romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label नाटक. Show all posts
Showing posts with label नाटक. Show all posts

Monday, January 18, 2016

नजरेतून अभिव्यक्त होणं...

नजरेतून व्यक्त होणं हा कॅमे-यासमोरच्या अभिनयाचा महत्वाचा भाग आहे.
नजरेतून व्यक्त होणं, चेहे-यातून व्यक्त होणं, आवाजातून व्यक्त होणं, हातवारे, हालचालीतून व्यक्त होणं हे सोईसाठी सुटंसुटं समजलं गेलं तरी संपूर्ण देहातून व्यक्त होणं हे अभिनयाचं मर्म आहे.
एरवी एखादा एखाद्या अंगाने आपसुकच चांगला व्यक्त होत असतो. या कामात आपण यशस्वी होतोय हे त्याला जाणवू लागतं. तो बनचुका होऊ लागतो.
व्यावसायिक क्षेत्रात अशा एखाद्या यशस्वी अंगाची शैली बनते. लोक त्यावर फिदा होत असतात. ते करणारा स्वत:वर फिदा होऊ लागतो. मग ते हास्यास्पद होऊ लागतं.
पूर्णपणे भूमिकेत शिरणं, स्वत:चा संपूर्ण कायापालट करणं ही खूप मोठी साधना आहे. काही जणांमधे असं करण्याची क्षमता उपजतच असू शकते पण म्हणून सततच्या साधनेचं महत्व कमी होत नाही.
सर्वसाधारणत: भूमिका वठवण्याच्या दोन ठळक पद्धती मानल्या जातात. भूमिका काय आहे हे समजल्यावर आतूनच तिची तयारी चालू होणं. आधी आत्मा गवसणं आणि मग भूमिकेला शरीर मिळणं अशी एक पद्धती मानली जाते तर भूमिकेबद्दलच्या कलाकाराच्या आकलनानुसार  शरीर, आवाज, हावभाव आधी नक्की करुन भूमिकेच्या आत्म्यात शिरायचा प्रयत्न चालू करणं ही दुसरी पद्धती मानली जाते.
अभिनयात तंत्राचा भाग खूप आहे. केवळ उत्स्फूर्ततेवर कायम अवलंबून रहाता येणं शक्य नाही.
अभिनयासंदर्भात काही जण केवळ उत्स्फूर्ततेचा उच्चार करत असले तरी त्यानी तंत्र घोटवून अगदी सहज वाटावं इथपर्यंत मुरवलं असल्याचं ध्यानी येतं.
नजरेतून यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी संपूर्ण कायापालटाची गरज असते तरी नजरेचा वापर कसा करावा याचीही तंत्रे आहेत.
मी शिकलो ते एकांकिका नाटकं करत करतच. प्रत्यक्ष नाट्यशिक्षणवर्गातून शिकणं कायम मला हुलकावणी देत राहिलं.
पण मला सुरवातीलाच एक हाडाचा शिक्षक म्हणा, तालिम मास्तर म्हणा लाभला. नवीन माणूस अभिनयाला जरासा अनुकूल वाटला तर त्याला त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे कसा तयार करायचा हे कसब त्याच्याकडे होतं.
एका जुन्या जमान्यातली कालांतराने पडझड होऊन अज्ञातवासात गेलेली चित्रपटनायिका प्रमुख पात्र असलेल्या एकांकिकेत मी एक फारसा वाव नसलेली भूमिका करत होतो. लेखक-दिग्दर्शक तुलनेनं नवीन होता. माझ्याकडून त्याला हवं ते काढून काढून तो दमला. त्याचं आणि वर वर्णन केलेल्या हाडाच्या शिक्षक- तालिम मास्तराचं याबद्दल काही बोलणं झालं असावं. तालिममास्तर दुस-या दिवशी तालमीला आला. माझ्या सीनची तालिम सुरु झाली. चार पाच वाक्यांचा माझा काही भाग होता. ती वाक्यं मी कशी अभिव्यक्त करायची हे सांगत असताना त्याने नजरेचा प्रवास उलगडूनच दाखवला.
मी करत असलेलं पात्र नायिकेशी बोलत असतं असा प्रसंग होता. सुरवातीला त्या पात्राची नजर नायिकेच्या चेहे-यावर आहे. तिच्याशी बोलत असताना ते पात्र त्या दोघांच्या गतायुष्यात शिरतं. पात्राचा चेहेरा आणि त्याची नजर नायिकेच्या चेहे-यावरुन निघून प्रेक्षागृहावर प्रवास करु लागते. त्यानंतर ते पात्र त्या आठवणींमधे रमतं. नजर प्रेक्षागृहावर एका काल्पनिक बिंदूवर स्थिरावते. हरवते. या तंत्राचा सराव करायला लागल्यावर माझा ताण बराच कमी झाला. त्या प्रसंगापुरतं तरी मला भूमिकेच्या अंतरंगाकडे जाणं सोपं वाटू लागलं.
भूमिका केवळ ती सादर करणा-यालाच पटून चालत नाही तर समोरच्या प्रेक्षकांना ती पटवून द्यावी लागते. नजरेच्या प्रवासासंदर्भात पात्र गतकालात गेलं आहे, ते विचारात पडलं आहे, ते तंद्रावस्थेत गेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी यथार्थपणे सादर करण्याचं तंत्र असं एकिकडे पात्राला भूमिकेत शिरायला मदत करतं आणि प्रेक्षकाला वास्तवाजवळ नेतं. तालिममास्तर हे अचूक करुन दाखवायचा. समजावून सांगायचा...
कालांतराने एका मालिकेत काम करत असताना एका देखण्या नटाला कॅमे-यामागे आणि कॅमे-यासमोर पहाण्याची संधी मिळाली. कॅमे-यामागे तो सतत वात येईल इतपत बडबड, चेष्टामस्करी करत असायचा. हातात सीनचे कागद असायचे. कॅमे-यासमोर गेल्यावर मात्र त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला असायचा. भावदर्शन तर तो उत्तम करायचाच पण प्रेक्षकाला टीव्हीची चौकट नेमकी केवढी दिसते याचं चांगलं भान त्याला असावं. आपण कल्पिलेल्या त्या चौकटीच्या अवकाशात तो नजरेचा प्रवास मांडायचा. माॅनेटरवर तो सीन बघताना त्या सीनमधे तो करत असलेल्या पात्राला काय म्हणायचं आहे ते अचूक कळत असे. पुढे त्याला हिंदी महामालिका मिळाली. त्यात त्याचा हा प्रवास बघणं रंजक तर होतंच पण शिकवणारंही होतं...
नजरेत भय, आश्चर्य, भेदकता, अंगार इत्यादी ढोबळ भावना दाखवून लोकप्रिय होण्याचा एक काळ होता. त्याकालातले हरवलेले काही आजही सापडतील. पण नजरेतून व्यक्त होणं हे केवळ तेवढंच नक्कीच नाही.
नजरेचा यथार्थ वापर अभिनयात करताना, नजरेच्या प्रवासाचं हे तंत्र अभिनय करणा-याला भूमिकेच्या विचाराच्या सतत सान्निध्यात ठेवायला मदत करणारं आहे.
हे सगळं आठवलं एका ताज्या मालिकेतल्या एका तुलनेने नवोदित अभिनेत्रीला नजरेचा वापर यथार्थपणे करताना बघून... जे या माध्यमात विरळाच बघायला मिळतं...
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

Tuesday, April 28, 2015

मित्र, सुहृद, मार्गदर्शक...

 खरं तर हा उलटा प्रवास आहे... इथे प्रकाशित केलेलं आणखी वाचकवर्गासाठी इतरत्र प्रकाशित करतो आपण. एकटं वाटण्याच्या अवस्थेत आणि एकाकी न होण्याच्या प्रयत्नात काही ऋणानुंबध आठवतात. ते सहज पोचण्यासाठी आभासी जगात जवळचे झालेले, ज्ञात जगात आभासी झालेले इत्यादी इत्यादी, त्यांच्या त्यांच्या सवडीने का होईना आणि आभासी का होईना सहवेदनेत सामील होत असतात... त्यातून नवीन वास्तवातले ऋणानुबंधही अस्तित्वात येतात.. जग जवळही येतं, ते लांबही असतं... आभासीही असतं आणि वास्तवही असतं... माणूस आहे तोपर्यंत भोवताल असणार, जग असणार... त्याच्या अस्तित्वातली व्यामिश्रताही असणार.
भूतकाळातल्या अनेक सुहृदांना बरंच काही सांगायचं राहून गेलेलं असतं, आत्ता आवर्जून सांगावं असं काही... त्यावेळी सहज वाटणारं काही आता कृतज्ञतेच्या स्वरुपात दाटून येत असतं...
तुकड्या तुकड्यानं व्यक्त होण्याची सवय भिनत चाललेली असली तरी ते सगळं कुठेतरी संग्रहित असावं असंही वाटत असतं...
मूळात व्यक्त व्हायला माध्यम सहज हाताशी असतं...
असे काही तुकडे जोडण्याचा प्रयत्न... पुन:प्रकाशित स्वरुपात... 


माणसं जमवणारा- पेक्षा मुलं जमवणारा, समूह तयार करणारा, संघटनकौशल्य असलेला आणि अर्थातच नेता असणारा एक मित्र... उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनयाची उपजत देणगी असणारा, लेखक, दिग्दर्शक, निर्माता... उरापोटी धडपडून वर्षानुवर्षं प्रायोगिक संस्था चालवत रहाणारा... मी काहीही प्रयत्न न करता मला सामोरा आलेला, मला हाताला धरुन एकांकिकेच्या तालमीच्या हाॅलमधे घेऊन आलेला... मीच काय कोणीही बसून राहील, सहजासहजी उठणार नाही इतकं सहज मार्दव त्याच्या चालण्याबोलण्यात होतं... त्याचं बोट धरलं आणि मी त्या लखलखत्या गुहेत शिरलो...
त्यानं कै प्रा. कृ रा सावंत यांच्याकडे नाट्यशिक्षण घेतलं होतं... एकांकिका स्पर्धा तेव्हा उपनगरात जोशात होत्या... ग्रीक पद्धतीची नाटकं आणि पर्यायानं नाट्यशिक्षण हा सावंतसरांचा -आता ज्याला युएसपी असा शब्द आहे- तो होता... हा मित्र स्वत: हे रंगकर्मी अष्टपैलुत्व शिकला, त्याच्या शाळेतल्या त्याच्या बरोबरच्या, मागच्या वर्गातल्या, आमच्यासारख्या कित्येक, कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्यांना रंगमंचावर आणलं, तयार केलंच पण माजी विद्यार्थी संघासारख्या संस्थेला कार्यरत ठेवून या मुलांना सामाजिक कामाची ओळख करुन दिली... नेता असूनही मित्रत्वाचं नातं संपर्कातल्या लहानथोरांशी आजतागायत टिकवणं ही तुझी खासियत... तुझा 'समुद्रशिकारी' नाटकातला न-नायक, तुझं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्यसंकल्पना, उत्कृष्ट निर्मितीमूल्यं.. बघणा-या आम्हालाही स्वप्नवत होतं सगळं... शाळेच्या इमारत निधीसाठी त्यावेळी कोप-यातल्या उपनगरातल्या, आपल्या कोप-यातल्या वसाहतीत होणारे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग म्हणजे पर्वणी असायची... 'समुद्रशिकारी' बघताना मला त्या नाटकांची आठवण झाली होती... मग 'संभूसांच्या चाळीत' बघतानाही... सरकारी पुस्तक आणि प्रकाशने खात्यात तू असताना, ओल्ड कस्टम्स हाऊसमधे, दुपारच्या भेटींदरम्यान तू सतत अस्वस्थ आहेस हे जाणवायचं... ती सुरक्षित नोकरी तू सोडलीस, नव्याने संघर्ष केलास... पत्रकारितेसारख्या, तुला आवडणा-या पण त्यावेळी बेभरवशाच्या असलेल्या क्षेत्रात शिरलास...
आज तू जो काही आहेस त्या आधीचा प्रवास आम्ही जवळून पाहिलाय आणि त्या प्रवासाचा आणि तुझा अभिमान वाटतो संजय डहाळे...


