romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label मनू आणि मी. Show all posts
Showing posts with label मनू आणि मी. Show all posts

Tuesday, April 26, 2011

गंगेत घोडं न्हालं! (’अभिलेख’२००!!)

वाचकहो! घोड्याला नदी(गंगा)पर्यंत नेता येतं पण… पुढे?... हे झालं घोड्याचं (प्रत्यक्ष घोड्याचं)! शब्दाच्या खुरांवर उड्या दामटणारा म्हणून अल्पावधीत प्रकाशात आणल्या गेलेल्या (कर्टसी: माझी बायको आणि माझा सहचर मनू) माझ्यासारख्या लेखनअश्वाचं आणि त्याच्या प्रातिभ अविष्काराचं (???) पुढे काय झालं याची उत्सुकता तुम्हाला असेलच! (?!) नसली तरी मला ते सांगण्याची उर्मी दाटून आली आहे.तुम्ही १९९ वेळा समजून घेतलंत, आजही समजून घ्याल ही अपेक्षा!
साडेसाती, पापग्रह असं कितीही म्हटलं आणि कितीही मारून मुटकून घोड्यावर बसवलं (पुन्हा घोडा आलाच!) तरी एकदा हवा लागली की वारू (वारू की घोडा?) चौखूर उधळायला वेळ लागत नाही! यालाच कानात वारं भरणं म्हणतात.माझंही तसंच झालं.
माझ्या तथाकथित बालकथा संग्रहाचं प्रकाशन व्हावं ही मनूच्या मनीची अदम्य इच्छा! त्याच्या समारंभ व्यवस्थापक होण्याच्या महत्वाकांक्षेला फुटलेले धुमारे तो माझ्यातर्फे पूर्णपणे उजळवणार होता.त्यातला एक टप्पा पूर्ण झाला.मी दिवसरात्र प्रकाशन समारंभाची स्वप्नं बघण्यात रात्रंदिवस जागू लागलो(?).
लोक रात्र वैर्‍याची आहे म्हणून जागतात, स्वत:ला राजा म्हणवून घेतात हे आ-आठवून त्या स्वप्नांच्या मध्यंतरांमधे मी स्वत:शीच खुदूखुदू हसू लागल्याचं माझं मलाच जाणवू लागलं.
सगळं कसं स्वप्नवत होतं! मी माझे मलाच चिमटे काढून काढून बेजार झालो.मनूला फोन लावला रे लावला की तो मला असंख्य नवनव्या आयडिया ऐकवायचा.प्रत्येक आयडियेआधी ’गेट आयडिया! : फ्रॉम मी!’ असा विनोद-बिनोदही करायचा.अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांची अशी नावं घ्यायचा की ज्यांना मी केवळ पेपरमधल्या फोटोंमधेच बघितलं होतं.शहराच्या मध्यभागातलं सभागृह त्यानं प्रकाशन समारंभासाठी नक्की करायला घेतलं तेव्हा माझ्या हातापायाची सगळी बोटं तोंडात होती.मनूला माझं मध्यमवर्गीय बजेट सांगून मी आधीच अवलक्षण करून घेतलं होतंच.मनूला इव्हेंट मॅनेजर होण्याचा फीवर इतका चढला की तो मला स्वखर्चाने टॅक्सीतून फिरवू लागला.टॅक्सी हे पब्लिक ट्रान्सपोर्ट याने की ’इतर’ लोकांनी प्रवास करायचं वाहन आहे हे मी त्याला परोपरीने विनवूनही तो जुमानेना.
एके दिवशी असंख्य निमंत्रितांची यादीच त्याने माझ्यासमोर टाकली.मी थरथरू लागलो.म्हटलं, “हे हे सगळे येणार आपल्या कार्यक्रमाला?” तो म्हणाला, “झक मारत!” मी लगेच विचारलं, “कसे?” तो म्हणाला, “ते माझ्याकडे लागलं! तू टेन्शन घेऊ नको!” लवकरच उभ्या आडव्या महाराष्ट्रातली या वर्षातली अत्यंत महत्वाची व्यक्ती मीच ठरणार, याबद्दल संशयही राहू नये याची पूर्ण काळजी मनू घेत होता.हात पाय लटपटत असतानाही मनूविषयीच्या अपार प्रेमाने माझं मन भरून दाटलं (!).
मीही चांगलाच सरसावलो.मग मी प्रमुख पाहुण्यांचं नाव सुचवलं की मनू त्याच्या वरच्या कुणाचं तरी नाव घेऊन मला गार करायला लागला.
प्रमुख पाहुणे, अध्यक्ष महाराज आणि कार्यक्रमाची तारीख हा लाल त्रिकोण (माफ करा नेहेमी प्रमाणे चुकीच्या जागी चुकीची उपमा येतेय पण समजून घ्याल तेव्हा…) सारखा लाल सिग्नलसारखा आडवा येऊ लागला.कधी पाहुणा आहे तर अध्यक्ष नाही.अध्यक्ष आहे तर पाहुणा नाही.दोघेही आहेत तर त्या तारखेला सभागृहच रिकामं नाही असं लाल त्रांगडं पिच्छा सोडेना.आता अगदी दर पौर्णिमेला जास्वंद वहायचा लाल तोडगा वर्षभर करावा लागणार या निर्णयाला मी येऊन पोचलो.
मनूला फोन केला की तो समजूत घालायचा.मी त्याला फोन केला की त्याचवेळी त्याला नेमका कुणातरी अतिमहत्वाच्या व्यक्तीचा फोन यायचा.इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे खायचं काम नाही हे मनोमन समजून माझ्या मनातला माझ्या मनूविषयीचा माझा आदर मनोमन दुणावला (चांगलं झालंय नै वाक्यं!).
पुस्तकाच्या प्रती हातात आल्या.ते माझ्या बायकोच्या नात्यातले लांबलांबचे प्रकाशक काका वेगवेगळे झब्बे घालून मला भे-भेटून समारंभाचं काय? असं वेगवेगळ्या झब्ब्यात आणि वेगवेगळ्या स्वरात विचारू लागले.आजपर्यंत त्यांच्या लेखकांचे प्रकाशन समारंभ त्यानी स्वत:च केलेले.प्रकाशन समारंभ आंगावर घेऊन करणारा त्यांच्या प्रकाशन आयुष्यातला मी पहिलाच!
दोन महिने होत आले पुस्तकांच्या प्रती हातात येऊन आणि प्रकाशन समारंभाचं काही ठरेना.
रात्रंदिवस जा-जागून आता माझ्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं होतं! (छे! छे! तसलं काही सर्फींगबिर्फींग मी करत असल्यामुळे ते आलं असा समज करून घेऊ नका!) मी- चक्कं मी- आता पुढाकार घ्यायचं ठरवलं.असं करणारा आमच्या खानदानातला मी पहिलाच.
मी मनूला प्रत्यक्ष भेटलो.त्याला सहजासहजी उपलब्ध होऊ शकतील अशी नावं सुचवली.जे फुकटचा भाव न खाता येतील असं माझं मत होतं.पुस्तक जुनं झाल्यावर त्याचं प्रकाशन करण्यात काय हशील? “तू म्हणतोयस तर…” या बोलीवर मनूनं या पायावरचं वजन त्या पायावर घेतलं आणि लगेच तयार झाला. “हॉल फुकट मिळणार आहे.चहापाण्याचा खर्च फक्त करायचा!” असा बॉम्ब मनूनं टाकला आणि मी मनूला माझा आध्यात्मिक गुरूच करून घेतलं.मग मनूनं स्वखर्चानं थोडक्यात पोस्टर डिझाईन करून घेतलं.निमंत्रणाचं मॅटर तयार केलं.”हा येणार! तो येणार! तू अमक्याला फोन कर, मी सांगतो!” अधिकारवाणीच्या सुरात मनूचं दिशादर्शन सुरू झालं.माझ्या अपेक्षेप्रमाणे मी ज्यांना फोन करत होतो ते मला ओळखत नव्हते. “तुमचं निमंत्रण पोचलंच नाहीए हो!” “आम्हाला नं हल्ली अशा कुठल्याच कार्यक्रमाला जायला मिळत नाही!” असं इतकं कळवळून सांगत होते की त्यांच्याबद्दल अपार करूणेव्यतिरिक्त माझ्या मनात काहीच उरलं नाही.
समारंभाचा दिवस उजाडला.आमच्या घरी गुढीपाडव्यासारखं वातावरण होतं.एवढी मोठी गुढी मी उभारत होतो! पण त्या दिवशी मनूचं काय बिनसलं कुणास ठाऊक? तो माझ्यावरच डाफरायला लागला.
“पोस्टर लावलं नाहीस! त्या अमक्या तमक्याला फोन केला नाहीस!” हे सगळं खरंतर मनूनं स्वत:च स्वत:च्या अंगावर घेतलं होतं.मी ते सगळं करीन असं मी त्याला सांगूनही.तो प्रमुख पाहुण्यांना घ्यायला जाणार होता.तिथेही तो गेला नाही.फोनवरूनच त्याने त्याना यायला सांगितलं.ते आले.मनूनं फोटो काढले.मान्यवर निमंत्रित आले नाहीत.कारण एका वाहिनीवर त्यासगळ्यांची एक महत्वाची पार्टी (!) होती.काही मोजक्या मित्रांमुळे समारंभाची लाज राखली गेली.
एखादा खुसखुशीत सिनेमा चालू असावा आणि त्याला अचानक एक समांतर गंभीर किनार लागावी तसं काहीसं होत होतं.
समारंभ झाला तरी कवित्व (!) उरलंच! ’मनू फोटो कधी देतोएस?’ ह्या माझ्या लाडीक हट्टाला मनू प्रतिसादच देईना.भावनेच्या भरातून जरा बाहेर आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मनू एकूणच प्रतिसाद देणं टाळतोय! महिन्याभराने समारंभाची बातमी पेपरात आली पण ती स्थळ, काळ, वेळ टाळून आणि फोटोशिवाय.
त्यादिवसापासून आजतागायत मी मनूची प्रतीक्षा करतोय.तो मला भेटलेलाच नाही.माझं घोडं गंगेत न्हालं हो, पण मनू काही यशस्वी समारंभ व्यवस्थापक झाला नाही! काय झालं असेल त्याचं? कुठे असेल तो? काय करत असेल? माझ्यासारख्या आणखी कुणाला शोधत असेल? कुठेतरी त्याचा वास येतो, भास होतो.पुढे जाऊन शोधावं तर तो तो नसतोच.तो तुमच्या आमच्यातच आहे हे नक्की.तुम्हाला जर तो कुठे आढळला (हे जरा फारच होतंय, कल्पना आहे मला) तर मला नक्की कळवा! लेखक झालो पण मित्र गेला (हेही फार होतंय कल्पना आहे मला) असं काहीसं झालंय आणि आम्लपित्त वाढलंय त्यावर उपाय चालू आहेत सध्या!

Thursday, April 14, 2011

समारंभ व्यवस्थापन

मनू शेवटी समारंभ व्यवस्थापनातही शिरला.काय? समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय? अहो, पूर्वी घरातली एखादी म्हातारी कोतारी बारशाची तयारी करायची आणि बारसं घडवून आणायची.पुलंच्या ’व्यक्ती आणि वल्ली’ मधला नारायण लग्नं घडवून आणायचा.याच प्रकारच्या कामाला हल्ली ’इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणतात.आता तुम्हाला कळलं असेल! इंग्लिश शब्द वापरला की आपल्याला लगेच कळतं!
हल्ली बरेच समारंभ, समारंभ व्यवस्थापक घडवून आणतात.पैसे आणि नाव कमावतात.मनू कसा मागे राहील? आणि मनू समारंभ व्यवस्थापक व्हायला कारण मी!
झालं काय मुलीला रात्री गोष्टं ऐकल्याशिवाय झोप येत नाही.मग मी तीच ती जुळवाजुळव करून नवीन नवीन गोष्टं तयार करून तिला सांगायला लागलो.ती म्हणायची, “पप्पा! या गोष्टीत कालचं ते हे होतं!” मग मी तिला प्रेमाने समजवायचो, “अग जग असतं न जग!” ती लगेच ’हो’ म्हणायची.मी पुढे म्हणायचो, “या जगात नवीन असं काहीच नसतं! सगळं तेच तेच तर असतं!” तिचा अंगठा तोंडात जाऊन ती एकाग्र व्हायची आणि हुंकार द्यायची.
बायकोला झोपताना एफएम ऐकायची सवय.तिच्या त्या अफलातून चिनी बनावटीच्या भ्रमणध्वनीवर.झोप येतेय असं वाटलं की ती तो पालथा की कसा काय तो कसाबसा करते.
एके सकाळी मनू चहाला माझ्याकडे आला.रोजची बरीच घरं संपवून तो लवकरच माझ्याकडे आल्यामुळे मी त्याचं योग्यं प्रकारे आगतस्वागत केलं.बायकोची झोप पुरी झाली नसावी किंवा ’आमची झोप पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही कसे हो चार चार दिवसांनी चहा घटळायला सकाळी सकाळी टपकता!’ असा काही अप्रत्यक्ष संदेश तिला तिच्या मनूभाऊजींना द्यायचा असावा.जे काय असेल ते.तिनं चायनीज बनावटीचा तिचा तो भ्रमणध्वनी सुरू केला आणि अचानक देववाणी ऐकू यावी तशा नको तेवढ्या गंभीर (!) आवाजात कुणा महामानवाचे अध्यात्मिक बोल कानी पडताएत असं आपलं मला वाटायला लागलं.मी हातातल्या चहाकडे आणि तोंडातल्या चहाच्या घोटाकडे पंचप्राण एकाग्र केले.चहा संपतो न संपतो तोच मनूनं माझ्या अंगावर उडीच मारली.मी निसटता चहाचा मग सावरतोय न सावरतोय तोवर तो आयपीएल जिंकल्यासारखा ओरडायला लागला, “व्वा! वा! क्या बात है!” माझी पाठ त्याच्या दणक्यानं हादरायला लागली.माझं लक्ष माझ्या बायकोकडे गेलं आणि मी ७.८ रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरून गेलो.म्हणजे बायको आता ज्या नजरेने माझ्याकडे बघतेय त्याला आदराने पहाणं असं म्हणतात? हे कधी शिकली ही? की पाठीवरच्या दणक्यानं मलाच दृष्टीभ्रम झालाय?
मनू आणि माझी बायको मग पुढच्या महत्कार्याला लागली.मला भानावर आणण्याच्या.त्यानी पुन्हा ती चिनी बनावटीच्या यंत्रातली वाणी सुरू केली. “अहो हे तुम्ही आहात! तुम्ही!” “मी?ऽऽऽऽ” कसाब, तहव्वूर की तस्सव्वूर? तोच तो कुणीतरी राणा किंवा थेट डेव्हीड हेडली या सगळ्यांनी मिळून जे अपराध केले त्यापेक्षाही भयंकर गुन्हे माझ्या नावावर नोंदल्यासारखा मी किंचाळलो.
मी मुलीला रात्री सांगितलेली ती माझ्या आवाजातली गोष्टं आहे.अनवधानाने ती भ्रमणध्वनीवर ध्वनिमुद्रित झाली आहे हे मला उभयता परीपरीने सांगत होते आणि तो गुन्हा कबूल करणं मला जमत नव्हतं.
बायको आणि मनू या दोन तगड्या व्यक्तिमत्वांनी माझा अगदी सहज मोरू केला असेल हा तुमचा होरा अगदी अचूक आहे! तसंच झालं.मला माझा गुन्हा कबूल करावा लागलाच.लगेच पुढचा गुन्हा, पुढचं कलम लागलं आणि माझा छळ सुरू झाला.अशावेळी दयेची याचना ज्याच्याजवळ मागायची तो परमेश्वरही कुठेतरी गेलेला असतो हो!
मनू आणि माझी बायको दोघांनी “आता पुस्तक! पुस्तक! पुस्तक! पुस्तक!” असा घोषा लावला आणि माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले.इतका हल्ला आणि कल्ला केला त्या दोघांनी की माझी ती गोष्टं ऐकता ऐकता शहाण्यासारखी झोपणारी मुलगी दचकून जागी झाली.कुणीतरी माझ्याबाजूने असणारं जागं झालंय म्हणून मी खूष व्हावं तर तीही, तिला काय कळलं कुणास ठाऊक दरवेशाच्या अस्वलाभोवती नाचावं तशी त्या दोघांमधे सामील होऊन माझ्याभोवती नाचू लागली.
माझी साडेसाती सुरू होण्याचा तो कुमुहुर्त असावा.पुढच्या घडामोडी पटापट घडल्या.
“आता रोज गोष्टी सांगून ह्या बालगोष्टींचं पुस्तक लिहायचंस! काय?” मनूनं बखोट धरून मला धडकीच भरवली.तो पर्यंत दुसरा शिलेदार म्हणजे माझी बायको, तिनं ताबडतोब थेट तिच्या आतेभावाच्या, चुलतभावाच्या, मावस मेव्हणीच्या, मामेकाकांना फोन केला.ते प्रकाशक होते.
साडेसातीतली कुठलीतरी अडीच वर्षं भयानक जातात म्हणे.मला नंतरचे अडीच महिने मनूनं, माझ्या बायकोनं आणि तिच्या प्रकाशक काकानं अर्थात शनि, राहू आणि केतू त्रयीनं तिन्ही बाजूनी चिणून चिणून मारून मुटकून एकदाचा एका पुस्तकाचा लेखक बनवलंच.मी लेखक झालो या आनंदापेक्षा माझी साडेसाती संपली, इतक्यातच संपली या विचाराने खुर्चीवर बसल्याबसल्या जोरात आळस द्यायला हात वर केले आणि मनूनं ते वरच्यावर पकडले. “आता प्रकाशन! प्रकाशन समारंभ करायचाच!” मी मनातल्या मनात स्वत:वर ज्याम चरफडलो, ’बघ! कालसर्प शांती करायची करायची म्हणून पुढे ढकललीस ना? भोग आता तुझ्या कर्माची फळं!’
झालं! मनूनं प्रकाशनाचं जाहीर केल्यावर कुंडलीतले यच्चयावत पापग्रह पुन्हा माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले.
आता डोकं लढवणं भाग होतं.नसलं तरी.
मी म्हणालो, “मनू! आमच्या हिला दुधी हलवा करायला सांगतो.बिल्डिंगमधल्यांना बोलवूया.तुझ्या हस्ते करून टाकू प्रकाशन!” त्यानंतर अर्धा तास मनूनं मला ’मी मध्यमवर्गीयपणा करून कसा रसातळाला जाणार आहे’, यावर लेक्चर दिलं.वर म्हणाला, “मी सगळं मॅनेज करणार! बाजारात चलती असलेले अध्यक्ष, प्रमुख पाहुणे बोलवायचे! शहरातल्या मोठ्या सभागृहात समारंभ करायचा.फोटो काढायचे.ते दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आणायचे.अरेऽ बालसाहित्यात क्रांती केलीएस तू! ते काही नाही! ते सगळं माझ्यावर सोड! तू फक्त लाल झब्ब्याची तयारी कर!” ते सगळं ऐकलं आणि साडेसातीतले पुढचे अडीचंच काय आणखी अगणित महिने माझ्यासमोर आ वासून उभे राहिले.मला प्रचंड घेरी आली.अजून पुढचं सगळं- म्हणजे मुलीचं शिक्षण, लग्न वगैरे व्हायचं होतं म्हणून बायकोनं आणि समारंभ व्यवस्थापनाचा चान्स हुकू द्यायचा नाही म्हणून मनूनं सावरलं म्हणून नाहीतर सोफ्याची कड लागून डोक्याला पोचा तरी नक्कीच आला असता.शिवाय… तुम्ही सगळे एका होतकरू लेखकाला मुकला असता… मी धडधाकटपणे जिवंत राहिलो होतो… पुढची साडेसाती भोगण्यासाठी…

Friday, March 18, 2011

हास्यगाऽऽरवा २०११: अल्पसंख्याकांचा देश!

हास्यगाssरवा २०११
सगळ्या मित्रमैत्रिणींना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! जालरंग प्रकाशनाचा "हास्यगाऽऽरवा २०११" होळी विशेषांक प्रकाशित झालाय.लेख, किस्से, वात्रटीका असं बरंच विनोदी साहित्य असलेला! माझ्या लेखाचा दुवा खाली दिलाय आणि त्याखाली संपूर्ण लेख दिलाय:)

हास्यगाऽऽरवा २०११: अल्पसंख्याकांचा देश!

मनू म्हणजे सतत बदलणारा प्राणी.प्राणी म्हटलं की त्याला राग येतो.मग मी त्याला म्हणतो माणूसप्राणी.तो खूश होतो आणि पुन्हा बदलतो.
मी सामान्य असल्यामुळे काहीही बदललं की मी कासावीस होत असतो.अशावेळी मनू माझी परिक्षाच घेत असतो.जीवघेणी परिक्षा! या वेळची परिक्षा जास्तच जीवघेणी होती.
आपला देश हा अल्पसंख्याकांचा देश आहे काय? मी नेहेमीच गोंधळलेला असतो म्हणून तुम्हाला विचारतोय! देशातले बहुसंख्य कायम झोपलेलेच दिसतात.कुठल्याही अर्थानं घ्या! जात, पात, धर्म इत्यादीतल्या विविधतेने नटलेला आपला देश.देशातले अल्पसंख्याक नेहेमीच आग्रही असतात.नसले तर आपले नेते त्याना तसं बनवतात.त्यांना लाखो सवलती, कायदे देतात आणि निवडून देतात.आपल्या मनूसारखा चाणाक्ष माणूसप्राणी या सगळ्याचा फायदा न घेता तरच नवल.
त्याचं या वेळचं बदलणं माझ्या अंगावर मात्र काटा आणणारं होतं!
मनूवर माझं बारीक लक्ष असतं.काही दिवस त्यानं सभ्य माणसासारखं शर्ट-पॅण्ट घालणं सोडून दिलं- सोडून दिलं म्हणजे अगदी ’तसं’ नाही.पण त्याऐवजी तो रंगीबेरंगी कुरते, सलवारी, जाकिटं घालायला लागला.गळ्यात घट्टं बसणारी नाडी.त्यात भयंकर रंगाचा बदामाच्या आकाराचा खडा.जाकीटावर सोनेरी वेलबुट्टी.इथपर्यंत ठीक होतं.त्यानं केसही वाढवले.हा मुद्दाही आक्षेप घेण्यासारखा नव्हता.पण तो जेव्हा लचकत मुरडत चालायला लागला तेव्हा मी जरा सावध झालो.मग एकदा मी त्याला ब्युटीपार्लर अर्थात एका स्त्री सौंदर्यप्रसाधनगृहातून बाहेर पडताना बघितलं.प्रत्येक क्षणी माझ्या काळजाचा ठोका चुकत होता.
मला त्याला भेटायचं धाडस होईना आणि तो मला सारखा भेटायला लागला.मुद्दाम भर रस्त्यात थांबवायला लागला.त्याचं बोलणं लाडीगोडीचं.काही सांगताना तो मुद्दाम माझ्या दंडावर, गालावर चापटी मारायचा.रोखून बघायचा आणि मग मी कॉन्शस (भयचकित) झाल्यावर हसायचा.हसणं तसंच होतं.जिवणी फा-फाकवून लाचार.पण त्याचे ते विभ्रम (म्हणजे चाळे) बघून-नव्हे सहन करून- मी सुन्नं होत होतो.त्याची काळजी वाटून त्याला चार शब्द सुनवावेत म्हणून मी तयारी करायचो पण त्याच्या कोरलेल्या भुवया, चेहेर्‍यावरचा हलका मेकअप, ओठावरची लाली बघून माझ्या तोंडून शब्दच फुटायचे नाहीत.
बरं, आता फक्त आमच्या दोघांमधेच त्याचं हे वागणं राहिलं नव्हतं.मनू मला भर रस्त्यात गाठायचा आणि लोक आमच्याकडे टकामका पहात रहायचे.मला अंगावर पाल चढल्यासारखं व्हायचं.एकदा तर त्याने माझ्या शर्टाच्या बटणांनाच हात घातला.मला धरणीनं पोटात घ्यावं असं वाटायला लागलं आणि गर्दीतून एक हाक ऐकू आली, “एऽऽ छगऽऽन” त्यावर मनू त्या माणसाकडे बघून माशी हाकलल्यासारखं करून लाडीक आवाजात चित्कारला, “यूऽऽ नॉटीऽऽ” … मी, तुम्हाला सांगतो, जीव घेऊन धूम ठोकली.त्यानंतर मनू केव्हाही समोरून येताना दिसला की मी सरळ पतली गली पकडून तिथून सटकत होतो.
बैचेन मात्र होतो.मनूचं हे काय झालं होतं? देशात चाललेल्या सगळ्याच गोष्टी माझ्यासारख्याच्या हाताबाहेरच असतात.अशा गोष्टी नुसत्या बघूनच मी हबकतो.दर वेळी मनूला हक्कानं काही तरी उमज पाडायचा केविलवाणा प्रयत्न तरी करायचो.या वेळी मी हतबल झालो होतो.डोळ्याचं भुस्काट पडायचं बाकी होतं.
बरं! मनूचा पाठलाग करून त्याच्यावर नजर ठेवायची म्हणजे नस्ती आफत! मनूला लागलेल्या रोगासारखे हे रोग साथीचे असावेत.हळूहळू मनू घोळक्यात दिसू लागला.त्याच्यासारखे बायलट केशभूषा, वेशभूषा केलेले पुरूष आणि पुरूषी दिसणार्‍या मुली.खरं म्हणजे बाई कोण, पुरूष कोण हे ओळखणं कठीणच होतं.शपथेवर सांगण्यासारखं तर नव्हतंच.एक मुलगा, एक मुलगी गळ्यात गळे घालून चाललेत म्हणून कौतुकानं बघावं तर तोंडावर आपटायची पाळी.हे सगळे मिळून नक्की काय करतात म्हणून दिव्याच्या खांबाआडून मी जेम्स बॉंडगिरी करायला गेलो.स्वत:वर जरा जास्तच खूश होतो आणि मला बेमुदत पडायची बाकी राहिली! मला घेराव पडला.असंख्य ’ते’ किंवा ’त्या’ आणि मी एकटा.“बघता काय? सामील व्हा!” असा सगळ्यांचा आग्रह.कुणीतरी दोन-चार थपडा दिलेल्या परवडल्या पण हे-नाही- ह्या सगळ्या? ईऽऽऽऽ कशीबशी हातापाया पडून मी माझी सुटका करून घेतली आणि कानाला खडा लावला (कानाला! कानाच्या पाळीला नव्हे! तो ते-त्या लावत होते!).या असल्या लफड्या-लोच्यामधे अडकलो तर आहे ते सुद्धा गमवायची पाळी! पंधरा दिवस घराबाहेर पडलोच नाही.स्वप्नातसुद्धा दचकून जागा होत होतो!
पुढे एक दिवस कुठून तरी येताना एका उद्यानात सभा चाललेली दिसली.बघतो तर सगळे तेच! आय एम सॉरी! त्याच! ते की त्या? च्यायला काय म्हणायचं यांना? मनू तावातावाने सभेपुढे भाषण करत होता.स्टेजवर रंगीबेरंगी कापडी फलक, ’सम समा संयोग सभा’! त्या खाली चार ’एस’ एकमेकांत गुंतलेले! उद्यानभर सगळे तेच! नेहेमीची बहुसंख्य लहान मुलं, म्हातारे-कोतारे, तरूण जोडपी गेटच्या बाहेर ताटकळत! उद्यानातल्या प्रत्येक झाडावर एकेक बोर्ड! आम्हाला न्याय द्या! आमच्या मागण्या मान्य करा! कायदा बदला! आम्हाला स्वातंत्र्य द्या! कोण कुणाबरोबर रहाणार हे तुम्ही कोण ठरवणार? आम्हाला सुखानं जगू द्या!... मनू संतापानं लालेलाल झालेला.मग जोरजोरात घोषणा घुमायला लागल्या.उद्यानाबाहेर पोलिसांचं कडं.हेल्मेटधारी.जाळ्या घेतलेले.दंडुका, रायफली घेतलेले.ते गेटबाहेर ताटकळणार्‍या म्हातार्‍या कोतार्‍यांना, लहान मुलांना, तरूण जोडप्यांना अजिबात आत सोडत नव्हते.बहुसंख्याना आज उद्यानात प्रवेश नव्हता.तसा प्रयत्न करणार्‍याला फटकावले जात होते.मी तिथून निघालो.साठ-सत्तर वर्षांपूर्वी मिठाचा सत्त्याग्रह, कायदेभंगाची चळवळ, विदेशीची होळी. चले जाव, भारत छोडो! असं बरंच काही होतं.आज आपण स्वतंत्र आहोत पण ते चार ’एस’ स्वतंत्र नाहीत.आज ते अल्पसंख्याक आहेत.त्यांनी आवाज उठवलाच पाहिजे.
मग एके दिवशी बातम्या लावल्या.देशाची अजून किती वाट लागलीय हे अधूनमधून बघणं गरजेचं असतं.टीव्हीवर मनू! मी दाणकन् उडालो.पत्रकार परिषदेतला मनू तावातावाने मुलाखत देत होता.अडला की बाजूचे चार एस् त्याला प्रॉम्ट करत होते, ’लवकरच लैंगिक अल्पसंख्याकांचं देशव्यापी अभियान चालू होणार!’ असा संदेश सगळ्या वाहिन्यांवरून झूम आऊट, झूम इन होत राहिला…
मग वाहिन्यांवरचं हे ’अल्पसंख्याक अभियान’ बघायची मला चटकच लागली.म्हणजे, वाहिन्यांवरचं इतर काही सतत बघण्याची नेहेमीची चटक बाजूला सारून मी या चटकेला सर्वोच्च प्राथमिकता दिली असं म्हणूया हवं तर!
आणि रसिकहो! ते एकमेकांत गुंतलेले चार एस् जिंकले.त्यांचा विजय झाला.पर्यायानं आपल्या लोकशाहीला आणखी एका कोंदणाचा लाभ झाला! आणि याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला! पण…
आपला मनू स्वत:च्या अल्पसंख्याकपणाचा फायदा घेऊन केंद्रातल्या नेहेमीच्या डळमळत्या सरकारात शिरणार आणि समाजकल्याण खात्याचं मंत्रीपद पटकावणार याबद्दलही माझी खात्री झाली!

Thursday, March 3, 2011

राक्षस इत्यादी पुरस्कार!

मनूला सतत टाईमपास हवा असतो.माझ्यासारखं आयतं गिर्‍हाईक असल्यावर त्याला बोलत रहायची संधी मिळते.असं पकडून ठेवून बोलण्यासाठी मग तो वेगवेगळे डाव टाकतो. "तुला काय वाटतं?" असं म्हणून तो माझी मुलाखत घेतल्यासारखं करतो.मी सामान्य.असं कुणी मला विचारलं तर मी थोडाच मागे रहाणार? काळं कुत्रंसुद्धा विचारत नाही पण मनू विचारतो याचंच मला कौतुक.
"पूर्वी राक्षस पुरस्कार, दुर्योधन पुरस्कार इत्यादी दिले जात होते त्याबद्दल तुला काय वाटतं?" मनूनं नेम मारला आणि मला तो बरोब्बर लागला.खरं तर हे गढे मुर्दे उखाडणं होतं पण मला नं हल्ली हेच आवडतं.त्यासाठी मी एक चव्हाटाही जॉईन केलाय.मजा येते, खवळायला एक निमित्त मिळतं.खवळून दिलकी भडास काढून टाकली की आरोग्य (?) सुधारतं असं परवाच कुठेतरी ऐकलं.चांगलं काहीतरी ऐकलंय म्हणजे ते चव्हाट्यावरच असणार.तर ते असो.सांगायचा मुद्दा मी खवळलो, "वाईट झालं रे अगदी वाईट्ट! वाईट्टं! एवढे सगळे राक्षस, दुर्योधन आजुबाजूला नंगानाच घालत असताना ते पुरस्कार हवे होत्ये र्‍येऽऽ वेगवेगळ्या कंपन्या सिनेमा पुरस्कार काढतात, वेगवेगळे तेच ते वाटणारे कार्यक्रम करून आणि त्याच त्या लोकांना आल्टून पाल्टून पुरस्कार देऊऽऽनऽऽ तसं करता आलं असतं रेऽऽ कुणीतरी असं पाऊल पुन्हा उचलायला पायज्ये रेऽऽ" माझ्यातला सामान्य मध्यमवर्गीय खवळून, कळवळून बाहेर आला.मुलाखत घेणारा जसा कावेबाज चेहेरा करतो आणि लोक ज्याला मिष्कील म्हणतात तसा चेहेरा मनूला करावाच लागत नाही.त्याचा चेहेरा ओरिजनलीच तसा आहे.तो म्हणाला, "पण तुला असं नाही वाटत की जो कुणी आयोग असा पुरस्कार द्यायचा तो स्वत:ला ग्लोरिफाय करण्यासाठीच हे सगळं करत होता?" माझा चेहेरा पटकन्‌ कोर्‍या पाटीसारखा झाला.मी सामान्य इ.इ. असल्यामुळे तो बर्‍याच वेळा तसा होतो हे चाणाक्ष असल्यामुळे तुमच्या ध्यानात आलंच असेल.माझा कोरा चेहेरा बघून मनू म्हणाला, "म्हणजे असं की एखादी बाई आपण गर्दीत उठून दिसावं म्हणून भली मोठी लालभडक टिकली लाऊन लक्ष वेधून घेते तसं?" माझी ट्यूब पेटली.ज्ञानाचा उजेड पडल्याच्या भरात मी म्हणालो, ’हां! म्हणजे असले पुरस्कार देऊन स्वत:चंही नाव करून घ्यायचं!" मनू म्हणाला, "नाहीतर अमुकतमुक आयोग अस्तित्वात आहे हे आपल्याला माहितच नसतं, नाही का?" मुलाखतकर्त्यासमोर बसलेल्या आज्ञाधारी आणि अत्यंत गरजू मुलाखत देणार्‍यासारखं मी लगेच “हो” म्हटलं.
मनूचा टाईमपासचा हेतू आता सफल झाला होता आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला होता.“अमुक माणूस पैसे खातो पण काम करतो ना? मग पैसे खाल्ले तर काय बिघडलं?” या हल्ली खूप फेमस झालेल्या वचनाला जागून मी म्हणालो, “पुरस्कार देऊन नाव करून घेऊ देत रे! काहीतरी चांगलं केलं ना?” मनूनं अनुभवी मुलाखत घेणार्‍यासारखं पटकन् विचारलं, “कोण म्हणतं?” माझा चेहेरा पुन्हा कोरा करकरीत. “म-म्हणजे?-” मी चाचरत विचारलं. मनूनं स्पष्टं केलं, “अरे यात आपल्या सांस्कृतिक इतिहासाचं विकृतिकरण होत नाहीए का?” हगल्या पादल्या गोष्टींमुळे आपल्या महान आणि सर्वात जुन्या संस्कृतीचं असलं काही होतं असं कुणी म्हटलं की माझ्या डोक्यात कुरतडायला लागतं.“कोण म्हणतं?” मी त्राग्यानं विचारलं. “महासंघ आणि चळवळीतले कार्यकर्ते!” मनू उत्तराचा दबा धरूनच बसल्यासारखा उत्तरला.असं म्हणताना त्याचा चेहेरा फुलला.जाहिरातीतला माणूस ज्या उत्साहात ’एक बाम तीन काम!’ म्हणतो त्यालाही लाजवणारा उत्साह अशावेळी मनूच्या चेहेर्‍यावर असतो.ही माझ्यासाठी खरंतर धोक्याची खूण होती पण माझं तात्विक भान एकदा जागं झालं की कसला धोका आणि कसली खूण! “कोण हे महासंघ आणि चळवळीतले कार्यकर्ते?” आजूबाजूला कोणी ऐकत नाहीए ना हे बघूनच मी माझं मत ठामपणे मांडलं. “आत्तापर्यंत कुठे होते हे?” कुणीच ऐकत नाहीए ह्याची खात्री झाल्यामुळे माझा धीर चांगलाच चेपला. “अरे भारतातील संस्कृती संघर्षाचा इतिहास नव्याने वाचायला-शिकायला नको का?” मनूनं अगदी शांतपणे आपलं नवं प्यादं पुढे सरकवलं.हा मला नवा बंपर, नवा गुगली किंवा नवा दूसरा होता.चेहेरा कोरा करकरीत होण्याच्या पुढची पायरी चेहेर्‍यावर वेडेपणाची झाक येणं ही असावी.मी डोकं फिरल्यासारखा ओरडलो, “हे काय शिकायचं वय आहे काय? कुणी कुणी काय काय शिकवायचं? आणि आम्ही सतत शिकतच रहायचं? काय नव्याने वाचायला शिकवणार आहेस तू, ते मला समजेल असं सांग!” असं सगळं एका दमात ओरडत असताना मी आजूबाजूला बघत होतोच.कावेबाज मनूचा आवाज आणखी मुलायम झाला. “हे बघ! पुराणातले राक्षस, दैत्य, असूर हे वाईट नव्हते!” हे म्हणजे जरा अतीच होतं.मी भांडायला लागलो, “मग काय देव होते? देव होते?” मनूनं तरीही शांतपणा सोडला नाही. “अरे पूर्वीच्या काळी ब्राह्मणांनी जी चार वर्णांची व्यवस्था केली होती.त्या परंपरेचे विरोधक म्हणजे त्या वेळचे बहुजन, ज्याना त्या ब्राह्मणांनी दैत्य, असूर, राक्षस म्हणून बदनाम केलं!” मी लगेच उपरोधानं म्हटलं, “काय म्हणतोस? खरंच? मी तर समजत होतो की केवळ दुष्ट प्रवृत्ती म्हणजेच दैत्य, असूर, राक्षस वगैरे आणिऽऽ रावण हा जन्माने ब्राह्मणच होता कीऽऽ त्याला का असूर म्हटलं?... काय झालंय तुला सांगतो, ब्राह्मणांना सगळ्यांनीच दाबून टाकायचं ठरवलंय.महासंघ असो, राजकीय पक्ष असो, नाही तर असले हे दैत्य, असूर, राक्षस असे शब्द का वापरले अशी लहान मुलांच्या भांडणासारखी भाषा असो.सगळ्यांनी उठून आपण बहुजन आहोत म्हणायचं आणि ब्राह्मण ब्राह्मण असं ओरडत साप म्हणून भुई थोपटायची! काही तरी कारण काढून आग पाखडायची!” मनूचा आवाज कधी नाही तो खाली आला असं मलाच वाटलं.त्यानं पुढचा ’दूसरा’ टाकला, “हिंसा, अत्याचार, भेदभावाची मूल्यं राक्षसांनी कधीच मांडली नाहीत! उलट उच्चवर्णीयांनी या समाजात निर्माण केलेल्या वर्णवर्चस्वाला व त्यांनी मांडलेल्या विषमता, हिंसेच्या मूल्यांना राक्षसांनी विरोधच केला!” आता मात्र मला वैताग वैताग आला.मनूचा हा न समजणार्‍या भाषेचा किडा मेंदू पोखरत होता. “मनू, तुला नक्की काय म्हणायचंय? राक्षसांना बहुजन म्हणायचंय की बहुजनांना राक्षस म्हणायचंय?” मनू मला इशारा दिल्यासारखा म्हणाला, “साल्याऽऽ चोख्याच्या पायरीवर नेऊ काय तुला? चांगले फटके मिळतील!” कधी नाही ते मीही पेटून उठलो, “भडकाभडकवी करायची तर पायरीचा आधार कशाला घ्यायचा? यांचे नेते सवलती का काढू देत नाहीत? यांच्याच वस्तीत यांच्याच नेत्याला चपलांनी पडते आणि त्यालाच कालांतराने हे आपला एकमेव नेता म्हणून का मिरवतात? यांचाच ढाण्या वाघ स्वत:चंच शेपूट का हुंगतो?... केवळ एककलमी कार्यक्रम असल्यासारखा शिवराळपणा करायचा, ढोल बडवत रहायचे! कशाविरूद्ध तरी भडभडभडून ओकण्यासाठी चोखा मेळ्याला वापरायचं असतं?... ब्राह्मण्याशिवाय सगळे प्रश्नं संपले? परिस्थितीच्या रेट्याखाली जगणारा माणूस ही एकच जात या देशात बाकी राहिलीय! तुमची नैराश्य बाहेर काढायला त्यांच्यासाठी काहीतरी करा! नुसते भडभडून ओकू नका! आणि आधी हे फालतू पुरस्कार देणं थांबवा.त्यावरचे वाद थांबवा! जे झालंय त्याचं खापर कुणा एकावर फोडत रहाणं थांबवा!”
राक्षस इत्यादी पुरस्कार देणं कधीच थांबलं होतं आणि तरीही मनूचा हेतू सफल झाला होता.त्यानं वेताळासारखा पोबारा केला.महानगरातल्या चोख्याच्या पायरीवरची वाट चित्रपटसृष्टीत जाऊन रममाण झाली होती आणि कुठल्या एका कोपर्‍यातले कुणी एक रिकामटेके रडतराऊ तोंडाचा आ करून प्रसिद्धीच्या घोड्यावर बसू लागले होते…

Saturday, January 15, 2011

कॉमेडी शो “पोस्टातली गोष्टं! ”

मनू फक्तं मलाच भेटतो असं नाही.आपल्या सगळ्यांनाच तो पावलोपावली भेटतो हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल.आपणच कधी ’मनू’ होतो का? हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न!
काही वर्षांपूर्वी मला मनू पोस्टातल्या एजंटच्या रूपात भेटला.अतिशय दीनवाणा, लाचार, चाचरत चाचरत बोलणारा, अत्यंत गरजू असा.Cartoon Nerd/Geek Illustration
आयुष्यात आपल्याला आयकर (इन्कमटॅक्स) भरावा लागतो या कल्पनेनेच मी प्रचंड भारावून जातो दोस्तांनो दर वर्षी.आपण भरायचे आणि ’त्यांनी’ खायचे.सामान्य माणूस आणखी कशाने भारावणार? असा मी प्रचंड भारावून माझ्याच मनोराज्यात दंग झालेला असताना मनू समोर आला.मगाशी म्हटलं त्या स्वरूपात.१ रूपयाला ७ रूपये पोस्टाच्या राष्ट्रीय बचत योजनेत टाकून सर्टिफिकीट मिळवा आणि १ रूपयाही वाचवा.माझा आनंद गगनात मावेना.एक रूपया वाचणार वर सर्टिफीकीट.सामान्य माणसाला सर्टिफिकीटाचं- मग ते कसलंही असो- काय मोल असतं तुम्हाला तर माहितीच आहे.मी कर्ज काढून टॅक्स वाचवला.पाच हजार वाचवण्यासाठी पस्तीस हजार गुंतवले.मनूला त्यावर एक टक्का कमिशन.त्यातलं काहीतरी तो मला देणार.त्यानं मला काहीच दिलं नाही.मी सामान्य आणि मनू मराठी माणूस, त्यातून गरजू, म्हटलं जाऊ दे! दरम्यान माझ्या असं लक्षात आलं, मनूनं ज्या पोस्टाची नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स दिली होती ते मला खूप लांब होतं.मी पुन्हा मनूला गाठलं नाही.त्यानंतर दरवर्षीचे व्यवहार मी स्वत:च माझ्या जवळच्या पोस्टातून करायला लागलो.
सात वर्षं सरली.मनूनं दिलेल्या सर्टिफिकीटांची मुदत संपत आली.मी माझ्या त्या जवळच्या पोस्टात गेलो आणि याच पोस्टातून मला त्या दूरच्या पोस्टातल्या सर्टिफिकीटांचे पैसे मिळावेत असा अर्ज महिनाभर आधीच नेऊन दिला.कुठल्याही पोस्टातल्या एनएससीजचे पैसे दुसर्‍या कुठल्याही पोस्टातून मिळायची सोय तेव्हा तरी होती.
साठ हजाराच्या आसपास रक्कम मिळणार.त्यातून चालू वर्षाचा टॅक्स भरायचा.पैसे मिळणार असं कळल्यावर घर आणि घरातले महत्वाचे खर्च लगेच डोकं वर काढतात.आपल्या श्रमाचे आपण गुंतवलेले पैसे!
मुदत उलटून गेली तरी माझ्या जवळच्या पोस्टात त्या दूरच्या पोस्टातून परवानगी आली नाही.मी अस्वस्थ होऊन आणखी दोन स्मरणपत्रं पाठवली.३१ मार्च ही तारीख जवळ आली तशी मला मनूला गाठल्याशिवाय पर्याय राहिला नाही.सुरवातीलाच मला मनूला गाठता आलं असतं पण मग मनूनं मला त्या एजंटी काव्यानं जबरदस्ती त्याच्याकडेच पैसे गुंतवणं भाग पाडलं असतं. ’पैसे देतो पण इतके गुंतव’ असे दमबाजीचे प्रकार प्रत्यक्ष पोस्टाच्या खिडक्यांवर चालतात असं मी ऐकलं होतं.
मनूला फोनवर गाठलं आणि सात वर्षांपूर्वीच्या लाचार मनूचं रूपांतर कशात झालंय हे समजलं. “आता वेळ नाही.माझ्याकडे पहिल्यांदा का नाही आलास? आता पैसे १ एप्रिल नंतर!” लोक एप्रिल फूल करतात ते मला माहित होतं.मनू मला एप्रिलनंतरही फूल करायला निघाला होता.त्यानं अडवणूक चालूच ठेवली. “तुझा अर्ज त्या पोस्टात मिळालाच नाही.मिळाला असेल तर पोस्टमास्तरनं तो दाबला (कशासाठी?) असेल.” असं उद्धटपणे बोलायला लागला.त्या पोस्टात फोन केला तर मास्तर चहा प्यायला गेलेले.माझा अर्जं, त्यानंतरची चार स्मरणपत्रं काही काही मिळालेलं नाही! इतके दिवस मी लोकांची पत्रं एकमेकाना मिळत नाहीत असं ऐकलं होतं.पोस्टातली पत्रं खात्यातल्या खात्यात एकमेकाना मिळत नाहीत? डोक्याचा गोविंदा झाला आणि कळलं हे इतकं सरळ नाही.
शेवटचे चार दिवस उरले.हातात पैसा नाही.आपला पैसा अडवून ठेवलेला.हकनाक.दोन रात्री झोप लागली नाही.
तिसर्‍याच दिवशी पहाटे जाग आली.सामान्य, सरळ वाटेने जाणार्‍या माणसाला देव म्हणा, सुप्तमन म्हणा मदत करतं असं म्हणतात.टेलिफोन डिरेक्टरीच्या मागच्या बाजूला विविध सरकारी खात्यातल्या वरिष्ठांचे फॅक्स नंबरस् दिलेले असतात असा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.उठलो.चीफ पोस्ट मास्तर जनरल पासून खालपर्यंत असे सहा फॅक्स केले.फॅक्सने तुमची लेखी कंप्लेंट जाते.आश्चर्य म्हणजे संध्याकाळपर्यंत खातं चक्कं हललं! एका वरिष्ठाचा मला- मला फोन आला.पैसे रोख तयार आहेत.घेऊन जा.वीस हजारांवर पैसे रोख देता येत नाहीत असा नियम असूनसुद्धा!
सामान्य माणूस नुसतीच टीका करतो.नकारात्मक चित्रं रंगवतो.सहसा पेटून उठत नाही.पण कधी काळी पेटला तर हट्टालाच पेटतो.
मी पुन्हा मनूला फोन केला.२९ मार्च.त्याची अरेरावी अजून संपली नव्हती.मी त्याला ठासून सांगितलं पैसे तूच आणून द्यायचे.पोस्टमास्तरला फोन केला.तो म्हणाला, “मनूला पुन्हा पुन्हा येण्या- जाण्याचा त्रास (!) नको.सर्टिफिकीटं सह्या करून तयारच ठेवा.मी मनूला पैसे घेऊनच पाठवतो!”
३० मार्च.मनूच्या नाकी नऊ आलेले.सगळीकडून पैसे जमवून भरण्याची त्याची एजंटगिरीची घाई उद्याच्या ३१ मार्चमुळे टोकाला आलेली.त्यात मी धोबीपछाड टाकलेला.चिडून म्हणाला, “मला दुसर्‍या पोस्टात पैसे भरायला जायचंय.किती वाजेपर्यंत पैसे घेतात महित्येय का?” मी फोनवर जोरात ओरडलो, “पोस्टात काय चालतं हे सगळं मला माहित झालंय! तू पैसे घेऊन येतोस की नाही ते सांग!” मनूनं फोन डिसकनेक्ट केला.कुठल्या तोंडानं तो मला भेटणार!
३१ मार्च उजाडला.मनूच्या कृपेमुळे मला अखेर त्या लांबच्या पोस्टात जावं लागलंच.Mr. van Rooy  Cartoon by Shonaमास्तर मिशांना पीळ भरत माझी वाटच बघत होते.३१ मार्च होता तरी मिशीला पीळ भरून झाल्यावर ते हाताची घडी घालून बसले होते.माझ्याकडे बघत त्यांचं ते गुलछबू हसणं.रंगेलपणे हॅ हॅ हॅ हॅ करत माझं त्यांनी स्वागत केलं.पैसे चोख काढून ठेवलेले.नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही याचा अर्थ मला कळला.आपल्याकडेही ताकद असते याचा प्रत्यय आला.दुसर्‍या मिन्टाला माझे पैसे अखेर माझ्या हातात पडले.तरीही, वरून बांबू मिळूनही तो गुलछबू मास्तर जणू काही झालंच नाही असा हसून मला चहा पाजायला बघत होता.तुमचा अर्ज अजून सापडत नाही हो- असं ठाम निर्लज्जपणे सांगत होता.
मनू त्या पोस्टातला रेग्युलर एजंट.त्याला कमिशन मिळतं.तो मास्तरला कमिशन देऊन आपल्याकडे न येणारे पैसे अडवतो.अडवून पैसे आपल्याकडे गुंतवून घ्यायचे.नाही मिळाले तर अडवायचे आणि सामान्य माणसाला म्हणायचं आता बस बोंबलत! हा या दोघा मराठी माणसांचा डाव लक्षात यायला आता मला शेंबड्या पोराचीही गरज नव्हती.माझ्यावर मात्र ’वरून’ खरंच कृपा झाली होती!
या प्रकारची कृपा माझ्यावर नंतरही झालेली आहे दोस्तांनो! त्यानंतर विमा आणि नंतर एका खाजगी बॅंकेच्या एटीएम व्यवहारासंदर्भात! खरंच! अजिबात भिऊ नका! हे सेवा उद्योग आपल्या पाठीशी निश्चित उभे आहेत!
Post Office in Fort

