romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, March 1, 2012

'झुलवा' चा प्रवास...

’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक! या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड  झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, पीटर ब्रुक- ज्यानी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाभारताचे प्रयोग केले ते- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्‍या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्‍यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!  

माझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही? लोकांनी मला काय काय शिकवलं नाही? एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात  कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्‍या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्‍यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं  बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.  
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला  होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..

      

2 comments:

mau said...

सुंदर !!!शेअर केल्याबद्दल धन्यवाद !!

Vinayak Pandit said...

स्वागत उमा आणि मन:पूर्वक आभार!