romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, April 11, 2011

सहनिवास

उच्चभ्रू वस्तीतल्या ’अमुकतमुक’ सहनिवासांपासून सगळ्याच अर्थाने खूपच लांब.अजगरासारख्या पसरलेल्या पश्चिम रेल्वेवरचं एका जवळच्या जिल्ह्यातलं उपनगर.बावीस वर्षं उलटून गेलीएत.स्थिती आणखी आणखी वाईट.स्थानकापासून चालत वीसएक मिनिटांचं अंतर.इथे स्थित असलेल्या सहनिवासाची वार्षिक सर्वसाधारण सभा.
चाळीस सदनिकाधारकांपैकी चोवीस हजर.रहाणारे सतरा-अठराच जेमतेम.बावीस वर्षांपूर्वी काही मराठी, आपापसातल्या जातीप्रजातींचे सूक्ष्म का असेना ताणेबाणे ठेवत आणि काही गुजराती, मराठ्यांचे आणि त्यांचे नाते (?) जपत इथे सदनिकाधारक झाले.सगळे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय.त्यातल्या दोन-पाच जणांचं भागधेय असं की त्याना त्यांची सदनिका सोडताच आलेली नाही.तिघे-चौघे अजून तिथे रहातात.पाण्याने अंत पाहिलेला.टॅंकर मा-मागवून जीव जात चाललेला ते आता एक दिवसाआड का नाही नळाचं पाणी मिळतंय एवढं सुख.
पावसात असह्य गळती.गच्चीतून, भिंतींमधून.रिकाम्या राहिलेल्या सदनिकांमधून कबुतरांनी (माणसातल्या नव्हे, खर्‍याखुर्‍या!) वस्ती केलेली.पिसं, विष्ठा यांनी माखून टाकलेल्या सदनिका न रहाणार्‍यांनी बावीस वर्षांत चार चार वेळा साफ करून बघितलेल्या.रहाणार्‍यांनी पावसाने आतून काढलेले नकाशे दिसू नयेत म्हणून लाल, पिवळे असे गडद तैलरंग सदनिकेला दिलेले.
बाहेरून तीन विंगा असलेला हा सहनिवास, रंगहीन, भेगा पडलेला.बाहेरून अद्याप रंग काय डागडुजीही केली गेलेली नाही.मागच्या बाजूच्या गटाराची अवस्था अशी की त्यामुळे सहनिवास आज न उद्या खचेलच.
एक सेक्रेटरी बावीस वर्षांपासून तिथेच राहून खिंड लढवत असलेला.ढासळणार्‍या बुरूजांची खिंड लढवत रहाणं हे एकेकाच्या आयुष्याचं ध्येय कसं काय असू शकतं? असू शकतं याचं एक कारण या सेक्रेटरीचा व्यवसाय उच्चभ्रू वस्तीतल्या सहनिवासांची कंत्राटी पद्धतीनं व्यवस्था पहाणं.आपल्या सहनिवासाला असं सोडून जाऊ नये असं त्याला वाटत असेल? मुलं मध्यपूर्वेत स्थिरस्थावर.हा इथेच.आणखी खोलात जायचं तर हा गुजराती :). त्याच्यामुळेच सहनिवास रजिस्टर्ड झालेला सहा वर्षांपूर्वी.
दोन लाख रूपये शिल्लक आणि अडीच लाख रूपये सदनिकाधारकांची थकबाकी.
अशा सहनिवासाची वार्षिक सर्वसाधारण सभा.दोन मुख्य विषय.या पावसाळ्यापासून कसा बचाव करायचा? एवढ्या मोठ्या थकबाकीचं काय? खरं तर प्रश्न पहिला आणि एकमेवच.त्या प्रश्नाचा उत्तरार्ध असलेला दुसरा प्रश्न.गच्चीच्या वॉटर प्रुफींगचं कोटेशन पाच लाख चाळीस हजार रूपये आणि इमारतीचं बाहेरून गच्चीशिवायच्या वॉटरप्रुफिंगचं आणखी तेवढंच.मिळून अकरा लाख रूपये.ते कसे उभे करायचे? काही थकबाकीतून.बाकीचे वर्गणीतून.
सभा सुरू होते.कुणीही यावं काहीही बोलावं असं सभेचं सर्वसाधारण स्वरूप.या दहा-बारा वर्षात सहनिवासातले सदनिकाधारक आणि त्यापेक्षाही भाडेकरू हे परप्रांतीय.स्पष्टं शब्दात सांगायचं तर भय्ये.आता पुन्हा हे पूर्वीच्या ’मद्राश्यां’सारखं होतंय.दक्षिणेतले सगळे मद्राशी तसं उत्तरेतले सगळे भय्ये.पण भय्ये हेच बरोबर.बिहारमधले असोत किंवा उत्तरप्रदेशमधले.झारखंड आणि उत्तरांचलातले काही ठळकपणे अजून ओळखता येत नाहीत बुवा, एक धोनी झारखंडातला सोडला तर.
तर... सभेत एक भैय्यीण उठते.तावातावाने.चेअरमन जो भैय्याच आहे, जो कंत्राटी पद्धतीने बांधकामं करतो आणि दिसतो, रहातो एखाद्या समाजविघातक प्रवृत्तीवाल्यांसारखा, त्याने सोसायटीला न विचारता त्याच्या भल्यामोठ्या गाडीसाठी सहनिवासाचंच विस्तारीकरण करून पार्कींगची शेड कशी बांधली? हा भैयीणीचा सवाल.ती लालबुंद.थरथरणारी.कुणाला बोलून न देणारी.शेड बांधायची परवानगी घेतली होती का? परवानगी घेतली असेल तर सोसायटीला त्याचं काय भाडं मिळतं? ते बाहेर पाच-पाच लाख असतं इत्यादी तिचे मुद्दे ती खोटं खपवून घेत नाही या सात्विक संतापाने जीव तोडून सांगते.तिच्याबरोबर बसलेल्या सदनिकाधारकांच्या बायकांचा संतापही अनावर होऊ लागतो.या सगळ्या पहिल्या रांगेत बसलेल्या आणखी एका भैय्यावर घसरतात.हा ही बांधकाम कंत्राटं घेणारा.त्यानं त्याच्या दुकान कम ऑफिसमधे चोरी झाली म्हणून ग्रील लावतो अशी परवानगी घेतली आणि दुकानाबाहेर शेड बांधून बाजूला भिंतीचा आडोसाही केला.एखाद्या रूमचा ऐवज तयार केला.तो गप्पं.त्याच्यावर जास्तंच आक्रमण झालं की तो सोसायटी बनण्याच्या आधी कोणी कोणी गॅलरीला ग्रील्स लावून ती झाकली त्याचे हिशोब सांगतो...
कधी एकदा हरदासाची कथा मूळ पदावर येते आणि गच्चीच्या वॉटर प्रुफिंगचा विषय निघतो.त्यावर गच्चीवर संपूर्ण पत्र्याची शेडच उभारा असा भांडणार्‍या भैयीणीचा आग्रह.टाईल्स आणि केमिकल मी स्वस्तात आणीन.लेबर दुकानाबाहेर शेड बांधणारा (वाचकांना कळावं म्हणून असा उल्लेख) भैय्या देईल असं आणखी एक सुशिक्षित भैया म्हणतो.तो आपल्या बांधवाशी त्यांच्या त्या तसल्या भाषेत संवाद करत नाही.असे नवे पर्याय येऊन आधी आलेल्या कोटेशन्सना फाटा मिळालेला.गंमत बघा हं.आधीची कोटेशन्स दिलेली आहेत बेकायदा पार्कींग बांधणार्‍या चेअरमन भैयाने.त्याच्या कुणी ’शिष्यां’ची म्हणून.
आणखी एक परप्रांतीय शिक्षक सेक्रेटरीच्या बाजूला व्यासपीठासारख्या मांडलेल्या टेबलामागे बसलेले.हे त्यांच्या बांधवांशी त्यांच्या त्या तसल्या भाषेतून संवाद साधतात.अतिशय विनम्रपणे बोलतात.सभेची सभ्यता पाळायला सांगतात.दोन बांधवांमधे जुंपली की ’आपसवामां सुलझाई लई लो हो’ असं काही त्यांच्या त्या भाषेत सांगतात आणि मेंटेनन्स का दिला नाही? असं विचारल्यावर दोन-चार महिने भाडेकरू नव्हता असं कारण सांगतात.
मूळ मुद्याच्या आणखी खोलात शिरल्यावर सभेच्या असं लक्षात येतं की एवढा खर्च करून ही एवढ्या वयाची इमारत पुनर्बांधणीत गेली तर त्या खर्चाचा काय उपयोग?
सेक्रेटरीने पुनर्बांधकामासाठी विकासक शोधण्याचा उद्योग करून पाहिलेला असतो.सहनिवास असलेल्या पंचक्रोशीत मोबाईल फोन हेच ऑफिस असलेले सगळे विकासक.समोरच्या सहनिवासाच्या पुनर्बांधणीचा अनुभव ताजा.अनेक सदनिकाधारक देशोधडीला लागलेले.जाब विचारायला गेलेल्या तरूणाचा खून.अजूनही पंचक्रोशीवर समाजविघातक पाया असलेल्या प्रवृत्तींचंच वर्चस्व.त्यातले काही राजकारणी झालेले.’मैद्याच्या पोत्यां’सारख्या वर्षानुवर्षे बसून राहिलेल्या राजकारण्यांनी त्यांना साथ दिलेली.त्यामुळे जिल्ह्याबाहेरच्या महानगरातला एकही विकासक तिथे यायला तयार नाही.
आणखी एक गंमत म्हणजे दोन राजकारणी भावांमधून विस्तवही जात नाही म्हणे! :D पण सहनिवासाच्याच आवारात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयं थाटलेली.कार्यकर्ते भूमिपुत्र.व्यवसायाच्या प्रतिक्षेत.त्यांची सोय कशी लावायची हा पक्षापुढचा महान प्रश्नं.मग आधी वाचनालय, चहा-भजीची-सिगरेट-गुटख्याची टपरी असं करत सहनिवासाच्या जागेवर अतिक्रमण.जाब विचारायला गेलेल्या एकट्या दुकट्या सदनिकाधारकाला फटकावणं.बाकीचे सावध.हे अतिक्रमण हेही विकासक पुढे न येण्याचं आणखी एक कारण.पक्षांच्या मागण्यांना कसं पुरे पडायचं हा त्यांच्यापुढचा प्रश्नं.
एकूणात, भूमिपुत्र असोत, परप्रांतीय असोत, बरेच छोटे मासे, त्याना गिळणारे मोठे मासे.उद्या विकासक जरी आला तर तो सगळ्यात मोठा मासा.
सेक्रेटरी म्हणतो उद्यापासून मी काम बघणार नाही.दुसरा कुणीही पुढे येत नाही.
देशाचं आणि देशाच्या एका कोपर्‍यातल्या सहनिवासाचं चित्र सारखंच असल्यासारखं.
हे चित्र प्रातिनिधिक आहे का? तुम्हीच ठरवा!

2 comments:

Unknown said...

प्रांत, पोशाख वाद किंवा भाषा वाद हा सगळा खरंतर बुद्धीभ्रम आहे. आवश्यक अशा सामाजिक किंवा व्यावहारिक संतुलनासाठी परस्परांना पूरक अशा काही सीमा रेषा आखल्या पाहिजेत आणि असल्याही पाहिजेत. पण त्या कशा तर एक व्यापक असा समाज कल्याणकारी संकेत म्हणून. तेच स्वातंत्र्य जाती,धर्मांना दिले पाहिजे,मिळाले पाहिजे. अन्यथा एक देश म्हणून एकसंघ राहण्यात आपण आणि आपले नागरिकत्वच अडचणीचे ठरेल. कदाचित ठरते आहे. ज्याचा राजकारणाच्या नावाखाली,समाजकल्यांणकारणाच्या नावाखाली काहीच'जनां'कडून अनाठायी लाभ उठवला जात आहे.

विनायक पंडित said...

राजेंद्रजी अभिलेखवर तुमचं स्वागत! अगदी पटलं तुमचं म्हणणं.धन्यवाद!