romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, June 26, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१३)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२ आणि त्यानंतर...
अंकितकडे प्रेमभरे पहात राहिलेल्या कडलेंना प्रेमपान्हाही फुटतो.
"आले- आले- अंकुडीऽऽ.. काय काय आणलं बाजारातून?"
अंकितला गौरीबरोबर ओढला जातोय. तो कडल्याना चिडवून दाखवतो.
"ऍऽ ऍऽ तुम्हाला काय करायचंय? तुम्हालॅ कॅय-"
तोपर्यंत गौरी अंकित, खांद्यावरच्या अवनीसह आपल्या घराच्या दिशेला आणि निमा तत्परतेने तिला पाठ करून विरूद्ध ब्युटीपार्लरला जाण्याच्या दिशेला निघून जाताएत. निघता निघता निमाचा कडलेना शेवटचा डोस.
"तुम्हाला यायचं तर या रितिक, नाहीतर इथेच बसा- मी चाल्ले-"
ती निघून चाललीए हे कडलेंच्या जरा उशीराच लक्षात आलंय. नेहेमीप्रमाणे.
"निमू निमू आलो गं! थांब! एकटीच कशी सोडू तुला भर बाजारात निमूऽऽ"
गौरीचा पुरता पिट्ट्या पडलाय अंकित, अवनीला सांभाळता सांभाळता. ती दमलेली. अंकितची भुणभुण चालूच आहे.
"ममा- ममा- माजं बेब्लेड राहिलं बेब्लेड!"
’अरे हो रे बाबा! नुसती कटकट लावलीए-"
"ममा- बेब्लेऽऽड-"
"अरे किती आणायची किती तुला बेब्लेड"
"ममाऽऽ"
गौरीचा पेशन्स संपलाय.
"आता मलाच फिरव- अय्यो देवा चावी? चावी कुठेय?"
"ममा चावी- नाय बेब्लेड- बेब-"
"चूप रे!" कडेवरच्या अवनीला सांभाळत, हातातल्या सामानात गौरीची चावीची शोधाशोध चालू होते.
"आता होती- पर्समधे- बापरे हा- महेश- घेऊन गेला की काय- काय रे पपानं नाय ना नेली? गेली कुठे?.. उगी उगी अवनीऽ- आलं हां बाबू घर- आलं- हो‍ऽहो- गप गं! - गप- चावी- चावी- अरे अंकित! हे काय?"
अंकित शांतपणे आपल्या खिशातून चावी काढून आईच्या हातात देतो.
"हे काय? तुझ्याकडे कशी आली?"
"पपानी दिली- जाता जाता-"
गौरी घ्यायला जाते तो हुलकावणी देतो.
"अरे दे! दे रे! गाढवा खेळतोएस काय?"
"आधी बेब्लेड!-"
"दिलं बाबा दिलं-"
"कधी?-"
"देते रे बाबा देते उद्या! नक्की! माझ्या राज्या दे आता चावी! लवकर आत जायचंय! सगळं करायचंय! दे! दे!"
गौरीला अंकितकडून चावी खेचूनच घ्यावी लागलीए.
"ममा उद्या नाय दिलंस ना बेब्लेड-"
"अरेऽऽ देत्ये रे बाबा देत्ये! ये आत ये! टीव्ही लावू- टीव्ही?"
"मी लावतो! मला येतो लावता!" अंकित टीव्ही लावतो.
"च्यला च्यला पप्पूऽऽ आता ममं कलायचंऽऽ कलायचं नाऽऽ" गौरी कडेवरच्या अवनीला चुचकारत किचनमधे निघून जाते...
तोपर्यंत बाहेर सोसायटीच्या आवारात एक स्त्री दाखल झालीय. चकमक लावलेला भडक जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलेली, हेअरस्टाईल केलेली, कपाळावर, गालावर बटा काढलेली, चेहेर्‍यावर मेकप लावलेली. ही स्त्री लचकत मुरडत कुठलं तरी घर शोधतेय. घुटमळतेय. ओढणीने वारा घेत हातातला पत्ता बघतेय. मग नक्की ठरवून जावडेकरांच्या फ्लॅटची डोअरबेल दाबते.
"ममाऽ इस्त्रीवालाऽ"
"आलेऽ रे बाबाऽऽ" गौरी कडेवरच्या अवनीला थोपटत किचनमधून बाहेर आलीय, " झोप पपू. झोपायचं!-"
दार उघडते आणि बाहेर बघतच रहाते.
"क- कोण- कोण पाहिजे?"
स्त्री दाराबाहेरच उभी राहून उजव्या हाताच्या तर्जनीने लाडीक खुणा करून ’आत येऊ का?’ असं विचारतेय.
"अगं बाईऽ वोऽ होळीऽ- होळीको टाईम है अजून-"
स्त्री लाडिकपणे पण विचित्र हसते. खुणा चालूच.
"अगं बाई हे काय? रस्ता चुकलाय का तुम्ही?" तोपर्यंत अंकित उत्सुकतेने धावत दाराजवळ आलाय.
"बघू बघू कोणेय? हॉ हॉ हॉ..."
"अंकित- ए- ए- अरे- गप!"
स्त्री आता अंकितला बघून मोहरल्यासारखे विचित्र हावभाव करते.
"पयचाना नई पिंट्या?ऽ"
"ये चल चल पुढे हो! मी- मी- पिंट्या बिंट्या कोणी नाही!"
"ओऽ स्मॅर्ट बओय!.. भाबी भाबी मला ओळकलं नाई- ओळकलं नाई?"
"नाही हो खरंच नाही.. ह ह.. देवाशप्पत-"
"मी हॉ हॉ- मंजू!ऽऽ" दोन्ही हात समोर पसरून उभी रहाते.
"आईशप्पत नाही हो मंजू- बिंजू- कोणी-"
अंकित स्त्रीला न्याहाळत राहिलेला. अचानक ओरडतो.
"टी. मंजूऽऽ"
"बलोबल! अगदी बलोबल पिंटूऽऽ" मंजू अंकितला जवळ घ्यायला जाते.
"अरे हाड हाड!"
"अंकित! अरेऽ- ए-"
"असू द्ये! राहू द्ये भाबी! मी लालन पालन बालन संघातून-"
"ओळखलं! ओळखलं! पुढे टी लावल्यावर लगेच ओळखलं!.. ह ह.. काय घेणार?"
मंजू तीन बोटं नाचवतेय, "इतके!"
"ह ह.. तीनशे?-"
"हजार!" तीन बोटं मंजू जोरजोरात नाचवू लागलीए. गौरी आता ओरडतेच.
 "तीन हजारऽऽ- जेवणा-खाणा सकट?"
मंजू लगेच पाठ फिरवते, " देता की जाऊ?"
गौरीला आता जिवाच्या आकांतानं ओरडावं लागतं.
"ओऽबाईऽऽ नका जाऊऽऽ नका जाऊऽऽ"
गौरी स्तब्ध होऊन मंजूला नीट न्याहाळते. ’ध्यान आहे, काय करेल काय माहिती’ असं मनात पुटपुटते.
"जाऊ नका बाई.. जाऊ नका!"
"ठीक हाय!" मंजूनं एक हात कंबरेवर ठेऊन एक झांसू पोज घेतलीए.
"ओ पण.. द्या नं काहीतरी सूट- कन्शेशन- द्या नं!"
"हीच सूट!"
"ओ द्याना प्लीज थोडीतरी सूट द्या ना, बाईऽऽ-"
"चला भाबी! चला आपण दोघीही जाऊ या का? त्या मंदिराशेजारी उभे राहू. द्या द्या करत!"
"असं हो काय करता मंजू!"
"मी अजून काहीच केलेलं नाहिए!" मंजू गौरीच्या डोळ्यात रोखून बघत राह्यलीए.
"म्ह- म्हणजे?"
"हॉ हॉ हॉ... म्हंज्ये उंटाच्ये पंज्ये!"
"येऽ हड! उंटाच्ये नाय! उंटाच्ये नाय, वागाच्ये वागाच्ये!" अंकित नाचायला लागलाय. मंजू त्याचा गालगुच्चा घेते.
"हो ले हो बबुडीऽऽ"
"ये गप! रंग लागेल तुझ्या मेकपचा!"
"अरे बाबा अंकूऽऽ" तो काय करेल-बोलेल या विचाराने गौरी अस्वस्थ झालीए.
"असू दे हो! गोगोड आहे पोगा! गोगोड! ये ये!"  मंजू अंकितचा हात धरते.
"ये सोड! सोड!"
"हॉ हॅ हू खू खू.. तर मी काय म्हणत होतो- होता- होते- होते- तुम्ही अजून काहीच दाखवलं नाहिए मला?"
"काऽऽय? काय म्हणायचंय-"
"ओऽ ओऽ सॉरीऽ हा हा मोठा ना तुमचा! गोगोड- आणि ही ही तुमच्या कडेवर- घाबरू नको भाबी. हिला बगत होत्ये मी- गुड्डीला- गुड्डी गुड्डी- डि-डी-डू-डू-" गौरी मान वळवून वळवून दमलीय.