Monday, January 10, 2011

कॉमेडी शो “काय नवीन?”

“काय नवीन?...” आज आत्ता आठवड्याभरानंतर मनू भेटला, या नव्या वर्षात.मी म्हटलं, “नवीन? काय नवीन?” मनू मला टप्पल मारत बोलला, “यड्या मलाच काय विचारतोस पुन्हा तेच! माझी रोज पार्टी चालू आहे नवीन वर्षाची!” मी म्हटलं, “रोज?” तो म्हणाला, “तू नं नेहेमी जीवाला वैतागलेलाच रहा.सगळं जग आनंदित झालंय नववर्षं आलंय म्हणून आणि तू! चिंतातूर जंतू!” असं म्हणून मनू हसला.ज्या हसण्याला मी कुत्सित म्हणतो आणि मनू ज्याला स्टायलिश म्हणतो ते हसू. “बोल! काय नवीन?” माझ्या पाठीत इरिटेटिंग धपाटा घालत मनू तोच प्रश्नं मला पुन्हा विचारत होता.मी उसळलो- उसळलो म्हणजे- आवाजानं एक वरची पट्टी पकडली फक्तं.म्हणालो, “अरे नवीन काय नवीन नवीन? काय नवीन?” मनू पुन्हा हसला- आता मी खरंच चिडायला लागलो होतो.त्याला हवं ते झालं होतं.माझं सुरू झालं. “वाण्याचं बिल वाढतंय.ते वाढतंय म्हणून मॉलमधे जावं तर क्रेडिट कार्ड वाकडंतिकडं झालं सारखं सारखं स्वाईप करून.डेबिट कार्ड स्वाईप मशिननंच गिळलं.काय नवीन? ओवरड्राफ्ट खात्यातला डेबिट बॅलन्स वाढतोय.कांद्याचा वांधा नाशिकपासून पाकिस्तानपर्यंत पसरलाय.डाळींनी पुन्हा उचल खाल्लीय.वर कृषीमंत्री म्हणतात हे असं रहाणारंच! च्यामारी त्या गुटख्याच्या! तो मात्रं सगळीकडे मिळतो! काय नवीन? कामावर जायला बाहेर पडावं तर ट्रॅफिकचे लोच्ये-सगळीकडे.वर होर्डिंगवर नॅनोचा ’आनंद’ ० पैशात देतो म्हणे गाडी! काय नवीन? एमयूटीपीची ट्रेन स्टेशनमधे शिरायला दहा मिन्टं घेते! कारण काय? मोटरमनवर अन्याय? मोनोरेल आणि हवेतून रेल्वे! काय फरक पडणार? धंदे आणि स्टॉल्स पदपथावरून भर रस्त्यांमधे आलेत आता! पाण्याचा ब्लॉक, रेल्वेचा मेगाब्लॉक, हे सेवाउद्योग ब्लॉकमधेच संपणार आणि आपल्यालाही संपवणार! शिक्षणक्षेत्रात देशव्यापी एकत्रीकरण! पोरं लॅपटॉप मागताएत शाळेत जायलाऽ अर्‍ये काय नवीन?...”
मी प्रत्येक वेळा ’काय नवीन?’ च्या समेवर येत होतो आणि दाद दिल्यासारखं मनू त्याचं ते स्टाईलिश हसू हसत होता.तो हसला की मला आणखी चेव येत होता.मी दमतोय असं दिसल्यावर त्यानं मला थांबायची खूण केली आणि म्हणाला, “साल्या तू ना सामान्यच रहा नेहेमी!” “अर्‍ये मग काय करू?” मी विचारलं.त्यावर मनू उत्तरला, “अरे काय करू म्हणून काय विचारतोस? मोठा हो.मोठा हो!” मनूचं काहीतरी वेगळंच! मी विचारलं, “मोठा हो म्हणजे?” मनू माझा मित्र होताच.आता तो माझा मार्गदर्शक व्हायला बघत होता.म्हणाला, “मला सांग! तुझ्यासमोर पाण्यानं भरलेला अर्धा ग्लास ठेवला, तर तू काय म्हणशील?” मी चटकन् म्हणालो, “पिऊन टाकीन! काय म्हणीन कशाला? घशाला आधीच कोरड पडलीय सारखं ’काय नवीन’ म्हणून!” मनू आता माझ्यासाठी तत्ववेत्ताही झाला- म्हणजे फिलॉसॉफर.मनूला तेच चांगलं जमतं.कारण त्यासाठी काही मेहेनत करावी लागत नाही.नुसती तोंडाची वाफ दवडली की झालं.तर मनू त्याच्या खास ठेवणीतल्या आवाजात माझी समजूत काढत म्हणाला, “अरे म्हणजे ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणशील की अर्धा रिकामा आहे म्हणशील?” मी वैतागलो, “अरे कसाही असला तरी ग्लास अर्धाच रहाणार ना रे? आमचं सगळंच अर्धं.आयुष्य अर्धं, स्वप्नं अर्धी, महत्वाकांक्षा अर्धी, पैसा, संपत्ती…” असं म्हणेपर्यंत मला खोकला आला.मी खोकतोय हे बघून मनू पुन्हा हसला.स्टाईलिश.म्हणाला, “अर्धवट आहेस, अर्धवट.चांगला आणि योग्य विचार कधी करणार तू?” आवंढा गिळून मी म्हणालो, “काय वाव आहे विचार करायला? आहे त्या भयाण परिस्थितीत कलमाडी नको म्हणू, राजा नको म्हणू, आदर्श नको म्हणू, ती राडिया नको म्हणू सगळ्यांनी हात धुऊन घेतलेत! आता पुन्हा बोफोर्सच्या तोफा उलटवणार आहेत म्हणे! कोणावर? सगळं शेवटी आपल्यावरच! इकडे आपोझिशनवाले टपलेले, तिकडे राज्य पातळीवरचे नेते टपलेले, पलिकडे आपला शेजारी टपलेला आणि त्याही पलिकडे ती महासत्ता!ऽऽ”
मनू पुन्हा आपल्या ठेवणीतल्या आवाजावर आला.म्हणाला, “नको त्याची काळजी करतोस बाबा तू! तू काय करणार सगळ्या गोष्टींवर? सगळ्या समस्यांवर? टीव्हीचे बघ अगणित चॅनेल्स झालेत! काय वरायटी आहे! रिअलिटी शोज आहेत, गेम शोज आहेत, सेलिब्रिटीजनी चालवलेले.रोजचे सिनेमे आहेत.महामालिका आहेत- तुझ्या भाषेत.राष्ट्रभाषेत.हव्याच असतील तर आंतरराष्ट्रीय भाषेत! करमणूक होत नसेल तर बातम्या आहेत. बातम्यांमागच्या बातम्या आहेत.हॉरर बातम्या, हॉरर शो, अत्त्याचारसुद्धा आहेत! काय नाही? आता रात्री अकरानंतर काय बघायचं हे मी तुला सांगू? तू दिवसा ऑफिसमधे आडोसा करून कंपनीच्या लॅपटॉपवर बघतोस तेच! ते झालं की मॉलमधे जा.सत्राशेसाठ आहेत या टोकापासून त्या टोकापर्यंत.तिथेच मल्टिप्लेक्सेस नाहीत? आणि घरी आल्यावर, रस्त्यात, गाडीत, लोकलमधे, इकडे आणि तिकडे तुझा भ्रमणध्वनि आहे, त्याचे इअरप्लग्ज आहेत.हाताच्या पंज्यावर मावणारं इंटरनेटवरचं मायाजाल आहे.माहिती मिळवायला कोण सांगतय तुला? यूट्यूबवर काय बघायचं हे मी तुला सांगू? तुझा शाळेत जाणारा मुलगा सांगेल तुला! सगळं झालं की किंवा सगळं व्हायच्या आधी किंवा सगळं होताना त्याच्या मधेही गप्पांचे अड्डे आहेतच कीऽऽ होऊदे ना साईटवाल्यांचा फायदाऽ तुझा काय तोटाय हे सगळं करण्यात मला सांग!...नायतर असं कर.येतोस आज पार्टीला? वर्षाखेर आणि वर्षारंभ अशी मिळून मोजून सत्ताविसावी पार्टी आहे आज! धुंद हो.नव्या वर्षाचं स्वागत कर.माझं ऐक.स्वत:ला कुरतडत बसू नकोस असा!” मी म्हणालो, “अरे मनू हा चंगळवाद झाला.सगळ्याच प्रश्नांवर, समस्यांवर सामान्य माणूस काही करू शकेल असं मुळीच नाही.पण आपण आपले, आपल्यापेक्षाही जे सामान्य आहेत त्यांचे प्रश्नं, समस्या डोळ्यांसमोर दिसत असूनही कानाडोळा करायचा? फक्तं आपलंच बघायचं? कुणीतरी सुरवात करायलाच हवी रे.आपल्या आपल्या परीनं.ती कुठल्या नवीन वर्षात करायची?... आणि तू विचारतोएस मला काय नवीन?...” मी माझ्या तंद्रीत कधी गेलो ते मलाच कळलं नाही.
तंद्री भंगल्यावर मी मनूकडे पाहिलं.तो दिसेनासा झाला होता नवीन वर्षाचं स्वागत करायच्या सत्ताविसाव्या पार्टीला आणि मी माझ्या परीनं नवीन वर्षाचं स्वागत करायचा प्रयत्न करत होतो…

Saturday, December 11, 2010

कॉमेडी शो! “फलाना… बिस्ताना…!”

“काय म्हणूया?... आपलं ते हे… फलाना… बिस्ताना…!”
मनू इंग्रजी शिकवणार.त्यासाठी शिबिर घेणार.त्या शिबिराला तो कार्यशाळा म्हणणार.असल्या या कार्यशाळेत शिकवताना तो अडला की विद्यार्थ्यांनाच विचारणार, “अमक्या ढमक्या इंग्रजी शब्दाचा अर्थ… काय म्हणूया? असेल आपलं ते हे… फलाना… बिस्ताना…”
मला वेड लागायचं बाकी होतं.मनूची मातृभाषा मराठी.आता मराठी माणसाचं इंग्रजी असून असून किती पावरफूल असणार? कुणाचं नसतं असं नाही.पण मनू? साक्षात मनू? हो मनूच!
आजकालच्या जमान्यात ज्याला ओ की ठो कळत नाही, येत नाही, त्यानं आपण सर्वज्ञानी आहोत असं सिद्धं करायचं असतं.होतकरू पोरांना काय कुणीतरी ’मास्तर’ हवाच असतो.असं काही करण्यात तर मनूचा हातखंडा.शाळा-कॉलेजात असताना संधी मिळाली की मनू उभा मग चेहेरा पा-पाडून, जिवणी फा-फाकवून, लाचार हसत तो वाटेल तसं, मनाला येईल तसं इंग्रजी फेकायचा.अहो, मायमराठीतच तो ’उपक्रम स्तूत्य आहे तुमचा!’ च्या ऐवजी ’उपक्रम सूस्त आहे तुमचा!’ असं म्हणाला होता एकदा म्हणजे मग इंग्रजीसारख्या वाघिणीच्या दुधाचं तो काय करत असेल त्याची तुम्हीच कल्पना करा म्हणजे झालं.काहीही असो, बोलतो ना! (म्हणजे आपल्यावर उभं राहून बोलायची पाळी येत नाही ना!) म्हणून पोरं खूष.सर खूष.
परवा त्याला हे सुचलं.शिबिराचं-चुकलो-हे कार्यशाळेचं.जगावेगळी आयडिया मलाच प्रथम सांगतोय या आविर्भावात त्यानं मला ती ऐकवली.मी म्हणालो, “मन्या हे फार होतंय! इंग्रजी शिकवणार? तू?” त्यानं माझं तोंड दाबलं.म्हणाला, “येड्या चूपचाप मला मदत कर.शंकाकुशंका काढू नकोस मध्यमवर्गीयासारख्या!” मी मनूला मित्र मानतो. “हो!” म्हणालो.
मनूनं जाहिरात दिली. ’फडाफडा इंग्रजी बोला! आधी आमच्या कार्यशाळेत चला!!” झालं! पूर्वी ’फाडफाड’ इंग्लिशच्या वर्गांना जाणार्याय आईबापांनी आपल्या मुलांना पाठवलं. ’फडाफडा’ म्हणजे निश्चित वेगळं काही असणार होतं.हीऽऽ गर्दी जमा झाल्यावर मनू माझ्या कानात म्हणाला, “बस! लिहून घे नावं! त्याना सांग! फक्तं चाळीस निवडणार!” मी सांगितलं.मरणाची झोंबाझोंबी झाली.मी चाट पडलो.मनूनं बरोब्बर कुणाचा बाप मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी आहे हे बघितलं.कुणाचा बाप फॉरेनला असतो, किंवा येतो-जातो, मध्यवस्तीत कोणाची रहायची जागा रिकामी आहे, कोणाचा इंटिरिअरचा धंदा आहे ते पाहून यशस्वी ’चाळीस’ निवडले.बाकीचे बिचारे प्रचंड हिरमुसले.निवड अशी करायची?- मी चिडून मनूला हे विचारायला जातोय तर मनूभोवती त्या चाळीसांचा गराडा.मनू त्यांना अलिबाबाच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी सांगत असल्याच्या अविर्भावात.ते डोलताएत.मिठ्ठास बोलणं, फक्त बोलणं ही मनूची जादूची पुंगी.सगळी बालकं डोलत मनूपाठोपाठ वर्गात दाखल झाली.मनूनं माझी बाही खेचली. “बस! या प्रत्येक ठोंब्याकडून पाचहजार वसूल करायचे!” मी जोरात ओरडलो, “पाऽऽच-” मनूनं मला पुढं बोलूच दिलं नाही.म्हणाला, “चूपचाप घे.मला द्ये.रिसीट नंतर- असं सांग!” मी भांबावलेला असलो की मनू माझा नेहेमीच मोरू करतो आणि मला राबवून घेतो.
दोनावर पाच पूज्यं हातात येईपर्यंत मनू इतका विनम्र होता, पैसा हातात पडल्यावर त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक आली.त्याचे डोळे माजलेल्या राजकारण्यासारखे झाले.
मनूची ’कार्यशाळा’ सुरू झाली.मी दिमतीला होतोच.ती सगळी रंगीबेरंगी पोरं-पोरी, विशेषत: पोरी बघून मनूचा उत्साह वाढायचा.मग नाकावरचा चष्मा पालथ्या हाताने सरकवून, झब्याच्या बाह्या सरसावून बसता-उठता झब्याचा मागचा भाग फलकावून मनूचं अमकं, ढमकं आणि फलाना, बिस्ताना सुरू व्हायचं. “काय म्हणूया?” असं विचारत तो समेवर यायचा.इंग्रजी तर नुसतं फेकायचा, पण ते इतक्या सफाईनं की पोरं मास्तरवर खूष.कार्यशाळेचा तास संपला की पाया पडायची बिचारी.मी एका कोपर्यातत बसून ते अचाट इंग्रजी, त्याचे मनूनं सांगितलेले अफाट अर्थ ऐकून चाट पडायचो.सामान्य मराठी माणूस असल्यामुळे पुढ्यात आलेला चहा गिळून मुकाट बसायचो.एक-दोन महिन्यात, महिना दोन पेट्यांचं तेज मनूवर चढलं.आता तो रंगात आला की दोन्ही हात पक्षाच्या पंखांप्रमाणे आखडून घेत तमाशातल्या नाच्याप्रमाणे डोलत-चालत मुलांना शिकवू लागला.चांगली मुलगी दिसली की त्याचे डोळे चमकायचे आणि ओठांचा चंबू व्हायचा.मुलगी बिचारी इकडे तिकडे बघायची.वर्ग संपेपर्यंत शरमून मान खाली घालून बसायची.
मी बिनपगारी फुलहजेरी कामगार म्हणून मला प्रवेश सुलभ होता.माझी उत्सुकता वाढत चालली होती.मनूनं कार्यशाळेतल्या मुलांच्या जीवावर मध्यवस्तीत किरायानं का होईना फ्लॅट घेतला.त्याचं फुकट इंटिरियर करून घेतलं.मंत्र्यांकडून, सरकारी अधिकार्यांलकडून सगळी कामं करून घेतली.पोरं सतत मास्तर मास्तर करत पाया पडत होती ती वेगळीच.नुसतं ’काय म्हणूया?... फलाना बिस्ताना…’ या भांडवलावर माणूस काय करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर होतं आणि उद्योग नसलेले आईबाप आपल्या उद्योग नसलेल्या मुलांना पदरची दक्षिणा देऊन कसे मार्गी लावतात याचंही.
मुद्दलातच खोट असलेल्या मनूच्या इंग्रजीबद्दल फक्त मलाच माहित होतं.मी पडलो सामान्य, मराठी मध्यमवर्गीय.मला काय आवाज उठवता येतो? मी स्वत:ला फक्त कोसत राहिलो.मनू माझं कधीच ऐकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ होती.एक दिवस राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी शिकवणारा कार्यशाळाशिक्षक म्हणून मनूची निवड झाली.अटकेपार झेंडे लावले म्हणून मनूचं सगळ्यांनी कौतुक केलं…

Tuesday, November 30, 2010

कॉमेडी शो “लोकांच्या सेवेसाठी…”

