romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label Asian Films. Show all posts
Showing posts with label Asian Films. Show all posts

Friday, September 2, 2011

जगावेगळा ’बफेलो बॉय’

डेस्पेरेडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल तुम्ही माझ्या गेल्या नोंदीत वाचलंच आहे.दरवर्षी मुंबईत भरवल्या जाणार्‍या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातल्या लक्षात राहिलेल्या दुसर्‍या आणि जगावेगळ्या वित्रपटाबद्दल इथे लिहितोय.हा चित्रपट म्हणजे ’बफेलो बॉय’!
व्हिएटनामसारख्या देशातून आलेल्या या प्रवेशिकेनं थक्कच केलं.चित्रपट माध्यमाला मर्यादा आहेत का? असा मोठा संभ्रम हा चित्रपट बघत असताना होतो.’पाणी’ या पंचमहाभूताचं विलक्षण दर्शन हा चित्रपट घडवतो आणि तेवढ्यावरच तो थांबत नाही.एका पंधरा वर्षाच्या मुलाला काही महिन्यांच्या अवधीत घडलेलं आयुष्याचं दर्शन केवळ अप्रतिम चित्रप्रतिमांमधे हा चित्रपट सादर करतो.
पंधरा वर्षाचा किम आपल्या वडिलांबरोबर आणि सावत्र आईबरोबर राहतो आहे.तो रहात असलेल्या या भागात, व्हिएटनाममधे, पाऊस म्हणजे अरिष्टंच आहे.तो धुंवाधार बरसताना आपण त्या प्रतिमांबरोबर ओढले जातो.हे शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे दोन म्हशी आहेत.आईवडील अतिवृद्धं झालेले.म्हशी जगवायच्या असतील तर या भूभागातल्या सगळ्यांना त्यांच्या म्हशी एका बेटावर चरण्यासाठी न्याव्या लागतात.प्रचंड पाऊस आणि सर्वत्र भरलेलं प्रलयसदृष्य पाणी यामुळे म्हशींना खायला गवत उरलेलं नाही.
ज्या बीस्ट्स आयलंडवर या म्हशींना न्यायचं तिथपर्यंतचा प्रवासही सुखकर नाहीच.किमचा हा प्रवास सुरू होतो.मुसळधार पावसात, चहुकडे क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्यातून वाट काढत तो चालू पडतो.त्याला काय खायला मिळतं? इतकं पाणी सभोवार असून त्याला प्यायचं पाणी मिळवण्यासाठी काय करावं लागतं? इथपासून चित्रपटाचं डिटेलिंग सुरू होतं.यातली दृष्यं बघून अवाक होणं केवळ बाकी रहातं! आपल्याला मागासलेल्या वाटलेल्या त्या प्रदेशात, पावसाच्या अखंड भडिमारात, प्रलय झालेल्या ठिकाणी हे चित्रिकरण कसं साध्य झालं असेल याचा अचंबा करत आपण किम जगू लागतो.
किमला त्याच्या आयुष्यातलं कुठलं रहस्य या दरम्यान कळतं? त्याची आई कोण? बेटाजवळ पोचल्यावर त्या परिस्थितीतही होणार्‍या इतर लोकांच्या मारामार्‍या, स्त्रियांवरचे अत्त्याचार, स्वत: किमनं त्या सगळ्या जगण्यात सामील होणं असं सगळं जगावेगळं जगणं आपण किमच्या दृष्टिकोनातून कधी अनुभवायला लागलो हे आपलं आपल्यालाच कळत नाही!
यातला किमच्या वडलांच्या शिकार्‍यावरच्या मृत्यूचा सेगमेंट- उपकथानक काटा आणणारं आहे.किमच्या पुन:प्रवासात सभोवतालच्या पाणीच पाणी चहुकडे या अवस्थेत चुकून माकून एखादा शिकारा जवळ आला तरच माणसाची भेट होणार अशी परिस्थिती.यात शिकार्‍यावरच्या म्हातारा म्हातारीमधला म्हातारा मरतो.अशावेळी माणूस मेल्यावर पुढे काय करायचं हा यक्षप्रश्न.प्रवास न संपणारा.संपेपर्यंत त्या शरीराचं काय होणार? मग त्या मृत शरीराला काळजावर दगड ठेऊन जलसमाधी द्यायची! पण ते शरीर पूर्ण बुडायला तर पाहिजे! मग काय करायचं?... हा प्रसंग मुळातूनच पहाण्यासारखा आहे.
आयुष्य हे दु:खानं भरलेलं तर आहेच.माणसानं त्याच्या जगण्यावर आलेल्या अडचणींवर कसा विजय मिळवला किंवा तो आयुष्याशी कसा लढला हे ’बफेलो बॉय’ अप्रतिमपणे दाखवतो.
चित्रपट संपल्यावर केवळ उदासवाणी हुरहूर लागत नाही आणि आपण कधीच अनुभवू शकणार नाही असं आयुष्य आपल्याला लाभल्याचा साक्षात्कार हा चित्रपट प्रेक्षकाला जरूर देतो...
मग करताय न लगेच डाऊनलोड? त्या आधी हा यूट्यूब ट्रेलर पहा!
         माझ्या आशियाई चित्रपट महोत्सवात बघितलेल्या या आधीच्या चित्रपटविषयक नोंदी पुढीलप्रमाणे:
मुतलुलुक-ब्लिस
द सिरियन ब्राईड
डेस्पेरेडो स्क्वेअर

Wednesday, August 31, 2011

’डेस्पेरेडो स्क्वेअर’ अर्थात ’संगम’

आशियाई चित्रपट महोत्सवाबद्दल या आधी लिहिलं ते द सिरियन ब्राईड आणि मुतलुलुक- ब्लिस या चित्रपटांबद्दल.मुंबईत दरवर्षी थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव होत असतो.या वर्षी तो २२ डिसेंबर २०११ ते २९ डिसेंबर २०११ या कालावधीत साजरा होणार आहे.२००५ सालापासून या महोत्सवात बरेच चांगले चित्रपट बघायला मिळाले.यातल्या पटकन‍ आठवणार्‍या आणखी दोन चित्रपटांबद्दल केव्हापासून लिहायचं होतं.राहून गेलं.यातला एक चित्रपट ’डेस्पेरेडो स्क्वेअर’ हा इस्त्रायली चित्रपट! एक भारतीय चित्रपटांचा प्रेक्षक असलेल्या मला हा अतिसुखद धक्का होता.मी हा चित्रपट मस्त एंजॉय केला.
१९६४ साली आलेला राजकपूरचा संगम बहुतेकांनी पाहिला असेलच.तो कुणाला खूप आवडला.कुणाला आवडला नाही.चित्रपटातली गाणी हा राजकपूरच्या चित्रपटांचा मुख्य गुणविशेष! ती गाणीही बहुतेकांना आठवत असतीलच.चित्रपट आवडो न आवडो यातल्या गाण्यांवर अनेकांनी समरसून प्रेम केलंय हे नाकारता येत नाही.
१९६४ साली आलेला संगम हा १९४९ साली आलेल्या मेहेबूब खान या चित्रसम्राटाच्या अंदाज या चित्रपटाचा रिमेक होता.या चित्रपटातली गाणीही अविस्मरणीय होती.राजकपूर, दिलिपकुमार, नर्गीस हे मेहेबूब खान यांना गुरूस्थानी मानत.मेहेबूब खानचा १९५७ साली आलेला मदर इंडिया कोण विसरू शकेल? तो त्यानेच १९४० साली बनवलेल्या औरत या चित्रपटाचा रिमेक होता! आता या रिमेकच्या खेळातून जरा बाहेर पडूया!
’संगम’ किंवा तो ज्यावरून घेतला तो ’अंदाज’ या चित्रपटांची मूळ गोष्टं कुणाची होती माहित आहे? 
’तीन मुले’ ही ती मूळ गोष्टं होती, पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपल्या परमपूज्य साने गुरूजींची!
असो!
’डेस्पेरेडो स्क्वेअर’ ह्या इस्त्रायली चित्रपटाचा विषय असा.
इस्त्रायलमधलं एक जमान्यापासून बंद पडलेलं एक सिनेमागृह.त्या सिनेमागृहाचा मालक मरण पावलाय.त्याला दोन तरूण मुलं.त्यातल्या धाकट्याच्या स्वप्नात बाबा येतात आणि कायमचं बंद पडलेल्या त्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करा! असा आग्रह धरतात.त्या मुलांचा काका त्यांच्यापासून लांब गेलाय तो ते सिनेमागृह बंद पडल्यापासूनच.त्याच्याही स्वप्नात त्याचा वडीलभाऊ येऊन बंद पडलेल्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करण्याची गळ घालतो.
