romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, March 21, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (९)

वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ आणि त्यानंतर
अंधार पडलाय. महेश अक्षरश: हवेवर झुलत सोसायटीच्या गेटमधून प्रवेश करतोय. ’फुलों नही समाती’ अशी त्याची हालत आणि त्याला झालेला आनंद! त्याच्या हातात मिठाईचा बॉक्स. सहनिवासाच्या प्रवेशद्वाराजवळच कडले दबा धरून बसल्यासारखे. महेश दिसताच टुणकन उडी मारून पुढे झालेले. महेश घरी जाण्याच्या घाईत. त्यामुळे त्यांची चुकामुक होतेय. महेशला खरंतर चुकामुक व्हायला हवीय. पण कडले ती होऊ देण्याच्या मनस्थितीत नाहीत. कडलेंचं लक्ष महेशच्या हातातल्या मिठाईच्या बॉक्सवर. कडले ऐकणार नाहीत हे समजल्यावर महेशला जागच्या जागी ’जैसे थे’ होणं भाग पडतं. कडले ती संधी साधतातच, "काय?"
महेश दमलेला पण अत्यंत खूष, "काय म्हणजे?"
"म्हणजे झालं काय?"
"मुऽऽलगीऽऽ दुसरी, बेटीऽ धनाची मोऽऽठ्ठीऽ पेटीऽऽ"
कडले अत्यानंदानं महेशला मिठी मारतात, "अभिनंदन!अभिनंदन!"
"ही घ्याऽ बर्फीऽऽ"
कडले बॉक्स घेतात, उघडतात, "ऊंऽऽ म्हणजे सगळ्यांना वाटून उरलेली, एवढीच?"
"कडले काकाऽ मजा कराऽऽ मी दमलोयऽ जाग जागूनऽ जाऊन झोपतोऽ"
"ऊं ऊं ऊं ऊं.."
महेश घरी निघालेला, परत फिरतो. कडलेंजवळ येतो, "हेऽऽ काऽय कडलेकाका! कसलं अवलक्षण?"
"मी रडतोय! कुंऽऽ"
"रडताय? याबेळी? का?.. आणि तुमच्यात हे असं रडतात?" पुढे महेशला ’कुत्र्यासारखं?’ असं विचारायचंय पण समयसूचकता दाखवून तो गप बसतो.
कडले थेट पुन्हा त्याला मिठीच मारतात, "काय करू रेऽऽ तुला दोन दोन! मला एकही नाहीऽहीऽहीऽहीऽ"
"अरे! अरे! अहो पण मी काय करू?"
"आधी सांग मी काय करूऽऽरूऽऽरूऽरूऽ"
"अहो सोडाऽ सोडाऽ.. हीऽही.. पाळणाघरातली सगळी तुमचीच कीऽ"
योगायोगाने त्याचवेळी पाळणाघरातून ’काका मला वाचवा’ च्या तालावर ’काकाऽ काकाऽ मला कडेवर घ्याऽ’ असा कोरस सुरू होतो.
"काकाऽऽ ऐकाऽऽ"
कडले डोळे पुसतात. खूष होत असल्याचा लाऊड अभिनय करत ते जरा जास्तच वेळ तो कोरस मन लाऊन ऐकतात, " आलोऽ आलोऽ रेऽ चिमण्यांनोऽ"
 "कावळा उडाला लगेच!" महेशनं कपाळावर हात मारून घेतलाय.
महेश लॅच उघडून घरात येतो. बेडरूममधे जाऊन आडवा होतो न होतो तोच वसाहतीच्या आवारात अंकित आणि त्याच्या पाठोपाठ शांताबाई आणि उर्मिलाताई एकमेकींच्या हातात एकेक हात अडकवून मार्चिंग करत दाखल झालेत. ही टीम घराजवळ येते आणि आळीपाळीने डोअरबेल वाजवू लागते. आत नुकताच आडवा पसरलेला महेश भांबावतो आणि धडपडून दार उघडतो. तिघेही आत येतात आणि कदमताल चालूच ठेवतात. महेश भडकलेला.
"अर्‍ये होऽहो! अर्‍येऽ सगळे इकडे आलाऽतऽ तर मग तिकडे कोऽणऽ आऽहेऽ गौरीजवळऽऽ"
"उम्या आहे आपला! त्याची बायको आहे!"
"वंदू आहे जावयबापू! तिचा नवरा आहे!"
"हां! आहे ना! हु‌ऽऽश्शऽऽ चलाऽ- या दोघी काय एकमेकींना सोडत नाहीत-"
"काऽऽय?"
"दोघी येकदम!- काही नाही! काही नाही! बरं झालं! आलात! आता बसा!.. म-म- किंवा उभ्याही रहा! जेवण मागवा! हॉटेलातून चालेल! मी कर्ज काढलेलंच आहे! दमला असाल!.. मग विश्रांती घ्या!"
महेशला त्याना काय सांगावं कळत नाही. आपण काय सांगितल्यावर त्या काय करतील याची धडकी त्याला आधीच बसल्यासारखी. दरम्यान अंकित बेडरूममधे काहीतरी शोधाशोध करतोय. शांताबाई आणि उर्मिलाताई नुसत्याच उभ्या आहेत. दोन परस्परविरूद्ध टोकांना. महेश आळीपाळीने दोघांकडे बघतो.
"दोघी दोन टोकांना.. म्हणजे काही खरं नाही.. आपण बेडरूममधे जाऊन झोपावं-"
"महेऽश!"
"बापूऽ- आपलं हे- जावईबापू! गौरीला तीन दिवसात घरी आणायचं!"
"आठ दिवसांच्या आत आणायचं नाही महेश! डॉक्टर काहीही म्हणोत!"
"ही दुसरी खेप आहे जावईबापूऽ काय गरज आहे!"
"गरज? गरजबिरज काही नाही! आठ म्हणजे आठ!"
महेश आतल्याआत धुमसायला लागतो, "च्यामारीऽऽ ह्यांचं सुरू झालं परत!"
दोघी आपापला कोपरा फक्त बदलतात.
"महेऽऽशऽ गौरीला ऑर्डिनरीरूममधे हलव ताबडतोब! खर्च तुझा काका नाही देणार!"
"बापूऽ- आपलं हे जावईबापू! स्पेशलरूममधून हलवलंत तर मी तिसर्‍या मजल्यावरून उडी मारीन! हुंडा भरपूर दिलाय आम्ही!"
"पाच वर्षात वसूल केलाय तिनी या घरात राहून!"
"बापू हे फार होतंय!"
"मऽहेश! हे काहीच नाही!"
महेशचा स्फोट झालाय, "स्टॉप इट!.. प्ली-प्लीज- स्टॉप ईट! आईऽ ए आईऽ- आणि आईऽ अहोऽ आईऽऽ तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?.. सांगाल का? प्लीऽऽजऽ.. तुम्ही सतत असं एकमेकांच्या विरूद्ध बोलत राहिलात तर आम्ही जगायचं कसं? वागायचं कसं? अं? कसं वागायचं?"
"महेश! त्याना सांग! अजिबात बोलायचं नाही!"
"बापूऽऽ मी बोलल्याशिवाय रहाणार नाही!"
"बोला हो! काहीही बोला! पण मला सारखं सारखं बापू बोलू नका!"
"मऽऽहेश!"
"बोल आई!"
"मऽऽहेशराऽव!"
"बोला आई!" महेशनं दोघींना हात जोडलेत.
"महेश मी इथून निघून जाऊ?"
"नकोऽ आईऽ पाया पडतोऽ अंकितला कोण सांभाळणार?ऽ"   
"अच्छा महेशराव! म्हणजे मी इथून जाऊ!"
"नकोऽ आईसाहेबऽ अवनीला कोण सांभाळणार?"
"कोण रे महेश!"
"अवनी गं अवनी!" महेश बोलतो आणि मग जीभ चावतो. पण तोपर्यंत उशीर झालाय.
"अवनी! अच्छा! म्हणजे हिनं नावसुद्धा ठरवलं अं? माझ्या अपरोक्ष?"
"हे फार होतंय महेशऽऽराऽव!"
"आईऽऽ- तुम्ही नाही हो! एऽऽ आईऽ तू!ऽ अगं नाव ह्यांनी नाही ठरवलं आयशप्पत! म्हणजे तुझी शप्पत! मी आणि गौरीनं-"
"मला सगळं कळतं रेऽऽ अगं आई गंऽऽ जगदंबेऽ मला इथून घालवून द्यायचे हे धंदे गं बाईऽ"
"नाही आईऽ माझी आईऽ नाऽऽईऽऽ"
"ठीक महेशराव! मग मी जाते"
"अहोऽ आईऽ नकाऽ होऽ जाऊऽऽ"
शांताबाई खटकन डोळे पुसतात, "ठीक आहे महेश! मग मी नाही जात! पण मी म्हणते तसं झालं पाहिजे!"
"नाही बापू! मी म्हणीन तसंच!"
"आईऽऽऽऽ- नाही तुम्हाला दोघींनाही नाहीऽऽ तिला म्हणतोय, आयीऽऽ जगदंब्येऽऽ वाचीऽऽवऽऽ"
"नाव अवनी ठेवायचं नाही!"
"नाव अवनीच ठेवायचं!"
दोघी हमरातुमरीवर आल्या आहेत. महेश हतबल. दोन्ही हात डोक्याला लाऊन टेकीला आलेला.
दरम्यान बेडरूममधे इतका वेळ शोधाशोध करणार्‍या अंकितला एकदाचा अडगळीत एक मोठा बॉक्स सापडलाय. तो घेऊन लपवत लपवत अंकित त्या गदारोळातून घराबाहेर येतो. बॉक्स उघडतो. खूष होतो. हळूच आतलं भेंडोळं काढतो. तो फटाक्याचा लांबलचक कोट आहे. पाच-दहाहजार डांबरी फटाक्यांची माळ. अंकित ती माळ हळूहळू उलगडतो. ती उलगडून होत असताना त्याची ट्यूब पेटते. तो शेजारच्या पाळणाघराकडे बघतो. त्याला हसू फुटतं. आवरता आवरत नाही. ती माळ हातात धरून ओढत तो पाळणाघराजवळ येतो. कानोसा घेतो. आत, बाहेर, दोन्ही, तिन्ही दिशांना... मग ती माळ हळूहळू पाळणाघराच्या ग्रील्समधून आत सोडतो.
महेश घरात, घरातल्या फटाक्यांना तोंड देतोय. घरातले दोन्ही फटाके आता हमरातुमरीवर आलेत. त्या दोघींना अडवल्याशिवाय त्याला गत्त्यंतर नाही आणि त्या तर अजिबात ऐकायला तयार नाहीत. आता लढाई हातघाईवर आलीए आणि फटके मात्र मधेमधे येणार्‍या महेशला बसताएत.
बाहेर अंकित शांतपणे आपलं काम करतोय. माळ संपूर्ण आत जाऊन माळेचं छोटसं टोक आता पाळणाघराच्या ग्रील्सवर बाहेर लोंबतंय. अंकित खिशातली काडेपेटी काढतो. माळ पेटवतो. तिथून धूम ठोकतो.
काळोखात वीजा चमकल्यासारखे फ्लॅशेस.. त्यामागोमाग फटाके फुटल्याचे धुमधडाड आवाज..
महेशच्या घरात हातघाईवर आलेल्या दोघी..
महेश बाहेर येतो. त्याला काही कळत नाही.. आत जातो. काही करता येत नाही..
फटाक्यांच्या आवाजानी जोर पकडलाय आणि महेशची आत, बाहेर अशी प्रचंड भंबेरी उडालीय...   क्रमश:

No comments: