romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, May 22, 2014

देवराय (३)

भाग १, भाग २  इथे वाचा!
पुष्पी चहा पित खिडकीला टेकून उभी. निरीक्षकासारखी. आजोबा आणि देवराय यांच्या संवादाकडे लक्ष देऊन.
"मग? समेळशास्त्री काय म्हणताएत?"
"काही नाही चाललंय.थकलेत तसे. पण भगवद्‍गीता, महाभारत म्हटलं की उत्साहानं ओसंडून जातात! अभ्यास दांडगाच-"
"अरे व्यासंग म्हण व्यासंग! जात जा! जात जा! रामनवमीची तयारी कुठपर्यंत आलीय?"
"चालू आहे जोरात! शास्त्रीबुवांच्या व्याख्यानानेच सुरवात करतोय-"
"हे सगळं ... ती टोणगी हा हा हू हू‍ऽ करत, मुलींच्या टिंगली करत उभी असतात त्याना ऐकायला लाव!"
"सांगतो आबा रात्री जमतो गच्चीत तेव्हा! गप्प बसून ऐकत असतात माझं. मानाही डोलवतात पण-"
"खरंय बाबा! खरंय! त्याना हाताला धरून काही सांगायचं- अले... अले अले आला का बाबू छालेतूनऽ आज काय-"
"ग्र्यांपा यू नो! आर मिस..."
श्रीधर, पुष्पीचा भाऊ पोराला शाळेतून घेऊन आला. पोरगं "अंकीऽऽल" करत देवरायला चिकटलं. देवरायनं त्याला उचलून घेतलं. त्याला पेढा भरवला. पण त्या आधी ’सदा सर्वदा...’ त्याच्याकडून म्ह्णून घेतलंच. पुष्पी हसत त्या दोघांकडे बघत होती.
"काय श्री? कसं काय चाललंय आणि?"
"ढकलायचं काय... कसं तरी... चालवायचं...!..."
"का रे?"
"अरे इथून बसनी ऑफिसला जायचं. पंऽऽधऽऽरा मिनीटं प्रवास! काय गर्दी! बसायला जागा नाही! ऑफिसमधे काम खूऽऽप! साहेब कडक! काय विचारू नको!"
मोठ्या पोटावरून हात फिरवून कडवट ढेकर देत श्री म्हणाला आणि तोंड वेडवाकडं केलं. पुष्पीला वाटलं आता देवराय त्याची खिल्ली उडवणार!- इतक्यात-
"मग देवा, पुढचा काय विचार आहे?"
"आबा, आहे एक मित्र, तो आणि मी मिळून इंटिरियर डिझाईनिंगचा बिझिनेस करायचा म्हणतोय!"
"ऑल द बेस्ट!"
"थॅंक्यू!... पुष्पा, निघतो! चल रे श्री!... अरे हो पुष्पा!... तुझ्या त्या निखार्गेचा लहान भाऊ भेटला होता. माझ्या वर्गात होता ना! त्याची सगळी चित्रं मीच काढून द्यायचो. गूड शेरा मिळाल्यावर हा लगेच ती द्यायचा परत! रंगवण्यासाठी! मला! हाऽहाऽहाऽ..."
देवरायच्या चेहेर्‍यावरचा आनंद निर्व्याज... समोरचासुद्धा टवटवीत व्हायचा लगेच.
"त्याच्या बहिणीचं, म्हणजे तुझ्या त्या निखार्गेचं लग्न ठरतंय म्हणत होता... बाकी काय?"
’चाललंय’ या अर्थी मान हलवत पुष्पी हसली, "तुझ्या पुढच्या करियरसाठी शुभेच्छा!"
असं तिनं म्हणताच असाच हसला होता तो... आता सारखाच...
"चहा घेणार का?"
पार्टिशनच्या आडून देवरायचा खणखणीत स्वर कानावर पडला आणि पुष्पी परतली, भानावर आली... देवरायचं घर... वर फिरणारा पंखा... आपल्या चेहेर्‍यावर आलेला घाम, त्याच्या वहिनीचा बोलता बोलता लागलेला डोळा, देवरायची आई गेली म्हणून सांत्वनाला आलेल्या आपण... एक एक करून सगळं लक्षात यायला लागलं... समोर उभा देवराय... हातात चहाचे कप घेऊन... हासत...   (क्रमश:)