मुलं ते कायमचं बंद पडलेलं सिनेमागृह चालू करण्याचा विडा उचलतात.पण पहिला चित्रपट कुठला लावायचा? ते काकाला विचारतात.काका म्हणतो आपण हा प्रश्नं ’इस्त्रायल’ ला विचारू.’इस्त्रायल’ ही नमुनेदार व्यक्ती आहे या कुटुंबाचा जीवलग.तो अफलातून हेअरडू करतो.स्वत:ला राजकपूर समजतो.सतत आपल्या दुचाकीवर राजकपूरच्या सिनेमातली गाणी वाजवतो! तो म्हणतो बंद पडलेल्या चित्रपटगृहाची सुरवात करायची तर ती ’संगम’ याच चित्रपटाने.
इस्त्रायल आणि अरॉन-मुलांचा काका या दोघांनाही मदर इंडिया, संगम या चित्रपटांची स्टार कास्ट, गाणी यांचं अक्षरश: वेड लागलेलं आहे. इस्त्रायल गोपाल, राधा, सुंदर यांची ( तीन मुलांची?) गोष्टं अर्थात पिच्चरची थीम सांगतो.  त्या मुलांसमोर ’दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं गाऊन दाखवतो! काका-अरॉनही त्याला साथ देतो.धाकटा मुलगा मोठ्या भावाला म्हणतो. अरे! हेच संगीत मी माझ्या ’त्या’ स्वप्नात ऐकलं होतं! आता बोला!!
पुढे काय होतं? ते पहाण्यासारखं आहे! चित्रपटाचं कथानक त्या बंद पडलेल्या चित्रपटगृहाच्या पुनरूज्जीवनाबरोबर पुढे सरकू लागतं आणि एक वेगळंच इमोशनल नाट्य उभं रहातं.त्यात गुंतागुंत होते.ती गुंतागुंत संपते की नाही? चित्रपटगृह पुन्हा चालू होतं की नाही? हे बघत आपला जीव वरखाली होत रहातो!...
यूट्यूब वरचा या चित्रपटातल्या महत्वाचा सीन तुम्हा सगळ्यांशी इथे शेअर करतोय! तो बघितल्यावर तो डालो करायचा की नाही? याचा निर्णय तुम्हालाच घेता येईल! काय? :-) 
डाऊनलोड केलात तर मला दुवा- लिंक हो!- द्यायला विसरू नका! तुम्ही माझ्यापेक्षा सहजतेने अशी लिंक शोधू शकता, मला माहिती आहे!
मागच्या पिढीतल्या लोकांजवळ लहानपणी गणेशोत्सवात आपण रस्त्त्यावरच्या पडद्यावर चित्रपट बघत होतो याच्या मनोरंजक आठवणी असतील.काळाचा महिमा अगाध आहे.आज आपण डालो करून हवे ते सिनेमे सहज बघू शकतो! नाही?
      आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!



   
 



Thursday, November 6, 2008

“द सिरियन ब्राईड”

खूप दिवसांपासून या सिनेमाबद्दल लिहायचं राहूनच जातंय.द सिरियन ब्राईड हा इस्त्रायली सिनेमा २००५ सालच्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमधे दाखवला गेला आणि आजतागायत डोक्यातून गेलाच नाही.दिग्दर्शन: इरान रिकलिस.२००४ साल हे त्याचं प्रदर्शन वर्षं.

ड्रुझ जमातीतल्या मोना या मुलीचा विवाह ठरलाय आणि तिला ती रहात असलेल्या गोलन टेकड्यांच्या परिसरात तिची बहिण पूर्वतयारीसाठी ब्युटीपार्लरमधे घेऊन जातेय या दृष्याने चित्रपटाची सुरवात होते.गोलन टेकड्यांच्या चढणीवरून त्या जात असताना पार्श्वभूमीवर लांबवर खूप खालच्या भागात असलेला हमरस्ता दिसतोय. गोलन टेकड्यांचा भाग आता इस्त्रायली अंमलाखाली आहे आणि तिथल्या मोनाचं लग्नं सिरियामधल्या एका प्रथितयश अभिनेत्याशी ठरलं आहे.ईस्त्रायल आणि सिरिया या देशांमधल्या घमासानीनंतर या दोन्ही देशांच्यामधे युनो कर्मचाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेला सैनिकी प्रदेश तयार करण्यात आलाय.विशेष कारणांसाठीच सीमारेषेचा पार करण्याची परवानगी दोन्ही देशांकडून मिळू शकते.मोनाला ६ महिने लागले आहेत ईस्त्रायली सरकारकडून गोलन टेकड्यांचा परिसर सोडायची परवानगी मिळवायला.एकदा तिने हद्द ओलांडली की तिला परतण्याची, आपल्या कुंटुंबाला भेट देण्याची संधी कदचित आयुष्यात मिळणार नाही आणि त्यामुळे ती विचारात पडलीय.दुसरीकडे तिला आपल्या होणाऱ्या नवऱ्याला जाणून घेण्याची संधीच मिळालेली नाही.अश्या मोठ्या तिढ्याने दिग्दर्शक सिनेमाला सुरवात करतो आणि एकापाठोपाठ एक अत्यंत उत्तम व्यक्तिरेखा सादर करू लागतो.

मोनाचे वडील सिरियाशी जुळवून घेणं या मताचे खंदे पुरस्कर्ते म्हणून नुकतेच इस्त्रायली तुरूंगात जाऊन जामीनावर बाहेर आलेत.त्यांच्या एका मुलाने जमातीविरूध्द जाऊन एका रशियन डॉक्टरशी लग्न केलंय तो बहिणीच्या लग्नासाठी येऊ घातलाय.त्याच्या येण्याबद्दल वडलांना गावातून इशारा मिळालाय.मोनाची बहिण एक अयशस्वी विवाहबंधनात असलेली मोठ्या दोन मुलींची आई आहे.या तिघींना त्या ट्राऊझर्स घालतात म्हणून मुक्त स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या समजलं जातं.ही बहिण समाजसेविका म्हणून प्रशिक्षण घेण्याच्या तयारीत आहे.तिच्या नवऱ्याचा परंपरागत व्यवसाय आहे खाटिकाचा.मोठ्या मुलीला इस्त्रायलभिमुख विचारसरणी असलेल्या घरातल्या मुलाशी लग्नं करायचं आहे आणि आईला असं वाटतं की तिनं अजून शिकावं जे आईला करायला मिळालं नाही.बापाला परंपरागत पुरूषी समाजव्यवस्थेतला कुटुंबप्रमुख म्हणून या सगळ्या प्रकाराने द्विधा मनस्थितीत टाकलंय.याच कुटुंबातला, नववधूचा आणखी एक भाऊ इटलीत व्यवसाय करतो आणि तो स्वच्छंदी आहे पण त्याच्या जीवनशैलीला समाज हरकत घेत नाही आणि त्याचवेळी रशियन महिला डॉक्टरशी लग्न केलेल्या त्याच्या भावाला मात्र समाज वाळीत टाकतो…

असा भला मोठा आणि तेवढाच गुंतागुंतीचा पट घेऊन दिग्दर्शक आपल्याला पुढे नेतो.आपण सहज या प्रवाहात सामील होतो.कुठेही आपल्याकडच्या अनेक कॅरेक्टर्स असलेल्या मालिकांप्रमाणे नीरसता तर येत नाहीच!

लग्नाच्या जेवणावळींनंतर वधूला इस्त्रायल-सिरिया सीमारेषेवर आणलं गेलंय आणि इथेच तिच्या पलिकडे जाण्यात विघ्नं येऊ लागतात.दोन्ही देशांमधल्या सरकारी कारवायांचा समर्पक आणि अपूर्व असा हा भाग दिग्दर्शकानं इथे साकारलाय.कुठलीही हाणामारी नसताना आपण श्वास रोखून हया नाट्याचे साक्षीदार होऊ लागतो.इस्त्रायली सरकारनं गोलन टेकड्यांवरच्या रहिवाश्यांच्या पासपोर्टवर ते इस्त्रायल सोडून जात आहेत असा शिक्का मारण्याच्या निर्णय नुकताच घेतला आहे तर सिरियन सरकार गोलन टेकड्यांना सिरियाचा परदेशव्याप्त परिसर मानते आहे.इस्त्रायल सरकारचा शिक्का असलेल्या पारपत्रांना सिरिया सरकार इस्त्रायलच्या सिरियाविरोधी हालचाली मानते आणि अश्या इमिग्रंट्सना प्रवेश नाकारते आहे!...

