romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, March 6, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (६)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५,
आणि त्यानंतर...

दुपार झालीए आणि निमामावशीच्या पाळणाघरात प्रचंड कोलाहल चालू आहे. कुणीतरी जोरात ढकलल्यासारखे रिकामजी कडले घरातून बाहेर आलेत आणि स्वत:शीच मोठमोठ्याने बोलू लागलेत, "अरे! अरे!.. अरे बाबानो मी या घराचा मालकए रे मालक!.. छ्या! कंबर मोडलीए माझी!.. यावेळची गर्दी म्हणजे भयानक! भयानक!.. निमू- माझी निमू माझ्या वाट्यालाच येत नाही आख्ख्या दिवसात! दिवसभर वाट्याला येतात ती दप्तरं, बॅगा, वॉटरबॅग्ज, युनिफॉर्मस, चपला, बूट.. ते सगळं आवरून दमून रात्री मी आठ वाजताच ढाराढूर! म्हणजे रात्रीही- छ्या! छ्या!.."
एक उंच, देखणी, अत्यंत मॉड साधारण पंचावन्न वर्षाची स्त्री सोसायटीच्या आवारात आलीए. आख्खी इमारत न्याहाळतीए. काहीतरी शोधतेय. तिचं लक्ष स्वत:शीच मोठमोठ्याने बडबडणार्‍या कडलेंकडे जातं आणि तिच्या आधीच आक्रसलेल्या भुवया आणखी आक्रसतात. कडले नवी संधी चालून आल्यासारखे ’ह्या कोण?’ असं स्वत:लाच विचारत पुढे झालेत, "येस!.. येस?.. ऍडमिशन क्लोज्ड मॅडम! येस बिल्कुल- साफ- आपलं- ते हे- क्लोज्ड!"
स्त्रीनं डोळ्यावरचा गॉगल कपाळावर सरकवलाय, "वॉट रबिश!"
कडले हसताएत, " हॅऽ हॅऽ पाळणाघर मॅडम!"
"वॉऽऽट?" 
"हे आपलं- बेबी सीटींग- नो ऍडमिशन मॅडम!"
"शी: तुम्ही काय मला- मला जावेडकर- जावेडकर इथे कुठे रहातात ते-"
"ओऽहोऽहोऽ हियर हियर मॅडम! धिस साईड!"
कडले वाकून अभिवादन करत असल्यासारखे. स्त्री कडलेंकडे, त्यांच्या त्या हालचालींकडे त्याच त्या आक्रसलेल्या चेहेर्‍याने पहात जावडेकरांच्या फ्लॅटच्या दिशेने चालू लागते.
"जावडेकरांच्या ह्या कोण?... कोण बरं?" कडलेंमधला गुप्तहेर आता जागा झालाय.
"वॉट?"
"नो! नो! नथिंग! आय रितिक- रितिक मॅडम!"
"रितिक-"
"रिकामजी तिरूपती- आपलं हे आर. टी. कडले! नेबर! यू गो! यू गो! शांताबाई-"
तोपर्यंत त्या स्त्रीचा जवळ जवळ तिळपापड झालाय. ती तरातरा पुढे होते आणि जावडेकरांच्या फ्लॅटची बेल दाबते. आत शांताबाई बॅगेत कपडे भरताएत.
"आले! आले!ऽ आता मेलं कोण आलं कडमडायला?"
शांताबाई दार उघडतात. दारातल्या स्त्रीकडे बघतात, तिच्या खांद्यावरच्या भल्या मोठ्या बॅगेकडे बघतात.
"काय आणलंय? फिनेल, शांपू, साबण, क्रिम्स- काही काही नकोय- दुपारच्या वेळी आम्हाला ऍलर्जी असते त्यांची!- या तुम्ही-" स्त्रीच्या तोंडावरच दार बंद करायला जातात.
"जस्ट अ मिनट! जस्ट अ मिनट! बाई आहेत घरात?"
