romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, November 28, 2013

देवराय (१)

देवरायनं मांडी मोकळी केली. पाठ ताठ केल्यावर जरा बरं वाटलं. पायाची बोटं सुन्न झाली होती. दुखत तर होतीच. गुडघा चांगलाच सुजला होता. आसन जरासं बदलून त्यानं पुन्हा सुरवात केली. बाजूला पोस्टकार्डांचा छोटासा ढीग. हाताखालचं कोरं पोस्टकार्ड ओढून, नीट पॅडवर ठेऊन त्यानं पुन्हा लिहायला सुरवात केली: "दु:खद निधन, आमच्या मातोश्री..." मधेच त्याने आजूबाजूला बघितलं. सगळे सुस्ताऊन पडलेले. तहान लागली म्हणून दुखर्‍या पायाने उठून पार्टीशन पलिकडच्या पाण्याच्या टाकीकडे जावं तर या अस्ताव्यस्त शरीरांना ओलांडावं लागणार! तो तसाच बसून राहिला. ढोसून धाकट्याला उठवावं, पायाची बोटं त्याच्याकडून ओढून घ्यावीत तर तो आपला पालथा पडून, हात छातीजवळ मुटकून ढाराढूर! उठवलं असतं तरी, "काय च्यायला!" म्हणून तोंड आणखीनच लादीत घुसवून पडून राहिला असता...
चहाची तलफ आली तशी देवरायला रहावेना. तो सावकाश उठला, लंगडत लंगडत पार्टीशनच्या मागे आला. पाणी प्याला. चहाचं आधण ठेवलं. दोंदावर बांधलेली धोतराची लुंगी आणखी घट्ट केली. खांद्यावरच्या नॅपकीननं खसाखसा तोंड आणि आंग पुसलं. दारातून हवेची झुळूक आली तसा तो दाराच्या फळीजवळ आला. लंगडा पाय सावकाश उचलत फळी ओलांडून पॅसेजमधे आला. नॅपकीन हलवून वहाणार्‍या वार्‍याला अंगावर झेलू लागला...
सगळं कसं शांत झालेलं... सततचा एस्टीचा प्रवास, जागरणं, वाचन, विचार सगळं काही पूर्णपणे थांबल्यासारखं... आतून विचारमग्न, पण बाहेर मात्र हसरा, आनंदी, येण्याजाणार्‍याची चौकशी, मदत, गप्पागोष्टी, मस्करी करणारा... आता स्वत:लाच आतून अगदी ब्लॅंक झाल्यासारखं, निर्वात पोकळी...
तिसर्‍या चवथ्या दिवशीपासून एकेक जण भेटायला यायला लागलेला. दोन तीन दिवस गप्प असलेला फोन खणखणायला लागलेला... तसं त्याला बरं वाटलं. सांत्वन करायला लोकं यायला लागली. सांत्वन करता करता त्यांची गाडी स्वत:च्याच चिंता, अडीअडचणी, अनुभव यावर... पूर्वी त्याला गंमत वाटायची पण मग तो नेहेमीच बोलणार्‍याला उत्साहित, प्रोत्साहित करायला लागला. समोरच्याचं बोलणं ऐकून घ्यायला लागला. या- सांत्वनाच्या परिस्थितीतही तो भेटायला आलेल्याला सल्ला देऊ लागला. लोक तो घेण्यासाठीच आल्यासारखे. एरवीही आणि ह्यावेळीही... हे त्याचं नेहेमीचंच होतं. त्यात आताही काही फरक नव्हता...
चाळीतली लोकं एकमेकांशी स्पर्धा करत घरात घुसायला लागली. ही एक सुवर्णसंधी असल्यासारखी. कुणी गेल्याचं दु:ख, त्यामुळे निर्माण झालेले, होणारे किंवा सुटलेले प्रॉब्लेम्स वगैरे गौण... संधी साधायची कधी एकदा हाच विचार... तो सगळ्यांशी अगदी मनमोकळेपणाने बोलला, वागला. माणसं त्याला प्रिय. मग त्यांच्या इतर गोष्टींच्या पलिकडे तो गेलेला...
पुष्पी येऊन बसली तेव्हा देवराय दुखवट्याची कार्ड पोस्ट करायला गेला होता. कार्डाचा गठ्ठा त्याने धोंगडेच्या हातात दिला. त्याला बजावून, बजावून सांगितलं. आता यात बजावून सांगण्यासारखं काय होतं? पण कामाची पद्धत हिच. एखाद्यानं कुणालातरी पेटीत टाकायला सांगितली असती कार्डं किंवा स्वत: पेटीत सारून झाला असता मोकळा... एवढी पत्रं अर्थातच नुसत्या नातेवाईकांना नव्हतीच. त्याचा परस्परसंवादावर भयंकर विश्वास. कम्युनिकेशन... प्रत्येक गोष्टीने तो जनमनाशी संबंध दृढ करायला बघे. एखादा धोंगडे हातात गठ्ठा पडल्यावरच कपाळाला आठ्या पाडता झाला असता पण या धोंगडेला, साहेबाना आपल्याविषयी आपुलकी आहे हे माहित होतं. त्याच्या गावातल्या कित्येकाना साहेब ओळखत होते. शेवटी मोकळं हसून देवराय बाहेर पडला, नेहेमीसारखा...
पोस्टाबाहेर आल्यावर त्याला एकदम उन्हाचा तडाखा जाणवला. जाड फ्रेमच्या चष्म्याआडचे डोळे किलकिले झाले. टोपी सारखी करून तो चालायला लागला. नाक्यावरून आत वळला आणि "वाऽ वाऽ छान! छान!" असं मनातल्या मनात म्हणत, मान डोलवत चालायला लागला. समोरच्या पानाच्या टपरीशेजारी, बंद दुकानाच्या दाराला रेलून, एक हात लेंग्याच्या खिशात घालून, थोरला हवेत धूर काढत उभा होता... शेजारी चट्टेरी पट्टेरी शर्ट घातलेला मित्र, कोंबडा काढलेला, चार पाच दिवसांचा पारोसा वाटणारा, इकडे तिकडे चोरासारखा बघत, गुपित सांगत असल्यासारखा... थोरला हवेतल्या वर्तुळांकडे बघत हसतोय... "याला एकदा घेतला पाहिजे!" असा विचार देवरायच्या मनात आला आणि दुसर्‍याच क्षणी, "या सुतकात तरी नको!" म्हणून त्याने मान झटकली. दुखर्‍या पायांनी चाळीच्या लाकडी जिन्याच्या कठड्याचा आधार घेत घेत, हाशऽहुश करत पायर्‍या चढायला लागला...
मोरीत हात पाय स्वच्छ धुऊन नॅपकीनला पुसत पुसत आत आला तर पुष्पी आणि मोठी वहिनी बोलत बसलेल्या. हुऽऽश्श करत तो तिथल्याच एका स्टुलावर बसला आणि, "काय? कसं काय?" असं पुष्पीला मोठ्या आवाजात विचारत हसता झाला...
पुष्पी त्याच्याकडे पहात राहिली...     (क्रमश:)

Friday, November 15, 2013

"शुभमंगल सावधान!" एकांकिका "कृष्णलीला" कार्यक्रमात...

कृष्णलीला, कृष्णलीला, कृष्णलीला... असा गजर घरी गेले कमीत कमी सहा महिने चालला होता... हे असं पहिलंच वाक्य तुम्हाला काय सांगायचं ते सांगून गेलंच असेल... तरीही... सांगतो... हा गजर तुम्ही ओळखला तिनेच म्हणजे आमच्या अर्धांगिनीने केलेला... तिच्या नृत्यवर्गाचा कार्यक्रम... सूत्र कृष्णलीला... तर तिला आमची एक एकांकिका त्यात बसतेय हे आठवलं आणि "कृष्णलीला" आमच्याही मागे लागली...
आता ताकाला जाऊन भांडं लपवायचं काही कारण नाही आम्हाला... आम्ही वाट बघत असल्यासारखेच... अशा संधीची केव्हापासून...
तर अशी झाली "शुभमंगल सावधान!" या एकांकिकेच्या सादरीकरणाची सुरवात...
"शुभमंगल सावधान!" लिहिली खूप आधी. मराठवाड्यातल्या एका गावातल्या एका आदिवासी तरुणीचं लग्न देवळातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लावलं... अशी बातमी वर्तमानपत्रात वाचली. तिची कथा झाली. एकांकिका होईल असं नंतर कधीतरी वाटलं. मग सुनीता आणि श्रीकृष्ण असा कथेतला एकमेव प्रवेश एकांकिकेचा शेवटचा प्रवेश झाला. त्याआधीचे प्रवेश मग बांधले गेले. असं अस्मादिकानी केलं पहिल्यांदाच...
गेल्या वर्षी कन्या या लिखित, दिग्दर्शित दीर्घांकाची निर्मिती केली. यावर्षी भूमिकाही करा असा आग्रह झाला अर्धांगिनीकडून आणि आमच्या आतून तर तो होतच रहातो नेहेमी... मग जमवाजमव सुरु झाली...
ती एक मज्ज्याच असते. कलाकार निवडणं. मग त्यांनी गळणं. कुणी हो हो म्हणत अचानक कलटीची चाहूल देणं. आपण त्याना तयार करतोय असं आपल्याला वाटणं. मग नाद सोडून द्यावा लागणं. एखाद्याने घाबरून पळच काढणं इत्यादी... रिहर्सलसाठी जागा हा आणखी एक व्याप आणि ताप... असं करता करता यावेळची गंम्मत म्हणजे दोनच कलाकार उपलब्ध. त्यातले एक अस्मादिक. मग पुनर्लेखन. आशय तोच ठेवायचा. तांत्रिकता सांभाळायची. रचनेचा तोल बिघडू द्यायचा नाही... एकांकिका सोडूनच द्यायचा विचार पक्का होत चालला. पण घर आणि संच (इन मिन दोन कलाकार) यांकडून आग्रह होऊ लागला आणि अस्मादिकांना वाट सापडली पुनर्लेखनाची...
आता दोन्ही कलाकारांना पूर्णवेळ फलंदाजी... फूल फ्लेज्ड बॅटिंग... म्हणजे मेहेनत भरपूर... तीत कमी पडायचं नाही. तेवढंच एक हातातलं...
अनंत अडचणी. त्या येतातच. काही करायचं असलं तर येतातच. विचार येऊ लागला यापेक्षा भरपूर चिकित्सात्मक अभ्यास केला असता तर रोज एक पिल्लू सोडून घमासान चर्चांचे फड उभे केले असते सोशल नेटवर्कींग साईटवर तर केवढं काम झालं असतं. केवढ्याना कामाला लावलं असतं... पण काहीतरी प्रत्यक्ष करायची खाज ना? काय करणार?
संगीत, प्रकाश सगळ्यातल्या अडचणी, मोबाईल्स न उचलणं, अडलेल्याला नाडलं करुन सोडणं... सगळं नेहेमीसारखं... तसं निर्मितीतलं नवेपणही मधे मधे येऊन अडचणी वाढवणारं... शेवटच्या क्षणापर्यंत...
प्रयोगात मग नेहेमीचं थोडंसं इकडे तिकडे झालेलं सोडलं तर महत्वाची अडचण न येता पस्तीस ते चाळीस मिनिटं कधी गेली कळलं नाही...
अस्मादिक (हा शब्द या नोंदीत किती वेळा आला?.. ते तुम्ही मोजलं असेलच!) विनोदाचं धनुष्य पेलून पहिल्यांदाच. तीन भूमिका: सूत्रधार, गणा, श्रीकृष्ण. थोड्याशा वेशभूषा बदलानेच साकार होण्यासारख्या. सोबतच्या स्त्री सहकलाकाराचंही तसंच, तीन भूमिका: अप्सरा-नटी, लक्षुमी आणि सुनिता ... मी खूप वर्षांनी प्रत्यक्ष रंगमंचावर... त्या तुलनेने नवीन...
प्रेक्षकांचे अभिप्राय अंतिम. ते अजून येताहेत.
आमंत्रण बर्‍याच जणांना गेलेलं असतं. काहींच्या खर्‍याच अडचणी. काही न जमवणारे, मग काही करत नसताना ’सध्या काय चाललंय?’ असं थांबवून थांबवून विचारणारे. काही ’यानं प्रत्यक्ष काही केलं बरं का’ म्हणून हिरमुसणारे, सरसावून उगाच आपलं काहीतरी कुठेतरी दामटत बसणारे...
आपल्याला कुणी किती गंभीरपणे घेतंय हा विचार लोप पावलेला असतो प्रत्यक्ष काही करत असताना. आपलं असेल नसेल ते कौशल्य पणाला लाऊन काम पूर्ण करणं यात आनंद असतो. नक्कीच असतो...
तो या नोंदीद्वारे आपल्यापुढे सादर करतो... आभार!...
"शुभमंगल सावधान!" (एकांकिका) "अभिलेख" निर्मित, "नृत्यरंग" आयोजित 
लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित 
प्रकाशयोजना: वासुदेव साळुंके 
पार्श्वसंगीत: अरुण कानविंदे 
रंगभूषा: शशी सकपाळ, रमेश वर्दम आणि मंडळी 
वेशभूषा: वरदा पंडित 
कलाकार: प्रिया गडकरी, विनायक पंडित



Tuesday, October 29, 2013

अभिलेखच्या नाट्यविषयक उपक्रमातलं दुसरं पुष्प...

"अभिलेख" वर मनापासून भेट देणार्‍या माझ्या मित्रमैत्रिणींनो!
दिवाळी अगदी काही दिवसांवरच आली आहे. सण येतात ते आपलं रोजचं तेच ते जगणं सुसह्य करण्यासाठी. ते आपण जबाबदारीने आणि तरीही पूर्ण आनंदात साजरे करायचे असतात...
तेव्हा सर्वप्रथम ही दिवाळी तुम्हा सर्व सर्व नेटकरांना परम आनंदाची जावो अशा मन:पूर्वक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद! तुम्ही दिलेल्या पाठबळामुळेच "अभिलेख" आजवर इतकी मजल मारु शकलं आहे....
सहचरहो! गेल्या वर्षीपासून "अभिलेख" चे नाट्यविषयक उपक्रमही चालू झाल्याचे आपण सर्वजण जाणताच.
"कन्या" या दीर्घांकाने (एक तासाचा नाट्यप्रयोग) या नाट्यविषयक उपक्रमाचा शुभारंभ झाला. गेल्या डिसेंबर महिन्यात ज्या दिवशी दिल्ली शहरात ती महाभयानक घटना घडली त्या घटनेआधीच्या संध्याकाळी "कन्या" दीर्घांक अशाच एका युवतीचं वास्तव उभं करत होता...
या दिवाळीनंतरच्या शनिवारी नऊ नोव्हेंबरला, सकाळी अकरा वाजता "अभिलेख" आणखी एक नाट्यविषयक उपक्रम अर्थात पस्तीस मिनिटांची एक एकांकिका "शुभमंगल सावधान!" सादर करत आहे. लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित.
हा कार्यक्रम "नृत्यरंग" या कथकनृत्य विषयक संस्थेने आयोजित केला असून संचालिका वरदा पंडित आणि त्यांच्या विद्यार्थिनी कथकनृत्य सादर करणार आहेत.
"कृष्णलीला" हे या कार्यक्रमाचं नाव आणि विषयही कृष्णलीला हाच.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली (पश्चिम) इथे "कृष्णलीला" सादर होईल. प्रवेशिकामूल्य रु.२००/- आणि रु. १५०/- ...
आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण... आपल्या शुभेच्छा आहेत म्हणूनच आम्ही "कृष्णलीला" सादर करत आहोत...
पुन्हा एकदा आपणा सगळ्याना मनापासून धन्यवाद!