सरतेशेवटी इस्त्रायली अधिकारी करेक्शन फ्लुईडने आपला शिक्का पुसायला तयार होईपर्यंत युनोचा लायझन ऑफिसर मागेपुढे करत रहातो (दोघंही शेवटी माणसेच!) आणि आता हा प्रश्नं शांततामय मार्गाने सुटू पहातोय तर सीमारेषेवर एक वेगळंच उत्स्फूर्त नाट्य घडतंय!

नववधू आणि तिच्या संपर्कात असलेली तिची स्पष्टं विचारांची मोठी बहिण यांच्यातल्या विचारमंथनानंतर नववधू सगळी सूत्रं आपल्या हातात घेऊन काही पावलांचंच असलेलं सीमारेषेपलिकडचं ते अंतर ठामपणे चालत जाऊन पार करते.त्याचवेळी तिची मोठी बहिण सगळ्या समूहापासून दूर चालत निघते निश्चयाने, मनातली स्वप्नं साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या अदृष्य भिंती तोडून टाकण्याच्या निश्चयाने!...या शेवटच्या दृष्यात विशेषत: मोठ्या बहिणीचे क्लोजअप्स आणि तिच्या समूहपासून दूर जाण्याचा प्रवास दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या माध्यमातून इतक्या प्रभावीपणे दाखवतो की आपण त्याला सलाम करतो! नि:शब्द दृश्य परिणामकारक करण्याचं हे अफलातून कसब.हा सिनेमा वैश्विक आशय असलेला आहेच.राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि मानवी स्वभाव असं सगळं स्वच्छं आणि अत्यंत परिणामकारकतेनं आपल्यासमोर उभं रहातं.हे करणं खूप कठीण आहे.उत्तम व्यक्तिरेखा, तितकाच अप्रतिम अभिनय, गुंतागुंतीच्या पटात सगळ्याचं कडबोळं न होऊ देणं, सतत उत्कंठावर्धकता टिकवणं-अर्थात पटकथेची उत्तम वीण(लेखन:सुहा अराफ, इरान रिकलीस)-जे चित्रपटाचं मुख्य अंग हे हा चित्रपट आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतो.उत्तम सिनेमाची अपेक्षा असलेल्यांना आणखी काय पाहिजे? 

Sunday, April 6, 2008

मुतलुलुक-ब्लिस

मुतलुलुक- ब्लिस
हे एका तुर्की चित्रपटाचं नाव.परदेशी चित्रपटाचं नाव योग्यवेळी आठवणं, त्याचा योग्य उच्चार समजणं, तो समजल्यावर तो योग्य पध्दतीनं करता येणं हा सगळा नव्याने शाळेत जाण्यासारखा अनुभव असतो.
गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या (आणि दरवर्षी नेमाने होणाऱ्या)थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला उदघाटनाचा मान मिळाला होता.
मुतलुलुक चित्रपटाच्या पहिल्याच चौकटीत दिसतं एका निर्मनुष्य तळ्याच्या काठी कुशीवर पडलेलं एका वयात आलेल्या मुलीचं शरीर.चित्रपटाची नामावळ चालू होते आणि कॅमेरा तिच्यावर आवर्तनं घेत आणखी वर जाऊन दृष्याची पार्श्वभूमी उलगडत असताना, तळ्याचा निर्मनुष्य परिसर दाखवत असताना मुलीच्या ओटीपोटाजवळून बाहेर आलेली लांबलचक आणि सुकत चालेलेली रक्ताची रेघ दिसते.मुलगी जीन्स, ओव्हरकोट, बूट इत्यादी आधुनिक वेषात, संपूर्ण वस्त्रात आहे.
एक वृध्दत्वाकडे झुकलेला मेंढपाळ, आपल्या जनावरांना तिथे घेऊन आलेला तिला पहातो.तो तिला ओळखतो, ती शुध्दीवर असल्याचं त्याच्या लक्षात येतं.शरीर खांद्यावर टाकून तो तिला तिच्या घरी पोचवतो.
मुलीला वडील आहेत, सावत्र आई आहे.तिच्यावर प्रेम करणारी आजी आहे.मुलीला अत्याचाराबद्दल, तो करणाऱ्याबद्दल विचारलं जातं.ती काहीच सांगू शकत नाही.अश्यावेळी मुलीला दोषी ठरवणं, तिला शिक्षा करणं, ती शिक्षाही देहांताची नाहीतर परागंदा होण्याची-पर्यायानं मरणसदृष्य आयुष्य आणि त्याचा शेवट प्रत्यक्ष मरण! हे समाजाचे नियम! मुलीला एका अंधाऱ्या कोठडीत ठेवलं जातं.सावत्र आईला अश्या अवस्थेत मुलीला घरी आणल्याचं आवडलेलं नाही.त्या मुलीवर अत्याचार होऊन तिला घरी आणलंय हे गावाचा सर्वेसर्वा आणि गावातल्या मोठ्या पिठाच्या गिरणीच्या मालकाला कळलं तर त्याचे परिणाम वाईट होतील ह्याची जाणीव सावत्र आई लगेच करून देते.बापाला तो विचार खातोय पण तरीही तो अत्याचारित मुलीला ठेऊन घेतो.असं करणं धोकादायक आहे.
मुलीचे वडील तरीही हे गावच्या त्या सर्वेसर्वाच्या कानी घालतात, ते सर्वेसर्वाचे नोकर आहेत.त्यांचं एकमेकात नातंही आहे.सर्वेसर्वाला हे अजिबात मंजूर नाही.गावकऱ्यांनी बोटं दाखवावित असं कुणी का करावं?ती मुलगी ही तर त्या सर्वेसर्वाच्या जवळच्या नात्यातली आहे!तिनं परागंदा व्हायलाच हवं हे सर्वेसर्वा ठासून सांगतो.तिला दूर कुठेतरी सोडून यायला हवं.हे काम कोण करणार?
सर्वेसर्वाचा मुलगा आर्मीत आहे.नुकताच एक पराक्रम गाजवून तो मानाने गावात परतलाय. तरणाबांड,कोवळा,मजबूत देहयष्टीचा.तो त्या मुलीचा दादा लागतो(पहिला,दुसरा कझीन).या मुलावर त्या मुलीला दूर कुठेतरी सोडून येण्याची जबाबदारी टाकली जाते.सर्वेसर्वाचा तो अत्यंत लाडका मुलगा आहे.तो वडलांचं सगळं ऐकणारा आहे.समाजाचा कायदा म्हणून मुलीला दूर शहरात नेऊन मारून टाकणं आवश्यक आहे असं वडील सांगतात आणि आर्मीतला जवान मुलगा ते ऐकतो.
अंधारकोठडीत मुलीला भल्या पहाटे गरम पाण्यानं स्नान घातलं जातं, सजवलं जातं, बळी देण्याआधी असावा तसा हा विधी! आजी मुलीला समाजातल्या स्त्रीच्या स्थानाबद्दल सांगते.दोघीही आणि इतर कुणीही त्यांच्या अवस्थेत काहीही बदल करू शकत नाही!