"अहो बाईच आहे मी!.. अग्गोबाई! मिश्या बिश्या आल्यात की काय मला? सकाळी तर नव्हत्या- तुम्ही- "
"आय- आय मीन- तू- तुम्ही- ओ‌‍ऽऽहऽ-"
"अग्गोबाईऽऽ उर्मिलाताई तुम्हीऽऽ अय्योऽऽ मी तुम्हाला फेरीवाली समजले होऽऽ"
"ये‌ऽऽ येऽऽ शांताबाई! ऍंड मी तुम्हाला कामवालीऽऽ ऍम सो सॉरीऽऽ-"
"थॅंक्यू थॅंक्यू- आपलं हे राहू दे राहू दे हो उर्मिलाताई! या! आत या! द्या ती बॅग! काय आहे काय या एवढ्या मोठ्या बॅगेत? ऑं?.. छान आहे हो बॅग!" शांताबाई बॅगेकडे बारकाईने पहात राहिल्याएत.
उर्मिलाताई आत आल्याएत आणि त्यांचं लक्ष शांताबाई भरत असलेल्या बॅगकडे गेलंय.
"गावाला कोण चाललंय हो! हु इज अबाऊट टू गो-"
"कोण?.. ह ह ह ह.. हो! हो! मी हो मी चाललीए! गावाला म्हणजे पुण्याला!"
"कधी? व्हेन आर यू-"
"आय- म्हणजे- टेल यू बरंका- यू नो आमचा उम्या! उम्या हो माझा धाकटा! नो यू?"
"येऽ येऽ आय नो- आय नो उम्या!"
"नो! नो यू? उम्या? अंग्गाशी!ऽ तर तो म्हणाला ये माझ्याकडे  चार दिवस- पण तुम्ही?.. काय.. रहायला आलात चार दिवस?" शांताबाई आलेला संशय बोलून दाखवताएत.
"ओऽह! ये! ये! म्हणजे- आय मीन-"
"नाही! नाही! रहा ना! रहा!.. तुमच्या मुलीचं गौरीचंही घर आहेच की हे.. काय सहज?.. नाही म्हणजे मी सहजच विचारतीए! रहा ना!.. रहा!" उर्मिलाताईंकडे त्या एकटक बघताएत. उर्मिलाताई उगाच इंग्लिश उसासे वगैरे सोडतात आणि इंग्लिश हुऽऽश्शऽऽ करत सोफ्यावर ठाण मांडतात.
शांताबाई आपल्या दुसर्‍या संशयाला वाट मोकळी करून देताएत, " काय म्हणतेय सोनाली मग? तुमची सुनबाई?"
सोनालीचं नाव निघताच ’बुलशीट’ असं म्हणत उर्मिलाताई सोफ्यावरून उठतात.
"वॉटर- उर्मिलाताई- काय वॉटरबिटर- पाणीबिणी हवंय का? आहे ना? इथेच आहे!.. घ्या!"
उर्मिलाताई आपल्या खास शैलीत बसतात. पाणी पितात.
"तुमचं शांताबाई- पुण्याचं.. काय अचानक?"
"छे! आपलं हे- सहज! सहज हो.. सहजच!"
"अंकितला घेऊन जाताय?"
"छे हो!- अय्योऽऽ.. माझी पण काय कमाल बघा-"
"वॉ- वॉट हॅपन्ड?- काय झालं शांताबाई?"
"आधी मला सांगा, तुम्ही रहायला आलात न इथे?"
"मी- आय- ऍक्च्युअली-"
"चार दिवस हो म्हणतेय मी!" 
 "वॉट टू डू शांताबाई! सोनाली- आमची सून एकदम युसलेस यू नो! वैतागले! अगदी वैतागले! तुम्हाला सांगू-"
"एकाच नावेतले प्रवासी आपण उर्मिलाताई!"
"अं?"
"काही नाही! अहो शेवटी मुली त्या मुली, सुना त्या सुना!"
"अगदी बरोबर! करेक्ट!- बरं तुम्ही काय सांगत होता?"
"होऽऽ अहोऽ आज्जी होतोय आपण दोघीऽऽ पुन्हा!ऽऽ"
"काऽऽऽय?"
"अहो.. ग्रॅंडमदर! ग्रॅंडमदर! परत! गौरी, तुमची गौरी-"
उर्मिलाबाई उठून शांताबाईंचे हात गच्च धरतात.
"काय सांगताय काय शांताबाई? ग्रेट न्यूज! कॉंग्रॅट्स! कॉंग्रॅट्स! अंकित खूष होईल आता! कशीए आमची गौरी?"
"ती ना?.. आहे मजेत!.. मी चाललेय पुण्याला!"
"म्हणजे?"
"म्हणजे म्हणजे आमचा उम्या हो! उम्या-"
"आय नो! धाकटा तुमचा! बरं!.. जावईबापू काय म्हणताएत?"
"जाऊ नको म्हणतोय!"
"कुठे?"
"टू पुने हो उर्मिलाताई!"
"अहो मग नका जाऊ!"
"तुम्ही रहाताय कायमच्या?"
"का- कायमच्या- नाही मी समजले नाही-"
इतक्यात बाहेर अंकित, शाळेतून आलाय. तो येतो ते थेट कडल्यांच्या दाराची, निमामावशीच्या पाळणाघराची कडी बाहेरून लावायला जातो आणि आत दबा धरून बसलेली निमा तणतणत बाहेर येते. तिला बघून अंकित घराकडे पळत सुटतो. निमा ज्याम भडकलीए.
"बघा!ऽऽ बघा!ऽऽ एऽऽ देऊ का एक सणसणीत? लाज नाही वाटत?"
तिच्या मागोमाग डोक्यावर विग चढवत कडले बाहेर आलेत.
"बघा! बघा! तुमची अंकुडी! पकडला! अगदी रेडहॅंड पकडला! पकडला की नाही?"
"जाऊ दे गं निमू!-"
"काय जाऊ दे? काय जाऊ दे?"
तोपर्यंत उर्मिलाताई आणि शांताबाई बाहेर आल्याएत. त्यांच्यामागे लपलेला हसणारा अंकित.
"सांभाळा! सांभाळा! तुमच्या पोरट्याला जरा-"
"ए पोरट्या बिरट्या म्हणायचं काम नाही सांगून ठेवते!"
"शांताबाई! हू इज शी- कोण? कोण आहे ती?"
"यूसलेस!"
निमा भडकून ओरडतेच, "शांताबाईऽऽ"
"एऽऽ गऽऽप! तुला नाही आमच्या अंकितला म्हणतेय मी! हां!ऽऽ"
"हीऽऽहीहीऽऽ" अंकीत हसतोय. उर्मिलाबाईंना उमगत नाहिए.
"अहो पण शांताबाई हे सगळं काय-"
शांताबाई त्यांचा हात धरून त्याना ओढतात, "चला तुम्ही आत चला! सांगते तुम्हाला!"
तरातरा घराकडे परततात. मागोमाग निमाकडे बघत हसणारा अंकितही.
"हसू नकोस! हसू नकोस! अंकुड्या! चांगली पोलिस कंप्लेंट करीन एकदा! मग समजेल! लाजा नाही वाटत! चिमुरड्या पोराला नाहीत आणि मोठ्याना त्याहून नाहीत!.. चला हो! तुम्ही काय बघत बसलाय डोळ्यात प्राण आणून त्या पोरट्याकडे? माझी मुलं राहिलीएत उपाशी तिकडे! तुमच्या- तुमच्या अंकुडीच्या नादात!"
कडले शुंभासारखे डोळे मिचकावत तसेच उभे. निमा परत जावडेकरांच्या घराकडे रागारागाने बघतेय.
"नाही- नाही तुम्हाला धडा शिकवला तर पाळणाघरवाली निमामावशी नाव लावणार नाही!.. जाऊ दे जाऊ दे म्हटलं तर जास्तच!.. तुमच्या मुलांना सांभाळताय, सांभाळा ना! माझ्या पाळणाघराला का त्याचा त्रास?"
"निमू.. मी काय म्हणतो-"
"काही म्हणू नका रितिक! निमूटपणे आत चला आता!"
"होय निमू!"
निमामागोमाग कडले निमूटपणे आपल्या घरात चालते होतात...                       (क्रमश:)
      

No comments: