romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, February 27, 2011

समंजस प्रेम!

स्त्री-पुरूषांमधले नाजूक भावबंध किंवा नैसर्गिक आकर्षणातून त्या दोघांनी एकत्र येणं म्हणजे प्रेम असा सार्वत्रिक समज आहे.स्त्री-पुरूष वयात येत असताना त्यांना या प्रेमाची चाहूल लागते.मनात प्रेमाची हुरहूर निर्माण होते.या ना त्या प्रकारे प्रत्यक्ष प्रेमभावनेची अनुभूती घेणं ही त्यापुढची पायरी.हे प्रेम सर्वस्व व्यापून टाकणारं ठरतं.प्रेमाचं वादळ समोर ठाण मांडून उभं रहातं.गंमत म्हणजे परिस्थितीवश किंवा स्वत:हून ठरवून माणूस या प्रेमापासून वंचित राहिला तरीही हे वादळ ठाण मांडून रहातंच.
सहसा प्रेमाचं लग्नात रूपांतर होतं पण लग्न न करता प्रेम करत रहाणं, लग्नाशिवाय नवरा-बायकोच्या प्रेमाने एकत्र रहाणं हे पर्यायही अवलंबले जातात.दोघांनी उरलेलं आयुष्य अविवाहित राहून किंवा परस्परांच्या अधिकृत जोडीदाराशी संसार करत असतानाही एकमेकातला प्रेमाचा धागा टिकवून ठेवणं ही तारेवरची कसरत होते.प्लेटोनिक लव्ह असं या प्रेमाचं लोकप्रिय नाव.
माणसं आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे आपापल्या प्रेमसंबंधात वागत असतात.स्त्री-पुरूषांमधल्या फार पुढे गेलेल्या प्रेमात शारीरिक आकर्षणाचा भाग नाकारता येत नाही.लग्नाने अशा संबंधाला अधिकृत मान्यता मिळते.लग्न न करता आणि शारीरिक आकर्षणावर मात करत परस्परातला प्रेमाचा धागा तरीही टिकवून ठेवणं म्हणजे माणसाच्या परिपक्वतेची एक प्रकारे कसोटीच.
प्रेम हे एकमेकाच्या मनात घर करून राहिलेलं असतं.सतत करत रहाणं यासारखी ही गोष्टं नसते.
लग्न करून प्रेमावर अधिकृत मान्यतेची मोहोर उठवणं सहसा चुकत नाही.जे प्रेम न करता विवाहबद्ध होतात, अर्थात ठरवून लग्न करतात त्यांचा प्रेमाचा अध्याय लग्नानंतर सुरू होतो.आमचा प्रेमविवाह नाही तर विवाहानंतरचं प्रेम आहे! असं हे अभिमानाने सांगतात.आधी प्रेमाची हुरहूर, मग वादळ, मग लग्न या प्रवासात हे वादळ लग्नानंतरही चालू रहातं.सहजीवनाचा धागा आधाराला घेऊन ह्या वादळावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू होतात.समंजसपणा काही एकदमच येत नाही.त्यासाठी अनेक परिक्षांमधून जाणं अपरिहार्य ठरतं.काही वेळा या अग्निपरिक्षाही असू शकतात.सगळ्या अंगाने दोन जीव एकत्र आल्यावर एकमेकांच्या सवयी, स्वभाव यांची खरी जाण येते.एकमेकांच्या स्वभावधर्मानुसार जुळवून घेणं यात प्रेमाची कसोटी लागते.लहान लहान गोष्टी जुळवून घेणंही कधीकधी जीवघेणं होऊन बसतं.सतत एकत्र राहिल्यामुळे घर्षण वाढत रहातं.
दोघांपैकी कुणी एकानं फक्त स्वत:चाच विचार करून चालत नाही.प्रेम ही भावनाच सहभागाची आहे.बर्‍याच गोष्टी समजायला सोप्या असतात.कळतं पण वळतंच असं नाही.माणसाच्या विचार करण्यात, बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात अंतर रहातं.मग मागच्या काही पिढ्यामंधे होत होतं तसं कुणीतरी एकानं (स्त्रीनं?) पड खाऊन हे प्रेम (!) वाचवावं लागतं.
वैवाहिक आयुष्यात लैंगिकदृष्ट्या एकमेकांशी अनुरूप होत रहाणं ही परिणामकारक गोष्टं असते.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सगळा डोलारा याच गोष्टीवर अवलंबून असतो.जोडप्यांचे आपसातले उत्तम लैंगिक संबंध अनेक तणावांवर मात करू शकतात.तसंच आपसातल्या अनेक तणावांवर योग्यं उत्तरं शोधायचा सतत प्रयत्न करून माणूस प्रेम या भावनेचा शारीरिक, भावनिक परमोच्च बिंदू गाठू शकतो.शरीर आणि मन या गोष्टी वेगळ्या रहातच नाहीत.
