romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, October 25, 2008

आर्त_“मुक्तसंवाद” दिवाळी’०८ अंक_माझ्या कथेचा काही भाग…

चला बाई!…आज एवढ्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची…यथासांग सगळं पार पडतंय!शेजारणी चिडवत होत्या सारख्या…मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे!...मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख!...मग मागितलेलं मिळालं म्हटल्यावर व्रताचं उद्यापन…त्याच्या ह्या जेवणावळी.जास्तीत जास्त माणूस जेवून जायला हवं!...काही कमी पडता उपयोगी नाही!महादेवानं काही कमी पडू दिलं नाहीये मग-

माई कुणी बैरागी आलेत दारावर.ते-

अगं, बोलाव, बोलाव नं त्याना आत!दारात कशाला तिष्ठवलंस?बोलाव!

माई ते आधी तुम्हाला भेटायचं म्हणतात

मला... बरं… हे घे!हे पात्र आत देऊन ये बरं तू!

दारात दोन बैरागी.एक प्रौढ, पांढऱ्या मिश्या, पांढऱ्या जटा, दोन्ही वयापेक्षा लवकरच पिकलेल्या.कपाळावर भस्माचे पट्टे.गंधसुध्दा.नजर, रागीट, आडमुठी.दुसरा पोरगेलासा.तो हसला.निरागस.हसणं तसंच चेहेऱ्यावर, त्यामुळे वेडगळ वाटणारं.चेहेऱ्यावर सतत वाहणारा घाम.तो म्हणाला, बाई, माई, ताई, आई-भिक्षा! आणी स्वत:च ठसका बसल्यासारखा हसला.आभिप्रायार्थ बरोबरच्या प्रौढ बैराग्याकडे नजर टाकली.प्रौढ तसाच एकटक, निर्विकार, ऑलप्रूफ नजर.कोऱ्या कापडाच्या चिध्यांसारखा फाटत जाणारा त्याचा स्वर, आम्हाला हवी ती भिक्षा मिळेल?

महाराज, आज घरात काही कमी नाही! आज महाव्रताची सांगता-

बाई पुन्हा विचारतोय, आम्हाला हवी ती भिक्षा-

जरूर महाराज, आज्ञा व्हावी!

मुसळ आणा!

महाराज, मु-

उखळ कुठे आहे?

महा-हे काय…चलावं…स्वयंपाकगृहाकडे चलावं!

दुसरा, तो तरूण बैरागी हसतोय तसाच-मघासारखा.त्याच्याकडे पाहिल्यावर ‘तुम्हाला काही कळणार नाहीगंमत आहे आमची!’ अश्या अर्थाचं हसणं…पांचट… ह्या बैराग्याना काय हवंय?...

चल रे, चल स्वैपाकघरात!

बाईऽऽऽमाझ्या मुलाला नेतोय हा आत?स्वयंपाकघरात?...आई गंऽऽऽत्या हसणाऱ्या, घामेजलेल्या तरूण बैराग्याने माझ्या मुलाला उचललंय आणि-आणि-आणि-

ती जागी झाली.धडपडतच.तो पत्र्याच्या खुर्चीत बसलाय.तांब्याच्या मोठ्या भांड्यातून पाणी पितोय.तिच्याकडे बघून हसला.हसणं कमीच.कुणाची फजिती झाली तरच.एरवी…घाईघाईत तिनं सगळं उरकलं.तशीच मोरीत शिरली.दरवाजा लावला.थंडगार पाणी रोजच्यासारखं डोक्यावर ओतून घेतल्यावरच ती तयार झाली-दिनक्रमासाठी…आंघोळबिंघोळ आटपून त्याचंही सुरू झालेलं साग्रसंगीत…ठाण मांडून…खोलीच्या मध्यभागीच…लोकरी आसनावर…अरविंद माहोम…अथम सोमो कृतम सोमो…सोमाय नम:… मैत्र मैत्र वान भवती…मैत्र मैत्र…    

Tuesday, October 21, 2008

माझं आजोळचं घर

आपण अगदी लहान असतानाच्या आपल्या स्मृती तीव्र असतात.मी आता राहतो त्या घराचा कोपरा न कोपरा एकांतात बसून आठवायला गेलो तर मला कण न कण आठवेलंच याची खात्री नाही पण माझ्या लहानपणातलं माझं आजोळचं घर मी आजही खडानखडा सांगू शकतो.कोल्हापूर हे तेव्हा गावात जमा होतं.घरात वीज आली नव्हती.कंदील, चिमण्या असा सगळा प्रकार होता.स्वयंपाकघरात चूल होती, तिला लाकडाचं जळण लागे, गोवरय़ाही लागत.पाणी तापवायचा तांब्याचा बंब होता त्यातही लाकडी ढलप्या, शेण्या, भुईमुगाच्या शेंगांची फोलं सारावी लागत.पहाटे परसातल्या एका पत्र्यावर थाप मारून बाप्या गवळी आजीला आवाज देई. होय, तोच म्हशीचं ताजं, धारोष्ण दूध त्याच्या कासंडीतून किंवा थेट तुम्ही दिलेलं भांडं म्हशीच्या आचळांना लाऊन तुम्हाला दूध घालत असे.जो आता कुठल्यातरी कॉर्नरवर प्रदर्शनात मांडल्यासारखा दिसतो.वाडा म्हणवल्या जाणाऱ्या पण तितक्या भव्य नसलेल्या एका वास्तूत आजोळचं बिऱ्हाड होतं.लाकडी रंगहीन दाराची चौकट.एका दरवाज्यावर तीन लोखंडी लंबगोल आकाराच्या कड्यांची साखळी.दरवाजा हलला की खळ्ळ असा आवाज करणारी.दरवाज्यावरच्या आडव्या पट्ट्यांवर पितळी बिल्ले ठोकलेले.दरवाजा आतून बंद केल्यावर त्याला सुरक्षिततेसाठी भला मोठा आडवा लाकडी अडणा खांदा लाऊन उजवीकडून डावीकडे सरकवायला लागणारा.मग सोपा.त्यावर कायम आजोबांचं बस्तान.त्यांचा पाठ टेकून बसायचा तक्क्या.समोर उतरतं शिशवी लाकडाचं डेस्क, लिखाणासाठी.कोपऱ्यावरच्या खुंटीवर त्यांचा डोक्यावरून काढलेला आणि तसाच वर्तुळाकार आकार असलेला स्वछं पांढरा रूमाल.त्याखाली त्यांचा कॉटनचा कोट.गुढघे पुढ्यात उभे ठेऊन, तक्क्याला टेकून बसलेले आणि जाजमावर दोन्ही हातांचे तळवे फिरवत, थापटत स्तोत्र म्हणत, गुणगुणत विसावलेले आजोबा-दादा.त्यांची पांघरायची हिरवी जाड लोकरीची ढाबळी.तशीच आणखी एक लाल रंगाची ढाबळी माझ्या अंगावर घालून मला त्यांच्याशेजारी झोपवणारे.झोपवण्याआधी सज्जन माणसाघरचा पोपट आणि दुर्जनाघरचा पोपट ही गोष्टं.संस्कारांचं महत्व सांगणारी.(याबरोबरच धर्म हा मुद्दा इथूनच मनावर ठसवणारी) दादांनी स्वत:च्या, माझ्या डोक्यावर चोळून चोळून लावलेलं स्वस्तिक हेअर ऑईल.लालभडक रंगाचं,उग्र सुगंध असलेलं,मोठ्या लाटांसारख्या नक्षीच्या बाटलीतलं.त्यावेळचा माझा एक लाल कोट आठवतो.कोटाच्या तळाशी दोन खिशे.त्यावर पोपट विणलेले.रात्री कंदील लाऊन समोर बसलं की सारवलेल्या भिंतींवर स्वत:चीच मोठी दिसणारी,घाबरवणारी सावली.शेणाने सारवलेल्या स्वच्छं सपाट भिंती.सोप्याची जमिनही अधून मधून, फोफडे निघताहेत असं दिसलं की सारवून घेतलेली.सारवायची बहुतेकवेळा आजीनंच.अख्खं घरच सारवायचं.दारासमोर सपाट, नंतर एक लेव्हल असलेला भला मोठा सोपा.त्यानंतरचं काळोखी माजघर, नंतरचं स्वैपाकघर.मागचं परसदार.सोप्यालगतच्या लाकडी जिन्याने वर गेल्यावर लागणारी तीन खणांची माडी.हे भाड्याचं घर!... बहुदा आजीनंच,कुणाची न कुणाची मदत घेऊन शेणानं सारवायचं… अनेकजण अजूनही गावांमधून अश्या वातावरणात रहात असतील.माझं पुढचं सगळं आयुष्य महानगरात गेलं.दोन्ही वातावरणांमधली तफावत सतत चांगलीच जाणवत रहाणारी…     