...आयुष्यातला काळोखी काळ असतो. मित्राच्या, आपल्या. घनिष्ठता निर्माण होते. तसा एक मित्र होता. 'नेमाडे' हे नाव त्याच्याकडून पहिल्यांदा ऐकलं.. दोघेही ओवरड्यू 'कारे'. मला असं काही जवळचं वाचायला पहिल्यांदा सापडलं. मग अनुक्रमे 'चातुष्टयं' वाचणं, भारावणं आलंच... या मित्रानं मला एका उपक्षेत्राचा परिचय करुन दिला. हाताला धरुन नेलं. ही व्यावसायिक कामं होती... वाचन, विचार करणं, एकूण भान, मनन ह्या दृष्टिनं मी एका निश्चित वळणावर त्याच्यामुळे आलो...
त्याचं दु:ख माझ्या मानाने खूपचखूप दारुण होतं... मी सुरक्षित वातावरणात होतो त्या मानाने...
दु:ख असणं, गहिरं असणं आणि नंतर ते आपण जास्त गडद करत नेणं, कुठेतरी आत्मकरुणा आपला कब्जा घेते आहे की काय?... असं त्याच्या बाबतीत जाणवायला लागलं. माझं दु:ख त्यामानाने जेमतेम असून मी आत्मकरुणेत वहावतोय की काय असं वाटायला लागलं...
कालांतराने दोन ओंडके वेगळे झाले. त्यानंतर काही काळाने मला कळलं, त्यानं मला 'डिलीट' केलंय. आता ब्लाॅक करतात तसं... तो नेहेमी म्हणायचा अमुक एक कालाने मी त्यावेळचे घनिष्ठ संबंध स्वत:हून तोडून टाकतो आणि नवीन संबंध जोडतो... पहिल्यापासून मला असं काही घाऊक स्वरुपात करणं अघोरी वाटायचं... हे शक्य असतं?... हे आपल्याला, इतरांना सोपं जातं?... भावस्थितीची मशागत करायला हा योग्य, उत्तम उपाय आहे?...
आज तो चांगल्या पदावर काम करतो. अचानक रस्त्यात भेटला आणि त्याचा 'डिलीट' प्रतिसाद बघून तो मला पूर्वीसारखाच वाटला...
बाबा, सतीश तांबे वरचे काही प्रश्नं... या घटनेतला मित्र तुझा चांगला मित्र होता. एका व्यावसायिक क्षेत्रात तू, त्याला आणलंस असं तो म्हणायचा... तू माझा शेजारी होतास. तुझ्या 'छापल्या कविता' तेव्हा प्रकाशित झाल्या होत्या. तू कवि आहेस, विद्यापिठाचा सुवर्णपदक विजेता आहेस आणि हे तू कशाकशातून जाऊन केलएस ह्या माहितीमुळे तुझ्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाली. मला नोकरी लागल्यावर तू मला बोलवून याच पदावर राहू नकोस. पुढची परिक्षा, त्याचे फायदे सांगितलेस. एक जाहिरात उतरवून घ्यायला सांगितलीस. तो जमाना कटपेस्ट, फाॅरवर्डसेंडचा नव्हता...
आपण तिघे, कालांतराने एकदा भेटलो. हे सगळं तुला आठवेलच असं नाही. या भेटीत मी एका क्षेत्रात वहावत जाणारे एका क्षणी विमनस्क होतात, तसा होतो. तू तुझ्या प्रश्नांनी मला स्वत:चं पुनरावलोकन करायला प्रवृत्त केलंस... ’तुझं वय काय? आता तू कुठे आहेस? जिथे जायचंय तिथे आता तू कुठे असायला हवंस?...’
भानावर आणणं हे ख-या मित्राचं  काम असतं. तू अनेकांशी या स्वरुपाचं वागला असशील.
घनिष्टता, जवळीकीसारख्या प्रसंगांबरोबर हे प्रसंग आठवतात. आपला परिचय तरी होता. काही वेळा अकस्मात जुजबी ओळखीचा किंवा पूर्णपणे अनोळखी कुणी ख-या मित्राचं काम बजावतो हे आठवलं, लक्षात आलं तेव्हा 'मैत्र जिवाचे' चा अर्थ नव्याने कळला. आज स्टे कनेक्टेड वर्च्युअली असं असलं तरी या भिंतीचा उपयोग असा संवाद साधायला होतो हे लक्षात येतं आणि आनंद होतो..


कुवतीप्रमाणे जमेल ते करत राहिलो असताना मुख्य, महत्वाचा जोडधंदा कुणातरी अवलियाला पकडून समूहानं ख्या ख्या खी खी करत रहाण्याचा राहिला... तेव्हाही उच्चभ्रू की कसले भ्रू नटवे, नटव्या 'काय ह्ये' म्हणून हिणवत राहिल्या तरी घेतला वसा सोडला नाही... सोडणार नाही...
गजू तायडे, तुमच्या पोष्टी वाचून मला गतायुष्यातल्या माझ्या दोन मित्रांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही...
एक कै. सुहास बावडेकर, दुसरा रवि कुरसंगे...
सुहास जेजेला होता. कमल (शेडगे) त्याचा गुरु. त्याच्या खांद्यावर याचा हात. तो अरेतुरे करायचा म्हणून इथे शेडगेंचा उल्लेख एकेरी केला... एरवी त्यांचा मोठेपणा मी काय सांगू. ही दोस्ती टाइम्समधली. चित्रकार माळी, सायन्स टुडे करणारा नाना शिवलकर, अरविंद मुखेडकर... नानाचे भंकसचे किस्से रॅगिंगच्या जवळपास जाणारे. पायाला पँटवर दोरखंड बांधणारा... माळींच्या डब्यावर त्यानं काढलेलं हुबेहूब डालडाचं चित्रं, ते माळींना माहित नाही पण इतर सगळ्याना माहित. नानाची 'ष्टा' ने संपणारी अत्रंग म्हण... सुहास आमच्या परिसरातला भांडणाचा किस्सा सांगायचा. 'नून' हा शब्द एकानं वापरला म्हणून दुस-यानं वापरुन त्यात आख्खं खानदान कसं आणलं... आम्ही रिपीट प्रेक्षक रात्रीबेरात्री ख्या ख्या करत उभे...
दुसरा रवि... हाफ मर्डरमधे अंदर, आणिबाणीत समाजवाद्यांना भेटला जेलमधे... क्युबिझम चित्रशैलीत चित्रं काढायचा. 'झुलवा' चं नेपत्थ्य त्याने केलं. त्याहीपेक्षा धारावीतून जोगते, जोगतिणी तालमीत आणले त्याने... कीच, रांडपुनव हे त्या जमातीतले कुणालाही प्रवेश निषिद्ध असलेले विधी वामन (केंद्रे) ला दाखवले त्याने... संस्थेच्या डबक्यात इगोबिगोची लपडी होऊन वातावरण तंग झालं की तो संस्थेतल्या ए पासून झेड पर्यंत सगळ्यांच्या अप्रतिम नकला करायचा... आम्हाला ख्या ख्या पर्वणी... तो परे मधे कॅटरिंग इनचार्ज होता. दौ-यात जेवणाची सोय त्याची... सतीश काळसेकर, राजन बावडेकर यांनी भालचंद्र नेमाडेंची घेतलेली आणि नेमाडेंनी रिस्ट्रिक्ट केलेली पानबैठक चर्चगेटला कॅन्टिनवरच्या अर्ध्यामाळ्यावरच्या रविच्या केबिनमधे झाली होती. त्यात माझ्यासारख्याला प्रवेश मिळाला रविमुळे... चाळीशीनंतर त्यानं लफडं केलं, मग लग्न केलं दुसरं. सध्या मुक्काम 'मामाचा गाव' ला...
असे दोन अत्रंग... माझ्यावर जीव होता त्यांचा असं वाटून माझी छाती फुगवून आणि कितीतरी इंच होते...
आपण केलेलं काम दुस-याला दाखवायची हौस प्रत्येक काही करणा-याला असते... म्हणून असेल पण ज्या आपुलकीने हे माझे मित्र मला आपली कामं दाखवायचे त्यातून माझ्यासारख्या कलेशी काही संबंध नसणा-याला किंवा नंतर नटवा बनून चमकायचीच खुजली निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना, त्यांच्यामुळे मला वेगळं जग बघायला मिळालं...
सुहास आमच्या नगरातल्या गणेशोत्सवात वेगवेगळ्या गणेशमंदिरांच्या प्रतिकृती इतक्या बेमालूम करायचा की भल्याभल्यांची गर्दी जमायची आणि तो त्यांच्यासमोर आम्हाला त्यातले बारकावे समजाऊन सांगत असायचा... कमलच्या खांद्यावर जसा त्याचा हात असायचा तसा आपल्या अमोलच्याही. बाप लेकाच्या खांद्यावर हात टाकून त्याला गाण्याचे प्राथमिक धडे देत गल्ल्यांतून फिरतोय हे माझ्यासारख्यासाठी तरी विलोभनीय होतं... अमोलला नंतर त्याने वाडकरांकडे शिकायला पाठवलं. अभिषेकी नगरातले सामान्याना माहित नसलेले थोर गायक रत्नाकर पै यांच्याकडे गाणं शिकायला यायचे. त्या दोघांकडे सुहास शिकला होता...
रविचं झुलवापेक्षा अनिल बांदिवडेकरांच्या एकांकिकांचं नेपथ्य अफलातून असायचं. एका एकांकिकेत त्याने दोन दरवाज्यांच्या फ्रेम्स, सभोवताली अनेक सुशोभित कुंड्यांची रचना करुन टाळ्या घेणारा सेट बनवला होता. त्याहीपेक्षा त्याने त्यात निरनिराळ्या अभिनयक्षेत्रांचा विचार करुन मग एकसंध सेट तयार केला ह्याचं अप्रूप जास्त...
सुहासनंही शेवटच्या काही वर्षांत व्यावसायिक नाटकांसाठी नेपथ्यं केली होती...
वामन आमच्यासाठी हाडाचा शिक्षक, दिग्दर्शक राहिला. केवळ त्याच्यामुळे माझ्यासारख्याला अशोक रानड्यांच्या भाषा, वाणी शिबिरात प्रवेश मिळाला. पीटर ब्रुक महाभारत घेऊन आला तेव्हा त्याच्या वर्कशाॅपसाठी वामननं शिव्या घातल्या पण घरातल्या आजारपणामुळं ते हुकलं... त्या वर्कशाॅपमधे रविने त्याच्या भलत्या भाषेतल्या इंप्रोवायझेशन्सनी धमाल उडवली होती म्हणे...
सुहास आणि रविसारखी हरहुन्नरी, अप्रतिम विनोदबुद्धी आणि टॅलंट असलेली माणसं लवकर विस्मृतीत गेलेली बघून वाईट वाटतं...
आमच्यासारख्या को-यांवर त्यानी आपुलकीनं केलेल्या संस्कारातून त्यांची आठवण तरी निघावी...
सांगावं तेवढं कमी... दोघांबद्दल...
पिपल्स बुक हाऊस, फोर्ट मधे भारतीय बैठकीवर मर्यादित रसिकांसाठी कवि नारायण सुर्व्यांची मैफल झाली होती... तोंडाचा आ वासून सुर्व्यांना थेट बघितलं, ऐकलं ते रविमुळे... दिलिप चित्रे, अरुण कोलटकर त्याच्यामुळे माहित झाले.. फोर्टमधून जाताना त्याने लांबून कोलटकर दाखवून त्यांचे किस्से सांगितले होते. रविनं 'इंद्रियारण्य' नावाचा स्वत:चा कवितासंग्रह प्रकाशित केला स्वखर्चानं. त्या 'अविसुर' प्रकाशनातल्या वि मधे मी होतो. ’झाल पल्ल्यावर’ ही त्याच्या आदिवासी भाषेतली कविता त्यात होती. इराणचा म्हातारा, बशी हा संदर्भ सांगून त्याला जमेल तशी त्यानं केलेली एक कविता त्यात होती. चित्रे, सारंग मला माहित झाले त्याच्यामुळे... मी कवडा झालो तेव्हा माझ्यापेक्षा त्याला बापासारखा आनंद झाला होता. त्यानं वही घालून दिलेली मी जपून ठेवलीए अजून...
सुहासमुळे दूरदर्शन केंद्र बघितलं पहिल्यांदा. रमण रणदिवेंच्या कविता सुहासच्या आवाजात रेकाॅर्ड झाल्या. सुहासची ती पहिली स्वतंत्र दोन गाणी अजून माझ्या स्मरणात आहेत. निर्माता कै. अनिल दिवेकरसारखा अत्रंग माणूस त्यानं दाखवला... केंद्रावरच, नविन आहे म्हणून निश्चल आहे, अभिनय करत नाही हा जोकही ऐकवला... वर तो असे जोक करणा-या प्रथितयश साहित्यिकानं तो केला असता तर डोक्यावर घेतला गेला असता हे ही... ;)
सुहासचे आजोबा चं वि बावडेकर साहित्यसंघाशी संबंधित होते. त्यावेळचं एक प्रसिद्ध नियतकालिक- आलमगीर- त्याचे संस्थापक, संपादक. त्यांचा थेट फायदा सुहासला मिळाला नाही. मधली पिढी वेगळ्या क्षेत्रात. (अमोल पालेकर सुहासच्या वडलांचा मित्र झाला. त्याच्यावरुन या अमोलचं नामकरण) संगीत नट अरविंद पिळगावकर सुहासचे मामा अजून हयात आहेत...
रवि भटकाविमुक्त... तो या मातीतला नाहीच... त्याला त्या फ्रेंच की काय जीवनपद्धतीचं आकर्षण. तेव्हा ती त्याची चूष वाटायची पण तो जगला तसा. आताही एका अर्थानं कोप-यातल्या मामाच्या गावात मॅनेजरकी करताना तो आवर्जून मित्रांना बोलवतो. आम्हीच गद्धे अजून जात नाही... रविनं एक अबसर्ड नाटक लिहून, त्याचं वाचन करवलं होतं चर्चगेट बुकिंगच्या वरच्या मजल्यावरच्या त्याच्या विश्राम केबिनमधे. हे असं काही असतं ते त्याच्यामुळे कळलं. इथेच त्याचं क्युबिझम पेंटिंग होतं. हे तो कालिना चर्चमधल्या फादरकडून शिकला... कालिनातल्याच एका मारामारीत तो आत गेला... तेव्हा आणिबाणी होती... रविला आणिबाणीमधल्या बंदींची मैत्री लाभत गेली...
कवि भुजंग मेश्राम, युवराज मोहिते यांच्या भेटी त्यानं इथे घडवलेल्या आठवतात...
रविबद्दल माझ्यापेक्षा जास्त जवळ असणारा अजित आचार्य.
तर सुहासबरोबरचा सुरेश कुलकर्णी.
असो... आता खरंच इत्यलम्...
(चित्र: आंतरजालावरुन साभार...)

Sunday, February 8, 2015

समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा...


व्यक्तिमत्वाची समृद्ध जडणघडण नाट्य आणि साहित्य या माध्यमांतल्या घटकांचा प्रत्यक्ष उपयोग करुन दिलेल्या प्रशिक्षणामुळे परिणामकारकपणे होत असते...
सभाधीटपणा, संवादकौशल्य, संघभावना, भाषेची ओळख, शब्द, शब्दांमागचे विविध अर्थ, भाव, भावना प्रकटन... 
अशा गोष्टींचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी "अभिलेख" येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रीकृष्णनगर, बोरिवली (पूर्व) परिसरात 'समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा' आयोजित करत आहे...

Friday, November 15, 2013

"शुभमंगल सावधान!" एकांकिका "कृष्णलीला" कार्यक्रमात...

कृष्णलीला, कृष्णलीला, कृष्णलीला... असा गजर घरी गेले कमीत कमी सहा महिने चालला होता... हे असं पहिलंच वाक्य तुम्हाला काय सांगायचं ते सांगून गेलंच असेल... तरीही... सांगतो... हा गजर तुम्ही ओळखला तिनेच म्हणजे आमच्या अर्धांगिनीने केलेला... तिच्या नृत्यवर्गाचा कार्यक्रम... सूत्र कृष्णलीला... तर तिला आमची एक एकांकिका त्यात बसतेय हे आठवलं आणि "कृष्णलीला" आमच्याही मागे लागली...
आता ताकाला जाऊन भांडं लपवायचं काही कारण नाही आम्हाला... आम्ही वाट बघत असल्यासारखेच... अशा संधीची केव्हापासून...
तर अशी झाली "शुभमंगल सावधान!" या एकांकिकेच्या सादरीकरणाची सुरवात...
"शुभमंगल सावधान!" लिहिली खूप आधी. मराठवाड्यातल्या एका गावातल्या एका आदिवासी तरुणीचं लग्न देवळातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लावलं... अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली. तिची कथा झाली. एकांकिका होईल असं नंतर कधीतरी वाटलं. मग सुनीता आणि श्रीकृष्ण असा कथेतला एकमेव प्रवेश एकांकिकेचा शेवटचा प्रवेश झाला. त्याआधीचे प्रवेश मग बांधले गेले. असं अस्मादिकानी केलं पहिल्यांदाच...
गेल्या वर्षी कन्या या लिखित, दिग्दर्शित दीर्घांकाची निर्मिती केली. यावर्षी भूमिकाही करा असा आग्रह झाला अर्धांगिनीकडून आणि आमच्या आतून तर तो होतच रहातो नेहेमी... मग जमवाजमव सुरु झाली...
ती एक मज्ज्याच असते. कलाकार निवडणं. मग त्यांनी गळणं. कुणी हो हो म्हणत अचानक कलटीची चाहूल देणं. आपण त्याना तयार करतोय असं आपल्याला वाटणं. मग नाद सोडून द्यावा लागणं. एखाद्याने घाबरून पळच काढणं इत्यादी... रिहर्सलसाठी जागा हा आणखी एक व्याप आणि ताप... असं करता करता यावेळची गंम्मत म्हणजे दोनच कलाकार उपलब्ध. त्यातले एक अस्मादिक. मग पुनर्लेखन. आशय तोच ठेवायचा. तांत्रिकता सांभाळायची. रचनेचा तोल बिघडू द्यायचा नाही... एकांकिका सोडूनच द्यायचा विचार पक्का होत चालला. पण घर आणि संच (इन मिन दोन कलाकार) यांकडून आग्रह होऊ लागला आणि अस्मादिकांना वाट सापडली पुनर्लेखनाची...
आता दोन्ही कलाकारांना पूर्णवेळ फलंदाजी... फूल फ्लेज्ड बॅटिंग... म्हणजे मेहेनत भरपूर... तीत कमी पडायचं नाही. तेवढंच एक हातातलं...
अनंत अडचणी. त्या येतातच. काही करायचं असलं तर येतातच. विचार येऊ लागला यापेक्षा भरपूर चिकित्सात्मक अभ्यास केला असता तर रोज एक पिल्लू सोडून घमासान चर्चांचे फड उभे केले असते सोशल नेटवर्कींग साईटवर तर केवढं काम झालं असतं. केवढ्याना कामाला लावलं असतं... पण काहीतरी प्रत्यक्ष करायची खाज ना? काय करणार?
संगीत, प्रकाश सगळ्यातल्या अडचणी, मोबाईल्स न उचलणं, अडलेल्याला नाडलं करुन सोडणं... सगळं नेहेमीसारखं... तसं निर्मितीतलं नवेपणही मधे मधे येऊन अडचणी वाढवणारं... शेवटच्या क्षणापर्यंत...
प्रयोगात मग नेहेमीचं थोडंसं इकडे तिकडे झालेलं सोडलं तर महत्वाची अडचण न येता पस्तीस ते चाळीस मिनिटं कधी गेली कळलं नाही...
अस्मादिक (हा शब्द या नोंदीत किती वेळा आला?.. ते तुम्ही मोजलं असेलच!) विनोदाचं धनुष्य पेलून पहिल्यांदाच. तीन भूमिका: सूत्रधार, गणा, श्रीकृष्ण. थोड्याशा वेशभूषा बदलानेच साकार होण्यासारख्या. सोबतच्या स्त्री सहकलाकाराचंही तसंच, तीन भूमिका: अप्सरा-नटी, लक्षुमी आणि सुनिता ... मी खूप वर्षांनी प्रत्यक्ष रंगमंचावर... त्या तुलनेने नवीन...
प्रेक्षकांचे अभिप्राय अंतिम. ते अजून येताहेत.
आमंत्रण बर्‍याच जणांना गेलेलं असतं. काहींच्या खर्‍याच अडचणी. काही न जमवणारे, मग काही करत नसताना ’सध्या काय चाललंय?’ असं थांबवून थांबवून विचारणारे. काही ’यानं प्रत्यक्ष काही केलं बरं का’ म्हणून हिरमुसणारे, सरसावून उगाच आपलं काहीतरी कुठेतरी दामटत बसणारे...
आपल्याला कुणी किती गंभीरपणे घेतंय हा विचार लोप पावलेला असतो प्रत्यक्ष काही करत असताना. आपलं असेल नसेल ते कौशल्य पणाला लाऊन काम पूर्ण करणं यात आनंद असतो. नक्कीच असतो...
तो या नोंदीद्वारे आपल्यापुढे सादर करतो... आभार!...
"शुभमंगल सावधान!" (एकांकिका) "अभिलेख" निर्मित, "नृत्यरंग" आयोजित 
लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित 
प्रकाशयोजना: वासुदेव साळुंके 
पार्श्वसंगीत: अरुण कानविंदे 
रंगभूषा: शशी सकपाळ, रमेश वर्दम आणि मंडळी 
वेशभूषा: वरदा पंडित 
कलाकार: प्रिया गडकरी, विनायक पंडित



Tuesday, October 29, 2013

अभिलेखच्या नाट्यविषयक उपक्रमातलं दुसरं पुष्प...

"अभिलेख" वर मनापासून भेट देणार्‍या माझ्या मित्रमैत्रिणींनो!
दिवाळी अगदी काही दिवसांवरच आली आहे. सण येतात ते आपलं रोजचं तेच ते जगणं सुसह्य करण्यासाठी. ते आपण जबाबदारीने आणि तरीही पूर्ण आनंदात साजरे करायचे असतात...
तेव्हा सर्वप्रथम ही दिवाळी तुम्हा सर्व सर्व नेटकरांना परम आनंदाची जावो अशा मन:पूर्वक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद! तुम्ही दिलेल्या पाठबळामुळेच "अभिलेख" आजवर इतकी मजल मारु शकलं आहे....
सहचरहो! गेल्या वर्षीपासून "अभिलेख" चे नाट्यविषयक उपक्रमही चालू झाल्याचे आपण सर्वजण जाणताच.
"कन्या" या दीर्घांकाने (एक तासाचा नाट्यप्रयोग) या नाट्यविषयक उपक्रमाचा शुभारंभ झाला. गेल्या डिसेंबर महिन्यात ज्या दिवशी दिल्ली शहरात ती महाभयानक घटना घडली त्या घटनेआधीच्या संध्याकाळी "कन्या" दीर्घांक अशाच एका युवतीचं वास्तव उभं करत होता...
या दिवाळीनंतरच्या शनिवारी नऊ नोव्हेंबरला, सकाळी अकरा वाजता "अभिलेख" आणखी एक नाट्यविषयक उपक्रम अर्थात पस्तीस मिनिटांची एक एकांकिका "शुभमंगल सावधान!" सादर करत आहे. लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित.
हा कार्यक्रम "नृत्यरंग" या कथकनृत्य विषयक संस्थेने आयोजित केला असून संचालिका वरदा पंडित आणि त्यांच्या विद्यार्थिनी कथकनृत्य सादर करणार आहेत.
"कृष्णलीला" हे या कार्यक्रमाचं नाव आणि विषयही कृष्णलीला हाच.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली (पश्चिम) इथे "कृष्णलीला" सादर होईल. प्रवेशिकामूल्य रु.२००/- आणि रु. १५०/- ...
आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण... आपल्या शुभेच्छा आहेत म्हणूनच आम्ही "कृष्णलीला" सादर करत आहोत...
पुन्हा एकदा आपणा सगळ्याना मनापासून धन्यवाद!

Sunday, October 20, 2013

प्रस्थापित (७) : भाग अखेरचा...

भाग १, भाग २भाग ३, भाग ४, भाग ५ आणि भाग ६ इथे वाचा!
... प्रयोग चांगलाच रंगला... नेहेमीप्रमाणे स्त्री कलावंत नेहेमीच्या जागी चुकली. पुरुष कलाकारानं शिरीषचे लाफ्टर्स खाण्याच्या प्रयत्न केला. शिरीषने अर्थात ते चोख वसूल केले. तो कुठेही चुकला नाही. सगळं नेहेमीप्रमाणे...
पण नेहेमीप्रमाणे शिरीष प्रयोगात रंगून गेला नव्हता. कुठेतरी कायतरी चुकचुकत होतं. प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही, काहीतरी वेगळं चालू होतं, हे शिरीषसाठी नवीन होतं...
कसे आलो आपण इथे?... नोकरी करणार नाही असं घरी सांगितल्यावर वडील चिडले होते. त्यांनी सतत मनधरणी करूनही, आपण सतत नाही! नाही! असं ठाम सांगत राहिल. तुच्छतेने?... मग आई हादरली. मागचे भाऊ, बहीण वेळेआधीच धडपडू लागले. आपण ते सगळं पहात स्ट्र्गल करत राहिलो. या इंडस्ट्रीत... सतत वाक वाक वाकण्याचा?... अपमान, उपेक्षा सहन करण्याचा?...
आणि... आज काय करतो आहोत आपण? रोजंदारीवर असलेल्या कामगारासारखे नाईटच्या पाकीटाची वाट पाहात? प्रथितयश निर्मात्याला बांधून घेऊन? कुबेर आणि कर्ण असलेला तो वेळप्रसंगी करवादत नाही आपल्यावर बॉससारखा? काय करतो आहोत आपण? सोडून जातो?...
एवढं सगळं करून दुसर्‍या फळीपर्यंत आलो आपण... आपल्यापुढचा दिग्दर्शक निर्मात्याचा नातेवाईक. तो आपल्याला पोचून देईल आणखी वर? एक नंबरवर?...
लग्न करायचं नाही ठरवलं आपण... तत्व जपल्यासारखं. सांभाळल्यासारखं. लग्न न करता कुणा कुणाबरोबर राहिलो... काय झालं? नातं नवरा- बायकोसारखं... कधी मी चुकायचं कधी तिनी. कधी दोघांनी. मग पुन्हा नवीन... पण लग्नासारखंच... संसारासारखंच... वेगळं काय?...
प्रयोग संपल्यावर मग शिरीष जास्तच बैचेन झाला. विशेषत: स्वत:ला जबरदस्तीने आरशात बघताना, टिश्यू पेपरने खरवडून खरवडून मेकप काढताना... त्यासाठी स्वत:ला आरशात न्याहाळताना...
हे सगळं आज दारूत बुडवणं अशक्य आहे, जोर करून बुडवायला गेलो तर जास्तच भडकून उठेल हे लक्षात आल्यावर तो आणखी खचला...
सगळं झालं ते त्या चष्मेवाल्यामुळं... संसारी, नोकरदार, अभिनयात सो कॉल्ड यश न मिळवल्यानं लेखनात स्ट्रगल करू पहाणार्‍यामुळं... प्रामाणिक, मॅनर्स पाळणार्‍या आणि स्वाभिमान न सोडणार्‍यामुळं... हे जाणवल्यावर मग शिरीषला आपलं ग्लॅमरस भणंगपण जास्त जास्तच खुपायला लागलं...         (समाप्त)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...खरं म्हणजे कथा लिहावी, तिच्याबद्दल काही लिहित बसू नये... हा अपवाद...
या कथेला "साप्ताहिक सकाळ" च्या कथास्पर्धेत ’तिसरं बक्षिस’ मिळालं. हा अनुभव माझ्यासाठी तरी प्रचंड सुखद होता...
पहिलं म्हणजे कथा निकाल असलेल्या साप्ताहिक सकाळच्या ४ ऑक्टोबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाली. एका मित्राने ती बघितली. वाचल्याचं कळवलं. साप्ताहिकाचे अंक प्रसिद्ध तारखेच्या आधी दोनचार दिवस प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने कळल्याने, तसं काही लिहिणारा अपेक्षित करत असल्याने, आनंद झाला. तो बाजारात जाऊन दोनचार प्रती घेऊन साजरा केला... दसराच होता... हात पाय पसरून पसरलो...
आस्थापनामधून फोन... बक्षिस घ्यायला या... परगावी... मी त्यावेळी नको तितक्या अडचणीत. कुठेतरी पहिलं बक्षिस न मिळाल्याची रुखरुख असावी. अपरिहार्य कारण पुढे करून येणं शक्य नसल्याचं नम्रपणे सांगितलं. पुन्हा फोन... जाण्यायेण्याचं भाडं देतो पण बक्षिस स्विकारायला याच... लिहिणार्‍याला हा तर पराकोटीचा आनंद! भाडं दिलं नाही, देतो म्हटलं तरी लिहिणारा खूष... आता जाणं भागच...
बक्षिस समारंभ अत्यंत नेटकेपणानं आयोजित केलेला. एका प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ बाईंचं व्याख्यान. आयोजकांनी स्वागत करणं... जाताना भेटून मग जा असा आग्रह... पहिल्या रांगेतली खुर्ची... उत्तम व्याख्यान... थोड्याफार गप्पा- कारण परतण्याची घाई, दुसर्‍या दिवसाचं रुटीन...
परतताना मी बसमधे नव्हतोच... चार बोटं नव्हे चांगलाच वर... प्रतिकूल काळात खूप वाट पाहून आलेला असा सुखावह अनुभव... संबंधितांचे आभार मानावे तेवढे थोडे...
परतल्यावर दोन दिवसांनी फोन... त्याच गावातून... नावं मुद्दाम टाळतोय... प्रसिद्ध व्यक्तिचं नाव घेऊन फुशारक्या नकोत आणि प्रतिसाद न देणार्‍यांची उगाच नावानिशी दखल कशाला?... अशा मोडवर सध्या आहे... तर फोन... नाव ऐकल्यावर मी चाट! असं होतं... अपेक्षा नसताना... ते नावाजलेले नाट्यसमीक्षकही. त्याना कथा प्रचंड आवडल्याचं ते सांगतात. त्यावर उत्तम एकांकिका होईल असं सांगतात. तुम्ही तसा काही विचार केला आहे का? म्हणून मित्रत्वाच्या नात्याने विचारतात. भारावून जाणं आभार मानणं यातच मी गुंतलेला असताना ते ज्या प्रायोगिक संस्थेशी संबंधित असतात त्यातला एकाचा संपर्क क्रमांक देऊन, याना फोन करा आणि मला येऊन भेटा पुढचं काय ते बोलू असं आमंत्रणही देतात... मी सातव्या आसमानात पोचलेला... ते शांत, मृदू...
मी उत्साहाने त्या संपर्क क्रमांकावर फोन करतो... पलिकडे,  त्याला कल्पना असावी असा आणि मला कल्पना नाही असा रुक्ष आवाज... विरोधी आवाज लगेच ओळखता येतात... माझं त्याना भरभरून सांगणं... येऊ ना? म्हणून विचारणं... ते नकारघंटा हातात घेऊन बसल्यासारखे... हो ही नाही आणि नाही ही नाही... पण म्हणजे नाहीच!...
वाईट वाटतं... पण काळ जातो तसं आयरनी वगैरे आठवायला लागते...
एका नकारात्मक अनुभवावर लिहिलेली कथा. अपेक्षा घेऊन चांगली नाटकं लिहून ती कुठे होत नाहीत तर तद्दन नाटक लिहून प्रयत्न केला तर तिथे प्रतिसाद हा असा... त्यावर कथा लिहिली, त्याला बक्षिस मिळालं, त्यानंतर एका प्रथितयश नाट्यसमीक्षकाला त्यात एकांकिकेचं बीज दिसलं, ते प्रायोगिक रंगकर्मींनी नुसतं पारखण्याचंही टाळलं... असा हा अनुभव किंवा अनुभवांची शृंखला...
करत रहाणं आपल्या हातात असतं. त्यानंतर येणारा अनुभवरूपी प्रतिसाद, त्याला काही लॉजिक नसतंच... मग आपल्याला जे वाटतं ते आपण स्वत:च करायचं. आपल्याला शक्य असेल तसं. पण करायचंच... असो!      
 

