romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, January 12, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(५)

युनियन लीडरनी ’चेक्सचं सॉर्टिंग करू नकोस! ते तुझं काम नाही!’ असं वारंवार बजावलेलं निशीला आठवत होतं तरीही तो किमान चार वेळा त्या चेक्सच्या ढिगापर्यंत जाऊन दूर झाला होता.खातेबदल.नियमाप्रमाणे डिपार्टमेंट चेंजचा फार्स दर वर्षा-दोन वर्षांतून होतो तसा यावेळीही झाला होता आणि प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सगळ्यानी मिळून पुन्हा एकदा निशीला घोडा लावला होता.रजाराखीव-लीव्हरिझर्व म्हणून.म्हणजे कमी तिथे तो.पडेल ते काम.पडेल म्हणजे मुद्दाम पाडलं जाईल, केलं जाणार नाही ते...
पाचव्यांदा निशीला रहावलं नाही.कामावर येऊन, नुसतं बसून किंवा रेंगाळून काय करणार? तो बोटांना थुंकी फासून फताफता काउंटरवाईज चेक्सचं सॉर्टिंग करायला लागला.
इतक्यात कॅंटीनचा पोर्‍या चहा घेऊन आला.
“एऽऽ क्या बनाया आज?”
“इटली”पोर्‍या म्हणाला.
“छ्याऽऽ खाया में अभी”असं म्हणून निशी थुंकी उडवत सॉर्टिंग करत राहिला.
कॅंटीनचा पोर्‍या पुढे जाऊन रेंगाळला.सॉर्टिंग करता करता निशीचं लक्ष पोर्‍याकडे गेलं.पोर्‍याचं लक्ष भलतीकडेच.मग निशीचं लक्ष भलतीकडे गेलं आणि त्याचे हात रेंगाळले.ओठांच्या कोपर्‍याशी थुंकी जमा होऊ लागली.लागल्यासारखा श्वास थाडथाड उडू लागला.शरीरातून विचित्रं लहर दौडू लागली.मान, डोकं मागे करून श्वास पूर्ववत करायचा प्रयत्न त्याचं शरीर आपसूक करू लागलं.
पोर्‍यानं मुद्दाम त्या दोघांच्या मधे जाऊन कॉफीचे कप ठेवले.दोघेही परस्परात गुंग.पोर्‍या मुद्दाम रेंगाळला.दोघांच्या भावस्थितीत इवलासाही फरक नाही.पोर्‍यानं मुद्दाम निशीकडे बघितलं.निशी आ वासून त्या दोघांकडे पहात होता.पोर्‍या मुद्दाम निशीसमोरून पास झाला.निशी तसाच.हक्काबक्का.कुणीतरी स्टॅच्यू घातल्यासारखा.छातीत धडधड आणि श्वास खालीवर.
त्या दोघांमधला तो गोरापान, उलटे केस फिरवलेला, स्मार्ट, परधर्मीय पण बाटगेपणाचा शिक्का असलेला.ती कर्मठ धर्माची.काळी, उंच, फेंदारलेल्या नाकाची.चेहेरा वर केला की नाकावरच्या चमकीतली नाकातली गाठ दिसायची.हसरी, कामसू, बांधा बरा.चापून चोपून नेसलेली साडी.
दोघेही आले, बसले की एकमेकांत धुंद असतात... निशीने एकदा मार्क केलं होतं.पुन्हा दोघेही विवाहित.एकमेकांशी नव्हे.तो खूपच पुढाकार घ्यायचा.गोरा.ती हसायची.मनमोकळं बोलायची.एकदा.. निशीने.. त्याना मागच्या गल्लीत पाहिलं होतं.पाठमोरं.त्या, गोर्‍यानं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.इथे निशीच्या अंगातून शिरशिरी गेली.त्याचा हात खांद्यावरून पाठीवर.मग खाली... तेवढं निशीने बघितलं.मग चपापून आजुबाजूला बघेपर्यंत ते गर्दीत कुठल्यातरी गल्लीत दिसेनासे झाले.
तेव्हापासून ते असे बोलत बसलेले दिसले की निशीला श्वास लागायचा.त्याच्या छातीत धडधड व्हायची.तो नाक, कान , डोळे सगळी इंद्रिये एकवटून त्यांचं ते सगळं न्याहाळत बसायचा.
“येऽऽ आलं रं आलंऽऽ...” अशी बंड्याची हाळी कानावर आली आणि निशी भानावर आला.तोपर्यंत चेक सॉर्टिंग सगळं बोंबललं होतं.आता काउंटरवाले आपल्याला भोसडणार लक्ष कुठे असतं तुझं म्हणून.निशी झालेला गोंधळ निस्तारायच्या मागे लागला...साला..यांना मदत करायची..यांचं काम आपणच करायचं..काही चूक झाली की हे आपल्यावरच चढणार...
ते सगळं निस्तारण्याच्या नादात निशीला समोरच्या काळ्या काचेत मागे बंड्याजवळ जमलेली गर्दी दिसली नाही.आजुबाजूला जमत असलेली इतर कर्मचारीमंडळी दिसली नाहीत.त्यांच्यात काय चर्चा चाललीय हे दिसलं नाही...
चारचारदा चेक्स उलटे पालटे करून, त्यांचे चार-पाच वाटे पुन्हा पुन्हा निरखताना त्याने अचानक दचकून आजुबाजूला बघितलं.मग त्याच्या लक्षात आलं.छ्यॉऽ... युनियन लीडर एवढ्या लवकर कुठला यायला?.. पण त्याने पुन्हा आपल्याला असं हे सॉर्टिंगफिर्टिंग, आपलं नसलेलं, काम करताना बघितलं तर.. ××वर लाथ मारीन!.. निशीला युनियन लीडरचा करपटलेला चेहेरा पुन्हापुन्हा आठवत राहिला...
चेक्सचं ते-रामायण-महाभारत-काय ते-हातावेगळं करून बाजूला सारत असताना त्यानं पुन्हा आजुबाजूला बघितलं आणि सकाळपासून मोजून आता साधारण शंभराव्यांदा तो दचकला... च्यायलाऽऽ या सॉर्टिंगच्या नादात आज कोण कोण आलं नाही ते आपण बघितलंच नाही.म्हणजे आज कॉम्प्युटर नसला तर आजही अलाऊन्स नाही.. अरे! इथे! कोण नाही? जाऊया का? नको! तो भाई असेल तर कानफटातच मारेल! घाणेरड्या शिव्या देऊन!.. कबनुरकर असेल तर पुन्हा आपल्या लग्नाचा विषय काढून टोचून बोलत राहिल.. काळे असेल तर ’आईशप्पत’ म्हणून तोंडावर हात ठेऊन बघून हसतच राहिल.. काय करावं.. काय करावं.. कुठे जागा मिळेल.. कोण आपल्याला कसं दटावेल या विचारात निशी चुळबुळत बसल्याजागीच बूड चिकटवून बसून राहिला आणि.. आणि एकशे एकाव्यांदा दचकला.

No comments: