romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, June 12, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१२)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११ आणि त्यानंतर...
संध्याकाळ अगदी दाटून आलीए. तरीही एक तिरीप उन्हाची, गूढ अंधारं होत जाणारं वातावरण अधिक गूढ करणारी. कडले, गुप्तहेरासारखे- डोक्यावरच्या विगवर फॅशनेबल कॅप घालून स्वत:च्या घरातून बाहेर पडलेत. दबकत दबकत, उगाच मानेला गुप्तहेरी झटके देत, इकडे तिकडे बघत. शेजारच्या जावडेकरांच्या फ्लॅटकडे वळून बघत पाठमोरे होतात. कसलासा वास आल्यासारखं हुंगतात. चेहेर्‍यावर प्रचंड बेरकी हास्य आणून वळतात. ते हास्य त्यांच्या दृष्टिने बेरकी पण दिसतं अधिकाधिक विनोदी, वेडगळ. अशावेळी त्याना स्वत:शीच बोलायची सवय आहे.
"जागा रहा जागा रहा त्रस्त समंधा!- अर्रर- त्रस्त समंध तो मी- नाही तो हा- हा वेडगळ महेश! महेश जावडेकर! महेशाऽऽ रात्र वैर्‍याची आहे, जागा रहाऽ- छ्या: हा गद्धा झोपतोय- झोपतोय नुसता. कामावरच्या पाळ्या म्हणे पाळ्या! शिफ्ट्स! मुलांना सांभाळण्यासाठी! अरे आम्ही काय म्येलो होतोऽऽ- ख्यॅक खॉक- कडले जोरात ओरडलात की हल्ली खोकला येतो तुम्हाला- अगं आई गं- सांभाळून!"
कडले मग एकदम अस्मानात डोळे फिरवून गूढपणे चमत्कारिक हसण्याचा प्रयत्न करतात. वेगळाच आवाज निघून स्वत:च दचकतात. मग छातीजवळ चोळू लागतात.
"जासूसी करणं म्हणजे आधी तब्येत सांभाळायला हवी कडलेऽ- अरे पण या जावडेकरांना काय धाड भरली होती म्हणतो मी- का नाही ठेवलं मुलांना या- या निमामावशीच्या पाळणाघरात. माझ्या कुशीत. सांभाळायला!"
पुन्हा कडल्यांना गुप्तहेरगिरीचा ऍटॅक येतो आणि ते डोळे विरूद्ध दिशेने फिरवून चेहेरा, डोळे गूढ करत विचित्र हसण्याचा प्रयत्न करतात.
"झोपर्‍या महेऽऽश! जागा तरी कधी रहाशील? आणि- आणि येणारी संकटं तरी कशी टाळशील?"
पुन्हा विजयी हसण्याचा प्रयत्न करतात पण तोंडातून आवाजच फुटत नाही. त्याऐवजी पुन्हा खोकल्याची उबळ येते आणि दम लागतो.
" हाऽ हा आहाऽ.. जासूसी हाऽ करायची पण आधी तब्येत सांभाळायची रितिक!"
स्वत:भोवती अचानक गिरकी घेतात. शरीराच्या गिरकीतल्या वाकड्या अवस्थेतच थांबून महेशच्या घराकडे बघत बोलू लागतात.
"पण राज्या- महेशा- हा कडल्या आहे इकडे भक्कम- अगं आई गं- तोल जातोय- पण आहे! आहे भक्कम! तोच सोडबणार तुला या सगळ्या राड्यातून, लोच्यातून, कशाकशातून-"
पुन्हा एक स्टाईलिश दिखाऊ गिरकी स्वत:भोवती घेतात. अचानक लख्ख उजेड पडतो.
"अरे! व्हॉट इज धिस?"
स्वत:च्या पायाखाली, स्वत:भोवती कौतुकाने बघत रहातात.
"बघा बघा कडले! काय करू शकता तुम्हीऽऽ- अं-हां- नको! नको! हसायला जाऊ नका कडले! नको! सध्या तब्येत सांभाळा! तब्येत मजबूत तो हसना पचास! व्वा! व्वा! कडले प्रतिभावानही झालाऽत! म्हणी रचता! त्याही हिंदीत!! व्वा वा वा-वा - व- व-"
अचानक त्यांची गाडी रूळावरून घसरू लागते. त्यांचं लक्ष गेलंय तेव्हा त्यांच्या घराचा ग्रीलचा दरवाजा उघडून निमा- कडल्यांची बायको- उभी आहे. हळूहळू कडल्यांची ट्यूब पेटू लागते.
"त- त- तू लावलीस काय ट्यूबलाईट बाहेरची- म्ह- म्हणून- उजेड- मी म्हणतोय- म्ह- म्ह- म्ह-"
"पाडलाय तुम्ही तेवढा खूप आहे उजेड. आता मी लावते दिवे!- त्या दिवट्याने सोडले फटाके माझ्या घरात- आणि आता हा माझा फटाका- वॉ- वॉ- कडलॅ- वॉ- तब्यॅत- प्रतिभॉ-"
निमा खरंतर ज्याम चिडून कडलेंची नक्कल करतेय पण कडल्यांना ते कौतुक वाटतंय.
"हे काय गं निमू! असं काय करायचं- रागवायचं-"
"अर्‍ये काय पण ध्यान! अहोऽऽ ती कॅप आणखी कशाला घातलीए त्या- त्या- विगवर-"
"शू: अगं हळू- हळू- असं भर आवारात मला- काढतो, काढतो. तुला नाही नं आवडत कॅप! काढतो-काढ-"
"हॉऽ हॉऽ हॉऽ निघाला विगऽऽ- काय पण जासूस!"
"असं काय गं निमा-"
"लाजतात कसले‌ऽऽ चला! शेवटचं पोर केव्हाच गेलं त्याच्या घरीऽ वाजले किती? बाई गं! ब्युटी पार्लर बंद होणार तुमच्या या पोरकट चाळ्यांच्या नादात. येताय का तुम्ही माझ्याबरोबर? का लावताय इथेच दिवे?"
"थोडसं थांब गं! नुकताच कित्येक दिवसांनी माझ्यातला गुप्तहेर जागा झालाय.. निमू‍‍ऽ इथे आता शेजारी जावडेकरांकडे अशी व्यक्ति येणार आहे जिच्यामुळे-"
"डोंबल! कोण येणार आहे यांच्याकडे?"
"शू: हळू गं हळू-"
"कॅय छू: छू: -मी काय घोडं मारलंय यांचं तर घाबरू? उपकार समजा पोलिस कंप्लेंट नाय केली! नायतर खडे फोडायला लागले असते आयशप्पत-"
"निमू‍ऽ निमूऽ बायकांनी- विशेषत: सुंदर बायकांनी- तुझ्यासारख्या- असं मवाली पुरूषांसारखं बोलू नई-"
"अरे हुऽऽड!- ते ऐनवेळी तुम्हीच शेपूट घातलं नसतं नेहेमीसारखं- ज्याऊद्ये- जाऊद्ये- म्हणून तर-"
"शू: अगं अगं अशी चव्हाट्यावर- माझी अब्रू-"
"मला नाही अब्रू- माझं नाही झालं नुकसान- नाही झाला माझ्या धंद्यावर- पाळणाघराच्या- परिणाम-"
"शू: शू: अगं केवढ्या मोठ्यामोठ्याने-"
निमा आता चटाचटा हाताच्या चुटक्याच वाजवू लागते.
"आरे ज्याव! नाय करून टाकली यांची-"
कडले कासावीस होत गेलेत. ते सारखे जावडेकरांच्या घराकडे बघू लागतात.
"अगं आत घरात ते- त्यांनी ऐकलं -बिकलं तर-"
निमा जोरात कपाळावर हात मारून घेते.
"घ्या! हे तुमचं हेरखातं-"
कडले कावरेबावरे झालेत.
"का? का- का- काय झालं?-"
"डोंबल! ती टवळीऽ तिच्या त्या दिवट्या आगलाव्या, फटाकेफोड्या पोराला घेऊन उलथलीए शॉपिंगला! कडेवर बाळ पण आहे!"
"कसलं -कसलं -कसलं शॉपिंग?"
"अरेऽऽबाबाऽऽ मला काय माहीऽऽत?"
"असं काय! -असं काय?"
"होऽहो असंच!- आणि तिचा तो कावळाऽ"
"का- का- को- को- कोण- का- का- कावळा-"
"अरे भल्या माणसाऽऽ आता तू कशाला मला क-का ची बाराखडी म्हणून दाखवतोएस?"
"मी- मी- मी-"
"अर्‍ये तो!- तो झोपरा कावळाऽ तोऽ नवरा तिचाऽ- पाळीपाळीने घरी रहाणारा आणि पाळीपाळीने ऑफिसला जाणारा-"
"च्यक च्यक आळीपाळीने गं!-"
"तेच ते! तो उलथलाय रात्रपाळीला!.. आता पडला उज्येड?"
"असं होय!.. पण तू- तू- तुला कसं माहित? तुला कसं माहित?"
"किचनच्या खिडकीतून आख्खं जग दिसतं मला! उगाच तुमच्यासारखं आछं आछं करत जासूसी नाय करावी लागत- आगं आई गं बाई!"
"क- का- का- बाराखडी दाबा आता कडले- निमू! निमू! तुला आता काय झालं?"
निमा हातातल्या घड्याळाकडे बघतेय.
"जगबुडी झाली. ढगफुटी झाली. सव्वीस जुलै झाली सगळीकडेऽ माझं ब्युटी पार्लर बंद झालं! नाही- नाही- कसं बंद होईल- मागच्या वेळी साडेसातनंतरही उघडं होतं- अं? ह्यांऽऽ"
बोलता बोलता निमाला समोर गौरी दिसते, मुलांना घेऊन घराकडे येत असलेली. निमा गर्रकन तिला पाठमोरी होते आणि निमा तडक चेहेरा फिरवून आपल्या फ्लॅटकडे चालू पडते. मागे अंकित रेंगाळतोय आणि त्याच्याकडे प्रेमभरे बघत, रेंगाळत राहिलेत कडले..                                                                                                          क्रमश:
   
            
Post a Comment