मुतलुलुक- ब्लिस
हे एका तुर्की चित्रपटाचं नाव.परदेशी चित्रपटाचं नाव योग्यवेळी आठवणं, त्याचा योग्य उच्चार समजणं, तो समजल्यावर तो योग्य पध्दतीनं करता येणं हा सगळा नव्याने शाळेत जाण्यासारखा अनुभव असतो.
गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या (आणि दरवर्षी नेमाने होणाऱ्या)थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला उदघाटनाचा मान मिळाला होता.
मुतलुलुक चित्रपटाच्या पहिल्याच चौकटीत दिसतं एका निर्मनुष्य तळ्याच्या काठी कुशीवर पडलेलं एका वयात आलेल्या मुलीचं शरीर.चित्रपटाची नामावळ चालू होते आणि कॅमेरा तिच्यावर आवर्तनं घेत आणखी वर जाऊन दृष्याची पार्श्वभूमी उलगडत असताना, तळ्याचा निर्मनुष्य परिसर दाखवत असताना मुलीच्या ओटीपोटाजवळून बाहेर आलेली लांबलचक आणि सुकत चालेलेली रक्ताची रेघ दिसते.मुलगी जीन्स, ओव्हरकोट, बूट इत्यादी आधुनिक वेषात, संपूर्ण वस्त्रात आहे.
एक वृध्दत्वाकडे झुकलेला मेंढपाळ, आपल्या जनावरांना तिथे घेऊन आलेला तिला पहातो.तो तिला ओळखतो, ती शुध्दीवर असल्याचं त्याच्या लक्षात येतं.शरीर खांद्यावर टाकून तो तिला तिच्या घरी पोचवतो.
मुलीला वडील आहेत, सावत्र आई आहे.तिच्यावर प्रेम करणारी आजी आहे.मुलीला अत्याचाराबद्दल, तो करणाऱ्याबद्दल विचारलं जातं.ती काहीच सांगू शकत नाही.अश्यावेळी मुलीला दोषी ठरवणं, तिला शिक्षा करणं, ती शिक्षाही देहांताची नाहीतर परागंदा होण्याची-पर्यायानं मरणसदृष्य आयुष्य आणि त्याचा शेवट प्रत्यक्ष मरण! हे समाजाचे नियम! मुलीला एका अंधाऱ्या कोठडीत ठेवलं जातं.सावत्र आईला अश्या अवस्थेत मुलीला घरी आणल्याचं आवडलेलं नाही.त्या मुलीवर अत्याचार होऊन तिला घरी आणलंय हे गावाचा सर्वेसर्वा आणि गावातल्या मोठ्या पिठाच्या गिरणीच्या मालकाला कळलं तर त्याचे परिणाम वाईट होतील ह्याची जाणीव सावत्र आई लगेच करून देते.बापाला तो विचार खातोय पण तरीही तो अत्याचारित मुलीला ठेऊन घेतो.असं करणं धोकादायक आहे.
मुलीचे वडील तरीही हे गावच्या त्या सर्वेसर्वाच्या कानी घालतात, ते सर्वेसर्वाचे नोकर आहेत.त्यांचं एकमेकात नातंही आहे.सर्वेसर्वाला हे अजिबात मंजूर नाही.गावकऱ्यांनी बोटं दाखवावित असं कुणी का करावं?ती मुलगी ही तर त्या सर्वेसर्वाच्या जवळच्या नात्यातली आहे!तिनं परागंदा व्हायलाच हवं हे सर्वेसर्वा ठासून सांगतो.तिला दूर कुठेतरी सोडून यायला हवं.हे काम कोण करणार?
सर्वेसर्वाचा मुलगा आर्मीत आहे.नुकताच एक पराक्रम गाजवून तो मानाने गावात परतलाय. तरणाबांड,कोवळा,मजबूत देहयष्टीचा.तो त्या मुलीचा दादा लागतो(पहिला,दुसरा कझीन).या मुलावर त्या मुलीला दूर कुठेतरी सोडून येण्याची जबाबदारी टाकली जाते.सर्वेसर्वाचा तो अत्यंत लाडका मुलगा आहे.तो वडलांचं सगळं ऐकणारा आहे.समाजाचा कायदा म्हणून मुलीला दूर शहरात नेऊन मारून टाकणं आवश्यक आहे असं वडील सांगतात आणि आर्मीतला जवान मुलगा ते ऐकतो.
अंधारकोठडीत मुलीला भल्या पहाटे गरम पाण्यानं स्नान घातलं जातं, सजवलं जातं, बळी देण्याआधी असावा तसा हा विधी! आजी मुलीला समाजातल्या स्त्रीच्या स्थानाबद्दल सांगते.दोघीही आणि इतर कुणीही त्यांच्या अवस्थेत काहीही बदल करू शकत नाही!
सतत सद्गदित होणाऱ्या त्या कोवळ्या मुलीच्या ओठावर आणि चेहेऱ्यावर माझ्यावर अत्याचार झाला यात माझी काय चूक हे रास्त भाव आहेत.आपल्यावर अत्याचार कोणी केला हे सांगायला ती अजिबात तयार नाही किंबहुना त्या प्रसंगाच्या उल्लेखानेच ती पूर्णपणे कोसळते.
अत्याचारित मुलीला तिचा लांबचा दादा, सर्वेसर्वाचा आर्मीतला मुलगा शहरात घेऊन आलाय.तो सर्वप्रथम आपल्या सख्ख्या मोठ्या भावाकडे येतो.या भावाचं आणि वडलांचं-सर्वेसर्वाचं वाकडं आहे.मुलीला घेऊन आपला धाकटा भाऊ शहरात का आलाय हे मोठ्या भावाला, वहिनीला समजतं.मोठा धाकट्याला परावृत्त करू पहातो पण धाकटा आपल्या मिशनवर ठाम आहे.
आपल्या नात्यातल्या मामे.मावसबहिणीला (कझीन) मारायचं कसं यावर मात्र त्या आर्मीमेनचं गाडं अडू लागतं.तो तिला गोळी घालू शकत नाही.तिला खूप उंचावर नेऊन उडी मारायला लावणं, ढकलणं त्याला अवघड होऊ लागतं.कुणालाही असं फुकाफुकी मारणं शक्य नाही या निष्कर्षापर्यंत तो येतो.
सर्वेसर्वा कुठलंही रिस्क घ्यायला तयार नाही.त्याची माणसं या दुकलीच्या मागावर आहेत…
एवढ्या विस्तृत स्वरूपात ही गोष्ट सांगायचं एक कारण म्हणजे या चित्रपटाचं अतिशय व्यवस्थित आणि तर्कशुध्द नॅरेशन- दिग्दर्शकाचं गोष्ट सांगणं! पुढे जाऊन कदाचित जाणवेल की अरे, ही गोष्ट हिंदी सिनेमासारखीच आहे, तरीही ती सामान्य हिंदी चित्रपटापेक्षा वेगळी आहे.ती चांगल्या पध्दतीने सांगितली गेली आहे.यात हिंदी सिनेमावर टीका करण्याचा उद्देश नाही अलिकडे बनणारे बरेच हिंदी चित्रपट सर्वार्थाने वेगळे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच…
पुढे मग त्या जवानाची कुतरओढ चालू होते, मुलीला कळतं की आपल्याला इथे का आणलं गेलंय, आपला लांबचा मोठा भाऊ आपलं काय करणार आहे.मुलगा मिशन पार पाडतो की नाही हे पहाण्यासाठी माणसं मागावर आहेत.मुलगा मुलीला वाचवण्याचा निर्णय घेतो.
आता या दोघांना जीव वाचवत रहाणं, निरूद्देश पळत रहाणं भाग आहे.फिशरीजचा धंदा असलेला त्या मुलाचा एक मित्र त्याला आपल्या क्रूझवजा घरात सहारा देतो.त्याचा माग लागून दोघांना तिथूनही पळावं लागतं.मग नवा किनारा.एका उमद्या फिलॉसॉफीच्या प्राध्यापकाच्या क्रूझवर दोघेही नोकर म्हणून रहातात.दोघांनी आपली खरी ओळख कायम लपवून ठेवली आहे.त्या प्राध्यापकाला सहवासाने ते कळतं.प्राध्यापक घटस्फोटीत आहे, आपण कोण आहोत(आयडेंटिटी क्रायसिस) या गहन प्रश्नानं त्याला ग्रासलंय.मुलगी अत्यंत निरागस आहे.प्राध्यापक त्या दुर्लभ निरागसतेच्या प्रेमात पडतो.मुलाला वाटतं या दोघांचं काही चालू झालंय.तो तिच्या तोंडात मारतो, प्राध्यापकावर हल्ला करतो.प्राध्यापक त्याच्या या कृतीच्या अर्थ त्याला समजावून देतो.तू त्या मुलीत आणि तुम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडला आहात ह्या वास्तवाचा स्वीकार करा!…
हा सगळा भाग उपकथानकाचा,मूळ गोष्टीपासून दूर गेल्यासारखं वाटलं ना?पण मजा अशी की याही सगळ्या प्रकारात आपण चांगलेच गुंतले जातो.डिटेलींग हा चित्रपटाच्या संहितेतला अतिशय महत्वाचा भाग आहे.उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधे तो नेहमीच दिसतो(उदा.मदर इंडिया-मेहबूब खान).शिवाय आपण मूळ गोष्टीपासून फारकत कधीच घेत नाही.त्या दोन तरूण मुलामुलींच्या चित्रपटातल्या कॅरेक्टरला न्याय देऊन पुढच्या घडामोडी(डेवलपमेंट्स)दाखवणं, योग्य पध्दतीने विशद करणं(डिटेलींग) खूप महत्वाचं आहे.गोष्टीच्या पुढच्या भागाची ती मागणी आहे.
तो प्राध्यापक त्या कोवळ्या जीवांना आधार देतो,धाडस देतो.ती दोघं निर्भयतेने एकमेकांसह पुढचं आयुष्य घालवायचं ठरवतात.किनारा गाठण्यासाठी एका वेगळ्या होडीतून ती दोघं निघतात. प्राध्यापक त्याना निरोप देतो.मुलगा होडी मार्गस्थ करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याच वेळी त्या उघड्या होडीच्या दुसऱ्याबाजूला बसलेल्या मुलीला मागच्या मागे तिचं तोंड दाबून पळवण्यात येतं! आली तशी ती मोटरबोट मुलीचं अपहरण करून निघून जाते!
प्रेक्षकांनाही हा चांगलाच शॉक आहे.शॉक हे नुसतंच गिमिक आहे का?चित्रपटासाठी आवश्यक गोष्टींपैकी ते एक आहे हे नक्की! योग्य वेळी,प्रेक्षक बेसावध असताना असा योग्य धक्का येणं चित्रपटाच्या रंजकतेत नक्कीच भर घालतं.आणि तसंच भर घालतं परमोच्च बिंदूवर धक्का देऊन उघडणारं रहस्य! ते ही या चित्रपटात आहे…
आता सुरू झालाय चित्रपटाचा उत्कर्षबिंदू- क्लायमॅक्स! मुलीचं अपहरण, अपहरणकर्त्यांचा पिछा करणारा तो मुलगा.हा सगळा जथ्था किनारा गाठतो.किनाऱ्यावरच्या झुडपातून जीव घेऊन धावणारी मुलगी, तिच्या पाठोपाठ तो मुलगा, त्यांच्या मागावर ते अपहरणकर्ते.मुलाच्या असं लक्षात येतं की अपहरणकर्त्यांना त्याला अजिबात धक्का लावायचा नाही, मुलीला मात्र त्याना शिल्लक ठेवायचंच नाहिये!मुलगा आता जीव तोडून मुलीला वाचवायच्या प्रयत्नात आहे.मुलगी जीव तोडून धावत पाण्यात शिरते.तिला गोळी लागू नये म्हणून तिला कव्हर करणारा मुलगा तिच्यापाठोपाठ.मुलगी एका क्षणी कोसळून पडते.तिला वाचवताना तो मुलगा तिच्यावर पडतो. मुलगी घुसमटते आणि ओरडते, “काका!माझ्यावर पुन्हा अत्याचार करू नका!”
हे ऐकून तो मुलगा हादरतो, बघणारे आपणही हादरतो.रहस्य उघड करण्याच्या अचूक बिंदूवर रहस्यभेद झालाय.त्या मुलाचा बाप,तो सर्वेसर्वा हाच तो अत्याचारी आहे! संपूर्ण चित्रपटात जेव्हा जेव्हा अत्याचारी कोण हा प्रश्न मुलीसमोर उपस्थित होतो तेव्हा ती काहीच बोलत नाही.पुढच्या त्या दोघांच्या जवळकीत तो मुलगाही तिला खोदून खोदून विचारतो पण आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही असं ती स्पष्ट करते.ते रहस्य अश्या रितीने उघड झालंय.
यानंतरही चित्रपट तार्किकतेची कास सोडत नाही हे महत्वाचं.मुलगा बापासमोर रिव्हॉल्व्हर रोखून उभा राहतो पण तो गोळी चालवू शकत नाही,ते इतकं सोपं कुठे असतं!
मुलीचा बाप, सर्वेसर्वाचा भावासमान नातेवाईक(त्याचा नोकर-व्यवस्थापक) अत्याचारी सर्वेसर्वाला गोळ्या घालतो.त्याचं कलेवर साचलेल्या पीठाच्या ढीगावर पडून त्यातलंच एक होऊन रहातं…
म्हटलं तर फारशी वेगळी नसलेली ही गोष्ट पण उत्तम पध्दतीने सांगितलेली.खूप चांगल्या अर्थाने सगळी व्यावसायिक मूल्यं असलेला हा चित्रपट आणि तरी सामाजिक वास्तवही परिणामकारकपणे मांडणारा!तुर्की चित्रपटांना फार मोठी परंपरा नाही ही पार्श्वभूमी लक्षात घेता हा चित्रपट महत्वाचा आहे जाणवतं.मुतलुलुकचा दिग्दर्शक- अब्दुल्ला ओगझ.
चित्रविश्वात पुन्हा भेटूच.नववर्ष शुभेच्छा!
गुढीपाडवा, ६ एप्रिल २००८
1 comment:
Very good review
Post a Comment