romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, October 21, 2008

माझं आजोळचं घर

आपण अगदी लहान असतानाच्या आपल्या स्मृती तीव्र असतात.मी आता राहतो त्या घराचा कोपरा न कोपरा एकांतात बसून आठवायला गेलो तर मला कण न कण आठवेलंच याची खात्री नाही पण माझ्या लहानपणातलं माझं आजोळचं घर मी आजही खडानखडा सांगू शकतो.कोल्हापूर हे तेव्हा गावात जमा होतं.घरात वीज आली नव्हती.कंदील, चिमण्या असा सगळा प्रकार होता.स्वयंपाकघरात चूल होती, तिला लाकडाचं जळण लागे, गोवरय़ाही लागत.पाणी तापवायचा तांब्याचा बंब होता त्यातही लाकडी ढलप्या, शेण्या, भुईमुगाच्या शेंगांची फोलं सारावी लागत.पहाटे परसातल्या एका पत्र्यावर थाप मारून बाप्या गवळी आजीला आवाज देई. होय, तोच म्हशीचं ताजं, धारोष्ण दूध त्याच्या कासंडीतून किंवा थेट तुम्ही दिलेलं भांडं म्हशीच्या आचळांना लाऊन तुम्हाला दूध घालत असे.जो आता कुठल्यातरी कॉर्नरवर प्रदर्शनात मांडल्यासारखा दिसतो.वाडा म्हणवल्या जाणाऱ्या पण तितक्या भव्य नसलेल्या एका वास्तूत आजोळचं बिऱ्हाड होतं.लाकडी रंगहीन दाराची चौकट.एका दरवाज्यावर तीन लोखंडी लंबगोल आकाराच्या कड्यांची साखळी.दरवाजा हलला की खळ्ळ असा आवाज करणारी.दरवाज्यावरच्या आडव्या पट्ट्यांवर पितळी बिल्ले ठोकलेले.दरवाजा आतून बंद केल्यावर त्याला सुरक्षिततेसाठी भला मोठा आडवा लाकडी अडणा खांदा लाऊन उजवीकडून डावीकडे सरकवायला लागणारा.मग सोपा.त्यावर कायम आजोबांचं बस्तान.त्यांचा पाठ टेकून बसायचा तक्क्या.समोर उतरतं शिशवी लाकडाचं डेस्क, लिखाणासाठी.कोपऱ्यावरच्या खुंटीवर त्यांचा डोक्यावरून काढलेला आणि तसाच वर्तुळाकार आकार असलेला स्वछं पांढरा रूमाल.त्याखाली त्यांचा कॉटनचा कोट.गुढघे पुढ्यात उभे ठेऊन, तक्क्याला टेकून बसलेले आणि जाजमावर दोन्ही हातांचे तळवे फिरवत, थापटत स्तोत्र म्हणत, गुणगुणत विसावलेले आजोबा-दादा.त्यांची पांघरायची हिरवी जाड लोकरीची ढाबळी.तशीच आणखी एक लाल रंगाची ढाबळी माझ्या अंगावर घालून मला त्यांच्याशेजारी झोपवणारे.झोपवण्याआधी सज्जन माणसाघरचा पोपट आणि दुर्जनाघरचा पोपट ही गोष्टं.संस्कारांचं महत्व सांगणारी.(याबरोबरच धर्म हा मुद्दा इथूनच मनावर ठसवणारी) दादांनी स्वत:च्या, माझ्या डोक्यावर चोळून चोळून लावलेलं स्वस्तिक हेअर ऑईल.लालभडक रंगाचं,उग्र सुगंध असलेलं,मोठ्या लाटांसारख्या नक्षीच्या बाटलीतलं.त्यावेळचा माझा एक लाल कोट आठवतो.कोटाच्या तळाशी दोन खिशे.त्यावर पोपट विणलेले.रात्री कंदील लाऊन समोर बसलं की सारवलेल्या भिंतींवर स्वत:चीच मोठी दिसणारी,घाबरवणारी सावली.शेणाने सारवलेल्या स्वच्छं सपाट भिंती.सोप्याची जमिनही अधून मधून, फोफडे निघताहेत असं दिसलं की सारवून घेतलेली.सारवायची बहुतेकवेळा आजीनंच.अख्खं घरच सारवायचं.दारासमोर सपाट, नंतर एक लेव्हल असलेला भला मोठा सोपा.त्यानंतरचं काळोखी माजघर, नंतरचं स्वैपाकघर.मागचं परसदार.सोप्यालगतच्या लाकडी जिन्याने वर गेल्यावर लागणारी तीन खणांची माडी.हे भाड्याचं घर!... बहुदा आजीनंच,कुणाची न कुणाची मदत घेऊन शेणानं सारवायचं… अनेकजण अजूनही गावांमधून अश्या वातावरणात रहात असतील.माझं पुढचं सगळं आयुष्य महानगरात गेलं.दोन्ही वातावरणांमधली तफावत सतत चांगलीच जाणवत रहाणारी…     

Post a Comment