काही वर्षांपूर्वी मला मनू पोस्टातल्या एजंटच्या रूपात भेटला.अतिशय दीनवाणा, लाचार, चाचरत चाचरत बोलणारा, अत्यंत गरजू असा.
आयुष्यात आपल्याला आयकर (इन्कमटॅक्स) भरावा लागतो या कल्पनेनेच मी प्रचंड भारावून जातो दोस्तांनो दर वर्षी.आपण भरायचे आणि ’त्यांनी’ खायचे.सामान्य माणूस आणखी कशाने भारावणार? असा मी प्रचंड भारावून माझ्याच मनोराज्यात दंग झालेला असताना मनू समोर आला.मगाशी म्हटलं त्या स्वरूपात.१ रूपयाला ७ रूपये पोस्टाच्या राष्ट्रीय बचत योजनेत टाकून सर्टिफिकीट मिळवा आणि १ रूपयाही वाचवा.माझा आनंद गगनात मावेना.एक रूपया वाचणार वर सर्टिफीकीट.सामान्य माणसाला सर्टिफिकीटाचं- मग ते कसलंही असो- काय मोल असतं तुम्हाला तर माहितीच आहे.मी कर्ज काढून टॅक्स वाचवला.पाच हजार वाचवण्यासाठी पस्तीस हजार गुंतवले.मनूला त्यावर एक टक्का कमिशन.त्यातलं काहीतरी तो मला देणार.त्यानं मला काहीच दिलं नाही.मी सामान्य आणि मनू मराठी माणूस, त्यातून गरजू, म्हटलं जाऊ दे! दरम्यान माझ्या असं लक्षात आलं, मनूनं ज्या पोस्टाची नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स दिली होती ते मला खूप लांब होतं.मी पुन्हा मनूला गाठलं नाही.त्यानंतर दरवर्षीचे व्यवहार मी स्वत:च माझ्या जवळच्या पोस्टातून करायला लागलो.
सात वर्षं सरली.मनूनं दिलेल्या सर्टिफिकीटांची मुदत संपत आली.मी माझ्या त्या जवळच्या पोस्टात गेलो आणि याच पोस्टातून मला त्या दूरच्या पोस्टातल्या सर्टिफिकीटांचे पैसे मिळावेत असा अर्ज महिनाभर आधीच नेऊन दिला.कुठल्याही पोस्टातल्या एनएससीजचे पैसे दुसर्या कुठल्याही पोस्टातून मिळायची सोय तेव्हा तरी होती.
साठ हजाराच्या आसपास रक्कम मिळणार.त्यातून चालू वर्षाचा टॅक्स भरायचा.पैसे मिळणार असं कळल्यावर घर आणि घरातले महत्वाचे खर्च लगेच डोकं वर काढतात.आपल्या श्रमाचे आपण गुंतवलेले पैसे!
मुदत उलटून गेली तरी माझ्या जवळच्या पोस्टात त्या दूरच्या पोस्टातून परवानगी आली नाही.मी अस्वस्थ होऊन आणखी दोन स्मरणपत्रं पाठवली.३१ मार्च ही तारीख जवळ आली तशी मला मनूला गाठल्याशिवाय पर्याय राहिला नाही.सुरवातीलाच मला मनूला गाठता आलं असतं पण मग मनूनं मला त्या एजंटी काव्यानं जबरदस्ती त्याच्याकडेच पैसे गुंतवणं भाग पाडलं असतं. ’पैसे देतो पण इतके गुंतव’ असे दमबाजीचे प्रकार प्रत्यक्ष पोस्टाच्या खिडक्यांवर चालतात असं मी ऐकलं होतं.
मनूला फोनवर गाठलं आणि सात वर्षांपूर्वीच्या लाचार मनूचं रूपांतर कशात झालंय हे समजलं. “आता वेळ नाही.माझ्याकडे पहिल्यांदा का नाही आलास? आता पैसे १ एप्रिल नंतर!” लोक एप्रिल फूल करतात ते मला माहित होतं.मनू मला एप्रिलनंतरही फूल करायला निघाला होता.त्यानं अडवणूक चालूच ठेवली. “तुझा अर्ज त्या पोस्टात मिळालाच नाही.मिळाला असेल तर पोस्टमास्तरनं तो दाबला (कशासाठी?) असेल.” असं उद्धटपणे बोलायला लागला.त्या पोस्टात फोन केला तर मास्तर चहा प्यायला गेलेले.माझा अर्जं, त्यानंतरची चार स्मरणपत्रं काही काही मिळालेलं नाही! इतके दिवस मी लोकांची पत्रं एकमेकाना मिळत नाहीत असं ऐकलं होतं.पोस्टातली पत्रं खात्यातल्या खात्यात एकमेकाना मिळत नाहीत? डोक्याचा गोविंदा झाला आणि कळलं हे इतकं सरळ नाही.
शेवटचे चार दिवस उरले.हातात पैसा नाही.आपला पैसा अडवून ठेवलेला.हकनाक.दोन रात्री झोप लागली नाही.
तिसर्याच दिवशी पहाटे जाग आली.सामान्य, सरळ वाटेने जाणार्या माणसाला देव म्हणा, सुप्तमन म्हणा मदत करतं असं म्हणतात.टेलिफोन डिरेक्टरीच्या मागच्या बाजूला विविध सरकारी खात्यातल्या वरिष्ठांचे फॅक्स नंबरस् दिलेले असतात असा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.उठलो.चीफ पोस्ट मास्तर जनरल पासून खालपर्यंत असे सहा फॅक्स केले.फॅक्सने तुमची लेखी कंप्लेंट जाते.आश्चर्य म्हणजे संध्याकाळपर्यंत खातं चक्कं हललं! एका वरिष्ठाचा मला- मला फोन आला.पैसे रोख तयार आहेत.घेऊन जा.वीस हजारांवर पैसे रोख देता येत नाहीत असा नियम असूनसुद्धा!
सामान्य माणूस नुसतीच टीका करतो.नकारात्मक चित्रं रंगवतो.सहसा पेटून उठत नाही.पण कधी काळी पेटला तर हट्टालाच पेटतो.
मी पुन्हा मनूला फोन केला.२९ मार्च.त्याची अरेरावी अजून संपली नव्हती.मी त्याला ठासून सांगितलं पैसे तूच आणून द्यायचे.पोस्टमास्तरला फोन केला.तो म्हणाला, “मनूला पुन्हा पुन्हा येण्या- जाण्याचा त्रास (!) नको.सर्टिफिकीटं सह्या करून तयारच ठेवा.मी मनूला पैसे घेऊनच पाठवतो!”
३० मार्च.मनूच्या नाकी नऊ आलेले.सगळीकडून पैसे जमवून भरण्याची त्याची एजंटगिरीची घाई उद्याच्या ३१ मार्चमुळे टोकाला आलेली.त्यात मी धोबीपछाड टाकलेला.चिडून म्हणाला, “मला दुसर्या पोस्टात पैसे भरायला जायचंय.किती वाजेपर्यंत पैसे घेतात महित्येय का?” मी फोनवर जोरात ओरडलो, “पोस्टात काय चालतं हे सगळं मला माहित झालंय! तू पैसे घेऊन येतोस की नाही ते सांग!” मनूनं फोन डिसकनेक्ट केला.कुठल्या तोंडानं तो मला भेटणार!
३१ मार्च उजाडला.मनूच्या कृपेमुळे मला अखेर त्या लांबच्या पोस्टात जावं लागलंच.
मनू त्या पोस्टातला रेग्युलर एजंट.त्याला कमिशन मिळतं.तो मास्तरला कमिशन देऊन आपल्याकडे न येणारे पैसे अडवतो.अडवून पैसे आपल्याकडे गुंतवून घ्यायचे.नाही मिळाले तर अडवायचे आणि सामान्य माणसाला म्हणायचं आता बस बोंबलत! हा या दोघा मराठी माणसांचा डाव लक्षात यायला आता मला शेंबड्या पोराचीही गरज नव्हती.माझ्यावर मात्र ’वरून’ खरंच कृपा झाली होती!
या प्रकारची कृपा माझ्यावर नंतरही झालेली आहे दोस्तांनो! त्यानंतर विमा आणि नंतर एका खाजगी बॅंकेच्या एटीएम व्यवहारासंदर्भात! खरंच! अजिबात भिऊ नका! हे सेवा उद्योग आपल्या पाठीशी निश्चित उभे आहेत!
No comments:
Post a Comment