romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, April 26, 2011

गंगेत घोडं न्हालं! (’अभिलेख’२००!!)

वाचकहो! घोड्याला नदी(गंगा)पर्यंत नेता येतं पण… पुढे?... हे झालं घोड्याचं (प्रत्यक्ष घोड्याचं)! शब्दाच्या खुरांवर उड्या दामटणारा म्हणून अल्पावधीत प्रकाशात आणल्या गेलेल्या (कर्टसी: माझी बायको आणि माझा सहचर मनू) माझ्यासारख्या लेखनअश्वाचं आणि त्याच्या प्रातिभ अविष्काराचं (???) पुढे काय झालं याची उत्सुकता तुम्हाला असेलच! (?!) नसली तरी मला ते सांगण्याची उर्मी दाटून आली आहे.तुम्ही १९९ वेळा समजून घेतलंत, आजही समजून घ्याल ही अपेक्षा!
साडेसाती, पापग्रह असं कितीही म्हटलं आणि कितीही मारून मुटकून घोड्यावर बसवलं (पुन्हा घोडा आलाच!) तरी एकदा हवा लागली की वारू (वारू की घोडा?) चौखूर उधळायला वेळ लागत नाही! यालाच कानात वारं भरणं म्हणतात.माझंही तसंच झालं.
माझ्या तथाकथित बालकथा संग्रहाचं प्रकाशन व्हावं ही मनूच्या मनीची अदम्य इच्छा! त्याच्या समारंभ व्यवस्थापक होण्याच्या महत्वाकांक्षेला फुटलेले धुमारे तो माझ्यातर्फे पूर्णपणे उजळवणार होता.त्यातला एक टप्पा पूर्ण झाला.मी दिवसरात्र प्रकाशन समारंभाची स्वप्नं बघण्यात रात्रंदिवस जागू लागलो(?).
लोक रात्र वैर्‍याची आहे म्हणून जागतात, स्वत:ला राजा म्हणवून घेतात हे आ-आठवून त्या स्वप्नांच्या मध्यंतरांमधे मी स्वत:शीच खुदूखुदू हसू लागल्याचं माझं मलाच जाणवू लागलं.
सगळं कसं स्वप्नवत होतं! मी माझे मलाच चिमटे काढून काढून बेजार झालो.मनूला फोन लावला रे लावला की तो मला असंख्य नवनव्या आयडिया ऐकवायचा.प्रत्येक आयडियेआधी ’गेट आयडिया! : फ्रॉम मी!’ असा विनोद-बिनोदही करायचा.अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांची अशी नावं घ्यायचा की ज्यांना मी केवळ पेपरमधल्या फोटोंमधेच बघितलं होतं.शहराच्या मध्यभागातलं सभागृह त्यानं प्रकाशन समारंभासाठी नक्की करायला घेतलं तेव्हा माझ्या हातापायाची सगळी बोटं तोंडात होती.मनूला माझं मध्यमवर्गीय बजेट सांगून मी आधीच अवलक्षण करून घेतलं होतंच.मनूला इव्हेंट मॅनेजर होण्याचा फीवर इतका चढला की तो मला स्वखर्चाने टॅक्सीतून फिरवू लागला.टॅक्सी हे पब्लिक ट्रान्सपोर्ट याने की ’इतर’ लोकांनी प्रवास करायचं वाहन आहे हे मी त्याला परोपरीने विनवूनही तो जुमानेना.
एके दिवशी असंख्य निमंत्रितांची यादीच त्याने माझ्यासमोर टाकली.मी थरथरू लागलो.म्हटलं, “हे हे सगळे येणार आपल्या कार्यक्रमाला?” तो म्हणाला, “झक मारत!” मी लगेच विचारलं, “कसे?” तो म्हणाला, “ते माझ्याकडे लागलं! तू टेन्शन घेऊ नको!” लवकरच उभ्या आडव्या महाराष्ट्रातली या वर्षातली अत्यंत महत्वाची व्यक्ती मीच ठरणार, याबद्दल संशयही राहू नये याची पूर्ण काळजी मनू घेत होता.हात पाय लटपटत असतानाही मनूविषयीच्या अपार प्रेमाने माझं मन भरून दाटलं (!).
मीही चांगलाच सरसावलो.मग मी प्रमुख पाहुण्यांचं नाव सुचवलं की मनू त्याच्या वरच्या कुणाचं तरी नाव घेऊन मला गार करायला लागला.
प्रमुख पाहुणे, अध्यक्ष महाराज आणि कार्यक्रमाची तारीख हा लाल त्रिकोण (माफ करा नेहेमी प्रमाणे चुकीच्या जागी चुकीची उपमा येतेय पण समजून घ्याल तेव्हा…) सारखा लाल सिग्नलसारखा आडवा येऊ लागला.कधी पाहुणा आहे तर अध्यक्ष नाही.अध्यक्ष आहे तर पाहुणा नाही.दोघेही आहेत तर त्या तारखेला सभागृहच रिकामं नाही असं लाल त्रांगडं पिच्छा सोडेना.आता अगदी दर पौर्णिमेला जास्वंद वहायचा लाल तोडगा वर्षभर करावा लागणार या निर्णयाला मी येऊन पोचलो.
मनूला फोन केला की तो समजूत घालायचा.मी त्याला फोन केला की त्याचवेळी त्याला नेमका कुणातरी अतिमहत्वाच्या व्यक्तीचा फोन यायचा.इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे खायचं काम नाही हे मनोमन समजून माझ्या मनातला माझ्या मनूविषयीचा माझा आदर मनोमन दुणावला (चांगलं झालंय नै वाक्यं!).
पुस्तकाच्या प्रती हातात आल्या.ते माझ्या बायकोच्या नात्यातले लांबलांबचे प्रकाशक काका वेगवेगळे झब्बे घालून मला भे-भेटून समारंभाचं काय? असं वेगवेगळ्या झब्ब्यात आणि वेगवेगळ्या स्वरात विचारू लागले.आजपर्यंत त्यांच्या लेखकांचे प्रकाशन समारंभ त्यानी स्वत:च केलेले.प्रकाशन समारंभ आंगावर घेऊन करणारा त्यांच्या प्रकाशन आयुष्यातला मी पहिलाच!
दोन महिने होत आले पुस्तकांच्या प्रती हातात येऊन आणि प्रकाशन समारंभाचं काही ठरेना.
रात्रंदिवस जा-जागून आता माझ्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं होतं! (छे! छे! तसलं काही सर्फींगबिर्फींग मी करत असल्यामुळे ते आलं असा समज करून घेऊ नका!) मी- चक्कं मी- आता पुढाकार घ्यायचं ठरवलं.असं करणारा आमच्या खानदानातला मी पहिलाच.
मी मनूला प्रत्यक्ष भेटलो.त्याला सहजासहजी उपलब्ध होऊ शकतील अशी नावं सुचवली.जे फुकटचा भाव न खाता येतील असं माझं मत होतं.पुस्तक जुनं झाल्यावर त्याचं प्रकाशन करण्यात काय हशील? “तू म्हणतोयस तर…” या बोलीवर मनूनं या पायावरचं वजन त्या पायावर घेतलं आणि लगेच तयार झाला. “हॉल फुकट मिळणार आहे.चहापाण्याचा खर्च फक्त करायचा!” असा बॉम्ब मनूनं टाकला आणि मी मनूला माझा आध्यात्मिक गुरूच करून घेतलं.मग मनूनं स्वखर्चानं थोडक्यात पोस्टर डिझाईन करून घेतलं.निमंत्रणाचं मॅटर तयार केलं.”हा येणार! तो येणार! तू अमक्याला फोन कर, मी सांगतो!” अधिकारवाणीच्या सुरात मनूचं दिशादर्शन सुरू झालं.माझ्या अपेक्षेप्रमाणे मी ज्यांना फोन करत होतो ते मला ओळखत नव्हते. “तुमचं निमंत्रण पोचलंच नाहीए हो!” “आम्हाला नं हल्ली अशा कुठल्याच कार्यक्रमाला जायला मिळत नाही!” असं इतकं कळवळून सांगत होते की त्यांच्याबद्दल अपार करूणेव्यतिरिक्त माझ्या मनात काहीच उरलं नाही.
समारंभाचा दिवस उजाडला.आमच्या घरी गुढीपाडव्यासारखं वातावरण होतं.एवढी मोठी गुढी मी उभारत होतो! पण त्या दिवशी मनूचं काय बिनसलं कुणास ठाऊक? तो माझ्यावरच डाफरायला लागला.
“पोस्टर लावलं नाहीस! त्या अमक्या तमक्याला फोन केला नाहीस!” हे सगळं खरंतर मनूनं स्वत:च स्वत:च्या अंगावर घेतलं होतं.मी ते सगळं करीन असं मी त्याला सांगूनही.तो प्रमुख पाहुण्यांना घ्यायला जाणार होता.तिथेही तो गेला नाही.फोनवरूनच त्याने त्याना यायला सांगितलं.ते आले.मनूनं फोटो काढले.मान्यवर निमंत्रित आले नाहीत.कारण एका वाहिनीवर त्यासगळ्यांची एक महत्वाची पार्टी (!) होती.काही मोजक्या मित्रांमुळे समारंभाची लाज राखली गेली.
एखादा खुसखुशीत सिनेमा चालू असावा आणि त्याला अचानक एक समांतर गंभीर किनार लागावी तसं काहीसं होत होतं.
समारंभ झाला तरी कवित्व (!) उरलंच! ’मनू फोटो कधी देतोएस?’ ह्या माझ्या लाडीक हट्टाला मनू प्रतिसादच देईना.भावनेच्या भरातून जरा बाहेर आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मनू एकूणच प्रतिसाद देणं टाळतोय! महिन्याभराने समारंभाची बातमी पेपरात आली पण ती स्थळ, काळ, वेळ टाळून आणि फोटोशिवाय.
त्यादिवसापासून आजतागायत मी मनूची प्रतीक्षा करतोय.तो मला भेटलेलाच नाही.माझं घोडं गंगेत न्हालं हो, पण मनू काही यशस्वी समारंभ व्यवस्थापक झाला नाही! काय झालं असेल त्याचं? कुठे असेल तो? काय करत असेल? माझ्यासारख्या आणखी कुणाला शोधत असेल? कुठेतरी त्याचा वास येतो, भास होतो.पुढे जाऊन शोधावं तर तो तो नसतोच.तो तुमच्या आमच्यातच आहे हे नक्की.तुम्हाला जर तो कुठे आढळला (हे जरा फारच होतंय, कल्पना आहे मला) तर मला नक्की कळवा! लेखक झालो पण मित्र गेला (हेही फार होतंय कल्पना आहे मला) असं काहीसं झालंय आणि आम्लपित्त वाढलंय त्यावर उपाय चालू आहेत सध्या!

No comments: