संसार निभवायला लागला.   

चिमण्यांची हातात आलेली घरटी फेकून देताना मला माझी बदलावी लागलेली घरं आणि त्यावेळचे ते त्रास आठवत राहिले...

आता माझी मुलगी इतर अनेक मुलांप्रमाणे शिक्षणासाठी परदेशी उडून गेलीय. तिला भेटायचं म्हणजे आम्ही तिच्याकडे उडत जायचं की तिनी उडत इथे यायचं याच्यावर आमच्यात चर्चा चालू असतात.

परवा संध्याकाळी मी आणि बायको एका सहनिवासाच्या दगडी कुंपणाबाहेरुन चाललो होतो. कुंपणालगत आत ओळीने अशोकाची झाडं. त्यांची पानं आणि फांद्या वेगळ्या ओळखू येत नाहीत. त्यांची ती रचना  उतरती होऊन प्रत्येक फांदीआड एक सुरक्षित आडोसा तयार होतो. बायकोनं दाखवल्यावर लक्षं गेलं. कुचकुचाट करत असंख्य चिमण्या त्या फांद्यांआडच्या आडोश्यात आत घुसत, बाहेर येत आनंदानं बागडत होत्या. ते आपलंच घर असल्यासारख्या. आता त्याना आपलं घरटं जमवायचीही गरज नव्हती... ते दृष्य आम्ही मी डोळे भरुन पहात राहिलो..
जग खूप जवळ आलंय. प्रचंड घडामोडीचा हा काळ आहे. घरातून उडून दूर जायचं. तिथे घर करायचं. पुन्हा कारणपरत्वे उडून राहून नव्या नव्या घरांकडे झेपावत रहायचं हे आजचं वास्तव आहे. आजच्या या कोलाहलाच्या वास्तवात अशोकाच्या झाडांच्या त्या आडोश्यात आनंदानं स्वत:चं घर शोधून बागडणार्‍या चिमण्यांचं ते दृष्य अजिबात पिच्छा सोडत नाही. आनंदच आनंद म्हणजे काय याची ते नेहमीच साक्ष देत रहातं...


२ एप्रिल २०१८ रात्री ९.३० वाजता अस्मिता वाहिनीवर साहित्यसौरभ या कार्यक्रमात "घरटं" अभिवाचन स्वरुपात सादर केलं...
 (छायाचित्र.. आंतरजालावरून साभार..)

Monday, April 2, 2012

पहिलं फोटोसेशन.. जाहिरात.. इत्यादी..

खरं तर लिहू की नको असं झालंय या पोस्टबद्दल.. असं होत नाही कधी.. या आधी ’इंद्रधनुच्या गावा’ या बालनाट्याबद्दल आणि ’झुलवा’ या नाटकाच्या प्रवासाबद्दल लिहिलं. त्याही आधी आकाशवाणी संबंधात लिहिलं होतं. या सगळ्या प्रवासाची सुरवात इथून झालेली होती.
या वाटचालीबद्दल लिहिताना मला स्वत:लाच काही गोष्टी नव्याने कळल्या. त्यावेळी मी त्या त्या घटनांमधे प्रत्यक्ष सहभागी होतो. नाही म्हणायला आता मी बर्‍यापैकी तटस्थपणे या सगळ्या प्रवासाकडे पाहू शकतोय.
मला ठाऊक आहे हे जे मी केलंय ते खूप काही नक्कीच नाही. पहिलं म्हणजे हे करत असताना मला स्वत:ला ते पूर्णपणे नवीन होतं. दुसरं म्हणजे फारसा कसला आधार नसताना, एकदम वेगळ्याच क्षेत्रात, त्यावेळी, वाटचाल करताना सहप्रवासी दोस्त खूप महत्वाचे ठरतात असा अनुभव आला. मी जे केलं त्यातून खूप मोठं म्हणता येईल असं काही अजून उभं झालं नसेल पण त्या त्या वेळी मला हे दोस्त लाभले त्यांची आठवण मनात घर करून राहिली. पूर्णपणे अनिश्चिततेच्या काळात जवळपास माझ्यासारख्याच अवस्थेत असलेल्या दोस्तांनी मला खूप आश्वस्त केलं होतं आणि ते माझ्या दृष्टीनं आजही महत्वाचं आहे.
’झुलवा’ नाटकाचा बहर ओसरला होता. खरंतर माझ्या मनात तो आजही ताजाच आहे. पण व्यवहारात बघायचं झालं तर आता पुढे काय? असा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितासमोर त्यावेळी उभा होता. हा प्रश्न नवीन काही नाटक करायला मिळणं, नवीन काही शिकायला मिळणं या स्वरूपाचा होता. डोक्यात प्रायोगिक नाटक करायचं पक्कं होतं. व्यावसायिक नाटक करण्याइतकी आपली तयारी झाली आहे का याची खात्री होत नव्हती. दुसरं काहीच नाही, नाटकच करायचं असं डोक्यात पक्कं असल्यामुळे एखादं नाटक करणं चालू नसेल तर प्रचंड अस्वस्थता मनात दाटत असे. काही शक्यता पडताळल्या. त्या शक्यतांनी काही मूर्त स्वरूप घेतलं नाही. आता नव्यानं काही सुरवात करणं भाग होतं. पण ते मनातल्या मनातच रहात असे. भिडस्तपणा आडवा येत असे. ’झुलवा’ नाटकादरम्यान कधीतरी चर्चगेट स्टेशन ते एनसीपीए अश्या चालत्या बोलत्या प्रवासात ’तुझ्यासारख्या अंतर्मुख माणसानं बहिर्मुख व्हायचा प्रयत्न करणं आवश्यक आहे’ असं वामननं (वामन केंद्रेनं) प्रेमानं आणि अधिकारानं सांगितलं होतं. अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी या दोन्ही स्वभावांची सांगड घालणं कसं आवश्यक असतं हे स्पष्टीकरणही त्यासोबत होतं. ते पूर्णपणे पटणारं होतं. फक्त ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता होती. 
अशा पद्धतीने मनाची तयारी होत असताना कधीतरी चंद्रशेखर गोखले भेटला. हो! तोच तो, ’मी माझा’ हा सुप्रसिद्ध चारोळी कवितासंग्रह लिहिणारा. त्यावेळी ’मी माझा’ ची पहिली आवृत्ती प्रकाशित होत होती. मला प्रत्यक्ष शेखरकडून ’मी माझा’ ची प्रत मिळाली होती. पुढे ’मी माझा’ च्या अनेक आवृत्त्या, पुढचे अनेक भाग प्रकाशित झाले. 
मी  कविता करायला लागलो तेही शेखरच्या कविता वाचून, भारावून जाऊन.
त्यावेळी शेखर, मी, आम्ही आपापली वाट शोधत होतो. शेखर त्यावेळी मॉडेल कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होता.
साधा, सरळ स्वभाव, ऋजू व्यक्तिमत्व, वागण्याबोलण्यात मार्दव आणि हे सगळं अगदी खरं. जेन्युईन. शेखरच्या पार्ल्याच्या घरी कित्येक गप्पा झालेल्या आठवतात. शेखर हा व्यवसाय करत होता आणि तो चांगल्या अर्थाने व्यावसायिक होता. खरंतर फोटोसेशन करायचं असं माझ्या मनात नव्हतं पण शेखरनं मला ते कसं आवश्यक आहे हे समजावलं. मालिकांचं युग नुकतंच सुरू झालं होतं. चांगल्या नाटकांचा काळ चालू होताच. त्यानं आशिश सोमपुरा ची ओळख करून दिली आणि माझं पहिलं फोटोसेशन पार पडलं. शेखरनं अगदी त्याचा शर्ट मला घालायला देण्यापासून सगळी मदत केली. आशिश हा प्रथितयश फोटोग्राफर. त्यावेळी त्याची सुरवात होती. त्याच्या स्टुडिओतले त्याने काढलेले चित्रा देशमुख अर्थात नंतर झालेल्या कांचन अधिकारी आणि दुर्गा जसराज यांचे अप्रतिम फोटो अजून आठवतात. शेखरने सुरवातीला अनेक फार्मास्युटिकल ऍड्ससाठी माझं नाव सुचवलं. त्यातली एक इप्का या औषधी कंपनीची होती. यात वेगवेगळ्या वयातल्या डॉक्टरच्या वेशात माझी छायाचित्र घेतली होती. बॅरेटो नावाचा छायाचित्रकार आणि सेशन झालं होतं काचपाडा, मालाड इथल्या एका तयार होत असलेल्या सदनिकेत. त्या छायाचित्रांच्या प्रती मला संग्रहासाठी हव्या होत्या. पण अशा छायाचित्रांच्या प्रती दिल्या जात नाहीत. त्याचं ब्रोशरही बनलं असेल पण ते कदाचित खाजगी वापरासाठी असेल.
काही औषधी कंपन्यांच्या जाहिराती केल्यावर शेखरनं अपोलो टायर्सच्या जाहिरातीसाठी माझं नाव सुचवलं. जाहिरात क्षेत्रातले सुनील रानडे आणि सुप्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळे या जाहिरातीचं संयोजन करत होते. अस्मादिकांचं तेव्हा बिर्‍हाडबाजलं पाठीवर बांधलेलं. पुरेशी तयारी करताच आली नाही. त्यात अपोलो ऍंटी स्कीडटेक टायरचा ३३ अंशाचा कोन! या जाहिरातीत मी ज्या खुर्चीवर बसलोय ती त्या कोनात कललेली दिसते हा आभास नाही! तांत्रिक करामतही नाही! मी माझ्या बुटांच्या टाचांवर खुर्चीला आणि स्वत:ला तोलत ज्याम घामाघूम होत होतो आणि प्रदीप आणि सुनील माझा होसला वाढवत (?) होते. अगदी खरं सांगायचं तर मी दाणकन खाली पडेन म्हणून आणि चांगलीच फजिती होईल म्हणून माझी भीतीनं ज्याम गाळण उडाली होती त्यावेळी! शेखर एवढं करून थांबला नाही तर त्यानं त्यावेळी ’साप्ताहिक लोकप्रभा’ साठी माझी छोटीशी मुलाखतही घेतली होती! फोटोसेशन आणि जाहिरात माझ्या आयुष्यात आलं ते केवळ आणि केवळ शेखर गोखलेमुळे. संघर्षाच्या काळात एक चांगला मित्र तर मिळालाच! पुढे विनय आपटेंबरोबर ’रानभूल’ हे व्यावसायिक नाटक करत असताना त्यांच्या ’ऍडडिक्ट’ या जाहिरातसंस्थेतून एका राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत काम करायला मिळालं. ’टाटारोगोर’ या कीटकनाशकाच्या जाहिरातीत काम करायला मिळालं. ही जाहिरात जालंधर वगैरे प्रदेशात प्रामुख्याने दाखवली गेली.  पूर्वीच्या प्रसिद्ध स्ट्रॅंड सिनेमाच्या जवळ, कुलाब्याला, आरटीव्हीसी- रेडिओ टीव्ही कमर्शियल्स-  नावाची कुसुम कपूर ह्यांची जाहिरातसंस्था होती. या जाहिरातसंस्थेसाठी मला एक विडिओवॅन फिल्म करायला मिळाली. महाराष्ट्र सरकारच्या ’महाबीज’ बियाणांची प्रसिद्धी करणारी, ग्रामीण भागातल्या शेताशेतांमधून दाखवण्यासाठी बनवलेली ही विडिओवॅन फिल्म होती. पारंपारिक मराठी चित्रपटासारखीच कथा घेऊन ही फिल्म बनवली गेली होती. दिग्दर्शक होते, सुरेंद्र हुलस्वार. या जाहिरातपटात जमिनदार खलनायक मला करायला मिळाला होता. जवळजवळ आठदहा दिवस कोल्हापूरला जयप्रभा स्टूडिओ आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात याचं चित्रिकरण झालं. या जाहिरातपटाची विडिओकॅसेट मात्र मिळाली पण त्यावेळी एका पावसाळ्यात अशा कॅसेट्सची बहुदा वाट लागत असे तशी तिची वाटही लागली. 
मी शुटिंगमधे अडकलेलो आणि माझी होणारी पत्नी मुंबईत माझी वाट बघणारी.  लग्नाला महिनाभरसुद्धा उरला नव्हता..
आरटीवीसीमधे मला नेलं त्यावेळचा माझा मित्र सुरेश चांदोरकरनं. त्यानं मला रेडिओस्पॉट्ससुद्धा मिळवून दिले. त्यातला एक व्हिक्स वेपोरबचा रेडिओस्पॉट विनय आपटेंबरोबर होता. त्यात एक गाणं- जिंगल होतं. ते सुरेशनंच रचलं. त्याचं ध्वनिमुद्रण त्यानेच जमवून आणलं. सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे ती जिंगल गायले. आमच्याकडे सगळंच तुटपुंजं होतं पण रविंद्र साठेंनी अगदी तुणतुणं जुळवण्यापासून इतकी मदत केली की त्यांचे केवळ आभारच मानले पाहिजेत! व्यावसायिकतेचा- चांगल्या व्यवासायिकतेचा हा आणखी एक अनुभव..
आरटीवीसीमधे कुमार हुलस्वार नावाचे ध्वनिमुद्रक होते. त्यानी माझ्या आवाजाचा नमुना खास ध्वनिमुद्रित करून घेतला. त्या बळावर मला हिंदी रामायणाच्या रेडिओ मालिकेत वॉईसिंग करायची संधीही मिळाली. या वाटचालीत शेखर, आशिश, सुरेश, कुमार हुलस्वार, विनय आपटे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच!
अगदी अलिकडे दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका राजकीय पक्षासाठीच्या ऍडकॅम्पेनसाठी अचानक रात्री नऊदहा वाजता बोलवलं गेलं. एक उद्योगपती सरकारच्या धोरणांबद्दल (चांगलं) बोलतो. सत्ताधारी पक्षासाठीची जाहिरात. हा अनुभव मात्र त्रासदायक होता. रात्रभर चित्रिकरण होत राहिलं. मी आणि बोलवलेला मॉब रात्रभर त्याच त्या ओळी अक्षरश: रटत राहिलो. मला इतकं रटत, बोलत ठेवलं की मध्यरात्रीनंतर कॅमेरा ऑन झाल्यावर मला काही आठवतच नाही असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालं. हे त्या रात्री बराचवेळ होत राहिलं. त्या अमुक एवढ्या सेकंदांत जाहिरातपट, निवेदन बसवण्याचा आटापिटा करत असलेला तो दिग्दर्शक बघून मला हसावं की रडावं तेच कळेनासं झालं. आयुष्यात पहिल्यांदा, कधी एकदाचं हे सगळं संपतय, असं सतत वाटत राहिलं. पुढे ही ऍड कॅंपेन- म्हणजे उद्योगपती, नोकरदार, गृहिणी, शेतकरी वगैरे असलेली ही जाहिरातमालिका, टीव्ही वाहिन्यांवर प्रकाशित झाली. माझा भाग, मला धरून काही जणांना बघायला मिळाला.. असं हे सगळं जाहिरात, फोटोसेशन जगतातलं माझं एक्सकर्शन (?) :D  
     