Tuesday, September 24, 2013

प्रस्थापित (६)

भाग १, भाग २भाग ३, भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा!
शिरीष समोरच्या चष्मेवाल्याशी आपलं नेहेमीचं डोळ्याला डोळा न भिडवण्याचं तंत्र चालू ठेऊनच होता. त्यानं आपल्या बॅगेतला हात बाहेर काढला.
"हे बघा- ही दोन-"
"मला कल्पना आहे हो-" चष्मेवाला सौम्य हसत म्हणाला.
"बघा ना- या संहितेबरोबर असलेल्या या पत्रावरची तारीख- सहा महिने होऊन गेलेत. या आणखी दोन संहिता. आधी आता या घेऊन बसायला-"
"मला पूर्ण कल्पना आहे त्याची. माणसं बिझी असतात. तुम्ही माझं पुस्तक चाळलं का?"
"हो ना! हो! हो!" शिरीषनं ठोकून दिलं.
"मग त्याच्या मलपृष्ठावर माझा बायोडेटा आहे. मी यातच होतो हो इतके दिवस. तुमच्यासारख्या भूमिका केल्या प्रायोगिक- व्यावसायिकला- अर्थात तुमच्यासारख्या यशस्वी नसतील त्या- मला माहितेय. माणसं बिझी असतात. त्यांना अजिबात वेळ नसतो. परवा आलो तेव्हाच माझ्या लक्षात आलंय!"
अजिबात न हालता शिरीष हातातल्या संहितांकडेच बघत राहिला.
"नाही- बघा ना- आता हे ह्यानी- सहा महिने आधी-"
"आरामात हो! मला अजिबात घाई नाही. आरामात वाचा. माझं पुस्तकही सवडीने वाचा- आणि मला सतत फोन करून, सतत भेटायला येऊन त्रास द्यायला खरंच आवडत नाही. इरिटेट होतो हो समोरचा माणूस. मला कल्पना आहे!"
"नाही- काय आहे- मला जर फोन करून आठबण केली नाहीत नं तर-" शिरीषनं नेहेमीचा धोबीपछाड टाकला. फोन नाही केलास ना तर तुझंच नुकसान आहे चष्मेवाल्याऽ- तो मनात म्हणाला.
"सतत नाही करत मी फोन. बिझी माणूस वैतागतो. वाचा तुम्ही सावकाश. चला. थॅंक यू!" चष्मेवाला निघाला. मेकपमनला, व्यवस्थापकाला हात करून तो निघाला आहेहे शिरीषनं नजरेच्या कोपर्‍यातून बघितलं, पण संहिता परत बॅगेत ठेवताना बॅगेत घातलेलं डोकं त्यानं अजिबात बाहेर काढलं नाही. चष्मेवाल्याच्या थॅंक यू लाही त्याने अर्थातच प्रतिसाद दिलाच नाही. गेला *****! असं मनाशी म्हणत त्यानं खर्रकन बॅगेची चेन ओढून बंद केली. चेहेरा अतिशय शांत ठेवून.
प्रयोग एक्च्यूअली सुरू व्हायला अजून अर्धातास तरी सहज होता. ऑफिशयल पंधरा आणि वर पंधरा मिनिटं. इस्त्री करून ठेवलेले कपडे बघून ठेवणं, तोंड धुणं, गप्पा मारणं इत्यादी प्रयोगाआधीची कामं यांत्रिकपणे करत तो रंगपटात स्थिरावला. काहीतरी त्याला खुटखुटायला लागलं. ते मनाच्या मागे ढकलून तो निग्रहाने हास्यविनोद करत राहिला. शेवटी वेळ झाल्यावर आरशासमोर बसला. आज मेकपमनला थांबवून त्यानं स्वत:चा मेकप स्वत:च करायला सुरवात केली. स्वत:चा चेहेरा रंगवताना त्याला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. मगासारखं... खुटखुटल्यासारखं... कॉन्फिडन्ट वाटत नाहीए आपल्याला आज? हं!... पावणेचारशेवा प्रयोग... यंत्र झालंय आता सगळं... वाचेचं, चेहेर्‍यावरच्या रेषांचं, हातवार्‍यांचं, हातचालींचं, विनोदाच्या जागाचं, लाफ्टरसाठी थांबण्याचं... तो स्वत:शीच हसला. पूर्ण एकाग्र होऊन, मेकपकडे लक्ष देऊन खुटखुटणं विसरण्याचा प्रयत्न करू लागला...     (क्रमश:)


 

Saturday, September 7, 2013

प्रस्थापित (५)

भाग १, भाग २भाग ३ आणि भाग ४ आणि  इथे वाचा!
शिरीषच्या घाईघाईला तोंड देत चष्मेवाल्याने सुरवात केली, "आणलंय मी... दुसरा अंक लिहिला नाहीये अर्थात... म्हणजे... कॉमेडी आहे... आजकालच्या रिवाजाप्रमाणे बरेच बदल करण्यासाठी... तुम्ही वाचा... तुम्हाला चांगलं... बरं... बरं वाटलं तर गाइड करा मग-"
"द्या, द्या फोन नंबर लिहिलाय नं?" शिरीष जरा ओरडतच म्हणाला. चष्मेवाल्याने तत्परतेनं लिहिलेला पत्ता, फोन नंबर दाखवला.
"दोन दिवसानी फोन करतो!" असं म्हणत शिरीष रंगपटाकडे निघालाच.
"तुम्हाला माझं नाटकाचं पुस्तक... द्यायचं-" चष्मेवाला पुस्तकावर शिरीषचं नाव लिहिण्यासाठी धडपडू लागला. पुस्तक ठेवायला जागा नाही. इस्त्रिवाला सरसावून मग्न. शिरीषला हसू आलं. त्यानं संभावितपणे इस्त्रिवाल्याला दम दिल्यासारखं करून जागा करायला सांगितली. त्यानं जागा करून दिल्यासारखी केली.
चष्मेवाला आता शिरीषच्या भाषेत चांगलाच फंबलला. शि च्या जागी गि वगैरे कसरती करून घाईघाईत नम्रपणे पुस्तक शिरीषला अर्पण केलं.
चष्मेवाल्याला घाम फुटला. कृती लवकर आटपली नाही तर शिरीष काय बोलेल, करेल याचा त्याला भरवसा नसावा.
"दोन दिवसात ह्स्तलिखित एक अंक वाचून होईल. फोन करतो दोन दिवसांनी!" रंगपटाकडे वळत मुद्दाम जरा जोरातच शिरीष म्हणाला. आपणच फोन करतो असं म्हटलं की प्रश्न मिटतो. वाट बघून गरजू फोन करत रहातो. मोबाईल आपलाच. आपल्याच हातात. अगदीच नाही तर बदलला नंबर. शिरीषचं समीकरण सोपं होतं.
"दोन दिवसांनी प्रयोग आहे तुमचा. तेव्हा जर आलो-"
"अरो हो! गुरुवारी! या ना या!- आता बसताय प्रयोगाला?" खिजवल्यासारखं वाटावं, वाटू नये अशा स्वरात शिरीषनं विचारलं.
"नाही... म्हणजे काम आहे... होतं दुसरं... तुमच्या कामाप्रमाणे ऍडजेस्ट केलंय- करणार- होतो... परवा येतो!"
हो ही नाही आणि नाही ही नाही, त्यामधलं काहीतरी एक्सप्रेशन देत नट आणि दिग्दर्शक (दुसर्‍या फळीतला) शिरीष रंगपटात शिरला, विसावला. रंगपटातली, नाटकातली पात्रं आणि इतर पात्रं यांच्याशी जरूरीप्रमाणे कमी, जास्त, अजिबात नाही, अशा प्रकारे कम्युनिकेट करू लागला.
हातातलं हस्तलिखित आणि पुस्तक त्याने केव्हाच मेकपच्या टेबलावर फेकलं होतं. नाटक सुरू व्हायला तब्बल पंधरा मिनिटं बाकी होती...
त्या गुरुवारी शिरस्त्याप्रमाणे शिरीष नाटक सुरू होण्याआधी, पंचवीस मिनिटं  ते अर्ध्यातासाच्या बेचक्यात त्या नाट्यगृहाच्या पॅसोजमधे शिरला. एकच भला मोठ पॅसेज. समोर कपडेपट. डाव्या हाताला रंगपट, अशी त्या नाट्यगृहाची रचना, तर समोर हसत चष्मेवाला.
"सॉरीऽ आजही मी तुमच्या आधी येऊन तुम्हाला सामोराऽ"
मोकळा झालाय, याला दाबायला पाहिजे, शिरीषनं लगेच ताडलं, "होऽ होऽ होऽ होऽ- जरा एक मिनीट-" असं म्हणत शिरीष कपडेपटात शिरला. व्यवस्थापकीय सहायकाला खुणेने कपडेपटाचं दार पूर्ण बंद करायला सांगितलं.
चष्मेवाला पॅसेजच्या भिंतीला टेकून वाट बघत उभा राह्यलाय हे नजरेच्या कोपर्‍यातून बघताना त्याला बरं वाटलं.
घातलेल्या शर्टची वरची दोन बटणं उघडून, आरामशीर हातातली भलीमोठी बॅग टेबलावर ठेवून तिची चेन उघडताच त्यानं आत बघितलं. थोडा वेळ तसाच जाऊ दिला. मग खुणेने व्यवस्थापकीय सहायकाला बाहेर पाठवून चष्मेवाल्याला आत बोलवायला सांगितलं. चष्मेवाला विनम्रपणे आत आला. तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत शिरीषनं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. आपल्या बॅगेतले कपडे वरखाली करत, एक शर्ट बाहेर काढून ठेवत, तो बॅगेतच बघत राहिला. आत दोन स्क्रीप्ट्स- नाटकाच्या संहिता आहेत ना याची पुन्हा एकदा त्याने खातरजमा करुन घेतली.
"हे बघा- हे-"
"अगदी आरामात. अगदी आरामात. मला काहीही घाई नाहीये!"
अचानक दोन्ही हात फैलावत चष्मेवाला म्हणाला. शिरीषनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं. त्याला हे अनपेक्षित होतं. पण ते चेहेर्‍यावर कसं दाखवायचं नाही हे तो शिकला होता. तो हलला नाही...        (क्रमश:)

Thursday, August 29, 2013

प्रस्थापित (४)

भाग १, भाग २भाग ३ इथे वाचा!
बिनफ्रेमच्या चष्म्याची नजर दीनवाणी  नव्हती. तो हिरमुसून घड्याळात बघत दूर जाऊन उभा राहिला आहे हे शिरीषनं डोळ्याच्या कोपर्‍यातून बघून घेतलं. चष्मेवाला घड्याळात बघत उभा राहिला.
मग पाच मिनिटांनी झटका आल्यासारखं वळत शिरीष नाट्यगृहाचा तो लांबलचक जिना चढू लागला. चार- पाच पायर्‍या चढल्यावर त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यातला बल्ब पुन्हा पेटला. चष्मेवाला चूपचाप त्याच्यामागे चालू लागला होता. चष्मेवाला जिना चढतोय याची खात्री झाल्यावर मगच शिरीषनं मागे न बघता, उलटा पंजा मागे नेऊन हाताची बोटं हलवून आपल्या मागोमाग येण्याची खूण केली. चष्मेवाल्याचा पडलेला चेहेरा बघायची त्याला आता गरज नव्हती.
शिरीष नंतर बुकींगजवळ गेला. नेहेमीप्रमाणे आत वाकून बघितलं. प्लानवर. हाताची बोटं उंचावून पासांची खूण केली. एका ओळखीच्याने थांबवलं. त्याच्याशी बोलला. मागचा चष्मेवाला प्रत्येकवेळी जर्क बसून थांबत होता. अडखळत होता. पास किती ठेवायचे हे बुकींगला सांगितल्यानंतर मगच शिरीषनं चष्मेवाल्याकडे बघून ’बसणार का’ असं अत्यंत कोरड्या आवाजात विचारलं. चष्मेवाला अर्थातच नाही म्हणाला. आपलं काम घेऊन आलेला माणूस पहिल्या भेटीतच फ्री पासवर नाटकाला बसणार नाही, याची शिरीषला खात्री होती.
नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताना द्वारपालाचा सलाम घेऊन शिरीषनं वेग वाढवला. चष्मेवाला फरफटल्यासारखा त्याच्या मागे. या सगळ्या प्रवासात कामाचं काय बोलायचं ते बोलून शिरीष प्रामाणिकपणे चष्मेवाल्याला वाटेला लावू शकला असता. पण शिरीषनं ’काय कसं काय?’ अशा पद्धतीचं बोलणंही टाळलं. शिरीष काही केल्या बोलत नाही म्हणून तो मर्यादापुरूषोत्तम चष्मेवाला शिरीषचा माग काढण्यातच धन्यता मानत होता. एखादा आगाऊ बोलबच्चन असता तर त्यानं शिरीषला एव्हाना हैराण केलं असतं.  पुढे जाऊन आपल्याला अडचणीचं ठरेल असं काहीही करायची चष्मेवाल्याची तयारी दिसत नव्हती. ’काढू दे अजून कळ!’ असं स्वत:शी म्हणत शिरीष वाटेतल्या कॅन्टीनजवळ थांबला. वडा कधी, कसा पाठवायचा हे त्यानं आवर्जून नक्की केलं. पुढे चाललेल्या कलाकाराबरोबर डिसकस केलं आणि थोडा वेग वाढवून त्यानं तो उभा पॅसेज पार केला.
आडवा पॅसेज पार करून दोन-तीन दारं पार करत तो रंगपटात पोहोचला. वाटेतल्या दारांना वर चाप लावले होते. मागून येण्यार्‍यासाठी दार उघडून धरण्याचीही शिरीषला आवशकता नव्हती. चाप लावलेली दारं फटाफट बंद होत होती. ती पुन्हा उघडत जाऊन चष्मेवाला रंगपटाच्या दाराशी येऊन घुटमळला. आत नेहेमीचे यशस्वी, त्याना भेटायला आलेले काही तुलनेने अयशस्वी, काही लोंबते अशी सगळी फौज जमली होती.
आत गेल्यावर उपचार म्हणून तरी शिरीषनं ’आत या’ असं म्हणावं ही चष्मेवाल्याची अपेक्षा असावी. घुटमळून, वाट बघून चष्मेवाला शेवटी रंगपटात शिरला. तो आला आहे याची खात्री झाल्यावर शिरीष त्याला ’या’ म्हणाला. बसा म्हणाला नाही. चष्मेवाला बसला. त्याने अपेक्षेने शिरीषकडे बघितलं. शिरीषने ताबडतोब त्याची नजर टाळून चष्मेवाल्याच्या बाजूला बसलेल्या खुळचट हसणार्‍या माणसाकडे मोर्चा वळवला. काहीतरी गंभीर घडल्यासारखी जुनीच घटना नव्याने सांगू लागला. खुळचट हसणारा मांडीवरच्या ऍटॅचीवर हाताचे दोन्ही कोपरे टेकवून मोबाईलवर खेळत आणखी खुळचट हसत ते सगळं ऐकत होता.

मग त्या खुळचटचं लक्ष चष्मेवाल्याकडे गेलं. ’अरे तू कसा काय इकडे?’, असं विचारून खुळचट तोंड पसरून हसला. शिरीष लगेच सावध झाला, "चला, चला आपण आपलं-" घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला उठवलं. ओळख बिळख म्हणजे नस्तं काहीतरी चालू झालं असतं.
घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला कपडेपटात आणलं. नेहेमीप्रमाणे खुर्च्यांमधे कपडे.
"द्या! द्या! आणलंय नं तुम्ही?" जरा तावदारल्यासारखं करतच शिरीषनं पुन्हा घाई केली...   (क्रमश:)  

Saturday, August 17, 2013

प्रस्थापित (३)

भाग १, भाग २ इथे वाचा!
संध्याकाळी सातच्या सुमाराला शिरीष नाट्यगृहाच्या फाटकातून आत शिरला. नेहेमीसारखा रिलॅक्स्ड. फाटकाला लगटून आणि आत आवारात अनेक ठिकाणी पुंजके उभे होते. शिरीषच्या भाषेत दोन- चार नट आणि अनेक बोल्ट्स. अंगविक्षेप करून ग्लॅमर खेचणारे. मोठमोठ्याने बोलून टाळ्या घेणारे. कुणी बाहेर जाऊन सिगरेट शिलगावून आत येणारे.
शिरीष कुणाला हात करत, कुणाशी हसत, कुणाला हाय करत, हात मिळवत आणि प्रसंगी फिल्मी आलिंगन देत- जरूरीप्रमाणे- अर्थात शिरीषच्याच- आवारात आला. ज्याच्याकडून काही अतिमहत्वाचं काम होण्याची शक्यता होती त्याला शिरीषनं स्वत: त्याच्याजवळ जाऊन अटेंड केलं. हे सगळं करत असताना त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यात धोरणीपणाचा बल्ब लागलेलाच होता. त्या बल्बनी तो आसमंत न्याहाळत होता. हवी ती हालचाल दिसत नव्हती.
मग तो भेटायला आलेल्या नाट्यव्यवस्थापकाशी बोलायला लागला. व्यवस्थापकानं त्याला कोपर्‍यात घेतलं. शिरीषनं दोन- चार मोबाईल कॉल्स करून व्यवस्थापकाला तारखा देण्यासंबंधीची व्यवस्था केली. या सुमारास नाट्यगृहासमोर नाट्यगृहात जाणार्‍या भल्यामोठ्या जिन्याच्या वरच्या टोकाला त्याला अपेक्षित हालचाल दिसली. तिथे एक बिनफ्रेमचा चष्मेवाला घुटमळत होता. याचा अर्थ तो रंगपटात जाऊन आला असावा. शिरीषनं पाठमोरं होऊन त्या व्यवस्थापकाला आणि त्याच्या सहाय्यकाला आणखी कोपर्‍यात घेतलं. बिनफ्रेमचा चष्मा ते बघून घुटमळत थांबला. याचा अर्थ तो भिडस्त आहे, मर्यादा पाळणारा आहे, हे शिरीषनं नमूद करून घेतला.
कोपर्‍यातली चर्चा आटोपतेय असं लक्षात आल्यावर शिरीष मोबाईलवर कॉल लावत एकटा आणखी कंपाऊंडच्या भिंतीजवळ गेला. बिनफ्रेमच्या चष्म्यानं ओळखलं असावं साहेब इतक्या लवकर रंगपटात येत नाहीत. तो जिना उतरू लागला. ते बघून शिरीष मोठ्याने हाका मारत एका नव्या कोंडाळ्यात सामील झाला. नुकताच चरित्रचित्रपट मिळालेला एक नट उत्साहाने आपले अनुभव सांगत होता. बिनफ्रेमचा चष्मा जिना उतरून खाली आवारात उतरला. साहेबांना भेटायचा त्याला धीर होत नसावा. त्याच्यासमोर प्रोफाईल फ्रेममध्ये असलेला शिरीष गप्पा रंगवत होता. बिनफ्रेमचा चष्मा जराशाने कोंडाळ्याला वळसा घालून जरा दूर जाऊन उभा राहिला. शिरीषने त्याला नीट बघून घेतलं. गृहस्थ संसारी, नोकरी करणारा, त्याच्या वयाचाच वाटत होता. राहू दे उभा असं स्वत:च्या धोरणीपणाशी म्हणत शिरीषनं कोंडाळ्यातल्या संवादातला आपला अभिनय चालू ठेवला.
बिनफ्रेमच्या चष्मेवाल्याने घड्याळात पाहिलं. मगापासून चौथ्यांदा. पावणेआठ- भेटीची वेळ. मग तो पुन्हा एक वळसा घेऊन शिरीषजवळ येऊन उभा राहिला. त्याच्याकडे बघत शिरीषने आपली नजर लगेच काढून घेतली. एखादं लाचार पोर दीनवाणं होऊन दात्याची नजर आपल्याकडे कधी वळेल याची नुसती वाट बघत उभं राहतं तसा बिनफ्रेमचा चष्मेवाला बाजूला येऊन उभा आहे हे शिरीषला जाणवलं.
"एक्सक्युज मी... एक्सक्युज मी... मी... अमुक अमुक... सकाळी... दुपारी... फोन केला होता. तुम्ही-"
"आपण जरा नंतर-" असं म्हणून वाक्य तोडून, दोन मिनिटं या अर्थाची दोन बोटं हवेत उडवून शिरीष कोंडाळ्यातल्या उत्साही चरित्रनायकाकडे नुसताच बघत राहिला. कमरेवरची बॅग, खांद्यावरचा तिचा पट्टा मानेजवळ आणखी वर ढकलून खिशात हात घालत...  (क्रमश:) 
   

Saturday, August 10, 2013

प्रस्थापित (२)

भाग १ इथे वाचा! 
...पुन्हा वेगवेगळा कोलाज बघत शिरीषला डुलकी लागली आणि मोबाईल पुन्हा वाजला. पुन्हा मंगलाष्टकं, तोच अनोळखी नंबर... कट. झोप.
तिसर्‍या वेळी त्यानं मोबाईल थंडपणे ऑफच करून टाकला. झक मारत गेले महत्वाचे कॉल्स. येणार असेल काही काम, मिळणार असेल, तर मिळेलच. नाही तर जाऊ दे झन्नममध्ये! असा विचार आल्यावर त्याला गाढ झोप लागली.
दुपारी बारानंतर कधीतरी पोटातल्या भुकेने शिरीषला जाग आली. नेहेमीप्रमाणे मोबाईल चार्ज करायला ठेवून तो बाथरूममध्ये शिरला.
सगळं आटोपल्यावर त्यानं बाहेरच्या कडीला असलेल्या दुधाच्या पिशवीतली दुधाची थैली फ्रिजमध्ये ठेवली. मोबाईल ऑन करून खिशात सरकवला. पोटातली आग शांत करायला बाहेर पडायला, कळवळत.
रिक्षात बसल्यावर सीटखालीच कळ असावी तसा सीडीप्लेअर चालू झाला. त्याच्यावर लेटेस्ट म्युझिक अल्बममधलं अत्यंत लेटेस्ट पॉप्युलर गाणं. शिरीषचा मोबाईल वाजला. शिरीष खिशातून तो काढेपर्यंत रिक्षावाल्यानं गाण्याचा आवाज चक्क कमी केला. शिरीष रिक्षावाल्याकडे बघतच राहिला. असेही रिक्षावाले असतात?
भुकेने कळवळलेला शिरीष मोबाईल स्क्रिनकडे बघत होता आणि स्क्रिन तो सकाळचा अनोळखी नंबर पुन्हा एकदा दाखवत होता. शिरीष वैतागला.
"हॅलोऽऽऽ... बोला!... बोला! बोला!..."
"मी अमुक अमुक बोलतोय शिरीषजी... मी एक... एक लेखक... लेखक-"
"हां! हॅलोऽऽ हॅलो‌ऽऽ बोलाऽऽ- कट!"
शिरीष आणखी वैतागला. कुणीतरी होतकरूऽऽ... आता हा काय पिछा सोडत नाय आणि पुन्हा मंगलाष्टकांची धून वाजली.
"हां! हॅलोऽऽ हो! हो! कळलं मला तुम्ही लेखक आहात ते!... या! याना! कधीही... प्रयोगाला या... हं! ऑं?"
"मी अलीकडेच प्रयोगाला येऊन गेलोय. एक नाटक लिहिलंय ते तुम्हाला दाखवायचं होतं. तुमचं मार्गदर्शन..."
आता शिरीषला पुढे बोलत रहाणं भागच होतं.
"हां! आंऽ वन लाईन काय आहे?... हां!... (*‌%!?!ऽ*)... हां हां ( *‌%!??!ऽ**%!)... हां! (*‌%!ऽ*?*%!!?) हां! ( *‌%!ऽ**%!?????!!!*ऽ) का- काय आहेऽ... इतरवेळी भेट ठरवली आणि नेमका वेळउशीर झाला तर पंचाईत होते म्हणून प्रयोगाला या!"
"कधी येऊ?"
"आं? आंऽ आज आज या ना, पण साडेसात पावणेआठपर्यंत या!"
"येऊ? मग येतो मी, थॅंक यू! साडेसात पावणेआठपर्यंत येतो. तुम्हाला दाखवतो. तुम्ही गाईड..."
शिरीष हं हं असा रिस्पॉन्सच न देत राहिल्यामुळे होतकरूला काहीच कळेना. फोन चालू आहे की कट झालाय, नक्की साडेसात पावणेआठला भेट होणार की... शिरीष मोबाईल तसाच होल्ड करून होता. गपचूप. होतकरू गोंधळला, भांबावला. शेवटी कंटाळला, स्वत:वरच वैतागला आणि त्याने फोन डिसकनेक्ट केला.
फोन डिसकनेक्ट झालाय अशी पूर्ण खात्री झाल्यावर मगच शिरीषनं आपला मोबाईल ऑफ केला आणि मनातल्या मनात होतकरूला आणि पोटातल्या भुकेला असंख्य फुल्या फुल्या वाहत रिक्षातून बाहेर बघत राहिला. रेस्टॉरंट यायची वाट पहात...                                                                             (क्रमश:)  

Monday, August 5, 2013

प्रस्थापित (१)

शिरीष नट होता आणि दिग्दर्शकही, रंगभूमीवरचा. दुसर्‍या फळीतला. दुसर्‍या फळीतून पहिल्या फळीत स्थान मिळवणं त्याला तितकसं कठीण नव्हतं. चांगली संस्था हाताशी होती. निर्माता कुबेर आणि कर्ण असा दोन्हीही. अर्थात इथपर्यंत पोहोचणं शिरीषला सोपं नक्कीच नव्हतं. काय काय व्याप ताप करून तो इथे पोहोचला हे त्यालाच माहीत.
प्रायोगिक संस्था, स्पर्धा यातच आयुष्याची तिशी उलटून गेली. कनिष्ठ मध्यमवर्गीय पालक, हातातोंडाची गाठ जेमतेम पडत होती इतकंच. कुठूनतरी नाटकाचं वेड शिरीषच्या डोक्यात आलं, एकदा आलं की ते सहजासहजी जात नाही.
शिरीष दिसायला असातसा. त्याच पंचविशीतच पोट आलं. बुटका, चेहेरा विनोदी कामांसाठी उपयुक्त. जाडा सुद्धा. पण सिन्सियर. झपाटलेला.
पस्तीशीत त्याला समजलं की हे स्पर्धा, बक्षिसं वगैरे काही खरं नाही. आयुष्यभर नाटक किंवा तत्सम क्षेत्रात रहायचं म्हणजे व्यावसायिक व्हायला पाहिजे. पण घरात नाटकाचं वातावरण नाही, कुणी गॉडफादर नाही. ठसणारं व्यक्तिमत्त्व नाही, टॅलेंट सर्वसाधारण योग्यतेचं. फक्त पुरेसं गांभीर्य, मेहनतीची तयारी, झपाटलेपण, दिग्दर्शनासाठी आवश्यक संघटन कौशल्य इतकं होतं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शिरीषकडे धोरणीपणा हा गुण होता. तो आपल्याकडे आहे हेही त्याला वेळीच समजलेलं. त्यामुळे कुठे पोचायचं, तिथे जाण्यासाठी चॅनल्स कुठले. त्यातला कुठला प्रथम वापरायचा. मग कुठला. आणीबाणीच्या वेळी या चॅनल्सचा क्रम कसा बदलायचा हे त्याच्या डोक्यात खूप कमी अवधीत तयार व्हायचं. बर्‍याचवेळी नशीबाची साथ मिळायची. असं होत होत मजल दरमजल करत अनेक ठिकाणी डिप्लोमॅटीकली वाक वाकून तो सद्यपरिस्थितीपर्यंत पोहोचला. अर्थात अनेक अपमान पचवून, प्रसंगी ते दारूच्या पेल्यात बुडवून.
जवळ जवळ क्रमांक एकचं दिग्दर्शकपद. व्यायसायिक स्पर्धेत पुढे धावणारा एकमेव दिग्दर्शक. आताच्या नाटकातला शिरीषचा रोल तसा नाटकातला तिसर्‍या-चौथ्या क्रमांकाचा. पण मुख्य भूमिकांपैकी. टिपिकल पण चोख हसे वसूल करणारा. टायमिंगचं कौशल्य शिरीषचं. सव्वातीनशे- साडेतीनशे प्रयोग म्हणजे पैसे, लोकप्रियता इ. इ. दृष्टिने चांगलेच. सामान्य प्रेक्षकही आता शिरीषला ओळखायला लागलेले.
कुणामधे गुंतणं वगैरे प्रकार शिरीषनं ठेवलेच नाहीत. शिरीषमधे कुणी गुंतणं तसं लांबच. आली तर आली. राहिली तर राहिली. गेली तर गेली. ही गेली तर दुसरी, तिसरी... नाही!... तर आहेच!...
चाळिशीनंतर शिरीषसारख्यासाठी एकूण स्थिती समाधानकारक नव्हे तर चांगलीच म्हणायला पाहिजे. देण्याची तयारी असली की मिळतं. नशीब साथ देत असलं की मिळतंच मिळतं. काय काय द्यायची तयारी आहे त्यावर सगळं अवलंबून.
शिरीष आहे त्यात अवघडलेला नव्हता. बर्‍यापैकी रिलॅक्सड होता. धावपळ, दगदग, मेहनत चुकत नव्हती. धोरणीपणाचा बल्ब मेंदूत सतत पेटवून ठेवावा लागे. पण आता रिटर्नस मिळत होते. अपेक्षेपेक्षा जरा जास्तच आणि तेही नुसत्या नशिबाच्या शिक्क्याचे नव्हे. शिरीषला त्याचा अभिमान होता.
आठवड्यातून एकदा शहराबाहेर प्रयोग लागत. असे एक-दोन प्रयोग आटपून, अतिशय शिस्तीत चौथा अंक संपवून, खरं तर या दिवसांत तिसरा म्हणायला पाहिजे. तो सकाळी परत आला. लुंगी लावून झोपला. फ्लॅटच्या कडीला अडकवलेल्या पिशवीत हात घालून दुधाची थैली बाहेर काढणं नेहेमीप्रमाणे जीवावर आलेलं.
सुखद गुंगी, रंगलेला प्रयोग, मिळालेले हशे, जमलेलं, विस्कटलेलं टायमिंग, प्रयोगात झालेल्या गोच्या, गमती, गप्पा, विंगेतल्या, दारूकाम, जेवण, बस, विनोद, चर्चा, बसमधली हेरगिरी असं सगळं कोलाज होऊन झोपेतही डोक्यात फिरत होतं. सुखद गुंगी उतरत आणि हॅंगओवर चढत. नेहेमीप्रमाणे. आणि मोबाईल वाजला. बराच वेळ मंगलाष्टकाची धून वाजल्यावर त्याला जाग आली. त्यानं मोबाईल चाचपडला, शोधला आणि तो चिडला. एकतर कुणीतरी जबरदस्तीनं ऍडजस्ट केलेली ती धून आणि अनोळखी नंबर. काय संबंध आपला आणि मंगलाष्टकाचा? आणि या नंबराचाही? घाणेरडी शिवी हासडून त्यानं नंबर कट केला. मोबाईलच ऑफ करून ठेवणं म्हणजे महत्वाच्या कॉल्सची गोची. तो पुन्हा झोपला...                                    (क्रमश:)

                    

Saturday, May 11, 2013

"कन्या" दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण!

१६ डिसेंबर २०१२ आपल्याला वेगळ्या कारणासाठी लक्षात असेल. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता अशाच एका मुलीची संघर्षातून उभं रहाण्याची कहाणी "कन्या" दीर्घांकाद्वारे मांडली होती.
आपल्यापैकी अनेकांना प्रयोग पहाणं साधलं नसेल.  "कन्या" या दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण आता आपण यूट्यूबवर पाहू शकता.
कन्या दीर्घांकासंबंधीची माहिती, क्षणचित्रे इत्यादी माहिती इथे जरूर वाचायला मिळेल.
हे माझं दिग्दर्शन आणि निर्मितीतलं आणि कलाकारांपैकी बहुतेकांचं अभिनयातलं पदार्पण!
आपल्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत!

Saturday, December 29, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (अखेरचा भाग)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७भाग १८ आणि त्यानंतर...
कडले लोककल्याणाच्या भावनेने आता अगदी बेफाम झालेत. त्यानीच ज्याम केलेल्या भैय्याला ते खडसावू लागलेत, "येऽऽऽ अब किदर जायेगा तू-"
"छोडो- छोडो- येऽऽ"
"ये महे‍ऽऽऽशऽऽ येऽऽ... गौरीऽऽ निमूऽऽ अंकीऽऽतऽऽ-"
"कोई नही- आयेगा- छोड- छोड-"
कडलेनी बेंबीच्या देठापासून बोंब ठोकलीए त्याचा परिणाम होऊन हाक मारलेले सगळे अचानक वेगवेगळ्या दिशेने धावत आलेत. भैय्या हडबडलेला. महेश अंकित त्याला मारत सुटतात, गौरी, निमाही त्याला सोडत नाहीत.
"महेऽऽश याचा विग काढ- अर्‍ये माझा नव्हे रेऽऽ याचाऽऽ"
भैय्याचा विग निघतो. भैय्या आणि मंजू टी एकच आहेत. कडले आता चार्जच घेतात प्रकरणाचा.
"बघितलंत! भामटा आहे हा! ठग! लालन पालन बालन संघ अस्तित्वातच नाही! हा ठकवतो खोटं बोलून. पालक फसतात गरजू आहेत म्हणून!"
गौरी, महेश एकदम खूष झालेत, "काका तुमचा प्लान मात्र एकदम सही!"
निमाला काही समजत नाही, "ऑं? यांचा प्लान?"
"अहो वहिनीऽ ग्रेट आहेत तुमचे हे!" असं गौरीनं म्हटल्यावर निमा चक्कं लाजलीए.
निमाचं लाजणं बघून कडलेंचा आवेश एक मात्रा आणखी वर चढलाय.
" परदाफाश केला. आता ’शी’ काय, ए टू झेड सगळ्या चॅनल्सचे ’सर्वोत्कृष्ठ गुप्तहेर’ पुरस्कार मलाच!"
निमा "रितिऽक" असं लाजून म्हणून आणखी एक मुरका मारते.
कडलेंच्या जिवाचं पाणी पाणी झालंय, "निमू‍ऽऽ"
महेश खाकरत काकांना आवरतो, "हं काका... नंतर. नंतर. चला आधी याला चौकीवर डांबून येऊ!"
सगळे चला, चला करत निघताएत इतक्यात समोरून हातात हात अडकवून दोन्ही आज्ज्या, शांताबाई आणि उर्मिलाताई संचलन केल्यासारख्या येताना दिसताएत. त्यांच्यामागून त्याना थांबवता थांबवता हैराण झालेला सोसायटीचा चौकीदार आलाय. सगळे भैय्याला चौकीदाराच्या स्वाधीन करतात. पोलिसात सोड म्हणून भैय्याला रट्टे लगावतात. चौकीदार आणि भैय्या बहुतेक एका समाजातले असावेत. त्यांचं तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं कर असं सगळं सुरू होतं.
इतर सगळ्यांचं लक्ष आता आज्ज्यांच्या संचलनाकडे वळलंय. संचलन एकदाचं थांबतं. दोन्ही आज्ज्या महेश गौरीला बघून थांबतात आणि चक्कं हात जोडतात.
"पोरांनो माफ करा! आमचं खरंच चुकलं. आम्ही सांभाळतो तुमच्या मुलांना!"
ते ऐकून कडले आणि निमाला च्येव येतो.
"नाही महेश! अंकुडी- अवनी आमच्याकडे!"
निमाला भरून आलंय, "भरपूर त्रास सोसलाय तुम्ही. बघितलंय मी. माझ्या पाळणाघरात आनंदानं रहातील दोघं!"
दोन्ही आज्ज्या, "आमच्याकडे!"
कडले, निमा, "नाही आमच्याकडे!"
जोरदार रस्सीखेच चालू झाली आहे. महेश वाहतूक पोलिसाच्या आवेशात गोंगाट थांबवण्याच्या प्रयत्नाला लागतो.
"शू: शू: एऽऽशू:ऽऽ हात जोडतो. हात जोडतो. पदर नाही पण तोही पसरतो असं समजा. पण आता मी सांभाळू शकतो माझ्या मुलांना. महिनाभर रात्रपाळी-दिवसपाळी एकत्र झाली साजरीऽऽ की चार दिवस औषध घेऊन डाराडूर-"
असं म्हणत महेशनं उजवा अंगठा तोंडाला लावलाय. ते बघून गौरी किंचाळते.
"ऍ हॅ रेऽऽ आणि माझं काय?"
आता सगळेच "नाही! नाही!" म्हणून नाचायला लागतात. दोन गट करून दोन्ही बाजूनी "आम्ही! आम्ही!" चा धोशा लावतात. या घोषणांनी गौरी, महेश हैराण झालेत.
त्याचवेळी लांबून सोसायटीच्या गेटमधून एक म्हातारा हात उंचावून त्यांच्या दिशेने चालत आलाय. सगळे त्याच्याकडेच बघत गप्प झालेत. कडले पुढे होतात. हा वेषांतर केलेला टी मंजू किंवा आत्ताच पकडलेला भैय्याच आहे की काय या दिशेने त्यांची चाचपणी सुरू होते.
म्हातारा बोलू लागतो, "अरेंऽऽ काय ह्यां! काय ह्यां! किती आवाज करतलंव? ऑं?.. माका सांगा- हयसर म्हयेश कोन हा? म्हयेश जावड्येकर?"
"मी! मी! का? का?"
"मांयझयाऽऽ का म्हन्तस माका! माका वळाकतंस?- अरे पांडू कांबळीचो चुलतो मी- तुजो दोस्त पांडू-"
"हां! हां! काय काका कसे आहात?"
महेश हात पुढे करतो आणि म्हातारा त्याचा हात धरून त्याला खेचतोच.
"अरे माका नोकरी व्हयीऽऽ नोकरी दी माका!!! तुज्या झीलाक आन च्येडवाक सांभाळतलंय मी! त्ये पन येक टायम प्येज्येवर! ती खाऊसुदीक पैसो न्हाय बाबा आता! अरे लोअरपरेलाची झाली अप्पर वरळी तीऽऽ मी- मी- मी- सांभाळतलंय- मी-"
म्हातारा कांबळी महेशला एका बाजूने खेचू लागतो. दोन्ही आज्ज्या "आम्ही! आम्ही!" करत दुसर्‍या बाजूने आणि निमा, कडले "आम्ही- आम्ही- आम्ही" करत आणखी तिसर्‍याच बाजूने.
मोठ्ठा गदारोळ सुरू झालाय. महेश आणि गौरीला सगळ्यांनी घेरलंय.
"आम्ही सांभाळतो तुमच्या मुलांना, आम्ही!" म्हणत महेश, गौरीच्या मागे सगळे हात धुऊन लागलेले...    

तर... मित्रमैत्रिणींनो! "आमच्या मुलांना सांभाळा!" म्हणत यापूर्वी आक्रोश करणार्‍या महेश, गौरीला आता या नव्या आव्हानाला सामोरं लागतंय. हे वर्षं सरत असताना! ;)
पण हे आव्हान गोड आहे! नाही? 
महेश आणि गौरीची कहाणी अशी सुफळ संप्रूण झाली या सरत्या वर्षात. नव्या उत्साहाने ते आता नव्या वर्षाला सामोरे जातील...
तुम्हा सगळ्यांनाही नव वर्षं सरत्या वर्षापेक्षाही उत्तम जावो ही शुभकामना!
आव्हानं असणारच. हे वर्ष सरत असताना दु:खही सोबत आहे. नव्या वर्षात या दु:खाला आपण सर्व मिळून न्याय मिळवून देऊया! 
नव वर्षं मन, बुद्धी पूर्णपणे जागेवर ठेऊन साजरं करूया... 
आपणा सगळ्यांच्या मनातल्या इच्छाही सुफळ संप्रूण होवोत या शुभेच्छा!!! 
मन:पूर्वक आभार! 

Friday, December 21, 2012

"कन्या" दीर्घांकाची क्षणचित्रं!

"अभिलेख" प्रकाशित "कन्या" या दीर्घांकाचा शुभारंभ झाला त्याची क्षणचित्रं! 
दिनांक १६ डिसेंबर २०१२, रविवार, संध्याकाळी ५ वाजता, प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे "कन्या" हा दीर्घांक सादर झाला. 
एका अत्याचारित महाविद्यालयीन युवतीची कहाणी मांडण्याचा हा एक प्रयत्न. 
दीर्घांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे:
लेखन, दिग्दर्शन, निर्मिती: विनायक पंडित
प्रकाश: वासुदेव साळुंके
पार्श्वसंगीत: अरूण कानविंदे
वेशभूषा: वरदा पंडित
रंगभूषा: रमेश वर्दम
कलाकार
तेजश्री बोरकर
विद्या मुळगुंद
कविता नाडकर्णी
प्रिया गडकरी
मृणाल वझे

Wednesday, December 5, 2012

हार्दिक आमंत्रण "कन्या" दीर्घांकाचे!

हार्दिक आमंत्रण!
"अभिलेख" सादर करत आहे...
विनायक पंडित लिखित, दिग्दर्शित, निर्मित 
दीर्घांक "कन्या"
एका महाविद्यालयीन युवतीची ही गोष्टं!
सारिकावर अत्त्याचार झाला...
तिला तपासून घ्यावं लागलं आपलं आयुष्य,
आपल्या आधीच्या पिढीतल्या चार स्त्रियांशी...
काय होती या सगळ्यांची आयुष्यं?
सारिकाला काय मिळालं या अनुभवातून?
सारिकाचं पुढे काय झालं?

Monday, November 12, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१८)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७ आणि त्यानंतर... 
डोअरबेलच्या आवाजाने अंकितच्या टीव्ही बघण्यात व्यत्यय आलाय. तो जोरात ओरडतो.
"ममाऽ ममाऽ कचरेवाला! ममाऽ उघऽऽड!"
"आले रे आलेऽ कोण मेलं आता आलंय तडमडायलाऽ... आलेऽ आलेऽऽ..."
गौरी धावत पळत आतून येते. दार उघडते. दारात भैय्या. त्याला बघून ती चिडते.
"आओऽ आओऽ सब कचराही जमा हो गया हैऽ इदरऽ... लेके जाओऽऽ... सब कचराऽ हम कचराऽ हमारा नसीब कचराऽऽऽ-
"सुना- सुना हो- बहनीयां- सुना- हम कचरावाला नाही-"
"भैय्या आहेस ना?"
"हां... वह तो हम हुं..."
"मग? अरे हम काय? हुं काय? इथे आम्हाला भरलाय दम- हुं की चू काही करता येत नाही! आणि तू?... ज्याव रे बाबा आगे ज्याव!"
"बहनीयां... सुना हो- हम फोनवा करन रहिन- फोनवा-"
"अरे कसला फोनवा! फोनवा!- फोनवा? अं? म्हंज्ये फोन?"
"हां मैय्या... हम ऊही बालन लालन पालन संघ-"
"तुम भैय्या अऊर मैं मैय्या काय? लालन पालन?- वर बालन?- हां हां हां- आव अंदर आव- आव यार आव!- ये ये देखो क्या किया तुमारी वो मंजू टी ने-"
"टी मंजू-"
"अरे पुढे काय मागे काय टी च आहे नं? टीनपाट! एक मिनिट! म्येरे अवनीको ज्यरा पालनेमें रकती- हूं- हं... आव- अबी बेडरूममें आव- आव कोई नई है आव- ये- ये बेडरूममे तुमारा मंजू टी घुसा! ये- ये- ऐसा कपाट खोला-"
गौरीने भैय्याला ओढत घरात आणलंय. बेडरूममधे नेलंय. ती त्याला बेडरूममधलं कपाट उघडून दाखवतेय. भैय्या सगळं घर बारकाईने न्याहाळतोय. गौरी आता कपाटातली कॅश काढून दाखवतेय.
"ये- ये- ऐसा पैसा लिया- हमारे आदमी कोऽ क्या कुच पिलाके सुलाया- ये- ये इदर- और ओ- ओ भाग गई- गया-"
धावत धावत स्वत:च बेडरूमपासून हॉलपर्यंत जाते. दारापर्यंत. भैय्या तिच्यामागे.
"और क्या आश्चर्यऽ- गया गया वो गयाच- अरेऽऽ आदमी था ओ औरतके भेसमे... वो अच्चा हुआ... हमारा कडलेकाका करके है एक! है अच्चा है! बुढ्ढा है, अच्चा है! उसके वास्ते पैसा वापस मिलाऽऽ... मैं हात जोडती हूं... बस हमको अभी कुच नही चाहिएऽऽ"
त्या स्टोरीने भैय्या भावनाविवश होत खांद्यावरच्या पंच्याने डोळे पुसतोय.
"आपका... आपका गलतफहमी हुई गवा बहनीयां-"
"अरेऽऽऽ- वर हमकाच गलतफेहेमी?-"
भैय्या हात जोडतो.
"माफी करा हो मैय्या... हमार ऊहां टी मंजू कौनो ना रही-"
"ऑं?... म्हणजे रे- अरेऽऽ- म्हणजे ती भामटी- ठग-"
भैय्या आता तिला लोटांगणच घालतो.
"हमका माफी दै दो- मैय्या-"
"अरे ये- ये- क्या-"
भैय्या डोळे गाळत उठून उभा रहातो. हात जोडून.
"हमार नामपर उई ससुराईन मंजी धोखा दई गई आप लोगन को- लेकीन अब हम इहां कसम खाई रहिन माई... आपक सामने खडा रहिके के हम आपक बच्चनको पाली, पोसी, बडा करी-"
"म्हणजे नक्की काय करणार रे भैया?"
"हम संभालेगा बच्चोंकों!"
गौरी त्याला आपादमस्तक न्याहाळते, "तुम?"
भैय्या पुढे होतो, गौरी दोन पावलं मागे.
"हमार बहनीयांक खातिर हम जान भी दूं- ताऊजी कहां रहिन?"
"कोऽऽण ताऊजी?ऽऽ काय रे तुमची ही चिऊ काऊची भाषा?"
"चिऊ काऊ नाही! ताऊ- आपके हजबेंड!"
गौरी किचनकडे बघत रहाते...
"ओ- ओ- आई गं झोपला की काय हा बाथरूममधे?ऽऽ... महेऽऽश अरे ए-"
किचनच्या दाराजवळ ती पोचते न पोचते तोपर्यंत आतून महेश बाहेर येतो. केस पुसत. पूर्णपणे नॉर्मल. अगदी नॉर्मल असल्यासारखा तो फिसकारतो.
"काऽऽय आहे?ऽऽ"
"अरे- हा भैय्या-"
"कोणाचा?ऽऽ"
"अरे लालन पालन बालन संघाचा-"
महेश फिसकारत त्याच्याकडे बघतो. केस विंचरत दरडावतो.
"नाम क्या तुमारा?ऽ"
"श- श- शटल बिहारी-"
"अर्‍ये कोण बिहारी?ऽऽऽ"
"शटल बिहारी यादव! हमार परदादा अवध बिहारी बिहारवा से पहला शटल पकडभैके आवन रहिन ईहां... हमार नाम रख्खा-"
"शटल बिहारी?ऽऽ"
"यादव- हमार उपनाम!"
महेश त्याला न्याहाळू लागतो.
"दोन दोन नावं कायर्‍येऽऽ"
"नाही रे महेश एक नाव आणि दुसरं आडनाव-"
"माहितीए ते मला..."
एकदम भैय्याच्या अंगावर जातो.
"वोऽऽ टी मंजू मिली- मिला न मुझे तो मैं उसका खून पी डालूंगाऽ-"
"ऊ नाही मिली तो हमार पिजिए ताऊजी- हम आपक पांव पकडी- आपस बिनती करी- हात जोडी- माफी मांगी- ताऊजीऽऽऽ लेकीन आप हमका आपक चरनोंपर जगहा देई!ऽऽ"
"गौरी!... बघितलंस! कसे पाय पकडून पकडून मोठे होतात!- यानं माझे पाय खेचायच्या आत सांग याचं काय करायचं!" 
"अम्म्म... थोडे दिवस बघूया- नाहीतरी ती शेजारची पाळणाघरवाली निमडी जास्तच तोरा दाखवतेय- बरा दिसतोय- मैय्या म्हणाला मला-"
महेश गुरकावतो, "चांगलं चाललंय तुमचं... तो भैय्या तू मैय्या-"
गौरी खूष होते, "तेच म्हणाले मी- भैय्या! आप रह जाव कामपर- काम का क्या क्या है-"
"ऊ हम सब जानत रहीन जावडेकराईन... हमार काम पक्का ताऊ?"
महेश रूबाबात बेडरूमकडे निघालाय, "हांऽ-"
"अरे महेऽऽश... तू कुठे चाललास परत?"
"जातो मी- झोप पुरी व्हायचीय माझी- नाहीतर होईल परत माझा रोबो-"
"अरे-"
महेश चवताळतो, "च्याआयलाऽऽ रात्रपाळी, दिवसपाळी सारखी सारखी! झोप कधी पुरी करू?ऽऽ"
बेडरूममधे जातो. बेडवर अंग टाकतो. भैय्या इकडे तिकडे बघत हॉलमधेच. अंकित त्याला न्याहाळतोय आणि भैय्या त्याची नजर चुकवतोय. अंकित तोंडात अंगठा घालून त्याला जास्त जास्तच न्याहाळू लागलाय.
"ममा... याचा चेहेरा कुठेतरी पाह्यलाय ममा... ममाऽ-"
"तू गप रे- हां भैय्याजी! कलसे मैं कामपर जाऊंगी आप-"
भैय्याचं लक्ष अंकीतकडे. अंकित त्याचा पीछा सोडत नाही. भैय्या हैराण. तो गडबडीने खिशात हात घालतो.
"ऊ सब हम जानत रहिन मैय्याजीऽऽ... इ- इ रहा परशाद... हमार भौजाई गंगा ईस्नान कर आई... ऊ लडवा लाई आप लोगन के वास्ते... आ लई लो मैय्या... गंगामईया तोहरी पिहरी चढईबे... लो बिटवा लो... लो मईया.. ताऊजी- उनक डिसटरब ना करी मैय्या... उनका सोवन दो... आप लो मईय्या..."
भैय्या गौरी आणि अंकितच्या हातात एक एक प्रसादाचा लाडू ठेवतो. गौरी लाडू हातात घेऊन मनोभावे डोळे मिटते.
"असं का... अरे वा.. जय गंगा मैय्याऽऽ"
अंकित, गौरी पटापटा लाडू खातात. भैय्या पटकन किचनमधे घुसून पाणी आणतो, दोघांना देतो, टक लाऊन दोघांकडे बघत रहातो. दोघेही हळूहळू सुस्तावू लागलेत. ते सोफ्यावर रेलतात. भैय्या चपळाईने त्याना बसायला मदत करतो. ते बसतात आणि सोफ्याच्या काठांवर माना टाकतात. भैय्या पुन्हा त्याना न्याहाळतो. स्वत:वरच खूष होतो. बेडरूमकडे वळतो. बेडरूममधे येतो आणि झोपलेल्या महेशचा कानोसा घेतो. गौरीने मघाशी उघडून दाखवलेलं तेच पैशाचं कपाट उघडतो. पैशांची बंडलं, दागिने, कॅमेरा, मोबाईल असं मिळेल ते खिशात, धोतरात, पंच्यात खुपसतो. सावकाश कानोसा घेत हॉलमधे येतो. तिथल्या जमतील त्या वस्तू जमेल तिथे कोंबत विसावलेल्या अंकित, गौरीकडे बघत, सराईतपणे दाराबाहेर पडतो. बाहेर येऊन दबकत उजव्या बाजूला वळून धूम ठोकणार इतक्यात- मागून त्याच्या पाठीवर, त्याच्या मागावर दबा धरून बसलेले कडले झेप घेतात. कडलेनी भैय्याला पकडून धरून अगदी ज्याम करून टाकलंय...  ( शेवटचा भाग लवकरच...) 
       वाचक मित्रमैत्रिणींनो आपणा सगळ्यांना                       दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Thursday, November 1, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१७)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६ आणि त्यानंतर...
जावडेकरांच्या घरात अवनी जोरजोरात रडतेय. गौरी बेफाम रडणार्‍या अवनीला थापटून झोपवतेय. अंकित हातात एक खेळण्यातली कार घेऊन तोंडाने घर्रऽऽ असा असह्य होणारा आवाज काढत सगळ्या घरभर धावतोय. महेश बेडवर पालथा झोपलेला. ढाराढूर. गौरी अत्यंत गांजलेली आहे.
"चूप गं बये अवनी आताऽऽ किती रडशीलऽ चूप!... येऽ कारट्याऽऽ... अंकिऽऽतऽ अरे बस एका जागीऽऽ आणि आधी ते तोंड बंद कर! बंद कर रे-"
"मीऽऽऽ चूऽऽपऽऽ हेहेहेहेऽऽ हऽअऽहऽ... घर्रर्रऽऽऽ..."
"कारट्याऽऽऽ ऐकेल तर शपत!.. येऽ अगं ए बाई- चूप गं चूप! काय करू काय आता तुलाऽ- ए महेशऽऽऽ एऽऽऽ- काय माणूस आहे- अरे ऊठ रे ऊऽऽठऽऽ... चार दिवस झाले झोपलाएस-"
महेश ऊंऽऽऽ असा आवाज काढून फक्त कूस बदलतो.
"अरे काय रे हे?... अरे काय करू मी एकटी? आय आय गं! ही दोघं बघ! तू असा झोपलेला- कूस बदलतोएस म्हणून म्हणायचं जिवंत आहेस! अरेऽऽ काय प्यालास काय तूऽऽ... हे काय झोपणं तुझं? चार दिवस-रात्र? रात्रंदिवस?
"ऊंऽऽऽ... मैं... कहां हूं..."
"मसणात! अरे डायरेक्ट पिच्च्यरमधे कुठे जातोस तू? तीऽऽ मंजू टी चोरटी निघालीऽ पळाली पैसे घेऊऽऽनऽ तुला काहीतरी पाजूनऽऽ... ती ती नव्हतीच, तो होता म्हणे तो!- तसा डाऊट खाल्लाच होता मी! अरे शेजारचे कडलेकाका होते म्हणून निभावलं बाबा- अरे ऊठ! ऊठ बाबा लवकर! चार दिवस जेवण नाही खाण नाही- काय रे हे- चल चल बस झालं आता- ऑफिसला चार दिवस माझी दांडी- बस झालं बाबा- पोरांना देऊन टाकू शेजारी- पाळणाघरात- त्या निमाच्या- मिटवून टाकू भांडण- पडू पाया- सांभाळा आमच्या मुलांना म्हणावं-"
महेश पुन्हा उपडा, झोपलेलाच, ऊंऽऽऽ करतो. गौरी आणखी वैतागलेली. अवनीचं रडणं, अंकितचं घर्रर्र चालूच.
"ऊठ रे ऊठ बाबाऽऽ... कंटाळले रे बाबा मी- काय करू एकटीऽ- वाजला वाजला मेला फोन- हॅ- हॅ- लोऽ कोण? कोन?- ये देखो बार बार फोन मत करो तुम इदर- तुम तुम समझताय क्या- हां हां तुमारा वहीच बालन लालन पालन संघ- हां- क्या किया वो मंजू टी ने?- नई नई हम क्यूं जायगा पोलिसमें? क्यूं जायगा? म- म- मंगताय तो तुम जाव- हमको क्यूं जबरदस्ती? ऑं? ऑं? क्या? क्या बोल्ताय? न- नई- नई- नई! इदर और किसीको अजिबात मत भेजो!- ह-हमारा हमार पैसा मिल गया हमको सब बाबा- हां हां भरून पावा- हमको सबकुच! और- और तुम सुनो- सुनो- सुनो- इदर फोन भी मत करना- वरना- वरना फोन परसेही तुम्हारा तंगडी तोड डालेगा हमारा आदमी- अभी सोया है वो- उठता नई- लेकीन वो- वो- तोडेंगा- गुस्सा आयेगा तो- उसके मनमें आयेगा तो- खाना खाया होगा उसने तो- ~ऒं- ऑं- ठ्येवला मेल्यांनीऽऽ... ऊठ रे! ऊठ! चल चल चल मी मदत करते तू- अरे आणखी किती वाकू?ऽऽऽ कडेवर अवनी आहे माझ्या बाबाऽऽऽ... हं हं जमतय तुला! अरे बाथरूमला उठत होतास तू चार दिवस! तसंच! हां! हां! चल आत! आंघोळच करून घे चल!... ए अंकिऽऽत- चल बंद कर- बंद कर आवाज- अरे आपल्या पप्पाला त्रास होतोय बाबाऽऽ उठत नाहिए तो चार दिवस माहिती नाहिए काऽऽ- अरे आता उठलाय बाबा पण तू आवाज बंद कर आधी- बंद कर!- चल- चल- चल महेश!"
अंकितचं घर्रर्र घर्रर्र आणखी चेकाळून चालू. महेश गौरीच्या खांद्यावर हात ठेवून आंधळ्या भिकार्‍यासारखा आत जातो. अंकित धावून धावून दमलाय. तो फतकल मारतो, टीव्ही ऑन करतो...
त्याचवेळी बाहेर सहनिवासाच्या आवारात एक भैय्या दमदार पावलं टाकत दाखल झालाय. भरघोस पांढर्‍या मिश्या, भरघोस सरळ पांढरे केस डोक्यावर. मळका धोतर-कुर्ता. खांद्यावर गमछा. येतो तो सरळ जावडेकरांची डोअरबेल वाजवतो. पुन्हा पुन्हा वाजवू लागतो... (क्रमश:)  

Thursday, October 11, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१६)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२भाग १३, भाग १४, भाग १५ आणि त्यानंतर...
महेश वाट बघत बसलाय आणि त्याच्यामागे तसेच लाकडासारखे ताठ उभे कडले कंटाळायला लागलेत. मग ते खाली यायला निघतात तेव्हा महेशसारखेच चालू लागतात. ते लक्षात येऊन वरमतात आणि खाली येऊन झटपट बेअरिंग बदलून दबा धरून बसतात. चेहेरा, डोळे गूढ...
टी मंजू आतून अवनीला कडेवर घेऊन येते, "कोन हें रें? बार बार घंटी बजाता है?- अरे बेटी! थांब हं. तुला ठेवते ह्या पाळण्यात... हं... झोपायतं. दीदीला तलास द्यायता नई! उंऊंम- अं- गोग्गोड पापा... अबी भाहर वो ताठ होयेंगा तो अच्चा मज्या चखाऊंगी- आं????- फिरसे वोईच! ताठ! ऊईमां! ऊईमां! क्या करूं? क्या करूं?- अरे- अरे-"
मंजू असं म्हणून दार बंद करेपर्यंत महेश घोड्यासारखा आत घुसतो. मंजू किंचाळते.
"एंऽऽ एंऽऽऽ कोन है? कोन है?" मंजू धडपडते. महेश तिच्या अंगावरच आल्यासारखा. ती पडते.
"अरे क्या करतांय?"
"सॉरी मंजूद्येवी सॉरी! मैं बच्चा हो गया हूं... छोता छोता.. मेला ईलादा गलत नई है.."
"ऊंई मांऽऽ... कोन है कोन तुम?"
"बताता हुं... मैं इस घलका मालिक हुं... मेला नाम महेत है,,, मैं कलथनदाथ कानदी एंद कंपनी-"
"बस बस रे बस! मंदबुद्धी लगताय तुम मेरेको... पर सब माहिती तो बरोबर देताय-"
"मैं तुमको कुच नई कलुंगा.. खाली मुधे थोने दो!"
"आंईंऽऽऽ क्या बोला?"
"मुजे मेले बेदलूममें जाकल थोने दो.. थो जाऊंगा तो अच्चा हो जाऊंगा!"
मंजू महेशकडे अजून संशयाने बघतेय, " तो- तो- जाओ ना- जाओ!"
"येक धक्क्का द्येव नाऽऽऽ... मंदूदेवीऽ येक-"
"हां हां... देती हूं.."
"औल एक मिनित! कुच पानी दो! पीने के लिए! मैं थो जाऊंगा! हऽअऽहऽअऽ"
"हां सब करती हूं! सब करती हूं! अच्छेसे सो जाना तुम!"
त्याच्या मागे येत लाथ वर करते पण मग हातानेच स्पर्श करते. तो स्पर्श किचनच्या दिशेने होतो आणि महेश भलत्याच दिशेला किचनकडे जाऊ लागतो, वैतागतो.
"कैथा धक्का दिया.. मैं बोला था बलाबल धक्का द्येव- तुमने थो-"
महेश किचनमअधे शिरतो. मंजू त्याच्या मागे अरे- अरे- करत. सगळी वरात आतून बाहेर, हॉलभर. मग बेडरूममधे. महेश आता बेडला अडून.
"क्यां रे बांबा! क्यांरे तुमारा स्टॅमिना.. बाबांरेऽऽ मंदबुद्धी होके भी-"
"मैं मंदबुद्धी नई हूंऽऽ छोता बच्चा हूंऽऽ"
"अरे बच्चेऽऽ अभी दिखाती हूं तुझे-"
"मंदूदेवी अब मुझे छुला दो!"
"ऍहांरेऽ कैसे? गोदमें लेकर सुला दूंऽऽ"
 "अले बाबाऽऽ औल एक धक्का मालकलऽऽ"
"हां हां येस!" ती आपल्या पार्श्वभागाने त्याच्या पार्श्वभागावर जोरदार धक्का देते, "बाबां रे.. छुट गईऽऽ"
"अब मुझे कुच पिला दो! पिकल मैं छो जाऊंगा.. एकदम गाध छो जाऊंगा.. फिल मुझे गहेली नींद आएगी.. पलीलानी मेले सपनेमें-"
"हाय राम! ये आदमी है की एफेम रेडियोऽ.. मैं तो पूरी पक गईं रे बांबा.. वो दो दो और ये एक बच्चा! बाबांरे- छे हजार पगार लेना पडेगा- दिनका-"
"मंदूदेवी मंदूदेवी कुच पीने को दो- फिल मैं छो जाऊंगा... पलीलानी- थपनेमें..."
"हां हां बाबा हां!!!"
तिथल्याच कपाटात वगैरे शोधते. दारूची बाटली दिसल्यावर तिचा चेहेरा उजळतो. कपाटाचा दरवाजा उघडा.
"तुम मुझे कुच पिला दोगी-"
"हां ये पीला देती हूं मेरे लाल... ले... ले,,," हळूहळू बाटली त्याच्या तोंडात ओतते. जरावेळाने बाटली न्याहाळते. बाटली जवळजवळ रिकामी. आता महेश गुंगीत बडबडत असल्यासारखा.
"कितनी अच्ची हो थुम मंदूदेवी... मैं तुमाला बहुत बहुत शुक्लगुजाल हूं.. मुझे छुलाया... पीलाया..."
मंजू रोखून त्याच्याकडे बघतेय. त्याचं बडबडणं कमी कमी आणि क्षीण होऊ लागतं. बंद होतं. मंजू कानोसा घेते. महेशच्या गालावर चापट्या मारते. विकट हास्य करते. स्वत:च चपापते.
"ऊंईमां... ये तो सो गया... मैं बत्ता हूं. मुधे कुथ पील धो!- सो जा अब! हो गया धूत! हऽहऽहऽऽ चलो अब..."
हलक्या पावलाने वळते. त्याच उघड्या कपाटाजवळ येते. हात घालून पैशांची बंडलं खेचते. ओढणी सावरून घेत हॉलमधे येते. कानोसा घेत दरवाज्याजवळ येता येता थांबून पाळण्याजवळ जाते. बाळाचा उडता पापा घेते. लचकत मुरडत सफाईदारपणे दरवाजा उघडून बाहेर येते. दरवाजा घट्ट लावून पुन्हा पुन्हा खात्री करून घेते. गुणगूणत आणखीच मुरडत इकडे तिकडे बघत, कानोसा घेत पायर्‍या उतरते. आवाराबाहेर सटकायला बघते आणि त्याचवेळी दबा धरून बसलेले कडले तिच्यावर चित्त्याच्या चपळाईने झेप घेतात. ती आंई ऊंई करते, प्रतिकार करते. कडले स्वत: चांगलेच धडपडतात पण तिला धरतात.
"एऽऽय एऽऽय! क्या चुराया बोल! बोल!"
मंजू आधी अरेरावीने गुरगुरते. सुटायचा प्रयत्न करते पण कडले तिचा हात घट्ट पकडून पोलीऽऽस पोलीऽऽस म्हणून जोराची बोंब ठोकतात. मंजू घाबरते. निकराने स्वत:ला सोडवून घेत चोरलेले पैसे जमिनीवर फेकते. कडले फेकलेल्या पैशांकडे बघत असताना ती त्याना हिसडा देऊन सुटते. ते तिला पुन्हा पकडायला जात असताना तिचा विग त्यांचा हातात येतो.
"अरे- अरे- अरे मंजू कुठलीऽऽ हा तर मंज्या आहे मंज्याऽऽ- चोर चोऽऽरऽऽ पकडाऽऽऽ"
मंजू धूम ठोकते. तिच्या मागोमाग जलद पळायचा सराव केल्यासारखे पळणारे कडले. निमा धावत पाळणाघरातून बाहेर आलीय. ती कपाळाला हात लाऊन बघत रहाते...         (क्रमश:)