रविवार सकाळ.सकाळचे दहा वाजलेले.मी कधीही न मिळणारय़ा साखरझोपेत.जोरजोरात वाजणारा रिक्षाचा हॉर्न.तो कानठळ्या बसवणारा असूनही अजून मी उठत नाही म्हणून चवताळलेली बायको.असे सगळे पापग्रह राशीला एकत्र आल्यानंतर मला अंथरूण सोडावच लागलं.
खिडकीबाहेर पहातो तर नवी करकरीत रिक्षा.बाजूला उभा स्वच्छ पांढरय़ा कपड्यातला तिचा मालक कम चालक.नेव्हीमधल्या पायलट, कमांडरसारखी त्याची कॅप.दोन्ही हातांचा कर्णा करून माझ्या खिडकीच्या दिशेने त्याच्या माझ्या नावाने हाका.डोळे चोळत ते आऊट ऑफ फोकस, अंधुक दिसणारं दृष्य दिसावं म्हणून मला माझी झोप उडवावीच लागली शेवटी.
मी पुन्हा नीट पहातोय खिडकीतून तर आता कमांडर गायब.मी मनाशी म्हणतोय- अरे, हे काय दिवास्वप्न?- तर दारावर बेल.दार उघडतो तर समोर ’कमांडर’! मी (नेहेमीच्या) भांबावलेल्या चेहेरय़ाने काही विचारणार इतक्यात त्याने कॅप काढली आणि मी उडालोच! मनू!! मी आश्चर्यानं विचारलं, “हे रे काय?” जिवणी फाकवत, फवारा उडवणारं हास्य करून तो म्हणाला, “लोकांच्या सेवेसाठी!” मी म्हणालो, “सोडलीस नोकरी?” मला टप्पल मारून तो म्हणाला, “अरे नोकरी करून लोकं काय काय करतात! शिकतात.खरवस विकतात.शेअर्सची उलाढाल (!) करतात.एजन्सी चालवतात.राजकीय पक्षांचे संघटक होतात.मी रिक्षा घेतली.परप्रांतीयांना ठसन द्यायची आणखी एक संधी! चल!” असं म्हणून तो मला ओढायलाच लागला.मी माझी सुटणारी लुंगी सावरतोय.भोकाभोकांचा बनियन लपवायची धडपड करतोय हे लक्षात यायला त्याला वेळ लागला.माझ्या पार्श्वभागावर चापट मारून त्यानं मला मग आत ढकललं.मी कसाबसा शर्ट चढवला.पॅंट कमरेवर सरकवली नाही तोपर्यंत बायकोने डाव्या हातात पिशव्या आणि उजव्या हातात पैसे कोंबले.एकबाजूने मनू ओढतोच आहे.नेहेमीसारखा, कुठेलेही पर्याय नसलेला मी मनूच्या रिक्षेसमोर उभा ठाकलो.तिला घातलेला हार, लावलेले गोंडे न्याहाळतोय तोपर्यंत मनूनं मला सीटवर ढकललंच.रिक्षाच्या आत लावलेले गोंडे, झिरमिळ्या माझ्या नाकातोंडात जाऊन मी सटासटा शिंकतोय न शिंकतोय तोपर्यंत ढॅण ढॅणऽऽ ढॅण असा राक्षसी संगीताचा तुकडा माझ्या उजव्या कानात गिरमिटासारखा फिरतोय.बॅलन्स (माझा) डावीकडे केला तर डाव्या कानात गिरमिट.माझा चेहेरा आधीच केविलवाणा.आता सिनेमातल्या ए के हंगलपेक्षा बापुडवाणं होऊन मी समोर पाहिलं तर समोरच्या, मागचं ट्रॅफिक दिसावं म्हणून लावलेल्या आरशात दिसतोय मीच पण माझे ओठ लालचुटुक! डोळे फाड-फाडून पहातोय तर आरशावर नुसतेच ओठ.अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखा मी मनूच्या रिक्षाचं ते अंतरंग बघायला लागलो.बघायला काय लागलो? ते सगळं माझ्या डोक्यात, डोळ्यात आणि कुठे कुठे आपोआपच घुसत होतं म्हणा! आता संगीत आणखी वाढलं.त्यापेक्षाही वाढला त्या कुठल्याशा एफेम वरच्या, त्या आरज्ये की डीज्येचा भेसूर हिंदी कम इंग्लिश कम कुठल्याशा भाषेतला तारस्वर.मी डोळे मिटले तरी ते किलेकिलेच रहात होते.दोन्ही कानांवर गच्च हात ठेवले.मला तसं बघून मनू नेहेमीसारखा विजयोन्मादानं हसला आणि त्यानं माझं लक्षं वेधून घेतलं. “कशी आहे?” माझ्या कानाजवळ आपलं थोबाड आणून तो ओरडला.एका कानावरचा हात सोडून मी दोन बोटं जुळवली आणि ’छाऽऽन!” अशी खूण केली.मनूनं उजव्या हाताच्या तर्जनीचा- पहिल्या बोटाचा- आकडा केला.तो दोन डोळ्यांच्यामधे लावला.मग तोच आकडा ओठाजवळ नेऊन त्याचे मुके घेतले आणि वाकला.स्टार्टर हाताने वर ओढल्याबरोबर मला कानावरचे दोन्ही हात सोडून मिळेल तो आधार पकडावाच लागला नाहीतर मी रिक्षाबाहेर फेकलाच गेलो असतो.मनूची रिक्षा नुसती सुरूच झाली नव्हती तर ती हवेत जणू उडायलाच लागली.मी पिशव्या आणि पैसे गच्च मांडीत धरून बसलो.लहानपणी जत्रेत गोल गोल फिरून चक्कर आणणारय़ा घोड्यावर कसंबसं गच्च बसत होतो, जीव मुठीत धरून.त्याची आठवण येऊन मजा येत होती.हे मेरी गो राऊंड आत्ता तरी फुकट होतं.
माणसं, रस्ता, दुकानं, इतर वहानं भिरीभिरी मागे पडत होती.सोबतीला झिनच्याक एफेम.सगळंच झिंग आणणारं होतं.मला हे अभूतपूर्व स्वप्नं दाखवणारा जादूगार माझ्या पुढेच बसला होता.आरशातून माझ्याकडे आणि बाहेरच्या त्या जुलमी दुनियेकडे हसत हसत पहात पुढे पुढे जात होता.
रिक्षा पुढे येईल ते भेदत जात होती.वळणावरच्या आजीआजोबांना तिचा अंदाजच आला नाही.ते भेलकांडले.आता काय होतंय म्हणून मी वाकून पहातोय तो रिक्षा पुन्हा वळली आणि त्या आजीआजोबांचं काय झालंय हे पहाण्यापेक्षा स्वत:ला सावरण्याच्या कामात मी गुंतलो.मनूच्या चेहेरय़ावर विजयी हास्य कायम होतं.आता रिक्षा करकचून थांबली.काहीही प्रयत्न न करता मी रस्त्यावर आलो.मनूनं माझी गचांडीच पकडली, म्हणाला, “कॅय? कशी वाटली सफर?” मी पुन्हा दोन्ही बोटं घट्टं जुळवून छाऽऽन! अशी खूण केली.
एखादा डिस्कोबार असावा रिक्षांचा तसा तो रिक्षास्टॅंड होता.एका खांबावर भला मोठा युनियनचा बोर्ड.रंगीत.रिक्षांच्या तीन चार रांगा.तरी माणसं उभीच.स्टॅंडवर रिक्षा आली रे आली की तिच्याभोवती घोळका जमायचा.लहान मुलंबाळं कडेवर असलेले घामाघूम बायका-पुरूष, म्हातारे कोतारे, आजारी, अपंगांना घेऊन येणारे गरजू.सगळ्यांचे चेहेरे भिकारय़ांपेक्षा लाचार.मला कळेना पैसे द्यायची तयारी असूनही ह्यांचे चेहेरे हे असे का?
एक आजी मनूकडे आल्या.मिनिमम भाडं.मनू म्हणाला, “एरिया माहित नाही!” आजी म्हणाल्या, “कशाला चालवतोस?” मनूनं शांतपणे पुढच्या रिक्षाकडे हात केला.आजी धावल्या.
कडेवर बाळ, हातात बॅग असलेली बाई पुढे झाली.रस्त्याचं काम चालू.मनू म्हणाला, “रिक्षा उधरकी नही!” बाई म्हणाली, “फिर क्या लंडन जाओगे?” मनू हसला.म्हणाला, “हो!”
एवढ्यात एक पायानं अधू माणूस कसाबसा पुढे झाला.त्याच्या हातात पुस्तकांचा भलामोठा गठ्ठा.मनूनं मान हलवली- नाही! लंगडा म्हणाला, “का?” मनू म्हणाला, “वजन आहे!” लंगडा म्हणाला, “मग काय हत्तीवरून नेऊ?” मनू हसला.म्हणाला, “तुझी मर्जी!”
आता घोळका वाढला.मनू शांतपणे मान हलवत राहिला.
घोळक्यातून एक रागावलेला तरूण सरसावला.त्याची बहीण आजारी.तरूण मनूच्या अंगावर आला.मनूनं त्याला एक लावली.तरूण उताणा पडला.वर पहातो तो युनियनचा बोर्ड!
शेवटी एअरपोर्टचं भाडं मिळालं.मनूनं मला पुढे त्याच्याजवळ बसवलं.मी स्वप्न भासणारय़ा जत्रेत नव्यानं शिरणार होतो आणि मनूची रिक्षा लोकांच्या सेवेसाठी धावणार होती.

Monday, November 15, 2010

कॉमेडी शो “सेवक”

ढाम ढाम तिडकिट तिडकिट… डोक्यात घण बसायला लागले आणि मी उठलो.घड्याळात बघतो तर अडीच.हे कधीचे अडीच? अरे ही तर रात्र! भर मध्यरात्र! गणेशोत्सव गेला, नवरात्र सरली, दिवाळी आली कधी गेली कधी? मग आता एवढ्या रात्री हा नाशिकबाजा कुणाचा? खिडकी बंद करून घेतली.नोव्हेंबर अर्धा सरत आला तरी ती बंद करायला लागत नव्हती.थंडी आता पुढच्याच वर्षी पडणार बहुतेक! तर खिडकी बंद केली.पंखा फूल्लं आहे ना? चार-चारवेळा बघितलं! ढाम ढामच्या कानठळ्या तसाच! या आवाजांची सवय कशी होत नाही आपल्याला? आणि हे डेसिबलचं क्रुसिबल मिरवणारे सगळं होऊन गेल्यावर कसे जागे होतात? तात्विक प्रश्न उभे राहिले.असले प्रश्न उभे करून काही उपयोग असतो का? माझं झोपेतंच असलेलं सुप्त मन मलाच छळायला लागलं.शेवटी खिडकी उघडून शिव्यांची लाखोली वहात (स्व त: ला च!) बाहेर डोकावलो.
मनूच्या सोसायटीतून आवाज येत होता.चार-पाच इमारतींच्या त्या सोसायटीत असंख्य हॅलोजनांच्या प्रकाशात गुलाल उधळून पोरं मनसोक्तं नाचत होती.त्यांच्या तारूण्यातल्या कैफाचा हेवा करावा तेवढा थोडाच.तेच माझ्या हातात होतं.माझा कैफ, वास्तवाचे चटके बसून बसून (ते कुठे बसले हे वेगळं सांगायला पाहिजे का?) कुठल्या कुठे नाहीसा झाला होता.छातीतल्या कफाने उचल खाल्ली.सळसळत्या तारूण्याचा तो अविष्कार डोळे फाड-फाडून बघत, कान खाजवत मी तसाच उभा राहिलो.दिग्मूढ की काय म्हणतात त्या अवस्थेत.पण आता माझ्याच काना-डोक्यातून ढाम ढाम आवाज यायला लागले.खिडकी बंद करून अंथरूणावर येऊन झोपलो तर चादरीतून, गादीतून ढाम ढाम.बाजूला सहचारिणी.तिला ढाम काय किंवा तडाम काय सगळं सारखंच.तिचं घोरणंही आता ढाम- आपलं हे- चांगलंच ठाम स्वरात चालू राहिलं.आता उजाडल्यावर मनूची खबरबात घेणं भाग होतं.
सकाळी उठून मनूच्या सोसायटीचं गेट पार करतो न करतो तोच मागून गलका ऐकू आला- साहेब आले! साहेब आले! मागे बघतो तर हीऽऽ गर्दी!
गर्दीतल्या एकानं कंपाऊंडवर ढकललंच मला आणि सिनेमातल्यासारखी एक अलिशान गाडी सोसायटीच्या आवारात उभी राहिली.एखाद्या महाकाय पक्षाचे पंख हवेत उघडावेत तशी तिची दारं वर उचलली गेली.पांढराशुभ्र हाफशर्ट, पांढरी फूलपॅंट, पांढरय़ा चपला घातलेले मनूसाहेब एका दरवाज्यातून बाहेर आले.कपाळावर भलामोठा उभा कुंकवाचा पट्टा आणि हाताला जाडजूड लाल धागे बांधून नुकतेच देवदर्शन (देव कुठला हे ज्याचं त्यानं ओळखायचं) करून आलेले.दुसरय़ा दरवाज्यातून उतरले काळ्या कपड्यातले दोघे.एके ४७ की ५१ की ५७ की काय ते घेऊन.साहेबांचा जयजयकार संपला आणि काय आश्चर्य! साहेब माझ्याकडेच झेपावले.मला मिठी मारली.कोण म्हणतं साहेब झाल्यावर साहेब जनतेला विसरतात? सुदाम्यासारखं माझ्या डोळ्यात पाणी तरारलं.माझ्या विरलेल्या पॅंटीच्या खिश्यात पोहे सापडताएत का ते मी चाचपू लागलो.
साहेब जिवणी फाकवून हसत विचारत होते, “कॅऽऽय…कसं काय? हे नेहेमीसारखं वेषांतर नाहीए हं! निवाससेवक झालोय मी निवाससेवक!”
अधिक भाबडा(?) होऊन माझ्यातल्या सुदामानं विचारलं, “म्ह-म्हणजे?”
साहेब म्हणाले, “वागाच्ये पंजे… अरय़े यड्या, आमच्या सोसाय्टीनं मला येकमुखानं निवडलंय निवाससेवक म्हणून! आता मी उद्धार करणार!”
मला उद्धार करणं म्हणजे लाखोली वहाणं हेच माहित.मी आ वासला नेहेमीप्रमाणे.
साहेब म्हणाले, “तोंड मिट.आता सगळ्या सोसाय्टीचं कल्याण!” असं म्हणून त्यांनी गाडीकडे बघितलं.म्हणाले, “कशी आहे?” मी सोसायटीकडे बघत होतो.इमारतींचा रंग उडालेला.भिंतींना भेगा.वरच्या मजल्यावर रहाणारे पावसात भिजत नसतील, स्लॅबमधून पाऊसच आत येत असेल.साहेबांनी माझं तोंड खासकन वळवलं, ओरडले, “अरे इकडे बघ! मुद्दाम सफेत गाडी घेतली, नाय तर लोक म्हणायचे काळ्या पैशाची म्हणून!” “तू-तुम्ही घेतली? माझा अडाणी प्रश्न… माझ्या डोक्यावर टप्पल मारून साहेब म्हणाले, “सामान्यच रहा तू नेहेमी.सोसायटीवाल्यांना घ्यायला लावली.नाय तर म्हणालो, कुटलीच कामं होणार नाहीत!”
मनूसाहेबांच्या भाषेत आता बरय़ापैकी रांगडेपणाही आला होता.साहेबांनी माझ्या खांद्यावरून हात घालून मला पुढे ओढलं. “चल!” म्हणाले.मधेच थांबून जयजयकार करणारय़ांना हात दाखवला.भाडोत्री मोर्चेवाल्यांसारखे हात दाखवणारेही थांबले. साहेबांचं चालू झालं, “साल्यांना एकत्र यायला नको कधी.कामं कोणी करायची यावरून नेहेमी हमरातुमरी.सोयी सगळ्या पाहिजेत.संडासची टाकी वहायला नको.पाणी वर चढवायचा पंप बिघडायला नको.चोरय़ा व्हायला नकोत.भिंतीतून, छपराच्या स्लॅबमधून गळती नको.इमारतींच्या आवारात कचरा नको.अरे म हवंय काय?” गुटख्याची पुडी करकचून फाडून तोंडात रिकामी करायला म्हणून साहेब थांबले आणि मी डाव साधला- “पण सहजासहजी घेऊन दिली त्यांनी गाडी?” साहेबांनी तोंड वर केलं. “सॅहॅजॉसॅहॉजी…” तोंडातला गुटखा जिभेने एका बाजूला करून ते पुढे म्हणाले, “त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आणखी कठीण करून ठेवणं भाग पडलं!” मी विचारलं, “म्हणज्ये?” बावळट ध्यानाकडे बघावं तसं माझ्याकडे बघत साहेब म्हणाले, “ड्रेनेजचं काम चालू केलं, अर्धवट ठेवलं.पंप नुसता खोलूनच ठेवला.भिंतींना पराती बांधून भर दुपारी ठोकाठोक चालूच ठेवली.पण लोकांची सहनशक्ती चिकार!” असं म्हणून त्यांनी गुटख्याची पिचकारी मारली.पायरीवरच.पुढे बोलायला लागले, “मी त्यांच्यापेक्षा चिवट.शेवटी खोललेल्या ड्रेनेजच्या झाकणात एक म्हातारा पडला आणि एका बाईच्या पाठीत भिंतीवर भर दुपारी ठोकाठोक करणारय़ांची छिन्नी बसली आणि माझं काम सोप्पं झालं!”
आता मी संवाददाता झालो.म्हणालो, “मुदत किती?”
साहेब म्हणाले, “पाच वर्षं!”
मी विचारलं, “त्यानंतर?”
साहेब म्हणाले, “पुन्हा प्रॉब्लेम्स आणखी कठीण!”
“मग?” –मी विचारलं.
ते म्हणाले, “मुदतवाढ!”
“मुदतवाढीच्या टर्ममधे नवीन काय?” मी विचारलं.
ते म्हणाले, “मला नवीन फ्लॅट आणि निवाससेवक परिषदेची स्थापना!”
मी विचारलं, “त्याने काय होणार?”
ते म्हणाले, “प्रगती!”
मी दुरूस्ती केली, “निवाससेवक परिषदेच्या स्थापनेनं काय होणार?”
“तेच सांगतोय ना! निवडणूक होणं बंद!” मला मूर्खात काढत ते म्हणाले.
मी तरीही घेतला वसा सोडला नाही, विचारलं, “त्यानंतर?”
ते म्हणाले, “एक इमारत माझ्या नावावर!”
मी म्हणालो, “शाब्बास!”
ते म्हणाले, “मग आख्खी सोसाय्टी- हा सहनिवास- माझ्या मालकीचा!”
साहेब आणखीही पुढे बरंच म्हणत होते आणि मी श्वास घ्यायला जागा शोधत होतो!

Thursday, October 28, 2010

कॉमेडी शो “दिवाळीचा सीझन”

दिवाळीचा सीझन हा आपल्या मनूच्या दृष्टीने फार मोठा असतो.जवळजवळ महिनाभर मनू त्याच धुंदीत असतो.एखाद्या अट्टल नशेकरय़ासारखा.त्याच्या गोड बोलण्याला यावेळी ऊत येतो.मी सतत त्याच्याबरोबर असूनही मला मधूमेह कसा होत नाही याचंच मला नवल वाटतं.या महिन्याभरात मनू कुठेही केव्हाही दिसतो.परमेश्वरासारखा तो सर्वत्र संचार करत असतो.परमेश्वर सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मी पामर काही जाणू शकत नाही.मनू सर्वत्र संचार करून नक्की काय करतो हे मला पक्कं ठाऊक असतं.तो करतो ते मी करू शकत नाही म्हणून त्याच्या दृष्टीने मी सतत पामर ठरत आलो आहे.
शाळेत असताना मी ’बॉयस्काऊट’ मधे होतो.वर्षातून एकदा आम्ही घरोघर फिरून, पडेल ती कामं करून पैसे कमवत असू.त्याला ’खरी कमाई’ असं नाव होतं.मनू आमच्यात नसे.तो नाक्यावर उभा राहून कुणी कुणी टाकलेली सिगारेटची थोटकं शोधे आणि आम्हाला हसे.खरय़ा कमाईतून आम्ही शाळेसाठी देणगी म्हणून काही वस्तू आणत असू.मनू बापाच्या खिश्यातून चोरलेल्या बिड्यांचा धूर काढत आम्हाला मूर्खात काढत असे.आज तो एकही पैसा खर्च न करता दिवाळी साजरी करतो.वाण्याचे, दुधाचे, विजेचे, गॅसचे, अशी असंख्य बिले इमानदारीत भरून आलेली दिवाळी कधी निघून जाते याचा मला थांगपत्ता असत नाही.दिवाळीत माझ्या पाठीचा काटा ढिला झालेला असतो.मनू मात्र टेचात असतो.रोज रंगीबेरंगी वेष्टन असलेले गिफ्ट बॉक्सेस मिरवत, आपलं सुप्रसिद्ध हास्य फाकवत विजेत्याच्या रूबाबात घरी जात असतो.
मनूला सगळ्या कला अवगत आहेत.अडिअडचणीत असलेला माणूस तो आधीच हेरतो.माझ्यासारखा सदैव आणि सर्वत्र अडचणीत पडलेला कफल्लक माणूस त्याच्या कामाचा नसतो.’हेरतो’ म्हणजे तो नेमकं काय करतो ते आता तुम्हाला कळलं असेलच.त्याच्या भाषेत या प्रकाराला फिल्डिंग लावणं असं म्हणतात.मनूला बरोबर माहित असतं की कामाची माणसं या सीझनमधे स्वत: बाहेर पडत नाहीत.आपल्या नोकरांना, चाकरांना पुढे करतात.समोर आलेल्या या प्रतिनिधींना कसं वेठीला धरायचं हे मनूचं ठरलेलं असतं.माझं काय करणार? (म्हणजेच माझ्यासाठी काय आणणार?) हे मनू वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो.ते पहाणं खूपच गमतीदार असतं.तो कुणाला हात हलवून ओळख दाखवता दाखवता हातानेच ’काय?’ असं विचारतो.कुणासाठी नुसती भुवयांची हालचाल उपयोगी ठरते.मनूचे बोलके डोळे या सीझनमधे बरंच काम करून जातात.रात्री तो ते एका बंद पेटीत काढून ठेवत असावा असा माझा दाट संशय आहे.त्याशिवाय ते दुसरय़ा दिवशी काम करणारच नाहीत.
कुणाला हात मिळवून तो हळूच दाबणं, “याद है ना?” “काय करताय?” असं चक्कं विचारणं, या सगळ्या प्रकारांनी साधलं नाहीच तर गुरकावणं हे मनूचं दिवाळी भेट मिळवण्याचं अस्त्रं असतं.नेहेमी दिवाळी न देणारय़ांना या सीझनमधे तो हाडवैरय़ासारखा वागवतो.नेहेमी देणारे हे त्याच्या दृष्टीने परमेश्वर असतात.ज्याने मूक होकार दिलाय त्याला मनू बरोबर हेरतो.या हेरण्यावरून मला नेहेमी वाटतं की मनू पोलिसात किंवा सीबीआयमधे असायला हवा होता.गुन्हेगार शोधण्याचं मरू द्या हो, मनू एव्हाना करोडपती तरी झाला असता.बिना लाईफ लाईन के! तर अश्या हेरलेल्या सावजाचा माग काढत त्याच्या ऑफिसपर्यंत जाणं आणि दिवाळी पदरात पाडून घेणं ही मग फारशी कठीण गोष्टं रहात नाही.
मनूचं हे सगळं मला अजिबात पटत नाही.माझ्या नेहेमीच्या केविलवाण्या पद्धतीने मी या सगळ्याचा त्याच्याजवळ निषेध व्यक्तं करायचा प्रयत्न करतो. “तुला हे जमत नाही ना म्हणून तुझी जळते!” हे मनूचं त्यावरचं उत्तर.त्यानंतरचं त्याचं ते सुप्रसिद्ध फवारा उडवत कुत्सित खिदळणं.माझी तळपायाची आग मस्तकाला भिडते.मग मी हजारापासून उलटे अंक मोजायला सुरवात करतो.यावेळी मनूने तीही संधी दिली नाही आणि मी उसळलोच, “अरेऽऽ भीकेची लक्षणं आहेत हीऽऽ…” ओरडल्यावर मी नेहेमीप्रमाणे चपापून इकडेतिकडे बघितलं.प्रत्येकजण आपापल्या सावजाला आपल्याला पद्धतीने पटवून दिवाळी गटवण्याच्या खटपटीत असलेला मला दिसला.मग मी मनूकडे पाहिलं.तो हसला.त्याचं हे हसणं भयानक असतं.इथे माझा जीव जात असतो.सात्विक संताप अनावर झालेला असतो.मनू पुन्हा हसतो.मला हसावं की रडावं कळत नाही.माझा हात धरून तो मला खाली बसवतो.कुणाच्या तरी नावावर चहा मागवतो आणि आपल्या अत्यंत मृदू, मुलायम आवाजात प्रवचन सुरू करतो.एव्हाना मला तो कुणी ’बापू’ किंवा ’महाराज’ सारखा दिसायला लागतो. “पोस्टमन काय करतात? पालिकेचे कामगार काय करतात? बेस्टवाले, रेल्वेवाले आणि आणखी कुठलेही वाले काय करतात?- दिवाळी आली की ’बंद’ करतात! आपली जनता वर्षानुवर्षं या ’बंद’ च्या कडीकुलपात अडकलेली अडकते.काय बोलते का ती? तोंड आहे का तिला? करं कोण भरतं? त्या भरलेल्या कराचा फायदा कोणाला? मूकबधीर जनतेला कुठल्या डॉक्टरकडे न्यायचं?”
च्यामारी! मी काही वेगळंच बोललो होतो आणि मनूची गाडी नेहेमीप्रमाणे वेगळ्याच रूळावर? मी पुलावर आणि तो रूळावर? माझा ’आ’ वासलेलाच राहिला.
“यड्याऽऽ यातले दोन बॉक्स तूही घेऊन जा!” असं म्हणून मनूने मला टप्पल मारली तेव्हा जगातला सर्वात मूर्ख माणूस मीच याची पूर्ण खात्री मला पटली!

Wednesday, October 20, 2010

मनू, मी आणि दिवाळी अंक!

मनू हा माझा मला न टाळता येणारा सहचर आहे हे वाक्य जेव्हा मला सुचलं तेव्हा मी स्वत:वर जामच खूष झालो.नाहीतरी काळ्यावर पांढ- माफ करा- पांढरय़ावर काळं करणारे किंवा आजच्या जमान्यात हवेतल्या हवेत ब्लॉगपोस्ट्सरूपी बार उडवणारे स्वत:वर खूष असतातच म्हणे!
एरवी जगात इतक्या वेगवेगळ्या नात्यांमधे मनू मला भेटतो की तो म्हणजे कोण याची व्याख्या करणं कठीण.ह्या नात्यांच्या गुंतागुंतीत अडकून माझाच मनू होतोय की काय असं वाटायला लागलं आहे.
मी लिहितो.आपल्या भाषेलाच घरघर लागली आहे असं म्हणताना मी काय तारे तोडतोय ते तुमच्या समोर आहेच.तारे तोडता येईनात आभाळच वाकडं अश्या एका संभ्रमित सर्जनावस्थेत (?) मी एक कादंबरीच लिहिली आहे असा एक दिवस माझा समज झाला.सालं हे एक मोठं धाडसंच होतं.झालं! मला झोप लागेना.
याच दरम्यान कधीतरी मनूची आणि माझी भेट झाली.
“दिवाळी अंकाची तयारी करतोय!” चेहेरा लांबट करून तो तसाच ठेवत, केसांच्या रूपेरी बटांशी खेळत तो म्हणाला आणि टक लाऊन माझ्याकडे पहात राहिला.
“व्वा! व्वा! अरे तू म्हणजे-” भानावर येऊन मी म्हणालो.
“तू नाही! तुम्ही-तुम्ही!!” आख्ख्या डाव्या हाताने बटा कपाळावरून डोक्यावर सरकवत तो आत्मविश्वासाने म्हणाला.हसलाही नाही.
“हो…हो…तुम्ही-तुम्ही...अभिनंदन…आणि-आणि ऑल द बेस्ट!” एवढं बोलून झाल्यावर मनूच्या एकूण अवतारा-अविर्भावाकडे बघून मी गप्पच झालो.तो टक लाऊन बराच वेळ माझ्याकडे पहात राहिला आणि गाल वाकडा करणारं संपादकीय स्माईल करून दिसेनासा झाला.
मजा म्हणजे त्या दिवसांत आम्ही बरय़ाच वेळा भेटलो.वेगवेगळ्या छायाचित्रणस्थळी त्याच त्या संवादांचे प्रसंग सादर व्हावेत तसे तोच तोच सीन सादर होऊ लागला.मनू तसाच करडी टक लाऊन ’दिवाळी अंकाची तयारी करतोय’ असं सांगतोय, त्याच्या टक लावण्याने हैराण होऊन मी गप्पं होतोय, तो दिसेनासा होतोय!
बरय़ाच गोष्टींचे अर्थ मला झोपेतून दचकून जाग आल्याशिवाय कळतंच नाहीत.मनूच्या टकीचा अर्थ असाच लागला. ’मी माझं लिखाण तुला देऊ का?’ असं मी होऊन मनूला विचारायला हवं होतं.मी प्रथितयशच काय एखादा बनचुकाही लेखक झालेला नसल्यामुळे मी गरीबडा बापडा गप बसत होतो.त्यात मी आधीच केलेलं नको ते धाडस.हातातल्या लिखाणाला कादंबरी समजण्याचं.
मनू माझा जिवलग.तो मला थेट का विचारत नव्हता?... याचा अर्थ मला गरज होती!!! हा साक्षात्कार झाल्यावर मात्र मी बैचेन झालो.संधी एकदाच येते व दार ठोठावते हे व अशा अर्थाची देशी मॅनेजमेंट गुरूंची अनेक मुक्ताफळं माझ्याभोवती दिवसरात्र पिंगा घालू लागली.शेवटी मी मनाचा हिय्या केला.मागच्या अनेक वेळच्या तू-तुम्ही मुळे मनूला प्रत्यक्ष भेटण्याचं धाडस म्हणजे आणखी एक नको ते धाडस आणि मी पडलो मध्यमवर्गीय.शेवटी हो-ना करता करता माझी कादंबरीची संहिता कुरियरद्वारे मनूच्या पत्त्यावर पाठवून दिली.अर्थात तू-तुम्हीच्या खेळामुळे हा कोण? असा वाजवी प्रश्न पडून संहिता न वाचताच (केराच्या टोपलीत) पडू नये म्हणून सोबत माझा परिचयही जोडला.
आठ दिवसातच स्वत: मनूचा फोन आला आणि माझा आनंद गगनात मावेना.परिचय जोडण्याचा विक्षिप्तपणा का केलास म्हणून त्याने सर्वप्रथम माझी हजेरी घेतली.मी ते ही वाचलं असं त्यानं मुद्दाम नमूद केल्यासारखं सांगितलं.माझ्या अक्षराचं त्यानं मनापासून कौतुक केलं.हा मनू की डेल कार्नेजी ते मला कळेचना.तो मला चक्कं अहो-जाहो करत होता.मी ताबडतोब हरभरय़ाच्या झाडावर चढलो.
“पण सॉरी… माझं या वर्षीच्या अंकाचं काम झालंय-”
“एवढ्यातच?ऽऽऽ” मी जोरात किंचाळून खजुराच्या झाडावर लटकलो.
“यावेळी काय? नेहेमीच! एक दिवाळी अंक छापून आला की लगेच पुढच्या अंकाची तयारी!”
“सहा महिने आधीच अंकाचं काम पूर्ण?” माझ्या पडण्याला आता बुचकळाही कमी पडत होता.
“माझी पद्धतच आहे तशी! न छापलं गेलेलं चांगलं साहित्य मी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवतो.” मनूचा स्वर अधिकाधिक मृदू, मुलायम होत होता.अशावेळी आवाजात थोडी बायलेपणाची छटाही डोकावते.माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
“मग?” मनूनं जरा चढ्या स्वरात विचारलं.
“…पण…कसं वाटलं तु-तुम्हाला?” मी.
“चांगलंए…वेगळंए…पण कायए…पुढच्या वर्षीचंसुद्धा प्लानिंग झालेलंए त्यामुळे-”
अरे बापरे! मी मनातल्या मनात म्हणालो.मनूच्या अंकाला खरंतर बाजारात कोणी विचारत असण्याची शक्यता कमी होती.खरं तर म्हणूनच मी एवढं मोठं धाडस करायला धजलो होतो.मग मी फोन ठेवण्याच्या बेताला आलो.
“तरीही मला भेटा तुम्ही…संहिता परत घेऊन जा.आणखी कुठे जरूर प्रयत्न करा…संहिता घ्यायला प्रत्यक्षच आलात तर बरं होईल…कायए…दुसरा एक अंक काढतोय…कृषीविषयक…द्या तीन-चार पानी काही.चांगलं लिखाणए तुमचं…अक्षर सुंदरए-”
“कृषीविषयक काहीही लिहिता येणार नाही हो मला! काळ्या आईचा आणि माझा आयुष्यात कधी संबंधच आलेला नाही!” मी केविलवाणा होऊन कळवळून म्हणालो.
“मला भेटा!” आयुर्विमा एजंटच्या अविर्भावात मनू म्हणाला, “सोपं आहे हो मी तुम्हाला ब्रीफ करीन.काही कठीण नाही.तुम्ही सहज लिहाल.” मनूनं मला डायरेक्ट पंखाखालीच घेतलं पण माझं मन मला शंभर पानांवरून एकदम चार पानांवर येऊ देईना.शिवाय मागणीनुसार लेखन अर्थात ऑन डिमांड रायटिंगमधे सापडून डोक्याचं जे भजं होतं त्याच्याशीही मी परिचित होतो.
“केव्हा भेटता?” –मनू
“भेटतो…लवकरच…” –मी
“हं!...एरवी काय करता?”
“नोकरी”
“कुठे?”
“सरकारी खात्यात आहे…कारकूनच…नुकताच जाहिरात आणि प्रसिद्धी विभागात बदलून आलोय…” “तिथे ते हे आहेत का हो अजून…”
मी हो हो म्हटल्यावर मनूने मग ते कसे माझ्या चुलतबहिणीच्या मामेनणंदेचे मावसदीर आहेत, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत वगैरे पद्धतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम मांडला.मला हो ला हो करणं भाग होतं.
“एनी वे…भेटा मला.बोलू आपण.”
“थॅंक्यू व्हेरी मच साहेब! हल्लीच्या साभार पोच इत्यादी सगळं काही नामशेष झाल्याच्या जमान्यात आपण आवर्जून फोन केलात त्याबद्दल!”
मनू मनापासून कौतुकाने हसला.या! असं म्हणून त्याने फोन ठेवला.
नकार पचवणं खूप अवघड असतं.तुम्ही सामान्य असलात तरीही.नैराश्याचं मळभ दाटून रहातं.अश्यावेळी मी अधिक सर्जनशील कामांकडे वळतो.कपड्यांच्या घड्या घालणं, घरातला पसारा आवरणं, मुलाचा अभ्यास आता मी घ्यायलाच पाहिजे असं स्वत:च्या मनाशी म्हणणं…
यावेळी बाहेरगावीच जायचं असल्यामुळे निर्धास्त झालो.त्या आधी मनूच्या घरी माझ्या कादंबरीची संहिता परत घेण्यासाठी फोन केला.मनूच्या कोण्या नातेवाईकाने तो घेतला.चुकतमाकत अमुक वाजता या, भेट होईल, संहिता मिळेल असा निरोप त्याने दिला.घरी गेलो.मनू नाही.दुसरय़ाच दिवशी गावी जायची तयारी बाकी असल्यामुळे अजून अर्धा तास वाट बघणं मला शक्य नाही.मग भ्रमणध्वनीचा सहारा.संहितेची शोधाशोध.संहितेचं सापडणं (एकदाचं!) आणि शोधणारय़ा पात्राचे आभार मानून माझं तिथून निघणं.बाहेरगावी जाणं आणि सगळं विस्मृतीत ढकलणं जाणं…
“हॅलोऽ–”
“हॅलो…”
“हॅलो मी बोलतोय!”
“कोण मी?” बाहेरगावाहून आल्यापासून हा तिसरा प्रथमपुरूषी एकवचनी.दोघांना मी आधीच गारद केलेलं.आता मी हातघाईवर.
“मीच!”
“च्यामारी-”
“कृषीविषयक लिखाणाचं कुठपर्यंत आलंय?” आधी पारा चढू द्यायचा मग त्यावर बायकी शैलीत पाणी- संपादकी हतकंडे- माझ्यातला होतकरू आणि जागरूक लेखक लगेच जागा झाला.
“सा- साहेब- झालाच-झालाच आहे- शेवटचा हात फिरवतोय-” माझी लोणकढी.
“हं…दोनच पानी झाला असता-”
“हो- होईल-” माझ्यातला अगतिक लेखक.
“पण माझं त्या पुढच्या वर्षाचंही काम झालंय…”
आता माझ्यातला होतकरू, जागरूक, अगतिक लेखक इतकंच काय सज्जन माणसाचाही कडेलोट झाला आणि माझ्या मनात फुल्या फुल्या आणि फुल्याच.त्यात मध्यमवर्गी विवेकाचं आगमन.या सगळ्यामुळे माझ्याकडून भला मोठ्ठा पॉज.
“ऑफिस काय म्हणतंय?” मनूचा आवाज आणखी बायकी.आणखी खवचट.
यापुढे मात्र चमत्कार झाला.माझ्यातोंडून दत्तगुरू वदले असतील- नसतील- आमच्या गल्लीतले बापू तरी नक्कीच वदले असणार!
“एक जाहिरातदार भेटले होते ऑफिसात.कुणी दिवाळी अंक काढत असेल-” माझी लोणकढी मला पूर्ण करावीच लागली नाही.
“आहात तिथेच थांबा.मी ताबडतोब येतोय!” खट्ट!- रिसीवर आपटल्याचा आवाज!
पर्वतच महंमदाकडे येत होता.
यशस्वी साहित्यिकाची सगळी बीजं माझ्यात होती तर!
निदान कृषीसाहित्यिकाची तरी!
संमेलनाध्यक्ष होणं आता मला अजिबात कठीण नव्हतं!
मी लगेच स्वत:वर खूष झालो आणि माझ्यातल्या साहित्यधर्माला जागलो!

Tuesday, October 12, 2010

कॉमेडी शो ’मतदारराजा!’

या वेळी मी मनूला लगेच ओळखलं.नेहेमी वेगवेगळी सोंगं काढून मला उल्लू बनवणं हे त्याचं कामच झालं होतं.या वेळी पांढरेधोप कपडे घालून तो दारात उभा राहिला.डोक्यावर गांधीटोपी घातलेला.दोन्ही हात जोडून.मला म्हणाला, “मी उभा आहे!” – “ते दिसतंच आहे!” मी म्हणालो आणि खवचट हसलो.त्याचं ते फवारे उडवून हसणं, जिवणी फा-फाकवणं, वा-वाकून कृत्रिम अभिवादन करणं, तोंडावर दुनियेभरची लाचारी आणणं हे सगळं नसतानाही मी त्याला ओळखलं म्हणून मनातल्या मनात मी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
तो पुन्हा म्हणाला, “मी उभा आहे!” मी म्हणालो, “च्यायला मग बस की! आज काय पहिल्यांदाच आलाएस?” – “मला वेळ नाहिए बसायला, मी उभा आहे!” तो म्हणाला.मी मनूकडे निरखून बघितलं.अजिबात कुत्सितपणा नव्हता त्याच्या बोलण्यात.मीच जरा तिरकस झालो.म्हणालो, “काय? कुठलं घोडं मारायला जायचंय आज?” मनू आणखी गंभीर झाला.म्हणाला, “राज्या, ही चेष्टेची वेळ नाहिए.बरीच कामं पडलीएत.महापालिकेची निवडणूक लढवणं म्हणजे घोडं मारायला जाणं नव्हे.तुझ्यासारखा सुजाण मतदार जर असा बोलायला लागला-” मी उडालोच! म्हणालो, “थांब! थांब! थांब मनू! काय म्हणालास? तुला तिकीट मिळालं शेवटी? कुणी दिलं? कुणी दिलं सांग मनू? सांग!” सिनेमातल्या बालनटानं हिरोच्या हाताला हिसके मारावेत तसे मी मनूच्या हाताला मारू लागलो.सिनेमातल्या निर्विकार ’मनमोहन कृष्ण’ने डोळे आणखी निर्विकार (?) करत नजर वळवत पुटपुटावं तसं मनू पुटपुटला, “कठीण आहे! या महानगरातली जनता प्रौढ झालीए असं मला वाटत होतं.मनूचे ते डोळे माझ्याकडे वळले आणि मनू बोलू लागला, “अरे कुणाकडून तिकीटं घ्यायची? सगळे राजकिय पक्ष कसे आहेत?” मी उदगारलो, “सगळे एकजात एका माळेचे मणी!” मनू म्हणाला, “आहेत ना? त्यांनी काय भलं केलंय?” माझ्यातला मतदारराजा आता चवताळलाच, “गटारीत टाकलं रे महापालिकेच्या.ते ही अंडरग्राऊंड!” मी म्हणालो.मनूनं विचारलं, “पोरांना खेळायला ग्राऊंड्स आहेत?” मी विचारलं, “अंडरग्राऊंड?” मनू समजूतदारपणे म्हणाला, “नाही रे राजा, प्लेग्राऊंड!” माझ्यातली सद्सद का कसली विवेकबुद्धी आता जागृतच झाली.मी तडफडून म्हणालो, “नाही रे सगळी मैदानं बिल्डर्सच्या घश्यात घातली.हेच नगरसेवक.हेच बांधकामव्यावसायिक.आता आमची पोरं सतत त्या टीव्हीच्या डोक्यावर तरी बसतात किंवा आमच्या तरी!” मनूनं विचारलं, “बरं अत्यावश्यक सेवांचं काय?” मी करवादलो, “अरे सेवा कसल्या? मेवा खायला कुठून कुठून जमा झालीएत सगळी!” मनूनं विचारलं, “कुठून?” मी म्हटलं, “उमेदवारांची यादी बघ यावेळची! अर्ध्याच्या वर परप्रांतीय आहेत! अर्धे उमेदवार पूर्वी असलेल्या नगरसेवकांचे पित्ते आहेत.बायका-मुलं, आया, बहिणी आहेत.जवळजवळ सगळ्यांचं विभागातलं कार्य म्हणजे विभागात रहाणं, तिथेच धंदा करणं, आनंदमेळे भरवणं, वेगवेगळ्या उत्सवांना लोकांकडून देणग्या वसूल करून ते प्रायोजित करणं, झेंडे लावणं, मोठमोठी कामं केली म्हणून बोर्डावर लिहून स्वत:चंच अभिनंदन करणं.त्या बोर्डाला शंभर रूपयांच्या नोटांचा हार घालणं, ’आमचं नेतृत्व’ म्हणून दाखलेबाज चेहेरय़ांच्या पिलावळीनं दादा-भाऊ-साहेबांसकट आपलेही फोटो फ्लेक्सबोर्डांवर झळकवणं, भिंती रंगवणं, हॅंडबिलं वाटणं.हे यांचं सामाजिक काम?” मी मनूलाच लांबलचक प्रश्न विचारला.
मनूनं माझ्या थरथरत्या खांद्याला थोपटलं आणि शांतपणे म्हणाला, “कुणी बदलायचं हे चित्रं?” मी पटकन विचारलं, “कुठलं?” मनू म्हणाला, “अरे असं काय करतोस? हे असं नुसतं बोलून पेटून उठणं सोपं असतं राजा.दर निवडणुकीला असा शाब्दिक पेटून उठतोसच तू.पण तुझ्या हातातच खरी शक्ती आहे बाबा!” मी माझ्या दोन्ही हातांकडे बघायला लागलो! मनू म्हणाला, “हे आहे! प्रत्येक शब्दाचा शब्दश: अर्थ घेतोस तू!” मी गोंधळून मनूकडे बघितलं.त्यानं माझा हात हातात घेऊन पालथा केला.पहिल्या बोटाच्या नखावर दाबत म्हणाला, “इथे फक्त एक शाईचा ठिपका उमटून घ्यायचा.हिच तुझी शक्ती!” मी कळवळून म्हणालो, “अरे नेहेमी उमटवलाय रे! लांबलचक लाईनीत उभं राहून.कुठल्याही पक्षाचा चहा, वडापाव, पुरीभाजी न खाता.आपल्याला हवं तसं सत्याचं राज्य यावं म्हणून.या एकाच हक्कानं आपलं आयुष्य आपल्याला बदलता येईल नाही तर काहीच नाही.फक्त अंधार.एवढी जाणीव ठेऊन.पण भलभलतेच निकाल लागतात रे! वडापाव, पुरीभाजीच काय, दारूसकट सगळंच देणारे निवडून येतात.निवडून आले की आम्हा सामान्य माणसांना ते काय लक्षात ठेवतात? अरय़े महापालिकेसारख्या निवडणुकीच्या निकालाला लगेच चाकू-सुरे निघतात.हे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार काय रे सभागृहात बसून?” मला पुढे बोलवेचना.मनूच्याही डोळ्यात पाणी तरारलं.आज हे सगळं काही नवीनच होतं.
मनूनंच मला धरून खुर्चीवर बसवलं.शेजारी तो बसला.समजूतदार आवाजात म्हणायला लागला, “राजा, झालं ते झालं.अरे आपण, तू आणि मी मिळूनच हे सगळं बदलू शकतो.फक्त आपला विश्वास पाहिजे.स्वत:वर.एकमेकांवर.आणि विश्वास पाहिजे हे सगळं एक दिवस बदलणारच आहे या गोष्टीवर!” माझ्या खांद्यावर हात दाबत तो म्हणाला, “हे बघ! मी अपक्ष म्हणून उभा रहातोय.स्वखर्चानं.माझी निशाणी आहे आकाश.मोकळं आकाश! तेव्हा तू डोळे पूस आणि मला-” मनूचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.मी हाताची मूठ वर करून जोरात ओरडलो, “ताई माई आक्काऽऽ मोकळ्या आभाळावर-” माझी मूठ वरच राहिली.कुणीतरी घट्टं पकडून ठेवलेली.मी हिसके मारायला लागलो.शेवटी जागा झालो.लोकल ट्रेनमधे होतो.कामावरून घरी परतताना झोप लागली होती.शेजारी बसलेला मनू माझी मूठ धरून उठवत मला म्हणत होता, “अशी स्वप्नं बघायची सोडून द्ये राज्या, नायतर येडा होशील!”
मी खरंच येड्यासारखा मनूच्या चेहेरय़ाकडे बघत राहिलो.मला सत्य काय स्वप्नं काय काहीच समजत नव्हतं!

Thursday, October 7, 2010

कॉमेडी शो “तिकीट”

“मला तिकीट हवंय यार! मला तिकीट हवंय!” सकाळपासून मनू पाचव्यांदा म्हणाला.आज कधी नव्हे ते तो नर्वस दिसत होता.बरोबर मी असतानाही स्वत:शीच बडबडत होता.शेवटी त्याला ’लक्ष्मीविलास’ मधे नेलं.भजी मागवली.चहा मागवला.पैसे अर्थात मीच देणार होतो.मनूनं ताव मारायला सुरवात केली. “तिकीट हवॉय यॉर मॉलॉऽ” हादडतानाही तोंडातलं तिकीट, तिकीट सुटत नव्हतं.
मी समजुतदारपणे विचारलं, “कुठलं तिकीट हवंय मनू तुला?” वेड्यानं मानसोपचारतज्ज्ञाकडे बघावं तसं माझ्याकडे बघून तो पुन्हा शून्यात गेला आणि भजी चावायला लागला.मला त्याची दया आली, विचारलं, “पोस्टाचं तिकीट देऊ? स्टॅंप की रेवेन्यू स्टॅंप देऊ? रेल्वेपासच्या मागे ठेवलेले असतात मी.थांब बघतो हं!” - “यडा आहेस यार तू!” भजी गिळत मनू ओरडला, “काय कळतं काय तुला? मला तिकीट हवंय यार! छ्या: तिकीट! तिकीट! तिकीट हवंय!” चहावाल्या भटाच्या बर्नरच्या आवाजाने माझी लाज राखली नाहीतर लोक जमलेच असते भोवती.बघ्यांना काय हव्याच असतात अश्या गोष्टी.मी समजुतदारपणा सोडला नाही.सामान्य मध्यमवर्गीय असल्यामुळे मी तो सहसा सोडत नाहीच.म्हणालो, “मग बसचं देऊ का? शाळेत असताना दहा पैशाचं तिकीट होतं बसचं.ते पण जपून ठेवलंय.पुढे बरं असतं रे पोरा-नातवंडांना महागाईच्या गोष्टी सांगायला.ते देऊ की कालचं आठ रूपयाचं देऊ?”- “मरू दे रे!” मनू पुन्हा खेकसला.डॉक्टरनं वॉर्डबॉयकडे न बघता बोलावं तसं तो म्हणाला, “तुझं म्हणजे नं-” आणि पुन्हा तो शून्यात गेला. “तिकीट हवंय! तिकीट हवंय यार!” हे चालूच होतं.
मी आज समजुतदारपणाची एक एक पायरी चढायचं ठरवलंच होतं.पुन्हा विचारलं, “का रेल्वेची देऊ तिकीटं? पोरानं जमवलीएत खूप! दहा-पंधरा वर्षांपूर्वी हनिमूनला गेलो होतो, ऑफिसमधून पैसे उचलून, ती सुद्धा आहेत तिकीटं जपून ठेवलेली.म्हटलं पुन्हा कधी लांबच्या ठिकाणी जायला जमणार नाही.नुसतं तिकीट बघून समाधान तरी मिळेल.ती देऊ? का पासच देऊ जुना? गेल्या महिन्याचा? तो पण असतो माझ्याकडे.नाही तर असं करतो, कुपन्स काढलीएत बघ रेल्वेनं! दिसायला आणि वापरायला साधी.सोपी.मशिनमधे घालायची.एका स्टेशनवरचं पाचापैकी एक तरी मशिन कधी कधी चालू असतंच बघ.ती देऊ?” आता मनूनं नुसतंच माझ्याकडे बघितलं.कीव, राग संताप, किळस असे अनेक भाव त्याच्या चेहेरय़ावर आले आणि गेले. “हूंऽऽ” असा आवाज काढून तो पुन्हा शून्यात गेला.
मी त्याच्यापुढ्यातला भरलेला चहाचा ग्लास त्याच्या आणखी जवळ सरकवला.मला मनूकडे बघवत नव्हतं.त्याच्या डोक्यात सॉलिड कुरतडत असावं.मला त्याची आणखी काळजी वाटायला लागली.समोरचा चहाचा भरलेला ग्लास तोंडावर बसेल हा धोका पत्करूनही मी आणखी समजुतदार झालो.म्हणालो, “नायतर असं करू का मनू, माझ्या बायकोच्या आतेभावाच्या मावसबहिणीचा चुलत मेव्हणा कलमाडींच्या ऑफिसात आहे, त्याच्या ओळखीने सवलतीत किंवा कदाचित फुकटसुद्धा कॉमनवेल्थचं चालू तिकीट मिळेल.जातोस? त्वरा करावी लागेल.पुढचं बांधकाम कोसळायच्या आत आणि भारताला पदकं मिळणं बंद व्हायच्या आत जावं लागेल! जातोस? –म्हणजे आपण प्रयत्न करायचे.उद्या आणखी पदकं मिळाली की कलमाडी त्याचं श्रेय स्वत: लाटणार किंवा पदकं बंद झाल्यावर राष्ट्रप्रेमाचं काय करायचं असा नवीन प्रश्न निर्माण होणार आणि तेव्हा तिकीट मिळणार नाही! मग काय करू? की थांबूया पुढच्या ऑस्ट्रेलियाबरोबरच्या टेस्टपर्यंत? की पुढच्या आयपीएल पर्यंत थांबायचं? की ट्वेंटीं ट्वेंटीपर्यंत थांबायचं? की एकदम वर्ल्डकपचं हवंय तुला तिकीट?” माझ्या मनूविषयीच्या काळजीने पोटतिडीकीची कमाल मर्यादा ओलांडली होती.मी काय काय करणार होतो माझं मलाच कळत नव्हतं.मनूनं आता गरागरा डोळे फिरवले, खेकसला, “तुज्यायलाऽऽ गप बसायला काय घेशील?” आणि मनूनं चहाचा ग्लास गटागटा घशात रिकामा केला.सिनेमातल्या गममधे असलेल्या हिरोनं रमचा रिकामा करावा तसा.मी गप बसून चहाचा एक एक घोट घेऊ लागलो. “तिकीट हवंय यार! तिकीट हवंय! मला!” मनू पुन्हा संतापाने पुटपुटला.उठला.लक्ष्मीविलास हॉटेलमधून चालू पडला.कसेबसे पैसे देऊन मीही त्याच्यामागे कल्टी खाल्ली आणि माझी ट्यूब पेटली, “मनू तुला निवडणुकीचं तिकीट हवंय का?ऽऽ”
माझ्याकडे कुत्सितपणे बघत, संतापाने लाल होत, डोळे फिरवत त्याने विचारलं, “तू देणार? तू काय स्वत:ला मैद्याचं पोतं समजतोस? का वाघ समजतोस? की वाघाचा छावा? की छाव्याचा चुलतभाऊ? की वाघाच्या गुहेत गुदमरून झाल्यावर घड्याळाच्या गुहेत येऊन गुदमरणारा निळा कोल्हा? की जन्मानं परदेशी आहेस तू? आणिऽऽ ते तिकीट घ्यायला मी काय कुणा मंत्र्याचा, खासदाराचा, आमदाराचा नातेवाईक आहे की लोंबत्या आहे? की आरक्षित वॉर्डमधे उभं रहायला मी स्त्री आहे की रिझर्व कोट्यातला आहे? माझ्याकडे रग्गड पैसा आहे? मी इंडस्ट्रियालिस्ट आहे? अनेकांनी टेकू देऊन उभा केलेला दलित नेता वाटलो काय मी तुला?ऽऽ तू तिकीट देणार आणि मी घेणार!” असं म्हणून मनू भर रस्त्यात डोक्यावर परिणाम झाल्यासारखा हसायला लागला.
माझ्या सहनशक्तीचा, समंजसपणाचा कडेलोट झाला आणि मी रस्त्यातच थयथय नाचत त्याला विचारलं, “अरे मग तुला हवंय तरी कसलं तिकीट?”
मनू म्हणाला, “हां!... मला हवंय तिकीट भरपूर पैसे मिळवून देणारं! खून केले तरी ते पचवून टाकणारं! मला हवी असलेली कुठलीही बाई देऊन टाकणारं! मला हवंय तिकीट शत्रूशी मैत्री आणि मित्राशी शत्रुत्व केलं असं लोकांना भासवणारं!- मला हवंय-” मनू नटसम्राट नाटकातला म्हातारा झाला होता.मी काय करणार होतो? दिवेलागण झाली होती.घरी मुलाला शुभंकरोती शिकवायची होती.मी घरचा रस्ता पकडला.

Monday, October 4, 2010

कॉमेडी शो “सहकारी पतपेढी अमर्यादित!”

असं काही असलं की मनू सर्वात आधी माझ्याकडे येतो.आधी न हसता म्हणतो, “तू मला लकी आहेस रे! तुझ्यापासून सुरवात म्हणजे माझी भरभराट!” मग जिवणी फाकवून हसत म्हणतो, “अतिशय साधा आहेस रे तू! सुरवात तुझ्यापासूनच!” अतिशय साधा म्हणजे मनूच्या भाषेत बावळट हे मला पक्कं माहित असतं पण प्रत्येक वेळी तो डाव साधतोच.या वेळीही अतिशय साधा म्हणून त्याने एका अर्जावर माझी सही घेतलीच.
मनूच्या पुढाकाराने गल्लीत सहकारी पतपेढी चालू करायचं ठरलं.ठरलं म्हणजे काय मनूनंच ठरवलं.रोजच्या झकाझकीत असली झेंगटं करायला वेळ कुणाला आहे? असं मी मनातल्या मनात म्हणालो पण मनू मनकवडा आहे.त्यानं माझ्या डोक्यात टप्पल मारली आणि म्हणाला, “झेंगट! पतपेढीला, या सहकारी पतपेढीला झेंगट म्हणतोस?” अशी सुरवात करून मला जांभई येऊन माझी मान सारखी कलायला लागेपर्यंत भलमोठं लेक्चर दिलं.सहकारी चळवळीबद्दलचं.मनूचं बोलणं सुरू झालं की घड्याळाचे काटेही संथ होतात.मला पूर्णपणे पिळल्याशिवाय तो थांबत नाही.फारच थोड्या काळात तो सहकार महर्षी होणार याबद्दल माझ्या काय, गल्लीतल्या कुणाच्याच मनात आता संदेह राहिला नाही.मी सही केल्यावर प्रत्येकानं त्या पतपेढीच्या अर्जावर सही केली.
’चळवळ सहकारी पतपेढी मर्यादित’ असं डॅशिंग नाव मनूनं शोधून काढलं आणि एका बुजुर्ग गल्लेकरय़ाच्या हातून मुहुर्ताचा नारळ फुटला.पटापट प्रत्येकानं खातं उघडलं.मनू पैसे मोजत राहिला.सहा महिने झाले आणि मनूनं प्रत्येक खात्यावर व्याज तर दिलंच पण आम्हा प्रत्येकाला बोलावून, आहेर देतात तसं, एक हात पुसायचा टॉवेल आणि बॉलपेनही दिलं.आम्हा सभासद मंडळींचा आनंद गगनात मावेना.अजूनही आम्ही त्याच टॉवेलनं हात पुसतो.बॉलपेनं आम्ही तेव्हाच शोकेसमधे ठेवली.
वर्षं झालं तेव्हा मनूनं गांधी जयंतीला स्थानिक नगरसेवकाच्या हस्ते सत्यनारायण पूजा घातली.दोन वर्षं झाली तेव्हा विनोबा जयंतीला गृहराज्यमंत्री आणि तीन वर्षं झाली तेव्हा जयप्रकाश नारायण जयंतीला डायरेक्ट महसूल मंत्र्यांनाच बोलावलं.एव्हाना चांगला महसूल गोळा झाल्यामुळं ’चळवळ’चं आणि मनूचं दोघांचंही चांगलंच नाव झालं होतं.
मनू सरकारदरबारी मांडीला मांडी लावून बसायला लागला.त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाऊंटंट्सचं एक आख्खं पथक असायच.सभासद पतपेढीला खजिना समजायला लागले.व्याजाची मलई खाऊन शांत झोप लागत होती.बाकी झकाझकीचं सगळं मनू बघत होता.सभासदांनी सगळे अधिकार मनूच्या हातात दिले.मनू बोले आणि ’चळवळ’ हाले अशी परिस्थिती होती.
मग मनूनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.’फायनान्स अनलिमिटेड’ नावाची आणखी एक कंपनी काढली.लोकांना घरासाठी कर्ज देणारी.गल्लीतले आम्ही घरात रहातच होतो.कुठल्याही माईच्या लालमधे नवीन जागा घेण्यासाठी ताकद कुठून येणार? कर्ज घेतलं तरी ते फेडावंच लागणार.सामान्य असल्यामुळे आम्हाला ते फेडल्याशिवाय चैन पडणार नाही.मग घ्याच कशाला ते! गल्लीतल्या लोकांसाठी स्थापन झालेल्या पतपेढीतले पैसे या नवीन कंपनीत फिरवले जावेत ही मनूची आयडिया.त्याचा आम्हाला काय फायदा होणार होता? भाजीवाल्याशी एक-दोन रूपयांसाठी घासाघाशी करणारे आम्ही, आमची पतपेढी मनूच्या घशात सारून रिकामे झाले होतो.एवढ्या तेवढ्यावरून एकमेकाशी अरे ला कारे करणारय़ा एकाही शहाण्याने या व्यवहारात काही गैर आहे असं म्हटलंच नाही.मनू तोपर्यंत एका मजबूत राजकारणी पक्षाच्या कमिटीमधे जाऊन बसला.
एके दिवशी अचानक पतपेढीत मरणाची गर्दी झाली.ती बघितल्यावर मग आमची धावाधाव सुरू झाली.लोक पटापट पैसे काढून घेण्याच्या खटपटीत होते.कुणी कुणाला काय झालंय ते सांगत नव्हता.’माझे’ पैसे मिळाल्याशी मतलब.पतपेढी बुडणार हे आता गुपित राहिलं नाही.’कुणाचेही पैसे बुडणार नाहीत’ असा फलक पतपेढीच्या दारात लागला आणि आम्हाला कळलं पतपेढी बुडाली.
एक मात्र झालं.कधी नाही ते आमच्या गल्लीचं नाव पेपरात आलं.कधी नाही ते मनूचा घारय़ा डोळ्याचा, दाढी वाढवलेला फोटो पेपरच्या पहिल्या पानावर झळकला.मनूच्या कारकिर्दीतली ही केवढी मोठी अचिव्हमेंट.जेमतेम गल्लीला माहीत होता तो तो एकदम दिल्लीपासून जागतिक बॅंकेपर्यंत सगळ्याना माहिती झाला.पतपेढी बुडवण्यासाठी त्याने नक्की काय केलं ते आमच्या कुणाच्या नक्की ध्यानात आलं नाही पण त्यानं आमचे पैसे खाल्ले.आम्ही दिवसरात्र डोक्याला हात लावून बसू लागलो.चुकून झोप लागली तर दचकून जागे होऊन आपापसात चर्चा तेवढ्या करत राहिलो.आमच्या हातात आणखी काय होतं? मनूच्या हातात बेड्या पडाव्यात असं मात्र मनापासून वाटत होतं.मनूविरूद्ध साक्ष द्यायला सांगितली असती तर प्रत्येकानं तोंडात मिठाची गुळणी धरली असती.पैसेही नकोत आणि कोर्टाची पायरही चढायला नको!
सगळीकडे बभाल झाल्यावर नाईलाजाने विरूद्ध पक्षाने आमच्या या पतपेढीचा प्रॉब्लेम ताणून धरला.सत्तारूढ पक्षाला नाईलाजाने कृती करणं भाग पडलं.मोठ्या थाटामाटात मनूच्या अटकेचं नाटक पार पडलं.मनूच्या समर्थकांनी यावेळी वाटेत येईल त्याला वार्ताहर, प्रेस फोटोग्राफरपासून रस्त्यावरचा भाजीवाला आणि कामावर चाललेल्या आमच्या गल्लीतल्याच काही जणांना यथेच्छ बुकललं आणि मनूवरची आपली निष्ठा प्रकट केली.
त्यानंतर मग नाटकाचे इतर प्रवेश सुरू झाले.अटकपूर्व जामीन, मनूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमधे भरती करणं, मग दोन वर्षांनी खटल्याची तारीख पडणं, साक्षीदारांच्या साक्षी, त्यांचं उलटणं, सत्तारूढ आणि विरोधी यांची ’तू मार मी रडल्यासारखं करतो’ अशी लुटुपुटुची युद्धे, सहकारक्षेत्र बजबजलेले आहे काय? यावर मान्यवरांचे परिसंवाद.आम्ही त्यात इतके गुंतून गेलो की आपले पैसे आता काशीत गेलेत याचं भानही राहिलं नाही.
यथावकाश मनूची ’निर्दोष’ सुटका झाली तेव्हा आमचेच काही गल्लीकर त्याच्या स्वागताला गेले.
आता मनू बाजूच्याच गल्लीत नवी पतपेढी उघडणार आहे.
तो आला की तुम्ही नक्की अर्ज भरणार याची मला खात्री आहे.
पतपेढ्या मर्यादित असल्या तरी आपला त्यांच्यावरचा विश्वास अमर्यादित आहे हे नक्की!

Thursday, September 30, 2010

चोर मचाये शोर!

तुम्ही म्हणाल मनू गमतीदार आहे.कबूल.पण तेवढाच तो विचित्रही आहे.मनूच्या घरी एके रात्री चोर शिरला.मनूच्या सांगण्याप्रमाणे, मनूच्या त्या फेमस खांद्याला लावायच्या कातडी बॅगेतून चोराने रोख रक्कम, घड्याळ असा जवळजवळ पाच-सहा हजाराचा ऐवज लंपास केला.तेवढंच घेऊन चोर सटकला असता तर तो चोर कसला! जाता जाता त्यानं मनूच्या तोंडावर काहीतरी मारलं.मनूचा समोरचा एक दात काळा-निळा.चोरावर दातओठ खायचीसुद्धा पंचाईत.मनूचं सुरू झालं, “×××! काय झाडाला लागतात पैसे! वर हे रे! या दाताचं आता काय करू?”
मनूनं मग पोलिस कंप्लेंट केली.मनूला जिवणी फाकवून तोंड भरून हसायची सवय.हसला की काळा दात दिसला.हसायची चोरी! त्यानं दातही बदलला.
तिकडे पोलिसांना काही नेहेमीप्रमाणे चोर सापडेना.चार-पाच हजारांची चोरी काय शोधणार ते? त्यांना भलतीच कामं.खंडणीविरूद्ध पथक मजबूत करणं, शाळेसाठी देणग्या गोळा करणं.मनू आधीच एक नंबरचा फुकट्या.स्वत:च्या गेलेल्या चार-दोन हजारांवर तो पाणी सोडणार? त्यानं गल्लीत रात्रीची गस्त घालायची टूम काढली.मी लांबून सगळं बघत होतो.आपण काय करणार? मनूच्या दृष्टीनं मी म्हणजे फद्या!
मनू भलताच शहाणा.रात्रीच्या गस्तीसाठी त्यानं रिकामटेकडी, स्वेच्छानिवृत्ती घेतलेली, म्हातारीकोतारी बरोबर टाळली.तरूण मुलं, मुली जमवल्या.गस्त सुरू झाली.मनू वयस्कर.चोरी झालेली.रात्रीच्या धुंद वातावरणात तरूणाईचा सहवास.मनू समोरचा खोटा दात जिभेवर काढून दाखवतोय.पुन्हा जागच्या जागी लावतोय.जादू! तरूण पोरी खूष! मनू चेकाळतोय.रात्रीचं जागरण आणि दिवसा कामावर जाणं.झोपेची काशी.मग मनू उन्हात काळा होणारा चष्मा घालायला लागला.दिवसा-रात्री कधीही झोप अनावर व्हायची.डुलकी लागायची.ती दिसू नये.चष्मा नाकावरच फुटू नये म्हणून आता तो चष्म्याला दोरी बांधायला लागला.रात्री गल्लीतल्या पोरींना आणि दिवसा गल्लीतल्या महिलांना ज्योक सांगू लागला.त्यांचे ज्योक ऐकून उगाचच “च्यांगलं आहे! च्यांगलं आहे!” म्हणत हॅऽऽहॅऽऽहॅऽऽ करत नंदिबैलासारखं डोकं हलवून दाखवू लागला.सामान्य माणसाच्या अतिचाणाक्ष नजरेने मी ते सगळं बघत, ऐकत होतो.चोर शोधण्याचं काम, त्यात तरूण पोरं-पोरी एकत्रं आलेल्या.मनूनं मला वेड्यात काढलेलं.व्हायचं तेच झालं.
एका देखण्या पण अबोल असं डेडली कॉंबिनेशन असलेल्या मुलाभोवती पोरी जमायला लागल्या.त्यातली एक जादा उत्साह दाखवायला लागली.मनूसारख्या बुजुर्गानं खरं तर त्या फंदात पडायचं नाही.तरूण पोरं पडत धडपडत शिकणार.त्यांची जबाबदारी त्यांच्यावर.मनू भडकला.त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे लागला.ज्यादाच उत्साह दाखवणारी मुलगी मनूच्या मनात भरली होती.तीच काय! हल्ली मनू, दिसली मुलगी की… काय बोलणार? गल्लीत हीऽ बोंबाबोंब.चोर सापडायची बोंब.ती पोरगा-पोरगी कुठे गूल झाले? म्हणून मनूची बोंब! ते दोघे तिथेच! इतर पोरं-पोरी मनूचा अवतार बघून कलटी खायच्या मार्गावर.मनूला गममधे जायला एक कारण मिळालं.मुलगी हातातून सटकल्याचं.आधीच मर्कट, त्यात प्रेमभंगाचा गम, त्यात चोरीचा विंचू चावलेला.चोर सापडत नाही.पोरगा-पोरगी दाद देत नाहीत.मनू सैरभैर.
आता त्याने काय करावं? एके दिवशी त्याने एका पोलिसाचीच गचांडी धरली.पोलिस काय ऐकतात! त्यांनी मनूला आत टाकलं.चोपलं.समोरचा खोटा दात जिभेने हलवत राहिलं तर पोरी एक वेळ भाळतील पण पोलिस ते पोलिस. “माझी चोरी झालीये.ती मी शोधणारंच.मी रामशास्त्री प्रभूणे आहे रामशास्त्री प्रभूणे!” असं मनू चौकीत रात्रभर बरळत राहिला.पोलिसांच्या हातात दंडुका असतोच.सकाळी वेडा म्हणून त्याला सोडून देण्यात आलं.
मनूला आता लायसन्सच मिळालं.मनूनं आता त्या देखण्या अबोल पोराच्या नावाने पत्रं लिहिलं.त्या पत्रात त्या पोराच्यामागे ज्यादा उत्साह दाखवणारय़ा आणि मनूच्या हातून सटकलेल्या पोरीची छीऽथू केली.दिलं पेपरला पाठवून.ते छापून आलं आणि लागले सगळे त्या देखण्या, अबोल पोराच्या मागे.मला मनूनं बाजूलाच सारलेलं.लोकांची मजा अशी की मनूला सपोर्ट करणारय़ांचीच संख्या अधिक. ’त्याच्याकडे चोरी झालीए’ ही सहानुभूतीची लोकभावना प्रबळ.मनू मग भरकटलाच.ठार वेडा व्हायचा बाकी राहिला.
रात्रीच्या धुंदीत त्याने अनेक चाळे केले.एकदा रस्त्याच्या कडेला दोन-चार परप्रांतीय पाठमोरे रिलॅक्स होत होते.मनूनं कशाला त्यांच्या मागे लागायचं? ते पोलिसांच्या वरताण.त्यांनी मनूला उभा-आडवा फोडला.मनू डायरेक्ट इस्पितळात.तेही गल्लीतल्या आमच्या एका मित्रानं थर्डशिप वरनं परतताना, त्याला रस्त्याच्या कडेला व्हिवळत पडलेलं बघितलं म्हणून.मनूला आता तोंड दाखवायची चोरी.थोबाड सुजलेलं.त्यानं दाढी वाढवली.ती कराकरा खाजवत तो आपली दैनंदिन आणि दीनवाण्या रात्रीतली कामं उरकतच होता.अनेक व्याप करून ठेवत होता.आपणच बरोबर, बाकी सगळे मूर्ख या नात्याने.
पुढची बातमी ऐकली आणि मी चाटच पडलो.मनूच्या मानसिक अवस्थेविषयी काळजी वाढवणारी ती बातमी.पेपरात छापून आलेली.मनूने म्हणे एका अल्पवयीन मुलीलाच आपलं लक्ष्य बनवलं होतं! मनूला आता माझी नव्हे तर मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता होती.
पोलिसांनी आता मात्र मनूची चोरीपासूनची सगळी प्रकरणं गांभीर्यानं घ्यायला सुरवात केली.नवा उमदा सीआयडी कामाला लागला.मांडवळ हा शब्द, अपवादाने असेल, पण त्याच्या शब्दकोषात नव्हता.त्यानं मूळ चोरीच्या प्रकरणालाच हात घातला.सगळे धागेदोरे त्यानं शांतपणे जुळवले.कधी नव्हे ते मीही निश्चिंत झालो.वाटलं, मनू माणसात येणं शक्य होईल.ज्याच्या पायी एवढं सगळं रामायण झालं तो चोर नक्की सापडेल.
पुराव्यानिशी असं सिद्धं झालं की मनूच्या त्या कातडी बॅगेत काहीच नव्हतं.चोर आलाच नव्हता.चोरी झालीच नव्हती.चोर कुणी असलाच तर तो मनूच होता.जो मनू इतके दिवस उलट्या बोंबा ठोकत होता.
हे सगळं माझ्यासाठी कल्पनेपेक्षा विलक्षण होतं.मी भाबडेपणानं रिएलीटी शो बघायला निघालो होतो.मनूनं मला मद्रासी सिनेमा दाखवला होता…

Wednesday, September 29, 2010

कॉमेडी शो “शिक्षण!”

मनू काय करेल ते ब्रह्मदेवाच्या बापालासुद्धा कळणार नाही.हल्ली तो सतत मुलांच्या गराड्यातच असतो.शाळा-कॉलेजमधल्या मुलांच्यामधे राहून त्याला ’चाचा नेहरू’ व्हायचं असावं असं वाटून सुरवातीला मी त्याचं हे वागणं मनावर घेतलं नाही.पण मग तो फारच चेकाळला.शाळा, कॉलेजमधल्या मुलांसारखे टाईट, तोकडे, चित्रविचित्र छापांचे आणि रंगांचे शर्टस, टी शर्टस तो घालायला लागला.चकचकीत घट्टं पॅंटी आणि डोक्यावर उलटी कॅप घालून मिरवू लागाला.त्याने जेव्हा लांबलचक कल्ले- साईडलॉक्स- वाढवले, ओठाखाली केसांचा पुंजका ठेवला आणि काळे निळे गॉगल्स घालू लागला तेव्हा मला रहावलंच नाही.पोरंटोरं शाळा-कॉलेजात जायचं सोडून आपली मनूच्याच अवतीभवती!
एकदा सकाळी सकाळीच दबा धरून बसलो.मनू घराबाहेर पडतच होता.त्याला बाजूला खेचला आणि काट्यावरच घेतला.म्हणालो, “मन्या साल्या शोभतं काय तुला? अरय़े शतकातून एखादाच चाचा नेहेरू होतो! साल्या वासरात लंगडी गाय शहाणी आणि अंधोमें काना राजा, दोन्ही व्हायला बघतोस काय एकदम? एकाचवेळी!” मनू लहान मुलाकडे -केजीतल्या- बघावं तसं माझ्याकडे बघायला लागला.मला त्याने ओळखलं हे माझं नशीब.त्याला हल्ली हे जग फक्त लहान मुलांचच आहे असं वाटत होतं. “काय झालं बाबा?” टीचरनं स्टुडंटला विचारावं तसंच त्याने विचारलं.मी म्हणालो, “मन्याऽ कुठे फेडशील हे पाप? अरे पोरं शाळेला- कॉलेजला दांड्या मारताएत.त्यांचे आईबाप त्यांच्या नावाने कोकलाताएत आणि तू उलट्या टोप्या काय घालतोएस! घट्टं चकचकीत पॅंटी काय घालतोएस! बाबा, मुलं शाळाकॉलेजात गेली नाहीत तर करतील काय?” मनूतला हजरजबाबी बिरबल लगेच जागा झाला.म्हणाला, “आता काय करतात?” मी सुद्धा बिरबलाचा बाप बनलो.म्हणालो, “तुझ्याबरोबर गावभर उंडारतात! त्यांचे आईबाप शाळा, कॉलेजांच्या फिया भरतात.मनू, मनू अरे या उद्याच्या नागरिकांना शिक्षणापासून वंचित करतोएस तू! लाज वाटायला पाहिजे तुला!” माझ्यातला सात्विक का कसला पणा आता चांगलाच उसळ्या मारायला लागला.कधी नव्हे ते मनूनं माझ्यासमोर पडतं घेतलं होतं, सध्या तरी.मी सुटलोच, “मन्या मन्या अरे शिक्षणावरचा लोकांचा विश्वास उडेल! शाळाकॉलेजं ओस पडतील! पुढच्या जन्मी निरक्षर, आंगठेबहाद्दर होशील! आपल्यासारख्यांना शिक्षण ही एकच गोष्टं घेण्यासारखी राहिलीए आणि तुझं हे काय? तू किती वेळा बसून वारावीचं वर्षं पक्कं केलंस हे काय मला माहित नाही? कृपा कर! हात जोडतो! पण पोरांना शिक्षण घेण्यापासून तोडू नकोस रे!”
जुन्या हिंदी सिनेमातल्या गरीब हिरॉईनच्या अत्यंत गरीब (म्हणजे भिकारी?) बापाच्या डोळ्यांत जसे अश्रू उभे रहातात तसे माझ्या डोळ्यांतले अश्रू बघून मनूला बोलणं भागच पडलं.त्यानं पंधरावेळा मान वेळावत विचारलं, “तुला काय वाटतं, तू म्हणतोएस तिथे त्यांना शिक्षण मिळतं?” मी आश्चर्यचकीत झालो उद्गारलो, “म्हणजे?”
मनूची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, “मुलगा कितवीत?”
मी उत्तरलो, “दुसरीत!”
“डोनेशन किती दिलंस?”
“पन्नास हजार!”
“फी कीती?”
“महिना दीड हजार!”
“टर्म फी?”
“अधिक दीडहजार!”
“बसची फी?”
“महिना सातशे!”
“युनिफॉर्म किती?”
“दोन दोन! वेगवेगळे!”
“युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या, दप्तर कुठून घेतोस?”
“शाळेतूनच! आणखी पाच-सात हजार मोजून!”
“शाळेत मराठी शिकवणारय़ा बाईला ’न’ आणि ’ण’ मधला फरक कळतो?”
“बहुतेकवेळा कळतोच असं ठामपणे म्हणता येणार नाही!”
“मागच्या वेळेला तुझी बायको पालक मेळाव्याला गेली तेव्हा ही बाई काय म्हणाली?”
“बाई म्हणाली, तुमच्या मुलाचा अभ्यास घरी नीट करून घ्या.त्याची तयारी झालेली नाही.तो नापास झाला तर त्याला शाळेतून काढून टाकू!”
“तुझी बायको काय करते?”
“कॉलसेंटरमधे नोकरी करते! सेंटरनं तिला रात्रंदिवसासाठी विकत घेतलंय!”
“बरं! शाळेची पिकनिक वगैरे?”
“वर्षातून चारदा.पिकनिकला न गेल्यास हजार रूपये दंड!”
“शाळेचे विश्वस्त काय करतात?”
“बांधकाम व्यावसायिक.बिल्डर आहेत ते!”
“मुख्याध्यापक, इतर शिक्षक फावल्या वेळात काय करतात?”
“म्हणजे काय? शिकवतात!”
“तसं नाही रे! त्या व्यतिरिक्त काय करतात?”
बरंच काही.खाजगी शिकवण्या घेतात.व्यवसाय पुस्तिकांसाठी लिहून कमावतात.टीव्ही सिरियल्समधे कामं करतात.निरनिराळ्या गेम शोजमधे भाग घेतात.”
मनू आता फूल फार्मात आला.म्हणाला, “आता मला सांग, मी या शाळाकॉलेजातल्या मुलांमधे मिसळतो.त्यांच्याशी गप्पा मारतो.त्यांची मनं मोकळी करतो.त्यांना चार भिंतींबाहेरचं हे जग दाखवतो.त्यांच्यासारखाच रहातो.व्यवहार म्हणजे काय हे त्याना प्रॅक्टिकली शिकवतो, म्हणजे मी कुठलं पाप करतो?”
माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला.मी मनूला साष्टांग लोटांगण घातलं.माझं नेहेमीच असं होतं.कुठल्याही विषयाला दुसरी बाजू असते हे मी लक्षात घेतच नाही! तोंडात मारून घेत मी म्हणालो, “मन्या सरकारपर्यंत तुझं हे काम पोचलं तर तुला नक्की ’शिक्षणमहर्षी’ करतील,मला माफ कर.चुकलो मी!”
मनू हसला.जरा जोरातच.म्हणाला, “कुठल्यातरी कोपरय़ातून कुणीतरी माट्या येतो.कोचिंग क्लासेस काढून उखळ पांढरं करून घेतो.आपण का मागे रहायचं? माझ्या कामाचेही मी पैसे घेणार.पण माझं टेक्निक वेगळं आहे,अरे, शेवटी धंदा आहे हा आणि यात सगळं माफ असतं!”
जगातल्या सगळ्यात उत्तुंग इमारतीत शिरावं आणि नेमकं तिच्यावरच एखादं विमान येऊन आदळावं तसं माझं झालं…

Tuesday, September 21, 2010

कॉमेडी शो “सिरियल मर्डरर”

या जगात आव आणणं खूप महत्वाचं आहे.विशेषत: आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचा आव आणावाच लागतो हे आपल्या मनूला बरोब्बर पटलंय.यावेळी तो समोर आला ’टिळक’ छाप भरघोस मिशा वाढवून आणि लांब वाढलेल्या डोक्यावरच्या केसांचा पोनी बांधून.डोक्यावर उलटी टोपी.कमरेला बांधलेला पर्सवजा पाऊच.मी म्हटलं, “हे काय?” तो म्हणाला, “सिरियलचा कार्यकारी निर्माता आणि लेखकही झालोय!” मी नेहेमीप्रमाणे उडालोच.ओरडलो, “हिंदी सिरियल?” तो मग्रूरपणे म्हणाला, “नाय! मर्हाटी!” मी विचारलं, “नाव काय?” तो म्हणाला, “धिरधिरतांग- एक टांग माकडाला!” मी आणखी जोरात ओरडलो, “डब्बल नाव?- आणि त्याचा अर्थ?” मनूनं चेहेरा आणखी मग्रूर केला.मला एक शेलकी शिवी घातली.म्हणाला, “ओरडत काय सुटलाएस? सालं सिरियलला जे नाव द्यावं ते आधीच कुणीतरी रजिस्टर करून अडवलेलं!” मनूनं कमरेच्या पाऊचमधे बोटं सरकवून दोन-चार किमती पेनं काढून कुरवाळली.मी म्हटलं, “हे काय?” तो म्हणाला, “दिसत नाही?” मी विचारलं, “तुझं ते- ते- हे कुठाय?”- म्या पामराला लॅपटॉप या वस्तूचं नाव आठवेना.मनूला फुरफुरायला आयतीच संधी मिळाली.हातातली किमती पेनं नाचवत तो म्हणाला, “अरय़ेऽ ह्येच माझं साधन! याच्यावरच मी इतका-” उडतो!- असं मात्र मी मनात म्हणालो आणि माझ्या स्मरणशक्तीचं भारनियमन संपलं. “-लॅपटॉप रे! लॅपटॉप कुठेय तुझा?” केविलवाणा होऊन मी विचारलं. “झक मारत ग्येलाऽ तो असला की लेखकाचा हमाल करतात! ह्ये बरं!” तीच किमती पेनं आता कुणालातरी टोचून खुपसल्यासारखी करत मनू म्हणाला.लेखणीला तलवारीपेक्षा जास्त धार असते- मी मनातल्या मनात म्हणालो आणि आदराने त्याच्याकडे बघत राहिलो.एक जुनी म्हण आठवली.चला! सिरियलचं नाव तरी चांगलंच शोभून दिसत होतं- आव रावणाचा आणि…
शूटिंग सुरू झालंय म्हणून मी कामावर दांडीबिंडी मारून उत्साहाने बघायला गेलो.मग्रूर आव आणलेल्या मनूजवळ जाऊन उभा राहिलो.तो मिश्यांवरून हात फिरवून कार्यकारी निर्मातेपणाचा आव आणत होता.मी म्हटलं, “अरे संवाद कुठेयत सिरियलचे?” त्याने आपली मग्रूर भुवई उडवली, म्हणाला; “शॉट लागला की लिहिणार गरमागरम जिलब्या तळतात तसे!” आणि स्वत:च्या विनोदावर स्वत:च हसला.सेटवर राबणारय़ा पोरांनी हे नवीन काय म्हणून त्याच्याकडे बघितलं तर त्यांच्यावर डाफरला.
मनूनं चांगलंच नशीब काढलं होतं.हिंदीतली सुप्रसिद्ध माजी नटी निर्माती, मराठीतला वरच्या श्रेणीतला दिग्दर्शक, दोन-चार बुजुर्ग नट आणि बाकीची मनूच्या मर्जीतली पिलावळ.त्या पिलावळीला फार मोठा ब्रेक दिल्याचा आव मनू आणत होताच.एका बुजुर्ग नटाचं काम मानधनाच्या मुद्यावर मनूनं आपल्या शैलीत कापलं असावं कारण त्याच्याऐवजी आयत्यावेळी बोलवलेला एक होतकरू नट कॅरेक्टर रोलच्या पोषाखात उगाचच जीवाची उलाघाल करत उभा होता.पहिला शॉट काही अजून लागत नव्हता.
मी मनूला हळूच म्हटलं, “अरे शेकडा नव्वद सिरियल्स तोट्यात जातात म्हणून गळे काढता तुम्ही लोक.तू या सगळ्यांचे पैसे कधी आणि कसे देणार?” मनूनं त्या ’होतकरू’ वरची आपली कुत्सित नजर काढली आणि ती आणखी मग्रूर करून माझ्याकडे वळवली.खिडकीतून बाहेर खूण केली.मी खिडकीच्या बाहेर बघितलं.कंपाऊंडलगत भली मोठी करकरीत वॅगनवजा भलीमोठी मोटार.म्हणाला, “हा पेढा खा! हप्त्यानं घेतली गाडी.आजच! ’ह्या’ सगळ्यांचे पैसे ग्येल्ये काशीत!” मी तोंडात बोट घालून चूपचाप मनूचा आव आणि त्याच्या महत्वाकांक्षी सिरियलचा पहिला शॉट लागण्याची वाट बघत राहिलो.
मस्त वातावरण.मेकअपरूमधल्या गप्पा.उत्तम जेवण आणि अविरत काम.मनूनं हुकमी आव आणलेला.त्यामुळे त्याला मैत्रिणही मिळालेली.सावलीसारखी सोबत करणारी.शूटींगचा पहिला दिवस संपला आणि दोघांनीही यथार्थ, कृतार्थ झाल्याचा आव आणला.दमल्याचा आव आणला.सगळ्या युनिटनी दोघांचं कौतुक केलं.मुख्य म्हणजे तो होतकरू नटही उत्तम मिळाला पण मनू मग्रूर आव आणून त्याला तुच्छतेचीच वागणूक देत राहिला.त्याला महत्वाच्या भूमिकेसाठी बोलावूनही त्याला जाणवेल अश्या पद्धतीनं त्याला काही महत्व नाही जे जाणवून द्यायची एकही संधी मनूनं सोडली नाही.मी सहज त्याचं कौतुक केलं तर मनू फिस्कारला, “गरजेला उपयोगी पडला म्हणून काय झालं? तो आला नसता तर आज शूटिंग सुरूच झालं नसतं म्हणून त्याला घेतला!”
शूटिंगचं पहिलं सत्र संपलं आणि मनूनं आता दिग्दर्शकाचाही आव आणायला सुरवात केली.ज्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला सिरियलचा दिग्दर्शक म्हणून नेमण्यात आलं होतं त्याला बाजूला सारून मनूनं दिग्दर्शन करायला सुरवात केली.सेटवर राबणारय़ा तंत्रज्ञांना तो सहज झापू लागला.मी मनूला खाजगीत विचारलं, “सगळंच हातात घेतोएस.तुला झेपेल?” मनू माझ्यावरही डाफरला.सगळ्यांवर सतत उद्धटपणानं डाफरणं म्हणजे कार्यकारी निर्मातेपण अशी मनूची खात्री झाली होती.शिवाय फार्फार दिवसांपूर्वी हिंदीतल्या एका ’ब’ निर्मातीनं ब्लाऊज फेकून मारला होता- मनूच्या मैत्रिणीचा- मनूच्या अंगावर.असं म्हणे.मनू त्याचा तर सूड घेत नव्हता?
व्हायचं तेच झालं.सिरियल जेव्हा हवेत म्हणजे ’एयर’ वर आली तेव्हा खरय़ा दिग्दर्शकानं स्वाभिमान न सोडता काम सोडलं.मनूनं त्यालाही लेफ्टराईट घेतलं.सहाय्यक दिग्दर्शकाच्या ’दगडी चाळ’ पवित्र्यापुढे मनूचं काही चाललं नाही तिथे त्यानं लोटागंण घातलं.तंत्रज्ञांचं पोट हातावर असतं.त्यांना आजचे पैसे मिळाले नाहीत की उद्याचे आणि आजचे पैसे चोख घेतल्याशिवाय ते उद्या उगवत नाहीत.कॅमेरामन जरी मित्र असला तरी कॅमेरय़ाच्या भाड्याचा चेक वठला नाही तर कॅमेरावाला कॅमेरा दाबून ठेवतो.मनूनं त्या होतकरू नटालाही अपमानास्पद वागणूक दिलेली.त्यानंही ठेंगा दाखवला.
सिरियलमधे सतत फ्लॅशबॅक दिसायला लागले आणि बघ्यांनी ओळखलं की आता ’धिरधिरतांग’ चं काही खरं नाही.आपल्या मनूला प्रायोजकाचा आव मात्र काही केल्या आणता आला नाही! हळूहळू सगळे चिकनेचुपडे हिरोज- मनूनं जमवलेली पिलावळ- हिरमुसली, दुसरय़ा सेटवर जाऊन रूजू झाली.प्रायोजकांअभावी सिरियल बंद पडली.कसलाही आव आणता येतो.पण…
एवढ्यानं काय होतंय आव तर आणलाच पाहिजे.आणि आव आणायचा तर कमलहासनसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा.निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कार्यकारी निर्माता आणि जे जे, ज्याचा ज्याचा आव आणता येईल ते ते! आव रावणाचा आणि…
मजा म्हणजे आता टाटा सन्मान, बिर्ला सन्मानही जाहीर होऊ लागले म्हणजे मनूला सगळंच आभाळ मोकळं! या सगळ्याने मनूचा अहंगंड तरी जोपासला जाणारच.मनूला दुसरं काय हवं आहे? तो बघणारय़ा तुम्हा-आम्हालाही तुच्छच मानतो!

Friday, September 17, 2010

कॉमेडी शो- “अखेर विजय सत्याचाच!”

“आपण पेपर का वाचतो?” मनूला अधूनमधून असले तात्विक प्रश्न उभे करायची फार सवय.पुन्हा हे प्रश्न कुठल्या काळातले असतील याचा नेम नाही.गढे हुए मुर्दे खोदायची मनूची जुनी सवय.आता पेपर का वाचतो म्हणजे? माझी नेहेमीप्रमाणे गोची झालेली.मग नेहेमीप्रमाणे मनूची बारह डिब्बेकी गाडी भरधाव सुटते.तो म्हणतो, “मी सांगतो! आपण पेपर वाचतो कारण त्यात चांगल्या बातम्या असतात आणि वाईटही बातम्या असतात.चांगल्या बातम्या फारश्या नसतातच पण वाईट बातम्या आपल्याला लगेच आकर्षित करतात.त्यातही दोन प्रकार असतात बघ! एक वैयक्तिक पातळीवरची गुन्हेगारी आणि दुसरी संघटित गुन्हेगारी.वैयक्तिक पातळीवरच्या गुन्हेगारीचं एक वेळ जाऊ दे पण संघटित गुन्हेगारीचे पुन्हा दोन प्रकार असतात.चित्रपट क्षेत्रातली गुन्हेगारी आणि राजकारणातली गुन्हेगारी.राजकारणातल्या गुन्हेगारीबद्दल तू, मी नकोच बोलूया.चोथा झालाय आता.तर चित्रपट क्षेत्रातली गुन्हेगारी म्हणजे पुन्हा चित्रपटात चित्रित केली गेलेली गुन्हेगारी आणि प्रत्यक्ष चित्रकर्मींमधली गुन्हेगारी.चित्रित केलेली गुन्हेगारी फ्लॉप होऊ शकते पण ’प्रत्यक्ष’ गुन्हेगारी आजवर नेहेमीच बॉक्स ऑफिस ’हिट’ ठरली आहे.आता या चित्रपट क्षेत्रातल्या प्रत्यक्ष जीवघेण्या भांडणात दोन घटक हस्तक्षेप करू शकतात.एक म्हणजे पोलिस.दोन म्हणजे परदेशस्थ ’भाई’.जीवघेण्या भांडणातच दोन गोष्टी होतात.पहिल्याचा खून नाहीतर दुसरय़ाचा खून.कुणाचाही खून झाला की दोन गोष्टी होतात.आरोपीचा शोध किंवा आरोपी फरार.आता आरोपी फरारच झाला तर काय करणार? पण सापडला तर… तर…” मनू अडकला आणि मी जोरात उंच उडी मारली.इतका वेळ हे दोन दोनचं आख्यान ऐकून वीट आला होता पण मनू काय या दोन दोनच्या वीटा सारायचा थांबत नव्हता.तो दमला आणि सामान्य माणसाच्या न्यायपद्धतीवर असलेल्या ठाम विश्वासानं मी मनूला कोंडीत पकडलं.म्हणालो, “आरोपी सापडला तर मात्र एक आणि एकच गोष्टं होऊ शकते बाबूराव! न्यायालयात खटला उभा राहू शकतो!” असं म्हणताना माझा ऊर अभिमानानं भरून फुगला.त्याचक्षणी मनू जिवणी फा-फाकवून कुत्सित हसत म्हणाला, “पुढे?... आबुराव पुढे काय? अं?” झालं! मनूनं फुग्याला टाचणी लावली आणि मी नेहेमीप्रमाणे तऽतऽपऽप करायला लागलो.
मनूचा जोर वाढला.म्हणाला, “पुढे काय ते मी सांगतो! पुढे दोन गोष्टी होतात.एक म्हणजे तारखा लागतात तरी किंवा नुसत्याच पडतात.तारखा लागल्यावर काय होतं? साक्षीदार मरतात तरी किंवा जिवंत रहातात.साक्षीदार चुकून-माकून जिवंत राहिले तर दोन गोष्टी होतात.एक तर ते वेडे तरी होतात किंवा उलटतात तरी.साक्षीदार उलटले की वकिलांना हुरूप येतो कारण त्यांच्या हातात तुरूप येतो.गंमत म्हणजे हे वकीलही दोन प्रकारचे असतात बरं का सोन्या! एक म्हणजे सरकारी वकील.जे फक्त त्यांच्या त्या कमवलेल्या किनरय़ा आवाजात मोठमोठ्याने ओरडून प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देत असतात ते आणि दुसरे आरोपीचे वकील.ज्यांना तू ओळखतोसच.ते भरपूर पैसे तरी कमवतात किंवा खासदार किंवा कायदेमंत्री होतात किंवा पैसा आणि मंत्रीपद दोन्ही कमवतात.न्यायदेवतेचं काय असतं तुला सांगू का मोन्या? तिच्या हातातल्या तराजूलाही दोन पारडी असतात.एक उजवं, एक डावं आणि- आणि एक योगायोग सांगू का तुला? न्यायदेवतेलाही दोन डोळे असतात.एक उजवा आणि एक-” आता या दोन दोनमुळे माझा संताप अनावर झाला.मी बेभान झालो.ओरडलो, “अरे पण न्यायदेवता आंधळी असतेऽऽ तिच्या दोन्ही डोळ्यांवर काळी पट्टी असतेऽऽ एकच!” मनूनं सावधपणानं आजुबाजूला बघितलं.नजर रोखून विचारलं, “न्यायदेवतेचा अपमान करतोयस काय रे ए भडव्या! आत टाकू?” माझी पाचावर धारण बसली.आता दोनच गोष्टी शक्य होत्या.माझ्या चड्डीचा रंग तरी बदलणार होता किंवा शेजारच्या सुलभ शौचलयात तरी जाणं भाग होतं!
माझी अशी अवस्था झाली की मनूला स्वर्ग दोन बोटं उरतो आणी मी मात्र माझी दोन बोटं जगाला दाखवून मला नक्की कुठे जायचंय ते सूचित करत असतो. “रिलॅक्स! जस्ट रिलॅक्स!” जादूगारासारखं मनू म्हणाला. “आता जरा वेगळ्या विषयावर बोलूया!” मनूचं हे ’बोलूया’ म्हणजे तोच बोलणार आणि मी ऐकणार! “काय आहे! एक तर जिवंत मुर्दे तरी उखडूया किंवा गढे हुए तरी.जिवंत उखडायचे म्हणजे स्साला अब्रुनुकसानीचा प्रश्न! तर मला सांग! फळविक्रेत्यानं काय करावं? फळं विकावी की कॅसेट कंपनी काढावी?” माझ्या हाताची दोन बोटं मगाशी ताठ झालीच होती.दोन दोनला आता इलाज नव्हता.मी माझीच दोन बोटं माझ्याच दोन नाकपुड्यांवरून फिरवून प्रश्नाचं उत्तर शोधायला लहान मुलांसमोर धरतात तशी माझ्याच तोंडासमोर धरली.त्यातलं माझं एक बोट मी माझ्याच मनात धरलं आणि ओरडलो, “कॅसेट कंपनी काढावी!” मनू खूष झाला. “अगला सवाल! ओरिजनल कॅसेटची की ड्युप्लिकेट कॅसेटची?” मी पुन्हा माझंच बोट माझ्याच मनात धरून उत्तर दिलं, “ड्युप्लिकेट कॅसेटची!” मनूनं माझ्या पाठीवर थोपटलं, “अगला सवाल! त्या कॅसेटवर कोण गाणार? ओरिजनल लता की ड्युप्लिकेट लता?” मी म्हणालो, “अर्थातच ड्युप्लिकेट लता!” “अगला सवाल! कॅसेटकिंग होणं सरळ माणसाचं काम आहे की-” मी मनूला अडवून जोरात ओरडलो, “या जगात सरळ माणूस कधीच किंग होऊ शकणार नाही!” मनू म्हणाला, “शाब्बास! बिना लाईफलाईनके आप अच्छा खेल रहे है! अगला सवाल! कॅसेट्किंगने आपल्या ठोकळ्या भावाला लोकांच्या माथी मारलं ही त्याची मोठी चूक की हिरो बनायला चाललेल्या संगीतकार जोडीला दाबलं ही त्याची मोठी चूक?” मी मोठ्ठा निरर्थक पॉज घेण्याचा प्रयत्न केला.दिलिपसाब किंवा गोखलेसरांसारखा.मग म्हणालो, “लोकांना असले ठोकळे माथ्यावर घ्यायची सवयच आहे.हल्लीच्या मालिका बघत नाहिएस का तू? त्यामुळे संगीतकार होण्यापेक्षा हिरो बनायला चाललेल्या संगीतकारांना नाराज केलं ही त्याची मोठी चूक!” मनूनं डावा हात जास्त वापरून टाळ्या वाजवल्या.मी पैसे जिंकत नव्हतो तरी मला चेव येत होता.मराठी माणसाला पैसे हातात नसतानाच जास्त चेव येत असतो.मनूनं पुढचा डाव टाकला, “कॅसेटकिंगचा खून केलाच नव्हता मग जोडीतला एक संगीतकार परदेशी का पळाला?” मी जोरात ओरडलो, “याची दोन उत्तरं आहेत! एक! अल्पसंख्याकाला या देशात न्याय मिळत नाही हे त्याला सिद्धं करायचं होतं! दोन! आपण दोषी नाही म्हणून डोळ्यातनं पाणी काढून ऊर बडवणं आपल्या इथं उरलेल्या बहुसंख्याक जोडीदाराला सहज जमेल अशी त्याची खात्री होती!” मनूचा आखरी सवाल होता, “या देशात कोणत्या दोन गोष्टी खरय़ा आहेत?” मनूनं माझं बाहुलं करून टाकलंच होतं.मी लगेच उत्तरलो, “असत्य आणि न्यायालयाच निकाल! निकाल लागल्यावर प्रति कॅसेटकिंग काय म्हणाला आठवतंय का तुला? या निकालामुळे न्यायालयांवरची त्याची श्रद्धा वाढली आहे! सामान्य माणसांपेक्षा खुनी गुन्हेगारांचा न्यायसंस्थेवरचा विश्वास वाढतोय.अखेर विजय सत्याचाच म्हणून दोन बोटं वर करून आणि गळ्यात गळे घालून विजय साजरा करणारय़ांचे फोटो फ्रेम करून घराघरात लावले पाहिजेत!” मी जास्त बोलतोय हे लक्षात आल्याबरोबर मनूने तोंडानेच हूटर वाजवला.म्हणाला, “आज के लिए बस इतनाही!”

Tuesday, September 14, 2010

कॉमेडी शो- ’मी, मी आणि मी!’

आम्हा सगळ्या मित्रांना मनूनं बोलावलंय असं ऐकलं आणि आम्ही उडालोच! किंवा बेशुद्ध पडायचे बाकी राहिलो असं म्हणूया.मनू नेहेमी आमंत्रण घेतो, देत कधीच नाही. ’जानी! हम लेते है! देते नहीं!’ अशा ’राजकुमार’ थाटाचं त्याचं वागणं.
तो दिवस उजाडेपर्यंत आम्ही सगळे सैरभैर झालो होतो.प्रत्येकानं एकमेकांजवळ आणि सगळ्यांनी मनूकडे अशी चारचारदा खात्री करून घेतली.शेवटी तो दिवस आला.आम्ही सगळे मनूच्या घरी अवतरलो.
मनूच्या दिवाणखान्यात एक लाल सिंहासनवजा खुर्ची.लग्नाच्या हॉलमधे रिसेप्सशनला मांडतात तशी.जमिनीवर लांबलचक किंतान.आमच्यात मीच आपला सटरफटर.बाकींच्यापैकी एक मित्र डॉक्टर, एक इंजिनियर, एक फोटोग्राफर, एक गाणारा, एक चित्रकार, एक सैन्यातला, एक बॅंक मॅनेजर.ती लाल खुर्ची आणि ते गोणपाटाचं जाजम न्याहाळत एकमेकांकडे बराच वेळ बघत राहिलो.शेवटचा येईपर्यंत सगळे त्या गोणपाटावर बसलो आणि आतलं दार उघडून मनू आला.हसत.अप टू डेट पोषाखातला.तो आल्यावर सवयीने मी एकटाच अर्धवट उठलो आणि हे ऑफिस नाही मनू बॉस नाही हे लक्षात येऊन जीभ चावत खाली बसलो.मनू मुद्दाम माझ्या उतरलेल्या तोंडाकडे बघून कुत्सित हसला.नेहेमीप्रमाणे.तो नेहेमीप्रमाणेच हसला पण आज माझ्या असं लक्षात आलं की तो असं जिवणी फा-फाकवून हसतो तेव्हा त्याच्या वरच्या समोरच्याच दोन दातातली फट दिसते आणि तो आणखी वेडसर वाटायला लागतो.
बराच वेळ तसाच हसत सगळ्यांवरून नजर फिरवत मनू लाल खुर्चीत बसून राहिला.मग अचानक डॉक्टरकडे बघत म्हणाला, “कॅय? कॅय करताहात तुम्ही? माणसं मरताएतच ना अजून? अं? काय उपयोग एवढं शिक्षण घेऊन? एवढा पैसा खर्च करून? दवाखाना थाटून?” डॉक्टर चक्रावलाच.खरं म्हणजे मनूनं आमंत्रण देऊन बोलावलेलं.सगळ्यात आधी सगळ्यांचं स्वागत होईल अशी अपेक्षा.स्वागत झालं पण ते असं.
त्यावर डॉक्टर काही बोलणार तोच मनू मॅकेनिककडे वळला.कुठलंही बिघडलेलं यंत्र याच्या हातात दिलं की तो ते चालू करतो अशी याची ख्याती.मनू म्हणाला, “काय वर्कर? आता काय वर करताय?” त्या हॉलमधे किंतानावर बसलेले एकूणएक जण गार झाले, “कामगारच राहिलात ना शेवटी?” असं मनू पुढे म्हणाला आणि त्या मेकॅनिक मित्राचा चेहेरा तांबडालाल झाला.मी मनाशी म्हटलं आता जुंपणार.पण तोपर्यंत मनू आमच्या इंजिनियर मित्राकडे वळला.मी आमच्या मेकॅनिक मित्राकडे पाहिलं.त्यानं राग गिळला होता.एरवी तो कसलाही विधिनिषेध न बाळगणारा.लगेच कॉलर पकडणारा.तोही विचार करत असावा, मनूनं आमंत्रण देऊन बोलवलंय.आपले एकापेक्षा एक सरस मित्र इथे हजर आहेत.अशा वेळी आपण संयम पाळला पाहिजे.तोच काय आम्ही सगळेच संयम पाळत तिथे बसलो होतो.अर्थात, मूग गिळून बसलो होतो.
घरातून निघताना बायको काहीतरी खाऊन निघण्याचा आग्रह करत होती.मनूकडे काही खाणंपिणं होईल.रात्री उगाच गॅसेसची धन कशाला असा सारासार विचार करून मी तसाच निघालो.कधी नाही ते बायकोला धडा शिकवल्याचा आनंद असा मूग गिळून साजरा करावा लागत होता.पोटात आग पडली होती.मनू इथे इंजिनियर मित्रापाठोपाठ जो नजरेला पडेल त्याची बिनपाण्याने करत सुटला होता आणि सगळे अवाक होऊन पहात, ऐकत होते.संयमाची गुळणी तोंडात धरून बसले होते.
इंजिनयरला मनू म्हणाला, ब्रीज पाडता, घर पाडता, भूकंप होतो तो बरा तुमच्यापेक्षा. फोटोग्राफरला तो म्हणाला, दिसतं ते फिल्मवर उमटवता.त्यात काय विशेष? लहान पोराचं काम ते! चित्रकार मित्राला तो म्हणाला, निसर्गात एवढं सगळं आहेच.तू काय काढतोएस नवीन? डोंबल! मनू जेव्हा आमच्या सुप्रसिद्ध गाणारय़ा मित्राकडे वळला तेव्हा तर त्याने हाईटच केली! “तू फालतू गातोस! कसं गातात माहिती आहे?” असं विचारत मनूनं त्याला स्वत:च्या आवाजात गाणं ऐकवलं.जे ओरिजनली किशोरकुमारच्या आवाजात होतं.मनूच्या कापरय़ा आवाजात ते तलतचं झालं होतं.गाणं म्हणताना मनूचा चेहेरा नुकताच शेंबूड पुसायला लागलेल्या मद्दड पोरासारखा दिसायला लागला होता.मनूचा आत्मविश्वास मात्र गानकोकिळेलासुद्धा लाजवणारा होता.
पोटात डोंब उसळलेला असूनही आता काय काय होणार या विचाराने माझी उत्सुकता ताणली जात होती.आमचे सगळे प्रथितयश मित्र तोंडात मुगाची उसळ धरून गप्प बसून होते.त्यांना ही करमणूक नेहेमीपेक्षा वेगळी वाटत असावी.
गाणं म्हणून दातातली फट दाखवत तृप्त हसून झाल्यावर मनू स्वत:च्या बालपणाकडे वळला.मी पहिली अर्धी चड्डी कधी घातली.अर्धी चड्डी सोडून फुलपॅंटीत कधी आलो.पहिल्यांदा शर्ट इन केला त्या दिवशी किती तारीख होती.कुठल्या वर्षी मी पहिल्यांदा नाडीची सुरवार घातली.तिची गाठ कशी घट्टं बसली.ती कशी सोडवता आली नाही.मग त्याच वेळी कशी घाईची लागली.त्या ’घाईची’ला मी कसं तोंड दिलं.मी नोकरीची मुलाखत कशी दिली.मी लग्नं कसं केलं.पोरांना मी कशी शिस्त लावतो.माझ्याशिवाय पर्यायच नसल्यामुळे लोक कसे माझ्याकडेच पुन्हा पुन्हा येतात.तरी मी कसा त्यांच्यावर डाफरतो.माझं डाफरणं कसं विश्वविजयी आहे.माझं कौतुक करणं सगळ्यांनाच कसं अपरिहार्य आहे हे सांगताना मनूनं आमच्या लेखक मित्राला ’मनूचरित्र’ लिहिण्याचं आवाहन केलं.
पुढे मनू म्हणत होता, मी हात हलवला की वारा वहातो.मी डोळे उघडले तरच प्रकाश पडतो.मी अमूक केलं तरच पाऊस पडतो.मी तमूक केलं- आम्हा सगळ्यांचे मूग मात्र गिळून गिळूनही संपत नव्हते…

Monday, September 6, 2010

“खेळा लोकांनो खेळा”

’जन्माष्टमीला मराठी हंड्या फोडतात आणि गुजराती सातम-आठम खेळून कमवतात!’ हा मनूचा दरवर्षीचा ज्योक.त्यानंतर त्याचं त्यावर स्वत:च हसणं.फवारा उडवून जिवणी फाकवत.मग मी पृथ्वीतलावर नव्यानेच आलोय असं समजून ’सातम-आठम’ म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री- दहिहंडीच्या आदल्या रात्री- पत्त्यांचा जुगार खेळणं’ असं एक्सप्लनेशन.
जन्माष्टमी झाली.गोपाळकाला सरला.अनेक गोविंदा भरती झाले- हॉस्पिटलात.काही ढगाला हात लाऊन आले.गेले.संघर्ष आणि संस्कृती दोन्ही लेबलं लाऊन राजकारण्यांनी गोविंदाचंही मनसोक्त भांडवल केलं.सगळ्यांना सुट्टी आणि आम्हाला मात्र नाहीच म्हणून आम्ही केजीतल्या मुलासारखे हिरमुसलो आणि दूरदर्शनला डोळे लाऊन बसलो.हल्ली महिला गोविंदा पथकंही कार्यरत झाली आहेत.
एवढ्या सगळ्यात मनूचा पत्ता नाही सरतेशेवटी काल संध्याकाळी मनूच्या गोकुळात गेलोच.चाट पडायचा बाकी राहिलो.बाहेरच्या खोलीत मनूनं ऑफिस थाटलेलं आणि आजुबाजूला हीऽऽ गर्दी! गर्दीच्या मधोमध मनू.ओळखू न येईल अश्या अवतारात.मांडीवर मातीचा मटका घेऊन बसलेला.त्याच्यासमोर लागलेली माणसांची लाईन खोलीभर अनाकोंडासारखी पसरलेली.एकेक माणूस पाचचं नवीन काढलेलं जुन्या आठ आण्यासारखं नाणं पुढे करतोय.मनूचा असिस्टंट चिठ्ठी फाडतोय, त्यावर रंगीत पेनाने मनाला येईल तो आकडा घालतोय.मनू त्या माणसापुढे मटका धरतोय आणि चिठ्ठी हातात आली म्हणून स्वर्गसुख मिळालेला तो माणूस चिठ्ठी चारचारदा कपाळाला लावतोय.देवाची पार्थना करतोय.त्या चिठ्ठीचे मुके घेतोय आणि ती चिठ्ठी जातेय मनूच्या मटक्यात.बाजूला स्टीलचं मोठं पिंप.त्यात पाच पाच रूपयांच्या नाण्यांचा खच पडतोय.मनूनं डोक्याला रंगीबेरंगी पट्टी बांधलेली.ती तो घट्टं करतोय.मग पुन्हा पुढचा माणूस, पुढचे पाच, पाच रूपये.पुढची चिठ्ठी.बाजूला भला मोठा जाड हार घातलेला बोर्ड. ’निकाल रोज रात्री १॥ वाजता! खेळा लोकांनो खेळा!!’
मला अक्षरश: मुष्कील झालं हो मनूपर्यंत पोचणं.त्या गर्दीत तुमच्या आमच्यासारखे असंख्य लोक होतेच.कॉलेजमधे जाणारी मुलं-मुली होत्या.मुलांना शाळेत पोचवणारय़ा आया होत्या.फिरते सेल्समन होते.एवढंच काय हातावर पोट असणारे मजूर, भाजीवाले, फेरीवाले… कोण नव्हतं? एका चिठ्ठीला पाच रूपये मोजणं कुणाला अशक्य होतं? या रूपयाला नवीन लोगो बहाल झालेल्या जमान्यात?
लोक दहा दहा, पंधरा पंधरा चिठ्ठया मटक्यात सोडत होते.माझ्या खिशातली पाच पाच रूपयांची नाणीही उड्या मारायला लागली.पण बायकोने त्या सगळ्यांचा नारळ आणायला सांगितले होते.कुठलासा नवस फेडायला ती नारळाचं तोरण बांधणार होती.तिच्या भीतीने मी गप झालो.
मांडीवर मटका ठेऊन आत चिठ्ठया सोडणारा मनू दमला आणि घाम पुसायला त्यानं मटका आपल्या एका शिष्याच्या मांडीवर दिला.बाजूला होऊन मनूनं ठंडा मागवला आणि मी मनूला गाठलंच.मला बघितल्यावर त्याने नेहेमीचे ते आश्चर्यचकीत भाव चेहेरय़ावर आणले आणि “ओऽहोऽहोऽहोऽऽऽ वेलकम! वेलकम!” असं जोरात ओरडला.जोडीला ते सुप्रसिद्ध जिवणी फाकवून हसणं होतंच. “भडव्याऽऽ पात पातची नाणी काढ आधी!” माझी चड्डी खेचत मनू भर गर्दीत बोंबलला.मी उगाचच कासावीस झालो.लोक शांतपणे मटक्यात चिठ्ठया सोडत होते.थंडा लवकर आला म्हणून मी वाचलो नाहीतर मनूनं मला पुरतं नागवलंच असतं.एक ग्लास थंडा पिऊन मी मनूच्याच कानात कुजबुजलो, “हे काय करतोएस तू?” मनू निर्विकारपणे डोक्याची रंगीत पट्टी सैल करत म्हणाला, “का? काय झालं?” मी त्राग्याने म्हणालो, “अरय़े हा मटका आहे मटका! कायद्याने गुन्हा आहे हा! लोकांना भीकेला लावतोएस तू!” मनू म्हणाला, कायदा कशाशी खातात माहितीए का तुला? सुजाण नागरीक आहेस ना तू? मी वेडा म्हणून हे दुकान उघडून बसलोय.हा रोखीचा शेवटचा व्यवहार आहे! लोकांच्याच पैशातून ब्लॅकबेरीची ऑर्डर दिलीए! तो आला की तो सोडणार या मटक्यात.मटका तोच! लोकांना माझ्या पायरय़ा झिजवायचीही गरज नाही मग! एसेमेस केले की झाऽलं!!” मनू एखाद्या किर्तनकार हरदासासारखा समेवर आला म्हणून मीही सरसावलो.इतक्यात मनूचा पुढचा अध्याय सुरू झालाच. “सगळं बांधून टाकल्याशिवाय मटका मांडीवर घेऊन बसणं सोप्पं वाटलं तुला? आणि हे- हे- सगळे इथे जमताएत ते भिकेला लागायला जमताएत? अरय़े यातूनच कदाचित उद्याचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस निर्माण होणार, आहेस कुठे?”
मी आजुबाजूला बघितलं.मनूच्या मटक्याच्या अड्डयावरच तर उभा होतो. “अरे पण-” मनूनं मला पुढे बोलूनच दिलं नाही. “यड्या तुझ्यासारखे ऑर्डिनरी, थर्डग्रेड, सामान्य नसतात सगळे! त्याना रंगीबेरंगी स्वप्नं पडतात.त्याना महत्वाकांक्षा असतात.त्यासाठी ते धडपड करतात.तुझं स्वत:च जगाच्या खरय़ा-खोट्याचा निवाडा करण्याचं बुजगावणं टाक बाजूला! कार्यरत हो!” मी हळूच लाईनीकडे बघितलं.मटक्यात चिठ्ठया सोडण्यासाठी आता धक्काबुक्की चालू होती.
मनूनं एकदा तोंड उघडलं की ते बंद करणं ब्रह्मदेवाच्या बापाच्याही हातात नाही! “तू कष्ट करत रहा आणि लाख-दोन लाख पोराबाळांच्या हातात दे.मर! आणखी काय करणार तू?” मला रहावलं नाही.मी कळवळून म्हणालो, “अरे कॉलेजमधली पोरं पण-” मला अडवून मनू म्हणाला, “उद्याऽ त्याना नोकरय़ा देणारएस तू? पस्तीस-चाळीशीतल्या धडधाकट माणसांना व्हिआरेसचा बोनस द्यायला लागलेत आता! या पोरांना आतापासून सवय नको व्हायला? उद्या काय करणार ते? बरं! काय चोरय़ा मारय़ा करताएत का खून-मुडदे पाडताएत लोकांचे?” मी चवताळून म्हणालो, “अरय़े पण बापाचे खिसे फाडताएत ना पाच-पाच रूपयांसाठी!” मनू त्याहीपेक्षा जोरात म्हणाला, “तुझ्या बापाचे फाडताएत का? स्वत:च्याच आईबापाचे फाडताएत ना?... आता या घरी बसणारय़ा बायका.काय करणार नुसत्या बसून बसून? फाडल्या चिठ्ठया तर फायदाच आहे नं त्यांचा त्याच्यात?” मी म्हणालो, “फायदा? असा किती जणांना लागणार ते तुझा मटका?” माझा कान पकडून मनू म्हणाला, “हा बोर्ड बघ! जॅकपॉट कितीचा झालाय आता? चार कोटींचा! कुणाला मिळणार हे पैसे? सहा आकडे बरोबर जमलेल्या यातल्याच कुणाला तरी ना? का मला मिळणार आहेत? आणि प्रत्येक आकड्याला वेगळं बक्षिस आहेच की!” मी दम घ्यायला आजुबाजूला बघितलं.मनूचा एक शिष्य नाण्यांनी ओसंडलेलं ते स्टीलचं पिंप आतल्या खोलीत जाऊन ओतत होता.पुन्हा आणून लावत होता.लोक त्यात पुन्हा पैशांचा पाऊस पाडत होते.
मला आता फ्रस्ट्रेशन- नैराश्य आलं.मी त्राग्याने ओरडलो, “खेळ कसला रे याच्यात? सारखं खेळा, खेळा, लोकांनो खेळा! काय खेळ आहे याच्यात? चिठ्ठीवर नंबर.ती मटक्यात सोडायची.त्यातली एक तू रात्री दीड वाजता काढणार.एखादा झाला तर झाला करोडपती.बाकीचे होणार रोडपती.पुन्हा पुन्हा खेळून.छ्या!ऽऽ”
मनू एकदम गंभीर होऊन माझ्याकडे बघायला लागला.म्हणाला, राज्या तू खरंच तुझं डोकं तपासून घे! पैसे नसले तरी एक चिठ्ठी फाड.अरे हाच सगळ्यात मोठा खेळ! पैशाचा! नशिबाचा!” आणि आयुष्याचा! हे मात्र मी मनात म्हणालो.मनू अमिताभसारखा डावा हात पुढे करून उभा होता.
मी निकराने, काकुळतीला येऊन म्हणालो, “मनू अरे जनाची नाही निदान मनाची-” मनूनं माझा शर्ट पकडला.म्हणाला, "मराठी माणूस काहीतरी करतो तेव्हाच आडवे या रे तुम्ही! हेच मी टीव्हीवर टमाटम सिनेतारका आणून, प्रयोगशाळेतल्या भांड्यात लाह्या फोडल्यासारखे नंबर फोडले असते, एखादा जायनीज माणूस बाजूला उभा करून! तर?” अस्मितेला हात घातला गेल्यावर माझी बोलतीच बंद झाली.मान बाजूला वळवून मनू खच्चून बोंबलत होता.लोकांना बोलवत होता. “खेलो इंडिया खेलो! खेळा लोकांनो खेळा! प्ले जंटलमन प्ले! प्ले ऍंड विन! सुप्पर डुप्पर लोट्टो!!!” गर्दीनं मला ढकलून केव्हाच बाहेर काढलं होतं…