सतत सद्‍गदित होणाऱ्या त्या कोवळ्या मुलीच्या ओठावर आणि चेहेऱ्यावर माझ्यावर अत्याचार झाला यात माझी काय चूक हे रास्त भाव आहेत.आपल्यावर अत्याचार कोणी केला हे सांगायला ती अजिबात तयार नाही किंबहुना त्या प्रसंगाच्या उल्लेखानेच ती पूर्णपणे कोसळते.
अत्याचारित मुलीला तिचा लांबचा दादा, सर्वेसर्वाचा आर्मीतला मुलगा शहरात घेऊन आलाय.तो सर्वप्रथम आपल्या सख्ख्या मोठ्या भावाकडे येतो.या भावाचं आणि वडलांचं-सर्वेसर्वाचं वाकडं आहे.मुलीला घेऊन आपला धाकटा भाऊ शहरात का आलाय हे मोठ्या भावाला, वहिनीला समजतं.मोठा धाकट्याला परावृत्त करू पहातो पण धाकटा आपल्या मिशनवर ठाम आहे.
आपल्या नात्यातल्या मामे.मावसबहिणीला (कझीन) मारायचं कसं यावर मात्र त्या आर्मीमेनचं गाडं अडू लागतं.तो तिला गोळी घालू शकत नाही.तिला खूप उंचावर नेऊन उडी मारायला लावणं, ढकलणं त्याला अवघड होऊ लागतं.कुणालाही असं फुकाफुकी मारणं शक्य नाही या निष्कर्षापर्यंत तो येतो.
सर्वेसर्वा कुठलंही रिस्क घ्यायला तयार नाही.त्याची माणसं या दुकलीच्या मागावर आहेत…
एवढ्या विस्तृत स्वरूपात ही गोष्ट सांगायचं एक कारण म्हणजे या चित्रपटाचं अतिशय व्यवस्थित आणि तर्कशुध्द नॅरेशन- दिग्दर्शकाचं गोष्ट सांगणं! पुढे जाऊन कदाचित जाणवेल की अरे, ही गोष्ट हिंदी सिनेमासारखीच आहे, तरीही ती सामान्य हिंदी चित्रपटापेक्षा वेगळी आहे.ती चांगल्या पध्दतीने सांगितली गेली आहे.यात हिंदी सिनेमावर टीका करण्याचा उद्देश नाही अलिकडे बनणारे बरेच हिंदी चित्रपट सर्वार्थाने वेगळे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच…
पुढे मग त्या जवानाची कुतरओढ चालू होते, मुलीला कळतं की आपल्याला इथे का आणलं गेलंय, आपला लांबचा मोठा भाऊ आपलं काय करणार आहे.मुलगा मिशन पार पाडतो की नाही हे पहाण्यासाठी माणसं मागावर आहेत.मुलगा मुलीला वाचवण्याचा निर्णय घेतो.
आता या दोघांना जीव वाचवत रहाणं, निरूद्देश पळत रहाणं भाग आहे.फिशरीजचा धंदा असलेला त्या मुलाचा एक मित्र त्याला आपल्या क्रूझवजा घरात सहारा देतो.त्याचा माग लागून दोघांना तिथूनही पळावं लागतं.मग नवा किनारा.एका उमद्या फिलॉसॉफीच्या प्राध्यापकाच्या क्रूझवर दोघेही नोकर म्हणून रहातात.दोघांनी आपली खरी ओळख कायम लपवून ठेवली आहे.त्या प्राध्यापकाला सहवासाने ते कळतं.प्राध्यापक घटस्फोटीत आहे, आपण कोण आहोत(आयडेंटिटी क्रायसिस) या गहन प्रश्नानं त्याला ग्रासलंय.मुलगी अत्यंत निरागस आहे.प्राध्यापक त्या दुर्लभ निरागसतेच्या प्रेमात पडतो.मुलाला वाटतं या दोघांचं काही चालू झालंय.तो तिच्या तोंडात मारतो, प्राध्यापकावर हल्ला करतो.प्राध्यापक त्याच्या या कृतीच्या अर्थ त्याला समजावून देतो.तू त्या मुलीत आणि तुम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडला आहात ह्या वास्तवाचा स्वीकार करा!…
हा सगळा भाग उपकथानकाचा,मूळ गोष्टीपासून दूर गेल्यासारखं वाटलं ना?पण मजा अशी की याही सगळ्या प्रकारात आपण चांगलेच गुंतले जातो.डिटेलींग हा चित्रपटाच्या संहितेतला अतिशय महत्वाचा भाग आहे.उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधे तो नेहमीच दिसतो(उदा.मदर इंडिया-मेहबूब खान).शिवाय आपण मूळ गोष्टीपासून फारकत कधीच घेत नाही.त्या दोन तरूण मुलामुलींच्या चित्रपटातल्या कॅरेक्टरला न्याय देऊन पुढच्या घडामोडी(डेवलपमेंट्स)दाखवणं, योग्य पध्दतीने विशद करणं(डिटेलींग) खूप महत्वाचं आहे.गोष्टीच्या पुढच्या भागाची ती मागणी आहे.
तो प्राध्यापक त्या कोवळ्या जीवांना आधार देतो,धाडस देतो.ती दोघं निर्भयतेने एकमेकांसह पुढचं आयुष्य घालवायचं ठरवतात.किनारा गाठण्यासाठी एका वेगळ्या होडीतून ती दोघं निघतात. प्राध्यापक त्याना निरोप देतो.मुलगा होडी मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याच वेळी त्या उघड्या होडीच्या दुसऱ्याबाजूला बसलेल्या मुलीला मागच्या मागे तिचं तोंड दाबून पळवण्यात येतं! आली तशी ती मोटरबोट मुलीचं अपहरण करून निघून जाते!
प्रेक्षकांनाही हा चांगलाच शॉक आहे.शॉक हे नुसतंच गिमिक आहे का?चित्रपटासाठी आवश्यक गोष्टींपैकी ते एक आहे हे नक्की! योग्य वेळी,प्रेक्षक बेसावध असताना असा योग्य धक्का येणं चित्रपटाच्या रंजकतेत नक्कीच भर घालतं.आणि तसंच भर घालतं परमोच्च बिंदूवर धक्का देऊन उघडणारं रहस्य! ते ही या चित्रपटात आहे…
आता सुरू झालाय चित्रपटाचा उत्कर्षबिंदू- क्लायमॅक्स! मुलीचं अपहरण, अपहरणकर्त्यांचा पिछा करणारा तो मुलगा.हा सगळा जथ्था किनारा गाठतो.किनाऱ्यावरच्या झुडपातून जीव घेऊन धावणारी मुलगी, तिच्या पाठोपाठ तो मुलगा, त्यांच्या मागावर ते अपहरणकर्ते.मुलाच्या असं लक्षात येतं की अपहरणकर्त्यांना त्याला अजिबात धक्का लावायचा नाही, मुलीला मात्र त्याना शिल्लक ठेवायचंच नाहिये!मुलगा आता जीव तोडून मुलीला वाचवायच्या प्रयत्नात आहे.मुलगी जीव तोडून धावत पाण्यात शिरते.तिला गोळी लागू नये म्हणून तिला कव्हर करणारा मुलगा तिच्यापाठोपाठ.मुलगी एका क्षणी कोसळून पडते.तिला वाचवताना तो मुलगा तिच्यावर पडतो. मुलगी घुसमटते आणि ओरडते, “काका!माझ्यावर पुन्हा अत्याचार करू नका!”
हे ऐकून तो मुलगा हादरतो, बघणारे आपणही हादरतो.रहस्य उघड करण्याच्या अचूक बिंदूवर रहस्यभेद झालाय.त्या मुलाचा बाप,तो सर्वेसर्वा हाच तो अत्याचारी आहे! संपूर्ण चित्रपटात जेव्हा जेव्हा अत्याचारी कोण हा प्रश्न मुलीसमोर उपस्थित होतो तेव्हा ती काहीच बोलत नाही.पुढच्या त्या दोघांच्या जवळकीत तो मुलगाही तिला खोदून खोदून विचारतो पण आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही असं ती स्पष्ट करते.ते रहस्य अश्या रितीने उघड झालंय.
यानंतरही चित्रपट तार्किकतेची कास सोडत नाही हे महत्वाचं.मुलगा बापासमोर रिव्हॉल्व्हर रोखून उभा राहतो पण तो गोळी चालवू शकत नाही,ते इतकं सोपं कुठे असतं!
मुलीचा बाप, सर्वेसर्वाचा भावासमान नातेवाईक(त्याचा नोकर-व्यवस्थापक) अत्याचारी सर्वेसर्वाला गोळ्या घालतो.त्याचं कलेवर साचलेल्या पीठाच्या ढीगावर पडून त्यातलंच एक होऊन रहातं…
म्हटलं तर फारशी वेगळी नसलेली ही गोष्ट पण उत्तम पध्दतीने सांगितलेली.खूप चांगल्या अर्थाने सगळी व्यावसायिक मूल्यं असलेला हा चित्रपट आणि तरी सामाजिक वास्तवही परिणामकारकपणे मांडणारा!तुर्की चित्रपटांना फार मोठी परंपरा नाही ही पार्श्वभूमी लक्षात घेता हा चित्रपट महत्वाचा आहे जाणवतं.मुतलुलुकचा दिग्दर्शक- अब्दुल्ला ओगझ.
चित्रविश्वात पुन्हा भेटूच.नववर्ष शुभेच्छा!
गुढीपाडवा, ६ एप्रिल २००८