Sunday, October 5, 2008

देवीचं दर्शन

रामाचं देऊळ, रामाच्या सोप्यावरचे पुराणिकबुवा आणि श्रोते, समोरचा पार, कार्तिकेयाचं देऊळ, त्यानंतरची देवळांची रांग, घाटी दरवाजा, त्या बाहेरचा परिसर हे सगळं हिंडत, अनुभवत असताना लक्ष असायचं त्या संकुलाच्या मध्यभागी.रामाचं देऊळ ते घाटी दरवाजा हा त्या संकुल परिसराचा अगदी छोटासा भाग.संकुलालाच चार दरवाजे, म्हणजेच कमानी.मध्यभागी असलेल्या अंबाबाईच्या देवळामुळे हे ठिकाण ओळखलं जातं.संकुल वगैरे हा अलिकडचा शब्द.अंबाईला (मधला एक बा सायलंट) जाऊन यितो- हा स्थानिक सार्वजनिक उदगार.दिवस सुरू झाल्यानंतरचा.माझ्या आजोळातलं पहिलं घर महाद्वार रोडच्या वांगाया बॉळात.(स्थानिक बोलण्यात च्या मधला च सायलंट आणि बो चा बॉ झालेला) त्यामुळे महाद्वारातून येताना, गुलछडी, मोगरा, सोनचाफा अश्या फुलांचे वास घेत असतानाच टाचा ऊ-ऊंचाऊन देवीचं थेट दर्शन.भक्तांना साक्षात्कारासारखा अनुभव देणारी देवळाची रचना.संक्रातीला देवीच्या चेहेरय़ावर उन्हाची तिरीप पडते तेव्हा किरणोत्सव.अशी देवळाची रचना प्राचीन काळी कशी साधली असेल?... महाद्वारातून दर्शन झाल्यावर लगेच आत जायची ओढ.मुलांना गरूड मंडपात जायची ओढ.गरूड मंडपात पळापळीसारखे खेळ.याच गरूड मंडपात निजामपुरकरबुवा(थोरले, धाकले), वठारकरबुवा यांचे किर्तन सप्ताह.मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी गेल्यावर नुसता घरी काय बसून रहातोस म्हणून आजीनं या सप्ताहांना लहानपणी ढकलून पाठवलेलं.हे सगळं आठवलं ’शब्दछटा’ हा आपल्याच लिखाणावरचा एकपात्री कार्यक्रम करण्याची योजना आखल्याचं धाडस केलं आणि लोकसत्तामधे त्याबद्दल राईटअप आला त्या दिवशी मी नेमका देवळात आणि मित्राचा फोन… पुराण, प्रवचनं ऐकणं, किर्तन ऐकणं हे सगळं नंतर आयुष्यात आलेल्या नाटक, साहित्य या गोष्टींची पार्श्वभूमी होती.माझ्या आजोळी, आजीच्या रेट्यामुळे ती माझ्यापर्यंत पोहोचली.गरूड मंडपात गाण्याच्या मैफिलीसुध्दा.कोल्हापूर हे कलापूर.नामवंत गायक गरूड मंडपात, देवीच्या समोर, गणपतीच्या पुढ्यात, संगमरवरी कासव आहे त्या देवळात यायच्या पायरय़ांसमोर, आपली उपासना करतात.उपासना.कार्यक्रम नव्हे… पायरय़ा चढल्यावर आधी गणपतीचं दर्शन आणि त्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना, बरोबर गणपतीच्या मागच्या कमानीच्या टोकावर डोकं ठेऊन पुन्हा अंबाबाईचं दर्शन.पुढे येऊन मग “त्या” कासवाला हात लाऊन नमस्कार.