मग मुलं होतात.त्याना सांभाळणं, वाढवणं, त्यांच्या संदर्भातले निर्णय घेणं ही त्यापुढची परिक्षा.दोघांच्या प्रेमाला फुटलेला हा अंकुर दोघांच्या प्रेमाची व्याप्ती वाढवतो.आता आईवडलांमधला विसंवाद आणखी एका आयुष्याला मारक ठरू शकतो किंवा आईबापांमधलं प्रेम त्या मुलाला सोन्यासारखं आयुष्य जगायला बळ देऊ शकतं.मुलं मोठी होऊ लागतात.एकमेकांच्या सततच्या सहजीवनामुळे जोडप्याच्या शारीरिक, भावनिक संबंधात एकसुरीपणा यायला लागतो.तो घालवणं पुन्हा एकमेकाच्याच हाती असतं.खरं प्रेम या एकसुरीपणावरही मात करतं.
फक्त नवरा-बायको हेच नातं असलेल्या संबंधात हळूहळू नवरा-बायको हे नातं लोप पावून दोघे एकमेकांचे मित्र होतात, एकमेकांचे पालक होतात.प्रेम म्हणजे फक्त प्रेमच, भांडण नाहीच असं नसतं.उलट भांडणातूनच प्रेम अधिक वाढतं.मनुष्यस्वभाव किंवा परस्परसंबंध यांचा एक आलेख असतो.तो वर-खाली होत असतो.त्यातही उत्पत्ती, स्थिती, लय असं चक्र असतंच.
आता एकमेकाचं वागणं, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं एकमेकांच्या अंगवळणी पडतं.आपल्याला जमत नाही ते आपल्या जोडीदाराला चांगलंच जमतं हे लक्षात यायला लागतं.’मी’ पणाची जागा ’आपण’ने घेतली जाते.दोघांची मिळून जी शक्ती निर्माण होते त्याचा प्रत्यय यायला लागतो.
सर्वसाधारणपणे तिशी ते पन्नाशीतला हा प्रवास.
काही अजून एकटे राहिलेले किंवा या प्रवासात एकटे झालेले असतात.ते मग स्वत:ला नोकरीत, व्यवसायात, सामाजिक कार्यात, छंदात स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात.झोकून देण्याचा प्रयत्न करतात असं म्हणावं लागतं कारण कितीही झालं तरी, कुणी कबूल करो वा न करो, सहजीवनाची पोकळी रहातेच.
एक संबंध जोडला.त्यातली जादू संपली की दुसरा जोडला.असं करूनही जगता येतं.पण त्याला प्रेम म्हणता येत नाही.प्रेमभावनेतली अखंडता त्यात नसते.
काही जोडपी नाईलाजाचं सहजीवन जगत असतात.कुठल्याही कारणाने असेल किंवा कुठल्यातरी कारणासाठी असेल.सहजीवनाचा जाच व्हायला लागतो.प्रेमाची आडकाठी व्हायला लागली की आयुष्याला अर्थ उरत नाही.माणूस मुळात एकटा असतो.सहजीवन हा त्याच्या आयुष्याचा आधार.तो खिळखिळा झाल्यावर किंवा नाहीसाच झाल्यावर तो एकाकी होतो.आयुष्य खेचत रहाणं हेच भागधेय उरतं.
नुसतंच नर आणि मादी म्हणून जगता येतं की! पण मग माणूस आणि जनावर यात फरक काय?
समंजस प्रेमाची महती ही अशी असते.मुलं-बाळं मोठी होतात.घरट्यात थांबेनाशी होतात.पन्नाशीपर्यंत करियरची धावाधाव शांत होते.आता एकमेकाला आधार असतो तो फक्त प्रेमाचाच!

Friday, February 25, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(७)

आधी ड्रॉवर उघडू? की स्पंजपॉटमधला स्पंज ओला करायला देऊ? की स्टॅंपवरची तारीख बदलू? की कॅश सबसिडरी नोटबुक उघडून त्यात १, २, ३ असे नंबर टाकून ठेऊ? की दार वाजवणार्‍या ऑफिसरकडून कॅश इन हॅंड मोजून घेऊ?... काय नक्की करावं आधी हे न सुचून मुख्य रोखपालाचा अधिभार अचानक सोपवला गेलेला निशी बावचळून गेला.
त्या तशा अवस्थेतच त्याचं लक्षं समोर गेलं.समोरच्या काचेतून पलिकडे.पलिकडे जनता उभी होती.प्राणिसंग्रहालयात नव्यानेच दाखल झालेल्या, आधी कधीही न पाहिलेल्या, बबून नावाच्या माकडाकडे बघत रहावं तशी निशीकडे बघत.त्याचं लक्षं जनतेकडे गेल्याबरोबर एकच ओरडा सुरू झाला.त्या कालव्यातूनच निशीचं पेमेंटचं धुमशान सुरू झालं...
निशीच्या समोरच बॅंकेने सहाय्यार्थ दिलेलं कॉम्प्युटर टर्मिनल.निशी दचकला.आणखी एकदा.आयलाऽऽ दोन-तीन वर्षं झाली पेमेंट काऊंटरला बसून.ढकल ढकल ढकललं बसणं.आता?...
सबसिडरीबुकमधे नंबर लिहिणं वगैरे आता बादच.आता??... गेल्या वर्षभरात सगळ्यांनी मिळून ×× लावल्यामुळे आणि संगणक कमी असल्यामुळे एकदोनदाच संगणक वाट्याला आलेला.मशिन चालू करण्यापासून तयारी...
चालू करायचं बटण कुठलं? हे... आणि... हे असावं... अजून नाही चालू झालं... साली दोन बटणं की तीन... एऽऽ आंजर्लेकरऽऽएऽऽ...एऽऽ करकेराऽऽएऽऽकदमऽऽतू तरीऽऽ... साले कोणी लक्ष देत नाहीत... हाक मारली की हसतात... हे असेल का तिसरं बटण?... दाबूया?... दाबूया की नको?...
समोर उभ्या जनतेमधे कोलाहल माजत चालला आणि दुग्ध्यात पडलेल्या निशीला ते तिसरं बटण दाबावंच लागलं.
... हं... झालं चालू च्यामारी... आता... लॉग इन नेम... हं... आता हं पासवर्ड... आयला आपला पासवर्ड...हंऽहात तिच्याऽऽ... हा नाही?... मग?... हंऽऽहांऽतऽ...
निशीला पासवर्ड आठवेना.आठवलेला पासवर्ड मशिन घेईना.आता शेवटची संधी.ही साधली नाही तर लफडं.मग खालचा बंड्या.त्याच्या शिव्या.बडबड.नको तिथे चिमटे.आणि सगळ्यांचं हसणं.समोर जनता आता प्रक्षुब्ध होऊ लागलेली.निशीनं डोळे मिटून सुपेचं स्मरणं केलं.की बोर्डवरच्या सात-आठ तरी कीज उडून हातात येतील एवढ्या जोरात तो बडवून निशीनं शेवटचा प्रयत्न केला आणि कशी कुणास ठाऊक मशिनला दया आली.
तोपर्यंत समोरच्या काचेखालच्या फटीतून चार पाच हात सरसावले.चेक्स असलेले.
अरेरेरे!... हे काय करत बसलो आपण?... आधी टोकन द्यायला पाहिजे होतं!... छ्याऽऽ प्रत्येकाला टोकन देऊन आधी वाटेला लावलं असतं... छ्या:ऽऽ टोकन स्टॅंड कुठेय? एऽऽकदमऽऽएऽऽ टोकन स्टॅंड कुठेऽऽ-
“आरं एऽऽ निश्याऽऽ भाड्याऽऽ टोकनं कसली द्येत बसलाईस तुज्या कर्माचीऽऽ घ्ये घ्ये च्येक! ड्येबिट कर आन् हान् कॅश च्यामारीऽऽ एऽऽ”बंड्या बाहेर होताच जनतेच्या लाईनजवळ.बंड्याच्या ओरडण्यावर लाईनीतले बहुतेक हसले.
आता काय हसण्यासारखं होतं त्यात? निशी आणखी कावराबावरा झाला.काही न सुचून चुळबुळू लागला.आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी जुलमाने घोड्यावर बसवल्यासारखा गर्दीकडे पाहू लागला.
जनता आता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत होती.
पर्याय नव्हता.गत्यंतर तर नव्हतंच.
चेक घ्यायचा.बघायचा.कॉम्प्युटरवर अकांऊटला मारायचा.ड्रॉवरमधून कॅश उचलायची.चेक घे.बघ.गड्डी फेक.नोट कर.चेक घे.बघ.नोटा सरकव.नोट कर.ते करत असताना कॉम्प्युटरवर लक्ष ठेव.लॉग आऊट होऊ नये म्हणून.झाला तर पुन्हा दोन दोन पासवर्ड... मार.. मशिन चालू कर...
गड्डी कुठली फेकतोएस? पन्नासची की शंभरची? की पन्नासच्या जागी शंभरची?... पाचशे... हजार...बापरे! आज मरणार! छ्या:ऽऽ
आज काही धडगत नाही आपली! हा विचार निशीचा पिच्छा सोडत नव्हता.मग नोटांवरचे गंधी आपल्यालाच बघून हसताएत असं त्याला जाणवायला लागलं...