शाळेतून कॉलेजमधे जाताना आणि त्यानंतर नोकरी-व्यवसायात शिरताना माणसातल्या सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं.प्रेम या विषयात अनेक नवनवीन जाणिवा व्हायला लागतात.प्रथमदर्शनी प्रेम आणि पहिलं प्रेम यांच्या रोमांचकारी अनुभवाचं हे सर्वसाधारण वय म्हटलं पाहिजे.हिंदी सिनेमानं हा अनुभव आणखी रोमांचकारी बनवून टाकला.उदा. ’मेरे मेहेबूब’ ह्या सिनेमातली ती सुप्रसिद्धं आणि नंतर अनेकांनी अनेक रांगोळ्या घातलेली नायक-नायिकेची प्रथम भेट, ते अनवधानाने एकमेकांना धडकणं, ती पुस्तकं पडणं, त्यानं ती गोळा करणं, सगळं एकमेकांच्या नजरेत बांधलेल्या नजरा न सोडवता... काय? गेलात नं समाधीत?...
प्रथमदर्शनी प्रेमातून हटकून प्रेमाचं बस्तान बसण्याची कल्पना तशी वास्तवाला धरून मात्र नाही. ’पहिलं प्रेम’ हा मात्र माणसाच्या आयुष्यातला फार मोठा अनुभव.ज्यांचं पहिलं प्रेम यशस्वी होतं ते सुदैवी.अर्थात, प्रेमात यशस्वी होणं हा फार लांबचा पल्ला असतो.ते लग्नात परिणत होणं हा त्यातला पहिला टप्पा मानला जातो.
मागच्या पिढीत प्रेमविवाह हेच एक अप्रूप होतं तेव्हा पहिल्या आणि जराश्या आकर्षणाने झालेले विवाह नंतर खूप क्लेशदायी झालेले आढळले.प्रेमविवाहाबद्दल एक नको तेवढी रोमांचक कल्पना बाळगल्यामुळे हे झालं असावं.प्रेमविवाह अजून समाजात मुरले नसावेत.आजच्या पिढीत सर्वसाधारण अनुरुपता, शिक्षणक्रमातला समानधागा, समान करियर अशा मार्गाने एका अर्थाने कॅलक्युलेटेड (हिशोबी) प्रेमविवाह होतात.कालानुसार हे सुसंगत असावं.तरी प्रेम ही भावना त्यातही आपला प्रभाव दाखवल्याशिवाय रहात नाही.
निवडीची उलथापालथ करत रहाणं हा काही माणसांचा स्वभाव असतो.ठरवून प्रेमात पडता येत नाही हे त्याना मान्य नसतं.त्यांना कुणी आवडतच नाही.माणसातले दोष शोधत रहाणं, स्वत:बद्दलच्या अवाजवी कल्पना आणि प्रेमसंबंधातून अवाजवी अपेक्षा बाळगणं अशा वृत्तीमुळं ती प्रवाहापासून अलग पडतात.एखादा किंवा एखादी खूपच भिडस्त असते.समोरून आवाहन करणारं प्रेमही अशांना त्यांच्या कोषातून बाहेर काढू शकत नाही.काहींच्या बाबतीत प्रेमाचे योगच नसतात.प्रेम जुळण्यात सतत काहीतरी विघ्नं निर्माण होत रहाणं, उगाच गैरसमजच होणं, व्यावहारिक अडचणीत गुंतून प्रेमसंबंधासाठी अवकाशच न मिळणं अशा गोष्टींमुळे ते प्रेमापासून वंचित रहातात.हळूहळू अनावर होत जाणारं लैंगिक आकर्षण भुकेच्या स्वरूपात समोर उभं राहू लागतं.प्रेम आहे तरी वादळ, नाही तरी वादळ अशी परिस्थिती निर्माण होते.
समवयस्कांमधे प्रेम निर्माण होणं सहज असतं.कधीकधी आपल्यापेक्षा जास्त वयाची, वयात खूप अंतर असलेली व्यक्ती आवडायला लागते आणि तो समाजाच्या कुतूहलाचा विषय बनतो.यातल्या लहान भागीदाराच्या प्रेमाची गणती बालिश प्रेमात (काफ लव्ह) होऊन ते फारसं गंभीरपणे न घेण्यासारखं असतं असा सर्वसाधारण समज असतो.तर जास्त वयाचा जोडीदार पावलोपावली आपण करायला जातोय ते योग्य की अयोग्य या संभ्रमात पडायला लागतो.दोघंही एकमेकात इतकी गुंतलेली असतात की बाहेर पडणं दोघांनाही कठीण होऊन बसतं.लहान भागीदार कोवळ्या वयातला असेल तर त्याच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारी परिस्थितीच जणू त्याच्यासमोर उभी रहाते.संबंधातला जास्त वयाचा भागीदार जर विवाहित असेल तर फारच अडचणीचा मामला होतो.अशा विवाहबाह्य प्रेमातून अनेक माणसं दु:खी होऊ शकतात.
प्रेम कधीकधी जे राक्षसी रूप घेतं ती वादळाची परिसीमा ठरते.वर्गात शिरून किंवा भर रस्त्यात रॉकेल ओतून पेटवून देणं, तुकडे करून फेकून देणं, भररस्त्यात भरदिवसा सपासप वार करून बदला घेणं हे केवळ राक्षसच करू शकतात.त्यांना प्रेमिक वगैरे म्हणणं हा प्रेम या शब्दाचा अपमान होईल.याच्या बरोब्बर विरूद्ध असतं ते ’प्लेटोनिक लव्ह’.कुठलंही लैंगिक आकर्षण नसलेलं, निरपेक्ष असलेलं प्रेम.पृथ्वी सूर्याभोवती किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहिलेले आहेत अनंतकाळ तसं.
स्त्री-पुरूषांमधे निखळ मैत्री असू शकत नाही असं नाहीच.पण त्या दोघांत प्रेम निर्माण झालं तर त्यात लैंगिक आकर्षणाचा भाग नसतो हे पटणारं नाही.मुळात स्त्री-पुरूषात मैत्री व प्रेम यात फार पुसटशी रेषा आहे.
प्रेम जमतं आणि मग पुढचे निर्णय घेणं महत्वाचं ठरतं.त्यासाठी प्रेमाच्या धुंदीतून बाहेर यावं लागतं.त्या धुंदीत ही माणसं जास्तीत जास्त निकट येतात.एकमेकांच्या सवयी, दोष, एकमेकांना गृहीत धरणं, एकमेकांकडून अपेक्षा ठेवणं आणि त्यानंतर ’जेलसी’.आपल्याला आवडणारं माणूस फक्तं आपलंच ही ’पॅशन’.आपल्याच माणसावर बारीक नजर ठेवणं, त्यानं सतत आपल्याच अंकित असावं अशी अपेक्षा बाळगून त्याला जखडून ठेवल्यासारखं करणं, तो किंवा ती सतत आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असा समज (गैर) करून घेणं.तसं त्यानं करू नये असा ह धरणं असे प्रकार वादळात आणणारे ठरतात.
2 comments:
लैंगिक आकर्षण हेच आयुष्याच्या केंद्रस्थानी असले पाहिजे हा विज्ञानाचा आग्रह आपल्यासमोर वेगळ्या स्वरूपात आला आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार! परंतू त्रोटक स्वरूपाचा प्रतिसाद आणि आपली अनामिक स्थिती यामुळे आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे हे कळले नाही. winayak.pandit@gmail.com या माझ्या मेल आयडीवर शक्य असल्यास आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते जरूर कळवावे.
विज्ञानाचा आग्रह ही टर्म मला नवीन आहे.आद्य मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईडने माणसाची प्रत्येक कृती कामप्रेरणेतून उद्भवते असं सर्वात पहिल्यांदा सांगितलं.माणसाच्या आदीमप्रेरणा (basic instincts) त्याला कधीच सोडून जात नाहीत. नाहीत.हिंसा ही त्यातली आणखी एक.
प्रेम ह्या भावनेपुरती या लेखमालेची व्याप्ती आहे.समाजात, विशेषत: भारतीय समाजात केवळ कामप्रेरणेच्या पलिकडचेही प्रेम अधोरेखित केले जाते.
Post a Comment