"अहोऽ झोपलेय तीऽ ह ह ह.. झोपलेय हो.."
"हो नईऽ किती स्वीऽऽट! चला तर ह्या दोघांना दाखवून झालं! आता काय दाखवता- घर दाखवता का घर- नक्की आहे ना माजं कॉन्ट्रक्ट! सांगा ना भाबीऽऽ-"
"हो हो हो!- काय दिवे लावणारे कुणास ठाऊक- आहे ना आहे! चला चला- दाखवते ना घर- दाखवते-"
गौरी अजूनही मंजूच्या अपरोक्ष तिला चमत्कारिक नजरेने न्याहाळतेय.
"ह ह ह... चला ना चला- हेऽऽ किचन-"
"ओऽ मामाय! बगू! बगू!ऽऽ"
गौरी, तिच्या कडेवरची अवनी, मागोमाग मंजू, तिच्या मागावरच असल्यासारखा अंकित अशी सगळी वरात किचनमधे जाते. बाहेर येते. हॉलभर फिरते. मग बेडरूममधे शिरते. मंजू बारकाईने सगळं न्याहाळतेय. विशेषत: किंमती वस्तू वगैरे. बेडरूम गाठल्यावर मंजूची नजर जास्तच शोधक होते. कपाटाचं हॅंडल वगैरे ती गौरीच्या नकळत हलवून बिलवून बघतेय. गौरी तिला सूचना द्यायच्या नादात हॉलमधे आलीय तरी मंजू अजून बेडरूममधेच शोधक नजरेने वावरतेय. अंकित ती संधी साधून आईला एकटी गाठतो.
"ममा ममा तो काका आहे काकाऽ"
"आं??" गौरीला चटकन जे समजलं नाहिए ते मंजूनं नेमकं ऐकलंय. ती वेगात अंकितच्या दिशेने धावते.
"आलेऽ बबुडी बबुडी बबुडीऽऽ"
मंजू पकडायला आलेली बघताच अंकित पळत सुटलेला. दोघांची घरभर पळापळ. पकडापकड. मधे ’अरे, अरे’ करत त्यांचे धक्के खाणारी गौरी, अवनीला कडेवर घेऊन, दमलेली, घामाघूम होत असलेली...                               क्रमश: 

Sunday, June 17, 2012

’"झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ नावाचा समूह!

  • मित्रमैत्रिणींनो नमस्कार!
    गेल्याच आठवड्यात ८ जूनला ’"झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ या समूहाची सुरवात फेसबुकवर केली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा हव्या आहेत!
    "अभिलेख" वर मी या आधी झुलवा नाटकाबद्दल लिहिलं आहेच. पण ते अगदी वैयक्तिक स्वरूपाचं लेखन आहे. त्यापेक्षा सघन काही करावं, त्याची नोंद आंतरजालावर रहावी अशा इच्छेने मी त्यानंतर झपाटत गेलो. त्यात अनेकांना सहभागी करून घेणं आवश्यक आहे असं जाणवत गेलं. 
    आजच्या आशयघन नाटकांच्या पडत्या काळात एका कादंबरीवरून रूपांतरीत केलेलं, लोककलाप्रकाराच्या वेगळ्या बाजात बसवलेलं, पदार्पणातच राष्ट्रीय पातळीवर सादर झालेलं, नृत्य, संगीत, नाट्य याचबरोबर देवदासींची समस्या, त्यांच्या नुसत्या शोषणाची समस्या नव्हे तर त्यातल्या एका तरूणीची शिक्षण घेण्यासाठीची धडपड, तगमग "झुलवा" त मांडली गेली आहे. 
    हे नाटक १९८७ सालापासून साधारण २००५ पर्यंत एकूण चारवेळा रंगमंचावर आलं! वेगवेगळ्या संचात! 
    २०१२ साल हे "झुलवा" रंगमंचावर येऊन गेल्याचं पंचविसावं- रौप्यमहोत्सवी वर्षं!
    प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रवासातलं "झुलवा" हे एक महत्वाचं नाटक आहे. 
    चार पर्वात विस्तारलेले "झुलवा" शी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, संस्था, प्रेक्षक यांच्यात एक समन्वयाचं साधन तयार व्हावं, त्यांना नाटकासंबंधी विचार, आठवणी प्रकट करता याव्यात, त्यांनी वेळोवेळी केलेलं काम सूचिबद्ध व्हावं, आंतरजालावर या नाटकासंबंधातली माहिती संग्रहित व्हावी, इच्छुक नव्या पिढीला ती उपलब्ध व्हावी. नाटक विषयाचा अभ्यास करणार्‍याला त्यातून निश्चित लाभ व्हावा. सरतेशेवटी या सगळ्याच्या संदर्भाने देवदासींच्या समस्येवर आणखी विचारमंथन व्हावं असं मनापासून वाटलं. 
    "झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक- या नावाचा समूह सुरू करण्याचा उद्देश हा असा होता.
    देवदासींच्या समस्येवरचं हे पहिलंच मराठी नाटक आहे का? आज या समस्येवरचा माध्यमांमधला प्रवास सातत्याने अशा विषयांवरच्या येत असलेल्या चित्रपटांची सुरवात करून देणारा ठरला का?.. यावरही यामुळे प्रकाश पडू शकेल.
    "झुलवा" नाटकाच्या संदर्भातूनच केलेलं लेखन, प्रतिक्रिया, छायाचित्रं इत्यादी साहित्य ही या समूहाची आवश्यकता!
    हा ओपन ग्रुप आहे. नियमावली प्रमाणे तो चालवाला जाईल. तो कुणा एकाची जबाबदारी राहू नये, रहाणार नाही.
    यात वैयक्तिक दोषारोप, हेवेदावे यासंदर्भातलं लेखन अजिबात नको! मूळ धागा सोडून केलेल्या निष्फळ चर्चा नकोत! सकारात्मक टीका, समीक्षा, चर्चा असायला काहीच हरकत नाही!  
    "झुलवा" या नाटकासंबंधी एक डेटाबेस तयार व्हावा ही इच्छा सगळ्या "झुलवा" प्रेमींच्या मनात आहे असं वेळोवेळी जाणवलं आहे. वेगवेगळ्या ग्रुपमधे वेगवेगळ्या वेळी झुलवा नाटक सादर केलेले कलाकार आणि प्रेक्षक यांचं इथे अत्त्यंत मन:पूर्वक स्वागत!
    हळूहळू हा समूह आकार घेईल तेव्हा इथे माहितीचा साठा तयार होईल. अभ्यासकांनाही यातून लाभ होऊ शकेल. 
    तेव्हा मंडळी, ’"झुलवा" "Zulwa" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ हा समूह खाली दिलेल्या दुव्यावर साकार होत आहे: https://www.facebook.com/help/groups
    समूह सुरू होतो. तो वाढण्यासाठी आवश्यकता असते अनेकांच्या शुभेच्छांची, पाठिंब्याची, सहकार्याची.
    आपल्या सूचनांचं आणि दुरूस्त्यांचं मनापासून स्वागत!
    आभार!

Tuesday, June 12, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१२)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११ आणि त्यानंतर...
संध्याकाळ अगदी दाटून आलीए. तरीही एक तिरीप उन्हाची, गूढ अंधारं होत जाणारं वातावरण अधिक गूढ करणारी. कडले, गुप्तहेरासारखे- डोक्यावरच्या विगवर फॅशनेबल कॅप घालून स्वत:च्या घरातून बाहेर पडलेत. दबकत दबकत, उगाच मानेला गुप्तहेरी झटके देत, इकडे तिकडे बघत. शेजारच्या जावडेकरांच्या फ्लॅटकडे वळून बघत पाठमोरे होतात. कसलासा वास आल्यासारखं हुंगतात. चेहेर्‍यावर प्रचंड बेरकी हास्य आणून वळतात. ते हास्य त्यांच्या दृष्टिने बेरकी पण दिसतं अधिकाधिक विनोदी, वेडगळ. अशावेळी त्याना स्वत:शीच बोलायची सवय आहे.
"जागा रहा जागा रहा त्रस्त समंधा!- अर्रर- त्रस्त समंध तो मी- नाही तो हा- हा वेडगळ महेश! महेश जावडेकर! महेशाऽऽ रात्र वैर्‍याची आहे, जागा रहाऽ- छ्या: हा गद्धा झोपतोय- झोपतोय नुसता. कामावरच्या पाळ्या म्हणे पाळ्या! शिफ्ट्स! मुलांना सांभाळण्यासाठी! अरे आम्ही काय म्येलो होतोऽऽ- ख्यॅक खॉक- कडले जोरात ओरडलात की हल्ली खोकला येतो तुम्हाला- अगं आई गं- सांभाळून!"
कडले मग एकदम अस्मानात डोळे फिरवून गूढपणे चमत्कारिक हसण्याचा प्रयत्न करतात. वेगळाच आवाज निघून स्वत:च दचकतात. मग छातीजवळ चोळू लागतात.
"जासूसी करणं म्हणजे आधी तब्येत सांभाळायला हवी कडलेऽ- अरे पण या जावडेकरांना काय धाड भरली होती म्हणतो मी- का नाही ठेवलं मुलांना या- या निमामावशीच्या पाळणाघरात. माझ्या कुशीत. सांभाळायला!"
पुन्हा कडल्यांना गुप्तहेरगिरीचा ऍटॅक येतो आणि ते डोळे विरूद्ध दिशेने फिरवून चेहेरा, डोळे गूढ करत विचित्र हसण्याचा प्रयत्न करतात.
"झोपर्‍या महेऽऽश! जागा तरी कधी रहाशील? आणि- आणि येणारी संकटं तरी कशी टाळशील?"
पुन्हा विजयी हसण्याचा प्रयत्न करतात पण तोंडातून आवाजच फुटत नाही. त्याऐवजी पुन्हा खोकल्याची उबळ येते आणि दम लागतो.
" हाऽ हा आहाऽ.. जासूसी हाऽ करायची पण आधी तब्येत सांभाळायची रितिक!"
स्वत:भोवती अचानक गिरकी घेतात. शरीराच्या गिरकीतल्या वाकड्या अवस्थेतच थांबून महेशच्या घराकडे बघत बोलू लागतात.
"पण राज्या- महेशा- हा कडल्या आहे इकडे भक्कम- अगं आई गं- तोल जातोय- पण आहे! आहे भक्कम! तोच सोडबणार तुला या सगळ्या राड्यातून, लोच्यातून, कशाकशातून-"
पुन्हा एक स्टाईलिश दिखाऊ गिरकी स्वत:भोवती घेतात. अचानक लख्ख उजेड पडतो.
"अरे! व्हॉट इज धिस?"
स्वत:च्या पायाखाली, स्वत:भोवती कौतुकाने बघत रहातात.
"बघा बघा कडले! काय करू शकता तुम्हीऽऽ- अं-हां- नको! नको! हसायला जाऊ नका कडले! नको! सध्या तब्येत सांभाळा! तब्येत मजबूत तो हसना पचास! व्वा! व्वा! कडले प्रतिभावानही झालाऽत! म्हणी रचता! त्याही हिंदीत!! व्वा वा वा-वा - व- व-"
अचानक त्यांची गाडी रूळावरून घसरू लागते. त्यांचं लक्ष गेलंय तेव्हा त्यांच्या घराचा ग्रीलचा दरवाजा उघडून निमा- कडल्यांची बायको- उभी आहे. हळूहळू कडल्यांची ट्यूब पेटू लागते.
"त- त- तू लावलीस काय ट्यूबलाईट बाहेरची- म्ह- म्हणून- उजेड- मी म्हणतोय- म्ह- म्ह- म्ह-"
"पाडलाय तुम्ही तेवढा खूप आहे उजेड. आता मी लावते दिवे!- त्या दिवट्याने सोडले फटाके माझ्या घरात- आणि आता हा माझा फटाका- वॉ- वॉ- कडलॅ- वॉ- तब्यॅत- प्रतिभॉ-"
निमा खरंतर ज्याम चिडून कडलेंची नक्कल करतेय पण कडल्यांना ते कौतुक वाटतंय.
"हे काय गं निमू! असं काय करायचं- रागवायचं-"
"अर्‍ये काय पण ध्यान! अहोऽऽ ती कॅप आणखी कशाला घातलीए त्या- त्या- विगवर-"
"शू: अगं हळू- हळू- असं भर आवारात मला- काढतो, काढतो. तुला नाही नं आवडत कॅप! काढतो-काढ-"
"हॉऽ हॉऽ हॉऽ निघाला विगऽऽ- काय पण जासूस!"
"असं काय गं निमा-"
"लाजतात कसले‌ऽऽ चला! शेवटचं पोर केव्हाच गेलं त्याच्या घरीऽ वाजले किती? बाई गं! ब्युटी पार्लर बंद होणार तुमच्या या पोरकट चाळ्यांच्या नादात. येताय का तुम्ही माझ्याबरोबर? का लावताय इथेच दिवे?"
"थोडसं थांब गं! नुकताच कित्येक दिवसांनी माझ्यातला गुप्तहेर जागा झालाय.. निमू‍‍ऽ इथे आता शेजारी जावडेकरांकडे अशी व्यक्ति येणार आहे जिच्यामुळे-"
"डोंबल! कोण येणार आहे यांच्याकडे?"