Sunday, October 20, 2013

प्रस्थापित (७) : भाग अखेरचा...

भाग १, भाग २भाग ३, भाग ४, भाग ५ आणि भाग ६ इथे वाचा!
... प्रयोग चांगलाच रंगला... नेहेमीप्रमाणे स्त्री कलावंत नेहेमीच्या जागी चुकली. पुरुष कलाकारानं शिरीषचे लाफ्टर्स खाण्याच्या प्रयत्न केला. शिरीषने अर्थात ते चोख वसूल केले. तो कुठेही चुकला नाही. सगळं नेहेमीप्रमाणे...
पण नेहेमीप्रमाणे शिरीष प्रयोगात रंगून गेला नव्हता. कुठेतरी कायतरी चुकचुकत होतं. प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही. मनाच्या मागे, प्रयोग चालू असतानाही, काहीतरी वेगळं चालू होतं, हे शिरीषसाठी नवीन होतं...
कसे आलो आपण इथे?... नोकरी करणार नाही असं घरी सांगितल्यावर वडील चिडले होते. त्यांनी सतत मनधरणी करूनही, आपण सतत नाही! नाही! असं ठाम सांगत राहिल. तुच्छतेने?... मग आई हादरली. मागचे भाऊ, बहीण वेळेआधीच धडपडू लागले. आपण ते सगळं पहात स्ट्र्गल करत राहिलो. या इंडस्ट्रीत... सतत वाक वाक वाकण्याचा?... अपमान, उपेक्षा सहन करण्याचा?...
आणि... आज काय करतो आहोत आपण? रोजंदारीवर असलेल्या कामगारासारखे नाईटच्या पाकीटाची वाट पाहात? प्रथितयश निर्मात्याला बांधून घेऊन? कुबेर आणि कर्ण असलेला तो वेळप्रसंगी करवादत नाही आपल्यावर बॉससारखा? काय करतो आहोत आपण? सोडून जातो?...
एवढं सगळं करून दुसर्‍या फळीपर्यंत आलो आपण... आपल्यापुढचा दिग्दर्शक निर्मात्याचा नातेवाईक. तो आपल्याला पोचून देईल आणखी वर? एक नंबरवर?...
लग्न करायचं नाही ठरवलं आपण... तत्व जपल्यासारखं. सांभाळल्यासारखं. लग्न न करता कुणा कुणाबरोबर राहिलो... काय झालं? नातं नवरा- बायकोसारखं... कधी मी चुकायचं कधी तिनी. कधी दोघांनी. मग पुन्हा नवीन... पण लग्नासारखंच... संसारासारखंच... वेगळं काय?...
प्रयोग संपल्यावर मग शिरीष जास्तच बैचेन झाला. विशेषत: स्वत:ला जबरदस्तीने आरशात बघताना, टिश्यू पेपरने खरवडून खरवडून मेकप काढताना... त्यासाठी स्वत:ला आरशात न्याहाळताना...
हे सगळं आज दारूत बुडवणं अशक्य आहे, जोर करून बुडवायला गेलो तर जास्तच भडकून उठेल हे लक्षात आल्यावर तो आणखी खचला...
सगळं झालं ते त्या चष्मेवाल्यामुळं... संसारी, नोकरदार, अभिनयात सो कॉल्ड यश न मिळवल्यानं लेखनात स्ट्रगल करू पहाणार्‍यामुळं... प्रामाणिक, मॅनर्स पाळणार्‍या आणि स्वाभिमान न सोडणार्‍यामुळं... हे जाणवल्यावर मग शिरीषला आपलं ग्लॅमरस भणंगपण जास्त जास्तच खुपायला लागलं...         (समाप्त)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...खरं म्हणजे कथा लिहावी, तिच्याबद्दल काही लिहित बसू नये... हा अपवाद...
या कथेला "साप्ताहिक सकाळ" च्या कथास्पर्धेत ’तिसरं बक्षिस’ मिळालं. हा अनुभव माझ्यासाठी तरी प्रचंड सुखद होता...
पहिलं म्हणजे कथा निकाल असलेल्या साप्ताहिक सकाळच्या ४ ऑक्टोबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाली. एका मित्राने ती बघितली. वाचल्याचं कळवलं. साप्ताहिकाचे अंक प्रसिद्ध तारखेच्या आधी दोनचार दिवस प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने कळल्याने, तसं काही लिहिणारा अपेक्षित करत असल्याने, आनंद झाला. तो बाजारात जाऊन दोनचार प्रती घेऊन साजरा केला... दसराच होता... हात पाय पसरून पसरलो...
आस्थापनामधून फोन... बक्षिस घ्यायला या... परगावी... मी त्यावेळी नको तितक्या अडचणीत. कुठेतरी पहिलं बक्षिस न मिळाल्याची रुखरुख असावी. अपरिहार्य कारण पुढे करून येणं शक्य नसल्याचं नम्रपणे सांगितलं. पुन्हा फोन... जाण्यायेण्याचं भाडं देतो पण बक्षिस स्विकारायला याच... लिहिणार्‍याला हा तर पराकोटीचा आनंद! भाडं दिलं नाही, देतो म्हटलं तरी लिहिणारा खूष... आता जाणं भागच...
बक्षिस समारंभ अत्यंत नेटकेपणानं आयोजित केलेला. एका प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ बाईंचं व्याख्यान. आयोजकांनी स्वागत करणं... जाताना भेटून मग जा असा आग्रह... पहिल्या रांगेतली खुर्ची... उत्तम व्याख्यान... थोड्याफार गप्पा- कारण परतण्याची घाई, दुसर्‍या दिवसाचं रुटीन...
परतताना मी बसमधे नव्हतोच... चार बोटं नव्हे चांगलाच वर... प्रतिकूल काळात खूप वाट पाहून आलेला असा सुखावह अनुभव... संबंधितांचे आभार मानावे तेवढे थोडे...
परतल्यावर दोन दिवसांनी फोन... त्याच गावातून... नावं मुद्दाम टाळतोय... प्रसिद्ध व्यक्तिचं नाव घेऊन फुशारक्या नकोत आणि प्रतिसाद न देणार्‍यांची उगाच नावानिशी दखल कशाला?... अशा मोडवर सध्या आहे... तर फोन... नाव ऐकल्यावर मी चाट! असं होतं... अपेक्षा नसताना... ते नावाजलेले नाट्यसमीक्षकही. त्याना कथा प्रचंड आवडल्याचं ते सांगतात. त्यावर उत्तम एकांकिका होईल असं सांगतात. तुम्ही तसा काही विचार केला आहे का? म्हणून मित्रत्वाच्या नात्याने विचारतात. भारावून जाणं आभार मानणं यातच मी गुंतलेला असताना ते ज्या प्रायोगिक संस्थेशी संबंधित असतात त्यातला एकाचा संपर्क क्रमांक देऊन, याना फोन करा आणि मला येऊन भेटा पुढचं काय ते बोलू असं आमंत्रणही देतात... मी सातव्या आसमानात पोचलेला... ते शांत, मृदू...
मी उत्साहाने त्या संपर्क क्रमांकावर फोन करतो... पलिकडे,  त्याला कल्पना असावी असा आणि मला कल्पना नाही असा रुक्ष आवाज... विरोधी आवाज लगेच ओळखता येतात... माझं त्याना भरभरून सांगणं... येऊ ना? म्हणून विचारणं... ते नकारघंटा हातात घेऊन बसल्यासारखे... हो ही नाही आणि नाही ही नाही... पण म्हणजे नाहीच!...
वाईट वाटतं... पण काळ जातो तसं आयरनी वगैरे आठवायला लागते...
एका नकारात्मक अनुभवावर लिहिलेली कथा. अपेक्षा घेऊन चांगली नाटकं लिहून ती कुठे होत नाहीत तर तद्दन नाटक लिहून प्रयत्न केला तर तिथे प्रतिसाद हा असा... त्यावर कथा लिहिली, त्याला बक्षिस मिळालं, त्यानंतर एका प्रथितयश नाट्यसमीक्षकाला त्यात एकांकिकेचं बीज दिसलं, ते प्रायोगिक रंगकर्मींनी नुसतं पारखण्याचंही टाळलं... असा हा अनुभव किंवा अनुभवांची शृंखला...
करत रहाणं आपल्या हातात असतं. त्यानंतर येणारा अनुभवरूपी प्रतिसाद, त्याला काही लॉजिक नसतंच... मग आपल्याला जे वाटतं ते आपण स्वत:च करायचं. आपल्याला शक्य असेल तसं. पण करायचंच... असो!      
 

Tuesday, September 24, 2013

प्रस्थापित (६)

भाग १, भाग २भाग ३, भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा!
शिरीष समोरच्या चष्मेवाल्याशी आपलं नेहेमीचं डोळ्याला डोळा न भिडवण्याचं तंत्र चालू ठेऊनच होता. त्यानं आपल्या बॅगेतला हात बाहेर काढला.
"हे बघा- ही दोन-"
"मला कल्पना आहे हो-" चष्मेवाला सौम्य हसत म्हणाला.
"बघा ना- या संहितेबरोबर असलेल्या या पत्रावरची तारीख- सहा महिने होऊन गेलेत. या आणखी दोन संहिता. आधी आता या घेऊन बसायला-"
"मला पूर्ण कल्पना आहे त्याची. माणसं बिझी असतात. तुम्ही माझं पुस्तक चाळलं का?"
"हो ना! हो! हो!" शिरीषनं ठोकून दिलं.
"मग त्याच्या मलपृष्ठावर माझा बायोडेटा आहे. मी यातच होतो हो इतके दिवस. तुमच्यासारख्या भूमिका केल्या प्रायोगिक- व्यावसायिकला- अर्थात तुमच्यासारख्या यशस्वी नसतील त्या- मला माहितेय. माणसं बिझी असतात. त्यांना अजिबात वेळ नसतो. परवा आलो तेव्हाच माझ्या लक्षात आलंय!"
अजिबात न हालता शिरीष हातातल्या संहितांकडेच बघत राहिला.
"नाही- बघा ना- आता हे ह्यानी- सहा महिने आधी-"
"आरामात हो! मला अजिबात घाई नाही. आरामात वाचा. माझं पुस्तकही सवडीने वाचा- आणि मला सतत फोन करून, सतत भेटायला येऊन त्रास द्यायला खरंच आवडत नाही. इरिटेट होतो हो समोरचा माणूस. मला कल्पना आहे!"
"नाही- काय आहे- मला जर फोन करून आठबण केली नाहीत नं तर-" शिरीषनं नेहेमीचा धोबीपछाड टाकला. फोन नाही केलास ना तर तुझंच नुकसान आहे चष्मेवाल्याऽ- तो मनात म्हणाला.
"सतत नाही करत मी फोन. बिझी माणूस वैतागतो. वाचा तुम्ही सावकाश. चला. थॅंक यू!" चष्मेवाला निघाला. मेकपमनला, व्यवस्थापकाला हात करून तो निघाला आहेहे शिरीषनं नजरेच्या कोपर्‍यातून बघितलं, पण संहिता परत बॅगेत ठेवताना बॅगेत घातलेलं डोकं त्यानं अजिबात बाहेर काढलं नाही. चष्मेवाल्याच्या थॅंक यू लाही त्याने अर्थातच प्रतिसाद दिलाच नाही. गेला *****! असं मनाशी म्हणत त्यानं खर्रकन बॅगेची चेन ओढून बंद केली. चेहेरा अतिशय शांत ठेवून.
प्रयोग एक्च्यूअली सुरू व्हायला अजून अर्धातास तरी सहज होता. ऑफिशयल पंधरा आणि वर पंधरा मिनिटं. इस्त्री करून ठेवलेले कपडे बघून ठेवणं, तोंड धुणं, गप्पा मारणं इत्यादी प्रयोगाआधीची कामं यांत्रिकपणे करत तो रंगपटात स्थिरावला. काहीतरी त्याला खुटखुटायला लागलं. ते मनाच्या मागे ढकलून तो निग्रहाने हास्यविनोद करत राहिला. शेवटी वेळ झाल्यावर आरशासमोर बसला. आज मेकपमनला थांबवून त्यानं स्वत:चा मेकप स्वत:च करायला सुरवात केली. स्वत:चा चेहेरा रंगवताना त्याला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. मगासारखं... खुटखुटल्यासारखं... कॉन्फिडन्ट वाटत नाहीए आपल्याला आज? हं!... पावणेचारशेवा प्रयोग... यंत्र झालंय आता सगळं... वाचेचं, चेहेर्‍यावरच्या रेषांचं, हातवार्‍यांचं, हातचालींचं, विनोदाच्या जागाचं, लाफ्टरसाठी थांबण्याचं... तो स्वत:शीच हसला. पूर्ण एकाग्र होऊन, मेकपकडे लक्ष देऊन खुटखुटणं विसरण्याचा प्रयत्न करू लागला...     (क्रमश:)


 

Thursday, September 19, 2013

उत्सव आणि उन्माद

शहरातल्या सर्वप्रथम स्वयंघोषित ’नवसाला पावणार्‍या राजा’ च्या कार्यकर्त्यांच्या कृतीला उन्माद हे एकच विशेषण लावता येतं. विशेषणं भोंगळपणे  लावण्याची आपली प्रथा आहे. उन्माद ही केवळ एक मनाची अवस्था म्हणून या संदर्भात विचारात न घेता ती एक मानसिक विकृती म्हणून विचारात घेतली पाहिजे.
दुसरं, केवळ 'त्या' एका मंडळाचा जाहीर निषेध वगैरे करुन. आपल्याला मोकळंही होता येणार नाहीए!
बारकाईनं बघितलं तर चातुर्यानं बनवला गेलेला एक सांगाडा दिसतो. जो आता उघडपणे मिरवला जातोय. मंडळं हे एक संघटन असतं. गल्ली पासून दिल्ली पंथावरचा कुणी एक राजकारणी किंवा राजकारणी समूह हे संघटन पध्दतशीरपणे तयार करुन राबवत असतो. तो हे कशासाठी, कुणासाठी करतो? हे आपल्याला चांगलंच माहिती असतं. मग तरीही आपण त्यात सामील का होतो? आपणा सर्वांचेच हितसंबंध इथे गुंतलेले असतात.
तो कुणी एक किंवा तो कुणी समूह आपल्याच जीवाभावाचा 'वाटणारा' कुणी असतो. वाटणारा असं म्हणण्याचं कारण स्वार्थाची घडी आली की आपल्या आपल्यातच आपली कशी लठ्ठालठ्ठी चालते याच्याशीही आपण पूर्ण परिचित असतो. तरीही आपण तिथेच का रहातो? तर माझं काम होतंय ना मग झालं तर! बाकीच्या गोष्टींशी मला काय करायचंय? ही कामं म्हणजे अंत्यविधीला न सापडणारा क्रियाकर्म करणारा मिळवून देण्यापासून कुठलंही असू शकतं. ते ते त्यावेळी नक्कीच खूप महत्वाचं असतं.