(आतापर्यंत हा असा नमस्कार का करायचा हे वडिलधारय़ांनी सांगितलेलं विसरायला झालंय.)हे सगळं करत असताना देवीवरची नजर हटत नाही हा एक चमत्कार.पुन्हा देवळाच्या रचनेतला?... पुढे सरकताना “चला चला” या खाकी कपड्यातल्या पहारेकरी वजा माणसाच्या घश्यात मुसळ घातल्यासारख्या आवाजाबरोबर गाभारय़ाआधीचा अंधार सुरू झालेला.काळ्या शार दगडातले नक्षीदार गार गार स्पर्श असणारे खांब.अखंड रचनाच कशी केली असेल असा अचंबा सतत - या खांबांना जोडणारी आडवी रचना, मुलांना सहज चालता, पळता येईल अशी.वाढता अंधार आणि गाभारा जवळ येतोय.देवीकडेच जायचं.पण मधेच डाव्या, उजव्या बाजूच्या सरस्वती, महाकाली या दोघींचं दर्शन अनिवार्य.त्यापैकी एकिकडे जाताना मधे श्रीचक्र, जमिनीवरच्या काळ्या दगडात कोरलेला यंत्राचा चौकोन.त्यावर सततचा अभिषेक.यंत्राच्या नक्षीत जमून राहिलेलं पाणी, दूध, फुलं, तांदूळ.त्यातलं उजव्या हाताच्या अनामिकेच्या टोकाला लागून जे येईल ते नाकाच्या वर आणि दोन्ही डोळ्यांच्या मधे असलेल्या खड्ड्याला लावायचं.सरस्वती, महाकाली यांच्या काळ्याशार, रोखून बघतील असे डोळे असणारय़ा मूर्ती.त्यांचं दर्शन झाल्यावर अंधारात पुन्हा अंबाबाईच्या गाभारय़ाजवळ,तिथे जय आणि विजय हे -राक्षस (इति: वडीलधारे) भीती दाखवणारे.त्यांचा एक एक हात समोर पसरल्यासारखा. प्रवेश करताना आडवा, जाडजूड, लांबलचक, खाली न बघता ओलांडताच न देणारा सोनियाचा उंबरा!तिथून जोरदार घंटानाद करून आत आल्यावर देवी आणि फक्त देवी!तिचं मनसोक्त दर्शन.पुन्हा चला चला चा मुसळ घातलेला जोरदार गजर, फुर्रर्रर्र शिट्या.अंबाबाईचा त्यावेळी चांगलाच भीतीदायक वाटणारा, न संपणारा प्रदक्षिणामार्ग.तो सुरू होतानाच येणारा अंगारय़ाचा भाजका, लगेच तोंडात टाकावा असा वाटणारा वास सर्वत्रं.वाटेत भींतींवर लिहिलेलं महालक्ष्मीस्तोत्रं.कुंकवानं भरलेल्या भक्तांच्या डोकं टेकवण्याच्या जागा.प्रदक्षणा कधी पूर्ण झाली कळलंच नाही!तीर्थाची धार उजव्या हाताच्या ओंजळीत.हाताची ओली चिमूट दगडी अंगारापात्रात.मग तीच अनुक्रमे कपाळावर आणि तोंडात.देवीचं दर्शन पूर्ण.परतीची पावलं जड… प्रचंड देवभोळेपणा संस्कारक्षम वयातच बिंबवणारी आपली संस्कृती?... हे माझ्या आयुष्यातल्या श्रींमंत अनुभवांचं एक संचित! माझं आजोळ माझ्या आठवणीत येताना फक्त स्मरणरंजन करत नाही, माझ्या मुळांकडे नेऊन मला विचार करायला लावतं… नवरात्रं सुरू झालं आहे, मला आंबाबाईच्या देवळाचे वेध लागले आहेत…