"शू: हळू गं हळू-"
"कॅय छू: छू: -मी काय घोडं मारलंय यांचं तर घाबरू? उपकार समजा पोलिस कंप्लेंट नाय केली! नायतर खडे फोडायला लागले असते आयशप्पत-"
"निमू‍ऽ निमूऽ बायकांनी- विशेषत: सुंदर बायकांनी- तुझ्यासारख्या- असं मवाली पुरूषांसारखं बोलू नई-"
"अरे हुऽऽड!- ते ऐनवेळी तुम्हीच शेपूट घातलं नसतं नेहेमीसारखं- ज्याऊद्ये- जाऊद्ये- म्हणून तर-"
"शू: अगं अगं अशी चव्हाट्यावर- माझी अब्रू-"
"मला नाही अब्रू- माझं नाही झालं नुकसान- नाही झाला माझ्या धंद्यावर- पाळणाघराच्या- परिणाम-"
"शू: शू: अगं केवढ्या मोठ्यामोठ्याने-"
निमा आता चटाचटा हाताच्या चुटक्याच वाजवू लागते.
"आरे ज्याव! नाय करून टाकली यांची-"
कडले कासावीस होत गेलेत. ते सारखे जावडेकरांच्या घराकडे बघू लागतात.
"अगं आत घरात ते- त्यांनी ऐकलं -बिकलं तर-"
निमा जोरात कपाळावर हात मारून घेते.
"घ्या! हे तुमचं हेरखातं-"
कडले कावरेबावरे झालेत.
"का? का- का- काय झालं?-"
"डोंबल! ती टवळीऽ तिच्या त्या दिवट्या आगलाव्या, फटाकेफोड्या पोराला घेऊन उलथलीए शॉपिंगला! कडेवर बाळ पण आहे!"
"कसलं -कसलं -कसलं शॉपिंग?"
"अरेऽऽबाबाऽऽ मला काय माहीऽऽत?"
"असं काय! -असं काय?"
"होऽहो असंच!- आणि तिचा तो कावळाऽ"
"का- का- को- को- कोण- का- का- कावळा-"
"अरे भल्या माणसाऽऽ आता तू कशाला मला क-का ची बाराखडी म्हणून दाखवतोएस?"
"मी- मी- मी-"
"अर्‍ये तो!- तो झोपरा कावळाऽ तोऽ नवरा तिचाऽ- पाळीपाळीने घरी रहाणारा आणि पाळीपाळीने ऑफिसला जाणारा-"
"च्यक च्यक आळीपाळीने गं!-"
"तेच ते! तो उलथलाय रात्रपाळीला!.. आता पडला उज्येड?"
"असं होय!.. पण तू- तू- तुला कसं माहित? तुला कसं माहित?"
"किचनच्या खिडकीतून आख्खं जग दिसतं मला! उगाच तुमच्यासारखं आछं आछं करत जासूसी नाय करावी लागत- आगं आई गं बाई!"
"क- का- का- बाराखडी दाबा आता कडले- निमू! निमू! तुला आता काय झालं?"
निमा हातातल्या घड्याळाकडे बघतेय.
"जगबुडी झाली. ढगफुटी झाली. सव्वीस जुलै झाली सगळीकडेऽ माझं ब्युटी पार्लर बंद झालं! नाही- नाही- कसं बंद होईल- मागच्या वेळी साडेसातनंतरही उघडं होतं- अं? ह्यांऽऽ"
बोलता बोलता निमाला समोर गौरी दिसते, मुलांना घेऊन घराकडे येत असलेली. निमा गर्रकन तिला पाठमोरी होते आणि निमा तडक चेहेरा फिरवून आपल्या फ्लॅटकडे चालू पडते. मागे अंकित रेंगाळतोय आणि त्याच्याकडे प्रेमभरे बघत, रेंगाळत राहिलेत कडले..                                                                                                          क्रमश:
   
            

Saturday, June 2, 2012

एक बाग...

एक मंदिर ह्या, या आधीच्या लेखांकानंतर एक बाग हा लेखांक अगदी अपरिहार्य. असं माझ्या मनात होतं. दोन्ही लेखांकातला अवकाश मात्र चांगलाच लांबला. तर.. ही एक बाग त्या एका मंदिरा पासून अगदी हाकेच्या अंतरावर. तिथे प्रत्यक्ष गेल्यावर हा, या दोन स्थळांच्या जवळीकीचा योगायोग जरा स्तिमितच करतो. मग एक सूक्ष्म विचार येतो अमृतसर या शहराच्या भागधेयाचा.

एक बाग..  एक मंदिर.. 
एक धर्म.. एक स्वातंत्र्य.. 
आणि बाकी इतिहास.. 
कशाचा?... सामान्यांच्या संहाराचा??..

धर्मयुद्धाचा किंवा स्वातंत्र्ययुद्धाचा एखादा महत्वाचा तुकडा असलेल्या घटना. जालियांवाला बागेतला जनरल डायरचा हैदोस असेल किंवा ऑपरेशन ब्ल्यू स्टार असेल. या घटना परिस्थितीचा अपरिहार्य परिपाक असतात. एकूण इतिहासात अशा घटनांची कमी नाही. या दोन्ही घटनांची तुलना करायची का? तेही या लेखांकाचं लक्ष्य नाही. पण जाणवणारं साम्यही नाकारता येत नाही. विशेषत: सामान्यांचा संहार. सगळ्याच दृष्टिनं होणारा. त्रासदायक होऊ लागतो. ते अमुक एका ध्येयाच्या मार्गावरचं बलिदान जरूर ठरत असेल. त्याचं दु:ख बोचत रहातं खरं..
जालियांवाला बागेच्या कमानीतून प्रवेश करतानाच ते ठळकपणे जाणवू लागतं. सुरवातीच्या मार्गिकेत आहेत त्या नरसंहारी इतिहासाचे पुरावे. इथे फोटो काढायला मज्जाव आहे. जालियांवाला बागेतला नरसंहार, पेटून होळी झालेलं शहर, नागरिकाला जवळ जवळ नग्न करून त्याच्या पार्श्वभागावर ब्रिटीश सैनिकांचे उठत असलेले कोरडे, भर रस्त्यातली फाशी अशा कृष्णधवल छायाचित्रांच्या मोठ्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत. जुनी पत्रं आहेत. हरामखोर ब्रिटीश अधिकार्‍यांची, सरकारची. तसंच स्वातंत्र्य सैनिकांचे, नेत्यांचे लेख आहेत जुन्या वर्तमानपत्रांमधले. स्कॅन इमेजेस लॅमिनेट करून दर्शवलेल्या स्वरूपात. पुस्तकात वाचलेल्या इतिहासापेक्षा या प्रतिमांमधून दिसणारा इतिहास अंगावर काटा आणतो. रक्त खरंच पेटवतो. त्या छोट्या, अंधार्‍या मार्गिकेत तयार झालेल्या प्रदर्शन स्वरूपातल्या सभागृहात आपण उजवीकडून डावीकडे कधी फिरत गेलो ते कळत नाही. एवढा मोठा पल्ला पार पाडताना श्वास रोखलेला रहातो. आपण गांधीजींचं निवेदन वाचतो. जनरल डायरचं त्या घटनेच्या कितीतरी नंतरचं ’शक्य असतं तर अजून माणसं मारली असती!’ असलं पराकोटीचं राक्षसी वक्तव्य वाचतो. त्याचा म्हातारा झालेला फोटो- स्कॅन प्रतिमा- बघतो. सरतेशेवटी क्रांतिकारी उधमसिंगाचा फोटो आणि त्याचं कार्य वाचतो. हिंसेला अखेर हिंसेनंच प्रत्त्युत्तर द्यावं लागतं हे ऐतिहासिक सत्य डोळ्यासमोर उभं रहातं. मग मनात एका बाजूला सुभाषबाबू उभे रहातात. एका बाजूला गांधी...
आजवर अनाम असलेले अनेक क्रांतिकारी इथे नावानिशी आणि प्रतिमांनिशी आपल्या चक्षूंसमोर उभे केलेले आहेत. एकादोघांची तर अंत्यदर्शनं आहेत. या एवढ्याशा अंधार्‍या मार्गिकेत माझ्यासारखे अनेक सामान्य अचंबित होतात, भेदरतात, राष्ट्रप्रेमाने भारून जातात, ब्रिटीश सत्तेबद्दल आणि पर्यायाने शोषणकर्त्यांविरूद्धचा पराकोटीचा तिरस्कार मनात भरून रहातो. बरोबरीने आत्ममग्न व्हायला होतं. आजूबाजूला गर्दी आणि आपण स्वत:च्या आत अगदी खोलवर पोचलेलो असतो. 
मनाचं खरंच काही खरं नसतं. त्या मार्गिकेतून पाय निघत नसतो आणि कुठेतरी गोध्रा दंगलीतला तो डोळ्यात पंचप्राण आणि अश्रू आलेला, हात जोडून भीक मागणारा, जखमी दंगलग्रस्त अगदी क्षणभरासाठी का होईना डोळ्यासमोरून तरळून जातो..
मागून रेटा चालू होतो. स्थलदर्शन पूर्ण व्हायचं असतं. अंधार्‍या मार्गिकेतून आता पुढे जाण्याची सूचना होत असते. मूळात बाग नसलेली एक बाग. जालियांवाला बाग. वस्तीतल्या काही घरांमधली मोकळी अंगणवजा जागा. ज्यात वस्तीकर या ना त्या सभेसाठी जमायचे.
आज एक प्रदर्शनस्थळ म्हणून उभ्या केल्या गेलेल्या प्रकाशमान हिरव्यागार बागेकडे आपण प्रस्थान करतो. अंधार्‍या मार्गिकेतून उन्हानं चांगल्याच उजळून निघालेल्या हिरव्याकंच बगिच्याकडे. एरवी सरकारी अखत्यारीतल्या स्थळांचं काही खरं नाही असं आपण म्हणतो. पण इथे रचनाच अशी झाली आहे- ती हेतूपूर्वक केली असेल असं वाटत नाही- की पाताळलोकातून भूलोकात यावं आणि आशेच्या किरणांवर स्वार होऊ लागावं तसं काहीसं होऊ लागतं. भविष्यात चांगल्या गोष्टीही असतात याची ग्वाही देणारी ही रचना वाटते खरी. हे सगळं माणूससापेक्षही असतं. त्या त्यावेळच्या आपापल्या भावना, स्थळांचे ते ते अर्थ लावत असतात.
खरंतर भरवस्तीतली ही बाग. पण यात खार भेटते, सुंदर पक्षी सुद्धा भेटतात. बागेच्या भोवतालात उभ्या असलेल्या विटांच्या भिंतीतली त्यावेळच्या अमानुष गोळीबाराची छिद्रं लक्ष वेधून घेतात. ती रेखांकीत केलेली आहेत. बागेचं प्रवेशद्वार रोखून केलेल्या या गोळीबाराचा लांबलचक पल्ला जाणवतो. अमानुष हिंसेच्या त्या अप्रत्यक्ष दर्शनानं पुन्हा मन पेटून उठतं.
 तोपर्यंत आपण त्या शहीदी कुव्याजवळ आलेलो असतो. गोळीबार सुरू झाल्यानंतर काय काय होईल या भीतीने अनेक महिलांनी आपापल्या मुलींसकट, बाळांसकट या कुव्यात उड्या ठोकल्या!
अलिकडचा.. रहावत नाही.. पण संदर्भ मनात जागून जातो.. अलिकडच्या एका दंगली जळीतात विशिष्ट धर्माच्या गरोदर महिलेवर बलात्कार करून तिचा गर्भ बाहेर काढून तो भाल्याच्या का तलवारीच्या पात्यावर टोचून मिरवला गेला होता.. वृत्तपत्रांच्या भाषेत इथे कथित महिला, कथित घटना इत्यादी म्हणायचं! आणि मिरवणार्‍यांना काय म्हणायचं? कथित राक्षस, कथित धर्मांध? आणि तो कथित की कसला पराकोटीचा धर्मांधी अविष्कार कुणा एका असहाय्य गरीब मातेवर? त्या महिलेला असला एखादा कुऑं जवळ करता आला असता तर किती बरं झालं असतं असं वाटलं नसेल?
जालियांवाला हत्याकांडातल्या हुतात्म्यांचं स्मारक आणि सरतेशेवटी एका खाजगी आस्थापनानं, स्वत:च्या जाहिरातीसाठी का होईना तेवत ठेवलेली अखंड अमरज्योति दिसते..
निघायची वेळ झालेली असते. मनातलं सगळं झाडून टाकून आपण पुन्हा एकदा हिरव्यागार, पशुपक्षी असलेल्या, उत्तम हुतात्मा स्मारक आणि प्रतिकात्मक ज्योत असलेल्या बागेवर नजर फिरवतो...
सुरवातीच्या त्या अंधार्‍या मार्गिकेतून आल्यामुळे असेल, नंतरची ही बाग आणखीनच उजळलेली वाटू लागते..
दुसर्‍या दिवशीचा कार्यक्रम आठवू लागतो.. अमृतसर शहराचं भागधेय पुन्हा एकदा जाणवतं. शहरापासून फक्त पस्तीस किलोमीटरवर आहे अत्तारी गाव. भारताच्या सीमेवरचं शेवटचं गाव आणि मग अत्तारी-वाघा बॉर्डर.
कुंडलीवर विश्वास असेल आणि शहराचीही एखादी कुंडली असत असेल तर अमृतसर शहराची कुंडली एकदा तपासून बघायला हवी..