आपल्याला आपल्या जमलेल्या समूहापासून दूर व्हायचं नसतं. नवा समूह आपल्याला तयार करता येत नसतो. दुसर्‍या कोणत्याही समुहात आपल्याला सहज सामावून घेतलं जाणार नाही याबद्दल आपले आपणंच ठाम असतो. मग अंतर्विरोध सांभाळत बसणं अपरिहार्य होऊन बसतं. मग आहे ते पटवून घेण्यात आपलं हित आहे हे आपल्याला आपोआप पटतं. नाहीतर सगळं भूमंडळ हादरवून थरकाप करून टाकणार्‍या डिजेंच्या तालावर इतक्या मोठ्या मिरवणुका दिसत्याच ना.
त्या तशा दिसण्याचं आणखी एक कारण म्हणजे तरुणाईला आपल्या ताणांचं विरेचन हवं आहे. कानात खुपसायला एफ एम आहे. प्रवास सुसह्य व्हायला, त्या व्यतिरिक्त जालावरची किंवा हातातल्या आयुधात जतन केलेली चित्रफीत आहे. आख्खं आंतरजाल, मल्टिप्लेक्सेस आहेत. झालंच तर तोंडी लावायला इडियट बॉक्स आहे. तरीही... आयुष्यच इतकं कठीण आहे की...
दुसरं, राजकारणी मग तो कुठल्याही दर्जाचा असो बावा, त्याच्याशी संगनमत पाहिजेच. मागच्या पिढीतल्यांसारखा नसता मूल्यामूल्य विवेक काय कामाचा? मग दारात वर्गणी मागायला, म्हणजे डिमांड करायला येतो तो उंची कपडे घालणारा, उच्चशिक्षित, नवश्रीमंत तरुण. जो इतकेच द्यायचे हं! असा सज्जड पण प्रेमळ दमही देतो. तो आपल्यातल्याच कुणाचातरी भाऊ, मुलगा, जावई इत्यादी असतो. आपण हसतो. देतो. मग कुरकुरतो. तेवढी मोठी रक्कम आपल्याला परवडणारी नसते असं नाही. पण हल्लीच्या ’कुणी उठतो स्पॉन्सर करतो’ च्या जमान्यात वैयक्तिक वर्गणीची गरज काय? ही आर्थिक उलाढाल नक्की काय होते? ती योग्य ठिकाणी की अयोग्य? हे विचारण्याचं धाडस आपल्यात नसतं. असलं तर येऊन ’स्वत्ता हिशोब तपासून घ्या!’चं आव्हान पेलायची ताकद आपल्यात असावी लागते...
'ते' स्वयंघोषित नवस मंडळही नाही का केवढी लोकोपयोगी कामं करतं, देणग्या देतं?... पण मग ढकलाढकली, हमरातुमरी, प्रत्यक्ष पोलिसांना मारहाण आणि इतर निषिद्ध बाजूंचं काय? यालाच मूल्यामूल्य विवेक म्हणता ना? आजच्या या ग्लोबल व्यामिश्र वास्तवात असा विवेक सांभाळत बसणं परवडणारं आहे? तुम्हीच तो सांभाळत बसणार असाल नं तर मग टाकतो तुम्हालाच वाळीत !!!
आणि काय हो, तुम्ही ऐन जोशात होता तेव्हा यातच सामील होतात. या उत्सवात! आणि आज असं बोलताय?...
हो! होतो ना? तेव्हा कळत असून वळवून घेतलं नाही. आता स्वत:पुरता वळलोय. तेव्हा फक्त माझ्या भावनांचं, माझ्या ताणांचं विरेचन म्हणून काही कृती घडल्या. त्याचा पश्चाताप झालाय. तेव्हा सुटा विचार होत होता. आता एकूणात विचार करतोय. त्यामुळेच खरं तर पोटतिडकीने लिहितोय...
हे एक बरं करताय की... झालं तर मग... म्हणजे आता ते त्यांचा गरबा चालू ठेवणार. दुसरे नव्याने ते काय ते छटपूजा की काय ते काढणार आणि आम्ही नववर्षाची शोभायात्राही काढायची नाही असं तुमचं म्हणणं असेल!!! विशेषत: प्रांतीय अस्मितेचा पुरस्कार करणारा तडफदार नेता आपल्याजवळ असताना?...
बघा बुवा! तेव्हा मी सुटा सुटा विचार करत होतो. आता तीच चूक तुम्ही तर करत नाही ना?...
...तर हे असं आहे... एकूणात की काय तो विचार करत रहाण्याचं...
ते कधी कधी करत रहायला हवंच की. एरवी आहेच. आत्मरंजन... आणि जनरंजनही...

Saturday, September 7, 2013

प्रस्थापित (५)

भाग १, भाग २भाग ३ आणि भाग ४ आणि  इथे वाचा!
शिरीषच्या घाईघाईला तोंड देत चष्मेवाल्याने सुरवात केली, "आणलंय मी... दुसरा अंक लिहिला नाहीये अर्थात... म्हणजे... कॉमेडी आहे... आजकालच्या रिवाजाप्रमाणे बरेच बदल करण्यासाठी... तुम्ही वाचा... तुम्हाला चांगलं... बरं... बरं वाटलं तर गाइड करा मग-"
"द्या, द्या फोन नंबर लिहिलाय नं?" शिरीष जरा ओरडतच म्हणाला. चष्मेवाल्याने तत्परतेनं लिहिलेला पत्ता, फोन नंबर दाखवला.
"दोन दिवसानी फोन करतो!" असं म्हणत शिरीष रंगपटाकडे निघालाच.
"तुम्हाला माझं नाटकाचं पुस्तक... द्यायचं-" चष्मेवाला पुस्तकावर शिरीषचं नाव लिहिण्यासाठी धडपडू लागला. पुस्तक ठेवायला जागा नाही. इस्त्रिवाला सरसावून मग्न. शिरीषला हसू आलं. त्यानं संभावितपणे इस्त्रिवाल्याला दम दिल्यासारखं करून जागा करायला सांगितली. त्यानं जागा करून दिल्यासारखी केली.
चष्मेवाला आता शिरीषच्या भाषेत चांगलाच फंबलला. शि च्या जागी गि वगैरे कसरती करून घाईघाईत नम्रपणे पुस्तक शिरीषला अर्पण केलं.
चष्मेवाल्याला घाम फुटला. कृती लवकर आटपली नाही तर शिरीष काय बोलेल, करेल याचा त्याला भरवसा नसावा.
"दोन दिवसात ह्स्तलिखित एक अंक वाचून होईल. फोन करतो दोन दिवसांनी!" रंगपटाकडे वळत मुद्दाम जरा जोरातच शिरीष म्हणाला. आपणच फोन करतो असं म्हटलं की प्रश्न मिटतो. वाट बघून गरजू फोन करत रहातो. मोबाईल आपलाच. आपल्याच हातात. अगदीच नाही तर बदलला नंबर. शिरीषचं समीकरण सोपं होतं.
"दोन दिवसांनी प्रयोग आहे तुमचा. तेव्हा जर आलो-"
"अरो हो! गुरुवारी! या ना या!- आता बसताय प्रयोगाला?" खिजवल्यासारखं वाटावं, वाटू नये अशा स्वरात शिरीषनं विचारलं.
"नाही... म्हणजे काम आहे... होतं दुसरं... तुमच्या कामाप्रमाणे ऍडजेस्ट केलंय- करणार- होतो... परवा येतो!"
हो ही नाही आणि नाही ही नाही, त्यामधलं काहीतरी एक्सप्रेशन देत नट आणि दिग्दर्शक (दुसर्‍या फळीतला) शिरीष रंगपटात शिरला, विसावला. रंगपटातली, नाटकातली पात्रं आणि इतर पात्रं यांच्याशी जरूरीप्रमाणे कमी, जास्त, अजिबात नाही, अशा प्रकारे कम्युनिकेट करू लागला.
हातातलं हस्तलिखित आणि पुस्तक त्याने केव्हाच मेकपच्या टेबलावर फेकलं होतं. नाटक सुरू व्हायला तब्बल पंधरा मिनिटं बाकी होती...
त्या गुरुवारी शिरस्त्याप्रमाणे शिरीष नाटक सुरू होण्याआधी, पंचवीस मिनिटं  ते अर्ध्यातासाच्या बेचक्यात त्या नाट्यगृहाच्या पॅसोजमधे शिरला. एकच भला मोठ पॅसेज. समोर कपडेपट. डाव्या हाताला रंगपट, अशी त्या नाट्यगृहाची रचना, तर समोर हसत चष्मेवाला.
"सॉरीऽ आजही मी तुमच्या आधी येऊन तुम्हाला सामोराऽ"
मोकळा झालाय, याला दाबायला पाहिजे, शिरीषनं लगेच ताडलं, "होऽ होऽ होऽ होऽ- जरा एक मिनीट-" असं म्हणत शिरीष कपडेपटात शिरला. व्यवस्थापकीय सहायकाला खुणेने कपडेपटाचं दार पूर्ण बंद करायला सांगितलं.
चष्मेवाला पॅसेजच्या भिंतीला टेकून वाट बघत उभा राह्यलाय हे नजरेच्या कोपर्‍यातून बघताना त्याला बरं वाटलं.
घातलेल्या शर्टची वरची दोन बटणं उघडून, आरामशीर हातातली भलीमोठी बॅग टेबलावर ठेवून तिची चेन उघडताच त्यानं आत बघितलं. थोडा वेळ तसाच जाऊ दिला. मग खुणेने व्यवस्थापकीय सहायकाला बाहेर पाठवून चष्मेवाल्याला आत बोलवायला सांगितलं. चष्मेवाला विनम्रपणे आत आला. तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत शिरीषनं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. आपल्या बॅगेतले कपडे वरखाली करत, एक शर्ट बाहेर काढून ठेवत, तो बॅगेतच बघत राहिला. आत दोन स्क्रीप्ट्स- नाटकाच्या संहिता आहेत ना याची पुन्हा एकदा त्याने खातरजमा करुन घेतली.
"हे बघा- हे-"
"अगदी आरामात. अगदी आरामात. मला काहीही घाई नाहीये!"
अचानक दोन्ही हात फैलावत चष्मेवाला म्हणाला. शिरीषनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं. त्याला हे अनपेक्षित होतं. पण ते चेहेर्‍यावर कसं दाखवायचं नाही हे तो शिकला होता. तो हलला नाही...        (क्रमश:)

Thursday, August 29, 2013

प्रस्थापित (४)

भाग १, भाग २भाग ३ इथे वाचा!
बिनफ्रेमच्या चष्म्याची नजर दीनवाणी  नव्हती. तो हिरमुसून घड्याळात बघत दूर जाऊन उभा राहिला आहे हे शिरीषनं डोळ्याच्या कोपर्‍यातून बघून घेतलं. चष्मेवाला घड्याळात बघत उभा राहिला.
मग पाच मिनिटांनी झटका आल्यासारखं वळत शिरीष नाट्यगृहाचा तो लांबलचक जिना चढू लागला. चार- पाच पायर्‍या चढल्यावर त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यातला बल्ब पुन्हा पेटला. चष्मेवाला चूपचाप त्याच्यामागे चालू लागला होता. चष्मेवाला जिना चढतोय याची खात्री झाल्यावर मगच शिरीषनं मागे न बघता, उलटा पंजा मागे नेऊन हाताची बोटं हलवून आपल्या मागोमाग येण्याची खूण केली. चष्मेवाल्याचा पडलेला चेहेरा बघायची त्याला आता गरज नव्हती.
शिरीष नंतर बुकींगजवळ गेला. नेहेमीप्रमाणे आत वाकून बघितलं. प्लानवर. हाताची बोटं उंचावून पासांची खूण केली. एका ओळखीच्याने थांबवलं. त्याच्याशी बोलला. मागचा चष्मेवाला प्रत्येकवेळी जर्क बसून थांबत होता. अडखळत होता. पास किती ठेवायचे हे बुकींगला सांगितल्यानंतर मगच शिरीषनं चष्मेवाल्याकडे बघून ’बसणार का’ असं अत्यंत कोरड्या आवाजात विचारलं. चष्मेवाला अर्थातच नाही म्हणाला. आपलं काम घेऊन आलेला माणूस पहिल्या भेटीतच फ्री पासवर नाटकाला बसणार नाही, याची शिरीषला खात्री होती.
नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताना द्वारपालाचा सलाम घेऊन शिरीषनं वेग वाढवला. चष्मेवाला फरफटल्यासारखा त्याच्या मागे. या सगळ्या प्रवासात कामाचं काय बोलायचं ते बोलून शिरीष प्रामाणिकपणे चष्मेवाल्याला वाटेला लावू शकला असता. पण शिरीषनं ’काय कसं काय?’ अशा पद्धतीचं बोलणंही टाळलं. शिरीष काही केल्या बोलत नाही म्हणून तो मर्यादापुरूषोत्तम चष्मेवाला शिरीषचा माग काढण्यातच धन्यता मानत होता. एखादा आगाऊ बोलबच्चन असता तर त्यानं शिरीषला एव्हाना हैराण केलं असतं.  पुढे जाऊन आपल्याला अडचणीचं ठरेल असं काहीही करायची चष्मेवाल्याची तयारी दिसत नव्हती. ’काढू दे अजून कळ!’ असं स्वत:शी म्हणत शिरीष वाटेतल्या कॅन्टीनजवळ थांबला. वडा कधी, कसा पाठवायचा हे त्यानं आवर्जून नक्की केलं. पुढे चाललेल्या कलाकाराबरोबर डिसकस केलं आणि थोडा वेग वाढवून त्यानं तो उभा पॅसेज पार केला.
आडवा पॅसेज पार करून दोन-तीन दारं पार करत तो रंगपटात पोहोचला. वाटेतल्या दारांना वर चाप लावले होते. मागून येण्यार्‍यासाठी दार उघडून धरण्याचीही शिरीषला आवशकता नव्हती. चाप लावलेली दारं फटाफट बंद होत होती. ती पुन्हा उघडत जाऊन चष्मेवाला रंगपटाच्या दाराशी येऊन घुटमळला. आत नेहेमीचे यशस्वी, त्याना भेटायला आलेले काही तुलनेने अयशस्वी, काही लोंबते अशी सगळी फौज जमली होती.
आत गेल्यावर उपचार म्हणून तरी शिरीषनं ’आत या’ असं म्हणावं ही चष्मेवाल्याची अपेक्षा असावी. घुटमळून, वाट बघून चष्मेवाला शेवटी रंगपटात शिरला. तो आला आहे याची खात्री झाल्यावर शिरीष त्याला ’या’ म्हणाला. बसा म्हणाला नाही. चष्मेवाला बसला. त्याने अपेक्षेने शिरीषकडे बघितलं. शिरीषने ताबडतोब त्याची नजर टाळून चष्मेवाल्याच्या बाजूला बसलेल्या खुळचट हसणार्‍या माणसाकडे मोर्चा वळवला. काहीतरी गंभीर घडल्यासारखी जुनीच घटना नव्याने सांगू लागला. खुळचट हसणारा मांडीवरच्या ऍटॅचीवर हाताचे दोन्ही कोपरे टेकवून मोबाईलवर खेळत आणखी खुळचट हसत ते सगळं ऐकत होता.

मग त्या खुळचटचं लक्ष चष्मेवाल्याकडे गेलं. ’अरे तू कसा काय इकडे?’, असं विचारून खुळचट तोंड पसरून हसला. शिरीष लगेच सावध झाला, "चला, चला आपण आपलं-" घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला उठवलं. ओळख बिळख म्हणजे नस्तं काहीतरी चालू झालं असतं.
घाईघाईत शिरीषनं चष्मेवाल्याला कपडेपटात आणलं. नेहेमीप्रमाणे खुर्च्यांमधे कपडे.
"द्या! द्या! आणलंय नं तुम्ही?" जरा तावदारल्यासारखं करतच शिरीषनं पुन्हा घाई केली...   (क्रमश:)  

Saturday, August 17, 2013

प्रस्थापित (३)

भाग १, भाग २ इथे वाचा!
संध्याकाळी सातच्या सुमाराला शिरीष नाट्यगृहाच्या फाटकातून आत शिरला. नेहेमीसारखा रिलॅक्स्ड. फाटकाला लगटून आणि आत आवारात अनेक ठिकाणी पुंजके उभे होते. शिरीषच्या भाषेत दोन- चार नट आणि अनेक बोल्ट्स. अंगविक्षेप करून ग्लॅमर खेचणारे. मोठमोठ्याने बोलून टाळ्या घेणारे. कुणी बाहेर जाऊन सिगरेट शिलगावून आत येणारे.
शिरीष कुणाला हात करत, कुणाशी हसत, कुणाला हाय करत, हात मिळवत आणि प्रसंगी फिल्मी आलिंगन देत- जरूरीप्रमाणे- अर्थात शिरीषच्याच- आवारात आला. ज्याच्याकडून काही अतिमहत्वाचं काम होण्याची शक्यता होती त्याला शिरीषनं स्वत: त्याच्याजवळ जाऊन अटेंड केलं. हे सगळं करत असताना त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यात धोरणीपणाचा बल्ब लागलेलाच होता. त्या बल्बनी तो आसमंत न्याहाळत होता. हवी ती हालचाल दिसत नव्हती.
मग तो भेटायला आलेल्या नाट्यव्यवस्थापकाशी बोलायला लागला. व्यवस्थापकानं त्याला कोपर्‍यात घेतलं. शिरीषनं दोन- चार मोबाईल कॉल्स करून व्यवस्थापकाला तारखा देण्यासंबंधीची व्यवस्था केली. या सुमारास नाट्यगृहासमोर नाट्यगृहात जाणार्‍या भल्यामोठ्या जिन्याच्या वरच्या टोकाला त्याला अपेक्षित हालचाल दिसली. तिथे एक बिनफ्रेमचा चष्मेवाला घुटमळत होता. याचा अर्थ तो रंगपटात जाऊन आला असावा. शिरीषनं पाठमोरं होऊन त्या व्यवस्थापकाला आणि त्याच्या सहाय्यकाला आणखी कोपर्‍यात घेतलं. बिनफ्रेमचा चष्मा ते बघून घुटमळत थांबला. याचा अर्थ तो भिडस्त आहे, मर्यादा पाळणारा आहे, हे शिरीषनं नमूद करून घेतला.
कोपर्‍यातली चर्चा आटोपतेय असं लक्षात आल्यावर शिरीष मोबाईलवर कॉल लावत एकटा आणखी कंपाऊंडच्या भिंतीजवळ गेला. बिनफ्रेमच्या चष्म्यानं ओळखलं असावं साहेब इतक्या लवकर रंगपटात येत नाहीत. तो जिना उतरू लागला. ते बघून शिरीष मोठ्याने हाका मारत एका नव्या कोंडाळ्यात सामील झाला. नुकताच चरित्रचित्रपट मिळालेला एक नट उत्साहाने आपले अनुभव सांगत होता. बिनफ्रेमचा चष्मा जिना उतरून खाली आवारात उतरला. साहेबांना भेटायचा त्याला धीर होत नसावा. त्याच्यासमोर प्रोफाईल फ्रेममध्ये असलेला शिरीष गप्पा रंगवत होता. बिनफ्रेमचा चष्मा जराशाने कोंडाळ्याला वळसा घालून जरा दूर जाऊन उभा राहिला. शिरीषने त्याला नीट बघून घेतलं. गृहस्थ संसारी, नोकरी करणारा, त्याच्या वयाचाच वाटत होता. राहू दे उभा असं स्वत:च्या धोरणीपणाशी म्हणत शिरीषनं कोंडाळ्यातल्या संवादातला आपला अभिनय चालू ठेवला.
बिनफ्रेमच्या चष्मेवाल्याने घड्याळात पाहिलं. मगापासून चौथ्यांदा. पावणेआठ- भेटीची वेळ. मग तो पुन्हा एक वळसा घेऊन शिरीषजवळ येऊन उभा राहिला. त्याच्याकडे बघत शिरीषने आपली नजर लगेच काढून घेतली. एखादं लाचार पोर दीनवाणं होऊन दात्याची नजर आपल्याकडे कधी वळेल याची नुसती वाट बघत उभं राहतं तसा बिनफ्रेमचा चष्मेवाला बाजूला येऊन उभा आहे हे शिरीषला जाणवलं.
"एक्सक्युज मी... एक्सक्युज मी... मी... अमुक अमुक... सकाळी... दुपारी... फोन केला होता. तुम्ही-"
"आपण जरा नंतर-" असं म्हणून वाक्य तोडून, दोन मिनिटं या अर्थाची दोन बोटं हवेत उडवून शिरीष कोंडाळ्यातल्या उत्साही चरित्रनायकाकडे नुसताच बघत राहिला. कमरेवरची बॅग, खांद्यावरचा तिचा पट्टा मानेजवळ आणखी वर ढकलून खिशात हात घालत...  (क्रमश:) 
   

Saturday, August 10, 2013

प्रस्थापित (२)

भाग १ इथे वाचा! 
...पुन्हा वेगवेगळा कोलाज बघत शिरीषला डुलकी लागली आणि मोबाईल पुन्हा वाजला. पुन्हा मंगलाष्टकं, तोच अनोळखी नंबर... कट. झोप.
तिसर्‍या वेळी त्यानं मोबाईल थंडपणे ऑफच करून टाकला. झक मारत गेले महत्वाचे कॉल्स. येणार असेल काही काम, मिळणार असेल, तर मिळेलच. नाही तर जाऊ दे झन्नममध्ये! असा विचार आल्यावर त्याला गाढ झोप लागली.
दुपारी बारानंतर कधीतरी पोटातल्या भुकेने शिरीषला जाग आली. नेहेमीप्रमाणे मोबाईल चार्ज करायला ठेवून तो बाथरूममध्ये शिरला.
सगळं आटोपल्यावर त्यानं बाहेरच्या कडीला असलेल्या दुधाच्या पिशवीतली दुधाची थैली फ्रिजमध्ये ठेवली. मोबाईल ऑन करून खिशात सरकवला. पोटातली आग शांत करायला बाहेर पडायला, कळवळत.
रिक्षात बसल्यावर सीटखालीच कळ असावी तसा सीडीप्लेअर चालू झाला. त्याच्यावर लेटेस्ट म्युझिक अल्बममधलं अत्यंत लेटेस्ट पॉप्युलर गाणं. शिरीषचा मोबाईल वाजला. शिरीष खिशातून तो काढेपर्यंत रिक्षावाल्यानं गाण्याचा आवाज चक्क कमी केला. शिरीष रिक्षावाल्याकडे बघतच राहिला. असेही रिक्षावाले असतात?
भुकेने कळवळलेला शिरीष मोबाईल स्क्रिनकडे बघत होता आणि स्क्रिन तो सकाळचा अनोळखी नंबर पुन्हा एकदा दाखवत होता. शिरीष वैतागला.
"हॅलोऽऽऽ... बोला!... बोला! बोला!..."
"मी अमुक अमुक बोलतोय शिरीषजी... मी एक... एक लेखक... लेखक-"
"हां! हॅलोऽऽ हॅलो‌ऽऽ बोलाऽऽ- कट!"
शिरीष आणखी वैतागला. कुणीतरी होतकरूऽऽ... आता हा काय पिछा सोडत नाय आणि पुन्हा मंगलाष्टकांची धून वाजली.
"हां! हॅलोऽऽ हो! हो! कळलं मला तुम्ही लेखक आहात ते!... या! याना! कधीही... प्रयोगाला या... हं! ऑं?"
"मी अलीकडेच प्रयोगाला येऊन गेलोय. एक नाटक लिहिलंय ते तुम्हाला दाखवायचं होतं. तुमचं मार्गदर्शन..."
आता शिरीषला पुढे बोलत रहाणं भागच होतं.
"हां! आंऽ वन लाईन काय आहे?... हां!... (*‌%!?!ऽ*)... हां हां ( *‌%!??!ऽ**%!)... हां! (*‌%!ऽ*?*%!!?) हां! ( *‌%!ऽ**%!?????!!!*ऽ) का- काय आहेऽ... इतरवेळी भेट ठरवली आणि नेमका वेळउशीर झाला तर पंचाईत होते म्हणून प्रयोगाला या!"
"कधी येऊ?"
"आं? आंऽ आज आज या ना, पण साडेसात पावणेआठपर्यंत या!"
"येऊ? मग येतो मी, थॅंक यू! साडेसात पावणेआठपर्यंत येतो. तुम्हाला दाखवतो. तुम्ही गाईड..."
शिरीष हं हं असा रिस्पॉन्सच न देत राहिल्यामुळे होतकरूला काहीच कळेना. फोन चालू आहे की कट झालाय, नक्की साडेसात पावणेआठला भेट होणार की... शिरीष मोबाईल तसाच होल्ड करून होता. गपचूप. होतकरू गोंधळला, भांबावला. शेवटी कंटाळला, स्वत:वरच वैतागला आणि त्याने फोन डिसकनेक्ट केला.
फोन डिसकनेक्ट झालाय अशी पूर्ण खात्री झाल्यावर मगच शिरीषनं आपला मोबाईल ऑफ केला आणि मनातल्या मनात होतकरूला आणि पोटातल्या भुकेला असंख्य फुल्या फुल्या वाहत रिक्षातून बाहेर बघत राहिला. रेस्टॉरंट यायची वाट पहात...                                                                             (क्रमश:)  

Monday, August 5, 2013

प्रस्थापित (१)

शिरीष नट होता आणि दिग्दर्शकही, रंगभूमीवरचा. दुसर्‍या फळीतला. दुसर्‍या फळीतून पहिल्या फळीत स्थान मिळवणं त्याला तितकसं कठीण नव्हतं. चांगली संस्था हाताशी होती. निर्माता कुबेर आणि कर्ण असा दोन्हीही. अर्थात इथपर्यंत पोहोचणं शिरीषला सोपं नक्कीच नव्हतं. काय काय व्याप ताप करून तो इथे पोहोचला हे त्यालाच माहीत.
प्रायोगिक संस्था, स्पर्धा यातच आयुष्याची तिशी उलटून गेली. कनिष्ठ मध्यमवर्गीय पालक, हातातोंडाची गाठ जेमतेम पडत होती इतकंच. कुठूनतरी नाटकाचं वेड शिरीषच्या डोक्यात आलं, एकदा आलं की ते सहजासहजी जात नाही.
शिरीष दिसायला असातसा. त्याच पंचविशीतच पोट आलं. बुटका, चेहेरा विनोदी कामांसाठी उपयुक्त. जाडा सुद्धा. पण सिन्सियर. झपाटलेला.
पस्तीशीत त्याला समजलं की हे स्पर्धा, बक्षिसं वगैरे काही खरं नाही. आयुष्यभर नाटक किंवा तत्सम क्षेत्रात रहायचं म्हणजे व्यावसायिक व्हायला पाहिजे. पण घरात नाटकाचं वातावरण नाही, कुणी गॉडफादर नाही. ठसणारं व्यक्तिमत्त्व नाही, टॅलेंट सर्वसाधारण योग्यतेचं. फक्त पुरेसं गांभीर्य, मेहनतीची तयारी, झपाटलेपण, दिग्दर्शनासाठी आवश्यक संघटन कौशल्य इतकं होतं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शिरीषकडे धोरणीपणा हा गुण होता. तो आपल्याकडे आहे हेही त्याला वेळीच समजलेलं. त्यामुळे कुठे पोचायचं, तिथे जाण्यासाठी चॅनल्स कुठले. त्यातला कुठला प्रथम वापरायचा. मग कुठला. आणीबाणीच्या वेळी या चॅनल्सचा क्रम कसा बदलायचा हे त्याच्या डोक्यात खूप कमी अवधीत तयार व्हायचं. बर्‍याचवेळी नशीबाची साथ मिळायची. असं होत होत मजल दरमजल करत अनेक ठिकाणी डिप्लोमॅटीकली वाक वाकून तो सद्यपरिस्थितीपर्यंत पोहोचला. अर्थात अनेक अपमान पचवून, प्रसंगी ते दारूच्या पेल्यात बुडवून.
जवळ जवळ क्रमांक एकचं दिग्दर्शकपद. व्यायसायिक स्पर्धेत पुढे धावणारा एकमेव दिग्दर्शक. आताच्या नाटकातला शिरीषचा रोल तसा नाटकातला तिसर्‍या-चौथ्या क्रमांकाचा. पण मुख्य भूमिकांपैकी. टिपिकल पण चोख हसे वसूल करणारा. टायमिंगचं कौशल्य शिरीषचं. सव्वातीनशे- साडेतीनशे प्रयोग म्हणजे पैसे, लोकप्रियता इ. इ. दृष्टिने चांगलेच. सामान्य प्रेक्षकही आता शिरीषला ओळखायला लागलेले.
कुणामधे गुंतणं वगैरे प्रकार शिरीषनं ठेवलेच नाहीत. शिरीषमधे कुणी गुंतणं तसं लांबच. आली तर आली. राहिली तर राहिली. गेली तर गेली. ही गेली तर दुसरी, तिसरी... नाही!... तर आहेच!...
चाळिशीनंतर शिरीषसारख्यासाठी एकूण स्थिती समाधानकारक नव्हे तर चांगलीच म्हणायला पाहिजे. देण्याची तयारी असली की मिळतं. नशीब साथ देत असलं की मिळतंच मिळतं. काय काय द्यायची तयारी आहे त्यावर सगळं अवलंबून.
शिरीष आहे त्यात अवघडलेला नव्हता. बर्‍यापैकी रिलॅक्सड होता. धावपळ, दगदग, मेहनत चुकत नव्हती. धोरणीपणाचा बल्ब मेंदूत सतत पेटवून ठेवावा लागे. पण आता रिटर्नस मिळत होते. अपेक्षेपेक्षा जरा जास्तच आणि तेही नुसत्या नशिबाच्या शिक्क्याचे नव्हे. शिरीषला त्याचा अभिमान होता.
आठवड्यातून एकदा शहराबाहेर प्रयोग लागत. असे एक-दोन प्रयोग आटपून, अतिशय शिस्तीत चौथा अंक संपवून, खरं तर या दिवसांत तिसरा म्हणायला पाहिजे. तो सकाळी परत आला. लुंगी लावून झोपला. फ्लॅटच्या कडीला अडकवलेल्या पिशवीत हात घालून दुधाची थैली बाहेर काढणं नेहेमीप्रमाणे जीवावर आलेलं.
सुखद गुंगी, रंगलेला प्रयोग, मिळालेले हशे, जमलेलं, विस्कटलेलं टायमिंग, प्रयोगात झालेल्या गोच्या, गमती, गप्पा, विंगेतल्या, दारूकाम, जेवण, बस, विनोद, चर्चा, बसमधली हेरगिरी असं सगळं कोलाज होऊन झोपेतही डोक्यात फिरत होतं. सुखद गुंगी उतरत आणि हॅंगओवर चढत. नेहेमीप्रमाणे. आणि मोबाईल वाजला. बराच वेळ मंगलाष्टकाची धून वाजल्यावर त्याला जाग आली. त्यानं मोबाईल चाचपडला, शोधला आणि तो चिडला. एकतर कुणीतरी जबरदस्तीनं ऍडजस्ट केलेली ती धून आणि अनोळखी नंबर. काय संबंध आपला आणि मंगलाष्टकाचा? आणि या नंबराचाही? घाणेरडी शिवी हासडून त्यानं नंबर कट केला. मोबाईलच ऑफ करून ठेवणं म्हणजे महत्वाच्या कॉल्सची गोची. तो पुन्हा झोपला...                                    (क्रमश:)

                    

Thursday, July 4, 2013

कथा: भूक (११)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९ आणि भाग १० इथे वाचा!
बाळ बाहेर येतंय!... धडका मारत!... असह्य होतंय!... मी ओरडतेय... पण माझा आवाज मलाच ऐकू येत नाहीये!... डोळ्यासमोर फक्त लाल लाल काजवे चमकल्यासारखे! दुसरं काहीच नाही!... नुसता घाम... घाम अंगावरून वहातोय!... मला घट्ट धरून ठेवलंय सगळ्यांनी आणि बाळ धडका मारतच आहे!... माझं शरीर चरकात घातल्यासारखं पिळवटतंय!... पण माझं मन मात्र... हसतंय... गातंय..., नाचतंय... झालंऽऽ झालंऽ... झाऽऽलं!...
आता... सगळं... शांत आहे!... ही... ही खरी शांती!... सत्यम शिवम सुंदरम... हेच असेल का?... रितं रितं... पण खूप सुख... आनंद!... त्या बेहोशीत मी तशीच पडून रहाते!... किती वेळ?... कुणास ठाऊक?...
हळूच डोळे उघडले माझे!... आपोआप... पहिल्या वादळी पावसानंतरची सकाळ... अशीच असते! ताजी! नवं आयुष्य... माझं आणि माझ्या- हे- हे- काऽऽय?... माझं बाळ- हे- असं- उखळासारखं डोकं आणि- आणि- मुसळासारखं शरीर- आणि ते ही- वळवळणारं!???... हे... हे... माझं बा-ळ-ईऽऽईऽऽऽऽ...
ती धडपडत उठून तशीच उभी रहाते!... अंथरूण घामानं भिजलेलं... धडपडतच ती... तिच्या नवर्‍याच्या डोक्याशी पालथ्या पडलेल्या घड्याळाचा गजर गप्प करते!... घोरण्याचे आवाज चारही बाजूंनी... ते कसे गप्प करणार?... अजूनही सगळं भयाण... गरगरणारं... डोकं आणखी दाबून धरून ती उभी अंथरूणातच... आणि तिच्या धडपडीनं कुणीच जागं होत नाही!... एक दिशा सापडते तिला!... ती धावत मोरीत शिरते. दार लाऊन घेते. केस सोडते. अंगावरचे घामाने चिकटलेले कपडे, त्वचा ओरबाडून काढल्यासारखे ओढून काढते. आणि... तशीच... नळाखाली फतकल मारून बसलेली ती... अजूनही परग्रहावरच्या एकट्याच सजीवासारखी!...
जळजळणार्‍या निखार्‍यांवर... जोरात पाणी ओतल्यावर श्शशशशऽऽऽ असा आवाज... आणि मग वर आसमंताच्या पोकळीत... वर झेपावणार्‍या पाण्याच्या वाफेसारखी... तिच्या सगळ्या शरीरातून वर वर येणारी हाक... ऽऽयेऽरेऽयेऽऽ चिलयाऽऽयेऽऽऽ...

(सदर कथा "आर्त" या नावाने (संपादकानी परवानगी घेऊन दिलेलं नवं नाव)  "मैत्रेय प्रकाशना"च्या "मुक्तसंवाद दिवाळी २००८" या दिवाळी अंकात या आधी प्रकाशित झाली होती) 



    

Friday, June 28, 2013

कथा: भूक (१०)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ आणि भाग ९ इथे वाचा!
...मॅटर्निटी होममधल्या बेडवर पडलेय मी!... सारं कसं शांत वाटतंय... आजूबाजूला नर्स, मेट्रन, डॉक्टरांची हालचाल आहे, बोलणं आहे... मला मात्र सगळं मूक चित्रपटासारखं दिसतंय... डोळे मिटताहेत... ग्लानी येतेय मला... मान वळवून मी बेडच्या उजव्या बाजूला पहातेय... आई बसलीये स्टुलावर... उघडून डोळ्यासमोर धरलेल्या तिच्या पुस्तकावरून तिचा चष्मा दिसतोय... उजव्या गालावर पंजा रेलून ठेवल्यामुळे तिच्या गालावर पडलेल्या वळ्या दिसताहेत... पुस्तकाचं नाव पहाता पहाता माझे डोळे मिटू लागतात... कसा असतो नाही हा अनुभव? आत... पोटात... हालचाल जाणवते... मधेच खच्चदिशी आत बसलेला धक्का... माझ्या बाळाने दिलेला?!... मी खुदकन हसते आणि ’आई ग!’ अशी कण्हते... आतमधे लाथ लागल्याचा त्रास होतो पण नंतर जी सुखद लहर पसरते सगळ्या अंगातून!... "फक्त थोडाच वेळ! थोडाच वेळ थांब आता!" मी स्वत:ला, बाळाला- दोघानाही समजावते आहे... शांत पडून रहायचा प्रयत्न करते आहे... चलबिचल चालूच... आत... वेळ भरत आलीय तसं वाढणारं टेन्शन... ते ही हवहवंसं वाटणारं... इतके दिवस... आणि अजूनही!... नकळत माझा जप सुरू होतो... हरे राम हरे हरे... हरे कृष्ण हरे कृष्ण... कृष्ण कृष्ण.... कृष्ण?... हां!... हां!... कृष्णबाळ... मी पुन्हा हसते... त्या ग्लानीतसुद्धा आईचं वाचन डिस्टर्ब होऊ नये म्हणून हसू आवरते... श्रीकृष्णपुराणातल्या बाळलीला आठवू लागतात... कृष्ण मोठा होतो... होत जातो... आणि... अचानक हा सांब यादव कुठून आला?... आणि हे यादव लोक त्या ऋषीची अशी थट्टा का करताहेत?... सांबाला साडी नेसवून, त्याच्या पोटाशी काहीतरी बांधून त्याला ऋषींच्या पुढे का ढकलताहेत!... आणि हसताहेत!... पुरे पुरे बाळांनो!... थांबत कसे नाहीत हे हसण्याचे आवाज?... बाजूच्या बेडवरच्या कोळणीला भेटायला आलेले लोक निघताहेत वाटतं!... हरे कृष्ण हरे कृष्ण... मला ग्लानी येतेय...
ढकलल्यासारखं होतं आणि मी जागी होते!... पांढरं स्वच्छ सिलींग... त्यात बसवलेल्या न दिसणार्‍या ट्यूबलाईट्स... पांढर्‍या भिंती... मी आजूबाजूला पहातेय... डोळे, डोकं जड झालंय... माझं डोकं मलाच, कुणीतरी उचलून ठेवल्यासारखं, वळवल्यासारखं वाटतंय... लेबररूमपर्यंतचा प्रवास शेवटी करतेच आहे मी!... माझ्या चेहेर्‍यावर हास्य... समाधानाचं- गर्वाचं नव्हे!... आमचे दाढीदिक्षित... त्याना कुणी सांगितलं म्हणे... दोघांनाही मंगळ आहे म्हणे कडक! असला काही चान्स घ्यायचा म्हणजे... मी नाहीच ऐकलं! काय झालं?... दोन महिनेसुद्धा कॅरी करू शकणार नाही म्हणे!... झालं आता! झालं!... भरली घटिका!... सलाईनमधून तो द्राव... सहज डिलीव्हरी होण्यासाठीचं ड्रग... हळू हळू सोडलं की... यांना मात्र फोन करायला सांगितलं पाहिजे! घरी- पुरश्चरण चालू असेल यांचं जोरात!... होऊ दे बाबा... आता एकदा होऊनच जाउदे!...   (क्रमश:)

Monday, June 24, 2013

कथा: भूक (९)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७ आणि भाग ८ इथे वाचा!
आईऽऽ आईऽऽ हे बघ काय?ऽऽ अगं आई हा माझा हात- कुठे... कुठे जायचंय आपल्याला? अगं आधी कोयता झालेला माझा हात- अं? आत्ता? पण- पण मला अजून तसं काहीच- अगं दीड एक महिना आहे अजून! तू अशी काय- थांब! थांब जरा!... मला आईला काही सांगायचंय! अगं थांब!... तुला आठवतंय आई?... मी आठ नऊ वर्षाची होते... मी किती वेळा तुला सांगायचे, ’मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल!’ पहिल्या वेळी तू घाबरलीस... मलाच ओरडलीस, ’हे कुणी शिकवलं तुला?’ अगं मला खरंच तेव्हा वाटायचं की मला बाळ- मला खोदून खोदून सगळं विचारलंस... मी तुला कितपत काय सांगितलं कुणास ठाऊक! पुन्हा मी तुला ’घेऊन चल’ म्हणाले की तू ’हूं... हूं...’ करत नेहेमीसारखं पुस्तकात डोकं खुपसून बसायचीस... मी जास्तच केलं तर तू रागवायचीस... एवढा राग यायचा तुला? तुझं वाचन डिस्टर्ब केल्याचा? मी चिडून पुस्तकावरचं नावच तेवढं वाचायचे!... लांबून!... पुस्तकाला हात लावायची छाती कुठे होती?... चांगलं लक्षात आहे माझ्या, पुस्तकावरचं नाव... ’शिक्षण आणि समाजकारण’...
तुम्ही कुणी नसताना एकदा... आपल्या बिल्डिंगमधला तो... खरखरीत दाढीचा माणूस... आणि त्यानंतर मला नेहेमीच... तसं वाटायला लागलं... कुठेही पुन्हा तो दिसला की मला धडकीच भरायची... त्या दिवशी जेमतेम त्याला ढकलून मी बाहेर पळाले... पुन्हा जेव्हा जेव्हा घरी एकटी रहायचे तेव्हा माझं काय व्हायचं- जाऊ दे... पण मग मल सारखं वाटायचं... मला बाळ होणार- तसलं... तसलं काही त्यानं केल्यामुळे बाळ होत नाही हे माझं मलाच कळलं पण फार उशीरा... त्यामुळे मी किती वर्षं तशीच सैरभैर... पुस्तक संपवून, हाताचा अंगठा आणि तर्जनीने चष्मा वर करून डोळे मिटून डुलक्या काढणार्‍या तुझ्याकडे मी नुसती पहात रहायचे!... तुला उठवून काही सांगितलं तर तू काय करशील!.. त्यापेक्षा सगळं आतच ठेवलेलं बरं!... खोल कप्प्यात!... आणि.. आणि आज तू एवढी घाई करतेयस! मला घेऊन जायची!... हॉस्पिटलमधे!!... आई, एक मिनीट!... मला त्या... त्या प्रसंगानंतर लग्नच करावसं वाटत नव्हतं!... मी टाळाटाळ करायचे आणि स्थळांकडे दाखवायला मला तू जबरदस्ती घेऊन जायचीस नं!... त्याची... त्याची आठवण होतेय मला... आता... तू अशी मला नेतेयस नं! तेव्हा...
मला लग्न करावसं वाटत नव्हतं पण... पण बाळ व्हावसं मात्र वाटायचं!... अगदी हवहवसं- म्हणजे ते... बाळ होणार आहे असे भास व्हायचे मला म्हणून म्हणत नाही मी!... मला कळतच नाही!... त्या एका प्रसंगाने... मला लग्न करू नयेसं वाटायचं पण बाळ होऊ नये असं मात्र कधीच- आणि लग्न झाल्याशिवाय माझ्या लेखी बाळ होणं... आई... आई... एक सेकंद प्लीज... आई, मी होण्याच्या वेळी तुला कसं वाटत होतं गं? काय वाटत होतं? डोहाळे कसले होते? नॉशिया कसला होता?... शहाळ्याचं पाणी पीत होतीस का ग तू?... आणि...
 (क्रमश:)   

Thursday, June 20, 2013

कथा: भूक (८)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६ आणि भाग ७ इथे वाचा!
शेजारी... तो घोरतोय... मंद्र, तार सगळ्या सप्तकातून लीलया वर वर पोहोचत... तो बाजूलाच आहे याची निदान जाणीव... सतत... सुरवाती सुरवातीला तर ती रडत रहायची. पुन्हा हुंदके बाहेर पडू नयेत म्हणून कोशिश करायची. पण दमून झोप तरी लागायची... नंतर नंतर... रडूही येईनासं झालं... अजून आपण भमिष्ठ कशा होत नाही!... खरंच!... मधे कधीतरी त्याने विचारलं होतं, "अशी दोन्ही गुडघे पोटाशी आवळून घेऊन का झोपून रहातेस तू?"... काय सांगणार?... नकळत तिच्या तोंडून ’हॅ’ असा ध्वनी बाहेर पडला. तिनंच दचकून आजूबाजूला पाहिलं. सगळं काही शांत... फक्त घड्याळाची टिक टिक... वेगवेगळ्या घोरण्याचे आरोह अवरोह... त्या सगळ्यात ती एकटी... परग्रहावर असलेल्या एकट्याच सजीवासारखी... लांबवरच्या त्या झिरोच्या बल्बकडे, सावली पडलेल्या देव्हार्‍यातल्या तसबिरींकडे आलटून पालटून पहात... लवकर सकाळ झाली तर निदान आजूबाजूला सगळं हालतं तरी होईल! आख्खी रात्र आपल्यावर दाटून आलेली... काही केल्या डोळे मिटत नाहीत... मिटले की भीती वाटायला लागते... पापण्यांच्या पडद्यावर दिसणार्‍या सततच्या चलतचित्रांची! अखंड चित्रं!... कुठूनही सुरू होणारी... आणि मग चालूच रहाणारी... कापूस कोंड्याची गोष्ट!... निरर्थक, निष्क्रीय, बेचव, रंगहीन... विशेषणंच कमी पडतील अशी!... निर्धारानं तिनं पोतडीतून आणखी एक उपाय काढला. आज सकाळपासूनचं दिवसातलं सगळं आठवायचा... क्रमाक्रमाने... घटना नाहीतच!... भूतकाळातल्या घटनांच्या नुसत्या सावल्या... फेर धरून नाचणार्‍या... पडसाद... आठवणी... अथक विचार... तरीही...
आज आपला आरसा किती स्वच्छ दिसतोय! नुकताच पारा लावल्यासारखा!... त्याचा तो जुनाटपणा, जळमटाचे फराटे, वेडीवाकडी गुंतागुंत, वाळवीची घरं टोकरून काढल्यानंतर खाली नुसत्याच रहाणार्‍या ठशांच्या ओळीसारखी नक्षी... कुठे गेली?...
मला हसू येतंय... इतकं स्वच्छ, स्पर्श केला तर नुसतेच तरंग उमटून पुन्हा स्थिर होणारं माझं मन... कुठे होतं इतके दिवस? मी आणखीनच हसते... स्वत:ला निरखून निरखून पहाते आहे पुन्हा पुन्हा... मी एवढी स्पष्ट कधी दिसले ह्यात?... आज माझी मलाच मी- गालावर गाल चढलेत! कोपरापासूनचा माझा हात केळीच्या कोकासारखा दिसतोय... पिवळा धमक... चेहेरा कधी नव्हे एवढा तेजस्वी!... का नाही? आता फक्त थोडेच दिवस... एखाद- दीड महिना... खुषीची अंतिम पायरी काय असू शकते? तेवढी मी आनंदी!... माझ्या पोटावरून- पोटातल्या माझ्या आनंदगर्भावरून हात फिरवतेय... जणू त्यालाही निरखतेय या आरशात!... मी स्वत:ला नीट बघायला थोडी मागे सरकते आणि... आरशात आणखी कुणी?... हो! माझ्या मागेच... माझ्या गर्भाकडे एकटक मूक पहाणारं... मी माझ्या आरशातून त्याच्याकडे पहातेय... ते माझ्या चेहेर्‍याकडे पहातं... केविलवाणी नजर पुन्हा माझ्या गर्भाकडे?... मला रागच येतो!... अरे! एक तर तुला बोलता येत नाही... आमच्या दाढीदिक्षितांनी मोठ्या माजात सांगितलं, ’मला पोरांचं लेंढार नको!’ मग काय हवंय? मग कशाला करायचं हे सगळं? जवळ येतानासुद्धा धास्तावल्यासारखं करायचं?... मला तर वेगळाच संशय... म्हणून म्हणून दत्तक घेतलं तुलाऽ... आरशातून माझ्याकडे पहातोएस नाऽ तुलाच!... तू सततचा मूकच... काय पहातोस असा?... बापरे!! म्हणजे माझ्या- माझ्या गर्भावर तुझी नजर! चलऽ चऽऽल चालता होऽ हो चालताऽऽ... आता मला तुझी गरज नाहीऽ माझ्या गर्भावर डोळा ठेवणार्‍या कुणाचीच नाही! चऽलऽ... मी त्याच्यावर हात उगारते... उगारते आणि हाताकडेच पहात रहाते! कोपरापासूनचा माझा हात म्हणजे... लखलखीत कोयता?!?! आईऽऽ आईऽऽ हे बघ काय?ऽऽ अगं आई हा माझा हात- बघ! आईऽऽऽ...    

Tuesday, June 18, 2013

कथा: भूक (७)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ आणि भाग ६ इथे वाचा!
रात्री सगळे एकत्र जेवायला बसल्यावरसुद्धा सुरवाती सुरवातीला तिचा घास घशाखाली उतरायचा नाही! सगळे गप्प. हाताचं काम चालू यंत्रवत आणि नजर घड्याळाकडे. भांडी घासणारी बाई यायच्या आत आटपायला पाहिजे हा दंडक. चार जणांची तोंडं चार दिशेला... माहेरीही इन मिन तीन माणसं. पण जेवणापेक्षा गप्पाच भरपूर. त्याला बंधन नाही- विषयाचं, लहानमोठ्याचं- कशाचंच नाही... बंधन नाहीच!... इथे... इथे जेवणं आटोपली की तिची आवराआवर. तोपर्यंत तो सुवासिक बार भरून गॅलरीत गुणगुणत, कट्ट्यावर हातानी ताल धरत, रंगात येऊन... अशावेळी अंदाज घ्यायचा दारात उभं राहून. त्यानं वळून बघितलं न बघितल्यासारखं केलं तर पुढे जायचं नाही... कधी कधी मात्रं त्याचं स्वत:हून आत डोकवत रहाणं, तिचं आटपतंय का ते बघणं, तिनं ते ओळखायचं. साडीला हात पुसत त्याच्या बाजूला जाऊन उभं रहायचं. कट्ट्यावर दोन्ही हात रेलून. मग त्याच्या गंमती जंमती सांगणं... जोक्स, ऑफिसमधल्या नमुन्यांची वर्णनं, चाळीतल्या कॅरेक्टर्सच्या कथा... मग त्याच्या बोलण्याला खंड नसायचा... त्या रात्री ती समाधानानं झोपायची... तो तिच्याही आधी डाराडूर, जवळ जवळ रोजच... पण त्या तेवढ्या गप्पांनीही ती टवटवीत व्हायची... आणि खूश व्हायची ते त्याला आपली काळजी आहे, आपल्या मूडवर त्याचं लक्ष असतं हे बघून. भले त्यानं ते दर्शवू नये, मूड चांगला होण्यासाठी प्रयत्न करू नये... मूड चांगला रहाण्याची... तरीही... आज आपली हालत काय असती एरवी?... कल्पना करवत नाही!... आई, बाबा तेव्हा ठाम उभे राहिले. डिव्होर्सच्या वेळी. नंतरही त्यांची सगळी धडपड चालायची ती त्या भयानक प्रकारातून गेलेल्या आपल्या मुलीला भलत्या विचारांपासून सतत दूर ठेवायची!... शेवटी शेवटी त्याचंच आपल्याला ओझं व्हायला लागलं आणि हे स्थळ आलं. त्याला सगळं सांगितलं. त्यानं नेहेमीच्या शांतपणे आपल्याला करून घेतलेलं... दुसरेपणाची असूनही!... हे कितीही झालं तरी...
त्या विचारानीसुद्धा ती ताजीतवानी झाली. फरशी पुसता पुसता तिनं बाहेर पाहिलं. जेऊन, सुवासिक बार घोळवत तो गॅलरीत उभा होता. गुंग. जोरजोरात कट्ट्यावर तबल्याचा ताल धरत. तोंडाने तालाचा आवाज काढत... हातानी आवर्तनाची, समेवर आल्याची हालचाल करत...
सगळं आटपून ती दाराजवळ बराच वेळ रेंगाळली. मग पेंगणार्‍या सासूच्या खाकरण्याने भानावर आली. पुढे सासूचं पेंगता पेंगताही सुरू झालंच होतं... गुणगुणणं... "रे छबिल्या... राघू मैना निजल्याऽऽ..." सुनेचं लक्ष गेलंय हे कळल्यावर सासूचा व्हॉल्यूम आणखी वाढला!... हे असं... लक्ष गेलंय हे कळल्यावर तर जास्तच... मुद्दाम... कान कितीही बहिरे केले तरी उकळत्या तेलासारखे आत घुसणारे शब्द... तिनं आधी स्तोत्रं काढून लक्ष एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. मग सासर्‍यांच्या सारख्या आतबाहेर चाललेल्या फेर्‍या वाढल्यावर उठून अंथरूणं टाकायला सुरवात केली...
ही सर्वात कठीण वेळ... अंथरूणावर नुसतं पडून रहायची... या कुशीवरून त्या कुशीवर... सारखे दोन्ही गुडघे पोटाशी धरून ठेवायचे... रग लागली की लांब करायचे, पुन्हा... भिंतीवरच्या देव्हार्‍यावर लावलेल्या झिरोच्या बल्बकडे बघत... देव्हार्‍याच्या महिरपीच्या सावलीने झाकल्या गेलेल्या देवांच्या तोंडाकडे पहात... आठवतील तशी स्तोत्रं म्हणत, जप करत... मग उलटे आकडे म्हणत... हजारापासून सुरवात करायची तरीही... मग विचारांची तंद्री आणि ओढून ताणून येणारी डोळ्यावरची झापड यांचा खेळ अव्याहत... सकाळचा कर्कश्श गजर होईपर्यंत...   (क्रमश:)       

Sunday, June 16, 2013

कथा: भूक (६)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा!
तो यायच्या वेळेवर त्याची चाहूल लागूनच की काय तिची पुन्हा धावपळ सुरू... इतका वेळ वरून तरी शांत दिसत असलेल्या गूढ डोहात एकदम चार पाच खडे पडल्यासारखं... सगळीकडे गोमूत्र शिंपडून, लादी पटापटा पुसून घेऊन... उशा, चादरी, गाद्या, नॅपकीन्स, टॉवेल्स, पंचे सगळे कळकट, कुबट पण सर्वत्र गोमूत्र शिंपडणं अव्याहत... पिणंसुद्धा...
आता संध्याकाळी तो ऑफिसमधून आल्यावर तोच दिनक्रम! मधल्या काही कृती उलटसुलट... फक्त आता त्याची नजर दमलेली आडमुठी... पुन्हा आंघोळ करून... आसन घालून... अडम तडम...
पुन्हा भगवी लुंगी चढवल्यावर... सोवळं सोडून... सुवासिक बार भरून... दिवाणाच्या कप्प्यातला तबला डग्गा... खाली बसून हळूवारपणे बाहेर... रियाझ चालू... पूर्ण स्वत:तच... डोळे आता मिटलेले... ब्रह्मानंदी टाळी आता खरी लागलेली...हात सफाईदारपणे तबल्यावर... स्पष्ट बोल... डग्ग्याचा घुमारा... मधेच कुठेतरी आत आर्त कळ आल्यासारखा चेहेरा... मग हळूहळू पीळ सुटत गेल्यासारखा... शांत... मग गुंगी आल्यासारखा...
तिचं स्वैपाकाचं चालूच... खोबरं किसत ती सुद्धा त्या तबल्याच्या तालात दंग... त्याच्याकडे पहात... त्याच्या चेहेर्‍यावर उमटणारी कळ आणि सुटत जाणारा पीळ याचा खेळ बघत... नेहेमीसारखी... मग तिला वाटलं... आज इतकी वर्षं बायकोनं नवर्‍याकडे अशी नुसती पहात काढावीत?... माणूस स्पष्ट काही बोलेल तर बरं!... तोंडाला कुलूप... क्वचित बोलला तर मग सतत पाण्याच्या प्रवाहासारखं बोलणं... पण काही जवळचं विचारायला गेलं, गाभ्यातला काही विषय निघतोय असं वाटलं की लगेच अळी मिळी गूप चिळी... "मला इतरांसारखं लेंढार वाढवायचं नाहिए!" असं एकदाच पण ठामपणे सांगितल्यावर पुन्हा कशाला काय?... काही वागणं, बोलणं, सांगणं म्हणजे वज्रलेप... तो विषय कायमचा बाद... आयुष्यातूनच!... कित्येकदा तिला वाटायचं हेच खरं कारण की... मग विचारगर्तेत धबाधबा कोसळणं... त्यापेक्षा घरकाम, धुणं पुसणं, देवाला जाणं, जप करणं, स्तोत्र म्हणणं यात मन रमवलेलं बरं!... सोईस्कर!!... पण तेही किती खरं?...
सुरवातीला त्याला आवडेल म्हणून आपण देवाची स्तोत्रं वाचायला लागलो, जप करायला लागलो. त्याला बरं वाटलं की नाही कळलं नाही. नजर आडमुठी निर्विकार. आपल्याला मात्र बरं वाटलं. मनातला काळपट हिरवा झालेला भविष्यकाळ खरवडून निघेल अशी खात्री वाटायला लागली. जसजसे दिवस उलटत गेले, महिने उलटत गेले तसं तसं मात्र...      (क्रमश:)  

Wednesday, June 12, 2013

कथा: भूक (५)

भाग १, भाग २, भाग ३ आणि भाग ४ इथे वाचा!
आताही त्या मळ चढलेल्या मोठ्या आरशात कितीतरी वेळ हातातल्या पंचानं ती तोंड पुसत राहिली. उंचावरून गढूळ पाण्यात जेमतेम् प्रतिबिंब दिसावं तसा चेहेरा त्या जुन्या आरशात निरखत राहिली. तिच्याच ते लक्षात आलं. मग तिनं विस्कटलेल्या केसांचे पेड बांधले. लग्नानंतरच ती हे शिकली होती. तेल लावणं, वेणी घालणं, मोठं कुंकू लावणं, साडी नेसणं... तिला स्वत:च्याच अडॅप्ट होत जाण्याच्या सवयीची कमाल वाटली! किती? आणि कुणाशी?... कसं?... का?... तिनं पुन्हा एकदा चेहेरा आरशात निरखला... बॉब केलेले, उडत रहाणारे केस. जेमतेम पिन केलेले. कपाळ मोकळच बर्‍याच वेळा... आणि आता... हूंऽऽऽ... स्वत:शीच कडवट हसून तिनं फ्रीझ उघडला. अगदी खालचा, भाजीचा ट्रे काढला. पडवळाचे तुकडे बाहेर ठेवले. विळी घेऊन भिंतीकडे तोंड करून चिरत बसली...
समोर फोफडे  उडालेल्या भिंती. वरच्या बाजूला डोक्याला लावलेल्या तेलाचे उमटलेले ठसे. रांगेत. जणू  भुतांच्या सावल्याच. पंक्तीला येऊन बसलेल्या... या घरातही- दुसर्‍या लग्नानंतरच्या, काही फार वेगळी परिस्थिती नव्हती. सासू आणि सून हे नातं प्रेमाचं कधी असतं?...
त्या पहिल्या घरी सगळंच अशुद्ध आणि अवघड. आईवेडा मुलगा... आणि आई... हो! वेडीच म्हणायला पाहिजे... मीच कशाला... तिचेच जवळचे... मुलगा आज्ञाधारक श्रावणबाळ... लग्नाच्या रात्रीसुद्धा सगळ्या वर्‍हाडातच झोपणारा आणि त्यातच- शी:ऽऽ किळस किळस... दुसरं काहीच नाही!... तिचं अंग आता भाजी चिरता चिरताही शहारलं...
किती निरर्थक असावा एखादा माणूस?आणि तरीही त्यानं माजावर आलेल्या, लाल तुर्‍याच्या कोंबड्यासारकं मान टेचात मिरवत फिरावं? कसला अभिमान? कुठल्या विश्वात रहाणारी ही माणसं? आणि तरीही भुलवणारी?... हो! आपण नाही भुललो?... ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा... काय भुललासी वरलिया रंगा...
शेवटी सगळंच भिजत पडलेल्या घोंगड्यासारखं झालं... त्या सगळ्यातून किती दिवस जात राहिलो आपण? आपल्या स्वभावानुसार सहन करत... सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यासारखं!... आणि एवढं सगळं सहन करूनही... जरी... डॉक्टरकडे चेकींगला जाऊन आलो... एकदा, दोनदा!... आपला काहीही प्रॉब्लेम नाही!... मग त्याचं चेकींग... चेकींगला न तयार होण्याइतका तरी तो पुरूष होता... त्याचं चेकींग... मग त्याचं ते निरर्थक ऑपरेशन... विशेष म्हणजे एवढ्या सगळ्यातून जाऊनही त्याला अजूनही न शिवलेली मॅच्युरिटी... शेवटी अगदी सहन होईना, अंगातला ताप जाईना, छातीतला कफ संपेना तेव्हा... तेव्हाही शांतपणेच माहेरी परत...
विचारानं एक स्थानक गाठलं. गाडी थांबल्यासारखी झाली. तिनं समोरच्या ताटात पाहिलं. पडवळाचे बारीक तुकडे... विचारांच्या नादात पुन्हा पुन्हा बारीक झालेले... ती उठली. चिरलेली भाजी ओट्यावर ठेवली. हात धुताना घड्याळात पाहिलं. ट्रान्झिस्टर ऑन केला. आणखी एक विचार विरोधक उपाय...           (क्रमश:)   

Thursday, June 6, 2013

कथा: भूक (४)

भाग १, भाग २ आणि भाग ३ इथे वाचा!
... सगळं आटपून साटपून तिनं जमिनीवर सतरंजी अंथरली. उशी टाकून आडवी झाली...
मोच्याकडे चप्पल शिवता शिवता त्याने प्रस्ताव मांडला आणि आपण हबकूनच गेलो!... लग्न करायचंच नाही असा स्पष्ट निर्धार होता. इतर मुलींसारखं जोडी जमण्या- जमवण्याच्या दृष्टीनं पहाणं हा प्रांतच नव्हता. त्या सगळ्या पलिकडे स्वत:ला आणून ठेवलं. असा काही प्रस्ताव समोरून आल्यावर काय वेगळी प्रतिक्रिया असणार होती?... तो इतके दिवस घिरट्या घालतोय हे सुद्धा जिथे लक्षात येत नव्हतं तर...
उमदाच म्हणायचा तसा. दिसायला. वागायला. बोलायला. चेहेरा सतत हसरा... आणि आयुष्यात स्वप्नं तर किती? रोज काहीतरी त्याच्या त्या खड्या आवाजात ऐकवत रहायचा. तोंडावरचा, कपाळावरचा, मानेवरचा घाम पुसत रहायचा. रूमाल पिळून काढेपर्यंत. रूमाल पिळून झाल्यावर तिच्याकडे बघून हसायचा. एक पैसा खर्चून द्यायचा नाही तिला!... त्याचं पान खाणं तिनं कधी बंद केलं आणि त्याच्याबरोबर त्याच्या वडलानी त्याच्यासाठी घेतलेला फ्लॅट सजवण्याची स्वप्नं कधी बघू लागली?... तिलाच कळलं नाही!... वास्तवाचं भान असणारी, विकत घेतलेली नवनवीन पुस्तकं रात्र रात्र जागून वाचणारी, त्यावर चर्चा करणारी, काही समजलं नाही तर खोदून खोदून क्लिअर करून घेणारी ती... आता स्वप्नात रममाण झाली. पूर्णपणे. आता ते दिवस आठवले, त्या वेळची आपली अवस्था आठवली की काळ्या ढगाला सोनेरी किनार असल्यासारखं तिला वाटायचं...
"देवीऽऽ देवीऽ ऊठ ऊऽठ! मी स्वत: आलोय देवीऽ"
"अं?... मी... मला... आपण कोण आहात? आणि मला-"
"देवीऽ... मलाच तर आळवत होतीस नं?... इतक्या आकांतानं?... आणि मला ओळखलंच नाहीस?... मला वाटलं होतं मी तुला दिलेला वर तू विसरून गेलीस आणि म्हणून मी स्वत: तुला- इतके दिवस अतृप्त आहेस तू! तरी किती सावरलं आहेस स्वत:ला! कौतुक वाटतं तुझं! तुझी खडतर तपस्या पाहून मी प्रसन्न झालोय! माग! तुला हवंय ते माग!"  
"देवन! मला काय हवंय ते तुम्हाला..."
"कळलंय! कळलंय सारं मला बरं! तुझ्या इतक्या असोशीनंतरच तुझी इच्छा पूर्ण व्हायला हवी! तू... तयार आहेस ना?"
"म्हणजे... मी... मला... कृपा व्हावी! अनुग्रह व्हावा!"
"चल तर मग!"
"... कुठे?... मला... मी काही समजले नाही! आपण मंत्र देताहात नं? कृपा व्हावी! मी आजन्म आपल्या पायाशी आहे!.. इथे, या पवित्र स्थळी देऊ शकत नाही का तुम्ही मंत्र?"
"मंत्र? हाऽहाऽहऽहऽह... हे तुला कुणी सांगितलं?ऽ..."
"क्षमा असावी देवन... वरच असा आहे नं की मंत्राचा अनुग्रह होईल आणि मग-"
"मूढ आहेस! असं काही होत असतं का? तुझ्या वराच्या- स्वामीच्या हतबलतेची तुला खात्री झाली आहे का?... की नाही?... सगळं योजित असतं देवी. त्यासाठीच तर तुला वरदान दिलं गेलंय... चल! उशीर नको देवी! मी प्रसन्न आहे तुझ्या-"
"न- नाही- क्षमा असावी देवन- नाही! हे असलं मला नाही जमणार! मला संतानसुख हवं आहे- हवंच आहे! माझं जीवन तेच आहे. पण या मार्गानं मी- मला- मला- असं काही करा- म्हणजे- दुसरा काही उपाय असेलच नं देवन? मला- आपण असे का बघताहात माझ्याकडे?- नको- नको- असं रोखून माझ्या सगळ्या शरीराकडे- नाहीऽ देवनऽऽ मीऽऽऽ..."
घामाघूम होत ती दचकून उठून उभीच राहिली!... सासू तक्क्याला रेलून बसली होती. उजव्या पायावर डावा पाय ठेऊन तो हलवत. उभ्या असलेल्या तिच्याकडे बघायला लागली. तिच्या पायाजवळ गोल गोळा झालेल्या सतरंजीकडे बघायला लागली. मान डोलावत, तोंडातल्या पानातली उरलेली सुपारी जिभेने घोळवत घोळवत. हॅ हॅ हॅ हॅ करत हसत राहिली. हसणं संपल्यावर हं!ऽऽ असा लांब हुंकार देत जमिनीवर हात आपटत राहिली...
दचकून उभी राहिली तरी ती भेदरल्यासारखीच होती... भानावर आल्यावर तिनं झटका बसल्यासारखी साडी- पदर नीट केला. पदरानं घाम पुसून काढायचा प्रयत्न केला. सासूची आणखी काही रिऍक्शन व्हायच्या आत मोरीत धावली... नळ सोडला. फसाफसा हातापायावर, तोंडावर, मानेवर, पाण्याचे सबकारे मारून घेतले. जणू स्वत:ला लवकरात लवकर स्वच्छ करून घेणं आवश्यक होतं! ख्ररं म्हणजे डोक्यावरूनच पाणी ओतून घ्यावसं वाटत होतं पण मग पुन्हा-
शीऽऽ... हे असलं काय हे?... काही समजत नाही... कळत नाही... अजून आपण भमिष्ठ कशा होत नाही?...     (क्रमश:)   

    

Wednesday, June 5, 2013

कथा: भूक (३)

भाग १  आणि भाग २ इथे वाचा!
मान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा बाजार बघत बघत. घराकडे. घर... घराबद्दल- आपल्या- फार इमले रचले होते का आपण?... तसे सर्वसाधारणच तर होते! की ते सर्वसाधारण होते म्हणूनच... हे असं... तिची पावलं अडखळायला लागली...
छान कुटुंब असावं. छोटं, मोठं, कसंही. एवढं शिकून, उदार वातावरणात वाढून आपला ट्रडिशनलपणा सुटला नव्हता. परंपरागतता की परंपराप्रियता... अमुक एका करियरमागे धावायचं वेड नव्हतंच. सगळ्यात रस होता. स्वैपाक, घर आवरणं, मोठ्यांची, नवर्‍याची सेवा, त्याशिवाय स्वत;चं वाचन, शिवण, नाटक, सिनेमा बघणं... एवढंच नाही तर गप्पांमधे एखाद्या विषयावर आपलं मत ठामपणे मांडणं, चर्चा करणं... असं देव देव तरी आपण करू असं आपलं आपल्यालाच कधी वाटलं होतं?... परवा उषा राजेंद्रन भेटली तर बघतच बसली. कॉलेजमधे असताना आपण तिला सल्ला द्यायचो- भले देवावर विश्वास ठेव पण इतकं... आणि आता आपणच?...
ती घरात शिरायला आणि सासू दारातून बाहेर पडायला नेहेमीसारखी गाठ पडली. सासूनं हात उलटा करून तळव्याखाली मनगटावर बांधलेल्या घड्याळात निरखून निरखून पाहिलं. हुऽऽश्श! केलं. डाव्या तळव्यावर उजव्या हाताची आडवी मूठ आपटून टॉक टॉक असा आवाज करत, "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, आम्हाला मात्र-" असं म्हणत पुढे गेली...
तिनं कान लक्षपूर्वक बधीर करून घेतले होते. आत आली. सासरे पेपर वाचत बसले होते. तिला बघून हसले. "जेवायला वाढू का?" असं तिनं विचारल्यावर, "असू दे! असू दे! वेळ आहे अजून. तुम्ही बसा!" म्हणाले...
ती मोरीत गेली. हातपाय धुतले. बाहेर येऊन देवासमोर आसन मांडलं. देव्हार्‍यातला स्तोत्रांचा गठ्ठा काढला. जपाची माळ काढली. वेलवेटच्या हातमोज्यासारख्य़ा पिशवीत हात घालून- दत्तगुरू, दत्तगुरू... मोकाट सुटलेल्या आठवणी त्रास देऊ नयेत म्हणून जप करायचा, नुसतं शंखासारखं बसून रहाता येत नाही म्हणून जप करायचा, नुसता जप करायचा म्हणूनही जपच... जप करताना तंद्री लागली की पुन्हा भूतकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ, भविष्यातला काळोख आणि जगणं हे असं... मरण्याचं धाडस नाही म्हणून... असलं सगळं दुष्टचक्र. ते आजवर इतक्या वेळेला फिरून फिरून अजिबात थकलेलं नाही. आणि आपण?... निदान एक घर मिळालं... नाहीतर आईबापाचं घर सुटलेलं, दुसरं आपण सोडलेलं म्हणजे लांडग्यांना पर्वणीच. लांडग्यांच्या नजरा आता हातात मंगळसूत्र धरलं तर आपल्यालाच सौम्य तरी वाटतील... एरवी काय झालं असतं?... लग्नाचं घर तुटलं म्हटल्यावर गरती बाई हा शिक्का पुसायला जग तयारच होतं- "हलवा परशुरामाला मी बैसले जपाला, बोला हो कुणी बोला..." भसाड्या आवाजातलं गाणं... दारातून येणार्‍या सासूबरोबर... मागोमाग ते टिपिकल हसणं... तिच्या कानात सुरीसारखं शिरलं. एरवी बधीर कानानं तशीच बसून रहाणारी ती, उठली. तेवढ्यापुरतीच आत आलेली सासू, "ए म्हसण्याऽऽ" असं कुणालातरी हाक मारत खिदळली, चालती झाली...      
(क्रमश:)   

Saturday, May 11, 2013

"कन्या" दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण!

१६ डिसेंबर २०१२ आपल्याला वेगळ्या कारणासाठी लक्षात असेल. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता अशाच एका मुलीची संघर्षातून उभं रहाण्याची कहाणी "कन्या" दीर्घांकाद्वारे मांडली होती.
आपल्यापैकी अनेकांना प्रयोग पहाणं साधलं नसेल.  "कन्या" या दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण आता आपण यूट्यूबवर पाहू शकता.
कन्या दीर्घांकासंबंधीची माहिती, क्षणचित्रे इत्यादी माहिती इथे जरूर वाचायला मिळेल.
हे माझं दिग्दर्शन आणि निर्मितीतलं आणि कलाकारांपैकी बहुतेकांचं अभिनयातलं पदार्पण!
आपल्या अभिप्रायाची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत!

बेटं तर झाली... पुढे?

लहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.
म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! असे भाव दाटले. चेहेर्‍यावर राहिले.
नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.
माणूस म्हणजे बेट झालंय हे त्यानी साठोत्तरी दशकात जाहीर केलं. दुसर्‍या महायुद्धानंतर लिहित्या झालेल्या ’नव’ कथा, कविताकारांना माणूस एकाकी आहे हे जाणवलं होतंच. सगळ्या जगभर या गोष्टी दोन्ही महायुद्धानंतरच्या उलथापालथीनंतर दृगोचर होऊ लागल्या.
ही बेटं प्रत्यक्षात बघता, अनुभवता आली नव्हती. माझ्यापर्यंत ती थेट पोचली नसावीत. खरं म्हणजे मी अशा अनुभवांपर्यंत थेट पोचलो नव्हतो असं म्हणायला पाहिजे. अनेक घटना, भावना, विचारांच्या धुक्याआड अनेक गोष्टी त्यांची त्यांची वेळ आल्यावर जाणवत, लक्षात येत असाव्यात.
हल्ली त्या प्रकर्षानं जाणवू लागल्या आहेत.
माणसं, अनेक वर्षांची सवय असलेले मित्र अचानक समोरून अनोळखी होऊन निघून जातात. मी खुळ्यासारखा बघत रहातो. हसलेला असतो, हात दाखवलेला असतो, कधी चौकशी करायला थांबलेलोही असतो. पोपट होतो. पोपट झाला की राग येतो. समोरून अचानक असा प्रतिसाद येण्यासारखं मी काहीच केलेलं नाही असा पहिला विचार येतो. मग असं का? या विचाराचा भुंगा खायला सुरवात करतो. त्याची सुई नेहेमीप्रमाणे मी स्वत:च असतो. मग स्वत:ला पोखरून पोखरून झाल्यावर लक्षात येतं, अरे! त्या तसल्या प्रतिसादाचं केंद्र तर समोर होतं! मग मी कशाला माझ्या दिमागचं दही करून घेतोय! हा झाला माझा प्रवास.
बरेचसे, जा! गेलास उडत! असे असतात. त्यांचा हेवा वाटायला लागतो. पण आत कुठेतरी वर्षानुवर्षाचे बंध तुटल्यामुळे खुपत राहतं. माझ्या दृष्टीने माझी चूक नसताना. समोरच्याने मात्र ’ठान’ लेली असते. मी असाच वागणार! त्याना आत काही खुपत नसेल? का करत असतील असं हे? न्यूनगंडातून? अहंगंडातून? प्रचंड संकटं आल्यामुळे? की परिस्थितीवश एखादा दिवा तेल आणि वात कमी कमी होऊन विझत जावा तसे विझत जात असावेत हे आतून? किंवा भडकत, मी! मी! माझं! माझं! असं करत आणखी आणखी मिळवतो आहे याची नशा चढवत असावेत हे?
गरज नाही समोरच्याची म्हणून त्याच्याशी असं वागत असावेत हे? काय असावं?
मग मी माझाही झाडा घेऊ लागतो. मी भूतकाळात नव्हतो का काही कारणानी कासव झालो होतो? आत आत मान घालून जगाशी संबंध तोडून घेत होतो. काही काळ असं वागणं शक्य असावं.
मग मला मागचे काही संबंध संपल्यासारखे नाही का वाटायला लागले. एका मोठ्या वयाच्या मित्राला विचारल्यावर तो म्हणाला होता, लहानपण एकसारखं असतं, मोठं झाल्यावर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या दिशेने वाढतो. मग समानधर्मी काहीच रहात नाही. मग बालपणीचे ते रम्य इत्यादी दिवस गतरम्येतेतच रहातात. समोरासमोर आलो की काय बोलावं तेच कळत नाही, गतरम्यताच उगाळली जात रहाते.
अलिकडे जे जाणवलंय ते थोडसं मध्यमवयीन अडचणी- middle life crisis च्या दिशेने गेल्यासारखं वाटतंय. पण ते तेवढंच नाही. कॉर्पोरेटी झगमगाटातल्या तरूणांचंही असं होतंय असं दिसतं.
एखादा स्तरच असा आहे की हे सार्वत्रिक आहे? मग सोशल नेटवर्कींग साईट्सनी ही दरी काही प्रमाणात तरी बुजवली आहे की बुजवलेली ही दरी आभासमय आहे?
मतं पटत नाहीत म्हणून, स्वभाव म्हणून अंतर राखून राहणं समजून घेता येईल. पण हे जाणवलेलं वेगळं आहे. इथे अचानक, माझ्या दृष्टीने, समोरच्याच्या दृष्टीने नियोजित असा पूर्ण बहिष्कारच व्यक्त होताना दिसतोय. अनेक वेळा तो वैयक्तिक नाही तर सार्वजनिक आहे असंही दिसतंय.
कदाचित हे असं चालूच असेल. माझं लक्ष आज तिथे वळलं असेल.
काळजी वाटते. मीही काही खूप सोशल, सदैव भेटीगाठी करत असणारा माणूस नव्हे. काही कारणांनी, काही वेळा बहिष्काराचा अवलंबही करावा लागलाय मला. काळजी आपण तसे झालोत, होऊ, ही नाही. एकूणच हे बेट प्रकरण बेटं माझ्या मनात हल्ली चांगलंच रूजून बसलंय.
दुसरीकडे वैद्यकीय सल्ला सतत हा दिला जातोय की सतत माणसं जोडा, मित्रं जोडा, माणसात रहा! तुमच्या अनेक रोगांचं मूळ तुमच्या एकटेपणात आहे.
माणूस मुळातच एकाकी आहे. कुटुंबसंस्थेत रमलेला दिसला तरी.
यातून मला जाणवलेला धडा मी घेतोच आहे.
बेटं तर झाली... पुढे? हा विचार मात्र खाऊ लागला आहे हे खरं!      

Saturday, May 4, 2013

कथा: भूक (२)

भाग १ इथे वाचा!
तर... त्याच्यासाठी नाश्ता तयार... म्हणजे जवळ जवळ जेवणच. पेज, मऊभात असं. ते त्यानं ओरपून ओरपून खायचं. खाणं म्हणजे, जेवणं म्हणजे एकापाठोपाठ एक नुसती हातांची हालचाल. तोंडाकडे. मग त्या घाईमुळे शितं किंवा सदृश द्राव मिशांवर, जवळ जवळ छातीपर्यंत वाढलेल्या- वाढवलेल्या दाढीवर. ते पुसून हातांचं काम पूर्ववत...
हात धुऊन झाल्यावर... ताटातच... बायकोनं तत्परतेने ताब्यांच्या कलशातून आणलेलं पाणी गटागटा पिऊन.. हात भगव्या लुंगीला पुसत... हूऽऽ अफ असे आवाज काढत... तोंडाने... ढेकर असावेत... दारामागच्या सुवासिक तंबाखूचा डबा काढून काम चालू... बाहेर दाराच्या बाजूला, वाट्याला आलेल्या चाळीच्या गॅलरीतून... मच मच असं करत... रस्त्यावरची वर्दळ बघत... उदबत्तीच्या उरलेल्या काडीने दात कोरत...
आता पोटात गेल्यामुळे थोडी तृप्त थोडी आडमुठी नजर. नजरेतला आडमुठेपणा कायम. कधी मधेच मोकळं हास्य, चेहेरा ’हो, हो’ या अर्थानं हलवत. पण तेही लक्षात येऊन की काय पुन्हा नजर आडमुठी. ती चेहेर्‍यातच स्थिरावलेली. कायम.
तोपर्यंत ती... वर ठेवलेली त्याची ऑफिसची बॅग काढून... तोंडानं तिचंही स्तोत्र म्हणणं चालूच. स्वैपाक करत असल्यापासूनच... जेवणाचा डबा बॅगेत भरून आता त्याचे दारामागचे सॅंडल्स काढून फडक्याने पुसत...
त्याचं अजूनही काहीतरी बाकीच. आता काचेच्या शोकेसच्या दाराआडून... धार्मिक ग्रंथ. जाडजूड. पत्र्याच्या खुर्चीत बसून वाचत... उजवा पाय डाव्या पायावर ठेऊन... घोट्याजवळ चोळत... खाजवत... इतका वेळ मांडी ठोकून बसल्यामुळे होणारा त्रास...
बरोब्बर आठ वाजता पुस्तक- ग्रंथ बंद. कपडे करणं, आधी भगवा मुंडा घालून मग त्यावर शर्ट. पॅंटमधे इन करून. मानेपर्यंत वाढवलेल्या केसांवरून, लांब दाढीवरून कंगवा फिरवत. आरशासमोर. ठसठशीत लावलेलं लाल कुंकू. आडव्या फासलेल्या भस्माच्या पट्ट्यांवर. ते आरशात न्याहाळत...
लगबगीनं ती पार्टीशनवजा पडदा ओढून. रंगहीन. हुक्सवर फाटलेला. कुबट वास येणारा. साडी बदलून ती तयार. हा एकटाच बॅग घेऊन पुढे... आठमुठा नजरेतला आता शार्प. त्याच्या पाठोपाठ ती. त्याच गडबडीनं. जरा पाऊल कमी जास्त पडलं तर मार बसेल या भीतीवजा नजरेनं... असावी... चालत...
नजर सतत खाली. इतकी की भाजी, प्लॅस्टिकची खेळणी, किसण्या, बरण्य़ा, फळं अशा विकायला ठेवलेल्या वस्तूंवरूनच नजर फिरायची. त्या विकणार्‍यांचे चेहेरे तिनं कधी बघितलेच नसावेत. पसरलेल्या तुटक्या चपला, बूट, गढूळ पाण्याचं रबरी खोकडं, चपला ठोकून ठाकून शिवणारे काळे बरबटलेले हात दिसले की वळायचं हे-
अरे!... हे... फताडे पाय आणि शिऊन शिऊन तुटलेल्या की तुटून तुटून शिवलेल्या चपला... तोच आहे का ते बघावं? शी:ऽऽ त्याचं तोंडसुद्धा पहायचं नाहीये!... मान खाली घातलेला तिचा चेहेरा आणखी आत... कासवानं आपलं डोकं आत आत घ्यावं तसा! किती आत?... सगळं शरीरच जावं आत कुठेतरी... पाताळात...
ज्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही त्याचे पाय बघायला लागले!... हे असं आपल्याच बाबतीत... न्यूनपणाच्या गर्तेत कोसळता कोसळतानाच स्वत:ला सावरायचे कसेबसे प्रयत्न... तिची नेहेमीची धडपड... हो! त्याच्याच चपला त्या! त्याच्याच!...
किती दिवस काढले त्याच्याबरोबर? वर्ष दोन वर्षं... त्या लग्नाआधीचं जवळ जवळ वर्ष आणि नंतर वर्षभरच... नको त्या आठवणी!... सगळ्या चपलांसारख्याच तुटक्या, फाटक्या, विटलेल्या, नाहीतर... पुन्हा पुन्हा शिवलेल्या... त्यानं स्वत:हून विचारलं म्हणून आपण एवढ्या... की सगळं सर्वसाधारण मिळालं ह्यातच समाधान... आपल्याला हे कमीत कमी गोष्टीत आनंद मानून घ्यायचं कुणी शिकवलं? का स्वभावत:च...
दत्तगुरू दत्तगुरू... आडव्या आलेल्या मोकाट गाईंच्या झुंडीसारख्या आठवणी घालवायला तिनं जप सुरू केला...  कायद्यानं जरी वेगळे झालो तरी आठवणी कशा मनावेगळ्या करणार?... तिची पावलं मंदावली. त्यानं- तिच्या आत्ताच्या नवर्‍यानं- मागे वळून पाहिलं... कपाळावरची त्याची शीर ठळक दिसली तशी तिच्या पावलांनी वेग घेतला...
देवळात ती डोळे मिटून शांत बसली रोजच्यासारखी. तरीही मिटल्या पापणीवर- पडद्यावर दिसावेत तसे- फताडे पाय आणि तुटलेली अंगठ्याची वादी... मग मळकट कपडे- सततच्या घामामुळे दोन दिवसात कळा आलेले- तिनं मोठ्या हौसेने, नव्या फॅशनचे, त्याच्यासाठी शिऊन घेतलेले... त्यात कोंबलेला, पोट पुढे काढून चालणारा तो... सततचं हसणं... आव आणून आणून बोलणं... ऊतू जाणारं प्रेम... आणि वागणं?... झटपट सगळं उरकून बाजूला होणं... फक्त भाव करणं आणि नंतर पैसे देणं नाही- एवढाच काय तो फरक... बाकी सगळं तसंच!... शी:‌ऽऽऽ... तिने   डोळे उघडले. दचकून उठून उभी राहिली. चमकून इकडे तिकडे पाहिलं. नवरा रस्त्यावर दूर... पाठमोरा... हातात बॅग घेऊन ऑफिसला...                                                                                          (क्रमश:)       

Tuesday, March 26, 2013

"अभिलेख" वाचनसंख्या ५००००!!! होलीऽऽऽ हैऽऽऽ

आपल्या "अभिलेख"ची वाचनसंख्या ५००००!!! झालीऽऽऽ होऽऽऽ होलीऽऽऽ हैऽऽऽ