romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label नृत्य. Show all posts
Showing posts with label नृत्य. Show all posts

Tuesday, October 29, 2013

अभिलेखच्या नाट्यविषयक उपक्रमातलं दुसरं पुष्प...

"अभिलेख" वर मनापासून भेट देणार्‍या माझ्या मित्रमैत्रिणींनो!
दिवाळी अगदी काही दिवसांवरच आली आहे. सण येतात ते आपलं रोजचं तेच ते जगणं सुसह्य करण्यासाठी. ते आपण जबाबदारीने आणि तरीही पूर्ण आनंदात साजरे करायचे असतात...
तेव्हा सर्वप्रथम ही दिवाळी तुम्हा सर्व सर्व नेटकरांना परम आनंदाची जावो अशा मन:पूर्वक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद! तुम्ही दिलेल्या पाठबळामुळेच "अभिलेख" आजवर इतकी मजल मारु शकलं आहे....
सहचरहो! गेल्या वर्षीपासून "अभिलेख" चे नाट्यविषयक उपक्रमही चालू झाल्याचे आपण सर्वजण जाणताच.
"कन्या" या दीर्घांकाने (एक तासाचा नाट्यप्रयोग) या नाट्यविषयक उपक्रमाचा शुभारंभ झाला. गेल्या डिसेंबर महिन्यात ज्या दिवशी दिल्ली शहरात ती महाभयानक घटना घडली त्या घटनेआधीच्या संध्याकाळी "कन्या" दीर्घांक अशाच एका युवतीचं वास्तव उभं करत होता...
या दिवाळीनंतरच्या शनिवारी नऊ नोव्हेंबरला, सकाळी अकरा वाजता "अभिलेख" आणखी एक नाट्यविषयक उपक्रम अर्थात पस्तीस मिनिटांची एक एकांकिका "शुभमंगल सावधान!" सादर करत आहे. लेखन, दिग्दर्शन: विनायक पंडित.
हा कार्यक्रम "नृत्यरंग" या कथकनृत्य विषयक संस्थेने आयोजित केला असून संचालिका वरदा पंडित आणि त्यांच्या विद्यार्थिनी कथकनृत्य सादर करणार आहेत.
"कृष्णलीला" हे या कार्यक्रमाचं नाव आणि विषयही कृष्णलीला हाच.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली (पश्चिम) इथे "कृष्णलीला" सादर होईल. प्रवेशिकामूल्य रु.२००/- आणि रु. १५०/- ...
आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण... आपल्या शुभेच्छा आहेत म्हणूनच आम्ही "कृष्णलीला" सादर करत आहोत...
पुन्हा एकदा आपणा सगळ्याना मनापासून धन्यवाद!

Thursday, March 1, 2012

'झुलवा' चा प्रवास...

’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक! या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड  झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, प्रसिद्ध जर्मन नाट्य दिग्दर्शक फ्रीत्झ बेनिवित्झ- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्‍या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्‍यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!  

माझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही? लोकांनी मला काय काय शिकवलं नाही? एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात  कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्‍या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्‍यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं  बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.  
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला  होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..

      

Tuesday, February 28, 2012

बालनाट्याच्या गावा जावे..

सुरवातीलाच स्पष्ट करतो, जरा गंमत म्हणूनच बघा या प्रकाराकडे. म्हणजे एखादं लहान मूल बघतं ना त्या नजरेने. विषय अर्थातच खूप खूप वर्षापूर्वी सादर केलेल्या बालनाट्याचा आहे. बालनाट्य म्हटलं तरी ते लहान मुलांसाठीचं नाटक म्हणून कमी महत्वाचं मानता येत नाही हे मलाही या बालनाट्यात सहभागी होताना समजलं. लहान मुलाना सहज समजावं, त्यांची मस्तपैकी करमणूक व्हावी आणि त्यानंतर त्याना त्यातून काही (शिकायला) मिळावं असा सर्वसाधारण उद्देश या नाटकांमागे असतो. मी ज्या नाटकाबद्दल बोलतोय तो काळ पंचवीस वर्षापूर्वीचा आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आणि त्याही आधी बालनाट्यांची, सकस बालनाट्यांची रेलचेल होती. अनेक मान्यवर लेखक खास मुलांसाठी म्हणून नाटकं लिहित होते. बालांसाठी, बालकुमारांसाठी असे वेगवेगळे विषय असलेली ही नाटकं असत होती. अगदी सहज तोंडावर येणारी नावं म्हणजे रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर ही. इतर अनेक संस्थाही आपापल्या परीने उत्साहानं ही नाटकं करत होत्याच. नाटक क्षेत्राचं आर्थिक गणित एकूण कधीच समाधानकारक राहिलेलं नाही. तेव्हा त्यावेळीही ही मंडळी अशी नाटकं कशी करत असतील त्यांचं त्यानाच माहित! अशा सर्वांना मनापासून सलाम! प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती स्थिती आणि लय अपरिहार्य असते. मी अभिनेता म्हणून वावरत असलेल्या संस्थेचा तो स्थितीचा काळ असावा. मुंबईत तेव्हा एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटकं, राज्य नाट्यस्पर्धा आणि अर्थातच व्यावसायिक नाटकं यांचा एक सशक्त प्रवाह जोमानं वहात होता. अनेक वर्षांनंतर अलिकडच्या काही वर्षांमधे तो पुन्हा नव्या जोमानं, ताकदीनं आलेला दिसतो. त्याचं कौतुक मराठी माणसाला असणारच! त्यानाही सलाम!
कुठल्याही क्षेत्रामधे सतत भर पडत रहाणं आणि ती सशक्त असणं महत्वाचं असतं. रंगभूमीच्या बाबतीत एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक आणि हौशी नाटकं त्यानंतर व्यावसायिक नाटकं असा प्रवास सर्व रंगकर्मींच्या मनात सर्वसाधारणपणे असतोच. आमच्या संस्थेने थोडसं पुढचं पाऊल टाकायचं असं ठरवून ’इंद्रधनूच्या गावा’ हे बालनाट्य सादर करायचं ठरवलं आणि एक आख्खं नाटक करायला मिळणार म्हणून आम्ही आनंदित झालो नाही तरच नवल. त्याच्या वर्तमानपत्रात आलेल्या अभिप्रायांची कात्रणं या पोस्टमधे दिसताएत. एका विशिष्ट जागी संस्थेच्या नाटक- एकांकिकांच्या तालमी चालायच्या. त्या जागेसमोरचा रस्ता ओलांडला की एक प्रतिथयश वसाहत होती. काही सहकारी जे स्थानिक होते त्यानी त्या वसाहतीतली जवळ जवळ वीस एक मुलं जमवली. त्या सगळ्यांच्या पालकांची परवानगी काढायला सगळा संस्थेतला वर्ग घरोघर गेला. वसाहत मोठी होती आणि मुलं चुणचुणीत होती. सगळी अर्थातच नवीन. संस्थेतले कलाकार आणि ही मुलं अशा संचात हे नाटक बसणार होतं, सादर होणार होतं. परिसराजवळच असलेल्या एका नावाजलेल्या आणि जुन्या शाळेतले एक कलाशिक्षक बालनाट्य प्रकाराशी संबंधित होते. त्यानी हे नाटक लिहिलं.

त्याकाळातलीही ती हुशार मुलं. ज्याना लहान मुलांच्या ’किलबिल’ कार्यक्रमापेक्षा फिल्मी गाण्यांचा ’चित्रहार’ जास्त आवडणारा. ती आवड लक्षात घेऊन सॅंतॉक्लॉज या मुलांना चित्रहारसाठी एकत्र करतो. मुलांना चिऊकाऊची गोष्टं दाखवली जाते. मग शेतकरी मालक, हट्टी मालकीण आणि त्यांची गाय आणि म्हैस यांची गोष्टं. ज्यात नेहेमीच मालकाच्या उलट बोलणार्‍या, कृती करणार्‍या आणि चुकीचं वागणार्‍या हट्टी मालकीणीला  मालक कसा धडा शिकवतो ते दाखवलं जातं. सरतेशेवटी एकलव्याची परंपरागत गोष्टं सांगितली जाते. हुशार मुलांना एकलव्याचा पराभव अजिबात आवडत नाही मग मुलंच एकत्र येऊन ज्युडो-कराटेच्या (हे प्रकार त्यावेळी चांगलेच लोकप्रिय होत होते) सहाय्याने एकलव्याच्या गोष्टीला न्याय देऊन ती दाखवायला लावतात अशी वेगळी थीम या नाटकात बांधली होती. सोबत नाच, गाणी अगदी इंद्रधनू प्रकाशात सादर केली गेली. वयानं मोठ्या कलाकारांपेक्षा लहान मुलंच बाजी मारून जातात असं यावेळीही अर्थातच लक्षात आलंच.
या नाटकात मला मालक मालकीणीच्या गोष्टीत शेतकरी मालकाची भूमिका मिळाली. गावरान बाजाची भाषा लहानपणी कानावर पडलेली असल्यामुळं तो भाग जमला होता. गोष्टं विनोदी ढंगानं सांगितली होती. बोलण्यातून आणि हालचालीतून विनोद कसा व्यक्तं करायचा याचं शिक्षण पहिल्यांदा इथे मिळालं. जेमतेम दोन वर्षाचा अनुभव- मधल्या एक वर्षात आत्यंतिक अडचणीमुळे काहीच करता आलेलं नव्हतं. एक सुन्नपण आणि शून्यत्व आलेलं. या नाटकानं मनस्वास्थ्य सुधारायला मदत झाली. मोठी संधी मिळाली. बरंच नवं शिकायला मिळालं. दिग्दर्शकाबरोबरचं ट्यूनिंग काय असतं याचा अनुभव आला. ग्रामीण माणसाची, शेतकर्‍याची एक विशिष्ट चाल असते. एका तालमीत माझं लक्ष एकाग्र नसावं. ’तू शेतकरी नाहिएस आता, काय झालंय?’ असं दिग्दर्शकानं सांगितल्यावर आपण शेतकर्‍यासारखं चालत नाही आहोत. आताची आपली मोठी मूव्ह तशी झाली नाही हे लक्षात आलं. मग ती चाल चांगलीच लक्षात राहिली. बाकी, गाय आणि म्हैस (मानवी कलाकारांनी सादर केलेल्या) यांच्याबरोबर एक लाईव्ह गाणं काही अस्मादिकांना झेपलं नाही. गाण्याच्या नावानं आनंदच होता आणि नाचवजा हालचाली बर्‍या म्हणाव्यात तर त्यांची गाणं लाईव्ह म्हणण्यामुळं वाट लागत होती. मग ध्वनिमुद्रित गाण्यावर निभवावं लागलं. तेही बर्‍याच अंशी कसबसं निभवलं. सरावानं जमलं. मुंबईतल्या चिखलवाडी गणेशोत्सवाच्या मंचावर मी आधी एन्ट्री घेणार तर माझ्या म्हशीनं मलाच विंगेत ढकलून माझ्या आधी चुकीची एन्ट्री घ्यायचा प्रयत्न केला आणि  मी अक्षरश: पावसाळातल्या त्या चिखलात, स्टेजच्या जवळ, खाली जमिनीवर; पार्श्वभागावर आपटून उलटाच झालो. तसाच कुणीतरी मला हात दिला आणि पार्श्वभाग, टोपी इत्यादीचा चिखल मिरवत पुढचं नाटक निभवलं. कात्रणं तुम्ही बघता आहातच. त्यात फोटोसेशनसाठी पोज देणं आपल्या दृष्टीनं उत्साहाचं असतं आणि बघणार्‍यांच्या दृष्टीनं चांगलं, चांगलंच मनोरंजक असतं.
हे नाटक उभं रहाण्यासाठी संस्थेनं वेगवेगळ्या खाजगी आस्थापनांमधे स्पॉन्सरशिप मागण्याचा प्रयत्न करून पाहिला. पत्रक घेऊन आम्ही कार्यकर्ते अशा आस्थापनांमधे ओळखी काढून प्रयत्न करत राहिलो. प्रतिसाद अल्प आणि प्रयत्न केल्याचं समाधान जास्त असं या बाबतीत नेहेमीसारखं घडलं.
दोन अवांतर गोष्टी या संदर्भातल्या म्हणजे, या नाटकाचे लेखक, चांगल्या ओळखीचे झालेले. गप्पा मारणारे. चांगले हट्टेकट्टे. अगदी तरूण नव्हे पण प्रौढ. मनमिळाऊ. या नाटकानंतर काही काळाने त्याना अचानक दुर्धर आजार झाला. ते इतके बारीक झाले की तुम्हाला काय झालंय म्हणून विचारल्याशिवाय कुणालाच राहवत नसे. सैरभैर झाला बिचारा माणूस. कालांतराने निधन पावला. त्यांची आठवण आज प्रकर्षाने येते.
दुसरं म्हणजे या नाटकात नृत्य, जुडो-कराटे शिकवणारा, मदत करणारा आणि हे सगळं आपला छोटासा व्यवसाय सांभाळून करणारा, त्यावेळी अरे-तुरे करत असू तो; मधे एकदा अचानक पेपरात दिसू लागला. तो खूप मोठा योगी झालाय. त्याचं स्वत:च्या नावाचं फाऊंडेशन आहे. त्या फाऊंडेशनची सेमिनार्स आयोजित होतात. पुरस्कार जाहीर होतात. माणसं कुठल्या कुठे जाऊन पोचतात. इतकी, की हीच ती? असा प्रश्न पडतो. त्यांचा हा प्रवास कसा झाला असेल याची उत्सुकता दाटून रहाते.. असो! खाली आहेत वर दिलेल्या कात्रणांचे संपूर्ण अंश..                                                                            

Friday, May 23, 2008

कथकनृत्य कार्यशाळा

भव्य अलिशान हॉल.चकचकीत.काचेचे दरवाजे असलेला.वातानुकुलित.आत शिरायच्या आधीच काचेच्या दरवाजातून दिसतो दूर पलिकडच्या भिंतीला लागून खाद्यपेयांचा काउंटर.या हॉलमधे एरवी अतिउच्चमध्यम आणि त्यावरच्या वर्गातले रसिक दिसतात.नटले, थटलेले.लगतच्या प्रेक्षागृहात प्रवेश मिळण्याची वाट बघणारे.सेंट,कलोन,अत्तरं यांचा मिश्र वास एखाद्या कनिष्ठ मध्यम नवख्याला बुजवणारा.नवखा कनिष्ठ मध्यम/कनिष्ठ मध्यमा आपली चुळबुळ लपवण्यासाठी मेन/विमेन असं मोठ्या सोनेरी इंग्रजी अक्षरं असलेल्या दरवाजाकडे(आपापल्या प्रकृतीप्रमाणे) वळतात आणि आणखी बुजतात कारण तिथे पुन्हा भला मोठा हॉल, आरसे इ.इ. त्यात बाहेरच्या प्रेक्षागृहात लवकरच कुणातरी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गायक, वादक, नृत्य कलाकार, कलाकारसमुहाचा क्वचितच होणारा एखादा अपूर्व कार्यक्रम बघायला मिळणार असतो.त्या कुणा “कनिष्ठ”चं केवळ भाग्य उजळल्यामुळेच त्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण, तिकीट मिळालेलं असतं किंवा बराचसा आटापिटा करून त्यानं ते मिळवलेलं असतं…
हे असतं एरवीचं चित्र.दरवर्षी मे महिन्यातल्या या दरम्यानच्या आठवड्यात सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात या वेळात कधीही तुम्ही इथे गेलात तर एक वेगळंच दृष्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं!
बाहेरच्या या हॉलमधे निदान शंभर-एक मुली, अपवादानं मुलगे अक्षरश: बागडताना दिसतात.ती नुसती बागडतच नाहीत तर गटागटाने सराव करताना दिसतात.पायांत बांधलेल्या घुंगरांचा आवाज करत, एकमेकाना सूचना देत, गोंधळ करत.त्यांचे पालक(काहीकाहींचे तर दोघेही पालक)त्यांची काळजी घेत त्यांच्यावर डोळे लाऊन असतात.हे पाच दिवस या मुलांना इथे हटकलं जात नाही. कुणीही आलं गेलं तरी दरवाजावर त्याला तिकीट विचारलं जात नाही, फक्त न्याहाळलं जातं.दुपारी ही मुलं आपापल्या गटांचे गोल करून इथेच, याच हॉलच्या लादीवरच डबे उघडून जेवायला बसतात.यात फक्त लहान मुलंच नसतात तरूणी, प्रौढाही असतात.त्याही सराव करतात, एकमेकाला सराव करायला मदत करतात.
मधेच एखादा गट उठतो.घाईघाईत तयारी करतो, पायात घुंगुरं बरोबर बांधली आहेत ना?, आपलं सलवारकमीझ, त्यावर कंबरेला बांधून खांद्यावर घेऊन पुन्हा कमरेला खोचलेला दुपट्टा बरोबर आहे की नाही? हे बघतो आणि फुलपाखराच्या थव्यासारखा प्रेक्षागृहाच्या दरवाजाकडे पळतो.गटातली इंटुकली पिंटुकली मागेच रहातात. उत्साहाच्या भरात प्रेक्षागृहाचे जाड लाकडी दरवाजे आपल्यामागे लावले गेले आहेत का हे कुणीच बघत नाही.दरवाज्यांचा आवाज होतो तरीही शू:शू:व्यतिरिक्त मोठी प्रतिक्रिया आतून ऐकू येत नाही.धावत आत येणाऱ्या गटाबरोबर गोंगाट आत येतोच, आत जर पंडित बिर्जूमहाराजजींची मुलाखत रेकॉर्ड केली जात असेल तर मोठ्या पण दबक्या आवाजात तशी सूचना करून गोंगाटावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो पण तो पाळला जातोच असं नाही.तरीही कुणाला काही शिक्षा वगैरे होत नाही.
रंगमंचावर आधीच कुठल्या तरी गटाचा सराववर्ग चालू असतो.प्रेक्षागृहातल्या खुर्च्यांमधल्या मार्गिकेत एखाद्या वाहिनीचे प्रतिनिधी कॅमेरा, माईक महाराजजींच्या अवतीभोवती सरसाऊन मिळेल ती माहिती घ्यायला आतूर असतात. पण सराववर्गात खंड पडलेला नसतो. रंगमंचावर बिर्जूमहाराजजींच्या ज्येष्ठ शिष्या शाश्वती सेन सराववर्गाकडून ठरवलेला सराव ठोकून ठाकून करून घेत असतात.बोलून बोलून त्यांचा आवाज बसलेला असतो.पण त्यांचं प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असतं.मुलाखत संपवून महाराजजी पहिल्या रांगेतल्या खुर्चीत आपल्या नेहमीच्या आसनावर येऊन बसतात.त्यांचं सतत सर्जन चालू असतं.नवीन तोडे, तुकडे, परण यांची आतषबाजी चालू होते.शिकवलेलं पुन्हा पुन्हा आणखी सफाईदार केलं जातं.मधेच महाराजजी रंगमंचाच्या पायऱ्या चढून वर येतात.त्यांचं करून दाखवणं बघायला सगळे डोळे एकवटतात.महाराजजी करून दाखवतात ते अद्‍भूत असतं.ते पटकन कुणाला जमतंच असं नाही.त्यांच्या ज्येष्ठ शिष्या ते आत्मसात करायला धडपडत असतात.जमतं ते बहुदा शाश्वतीदिदिंनाच आणि मग त्या ते वर्गाला शिकवतात.महाराजजी ते आणखी सोपं करून दाखवताना शारिरिक हालचालींची सोप्या पध्दतीने फोड करून दाखवतात.भाव शिकवण्यासाठी समर्पक, मजेदार उदाहरणं देतात.महाराजजींचं सतत चाललेलं सर्जन, त्यांच गाणं त्यांच्या पंच्याहत्तरीतही केवळ अद्‍भूत असतं.संपूर्ण वातावरण भारून टाकणारा उल्हास सतत त्यांच्यातून बरसत असतो आणि त्याचबरोबर आवश्यक शिस्त शाश्वती सेन घालून देत असतात.
या कार्यशाळेत पूर्णपणे नव्यांना प्रवेश नसतो.ऑडिशन देऊन प्रवेश असतो.किमान चार बॅचेसमधे वर्गवारी केली जाते.शिकायला सुरवात केलेले विद्यार्थी ते आपापल्या ठिकाणी आपापले विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षिका या सगळ्यांसाठी ही कार्यशाळा असते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपासून ते अहमदाबाद, कलकत्ता, दिल्लीपासून शेदोनशे विद्यार्थी तीर्थक्षेत्री जमावं तसे दरवर्षी इथे जमतात. आणि…
हे सगळं नेहरू सेंटर मुंबई या संस्थेनं या विद्यार्थ्यांसाठी “विनामूल्य” ठेवलेलं असतं.ही आपल्या भारतातली गोष्टं आहे! परदेशातली नव्हे!... यासाठी नेहरू सेंटरचे आभार मानावे तेवढे थोडेच.
असे कार्यक्रम जर अश्या संस्थांनी अश्या पध्दतीने राबवले तर त्याला मिळणारा प्रतिसाद इथे ताबडतोब दिसतो.छोट्या छोट्या मुलींनी केलेले पदन्यास, त्यांची या वयातली तयारी बघून माध्यमांच्या भयकारी आक्रमणातूनही आपली कला कशी जोमदारपणे फोफावते आहे ते इथे आल्यावर पटतं.आजुबाजूला काहीच चांगलं चाललेलं नाही असा विचारही अश्या ठिकाणी आल्यावर संपतो.मस्तकं आदरानं झुकतात.