romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, March 15, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (८)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, आणि त्यानंतर...
महेशच्या आनंदाला उधाण आलंय. स्वत:च्या घरी पोहोचल्यावर तर जास्तच. अंकितला कडेवर उचलून आता तो गणपतीच्या मिरवणुकीतला झांजा आणि लेझिम नाच नाचू लागलाय. दारातून कडलेंचं मुंडकं आत आत ओढलं जातंय आणि त्याना बाहेर ओ-ओढून शेजारची पाळणाघरवाली निमामावशी हैराण झालीए. कडले महेशच्या नाचात सामील व्हायला आतूर झालेत. महेश मधेच तुतारी वाजवल्यासारखं करतो. जरावेळाने त्याच्या लेझिम, झांजा यांचा रोंबासोंबा होऊ लागतो. महेशला धाप लागते आणि तो गणपतीतल्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरून गौरीला शोधू लागतो. गौरीला जीव नकोसा झालाय. महेश तिला धरून पुढे आणतो. दिवस भरत आलेली गौरी प्रचंड अवघडलेली आणि लाजत असलेली. कसाबसा  आपला मोर्चा  बेडरूमकडे वळवते. तोपर्यंत निमानं कडलेना एखाद्या लहान मुलासारखं जावडेकरांच्या घराबाहेर आणलंय. महेश जोरात गणपतीबाप्पाऽऽ असं ओरडतो. पाठोपाठ अंकीत मोरयाऽऽ करतो. सुखी कुटुंब आता शयनकक्ष अर्थात बेडरूममधे दाखल झालंय.
"हुऽऽश्शऽ आता तयार रहायला हवं हं गौरी! केंव्हाही काही होऊ शकतं!"
"म्हणज्ये पप्पा?ऽऽ"
गौरी अंकितच्या गालावरून हात फिरवते, "म्हणजे.. बेटा.. ममाला केंव्हाही ऍडमिट व्हावं लागणार!" 
महेश लगेच तिची रीऽऽ ओढतो, "आणि मग डॉक्टरकाका आपल्याला एक छोटं छोटं, गोबरं, गोबरं बाळ देणार!"
"छ्याट डॉक्टरकाका द्येत नाई कॅय! ममाला असं बेडवर झोपवणार मग-" 
"पुरे! पुरे! पुरे! मला माहित नाही ते सुद्धा सांगशील बाबा! तुझं काही खरं नाही!"
गौरी अजून भांबावलेली, "काय रे.. महेश.."
महेश धडपडतो, "अगं आणि तू अशी अवघडून बसून काय राहिलीस! पड पड तू!"
"महेश, अरे पण-"
"माहितीये! भूक लागली असेल ना! मला पण मरणाची लागलीये!अरे! पण आया कुठे गेल्या? दोन दोन!"
"पपा, भारत पाकिस्तान ना?"
"अंकू.. अरे.. महेश अरे हा काय-"
महेश हसतो, "हांऽ काय खोटं नाही त्याचं! आयला! एक आई एक बोलते. दुसरी बरोब्बर त्याच्या विरूद्ध! कसं काय जमतं बुवा काय कळत नाही!-"
"माझ्यावर पपा, माझ्यावर प्रॅक्टिस करत असतात दोघी दिवसभर!"
"आ हा हा हा! काय पण अभ्यास आहे दोघींचा! एकमेकींच्या विरूद्ध बोलण्याचा!"
"महेश.. तुला त्रास होतो ना खूप.."
"छे गं! तुझ्या त्रासापुढे माझा त्रास काहीच नाही!.. म्हणजे तसा होतो गं! पण काय करणार? करणार काय? त्या पाळणाघरात मुलांना ठेवायचं धाडस आहे तुला?"
"अजिबात नाही.. आणि ह्या शेजारणीच्या.. च्यक!"
"का गं? का? का?" महेश गालातल्या गालात हसतोय.
"म्हणजे तू मोकळा मग.. उंडारायला..." अंकित जोरजोरात टाळ्या पिटू लागतो.
"एऽऽ गप ये! एऽ इतका काय मी हा नाहिए हं! हां! "
"तू हा आहेस की नाहिएस.. ते चांगलं माहितीए मला.. भले भले त्या निमडीनं गारद केले आहेत.. तेही मला.."
"गौरूऽ अगंऽ अगदी आराम करायचा आताऽ कसलाही विचार करायचा नाहीऽ मी काय करतोऽ तो काय करतोऽ ते काय करतातऽ त्या काय करताऽऽतऽ- अर्‍येऽ खरंच! त्या दोघी आत काय करताएत? मरणाची भूक लागलीए आम्हाला दोघांना!.. नाही तिघांना!"
"पण मी तर जेवलोय पपा!"
"हो माहितीए पप्पू मला!"
"मग तिघे कसे?"
"मी दोनदा- नाही- तुझी ममा दोनदा जेवणारए! एकटी! तू जा, तुझ्या आज्ज्या काय करताएत आत बघ! हं जा!"
गौरी लाजून चूर झालेली, "काय हे महेश.."
महेश लाडात आलेला, " काय हे म्हंज्ये काय माहितेय का गौरू! तुझं झालंय हे असं! आता तुझ्या जवळ यायचं म्हणजे सुद्धा-"
तेवढ्यात दोन्ही आज्ज्या बेडरूमच्या दारात येऊन खाकरताएत, "आम्ही आत यायचं का?"
महेश पूर्णपणे गडबडलेला, "ऑं?- आं- यायचं- यायचं का?- आणि आता आत येऊन उभ्या राहिल्यावर हे विचारताय?.. असू दे! असू दे! तुम्हाला काय बोलणार? तुम्ही काही केलंत तरी आम्ही काही बोलू शकणार नाही! तुम्ही निघून ग्येलात की आम्ही म्येलोऽऽ"
"काय? काय? काय?"
