romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, August 5, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१४)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १०, भाग ११,   भाग १२,  भाग १३ आणि त्यानंतर...
सकाळचे दहा वगैरे वाजलेत. रिकामजी तिरूपती कडले यांची सकाळची गस्त चालू आहे. हातात रंगीबेरंगी वेष्टन असलेली वेताची छडी घेऊन. मागे त्यांच्या घरात, घराचाच एक भाग असलेल्या पाळणाघरात नेहेमीप्रमाणे नुसता कोलाहल चाललाय. कडले चिंतेत दिसताएत. त्यांना पाळणाघरातला कोलाहल असह्य होतो आणि नेहेमीप्रमाणे ते स्वत;शीच बोलू लागतात.
"अरे बाबांनोऽ शांत व्हा शांत व्हा... अरे- शांत व्हा म्हणतोय मी तर तुम्ही जास्तच ओरडताय!.. शांतपणे.. गस्त तरी घालू द्याल की नाहीऽ या गुप्तहेरालाऽऽ... तुम्ही जमता त्या घराचा मालक आहे रे मीऽऽ  अर्‍ये चिमण्यांनोऽऽऽ- नाही मी त्यांच्यासारखं परत फिरा रे- नाही म्हणणार. फिरा कुठे वाट्टेल तिथे फिरा. पण गपचूप फिराऽ अं?- हां हां! कडले! आता कसं? हे वेगळं झालं तुमचं.. इतरांपेक्षा.. हं! वेगळे आहातच तुम्ही कडले! या कॉलनीलतला सर्वोत्कृष्ट गुप्तहेर म्हणून मानांकन झालंय तुमचं! मानांकन की नामांकन?- त्येच त्ये काय त्ये! ते झालंय! शी चॅनलवर! शी! शी!.. अं हं! अगदीच शी नाहीए तो चॅनल! शेरलॉक होम्स इंटरॅशनल- SHI- होय! हा हा! शी! शी! शी! आणि नॉमिनेशनही काही पपलू नाहीए. केवढी स्पर्धा होती. कॉम्पिटिशन होती कटथ्रोट- गुरख्यांची, भैयांची, आंडुपांडूंची. आंडूपांडू म्हणजे तसले नव्हेत- खात्यातले! खात्यातले! खा त्यातले- ह्या त्यातले- मरिनड्राईववरचे, सहार विमानतळावरचे, सगळेच- दया, प्रदीप, राजेश, सचिन, लोहार, सिंग- सगळेच! स ग ळे च! तरीही मला मानांकन! तेच ते काय ते नामांकन!... तर ते असो!"
कडले अचानक बुबुळं डोळ्याच्या एका कोपर्‍यात वर फिरवतात आनि चेहेर्‍यावर गूढ भाव आणायचा प्रयत्न करू लागतात.
"प्रसंग बाका आहे... हा काका इथे आहे- कडलेकाका- म्हणून ठीक! नाहीतर रात्र वैर्‍याची असूनही.. राज्या झोपलेला का? झोपलेला का? का? का? डाव्या तळहातावर उजव्या हाताची मूठ आपटून आपटून डावा हात पार कामातून गेला माझा, पण अजून हा झोपलेला का? का? का- ऑं??????"
कडलेंचा वासलेला आऽऽ तसाच रहातो. वसाहतीच्या आवारात महेश दाखल झालाय. ओळखू येऊ नये इतका बदललेला. त्याचे हात पाय ताठ झाल्यासारखे हलताएत. केस एखाद्या ऍंटिना समूहासारखे उभे राहिलेत. डोळे आणि डोळ्यांच्या कडा लालेलाल. तो कडलेंना ओलांडून सरळ पुढे आपल्या घराच्या दिशेने चालू पडतो. कडले तो दिसल्यापासून वा वाकून त्याच्याकडे पहाणारे. तो समोरून पुढे निघून जाताच धडपडतात.
"अरे असा काय हा? म-महेऽऽश! एऽमहेऽशऽऽ"
कडले महेशला वेगवेगळ्या प्रकारे हाका मारत त्याच्या मागून धावताएत पण महेशवर त्याचा काहीही परिणाम नाही. मग ते त्याला हात लावतात. हात लावल्याबरोबर महेशची दिशा बदलते. त्याचा मार्ग बदलतो. महेशचे डोळे तसेच सताड उघडे. कडले हात लावताताएत. महेशचा मार्ग बदलतोय. कडलेंना आता ह्या खेळाची मजा वाटू लागलीए. ते अरे- अरे- करत त्याच्यामागोमाग गोल गोल फिरताएत. शेवटी महेश कंटाळतो. त्याचा चेहेरा सारखं फिरून फिरून वेडावाकडा झालाय. तो अचानक यंत्रमानवासारखे तुटक तुटक उच्चार करत ओरडू लागतो.
"येऽऽ कोण आहे रे तो गद्धा? का मला फिरव- फिरव-" चिडून स्वत:च गोल गोल फिरू लागतो.
"अरे! हा बोलतो सुद्धा! थांब! थांब! थांब..." कडलेही त्याच्याबरोबर फिरू लागलेत. मग चपळाईने त्याच्या कपाळावर आपल्या उजव्या हाताची तर्जनी खुपसतात. तो थांबतो. कडले स्वत:च्या या अद्भुत शोधाने स्वत:च आश्चर्यचकित होतात. त्यावेळचा त्यांचा चेहेरा खरंच पहाण्यासारखा असतो पण आता आपला नायक महेश तो बघण्याच्या परिस्थितीत नाही. तो थांबतो. अचानक थांबायला लागल्यामुळे जागच्याजागी डोलू लागतो.
"येस! येस्स! यंत्रमानव झालाय तुझा महेशाऽऽ यंत्रमानव! होय ना? होय ना मित्रा? होय ना रे? बोल ना रे गुलामा? यंत्रमानवा! हा तंत्रमानव तुला साद घालतोय- थांब! थांब! जाऊ नको लांब!- तुझं तंत्र आता मला व्यवस्थित कळलंय! थांब माझ्या उजव्या हाताचं हेच बोट आता तुझ्या हनुवटीवर मारतो... हं! हा हा! हाआऽऽ येस्स्स! कशामुळे? बोल बोल रोबोमहेश! हे कशामुळे?ऽऽऽ"
"अन्नाड्या! कळत नाही?ऽऽ झोपेमुळे हे झोपेमुळे!!!"
"झोपेमुळे? की झोप न मिळाल्यामुळे???" तरीही कडलेंचे विनोद चालूच आहेत.
"तेच ते रे गद्ध्या! तेच ते!"
कडले उलटे वाकतात, "इतकं???"
महेश हातपाय हलवण्याचे निरर्थक प्रयत्न करतो.
"मग? तुला काय हे सोंग वाटलं?" 
कडले सराईत गुप्तहेराच्या उत्सुकतेने त्याचे हात, पाय, केस, डोळे न्याहाळू लागतात.
"होऽहोऽहोहोऽऽ ताठ झालंय की रे सगळं शरीऽऽर-"
"नाही! फक्त हात, पाय, केस आणि डोळेच!"
महेश पुन्हा ताठ झालेलं शरीर हलवण्याच्या प्रयत्नात.
कडल्यांना प्रेमाचं अतिरिक्त भरतं आलंय, "असू दे! असू दे!"
महेशचा आता अगदी तिळपापड झालाय, "काय असू दे? शुंभा.. बेरडा.. बेकल्या-"
कडले चतूर आहेत. गुप्तहेर तर ते आहेतच. ते आता टचकन महेशच्या त्याच त्या हनुवटीखाली आपलं तेच ते बोट मारतात. महेश चूप होतो आणि कासावीसही होतो.
"हंऽऽऽ हमसे पंगा लेताय? लेताय? अर्‍ये बाबाऽऽ तुमारा हनबटीका राज हमकू बराब्बर मालुमाय!.. अरे पण माज्या राज्या झोप नसल्यामुळे हे असं, एवढं होऊ शकतं? होऊ शकतं माज्या राज्या? हाऊ होऊ शकतं टेल मी!- अरे -अरे- हो-" लक्षात येऊन महेशच्या हनुवटीखाली पुन्हा बोट मारतात. महेश लगेच बोलू लागतो- नव्हे ओरडतोच.
"मूर्ख माणसा!ऽऽऽ डोळे उघडे ठेवून तू तरी बघ सगळीकडे! आख्ख्या कॉलसेंटर्सना लागलाय हा रोग!"
कडले विस्मयचकित होत, "ताठ होण्याचा?"
"होय रे होय!"
"मग यावर उपाय काय?"
"गाढवाऽ डुकराऽ कोण आहेस तरी कोण तू?ऽऽ हे तू मला विचारतोएस? मला?" अचानक रडू लागतो, "अरे मला माहित असतं तर सकाळपासून असे धक्के खात गावभर फिरलो असतो का रे मी?ऽऽऽऽ"
"टाईट होऊन?"
"अरे कोण टाईट झालाय इथे?ऽऽऽ गेंड्याऽऽ इथे रात्रंदिवस झोपत नाहिए मीऽऽ माझ्या मुलांना सांभाळायची ड्यूटी करायची आणि ऑफिसची ड्यूटी पण करायची म्हणूऽऽन हे असं झालंय माझंऽऽ तू काय रे मला- काय तू- मी- मी- माझ्या घरी- मला-"
प्रचंड संतापल्यामुळे महेशच्या तोंडातून कॅसेट अडकल्यावर जसे कचकचणारे आवाज यायचे तसे येऊ लागलेत. आता या आवाजांचं काय करायचं यावर कडले आपलं शरीर वेगवेगळ्या दिशांना हलवून हलवून विचार करताएत. शेवटी आठवून आठवून त्याच त्या त्याच्या हनुवटीखाली आपलं तेच ते बोट दाबतात. आवाज थांबतो. महेशची लुळी पडलेली जीभ आत जाते. महेश जागच्या जागी स्थिर.
"आं! हां रेऽऽ हां! बराच लोच्या झालाय रे! कसा होतास तू! काय झालास तू! अरे वेड्या असा कसा वाया गेलास- जाऊदे कडले! ही गाणं म्हणायची वेळ नाही!.. यावर उपाय काऽऽऽय?... उपा..य.. उ..पाय.. हां! झोप! झोप हाच यावर सोपा आणि जालिम उपाय! व्वा कडले व्वा! वाह व्वा! यू आर ग्रेट! तुस्सी ग्रेट हो पापाजी! थांब! आता जरा माझा चेहेरा, डोळे गूढ करतो.. हं हं हं! आता तुला घरी सोडतो.. तू झोप.. गाढ झोपलास तरी काही काळजी नाही.. तुझं रहस्य कळलंय आता मला! हा‍ऽहाऽहाऽहाऽऽऽ तुझ्या हनुवटीखालचं आणि वरचं बटण... येस्स! आय नो इट! आय गॉट ईट माय लव! आय गॉट इट! शी चॅनलवालोऽऽऽ निगा रख्खोऽऽ हुश्शाऽऽरऽऽ हाहाहाहाऽऽऽऽ.... व्वा वा! वाहव्वा कडले वाहव्वा! हसलात! पण खोकला नाहीत!- आता हा ठोकळा!... घरी पोचवायचा! हं चलरे ठोकळ्या टुणूक टुणूक! चल! चऽऽल!- अरे हो! आता दोन्ही बटणं दाबावी लागतील कडले! हनुवटीखालचं आणि वरचंही!.. हा हा हा.. टांग- टुंग!"
दोन्ही बटणं दाबल्याबरोब्बर महेश जोसात येऊन बडबडू लागतो, हालचाली करू लागतो, चालू लागतो. कडलेंची एकच तारांबळ उडते. महेश प्रचंड करवादलाय. त्याला शिव्याही सुचत नाहीएत. 
"अरे भ- अरे म- सा- आ- घोड्याऽऽ तुझे व्हरायटी एंटरटेनमेंट प्रोग्रॅम्स संपले असतील तर मला माझ्या घरी सोड! सोड! सोड रे!ऽऽ पापाजी.. कडल्या.. निमाचा पोपट.. टांग-टुंग करतोय!- माझा जीव चाल्लाय इथे-"
कडलेंना महेशच्या थयथयाटामुळे त्याच्या कपाळावर, हनुवटीखाली कुठेच बोट टेकवता येत नाहीए. महेशचं चालूच, "थांब सरळ होऊ दे एकदा मला! मग बघतो तुला! चोर! पाजी! डाकू! पुढारी! राजकारणी! मंत्री-"
शेवटी कडले कसेबसे महेशच्या हनुवटीखाली दाबतात. चपळाईने त्याला दिशा देऊन त्याला त्याच्या घराच्या दिशेने मार्गस्थ करतात. मग घाम पुसू लागतात.

"ये कडल्या भी किसी कच्च्या गुरूका चेला नय महेशराऽव... झोपर्‍या महेश. रोब्या महेश. ताठक्या महेश. उभा महेश. आडवा महेश... हा हा हा हा... स्वत:वर जास्त खूष होऊ नका कडले... पण पण.. त्या गावातल्या मारूतींसारखं झालंय रे तुझं महेश! अरे चल! चाऽल! तुझी सगळी बटणं आता माझ्या हातात आहेत! जा! जाऊन झोप! हा कडल्या आहेच नजर ठेवायला बाहेर आणि आत.. आत.. हा हा हा हा..स्वत:च बघ आत कोण आहे त्येऽऽ टांग- टुंग!!!"  घराची डोअरबेल आणि महेशच्या हनुवटीखालची कळ जोरात दाबतात आणि पायर्‍या उतरून यशस्वी गुप्तहेराच्या चपळाईने घराच्या आडोश्याला येऊन दबा धरून बसतात.
डोअरबेलचा आवाज ऐकून महेशच्या घरात असलेली टी मंजू कडेवरच्या अवनीला थोपटत बेडरूममधून बाहेर येते आणि दार उघडू लागते...                                                              (क्रमश:)