 

Sunday, February 26, 2012

वाचकसंख्या ३००००! सर्वांचे आभार!

नमस्कार वाचकहो! ’अभिलेख’ या माझ्या ब्लॉग अर्थात जालनिशीने वाचकसंख्या ३०००० हा महत्वाचा टप्पा ओलांडला आहे! आपले आभार! आभार!! आभार!!!
’अभिलेख’ ची सुरवात झाली १३ फेब्रुवारी २००८ या दिवशी! चार वर्षं उलटून गेली. एवढ्या काळात खरंतर अनेकांनी हा टप्पा आधीच पार केलाय. काही तर लाखाच्या आणि त्यापुढच्या घरात गेलेत. त्यामुळे अप्रूप नाही पण तीस हजारचा पहिला टप्पा पार केल्याचं समाधान जरूर आहे! ही सुरवात आहे. कशी झाली सुरवात?
तुम्ही म्हणाल झालं स्मरणरंजन सुरू! स्मरणरंजनात रमण्याबद्दल अनेक प्रवाह आणि प्रवाद आहेत. आपल्याला बुवा आवडतं त्यात रमण्यात आणि रमतो तर रमतो असं कबूल करायलाही आवडतं.
’अभिनयातून लेखनाकडे’ असा ’अभिलेख’ चा अर्थ मला अभिप्रेत आहे. केवळ रोजच्या जगण्यामधनं मी बाहेर पडलो ते अपघातानं अभिनय करायला लागल्यामुळं. लिखाणाचं बीज आत कुठेतरी होतं. ते माझ्या आईमुळेच पडलं असा माझा ठाम विश्वास आहे. संघर्ष करणं आणि त्यातून बाहेर पडणं असं चक्र माणसाच्या आयुष्यात सतत चालूच असतं. पुढे एक टप्पा असा आला की एका गर्द काळोख्या काळात अचानक कविताच फुटून बाहेर येऊ लागल्या. त्या कविता गोष्टरूप होताएत असं माझ्या लक्षात यायला लागलं. मग कथा- जशा जमतील तशा लिहिणं सुरू झालं.
दुसर्‍या बाजूला, साधारण दहा-एक वर्षाचा अभिनयाचा अनुभव असेल म्हणून म्हणा, कथेत संवाद येऊ लागले. मग कथा लिहिण्यापेक्षा नाटक लिहिणं जास्त सोपं (?) असं काहीतरी मनानं घेतलं आणि नाटक लिहिलं, ते चांगलं वाटलं म्हणून राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धेला पाठवलं. तिथे ते पहिलं आलं. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेला ते पात्र ठरलं आणि प्रकाशित झालं! ते नाटक म्हणजे आवर्त!
हे नाटक लिहिताना किंवा या लेखनाचं पुनर्लेखन करताना असं लक्षात आलं कि पुन्हा पुन्हा लिहिणं फार जिकीरीचं काम आहे आणि आता संगणकाशिवाय पर्याय नाही. पण संगणक घेणं परवडत नाही अशी परिस्थिती. लिखाण चालूच राहिलं. मुद्रित माध्यमात ते छापून येण्यासाठी प्रयत्न चालू झाले. मुद्रित माध्यमातही परिचयाचं कुणीच नव्हतं, नाट्यमाध्यमात तरी कुठे कोण होतं? नियतकालिकांमधे लेख छापून येऊ लागले, दिवाळी अंकात कथा  येऊ लागल्या. पुलाखालून बरंच... ही छोटी कादंबरीही प्रकाशित झाली. पुनर्लेखनाचं कसं तरी जमवावं लागत होतं किंवा मग एकटाकी लिहूनच त्याचं काय ते करावं लागत होतं. छापून आणण्यातलं परावलंबनही जाणवत होतं.
मग एके दिवशी तडक कर्ज घेऊन संगणक घेतला! हा क्रांतीकारी निर्णय असावा! :)
घेतला खरा पण तो चालवायचा कसा माहित नव्हतं. मराठी फॉन्ट्स कसा मिळवायचा माहित नव्हतं. तो सर्वत्र दिसण्यासाठी युनिकोड पद्धतीचा असावा लागतो हे माहित नव्हतं. एवढंच काय माझा पहिला मेल आयडी मी एका जुजबी ओळखीच्याला बोलावून करवून घेतला. तो बिचारा माझा मित्र झाला आणि त्यानं आयडी तयार केला, तो कसा करायचा ते दाखवलं. मग झुंज सुरू झाली. आधी सीडॅकचं iLEAP मिळालं! झुंज पराकोटीला गेली. मग शिवाजी फॉन्ट एका भावानं शोधून दिला आणि टाईप करणं सुसह्य झालं.
माझ्या कविता लोकांसमोर यावात असं खूप मनापासून वाटत होतं. एकतर त्या अतिसंघर्षाच्या काळात झाल्या होत्या आणि त्या बर्‍या आहेत असं मला वाटत होतं, तसे अभिप्रायही इतरांकडून मिळाले होते. ते कसं करायचं?
मग नेटवर शोधताना सुषमा करंदीकर या नाशिकच्या ब्लॉगर बाईंचा पाचोळा हा कवितांना वाहिलेला ब्लॉग सापडला. ब्लॉगचं झालेलं हे पहिलं दर्शन. हे असं करता येतं तर! मग अभ्यास सुरू झाला. उलट उलट जात, शोधत बराहा हे सॉफ्टवेअर एकदाचं मिळालं आणि मग सुटलोच!
..मध्यंतरी कुणीतरी- आता कुणीतरी म्हणजे कुणी जाणकारच असणार म्हणा- ब्लॉगची क्रमवारी की काय ती लावली. त्यात त्याने म्हणे कविता, कथा इत्यादी म्हणजे- ललितलेखनाचे ब्लॉगच वर्ज्य ठरवले म्हणे! अशी क्रमवारी-ब्रिमवारी लावण्याचा अधिकार कोण कुणाला देतो? आणि तो अमुक वर्ज्य, तमुक त्यज्य असं कसं काय ठरवतो? असा प्रश्न पडला. विचार करता असं उत्तर सापडलं की ब्लॉग किंवा आंतरजाल हे असं माध्यम आहे की इथे ’सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे!’ ह्या उक्तीप्रमाणे काहीसं आहे. अर्थात मी ब्लॉग लिहितो म्हणजे काही चळवळ करतोय असं म्हणण्याचं धाडस मी अजिबात करणार नाही पण मी हेच लिहितो कविता, कथा, लेख, नाटक वगैरे. मग माझ्या ब्लॉगवर तेच दिसणार. दुसरं असं आहे की माणूस आला की व्यक्त करणं आलं. व्यक्तं करणं आलं की गोष्टं आलीच. बघा पटतंय का, पण प्रत्यक्ष संवाद, लेखन आणि इतर माध्यमातून कुणीतरी कसलीतरी गोष्टंच एकमेकाला सांगतो की! असो! निंदा अथवा वंदा आमचा आपला सुचेल ते लिहिण्याचा धंदा! अर्थातच ’अभ्यासोनि प्रकटावे!’ हे आम्ही विसरणार नाही!
ज्याचा त्याचा पिंड असतो. ज्याचा त्याचा वाचकवर्ग असतो. कुणी एकाच विषयावर लिहितं. तेच बरोबर असं सांगतं. माझ्यासारख्या अनेकांना माणसं, त्यांचे स्वभाव, मन, नाटक, चित्रपट असं आवडतं. माझ्या आत आणि माझ्या सभोवताली काय चाललंय याकडे बघायला आणि जमेल तसं व्यक्तं व्हायला आवडतं. मी ते करतो. विषयाचं अमुकच असं बंधन नाही. असो!
या प्रवासातला आणखी एक टप्पा म्हणजे ’अभिलेख’ ची स्टार माझ्या वाहिनीच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेत झालेली निवड! या निवडीनं मला ब्लॉगर मित्रमैत्रिणी दिल्या. त्यातल्या काहींनी त्याआधी ’अभिलेख’ वर येऊन माझा हुरूप वाढवला होताच. मग आंतरजालावरच्या विशेषांकांतून लिहिता आलं. देवकाकांनी ध्वनिमुद्रणाचं तंत्र शिकवलं... शिकण्याचा प्रवास चालू राहिला. हा प्रवास असाच चालू राहो! असं आज अगदी मनापासून वाटतं. सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक वाचकांनी ’अभिलेख’ ला भेट दिली. अभिप्राय देणार्‍यांचे आभार. असं लक्षात येतं की अभिप्राय न देताही अनेक वाचक इथे येत असतात. नेमानं वाचत असतात. त्या सर्वांचे, सर्वांचे मनापासून आभार! सरतेशेवटी मला हवं ते, हवं तेव्हा, व्यक्तं करू देण्याचं स्वातंत्र्य आणि त्याच बरोबरीनं येणार्‍या जबाबदारीचं भानही देणार्‍या या माध्यमाचे शतश: आभार! धन्यवाद!


Tuesday, August 23, 2011

मुंबई अ, ब ते एफएम गोल्ड, रेनबो.. (२)

भाग १ इथे वाचा!
कालाय तस्मै नम: हे सगळ्यात खरं! नाही का? पर्यायच नव्हता तेव्हा आकाशवाणीला! सगळं जग घरात यायचं.ते घरात पडल्यापडल्या, काम करता करता, ट्रान्झिस्टर हे रेडिओचं लहान भावंड आल्यावर जमेल तिथे नेऊन, ऐकता यायचं.सुटसुटीत, सोपी आणि स्वस्तंच म्हणायला हवी अशी दर्जेदार करमणूक होती ही.आकाशवाणी आपलं कर्तव्य अखंडपणे करत आलेली आहे.माझा मुंबईतल्या केंद्राशी संबंध आला.पण महाराष्ट्रात इतरत्र पुणे, सांगली, नागपूर, जळगाव इत्यादी ठिकाणीही ती कार्यरत राहिली आहे.
दूरदर्शन हे माध्यमच एवढं भव्यदिव्य होतं, व्यापून टाकणारं होतं की जनता आकाशवाणीपासून लांब गेली.नवा पर्याय मिळाला होता आणि तो दिपवून टाकणारा होता.सामान्यत: माणसाला ’बघणं’ या गोष्टीत जास्त रमायला होतं.सगळं विसरायला होतं.क्रिकेट सामने, चित्रपट, रामायण, महाभारत अशा महामालिका काय नव्हतं इथे?
मग वर्तमानपत्रातून आकाशवाणीचं काय होणार? असं अधूनमधून छापून आलं की आकाशवाणीची आठवण होत होती.
माणसाच्या आयुष्याला गती आलेली होती.शहरातलं दैनंदिन आयुष्य आणखी आणखी जिकीरीचं होत होतं.दमून भागून घरी आल्यावर ’इडियट बॉक्स’ हा मोठा आसरा होता.दूरदर्शन रंगीत झालं.दूरदर्शनच्या वाहिन्यांची वाढता वाढता वाढे अशी अक्राळविक्राळ अवस्था झाली.
आता कसली आकाशवाणी आणि काय!...
...एका भल्या दिवशी मग फ्रिक्वन्सी मोड्युलेशन हे तंत्रज्ञान आलं.मोबाईल आले.त्यांच्यात आणखी आणखी सुधारणा चुटकीसारख्या वाटाव्यात अशा पद्धतीने घडून आल्या.एफएम रेडिओ आला.तुमच्या सेलफोनवरच एफएम येऊन ठाण मांडून बसलं.
माणसाची करमणुकीची गरज वाढत जाते.अनिश्चितता, असुरक्षितता त्याला सतत कुठल्या न कुठल्या आधाराशी बांधून ठेवायला लागतात.करमणुकीची साधनं, धार्मिक उत्सव, चित्रपट, पार्ट्या सगळंच वाढता वाढता वाढत जातं.रिकामा वेळ मिळाला की माणूस अस्वस्थ होतो, विशेषत: शहरातला.त्याला सतत व्यवधान लागतं.सेलफोनवर आलेल्या एफएमनं ’प्रवास’ ही नोकरीधंद्यासाठी अपरिहार्य असलेली, लांबलचक आणि त्रासदायक करून ठेवली गेलेली गोष्टं चांगलीच सुसह्य केली हे मान्य करायलाच पाहिजे.जिकडे तिकडे कानात ईअरपीस खोचलेली, वेड्यासारखे वाटावेत असे हातवारे करत संगीत ऐकणारी आणि मनोरूग्णासारखे वाटावेत असे हावभाव करत तासन्तास एकमेकाशी चॅट करणारी जमात तयार झाली. ’वॉकमन’ या आधीच्या भावंडाचं हे नवं रूप होतं.सगळी तरूण पिढी याला बळी पडली आहे असं म्हणत हळूहळू इतर सगळेच याला बळी पडू लागले आहेत.काय खरं ना?
’मोबाईलवरचं एफएम मोठ्या आवाजात लाऊन ठेऊन सहप्रवाशांना त्रास देऊ नका!’ अशा उद्घोषणा रेल्वेस्थानकांवरून आता होऊ लागल्या आहेत.एफएम धारकांना प्रवासात भल्या पहाटेसुद्धा मोठ्याने, ईअरपीस न वापरता गाणी ऐकण्याची अनावर हुक्की येते आणि मग भांडणाला तोंड फुटतं.
या सगळ्यातून जात असताना माझीही एफएमची ओळख झाली.एफएमचेही ढीगभर चॅनेल्स आहेत.त्यातले बहुतेक तरूणाईसाठीच आहेत.ज्यात ते रेडिओ जॉकी आवाजाच्या वारूवर मांड ठोकून तुमच्याशी काय वाट्टेल ते तासन्तास बोलू शकतात.रेडिओ जॉकी होण्यासाठी अगदी वरच्या पट्टीत (बेंबीच्या देठापासून, कोकलून, कानठळ्या बसतील असं; हे योग्य मराठी शब्दं!) बोलणं ही प्राथमिक अट असावी.हे जॉकीज् तुम्हाला फोन, एसेमेस करायला सांगतात.बक्षिसं देतात.ही एक संस्कृती म्हणावी इतका त्याचा पसारा झालाय.प्रदर्शित झालेल्या नव्या चित्रपटाबद्दलचं रेडिओजॉकीचं मत निर्माते जाहिरातीसाठी वापरताहेत.जोडीला तुम्हाला क्रिकेट सामन्याच्या स्कोअर सांगतात.तुमच्या दिलातली भडास तेच ओकून टाकतात आणि तुम्हाला आपलेसे करतात.शहरातल्या ट्रॅफिकची अमुक क्षणाला काय परिस्थिती आहे (ती नेहेमीच वाईट असते पण ती किती वाईट आहे हे क्षणाक्षणाला कळलं तर! तर काय वाईट?) ही महत्वाची गोष्टंही सांगतात.ब्रेकिंग न्यूज सांगितल्या जातात.रेडिओ जॉकी दादा आणि ताई तुमच्यातलेच एक होऊन गेले आहेत! तुम्हाला त्याना फॉलो करण्याशिवाय गत्त्यंतरच उरत नाही.उरतं का सांगा? एकूण रेडिओ जॉकी बंधूभगिनींचा दणदणाट आणि संगीताचा ढणढणाट याला पर्याय नाही.
मी आपला ’आपली वाणी आपला बाणा’ करत मर्‍हाटी एफएमकडे वळलो आणि पुन्हा ’आकाशवाणी’ ला सामोरा गेलो! वर्तुळ असं पूर्ण होतं तर!
आकाशवाणीच्या एफएम रेनबो आणि एफ एम गोल्ड अशा दोन वाहिन्यांवरून मराठी गाणी आणि मराठी प्रायोजित कार्यक्रम सादर होतात.
याशिवाय आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी आणि संवादिता वाहिनी अशा दोन वाहिन्या चालू आहेत.ती जुन्या मुंबई ब आणि मुंबई अ ची रूपं आहेत.पूर्वी इतक्या जोमानेच ती चालू आहेत.अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ आहे, गंमत जंमत आहे, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आहेत, पर्यावरणावर कार्यक्रम आहे, युवोवाणी आहे.संवादिता वाहिनीवर हिंदी नाटकं सादर होतात.चित्रपटसंगीत तर प्रसारित होतंच.विविध भारतीही त्याच जोमाने चालू आहे.अस्मिता वाहिनीवर कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या ’महानायक’चं अभिवाचन सादर झालं होतं.ते आणि इतर अशाच साहित्यांची नाट्यपूर्ण वाचनं नुसती सादरंच होत नाहीत तर ती लोकाग्रहास्तव पुन्हा पुन्हा प्रक्षेपित होत असतात.सर्वसाधारणपणे अभिजनांसाठी (क्लासेस) असं यांचं स्वरूप कायम आहे!
आकाशवाणीचे रेनबो आणि गोल्ड हे एफएम चॅनेल्स महाराष्ट्रभर सर्वत्र ऐकू येतात.त्यांचं स्वरूप सर्वसाधारणपणे जनतेसाठी (मासेस) असल्याचं दिसतं.
सगळीच माध्यमं आजकाल जास्तीत जास्तं जनताभिमुख झालेली दिसतात.यात खरोखर जनताभिमुख आणि जनतेला आवडतं म्हणून काहीही फंडे काढून जनतेला त्या फंड्यांच्या मागे धावायला लावणं असे दोन्ही प्रवाह आढळत असतात.
एफएम रेनबोवर पहाटे मंगल प्रभातच्या धरतीवर भक्तिसंगीत, मग भावगीतं, सिनेसंगीत असं सगळं आठ वाजेपर्यंत.आठ वाजता काटा अचानक इंग्रजी संगीताकडे वळतो आणि मग अकरा, एक, दोन वाजता तो पुन्हा हिंदी आणि मुख्यत: मराठी या भारतीय भाषांकडे येतो.
एफएम गोल्ड सकाळी सव्वासहाला सुरू होतो हिंदी भक्तिसंगीताने.त्यानंतर हिंदी चित्रपटसंगीत, बातम्यांचा भला मोठा कार्यक्रम.मग साडेआठ वाजल्यापासून खास कार्यालयांकडे प्रस्थान करणारय़ांसाठी दहा वाजेपर्यंत हिदी चित्रपट संगीत सादर होतं.दोन कार्यक्रमांमधे.या कार्यक्रमांच्या स्वरूपात वैविध्य आहे.फोन संपर्क आहे, एसेमेसचा मजा आहे.मग बातम्या.दहा वाजता ’मराठी’ गोल्डचा कब्जा घेतं.दहा वाजून दहा मिनिटं, अकरा, बारा, एक, दोन वाजता असे मराठी आणि मग हिंदी, काही प्रमाणात इंग्रजी असे कार्यक्रम ’बारीबारीसे’ सादर होत असतात.१० वाजताच्या मराठी गप्पाटप्पांच्या कार्यक्रमात करिअर या विषयावर चालू असलेल्या मान्यवर तज्ज्ञाच्या मुलाखती दखल घेण्यासारख्या आहेत.उद्योजकता, चित्रपट, सण इत्यादी विषयांवर मान्यवरांच्या मुलाखती इथे सादर होतात.त्याशिवाय दोन गाण्यांच्यामधे निवेदक एखाद्या विषयावर किंवा वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर; गंभीर, खुसखुशीत भाष्य करत असतात, माहिती देत असतात.
एफएमवरच्या निवेदकाला त्याच्या बोलण्यातूनही श्रोत्यांचं मनोरंजन करणं अभिप्रेत असतं.एरवी ऑल इंडिया रेडिओच्या नेहेमीच्या चॅनल्सवरचे निवेदक निवेदन करत असताना कायम धीरगंभीर असत आणि असतात.काही निवेदक तर कृत्रिम कमावलेल्या शैलीत बोलणारे असतात.एफएमवर निवेदकानं मोकळं ढाकळं असणं अपेक्षित आहे.मोकळं ढाकळं म्हणजे उंडारणं का, हा ज्या त्या निवेदकाच्या आणि श्रोत्याच्या आवडीनिवडीचा मामला.
एफएम हे एक प्रकारे त्या त्या भाषेचं प्रतिनिधित्व करत असतं.मगाशी म्हटल्याप्रमाणे एफएम हा त्या त्या संस्कृतीचा एक वर्तमानातला पडसाद आहे.बोलीभाषेत बदल होत असतात.प्रमाणभाषेत बोलायचं की वर्तमान बोलीभाषेत हा मुद्दा इतर एफएम चॅनल्सनी ढणढणाटी स्वरूपात सोडवून टाकलाय.आकाशवाणी एफएमनं मोकळंढाकळं होत जुनं स्वरूपच कायम ठेवल्याचं दिसतं.
प्रत्येक निवेदक आपापल्या व्यक्तिमत्वासकट इअरपीसमधून प्रथम आपल्या कानात आणि मग जमेल तसं आपल्या मनात डोकावत असतो, प्रवेश करत असतो.आकाशवाणी मराठी एफएम चॅनल्स- गोल्ड आणि रेनबोवर अशी वेगवेगळी व्यक्तिमत्वं वास करून आहेत.ती आपलं पूरेपूर रंजन आणि उदबोधन करत असतात.
एफएम तंत्रज्ञानानं आकाशवाणीला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणलंय! तुमचं मत काय आहे?
माझे आणि आकाशवाणीचे बंध: जुन्या नोंदींचे दुवे, पुढीलप्रमाणे:
आकाशवाणीची ओळख
आकाशवाणीवरचं पहिलं ध्वनिमुद्रण
श्रुतिकांसाठी आवाजचाचणी
अस्मिता वाहिनीवर ’माझ्या आजोळच्या गोष्टी’
अस्मिता वाहिनीवर ’माझ्या कविता’

Saturday, August 20, 2011

मुंबई अ, ब ते एफएम गोल्ड, रेनबो.. (१)

एखाद्या इतिहासजमा झालेल्या गोष्टीला पुन्हा झळाळी येते ती आधुनिक तंत्रज्ञानामुळे! आणि याचं ठळक उदाहरण म्हणजे आकाशवाणी अर्थात रेडिओ! पुन्हा आलेल्या झळाळीचा दर्जा कसा, काय वगैरे हे ज्याचं त्यानं ठरवायचं.एखादी लयाला गेलेली गोष्ट नवं रूप घेऊन येते.तिचं आधीचं आणि आत्ताचं रूप यांची तुलना करू नये हेच खरं!
रेडिओ या वस्तूची ओळख लहानपणी झालेली आठवते.फिलिप्सचा छोटा काळी कॅबिनेट असलेला आणि चेहेरा गोरा पान असलेला रेडिओ घरी आला.चेहेराच.दोन बाजूला डोळे असल्यासारखी दोन गोल बटणं.एक स्टेशन्स शोधून लावण्याचं आणि दुसरं आवाज कमी जास्त करण्याचं.गोल निमपांढरय़ा बटणांच्या वरचा पृष्ठभाग काळा, म्हणून डोळे.त्या दोन बटणांच्या मधोमध लहरींची बटणं.लघुलहरी SW, मध्यम लहरी MW इत्यादी.त्यातलं मध्यमलहरींचं बटण दाबलेलंच असायचं.ही बटणं दातांसारखी दिसायची.मधला एक दात पडलेला.हा चेहेरा जेव्हा पहिल्यांदा बोलताना ऐकला तेव्हा ज्याम मजा आली.चाळीतले आजुबाजूचेही आलेले आठवतात.रेडिओ बघायला.छोट्याश्या कौलारू चाळीतल्या एका खोलीत.उभ्या जाडजूड माणसाचं रंगीत चित्रं असलेल्या फिलिप्स कंपनीच्या खोक्यावर ठेऊन त्या तंत्रज्ञानं रेडिओ कसा चालवायचा हे दाखवलं होतं.
हा रेडिओ घेतला असावा वडिलांनी मुख्यत: नाट्यसंगीत आणि त्याहीपेक्षा बातम्या ऐकण्यासाठी.आज अजूनही दूरदर्शनवरच्या सातच्या बातम्याच ते ऐकतात.रेडिओवरची जुनी सवय असल्यामुळे.जणू त्या व्यतिरिक्त वेळच्या बातम्या खरय़ा नसतातच. (आजच्या न्यूजचॅनल्सच्या युगात त्यांचं खरं असावं असं पदोपदी जाणवतं खरं!) मग बातम्या ऐकताना त्या छोट्याश्या घरात आवाज मोठा करून हाताचा पंजा उगारून (म्हणजे गप्पं बसा अशी खूण करून) मुलांना, बायकोला गप्पं बसण्याची शिक्षा. (आता ऐकू कमी येतं म्हणून मागील पानावरून पुढे चालूच!) मुंबई ब वरचे आणि दिल्ली केंद्रावरचे शरद चव्हाण, दत्ता कुलकर्णी, सदाशिव दीक्षित, कुसुम रानडे इत्यादी म्हणजे हॉट फेवरिट! जणू हे स्वत:च वाचताएत त्या बातम्या अश्या कौतुकानं हसणं.नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत ह्या संदर्भात ते कानसेनच पण आवाज मोठा करून ऐकण्याची वाईट खोड. (आता ती मुलीला लागलीए.एमटिव्ही रॉक्स का फॉक्स दणदणीत असतानाही ती आवाज आणखी मोठा करतेच करते.आम्ही आमच्या वयात विविधभारती आणि रेडिओ सिलोनचा आवाज मोठा करून आईला वात आणत असू.चालायचंच, नाही?) नाट्यसंगीत ऐकताना वरचे खालचे दात दाबून धरायचे आणि त्यातून निघणारय़ा आवाजात गुणगुणणं.आजही ते चालूच.खरय़ा दाताच्या जागी कवळी आल्यामुळे आवाजाच्या टिंबरमधे फक्त फरक.छोटा गंधर्व (चाल्द मांयझा घा घासरा : चांद माझा हा हासरा), भालचंद्र पेंढारकर (आयी तुझी आठवड येय्यत्ये: आई तुझी आठवण येते, शिवशक्तीचा अटीतटीचा ख्येळ चालला भुबदपटी त्रिगुडाच्ये ह्ये तीदच फासे दिशादिशातूल लिदादती!, शक्कर शक्कर गऊरी शक्कर!), उदयराज गोडबोले (द्येऽऽह द्येवाच्येऽऽ मऽलऽदीऽऽरऽऽ) इत्यादी.हे सांगताना ह्या दिग्गजांची टिंगल अजिबात उडवायची नाही पण सकृतदर्शनी कानावर येणारे त्यांचे स्वर ऐकून आम्हाला तोंड लपवायला लागायचं.मग पुढे कुमार गंधर्वांच्या ’कधी धुसफुसलोऽ’लाही हुकमी हसू फुटायचं.हसू फुटणं हे काही नवलाचं नव्हतं कधीच.. इथे वडिलांचं रेडिओ ऐकणं जवळ जवळ संपायचं.
वडिलांचं रेडिओ ऐकणं संपलेलं असलं तर आणि तरच आईचं रेडिओ ऐकणं सुरू व्हायचं! (आमचं रेडिओ ऐकणं अजून सुरू व्हायचं होतं) आई मंगलप्रभात लावायची आणि आमच्या शाळांची तयारी करण्यात मग्नं असायची.ते लागलं की तिला आधी कोपरय़ावरचं कार्डावरचं दूध घेऊन यायला लागायचं.मग एकसोएक मराठी भक्तिगीतं: पंढरीनाथा झडकरी आता.., बोऽऽलाऽऽ बोला बोऽऽलाऽऽ अमृत बोलाऽऽ.., रघुपती राघव गजरी गजरी.., वारियाने कुंडलं हाऽऽलेऽ.., रात्रं काळी बिलवर काळी गळा मुखे.. (पुढची चाल आठवते.शब्दं सांगाल का प्लीऽऽजऽऽ), कुमुदिनी काय जाणे, परिमळ.. काय गाणी होती राव! चुकलो! आहेत राव! अजरामर गाणी! प्रचंड ठेवा आहे हा! सुवर्णयुग सुवर्णयुग म्हणतात ते हेच! अगदी ते प्रचंड ओलावा आणि मार्दव असलेले (!) आर एन् पराडकरही आठवतात.धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची.झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची! पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशीऽ.. सगळी गाणी गायले ती फक्तं दत्तगुरूंची! हिरे, माणकं, सोनं, नाणी- नाही हे भक्तिगीत नव्हे कुठलं तर- माणिक वर्मा, लता, आशा, उषा, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, भीमसेन जोशी, रतिलाल भावसार हे आणि असे इतर अनेक.. किती नावं घ्यायची? हे केवळ तेव्हा इतकं छान होतं आणि आत्ता तसं नाही असं नाही! ते होतंच तसं! कालानुरूप असेल, परिस्थितीनुरूप असेल.. रत्नं होती एकेक! गायक, गायिका आणि संगीतकार.. सुमन कल्याणपूरांची दशरथ पुजारींनी केलेली गाणी काय अप्रतिम आहेत! किती बोलावं आणि किती सांगावं.. माझ्यापेक्षा तुमच्यातले इतर अनेक जाणकार जास्तं चांगलं सांगतील! मी आपली एक एक कळ चालू करून देतो झालं!
मग भावसरगम! अरूण दाते, सुधीर फडके, हृदयनाथ.. यशवंत देव, श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी.. मंगेश पाडगावकर, शांता शेळके.. या फुलांच्या गंधकोषी.., भेट तुझी माझी स्मरते.., ही वाट दूर जाते.., तोच चंद्रमा नभात.., अशी पाखरे येती.., वेगवेगळी फुले उमलली.. विसर प्रीत विसर गीत.. किती किती सांगू- नव्हे हे ही भावगीत नव्हे! माझी सद्य मनस्थिती! तुम्हाला हसू येईल पण ’सामना’ मधल्या मास्तर सारखं “सांगा राव सांगाऽ सांगाऽ” असं डॉ.लागूंच्या त्या विशिष्ट शैलीत मला तुम्हाला सांगावसं वाटतयं! “कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय?” मुंबई ब वरच्या त्या सुवर्णयुगाखाली दडलंय काय?
नाट्यसंगीतातला जितेंद्र अभिषेकींनी सुरू केलेला नवा अध्याय आठवतो.रामदास कामत, प्रभाकर कारेकर, प्रकाश घांग्रेकर, शरद जांभेकर, विश्वनाथ बागूल, बकुल पंडित, फैयाज, आशालता वाबगावकर आणि द ग्रेट पं.वसंतराव देशपांडे. ’बगळ्यांची माळ फुले’ आणि “कुणी जाल का? सांगाल का? ”कुमारांचं ’अजुनी रूसूनी आहे’.. हेऽऽ हेऽऽ हेऽऽ शामसुंदराऽ राजसाऽ मनमोहनाऽ विनवूनीऽऽऽ सांगते तुज.. शूरा मी वंदिले.. चांदणे शिंपित जाशी.. सांगा! सांगा! लोकहो सांगा! लवकर सांगा नाहीतर लताचं हे राहिलं आणि सुमनचं ते राहिलं म्हणाल! कृष्णा कल्ले आणि डॉ.अपर्णा मयेकरांना घेतलंच नाही म्हणाल! म्हणा! जरूर म्हणा! आहेच ते सुवर्णयुग!
मग वनिता मंडळ, आपलं माजघर.. दर रविवारी मुलांसाठी गंमत जंमत, बालदरबार.. शाळा नववीपर्यंत सकाळची आणि दहावीला नेमकी दुपारची.रेडिओनं सांगितलेली वेळ म्हणजे प्रमाणवेळ! मग बाजारभावही ऐकायचो.. पाचोरा भूमरी अमुक अमुक क्विंटल असे.. तांदळाच्या, कापसाच्या, भुईमूग या सगळ्यांचे बरेचसे तालबद्ध उच्चार असणारे बाजारभाव आपोआप तोंडात बसायचे.सकाळी अकरा वाजता कामगारसभेतली गाणी आणि शनिवारी लोकसंगीताची मेजवानी! शाहीर साबळे, शाहीर निवृत्ती पवार, शाहीर विठ्ठल उमप, श्रावण यशवंते (यो यो यो पाव्हना, सकुचा म्हेवना, तुज्याकडं बगून हस्तोय गं, कायतरी घोटाळा दिस्तोय गं!) बालकराम वरळीकर.. कामगारांची ज्याम वट होती आकाशवाणी मुंबई ब वर.संध्याकाळी साडेसहा ते सातही असायचा.(आज शरद राव कामगारांची वट सामान्यांना त्रास दे देऊन वाढवताएत.जॉर्ज फर्नांडिसरूपी ’चक्का ज्याम’ यांचे ते पट्टशिष्य!) संध्याकाळच्या कामगारसभेत ’सहज सुचलं म्हणून’ ही उद्बोधन करणारी श्रुतिकामालिका, किर्तनं, लोकसंगीत.. दुपारी वनिता मंडळात लीलावती भागवत.. रात्री कृतानेक नमस्कार हा पत्रोत्तरांचा कार्यक्रमही मनोरंजक कार्यक्रमासारखा कान देऊन ऐकला जायचा.प्रपंच, पुन्हा प्रपंच आणि नंतर आंबटगोड.. आकाशवाणीनं वैविध्य दिलं, आपला दर्जा सतत टिकवून ठेवला हे मान्य करायलाच पाहिजे.सगळ्यावर कळस म्हणजे आपली आवड, नभोनाट्यांचां राष्ट्रीय कार्यक्रम, शास्त्रीय संगीताची राष्ट्रीय संगीत सभा.. दिग्गज गायक आकाशवाणीवर गायचं म्हणजे आपला बहुमान समजायचे.नुसतं कंठसंगीत नव्हे, वाद्यसंगीतही.. सगळ्या कार्यक्रमांच्या ओळखधून (सिग्नेचर ट्यून्स?) आजही लक्षात आहेत.आपली आवडची.. युवोवाणीची.. कामगारसभेची.. वनिता मंडळाची.. हे गंमत! जय गंमत! या या या झिन च्याक झिन! झिन च्याक् झिन च्याक् झिन!- आठवतंय का गंमंत जंमत कार्यकर्माचं टायटल सॉंग? साहित्यसौरभ, भाषणं.. एक सद्य घडामोडींवर आधारित स्पॉटलाईट का अश्याच काही नावाचा कार्यक्रम होता.निवेदक कोर्टातल्या वकीलासारखा तुमच्यावर चार्ज करायचा.आठवतंय?
दहावीला असताना म्हणजे शिंग फुटतात त्या वयात आम्हाला विविध भारतीचा शोध लागला.मग शाळेत जायची प्रमाणवेळ कळण्याच्या बहाण्याने हिंदी गाण्यांचा महामूर महापूर.. अभ्यासातलं लक्ष उडालंय म्हणून शिव्या.. या आधी आणि या काळातच रेडिओ सिलोनवरचा हिंदी गाणी सुरू व्हायच्या आधीची ऐकू येणारी ’नागिन’ ची ती सुप्रसिद्धं बीन! रेडिओ सिलोनचा आवाज हवेत हेलकावे खात यायचा.ती बीन तशीच आठवते व्हॉल्यूम कमी जास्त होत लाटालाटांनी कानावर येणारी! ’बिनाका गीत माला’ म्हणजे काय? असं विचारणारा निर्बुद्धं! मूर्खं! स्टुलावर चढून वर लाकडी शेल्फवर ठेवलेल्या रेडिओला कान लाऊन जर पहिली बादान (पायदान?) दुसरी बादान.. अऊर सुननेवालोंऽऽ हां हां हांऽऽ हां! आखरी पायदानपर आज है- कौनसा गीत? हं हं हं हं.. द ग्रेट ’अमीन सायानी’ ला पर्याय होता? हो मनोहर महाजनचा होता काही काळ.पण अमीन सायानी तो अमीन सायानी! आणि सिलोन- नंतर श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनका विदेश व्यापार विभागलाही नव्हता! इकडे विविधभारती आणि मधेच कुठेतरी ऑल इंडिया रेडिओकी उर्दू सर्विस होती, मुंबई अ वर- आठवतंय का?- तरीही!!! ते काय गौडबंगाल होतं हो? विविधभारतीवरचं गाणं संपलं रे संपलं की बॅंडचा लाल काटा फिरवून उर्दू सर्विसवर आणायचा.तिथे तेच गाणं लागलेलं असायचं! असं कुणी सांगितलं म्हणून एकदोनदा प्रयत्नपूर्वक ऐकल्याचं आठवतं.खरंच होतं का हो असं? की आम्हालाच नेहेमीप्रमाणे कुणी कुणी ×× बनवलं! नेहेमीप्रमाणे!
इतक्या तन्मयतेनं अभ्यास केलात तर काहीतरी पदरात तरी पडेल अश्या शिव्या खात आम्ही आकाशवाणीवर कब्जा करू लागलो होतो.एका बाजूला फौजी भाईयों के लिए ऐकण्यासाठी कामगारसभेवर अन्याय करू लागलो.हवामहल ऐकू लागलो.बेला के फूलपर्यंत मजल गेली की शिव्यांमधला जोर वाढायचा मग आपल्या विद्यार्थीदशेची कीव यायची.दुसरीकडे रेडिओवरच्या प्रायोजित कार्यक्रमांचं युग सुरू झालं. ’कोहिनूर मिल’ ही प्रतिथयश कंपनी आहे म्हणून वडिलांनी पहिल्यांदा ’कोहिनूरऽऽ गीऽऽत..गुंजारऽऽ’ लावला होता.विनोद शर्माचा तो अनुनासिक खर्जातला विशिष्टं आवाज! ’दम मारोऽऽ दम’ पहिल्यांदा इथे ऐकलं.त्यानंतर की आधी? ’बिन्नी डबल ऑर क्विट’ असायचं.फारूख शेख तेव्हा अभिनेता झालेला नव्हता.त्याचा आवाज आणि बोलण्याची पद्धत ऐकून प्रचंड भारावल्याचं आठवतं.दर्जा म्हणजे काय, हे आपोआप अंगात भिनत जाणारा एकंदरीत तो काळच असावा.दर्जा शोधावा लागत नव्हता. ’बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट’ अखंड चालत आलेलाच आहे. ’क्रिकेट वुईथ विजय मर्चंट’ मधे त्याचं शेवटचं ’अरूवा’ ऐकण्यासाठी कायम शेवटपर्यंत ऐकायचं.केवळ अरूवाच नव्हे पण त्याच्या या कार्यक्रमातून होणारय़ा कॉमेंट्सला चांगलंच महत्वं होतं.ठाकरसी ग्रुप ऑफ मिल्स ही त्याची घरचीच कंपनी.पण त्याचा उपयोग इतका चांगला होत होता.तो मधेच कार्यक्रम बंद करायचा मग तो चालू रहाण्यासाठी क्रिडारसिक आर्जवं करायचे.ती मागणी मग मान्य व्हायची.
हिंदी चित्रपटांचे प्रायोजित कार्यक्रम सुरू झाले आणि आमच्या त्या वेळच्या भाषेत ’थैया’ च झाला! मला देव आनंदच्या ’वॉरंट’, मनोजकुमारच्या ’संन्यासी’ चे प्रायोजित कार्यक्रम आठवतात.रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ’शोले’ नावाच्या जीपी सिप्पी अऊर रमेश सिप्पीका अजिमुश्शान शाहाकार भेटायचा! त्याची ख्याती काय सांगू? तिच नेमकी अभ्यासाची वेळ असायची.पत्र्याच्या स्कूलबॅग्ज असायच्या.आपटून, आपापसात युद्ध खेळून पोचे आणलेल्या आणि उघडता, बंद करताना करकरणारय़ा.सगळे आवाज बंद करून, पालकांची झोप मोडू नये आणि शोले सुटू नये म्हणून ज्याम काळजी घ्यावी लागायची.अफलातून डायलॉग्ज आणि केकवर चेरी म्हणजे हं हं हं हं- हो! तोच तो! अमीऽऽन सायाऽऽनीऽऽ..
विविधभारतीवरच्या जाहिराती म्हणजे स्वतंत्र विषय आहे! टींग डॉंग्! आणि टीऽडीऽटीडीऽ टीडीऽ टॅंग! असं दोन जाहिरातींमधलं संगीत! सॉरीडॉन, हमाम, सोना सोना नया रेक्सोना, आई गं! वैतागले या केसांना! (करूणा देवांची डबल आवाजातली जाहिरात) अमीन सायानी परमेश्वरासारखा सर्वत्र व्यापून उरत असेच.चल संन्यासीऽऽ हा गाण्याच्या मुखडा कट व्हायचा आणी अमीन सायानी ’किधर?” अश्या त्याच्या त्या कमावलेल्या आवाजात विचारायचा.मग मंदिरमेऽऽ इत्यादी.जोडीला ते अजिमुश्शान शाहाकार वगैरे असायचंच! प्रॉडक्शन्सची नावंसुद्धा त्याच्यामुळे कळायची.जीपी सिप्पी-रमेश सिप्पी, मुशीर रियाज पॉडक्शन, सुलतान एहमद का धरमकांटां.. मग कारण नसताना खोजाती सूरमा पण आठवतो त्याच्या आवाजातला.अनेक वाकळं वळणं, हुंकार, हसणं देऊन कमावलेलं ग्लॅमर असलेला आवाज.जरा जास्तंच ग्लॅमरस होतंय असं वाटूनही मंत्रमुग्ध करणारा!
चांगल चाललं होतं हो! पण मग सगळं हळूहळू विरत गेलं.. नाट्यमय श्रुतिकेतलं शेवटचं संगीत विरत जाऊन एक मोठ्ठा पॉज आला.. रेडिओचं डोळे फिरवून टाकणारं भावंडं दूरदर्शन आलं होतं.. टेलिविजन.. तरीही क्रिकेटमॅच बघताना लोक टीव्हीचा व्हॉल्यूम कमी करून रेडिओवरचं धावतं वर्णन लावत होते..
कोपरय़ात पडलेल्या आकाशवाणीला कुण्णीकुण्णी विचारत नव्हतं, नसावं.. अजूनही आठवण झाली की भावनाविवश होणारे आमच्यासारखे अनेक श्रोतेही दूरदर्शनच्या महापूरात वहात गेले, बहकत गेले..
कर्तबगार कुटुंबप्रमुख वृद्धं झाल्यावर वळचणीला खोचला जावा तसं काहीसं..

Tuesday, April 5, 2011

आवाजचाचणी…

वेळ मिळेल तेव्हा ’माझं काय चुकलं?’ नाटकातला, मी आवाजचाचणीसाठी निवडलेला संवाद हातात घेऊन म्हणून बघत होतो.तो पाठ म्हणायचा नव्हता पण सतत सराव केल्याने त्या संवादातला अर्क जेवढा जमेल तेवढा जाणिवेत आणि मग नेणिवेत मुरावा असा प्रयत्न होता.केवळ आवाजातून नाटकातल्या पात्राच्या भावना पोचवणं सोपं नाही.नवोदिताला तर नाहीच नाही पण नेहेमीप्रमाणे प्रयत्नाअंती जे पाहिजे ते शक्य होतं ही खूणगाठ मनाशी बांधून होतो.हातातला संवाद नाटकातल्या नायकाचा आणि त्याच्या बायकोचा.यात नायक आपण आत्महत्या करणार, ती अशी अशी करणार असं तिच्याजवळ जाहीर करतो.
आकाशवाणीवरच्या नाट्यविभागाच्या आवाजचाचणीचा दिवस उजाडला.मी जवळ जवळ टेन्शनमूर्ती होऊन आकाशवाणी केंद्रावर पोहोचलो.नाट्यविभागात गेलो.त्यावेळी नाट्यविभागप्रमुख होते श्री चंद्रकांत बर्वे.नवोदिताला बोलता बोलता सहज रिलॅक्स करणारे.त्यांनी मला ध्वनिमुद्रण कक्षात नेलं.तिथं पोचता पोचता माझ्या कानावर एक अतिपरिचित पण तितकाच दैवी स्वर कानावर पडला.मी त्या दिशेने बघितलं आणि जागच्या जागेवरच उभा राहिलो.त्या श्रीमती करूणा देव होत्या.पळून जावसं वाटलं.या बाई माझी आवाजचाचणी चालू असताना इथे असणार? त्यापेक्षा… पण आतून तयार झालेल्या निश्चयाने तसं करू दिलं नाही.
माझ्याबरोबर आवाजचाचणीसाठी इतर अनेक उमेदवार होतेच.आत काय चाललंय हे केवळ उमेदवार कक्षाचं दार उघडून आत जाण्या किंवा बाहेर येण्याच्या अवधीतच दिसत, समजत, कानी पडत होतं.त्यात ’तो’ दैवी स्वर प्रत्येकवेळी साथ करत होताच.एकाबाजूने सुखावणारा आणि दुसर्‍या बाजूने तो आपल्या चाचणीच्या वेळी तिथेच असणार या वास्तवाने अंगावर काटे आणणारा.
आवाजचाचणीची माझी पाळी आली.मी आत गेलो.चंद्रकांत बर्वेंनी स्वागत केलं.माझी आणि करूणा देव या दैवी आवाजाची ओळख करून दिली.इथपर्यंत मी लटपटत होतो आणि बर्वेसरांच्या पुढच्या वाक्याने कोसळायचाच बाकी राहिलो. “तुमच्या बरोबरचं स्त्री पात्राचं भाषण देव बाई वाचणार आहेत” बर्वेसरांनी त्यांच्या समंजस आवाजात अगदी सौम्यपणे सांगितलं.इथे माझी पाचावर धारण बसायला सुरवात झाली.
त्याआधी लहानपणापासून त्यावेळी निलम प्रभू आणि आता करूणा देव म्हणून या आवाजाला जीवाचा कान करून ऐकलं होतं.लहानपणी दूरदर्शनचा संचार झालेला नव्हताच.रात्री दिवे विझवून बिछान्यावर पडलं की आई आकाशवाणीवरच्या श्रुतिका लावायची.तिला आणि त्यावेळी सगळ्याच प्रौढांना ते वेडच होतं.त्यात राष्ट्रीय नभोनाट्याचे कार्यक्रम लागत.वेगवेगळ्या केंद्रांवरची नभोनाट्यांची रूपांतरं सादर केली जात.ती तासभर अवधीची असत.
अशा कित्येक नाटकात नायिका म्हणून निलम प्रभू आणि नायक म्हणून श्री बाळ कुरतडकर यांना ऐकणं म्हणजे पर्वणी होती.त्यावेळचे ते स्टार्स होते.
असा एक तारा आता माझ्याबरोबर संवाद वाचणार होता.करूण देव बाईंनी माझ्याकडचं संवादाचं पान घेतलं.चाळलं, म्हणाल्या, “आहो हे काय? यात माझंच भाषण जास्त आहे की!” त्यांचा अप्रतिम आवाज आता मला धडकी भरवायला लागला.मी कसंबसं “नाही-तसं नाही-पुढे” असं सांगायचा प्रयत्न करत होतो.तोंडातून आवाज फुटत नव्हता.इतक्यात दैवी आवाजच शांत, समंजस स्वरात म्हणाला, “नाही हो! आहे की तुमचं पुढे! चला! करूया सुरवात? तालीम करायची की टेक करायचं?” माझी अवस्था पारव्यासारखी झालेली.तोंडातून फक्त हां, हूं, हं शिवाय काही बाहेर पडतंच नव्हतं.आता तालीम काय किंवा प्रत्यक्ष आवाजचाचणी काय, काय ते एकदा होऊन जाऊदे! असा पवित्रा मनाने घेतला.
देव बाईंनी आणि मी तालीम केली.तालीम मीच केली त्या टेक द्यावा त्यापेक्षाही अप्रतिम वाचत होत्या.मला सराव करून जमत नव्हतं ते त्यांनी नुसता संवाद एकदा चाळून सहज जमवलं होतं.
तालीम आणि आवाजचाचणीसाठीचं ध्वनिमुद्रण अर्थात टेक होत असताना असा एखादा क्षण आला की त्यावेळी असं वाटलं हा संवाद संपूच नये!
दोन-तीन टेक झाले आणि चाचणी संपली. “तुम्ही चांगलं वाचलंत हो!” बाई गंभीरपणे म्हणाल्या.माझ्या अंगावरचे काटे गळून मुठभर मांस चढायला लगेच सुरवात झाली.
बर्वेसरांचे आणि देवबाईंचे आभार मानून मी बाहेर पडलो ते तरंगतच.आता आवाजचाचणीचं काय व्हायचं ते होऊदे! आजचा दिस गोड झाला… ही एकच भावना कब्जा करून होती!
असं त्या त्या दिवसापुरतं जगलो तर काय बहार येईल नाही? असं अनेक वेळा वाटतं.
आवाजचाचणी उत्तीर्ण झाल्याचं आकाशवाणीचं पत्र आलं आणि मणिकांचन, दुग्धशर्करा इत्यादी माझ्यासमोर ठाण मांडूनच बसले.
या अनुदिनीचे आभार यासाठी की हा अनुभव पुन्हा जगता आला.कोळी बनून अनेक कोळीष्टकांमधे गुंतलेलं असताना हा पुन:प्रत्ययाचा आनंदसुद्धा मोलाचा वाटतो.

Monday, March 28, 2011

आकाशवाणीवरचं ध्वनिमुद्रण

आकाशवाणीवर प्रवेश तर उत्तम झाला.ज्या दोन डॉक्टरांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या त्यानी मी नवोदित असूनही मला प्रोत्साहनच दिलं.आता मुख्य काम होणार होतं.ध्वनिमुद्रणाचं.
आकाशवाणीच्या इमारतीतल्या ध्वनिमुद्रण कक्षाकडे जाताना आणि आत शिरताना एका बाजूला अनामिक भीती आणि दुसर्‍या बाजूला नवीन काही घडतंय याची हूरहूर जाणवत होती.
ध्वनिमुद्रण कक्षाचे दोन भाग होते.एका भागात गोल टेबल.त्यावर चार ते पाच ध्वनिक्षेपक.भोवताली खुर्च्या.हा कक्ष ज्यांचं ध्वनिमुद्रण करायचं आहे त्या व्यक्तींसाठी आणि दुसरा पर्यायानं लहान आणि भल्यामोठ्या ध्वनिमुद्रण यंत्राने व्यापलेला कक्ष ध्वनिमुद्रकाचं काम करणार्‍यासाठी.
त्यावेळी ध्वनिमुद्रणात संगणकीय तंत्रज्ञान नव्हतं.ज्यांचं ध्वनिमुद्रण करायचं आहे त्याना ध्वनिमुद्रक तसंच कार्यक्रम अधिकार्‍याकडून अनेक सूचना दिल्या जात.
हातात कागदांची चळत असेल आणि ती वाचत ध्वनिमुद्रण करायचं असेल तर कागद सरकवल्याचा, फडफडवल्याचा आवाज आपल्या कानांना जाणवला नाही तरी ध्वनिक्षेपक बरोबर पकडतो.त्यावेळी हा दोष काढून टाकणं बहुदा जिकीरीच होत असावं.संगणकीय तंत्रज्ञान आल्यानंतर आपल्यासारखा माणूसही Audacity सारखं सॉफ्टवेअर वापरून नुसतं ध्वनिमुद्रणंच काय ध्वनिमुद्रण संकलनही शिकून घेऊन उत्तम पद्धतीने वापरात आणू शकतो.ध्वनिमुद्रणातल्या नको असलेल्या आवाजांची गच्छंती सहज होऊ शकते.
तेव्हा तसं नव्हतं.तुम्ही ध्वनिक्षेपकासमोर बसलात की तुमची बसण्याची ढब बदलतानाही आवाज होऊन उपयोग नसे.पायांचा टेबलाच्या खालच्या भागावर होणारा आघात, काही जणांना असते ती पाय हलवत रहायची सवय, अशा गोष्टींमुळे निर्माण होणार्‍या व्यत्ययांवर ध्वनिमुद्रण मधेच थांबवून फेरध्वनिमुद्रण करण्याशिवाय गत्त्यंतर नसे.
नवोदित आणि अनुभवी दोन्ही ध्वनिमुद्रणकर्त्यांना ध्वनिमुद्रक असलेल्या कक्षाकडे आणि ध्वनिमुद्रकाच्या उंचावून खाली आणलेल्या हाताकडे डोळे लाऊन बसावं लागे.प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी आणि एकमेकांच्या आवाजाची पट्टी जुळवणं हे धनिमुद्रकाचं पहिलं महत्वाचं काम असे.ते त्याला अचूकपणे करावं लागे.
ध्वनिक्षेपकाच्या नक्की कुठल्या बाजूला आपलं तोंड असावं हा ही नवोदित ध्वनिमुद्रणकर्त्याला जिकीरीचा व्यायाम होई.तोंडातून प, फ, भ अशा अक्षरांमुळे बाहेर पडणार्‍या श्वासाचा ’ब्लो’ ध्वनिमुद्रणात व्यत्त्यय आणतो हे सतत लक्षात ठेवावं लागे.हा दोष काढून टाकणं संगणकीय तंत्रज्ञानात पर्यायानं सहजशक्य झालं आहे.
या सगळ्या कसरती मला सुसह्य झाल्या त्या ध्वनिमुद्रक, कार्यक्रम निर्माते जयंत एरंडेसर आणि ज्यांची मुलाखत घ्यायची ते तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामुळेच.मी वयानेही या सगळ्यांपेक्षा चांगलाच लहान होतो.जिथे टीमवर्क अर्थात समूहाने काम करायला लागतं अशा कामांत अनुभवी वरिष्ठांनी जर नवोदितांना सांभाळून घेतलं नाही तर त्या कामाचा विचका होतोच पण त्या नवोदिताला अशा वातावरणाबद्दल कायमची अढी बसते.सुदैवाने मला अनुभवी वरिष्ठांची मदत झाली.माझं त्यांच्या इतकं महत्वाचं काम नसून त्यानी माझं कौतुक केलं आणि मला या माध्यमासंबंधी मार्गदर्शनही केलं.प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण करताना तर दोन्ही डॉक्टर्सनी ती मुलाखत अगदी गप्पांसारखी रंगवली...
आता पुढचा टप्पा होता आकाशवाणी नाट्य विभागातल्या आवाजचाचणीचा.दरम्यान मी त्यासाठीचा अर्ज भरला होता.नाटकांतून अभिनय केलेला असल्यामुळे या चाचणीत मला जास्त रस होता.आवाजाची सर्वसामान्य प्रत जोखणं, म्हणजेच आवाज ध्वनिमुद्रणासाठी उपयुक्त आहे ना हे पहाणं आणि तो आकाशवाणीवरून केवळ आवाजातलं नाटक निर्माण करण्यास योग्य आहे ना ते जोखणं अशा दोन टप्प्यांवर ही चाचणी होईल असं सांगण्यात आलं होतं.
चाचणीसाठी कुठल्याही नाटकातला एक संवाद तयार करून आणायचा आणि त्याचं वाचून ध्वनिमुद्रण करायचं होतं.मी संवाद शोधायला सुरवात केली आणि शोधाअंती त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीवर लोकप्रिय झालेल्या ’माझं काय चुकलं?’ या नाटकातल्या नायकाच्या एका संवादानं माझा ताबा घेतला.हे नाटक ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार श्री रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं.त्यांच्याच ’जौळ’ या कादंबरीवर आधारित.
ही एक सत्य घटना होती.मुंबईजवळ असलेल्या शहरातल्या एका उपनगरातल्या घरातली आई, मुलगा आणि सून यांचा एकत्र संसार, बायको आणि आई यांच्यामधे झालेली त्या मुलाची प्रचंड ओढाताण, जागेची अडचण, आईचं खडतर पूर्वायुष्यं आणि हट्टी स्वभाव, मुलाचा मनस्वी स्वभाव आणि शेवटी मुलाचं लोकलमधून उडी मारून आत्महत्या करणं…
आत्महत्येआधीच्या, त्या मुलाचा आणि त्याच्या बायकोचा त्या संवादानं माझा कब्जा घेतला होता.मुलाची आत्महत्येची मानसिक तयारी पूर्ण झाली आहे.’लोकलच्या दारात उभं रहायचं.अंधारा लांबलचक बोगदा आला की दाराच्या मधल्या रॉडवरचा हात अलगद सोडून द्यायचा’ इतक्या सहजपणे तो बोलतो, इतकी त्याची तयारी झाली आहे!...
हा संवाद निवडलाय म्हणजे मी भलतंच आव्हान पेलतोय का? कसं होईल ध्वनिमुद्रण? नाही झालो उत्तीर्ण तर काय? नेहेमीसारखा मी अनेक प्रश्नांना आणि त्यामुळे येणार्‍या अपरिहार्य ताणाला सामोरा जाऊ लागलो.झोप उडणं हे अशावेळी नेहेमीचं होऊन बसतं तसं बसलं…

Tuesday, March 1, 2011

आकाशवाणीशी ओळख

आईचं अचानक आलेलं दुर्धर आजारपण आणि त्यात अवघ्या तीन महिन्यात तिचा झालेला मृत्यू हा माझ्यावर, माझ्या दोन लहान बहिणींवर जबरदस्त आघात होता.आई ही अशीच आयुष्यभर आम्हाला आमच्यासाठी हक्काचीच असणार हे आम्ही मनाशी ठाम समजून आपापल्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे होतो.भलताच क्लायमॅक्स आमच्या आयुष्यात आला.एक वादळ आलं, गेलं, स्मशानशांतता तेवढी मनं व्यापून उरली.
माझ्यावरची जबाबदारी आता वाढलीय किंवा सगळं ओझं आता माझ्याच डोक्यावर आलंय असं काहीसं माझ्या मनानं घेतलं.नाटक हा छंद होता.माझ्या दृष्टीने तो माझ्या स्वत:साठी कितीही हवाहवासा वाटला तरी नुसता छंद करत रहाणं माझ्या ओझावलेल्या मनाला पटेना.
जबाबदारीची माझी व्याख्या, कल्पना काय होती?
नोकरी, नाटक यात माझ्या दिवसच काय घरी येईपर्यंत मध्यरात्र होत होती.मी घरी वेळ देणं आवश्यक होतं.माझ्या दोन बहिणी शिक्षण पूर्ण करून पुढच्या मार्गावर होत्या.त्याना नोकरी, त्यांचं स्वत:चं आयुष्य सुरू करून द्यायला हवं होतं.परिस्थिती बेताचीच होती.लष्करच्या भाकर्‍या भाजण्यापेक्षा बरीच महत्वाची कामं पडली आहेत असा ताण माझ्या मनानं घेतला.
नाटक माध्यमात काही उत्पन्न होऊ शकतं का याचा शोध त्या ताणानं आरंभला.
आकाशवाणी, मुंबई केंद्रावर जा असं मला नेमकं कुणी सुचवलं हे आता आठवत नाही पण आकाशवाणीवरच्या श्रुतिका, नभोनाट्य माझ्या आईमुळेच तेव्हा दूरदर्शन नसतानाच्या काळात रात्री जागून ऐकली होती.प्रपंच, पुन्हा प्रपंच ते आंबडगोड आणि आपली आवड, युवोवाणी इत्यादी सगळंच तेव्हा लोकप्रिय होतं.आई आवर्जून ते सगळं ऐकायची.ऐकवायची.
आवाज बरा आहे अशा प्रतिक्रिया यापूर्वी मिळालेल्या असल्यानं मी आकाशवाणी केंद्रावर जायचं ठरवलं.गेलो.कुणीतरी सुचवल्याप्रमाणे नाट्यविभाग शोधला.विभागात अजून कुणीही आलं नव्हतं.मी वाट बघत राहिलो.कुणी आलं, गेलं विभागप्रमुख कुठे आहेत कुणाला काही कल्पना नव्हती.मी रेंगाळत राहिलो.जरावेळानं विभागप्रमुख रजेवर आहेत असं कळलं.प्रयत्न थांबले असं मनाशी म्हणत मी रेंगाळत राहिलो.
माणूस स्वत:चा स्वभाव घेऊन जन्माला येतो.उणंअधिक सगळं घेऊन.भिडस्तपणा हा माझ्या स्वभावाचा भाग.अगदी लहानपणी मुखदुर्बळ म्हणून आईची बोलणी खाल्ली होती.आता ती कामाला यायची होती.मी नाट्यविभागासमोरच्या प्रशस्त मार्गिकेतून या टोकाला असलेल्या नाट्यविभागापासून मार्गिकेच्या त्या टोकापर्यंत फिरायला सुरवात केली.माझ्याच विचारात.एका फेरीत नुकतीच उन्हं आल्यामुळे उजळलेल्या मार्गिकेअखेरच्या तावदानांसमोर उभा राहून वळलो तर या टोकाच्या केबिनच्या आत लक्ष गेलं.लांबलचक केबिनच्या अगदी आत उजव्या टोकावरच्या टेबलापलिकडे एक व्यक्ती टेबलावरच्या दप्तरामधे काही नोंदी करत असावी.मी त्या गृहस्थांना ओळखलं.मी सकाळी ऑफिसला जाताना नेहेमी जी लोकल पकडायचो.त्या लोकलला तेही असायचे.त्यांचे सहप्रवासी स्थानकाच्या पश्चिमेला, मी रहात असलेल्या परिसराच्या दुसर्‍या एका टोकाला एक चित्रपट मंडळ चालवत असत.त्यासंदर्भात त्यांनी माझ्याकडे सूतोवाच केलं होतं.पण केंद्रावरच्या या केबिनमधल्या गृहस्थांची माझी नुसती तोंडओळख झाली होती.ते मला ओळखण्याची सुतराम शक्यता नव्हती.मी मनाचा हिय्या करून त्याना भेटण्याचं ठरवलं.आत गेलो.त्याना माझी ओळख, एका लोकलचा सहप्रवासी असल्याचा संदर्भ दिला.ते फारसे बोलणारे नाहीत असं त्यांच्या चेहेर्‍यावरून वाटायचं.त्यानी ’ओळखलं’ वगैरे म्हणण्याऐवजी आकाशवाणीवर कशाकरता आलात असं मनापासून विचारत बोलणंच चालू केलं.आकाशवाणीवरच्या नाट्यविभागाची आवाज चाचणी असते हे मला माहितच नव्हतं.ते त्यानी सांगितलं.ती वर्षाच्या सुरवातीला असते.अजून काही महिने बाकी आहेत अशी माहिती द्यायलाही ते विसरले नाहीत.त्यांच्या प्रतिसादाने मी सुखावलो.स्थिरावलो.
श्री.जयंत एरंडे हे ते आकाशवाणीवरचे कार्यक्रम अधिकारी.त्यांच्याकडे विज्ञानविभाग होता.एरंडेसरांचा मोठेपणा इतका की त्यानी आमच्या विज्ञानविभागासाठी काम कराल का? अशी विचारणा केली.त्यांच्या विज्ञानविभागातर्फे तज्ज्ञ वैद्यकांच्या मुलाखती प्रसारित होत असत.तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात तुम्हाला हे सहज जमेल असं त्यानी वर सुचवलंही.आपण अमुक एक मनात धरून प्रयत्न करायला जातो आणि दुसरं, अधिक वेगळं, नवा अनुभव देणारं काही आपली वाट बघत असतं.मी भारावलो.
एरंडेसरांनी मला सर्वप्रथम ऐकण्याचं यंत्र या विषयावर डॉ.वर्तक आणि त्यानंतर भाजल्यावर पाणी ओता या विषयावर डॉ.चंद्रकांत जोशी या सुप्रसिद्ध तज्ज्ञ वैद्यकांच्या मुलाखती घेण्याचं काम दिलं.त्यासाठी डॉ.वर्तकांना गोकुळदास तेजपाल इस्पितळात आणि डॉ.जोशींना त्यांच्या घरी शिवाजी पार्कला भेटायला सांगितलं.त्यांच्याशी चर्चा करून मी प्रश्नावली काढायची होती.दोघेही तज्ज्ञ ही सहृदय माणसं होती.मी पूर्णपणे नवा होतो.दोघांनी मला अभूतपूर्व असा अनुभव दिला.या दोन्ही मुलाखतींच्या कामात मला माझ्या ताणाचा, अडचणींचा पूर्ण विसर पडला होता इतकंच नाही तर एकट्यानं आपण असा एखादा प्रकल्प निभावू शकतो असा आत्मविश्वास दिला असं मला आजही इतक्या वर्षांनंतरही तो माझ्यासोबत आहे.माझ्या आकाशवाणीवरच्या प्रवासाची उत्तम सुरवात झाली होती…

Friday, September 24, 2010

पहिला प्रयोग!

आपल्यापैकी प्रत्येकाला लहानपणापासून एकदा तरी एखाद्या नाटकात काम करावं असं खूप वाटत असतं.मी पहिल्यांदा प्रत्यक्ष रंगमंचावर यायला आता काही दिवसच उरले होते.विश्वास बसत नव्हता.नाटकात काम मिळालं म्हणून आनंद तर होताच पण दिवसेंदिवस जाणवणारय़ा आणि पडणारय़ा जबाबदारीमुळे रिहर्सलमधे असताना तरी तो निखळपणे जाणवला नाही.सगळं बिनचूक पार पडण्याचं दडपण मनावर होतं.ही समूहकला असते.आपल्यामुळे इतर कुणाचा किंवा नाटकाचा- करत असलेल्या या एकांकिकेचा- फज्जा उडू नये!
जसजसा रिहर्सलचा वेग आणि वेळ वाढत होता तसतशी रात्री झोप लागेनाशी झाली.एकांकिकेच्या रिहर्सलबरोबर संस्थेचे बॅनर रंगवणे, नेपथ्य- जे काही होतं ते- त्याची तयारी या गोष्टीतही आम्ही सगळेच झोपबीप विसरून व्यग्र झालो होतो.ऑफिसला निघाल्यावर लोकलट्रेनमधे झोप लागायची आणि दचकून जाग यायची.आपला परिक्षेचा पेपर आहे आणि आपण वेळेवर पोचलेलोच नाही किंवा पेपर हातात पडल्यावर काही आठवतच नाही अशी स्वप्नं पडायची.ऑफिसमधे पेंग आवरायला लागायची नाहीतर सहकारी पकडायचे.
एकांकिका पहिल्यापासून शेवटपर्यंत न चुकता सादर करायची हे मुख्य ध्येय होतं.पुढे मृत्यू आहे अशी म्हातारय़ाची/मीडीआची/प्रत्यक्ष मृत्यूची भविष्यवाणी होऊनही ते तिघे पिसाटासारखे जंगलाकडे धावत सुटले आहेत.कसलीही पर्वा न करता.त्या भविष्यवाणी किंवा आकाशवाणी प्रमाणे कृती करताएत.मोहरा शोधतात.त्यासाठी एकमेकांचा जीव घेतात.तो म्हातारा- मीडीआ- मृत्यू- सांगतो.त्यांना मी सांगितलं होतं, तिथे आहे तुमचा मृत्यू!
या सगळ्या सादरीकरणाचा सहज, सोपा, समजणारा निश्चित अर्थ काय? हा प्रश्न त्यावेळी पडलाच नाही! सादरीकरणात गुंतलेले आम्ही सगळे नवोदित आणि आमच्याकडून होता होईल तेवढा बिनचूक परफॉर्मन्स करून घेण्यात व्यग्र असलेला दिग्दर्शक- तोच एकांकिकेचा लेखक.त्याला सगळं समजाऊन सांगायला वेळच नाही.तो लेखन, दिग्दर्शनाबरोबर संमेलनाचाही सूत्रधार.त्याने काही सांगितलंही असेल पण आम्ही त्या सादरीकरणाच्या मोहाने आणि त्या बरोबरच्या भीतीनेही एवढे भारावलो होतो की आमच्या ते कानापर्यंतही पोचलं नसावं.नव्या कोरय़ा मुलांना अश्या एकांकिकेबद्दल सांगून काही कळण्यापेक्षा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते हा ही विचार आमच्या लेखक-दिग्दर्शकच्या डोक्यात असेल.आम्हाला हे असं का? हे विचारायची तेव्हा बुद्धी झाली नाही.स्वत:ला आणि आपल्या समोरच्या जाणकाराला प्रत्येक वेळी असं का? हे विचारायला पाहिजे हे खूप नंतर डोक्यात बसलं.तरीही एकूण नाटक बसणं या प्रक्रियेत मग ते हौशी असो, प्रायोगिक असो, व्यावसायिक असो; सुरवात आणि शेवट जोडून न चुकता प्रयोग सादर करणं या कामात जास्त वेळ जातो असा अनुभव येतो.तुमची समज वाढेल तसंतसं तुम्ही जे करत असता ते समजून घेत असता.
एखादा विषय कठीण वाटावा.त्या विषयाच्या पेपरची भीती वाटावी पण इतर सगळ्याच विषयांच्या विचारांच्या गडबडीत इतकं व्यस्त असावं की मुख्य पेपर सहज लिहिता यावा तसं काहीसं झालं.माझं पदार्पण पार पडलं.सुरवातीच्या प्रवेशाआधीची- पहिल्या एन्ट्रीआधीची धाकधूक होती- जी अभिनेत्याच्या कायम मानगुटीवर बसलेली असते- ती होतीच.पण नंतर एखादी ताणलेली स्प्रींग सैल होत जावी तसा पहिला प्रयोग पार पडला.
प्रयोग पार पडल्यावर आता प्रतिसाद.तो तर प्रयोग चालू झाल्यापासून मिळायला सुरवात झाली. “आयला हा बघ! हा पण नाटकात! एऽऽ-” हा पहिला प्रतिसाद.माझ्या नावाने पुरूषी, घोगरय़ा आणि जास्त वेळ बायकी आवाजात हाका.प्रेक्षकातले, रंगमंचावरचे सगळे एकमेकांचे मित्रच.माझ्यासकट सगळ्यांच्याच नावाच्या हाकांचा गजर ही पहिली प्रतिक्रिया! नंतर मग काही गंभीर चाललंय या समजुतीनं बहुदा प्रेक्षकांत शांतता.मेजर चूक न होता प्रयोग पार पडला म्हणून आम्ही पडलेल्या पडद्याला नेहेमीच्या भाबडेपणानं लोटांगण करून वंदन केलेलं.मग भेटायला आलेल्या दिग्दर्शकाच्या पाया पडण्यासाठी रांग.त्याचा गंभीर चेहेरा.चांगलं झालं सगळं पण… असा त्याच्या गंभीर विचारी चेहेरा.फ्रीज झालेला.
एकांकिकेचा बराचसा भाग हा तिघांच्या कुजबुजीचा होता.ही कुजबुज प्रेक्षकात बसलेल्या आमच्या लेखक-दिग्दर्शकाला नीट ऐकू आली नाही.ही त्याची पहिली प्रतिक्रिया.आम्ही नवोदित नर्वस.माझं कुजबुजीतलं बोलणं स्पष्टं ऐकू आलं नाही असा त्याचा रोख.नंतरच्या काळात असं हे कुजबुजणं शेवटच्या रांगेपर्यंत पोचणं कठीण असतं हे समजलं.मग नवीन शब्द कळला.प्रोजेक्शन.तो वारंवार भेटीला येऊ लागला.
मी पूर्वी नाटकात पाहिलेलं असं या एकांकिकेत काहीच नव्हतं.ना दिमाखदार नेपथ्य.ना चमकदार कपडे.ना रंगीबेरंगी प्रकाश.झगमगतं असं काही नाही.अर्ध्यापेक्षा जास्त वेळ रंगमंचावर काळोखच.फार तर निळा झोत आणि झाड-म्हातारय़ावर लाल झोत.गोष्टंही नेहेमीची नाही.वेगळीच.सगळं दृष्टीआड.झाड, रान, ओढा, हंडा, सोन्याच्या मोहरा यापैकी दिसणारं काहीच नाही.ते सगळं अभिनेत्यानं आपल्या हालचाली, हावभाव यातून खरं आहे असं भासवायचं.’माईम’ हा आणखी एक नवा शब्द आमच्या डिक्शनरीत रूजू झाला.
“तुम्हाला कशाच्यातरी मागे जीव घेऊन पळायला लागलंय.दम लागलाय.या विंगेतून तुम्ही येता.थकून रंगमंचावर पडता! कसं कराल? दाखवा करून!” ही दिग्दर्शकाची सूचना.मग आमची तसं करण्याची धडपड.पहिले सगळे प्रयत्न हास्यास्पद.मग त्यातून योग्य प्रयत्न योग्य मार्ग सापडत जाणं.
“तुम्ही जंगलात शिरला आहात! करा! हं! झाड आलं.आता मोठा वेल आला.करा बाजूला.होत नाही? मग तोडून बाजूला काढा!” दिग्दर्शक सूचना देत होता आणि आमच्याकडून मुकाभिनयाद्वारे प्रसंग बसवून घेत होता.या प्रक्रियेला ’इंप्रोवायझेशन’ म्हणतात असं नंतर समजलं.थोडं समजत होतं.काही नवीन शब्दांनी पोतडी भरत होती.प्रयोग झाला, कालांतराने त्याप्रयोगसंदर्भातल्या चर्चाही संपल्या.इतक्या बिझी शेड्यूलनंतरचे दिवस खायला उठू लागले.आता काय? पुढे काय करायचं? काहीतरी करायचंच! नाटकच करायचं! पण कधी? एकदा तोंडाला रंग लागला की माणूस कितीही लहान असो, मोठा असो.वेडापिसा होतोच होतो…

Friday, July 3, 2009

ध्वनिमुद्रण "माझ्या आजोळच्या गोष्टी"

नमस्कार!
३० जूनला अस्मिता वाहिनी, आकाशवाणी मुंबई वरून प्रसारीत झालेल्या
माझ्या आजोळच्या गोष्टींचे ध्वनिमुद्रण खालिल लिंकवर आपण जरूर ऐकू शकता!
http://www.esnips.com/doc/6dc4838a-8bfe-43ef-84af-5e3708eace75/Mazya-Ajolchya-Goshti_300609



Wednesday, March 25, 2009

"साहित्यसौरभ" अस्मिता वाहिनी, मुंबई आकाशवाणीवर माझ्या कविता!!!

२७ मार्च, गुढीपाडवा,
रात्री १० वाजता,
मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर,
साहित्यसौरभ”  मधे माझ्या कविता ऐका! 

Tuesday, February 24, 2009

Listen To Me!

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

MARATHI BHASHA DIN i.e. Friday, 27th February, @ 10 PM!!!!

For Details Just Click 

http://vinayak-pandit.blogspot.com/2009/01/blog-post_31.html 

 

२७ फेब्रुवारी, रात्री १० वाजता, आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरसाहित्यसौरभमधे माझ्या कविता ऐका! क्लिक करा-

http://vinayak-pandit.blogspot.com  

 

Saturday, January 31, 2009

२७ फेब्रुवारी, रात्री १० वाजता, आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर“साहित्यसौरभ” मधे माझ्या कविता

२१ जानेवारीला आकाशवाणीला पोचलो ते हुरहुर घेऊनच.ज्या दिवाळीअंकात मी सातत्यानं लिहित आलो त्या अंकाच्या संपादकांनी, श्री राजेंद्र कुलकर्णी, यांनी माझं नाव साहित्यसौरभ कार्यक्रमासाठी सुचवलं.कार्यक्रम अधिकारी बाईंचा फोन आला.दहा मिनीटांच्या ध्वनिमुद्रणासाठी साहित्य पाठवावं असा.लेखक म्हणून एक स्वतंत्र कार्यक्रम तोही पुन्हा बहराला आलेल्या आकाशवाणीवर.मन हवेत तरंगावं असे आयुष्यातले हे क्षण असतात.मी लवकरच पोचलो.

आधीचं कुरियरने पाठवलेलं साहित्य उत्तम आहे पण आकाशवाणी या पूर्णपणे श्राव्य माध्यमाला साजेल असं आणखी चांगलं काही घेऊन या असाही निरोप नंतरच्या संपर्कातून मिळाला होता.दहा मिनीटं एरवी आपल्याला चुटकीसारखी वाटतात.श्राव्य माध्यमात श्रोत्याला आपल्यासोबत ठेवण्या आणि नेण्यासाठी या दहा मिनीटांच्या अवधीचेही छोटे आशयपूर्ण भाग असावेत.ते दृष्यात्मक असावेत.केवळ ऐकत असताना दृष्यं डोळ्यासमोर ठळकपणे उभी रहावीत असे असावेत ही समज नाटक माध्यमात असल्यामुळे आपोआप विकसित होत असते.लेखनातून नेमकेपणे हे मांडणं हे आव्हान असतं, तो एक सततचा अभ्यास असतो.

तेव्हा आता सोबत चार कविता होत्या आणि त्या आवडतील का ही हुरहुर.पण ही हुरहुर एवढ्या प्रमाणातच मर्यादित होती का?

आकाशवाणीचा आणि माझा संबंध १९८६ पासूनचा.कारणही वेगळंच.मी नाटक माध्यमाला परिचित झालो होतो आणि आयुष्यात व्यापून टाकणारं काही मिळालंय असं वाटत असताना, नाटकाच्या मुख्य प्रवाहाच्या जवळपास असताना आयुष्यात एक दु:ख आलं.फार वेळ नाटकाला देता येणार नाही अशी अनिश्चितता सामोरी आली.मग आपण मर्यादा घालून घेऊन काही चालू ठेवू शकतो का या विचाराने अंतर्मनाने शोधाशोध चालू केली.

एक गोष्टं पार स्मृतीआड झाल्याचं आज लक्षात येतंय.काही केल्या ते आठवत नाही.मला आकाशवाणीवर जाऊन काम माग अस कोणी सुचवलं! काही केल्या आठवत नाही!

मी भिडस्त, आकाशवाणीवर पोचलो.नाटक विभाग बघतात म्हणून ज्या कुणाचं नाव मला सांगितलं गेलं होतं त्यांची तिथून बदली झालेली.नव्यांनी नभोनाट्यात भाग घेण्यासाठीच्या आवाजचाचणीबद्दल सांगितलं.ती नुकतीच होऊन गेलेली!आता काय?मग त्यानीच विज्ञान कार्यक्रम विभागाला भेट द्या, काही करता येईल का बघा असं सुचवलं.मी तिथून उठलो.काही ठिकाणी विशेषत: केबिन्समधल्या कुणाला भेटायला गेल्यावर निरोप घ्यायला नक्की कधी उठायचे हे समजत नाही.आता समजलं.उठलो.

मग भिडस्त मी माझ्या स्वभावाला अनुसरून दोन-चार केबिन पलिकडे असलेल्या विज्ञान कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या केबिनपर्यंत गेलो, परत फिरलो.शेवटी हिय्या करून गेलोच.समोर बसलेले गृहस्थ बघितले आणि चाटच पडलो.अरे, हे! हे तर सकाळच्या आपल्या लोकलचेच सहप्रवासी! श्री.जयंत एरंडे! त्यांचा चांगुलपणा इतका की मला बोलतं करून त्यांनी मला चक्कं एक नाही तर दोन मुलाखतींचे कार्यक्रम दिले.दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती!

आकाशवाणीसारख्या नव्या माध्यमात प्रवेश झाला.कुठलीही अश्या प्रकारची पार्श्वभूमी नसलेला मी, माझा आवाज आकाशवाणी वरून ऐकणार होतो.

कालांतराने नाटक विभागाची आवाज चाचणी दिली.श्री.चंद्रकांत बर्वे तेव्हा नाटक विभाग प्रमुख होते आणि माझ्या आवाज चाचणीच्या वेळी माझ्या बरोबर होता आकाशवाणीवरचा दैवी आवाज श्रीमती करूणा देव.मी श्री रत्नाकर मतकरींच्या माझं काय चुकलं या नाटकातला संवाद नेला होता.अहो, यात माझं म्हणजे स्त्रीपात्राचंच बोलणं आहे! आवाज मंजुळ दैवी असूनही माझ्या छातीत धाकधुक सुरू झाली.नायक आत्महत्येचा निर्णय घेतो त्यावेळचा तो संवाद होता.पारसिकचा बोगदा आला की दरवाज्याजवळच्या खांबावर घट्टं धरलेला हात हळूच सोडून द्यायचा असा पुढे नायकाचा एक परिच्छेद होता तो मी त्याना दाखवला.त्यानी हो, ठीक आहे! अश्या अर्थाची मान हलवली असं मलाच वाटलं आणि माझी वेळ आल्यावर माझ्याकडून तो संवाद न थांबता म्हटला गेला.मग चाचणी कशी झाली काय झाली यावर दोन्ही मान्यवरांचं मत ऐकलं.ते बरंच बोलले.काही समजलं, काही नाही.आवाज चाचणी पास होऊ का अशी धाकधुक नंतर बराच काळ पुरली.

पास झालो; अविनाश मसुरेकर, करूणा देव, कै.वसंत सोमण, प्रदीप भिडे यांसारख्या कलाकारांबरोबर नभोनाट्यं करायला मिळाली.एका नभोनाट्यात चक्कं रमेश देवही होते.रास हे बंगाली नभोनाट्य आठवतं, अमिताभ-नूतनचा सौदागर नावाचा सिनेमा होता त्या गोष्टीवरचं नभोनाट्यं.

मी स्वत: नाट्यदर्पणच्या कल्पना एक अविष्कार अनेक स्पर्धेत केलेली रोमानी ही एकांकिकाही (माझ्या या ब्लॉगवर जिच्यातले काही फोटो आहेत ती) मूळ संचात आम्हाला सादर करायला मिळाली, श्रीमती तनुजा कानडे या निर्मात्या असताना.

पुढे इतरत्रं जाहिरातींसाठी आवाज देणं, रेडिओच्या व्यापारी कार्यक्रमात भाग घेणं हेही करायला मिळालं.

आकाशवाणीचा संपर्क दुरावत गेला, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं, नोकरी या चाकोरीत अडकून…

प्रचंड हुरहूर घेऊन आलेला मी वेळेआधीच आकाशवाणीवर पोचलो.प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या श्रीमती गद्रे भेटल्या. त्यानी नव्या चार कविता वाचल्या आणि त्याना त्या आवडल्या!श्रीमती नीता गद्रे स्वत: साहित्यिका आहेत.एका श्वासाचं अंतर हे त्यांचं आत्मकथन यापूर्वी साप्ताहिक सकाळच्या अंकातून क्रमश: प्रसिध्द तर झालंच पण लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवतं झालं.याचं याच नावाचं पुस्तकही प्रसिध्द झालं आहे आणि ते आवर्जून वाचावं असं झालं आहे.फिनिक्स पक्षाप्रमाणे श्रीमती गद्रे यांनी आपल्या आयुष्याला नव्याने सुरवात केलेली आहे, जे लोकविलक्षण आहे!!!

ध्वनिमुद्रण करणाऱ्या श्रीमती सुचेता आल्यावर दुसऱ्या मजल्यावरच्या ध्वनिमुद्रण स्टुडिओत गेलो.माझ्यासोबत श्री गो.मं.राजाध्यक्ष होते.जे अनेक वर्षं जे.जे.महाविद्यालयाचे डीन होते, जाहिरात क्षेत्रातले ते मान्यवर आहेत! माझ्यानंतर त्यांचेही जाहिरात या विषयावरचे भाषण ध्वनिमुद्रित झाले.आकाशवाणीने मला नुसती संधीच दिली नाही तर दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचा परिचय करून दिला!

अभिनेता म्हणून या आधी चंचूप्रवेश केलेला मी आज एक लेखक म्हणून ध्वनिमुद्रण करून स्टुडिओतून बाहेर पडलो ती नवी हुरहूर घेऊन.कसं झालं असेल ध्वनिमुद्रण?

दिनांक २७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून साहित्यसौरभ या कार्यक्रमात माझ्या या कविता सादर होणार आहेत आणि योगायोग असा की २७ फेब्रुवारी ही श्रेष्ठ कवि कुसुमाग्रजांची जयंती आहे आणि ती मराठी भाषा दिन म्हणून सादर होणार आहे!!!

माझी हुरहूर प्रचंड वाढली आहे!!!   

Listen To Me!

Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!  

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

AS A LAST MINUTE CHANGE MY PROGRAMME HAS BEEN POSTPONED!! NEW TIME: GUDHIPADWA, FRIDAY, 27th MARCH @ 10 PM!!!!