romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label Self Development. Show all posts
Showing posts with label Self Development. Show all posts

Saturday, May 11, 2013

बेटं तर झाली... पुढे?

लहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.
म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! असे भाव दाटले. चेहेर्‍यावर राहिले.
नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.
माणूस म्हणजे बेट झालंय हे त्यानी साठोत्तरी दशकात जाहीर केलं. दुसर्‍या महायुद्धानंतर लिहित्या झालेल्या ’नव’ कथा, कविताकारांना माणूस एकाकी आहे हे जाणवलं होतंच. सगळ्या जगभर या गोष्टी दोन्ही महायुद्धानंतरच्या उलथापालथीनंतर दृगोचर होऊ लागल्या.
ही बेटं प्रत्यक्षात बघता, अनुभवता आली नव्हती. माझ्यापर्यंत ती थेट पोचली नसावीत. खरं म्हणजे मी अशा अनुभवांपर्यंत थेट पोचलो नव्हतो असं म्हणायला पाहिजे. अनेक घटना, भावना, विचारांच्या धुक्याआड अनेक गोष्टी त्यांची त्यांची वेळ आल्यावर जाणवत, लक्षात येत असाव्यात.
हल्ली त्या प्रकर्षानं जाणवू लागल्या आहेत.
माणसं, अनेक वर्षांची सवय असलेले मित्र अचानक समोरून अनोळखी होऊन निघून जातात. मी खुळ्यासारखा बघत रहातो. हसलेला असतो, हात दाखवलेला असतो, कधी चौकशी करायला थांबलेलोही असतो. पोपट होतो. पोपट झाला की राग येतो. समोरून अचानक असा प्रतिसाद येण्यासारखं मी काहीच केलेलं नाही असा पहिला विचार येतो. मग असं का? या विचाराचा भुंगा खायला सुरवात करतो. त्याची सुई नेहेमीप्रमाणे मी स्वत:च असतो. मग स्वत:ला पोखरून पोखरून झाल्यावर लक्षात येतं, अरे! त्या तसल्या प्रतिसादाचं केंद्र तर समोर होतं! मग मी कशाला माझ्या दिमागचं दही करून घेतोय! हा झाला माझा प्रवास.
बरेचसे, जा! गेलास उडत! असे असतात. त्यांचा हेवा वाटायला लागतो. पण आत कुठेतरी वर्षानुवर्षाचे बंध तुटल्यामुळे खुपत राहतं. माझ्या दृष्टीने माझी चूक नसताना. समोरच्याने मात्र ’ठान’ लेली असते. मी असाच वागणार! त्याना आत काही खुपत नसेल? का करत असतील असं हे? न्यूनगंडातून? अहंगंडातून? प्रचंड संकटं आल्यामुळे? की परिस्थितीवश एखादा दिवा तेल आणि वात कमी कमी होऊन विझत जावा तसे विझत जात असावेत हे आतून? किंवा भडकत, मी! मी! माझं! माझं! असं करत आणखी आणखी मिळवतो आहे याची नशा चढवत असावेत हे?
गरज नाही समोरच्याची म्हणून त्याच्याशी असं वागत असावेत हे? काय असावं?
मग मी माझाही झाडा घेऊ लागतो. मी भूतकाळात नव्हतो का काही कारणानी कासव झालो होतो? आत आत मान घालून जगाशी संबंध तोडून घेत होतो. काही काळ असं वागणं शक्य असावं.
मग मला मागचे काही संबंध संपल्यासारखे नाही का वाटायला लागले. एका मोठ्या वयाच्या मित्राला विचारल्यावर तो म्हणाला होता, लहानपण एकसारखं असतं, मोठं झाल्यावर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या दिशेने वाढतो. मग समानधर्मी काहीच रहात नाही. मग बालपणीचे ते रम्य इत्यादी दिवस गतरम्येतेतच रहातात. समोरासमोर आलो की काय बोलावं तेच कळत नाही, गतरम्यताच उगाळली जात रहाते.
अलिकडे जे जाणवलंय ते थोडसं मध्यमवयीन अडचणी- middle life crisis च्या दिशेने गेल्यासारखं वाटतंय. पण ते तेवढंच नाही. कॉर्पोरेटी झगमगाटातल्या तरूणांचंही असं होतंय असं दिसतं.
एखादा स्तरच असा आहे की हे सार्वत्रिक आहे? मग सोशल नेटवर्कींग साईट्सनी ही दरी काही प्रमाणात तरी बुजवली आहे की बुजवलेली ही दरी आभासमय आहे?
मतं पटत नाहीत म्हणून, स्वभाव म्हणून अंतर राखून राहणं समजून घेता येईल. पण हे जाणवलेलं वेगळं आहे. इथे अचानक, माझ्या दृष्टीने, समोरच्याच्या दृष्टीने नियोजित असा पूर्ण बहिष्कारच व्यक्त होताना दिसतोय. अनेक वेळा तो वैयक्तिक नाही तर सार्वजनिक आहे असंही दिसतंय.
कदाचित हे असं चालूच असेल. माझं लक्ष आज तिथे वळलं असेल.
काळजी वाटते. मीही काही खूप सोशल, सदैव भेटीगाठी करत असणारा माणूस नव्हे. काही कारणांनी, काही वेळा बहिष्काराचा अवलंबही करावा लागलाय मला. काळजी आपण तसे झालोत, होऊ, ही नाही. एकूणच हे बेट प्रकरण बेटं माझ्या मनात हल्ली चांगलंच रूजून बसलंय.
दुसरीकडे वैद्यकीय सल्ला सतत हा दिला जातोय की सतत माणसं जोडा, मित्रं जोडा, माणसात रहा! तुमच्या अनेक रोगांचं मूळ तुमच्या एकटेपणात आहे.
माणूस मुळातच एकाकी आहे. कुटुंबसंस्थेत रमलेला दिसला तरी.
यातून मला जाणवलेला धडा मी घेतोच आहे.
बेटं तर झाली... पुढे? हा विचार मात्र खाऊ लागला आहे हे खरं!      

Wednesday, January 9, 2013

"सुदृढ नातेसंबंधासाठी..." पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली!

नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा मित्रमैत्रीणींनो! ’अभिलेख’ वरची नव्या वर्षातली ही पहिलीच नोंद! आनंद होतोय ही नोंद लिहिताना. "सुदृढ नातेसंबंधासाठी..." या "मैत्रेय प्रकाशन" या प्रकाशनसंस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे माझं दुसरं पुस्तक! या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली होती फेब्रुवारी २०११ मधे. "सुदृढ नातेसंबंधासाठी..." या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच डिसेंबर २०१२ मधे प्रकाशित झाली आहे! 
या आधी मैत्रेय प्रकाशनाच्याच स्वयंविकास मालिकेत माझ्या "स्मरणशक्ती वाढीसाठी!" ह्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. "मैत्रेय प्रकाशनाचे" मन:पूर्वक आभार!
वाचक मित्रमैत्रीणींनो! आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाशिवाय हे शक्य झालं नसतं. आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार! 
ही पुस्तकं  बुकगंगा आणि फ्लिपकार्ट या दोन्ही संस्थळांवर उपलब्ध आहेत.



Thursday, April 12, 2012

या व्यवस्थितपणाचं काय करायचं?

या व्यवस्थितपणाचं करायचं काय?... हा प्रश्न कधी नव्हत ते उभा राहिला समोर. प्रश्न उभे रहातात समोर ते आपण ते उभे करतो म्हणून. संवेदना कुठेतरी काम करत असतात. त्या नसल्या तर... त्या कुणाला नसतात असं होतं का? परिस्थिती, प्राथमिकता यावर अमुक एका विषयासंदर्भातल्या संवेदना अवलंबून असतात. संवेदनापर्यंत ठीक असतं पण त्यापुढचं अतिसंवेदनशीलपण, मग हळवेपण कितपत योग्य? संवेदनांच्या या चढत्या भाजणीवर पुन्हा त्या त्या माणसाचं सर्जनही अवलंबून. व्यवस्थितपणाचं करायचं काय?... हा मूळ प्रश्न या लेखांकातला.
हा प्रश्न पडला आणि मी नेहेमीप्रमाणे विरूद्ध बाजूला झोल मारला. ’एवढा व्यवस्थितपणा करायचाय काय?’वाले जे आहेत त्यांचं बरोब्बर आहे असं मला प्रकर्षानं वाटायला लागलं. असं म्हणणारे बरेच जण अव्यवस्थितपणाला व्यवहार मानणारे होते.
तू व्यवस्थितपणे कशाला वागतोस? त्यांच्या प्रश्नांची बंदूक मी स्वत:वर रोखून धरली. असं मी नेहेमी किंवा बर्‍याच वेळा म्हणूया, करतो. मी व्यवस्थितपणे वागतो कारण ’तू व्यवस्थित आहेस!’ असं म्हटलेलं मला आवडतं. हे मत मला कितीही नाकारावं लागलं तरी शेवटी स्वत:शी कबूल करावं लागलं.
आता तू लहान का मूल आहेस? मी स्वत:ला विचारलं. अजून तुला कुणी तुझं कौतुक करावं असं वाटतं? तेही व्यवस्थितपणासारख्या गोष्टीचं? या वस्तूची जगात काय किंमत राहिली आहे याचा अदमास तू घेतला आहेस का? की नेहेमीप्रमाणे मला जे आवडतं ते मी करणारंच असा तुझा हट्ट आहे?
मला व्यवस्थितपणा आवडतो म्हणून मी व्यवस्थित असायचा प्रयत्न करतो. मला स्वत:चा बचाव करायला आणखी एक ढाल मिळाली. तुला काय आवडतं आणि काय नाही याला कोण भीक घालतं?- लगेच आतलं जे दुसरं मन, आतला आवाज वगैरे जे काही असतं त्यानं पलटवार केला... मग मला हेही प्रयत्नपूर्वक स्वत:शी कबूल करावं लागलं की, खरंच! जो तो ज्याला त्याला काय आवडतं याचा विचार करतो. दुसर्‍याला काय आवडतं याचा विचार जो तो कितपत करतो? मी स्वत: असा विचार कितपत करतो?
व्यवस्थित असणं माझ्या स्वभावात आहे! मी आणखी एक ढाल, आणखी एक बचाव, आणखी एक स्वत:च स्वत:च्या डोक्यावर खोवलेला तुरा बाहेर काढला... ठीकय नं मग? तसा स्वभाव असणं किंवा तसं स्वभावात असणं  म्हणजे काही विशेष गोष्टं नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती जगभर असतात. अमुक एक पणा तुझ्यात आहे म्हणजे तू काही राजा इंद्र किंवा सिकंदर नाही झालास!
मला नाही आवडत अव्यवस्थित असणं! मला चीड आहे, घृणा आहे अव्यवस्थितपणाची!... माझं आर्ग्युमेंटेटिव की काय, कसलं म्हणतात ते, बुद्धिगम्य मन (?) इत्यादी जागं होऊन त्यानं आता नकारात्मक बचावाची लाईन पकडली आहे का? याचा आता मला अंदाज घ्यावा लागला. आधी स्वत:ला छळून घ्यायचं आणि मग प्रतिकारात्मक लढाई इत्यादीसाठी कंबर कसायचा प्रयत्न करायचा असा काही माझ्या मन इत्यादी वस्तूचा सेटप असावा...
पण व्यवस्थित असून तू काय एवढं घोडं मारलं आहेस? सालं.. ते बुद्धिगम्य वगैरे हार मानायलाच तयार होत नाही का?... मी काहीही घोडं वगैरे मारलेलं नाही व्यवस्थित असण्याचा अवलंब करून असं मग मला स्वत:शी प्रामाणिकपणे कबूल करावं लागलं.
माझ्यावर संस्कार आहेत तसे! असा आणखी एक पवित्रा मला मिळाला... तसे अनेक संस्कार आहेत तुझ्यावर! सगळे जपलेस तू आजतागायत? पाळलेस? साधा श्रावण पाळताना दमछाक होते तुझी!... मी स्वत:शी मूक होऊ लागायच्या प्रवासाची ही सुरवात असावी...
काय व्यवस्थितपणा व्यवस्थितपणा व्यवस्थितपणा लावलायस मगासपासून? आतल्या कोपर्‍यातलं आणखी एक भूछत्र चांगलंच कासावीस झालं! कशासाठी करायचा व्यवस्थितपणा? परिपूर्ण होण्यासाठी? परिपूर्ण असतं का कुणी? या जगात कुठली गोष्टं परिपूर्ण आहे? परिपूर्णतेच्या वाट्याला गेलेले रहाटगाडग्याचे दास झालेत कायमचे! रूटीनमधे अडकून अडकून मशिनं झालीएत त्यांची?... हे भूछत्र चांगलंच क्रांतिकारी इत्यादी असावं.
त्यापेक्षा मस्त असावं! आपल्याला पाहिजे ते करावं! आपल्याला आनंद मिळतो ते करावं! दुसर्‍याचा काहीच विचार करू नये! झाला अव्यवस्थितपणा तर व्यवस्थित असणारे करतील तो व्यवस्थित!
आणखी कशासाठी व्यवस्थित रहातोस तू? तुला अमुक एक चांगला मोबदला मिळतो. त्या मोबदल्याशी कृतज्ञ रहावं म्हणून व्यवस्थित रहातोस तू? म्हणजे... आपण आपल्याकडचं मॅक्झिमम ते द्यायचं. मोबदला मिळतोय त्यापेक्षा जास्त द्यायचं. असलं काही व्यवस्थापन इत्यादी तज्ज्ञानी, गुरूंनी सांगितलेलं खूळ आहे तुझ्या टाळक्यात? असं काही नसतं रे! आलेली जबाबदारी आली अंगावर घेतली शिंगावर असं म्हणून एकदाची पार पाडून भिरकावून द्यायची! तू व्यवस्थितपणा करून तुला मिळालेली बिदागी सेम आणि आ.अं.घे.शिं. म्हणून भिरकावून दिलेल्यालाही बिदागी सेम! पुन्हा मी व्यवस्थित म्हणून तू आत्मविश्वास इत्यादी कमवायच्या मागे लागणार! भिरकावून देणारे बघ कसे मिळून मिसळून असतात. त्याना माहित असतं रे माणूस स्खलनशील आहे! किती उड्या मारणार तू? कुठवर? कधी न कधी सगळं अव्यवस्थित होणार, असणार, रहाणारच की नाही?... की तुझं आपलं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच!... आतल्या कोपर्‍यातलं क्रांतिकारी भूछत्र आता चांगलंच फार्मात आलेलं दिसलं...
शेवटी हे लक्षात ठेव! व्यवस्थित व्यवस्थित करत तुझं सगळं अतिव्यवस्थितपणा कडे झुकायला लागतं! अतिव्यवस्थितपणा! लक्षात घे! त्यानं काय होतं? तू स्वत:ला निर्माणकर्ता वगैरे समजायला लागतोस. एक फसवं समाधान मनात घेऊन जगत रहातोस.
अतिव्यवस्थितपणा आणि अव्यवस्थितपणा यात एक ’ति’चा फरक आहे बघ! त्या क्रांतिकारी इत्यादीनं मला फुटकळ वाटणारी एक कोटीही केली जाता जाता आणि ते मागील पानावरून की अंकावरून पुढे चालूच राहिलं...