"दोघी येकदम? काही नाही आमच्या आयांनो! हात जोडतो! या! या! तुमचं सहर्ष स्वागत असो!.. दुसरं काय करणार?" महेशनं स्वत:च्या कपाळावर हात मारून घेतलाय.
"ऑं?"
"हे ही दोघी येकदम?- काही नाही! काही नाही!- ए आईऽ तू इथे बस! आणि अहो आई, तुम्ही इथे बसा! हं बसा! इथे इथे बस रे मोरा-"
"मी बसते!"
"मग मी उभी रहाते!" बसलेली आज्जी पटकन उभी रहाते.
महेश हैराण, "हं.. झालं सुरू!"
"पण तू गौरी बसलीएस का अशी? अगं व्यायाम पाहिजे या अवस्थेत!"
"हालचाल अजिबात नको सांगून ठेवत्ये!"
"आणि.. आज जरा जपूनच जेव!"
"दोन जिवांची आहेस पोरी! चारचारदा खाल्लं पाहिजे चांगलं!"
"इंजेक्शनचा कोर्स संपवला की नाही डॉक्टरनं?"
"अगं बयेऽ कशाला टोचून घेतेस सुया?ऽ"
महेश आणखी हैराण झालाय, "अर्‍येऽऽ ह्या आया आहेत की सुया आहेतऽ का? का टोचून खाताएत तिलाऽऽ.. ए आईऽ आहोऽ आईऽ मला भूक लागलीए मरणाचीऽ तिकडे किचनकडे चलाऽ-"
दोघींनी आपला मोर्चा आता गौरीच्या अगदी जवळ वळवलाय.
"डॉक्टरनं चालायला सांगितलं असेल नं?"
"डॉक्टरांनी भरपूर झोपायला सांगितलं असेल नं?"
महेश बेजार, "राहू आणि केतूची दशा सुरू झालीऽ"
"तू माझं ऐक गं मुली!"
"तू माझं ऐक गं सुनबाई!"
"अगं सगळं मॉर्डन झालंय आता!"
"परंपरा कधीही सोडायच्या नाहीत तुला सांगत्ये!"
"ही काय तुझी पहिली खेप नाहिए गं!"
"असं कसं? दोन्ही वेळेला त्रास सारखाच!"
महेश हैराण+बेजार, "हा त्रास कधी संपणार पण?"
"हे बघ! सिझेरियन झालं तरी घाबरू नकोस हं!"
"पैज मारून सांगते, नॉर्मलच होणार!"
"नंतर.. वजन वाढणारं काही खायचं नाही!"
"डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, साजूक तूप सगळं मी करून ठेवलंय!ते संपवायचं म्हणजे संपवायचं!"
महेश भूकेनं कळवळतो, "आय आय गंऽ कडकडून भूक लागलीए मरणाचीऽ आणि ह्याऽ-"
"आणि.. लगेच ऑफिसला जायचं नाही! चांगली सहा महिने रजा घे!"
"तीन महिने! तीन महिने फक्तं! चटपटीत राहिलं पाहिजे तुला!"
"धुणंभांडीवालीला पैसे वाढवायचे नाहीत! आहेत त्यात करा म्हणावं!"
"पैसे वाढव! नाहीतर बाई जाईल!"
"तेलाच्या बाईचं काय करायचं?"
"कसली तेलंबिलं लावताय जुन्या जमान्यातली!"
"घ्या! जुनं ते सोनं असं लोक म्हणताएत!"
महेश रडकुंडीला आलेला, "आयांनोऽ मी काय म्हणतोय ते आधी ऐका!"
"समजतंय न गौरी मी काय म्हणतेय ते?"
"नाही समजलं तरी काही फरक पडणार नाहिए! तू माझं ऐक!"
गौरी एवढा वेळ चूपचाप बसलेली. केविलवाणी होऊन बोलू लागते.
"ए आईऽऽ.. अहो आईऽऽ.. मी दोघांचही ऐकीन.. पण तुम्ही.-"
"अगं येऽऽ गौरीऽऽ तुला काय वेडबिड लागलंय काऽऽ या दोघींचंही तू ऐकणार म्हंज्येऽऽ तू- काय- तुला-"
"तू थांब महेश- मी तुम्हा दोघींचही ऐकीन- पण तुम्ही दोघींनी इथून जायचं नाही! मी सांगितल्याशिवाय अजिबात नाही!" 
"अगं वेड लागलंय का आम्हाला?ऽऽऽ"
दोघीही हसू लागलाएत आणि महेश त्या दोघींकडे वेड्यासारखा पहात राहिलाय.
दोघींचं पुन्हा चालू झालंय.
"तू जेवून घे बघू गौरी!"
"रात्रं फार झालीए! आता खाल्लंस तर अपचन होईल बघ!"
महेश सॉलिड कावलाय, "झालं!झालं सुरू!"
"चल गौरी! चल तू, जरा चार पावलं चाल!"
"झोप तू!अगदी पांघरूण घेऊन गुडुप!"
गौरीला कळा सुरू होताएत. तरीही दोघीही आयांचं काही ना काही परस्परविरोधी चालूच आहे. त्याना थोपवायचे महेशचे सगळे प्रयत्न विफल होताएत. गौरीच्या कळा आणखी वाढतात. महेश कावराबावरा होतो. सरतेशेवटी ओरडतो.
"ए आईऽऽ अहो आईऽऽ.. एऽ एऽऽ हिंदुस्थान-पाकिस्तानऽऽ कुणीतरी येणारएऽ का माझ्याबरोऽऽबर हॉस्पिटलाऽऽतऽ.."                                                    (क्रमश:)

No comments: