ही गोष्टं अशी जराशी बदलली, तर
कसं होईल?
नाही, नाही! रेकॉर्डसमधे ढवळाढवळ
करायची नाही.
संदर्भ बदलायचे नाहीतच.
मुख्य म्हणजे इश्यू अजिबात करायचा
नाहिये!
तरी पण सहज.
ठीक आहे! गंमत म्हणून म्हणा-
तर सर्वप्रथम
तो पोटात असताना चक्रव्यूह भेदायचं,
तो फोडून आत घुसायचं तत्वज्ञान त्यानं ऐकलं, हे कुणी ठरवलं?
त्याची आई जेव्हा हे सगळं ऐकत
होती. त्यावेळी तिच्या डोक्यात भलतीच अवधानं.
ज्याच्याशी संसार मांडला तो कसा
आहे याची पहिली जाणीव, खच्ची करणारी. कष्टं. अपार कष्टं. अगदी पोटूश्या स्थितीतही मैलावरनं
भरलेले हंडे पाणी व्हायचं. नवरा घरी आल्यावर रात्री अपरात्री त्याला वाढायचं. वर त्याचा
विचित्र स्वभाव आपलं कर्तव्य मानून सोसायचा. त्यावेळी कुणी ते तत्वज्ञान तिला ऐकवलं
असं जर आपण गृहीत धरलं तर. तर या सगळ्या परिस्थितीत त्या गर्भापर्यंत ते पोहोचलं का?
हा मूलभूत प्रश्न!
मूलभूत प्रश्नं विचारलेले आवडत
नाहीत? राग येतो? मग ठीक आहे, हेही गृहीत धरू.
पुढे ते सिद्ध झालंच म्हणा.
एक नाही अनेक चक्रव्यूहांत त्याला
घुसावं लागलं. जेव्हापासून समज नावाची काही एक वस्तू त्याला मिळालीए अशी बातमी सर्वदूर
पसरली होती त्यावेळपासूनच.
बरय़ाच वेळा त्याच्या वडीलधारय़ानीच
त्याला तो नाही नाही म्हणत असतानाच त्या चक्रव्यूहांत ढकललं होतं आणि आपल्यावरची जबाबदारी
तर झटकलीच होती पण किनारय़ावर काठ्या घेऊन त्याला पुन्हा आत ढोसायला डोळ्यात तेल घालून
उभे होते.
आई: वरच्या लेव्हलवरच्या चक्रव्यूहातच
सापडलेली. लढता लढता जिवानिशी संपली. त्याला आता, आत काय बाहेर काय, सारखंच असं वाटायला
लागलं. काहीही त्याच्या हातात नव्हतंच. शिवाय तो सूज्ञ, समंजस, महत्वाकांक्षी. वडीलधारय़ानाच
काय कुणालाच न दुखावणारा. आता त्याच्या पाठीवरचे भाईबंदही त्याला खुळ्यात काढायला लागले.
त्याना समज नाही ते परिपक्व झालेले नाहीत असं तो म्हणू शकत होता. पण वडीलधारय़ांचं काय?
नैसर्गिक प्रक्रिया खरी असते.
तिला अर्थातच काही नियम असतात. तिचा वेगही खूप कमी असतो.
कित्येक वर्षं तो नुसताच धुमसला.
यानं धुमसून एकूण एक आचरटांच्या डोक्यात काहीच शिरणार नव्हतं. शेवटी एका ज्येष्ठ आचरटेआझमच्या
पायावर त्यानं अक्षरश: डोकं आपटून घेतलं. अर्थात त्या आचरटेआझमनं काही त्याच्या डोक्यावरून
हात फिरवला नाहीच. उलट नको ते विचार करतो म्हणून हळवा अशी शिवी दिली.
कोणालाही न दुखवणारय़ा, वडीलधारय़ांसमोर
नेहेमीच मान तुकवणारय़ा त्याला, आता हे कळलं की या आचरटांच्या नादाला आपल्यासारख्यानं
लागणं पूर्णत: चुकीचंच. आईची अवस्था तो बघतच आला होता. असं डोकं आपटून घेतल्यावरच कळतं,
डोकं आपटून घेऊन आपल्याच कपाळाला जखम होते; दुसरय़ाचं काही जात नाही.
पुन्हा आईच्या पोटात जाऊन उरलेला
मध्यंतरानंतरचा भाग ऐकायला आई तर नव्हतीच. शिवाय आणखी एक जन्म घ्यावा लागणार.
तेव्हा या माणसांनीच- आपल्या असं
म्हणावं लागतं अशांनीच- चक्रव्यूह तयार केले, सापळे तयार केलेत; ते भेदणं ही एक अकर्मक
क्रिया होय.
अगदी शेवटची काडी पडताच त्यानं
आपण स्वत:, आपलं लक्ष्य यांकडेच लक्ष द्यायचं ठरवलं.
आता तुम्ही म्हणाल, यात काय नवीन?
पण मी नाविन्य असेल या कथेत असं
म्हणालो का?
नाही.
आताही मी तेच म्हणतोय, ती गोष्टं
अशी जराशी बदलली तर कसं होईल?
No comments:
Post a Comment