अव्यवस्थितपणात एक संधी दडलेली असते राजा! तुझ्या अमलाबाहेरची! व्यवस्थितपणा करून तू तुझा एकछत्री वगैरे अंमल प्रस्थापित करायला जातोस. ते कळत असेल, नकळत असेल. स्वत:चा कंट्रोल वगैरे समोरच्या कामावर प्रस्थापित करून सत्ता वगैरे मिळवल्याच्या आनंदात रहायला जातोस. पण जगात तुझ्या अंमलाबाहेरचंच खूप असतं. ते तुझ्या जराश्या किंवा चांगल्याच अव्यवस्थितपणात मिसळलं तर तू करत असलेल्या कामाला वेगळंच डायमेन्शन नाही का मिळणार? ते तू मिळवणार की व्यवस्थितपणाला बांधून घेऊन अंतिमत: कंटाळ्याचा सोबती होत रहाणार?
हे च्यायला चांगलंच गर्रकन फिरलंय की बाप्पा! मी स्वत:शी म्हणालो.
मग काय करतोस?... तो क्रांतिकारी की कसला तो कोपरा आता हात धुवून मागे लागलाय...    
          

Friday, December 30, 2011

अलविदा २०११! स्वागत २०१२!

२०११ असं गेलं, तसं गेलं अशा चर्चा सगळीकडेच चालू झाल्या आहेत. २०१२! आणखी एक वर्ष उंबरठ्यावर येऊन ठेपलंय! ते कसं जाईल, काय होईल याचा उहापोहही आत्ताच सुरू झालाय! त्यामुळे आपण अनेक भावनांवर स्वार होत, वर खाली होणार्‍या पाळण्यांची मजा घेणार!
३१ डिसेंबरची मजा १ जानेवारीपर्यंत लुटणार! मग कधीतरी दैनंदिन रहाटगाडग्यात रूजू होणार! 
येणारं नववर्ष २०१२ आपणा सर्वांना सुखसमृद्धीचे जावो! आपल्या सगळ्या अपेक्षा सफळ संपूर्ण होवोत!
                                            आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा!