romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, April 19, 2011

मीठेमें क्या है?

अफलातून कॅच लाईन- तुमच्या मनात ठसून राहिल अशी ओळ, नेमकी दृष्यं, असले तर मोजकेच संवाद आणि?… भारतात एखादी जाहिरात लोकप्रिय व्हायला आणखी एक गोष्टं परिणामकारक ठरत आली आहे आणि ती म्हणजे भारतीय संस्कृतीतल्या वैशिष्ट्यांचा वापर.
ही जाहिरातींची जाहिरात(?) करण्यासाठी चालवलेली अनुदिनी नव्हे.जाहिराती स्वत:च इतक्या चालताएत.कित्येक करोडोंची उलाढाल त्यातून होतेय.जाहिरातींच्या मार्‍यापुढे खरंतर कंबरडं मोडतंय बघत रहाणार्‍याचं.त्यामुळे खरं तर जाहिरात निर्माण करणार्‍यांचं आव्हान आणखी वाढलं असेल.काही जाहिराती कितीही वेळा दाखवल्या तरी बघणार्‍याला रमवणार्‍या ठरताएत आणि हे आव्हान यशस्वीपणे पेलताएत.
झूझूची मालिका ही त्यातली एक.खरं तर त्यात भारतीयता वगैरे नाही पण.वेगळे(विचित्र)पण आहे.वैश्विकता आहे.आता तर तो ’रजनी’ झूझू थेट मंगळावरच पोचलाय! तो बॅग काय आवरतो, हात काय झटकतो, खोलीच्या दरवाज्याकडे म्हणून निघतो, थांबतो आणि रजनीस्टाईल थेट खिडकीतून पसार काय होतो.अप्रतिम आहे सगळं.मुळातली कल्पना अप्रतिम आहे.खरं तर धाडसीच आहे.पण एक आख्खा मौसम झूझूंनी धुमाकूळ घातल्यानंतर या मौसमातही हा झूझू आपला प्रभाव टिकवून आहे.
आपण बोलतोय ते दुसर्‍याच जाहिरातीबद्दल.’मीठेमें क्या है?’ ही ओळ असलेल्या.कॅडबरी चॉकलेटच्या.कॅडबरीचे सगळेच जाहिरात विषय लोकप्रिय राहिलेले आहेत.मीठेमें क्या है? ही खरं तर एव्हाना चावून चावून चोथा व्हावी अशी लाईन.पण भारतीयांची गोड खाण्याची आवड, जाहिरात निर्मात्यांनी समोर ठेवलेला भारतीय परंपरा, संस्कृती, एकत्र कुटुंब हा पाया आणि नेमकेपण हे सगळं या आधी बर्‍याच वेळा वापरल्या गेलेल्या या ओळीला आणखी एक नवा आयाम देऊन गेलं आहे.
निर्माते ह्या जाहिरातींच्या भागांचा क्रमही हुशारीने रचतात.बहुदा रात्रीचं असावं असं एकत्र जेवण, लहान मुलीला असलेलं चॉकलेटचं प्रचंड आकर्षण.जेवणानंतर गोड काय? घरातल्या प्रमुखानं केलेली पृच्छा.छोट्या मुलीनं चॉकलेट लपवणं, तिच्या आईनं ते तिला सगळ्यांना द्यायला सांगणं, तिचं रडणं, क्षणभर आपल्यालाही वाटणं की आता पुढे काय? आणि स्मार्ट सूनेनं आतून आणखी एक चॉकलेट डिशमधे आणून ठेवणं!
सगळ्यात प्रथम जाहिरातनिर्माता घर, एकत्र कुटुंब प्रस्थापित करतो.मग त्या थोड्याशा अवधीतच लहान मुलगी, सून, सासू, कुटुंबप्रमुख ही पात्रं प्रस्थापित होतात.चॉकलेटशी अर्थात गोड खाण्याशी त्यांचा संबंध प्रस्थापित होतो.एका मोठ्या जनघटकाला जाहिरात खिशात टाकते.
पुढच्या भागांचा पाया इथेच रचला जातो.स्मार्ट सूनबाई-गृहिणी-तरूण स्त्री हा चित्रवाणीपुढे असणारा मोठा घटक अधोरेखित झाल्यावर पुढचा भाग अनपेक्षित वळण घेतो.हा भाग रोमान्स-प्रणय ही चिरतरूण कल्पना, तरूण प्रेक्षक आणि नवरा, बायको सासू हा शाश्वत त्रिकोण हा पाया वापरतो.मग केस पुसणार्‍या तरूण विवाहितेचं नवर्‍याच्या अंगावर तुषार उडवणं, नवर्‍यानं टिपीकल ’खानेमें क्या है?’ असा नेहेमीचा प्रश्नं विचारणं, पार्श्वभागी त्याचवेळी सासूचं आगमन, निर्गमन, सूचक कटाक्ष आणि स्मित, त्या निमिषभरातच सूनेनं सासूचं अस्तित्व जाणवून ’करेला’ हा मोजकाच शब्दं वापरणं आणि मग मीठेमें... ही सम गाठल्यावर मोहक विवाहितेने तितकंच मोहक स्मित करणं.चांगल्या कलाकारांची निवड हे चांगल्या जाहिरातीच्या यशाचं आणखी एक गमक.पुढे काय? उत्सुकता वाढते.
त्यापुढे घरातल्या बाहेरून येणार्‍या तरूण घटकाचा नेहेमीचा प्रश्न पुन्हा समोर.खानेमें क्या है? समोर कोण बसलंय? फेसपॅक लावलेली बायको? की बहिण? नणंद हा एकत्र कुटुंबातला आणखी एक घटक प्रस्थापित होतोय, तिच्या टिपीकल वैशिष्ट्यानुसार.या सगळ्यामुळे विनोदनिर्मिती, उत्तम जाहिरातीतला महत्वाचा घटक.एव्हाना मालिकेचे धारावाहिक भाग बघायला चटावलेले प्रेक्षक चांगलेच गुंगुंन गेलेत.हा ही विचार, महामालिकांच्या महासामर्थ्याचा!(?) जाहिरात बनवणार्‍याने केला असेल? -आणि या जाहिरातीतलं कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण घिसपिटं असलं तरी महामालिकांसारखं टॉर्चर करणारं नाही!
जाहिरात क्षणार्धात संपणारी असते.भारंभार जाहिरातींच्या मार्‍यामुळे दर्शक हैराण झालेला.त्याचं कितपत लक्षं असेल प्रत्येक जाहिरातीकडे.उलट जाहिरात लागल्यावर तो इतर(!) महत्वाची कामं करायला तत्परतेनं उठतोच.या सगळ्यातून खिळवून ठेवणार्‍या जाहिरातींमागे इतका सगळा विचार असतो हे कळत गेलं की एक वेगळं विश्व, एक वेगळी मजा समोर येते.
... अंताला एक कलाटणी... मीठेमें क्या है? ही या जाहिरातीत संसारी प्रणयभावनेला अनुकूल म्हणून वापरली गेलेली पंचलाईन नको एवढी लोकप्रिय होऊ नये.अन्यथा सडकसख्याहरींच्या हाती आयतेच कोलीत!

6 comments:

Suhas Diwakar Zele said...

अप्रतिम कंसेप्ट आहे त्या जाहिरातीचा...
खुप खुप भावला मानला... :)

विनायक पंडित said...

अगदी खरं आहे सुहास! मस्तच!:)

BinaryBandya™ said...

मलाही फार आवडते हि जाहिरात (आणि हो ती मुलगी सुद्धा :) )

विनायक पंडित said...

<>+++1 :) बायनरी बंड्या आपलं स्वागत! आभार! (मैथिली सुभाष, मराठी, मालिका+जाहिराती):):)

Yogesh said...

ती जाहिरात अफ़लातुन आहे....एकदम फ़ेवरीट :) :)

विनायक पंडित said...

:D धन्यवाद योगेश!