romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins
Showing posts with label ग्लोबल झालिंया कळें.... Show all posts
Showing posts with label ग्लोबल झालिंया कळें.... Show all posts

Friday, July 15, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(११)

भाग १० इथे वाचा
आपल्याला आलेल्या रागाचा आपल्या कामावर परिणाम होता कामा नये याची काळजी टोकेकर (अति) काळजीपूर्वक घेत असत.गेलेल्या कदमला नंतर कधीही सुनवता येईल असा विचार करून ते आत्ता आपल्यासमोर काय काम आहे? या विचारावर आले आणि मग निशीकडे वळले, “हं काय गोरंबेऽ”
निशी आता इकडे तिकडे पहायला लागला.टोकेकर कधीही एकाच प्रकारे संबोधत नसत.म्हणजे निशी तर निशी कायम, असं नाही.निशी, निशीगंध असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळी.निशीला गोरंबे या त्याच्या आडनावानं आख्या जगात कुणीच हाक मारायचं नाही.टोकेकर सोडून.निशीचा ऊर नेहेमीप्रमाणे धपापत होता.श्वासाला धुमारे फुटल्यासारखा त्याचा श्वासोच्छवास नेहेमीच होत असे.
“आधी तू जरा लांब उभा रहा.हं!... अरे! हे असं-” सर्वप्रथम टोकेकरांच्या अंगात गाडगेबाबा संचारले.त्यानी केबिनमधलं ते एवढसं डेस्क साफ करायला घेतलं.त्यावरचे ऐवज ते न्याहाळू लागले.महत्वाचे असलेले आणि नसलेलेही.दोन्ही सारख्याच जागरूकतेने.
“हेऽहेऽ आंजर्ल्याचं प्रिंट आऊट आणिऽ हेऽ करकेरय़ाऽ–” -निशी.
“थांब थांब हे आंजर्लेकरचं कशावरून? आणि हे करकेराचं?” मूलभूत संशोधन करणारय़ांना मूलभूत प्रश्न उभे करायची सवयच असते.टोकेकर अपवाद नव्हते.प्रिंट आऊट्स ते उलटसुलट करून बघायला लागले.जवळ, दूर असं धरून गुप्तहेरासारखे न्याहाळू लागले.निशीला वाटायला लागलं आता बहुतेक हे वास घेऊनच छडा लावणार कुणाचा प्रिंट आऊट कुठला याचा.
“अरे! अरे! हा कॉम्प्युटर प्रिंट आऊट आहे-”
“होऽ मगऽ मगऽ”
“अरेऽ वरच्या कोपरय़ात कुणाच्या कामाचं हे प्रिंट आऊट आहे त्याचं नाव छापलेलं असतं! हऽहऽ लक्षातच आलं नाही माझ्या हऽहऽ”
निशीला आता अनावर जांभया यायला सुरवात झाली.
“ही कुणाची कॅश?-”
“बॅं- बॅंकेचीऽ ऑऽहॉऽऽ-”
“ते खरं रे पण कुणाची कुठली? तुझी, त्या ह्याची आणि त्या...”
सगळ्या नोटा सारख्या.म्हणजे मूल्यं वेगवेगळं पण तरी सारख्याच.बंडलं सारखी.निशीनं गोंधळलेल्या अवस्थेत सगळी कॅश एकत्र केलेली.प्रत्येक कॅशियरची कॅश वेगवेगळी ठेवली असती तर प्रत्येकाची आणि एकूण अशी कॅश लवकर टॅली झाली असती.आता प्रॉब्लेम आणखी अवघड.
कमावलेल्या शांतपणे ’असू दे! असू दे’ म्हणत टोकेकरांचे हात, डोकं, मन- सगळं सरावलेलं- चालू झालं.निशी उभ्या उभ्या पेंगू लागला.काम चालू असताना टोकेकर झालेला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते तोंडाने सांगत होते.कॉम्प्युटर लॉग आऊट होऊ नये म्हणून काळजी घेत होते.कॉम्प्युटरवरून फिगर मिळवत होते.कॅश काऊंट करत होते.बंडलं बांधत होते.निशी हूं हूं असे हुंकार भरत डुलक्या काढत होता.
पंधराव्या मिन्टाला सगळे फरक बिरक शोधून टोकेकरांनी संपूर्ण कॅश टॅली केली.निशीच्या चुका पांडेकडून चेक्स मागवून दुरूस्त केल्या.हि ज्याची जबाबदारी तो कॅश इनचार्ज पांडे या सगळ्याकडे पाठ फिरवून आलेल्या पाहुण्याबरोबर हास्यविनोद करतच राहिला.
निशीचं नशीब बलवत्तर होतं.चुका दुरूस्त होण्यासारख्या होत्या.निशीला खड्ड्यात घालणारय़ा नव्हत्या.निशी आता पूर्णपणे जागा झाला.पुढचा मार्गशीर्ष गुरूवार तरी इमानेइतबारे पाळण्याचं त्यानं स्वत:च स्वत:ला वचन दिलं आणि आधी मनोमन सुपेला साष्टांग दंडवत घातला... स्वत: जगलास आणि मलाही जगवलंस रे बाबा...

...थॅंक्यू! थॅंक्यू! अच्छाऽ पांडेजीऽअच्छाऽकनवाळेजीऽ– आपलं हे कनवाळेऽ अरे होऽ पांडेजीऽमेहेमानजी को भी अच्छेऽ थॅक्यू!” सगळं झाल्यावर टोकेकरच सगळ्यांचे आभार मानत सुटले.एटिकेट्स पाळण्याचं त्यांचं लिमिटही जरा वेगळंच होतं.
“अच्छेऽअच्छेऽऽहॅऽहॅऽहॅऽ...” पांडेजी पुन्हापुन्हा खुदखुदत राहिले.
तेव्हा कदम त्याचं कटिंग आटपून परतत होता, अगदी वेळेवर आणि आता घरी जायच्या वेळेला लफडा नको असा सावध पवित्रा घेत टोकेकर त्याला बघून टॉयलेटकडे धावले...

Friday, July 8, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(१०)

भाग ९ इथे वाचा
... सव्वापाच वाजून गेलेले.पसारा आणखी वाढलेला.आले किती गेले किती देवाला माहित.नाहीतर सुपेला.हरे राम हरे हरे... कुठून सुरवात करावी हे निशीला समजत नव्हतं आणि आता सुरक्षारक्षक, कॅशप्यूनही काट्यावर आलेले...
सिंगल लॉक, डबल लॉक म्हणजे नोटांची बंडलं, सुट्या नोटा, नाणी सगळं समोर, सभोवार पसरलेलं.चष्मा काढत, पुन्हा घालत, डोक्यावरच्या करड्या केसांमधून मळ जमलेली नखं खुपसून खुपसून निशी हैराण झाला.मग कॅशप्यून कदमनं सुचवलं म्हणून बरीच खुडबुड करत शेवटी एकदाची प्रिंट कमांड दिली.त्याने केलेल्या रोखीच्या आदानप्रदानाची गोळाबेरीज मेन प्रिंटरवर कागदावर उतरणार होती...
दुपारी चारसाडेचारपर्यंत शाखेत अंधार पसरतोच.बाहेर रस्त्यावर, इतरत्र अजून लख्ख उजेड असतो.आस्थापनखर्च कमी होण्यात आतला अंधार-चारसाडेचारचा हातभारच लावतो.
जुन्या ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट सिनेमात पडक्या भूतबंगल्याचा रखवालदार जसा अर्धवट अंधारात वावरताना दिसतो तसे टोकेकर आता आतल्या-शाखेतल्या अंधारात वावरताना दिसत होते.इकडे तिकडे बघत.कशासाठी? आपण बॅंकेने नेमून दिलेल्या वेळेआधी बाहेर पडतोय हे कुणी पहात नाहिए ना, हे बघण्यासाठी? की कशाचा तरी रहस्यभेद करण्यासाठी? कसला?...
पडक्या भिंतीवरून रखवालदाराचा क्लोज उगवावा तसे टोकेकर निशीच्या केबिनच्या काचेतून डोकावले.न बोलता पहात राहिले.चुळबुळणारा निशी असहाय्यपणे रोख रकमेचे वाटे चिवडत मोजायचा प्रयत्न करत होता.नोटांचे डिनॉमिनेशन्स लिहून घेत होता.खोडत होता.एकदा तर त्याने बोटाला थुंकी लावून त्यानेच खोडण्याचा प्रयत्न केला.छॅ:ऽऽऽ करून नैराश्याला वाट करून देत असतानाच त्याला समोरच्या काचेतून डोकावणारे टोकेकर दिसले आणि तो दचकला.त्याचा मूळचा आणि रोखीच्या आजच्या व्यवहारानंतर झालेला असा एकूण अवतार तसंच त्याचं दचकणं एवढं भयंकर होतं की त्या सगळ्याने टोकेकरही दचकले.दचकवा-दचकवीच्या या खेळानंतर नेहेमीच्या अतिसमंजस स्वरात टोकेकर म्हणाले,
“काय रे निशिगंध... डिफरन्स लागतोय?”
“अंऽआंऽऽअंऽ...” असे निरर्थक आवाज फक्त निशीलाच जमायचे.
“काय विचारतोय मी... टॅली होत नाहीये का?”टोकेकरांचं अतिसमंजसपणाचं अपर लिमिट बरंच वरचं होतं.निशीला कोण एवढं समजून घेणार?
“होऽअहोऽस्स्... बघा हो... काय सुचतच नाहीयेऽ... ही त्याची- त्या आंजर्ल्याची कॅश... ही त्या करकेरय़ाची... माझी कुठली?... ही... का ही?... हे... प्रिंट आऊट पण असं आलंय... आकडे सोडून सगळं नीट दिसतंय... ह्या काळ्या मुंग्या आहेत की आकडेच... हेऽ... फसवलं हो त्या बंड्यानं... मला कॅशमधे बसवलं... स्सऑऽ– नाहिये ना कुठे इथे?... नाहीतर हजामत... हा शेजारचा आंज्या आणि हा कानडी ×××-ऑ-”
“मदत करू का?... अं? करू मदत?”
टोकेकर अतिसमंजसपणाकडून सौजन्यशीलतेकडे वळत.तसे ते वळले आणि निशीने पुन्हा काही निरर्थक उच्चारांची पुंगळी हवेत सोडली.
“अरे हो! पण तुझ्या साहेबांना- तुमच्या कॅशच्या इनचार्ज ऑफिसरला विचारावं लागेल.त्याची परवानगी घेतल्याशिवाय मी आत, केबिनमधे येणं हे बॅंकेच्या नियमांना-” टोकेकर अतिसौजन्यशीलतेच्या मळ्यात आता तळ्यात-मळ्यात करू लागले.नेहेमीप्रमाणेच.
“ओ-ओ-तुमच्याऽयलाऽ टोकेकर! घुसा घुसा आता केबिनमधे ×××! हा ×××××× बारा वाजवनार आमच्ये इतेच!-”
“घॉसा! घॉसा!”
आधी कॅशप्यून कदम करवादला, पोटाला चिमटा बसल्यासारखा आणि मागोमाग सुरक्षारक्षक कनवाळेनी तोबरा भरून अनुमोदन दिलं.तरीही-
“बघ रे निशिगंध... हे सांगताहेत घुसा म्हणून पण उद्या बॅंकेने काही ऑब्जेक्शन घेतलं तर-”
आता कदम खसपटलाच.
“ओऽ तुमच्यायलाऽऽ ऽ#$%&*!@#$%&*!:;’”#$@!~&*... च्यामारी-”
“खॉक् खॉक् खॉऽऽ” सुरक्षारक्षक कनवाळे.
“च्यामारीऽऽ आतापरेंत सलूनमधी पोचून दोन चार कटिंगपन झाली आस्ती!”
कदम फावल्या वेळेत बॅंकेत काम करायचा.
“पांडेजी आ सकता हुं मैं अंदर- कॅशकेबिनमें?” टोकेकर विनम्रता वगैरे कोळून प्यालेले.
“हाये हाये ह्ये बगा कनवाळे! ओऽ टोक्येकरऽ तुमच्याऽऽआताऽ ‍^@#$$$$!%^&*+###@@!&&&!!ऽ–”
“जॉऊ द्येऽरे कॉदम जॉऊ द्ये- खॉ खॉक् खॉ:ऽऽ”
“बगा ना बगाऽ च्यामारीऽ परपरांतीयांना बगा लोनी लावतात कश्येऽ ओ ओ टोक्येकर ह्ये परपरांतीय हगले ना...”
कदम नावाच्या भूमिपुत्राचा संताप आता अनावर झाला.
कॅशचा ऑफिसर पांडे अगदी शेवटच्या पिंजरय़ात- केबिनमधे आपल्या मेव्हण्याबरोबर बसला होता.पांडे ’नुकताच’ बदली होऊन आलेला.मेव्हणा ’अगदी नुकताच’.मुलखाची ख्यालीखुशाली, मेव्हण्याला आकर्षून घेणारं शहराचं मोहकपण या सगळ्यावरची त्यांची चर्चा चांगलीच रंगात आली होती.
“हाऽहाऽहाऽ आइये टोकेकरजीऽऽ आइयेऽऽ आपहीका तो है कैस कैबन! हॅऽहॅऽहॅऽहॅ”
पांडेजी आपल्या प्रांताला जागून मिठ्ठास बोलले आणि हास्याची लकेर त्यानी उगाच चांगलीच वाढवत नेली.
पण आता टोकेकर कदममधे अडकले होते.तो वैतागून तिथून निघून गेलाय.पूर्णपणे.हे बघून ते कनवाळेना म्हणाले,“हाऽहऽहऽ... काय शिबीर आहे कदमचं? की संचलन?”
“खॉऽऽखॉक्ऽखॉक् कुटलं होऽ आनि येक कटिंग भाद्रून येतो म्हनलाऽ तुमी व्हा आत हॉ हॉ”
“माझी बिनपाण्याची करायला बघत होता...”
टोकेकर तीव्र नाराजीने कदम गेलेल्या दिशेकडे बघत मनातल्या मनात दातओठ खात राहिले.मग चपापून त्यानी इकडे तिकडे बघितलं.आपण मनातल्या मनात कदमचा केलेला उद्धार कुणापर्यंत पोचला तर नाही ना अशी शंका त्याना वारंवार येत राहिली...

Friday, March 25, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(९)

भाग (८) इथे वाचा.
मग निशीने ते कसलेसे जाम मनसोक्त चापले.अगदी छोट्या, हाताच्या पंजात मावणार्‍या स्टीलच्या प्लेटवर टर्राक टर्राक आवाज काढून.अधूनमधून, सुरवातीला आणि शेवटीही भय्याकडून त्याने जामचा पाक प्लेट्वर ओतून घेतला तो वेगळाच.
“अब हो गया बाबा आपका खाकर?”
“एऽऽ डालो! और डालो पाकऽ च्यायलॉऽ हमॅशॉका गिर्‍हाईक हैऽऽ”
निशीला आता परतणं भाग होतं, एरवी गोड झाल्यावर तिखटासाठी फिरावं असं त्याच्या मनात फार होतं.मरणाची भूक काही केल्या शांत होत नव्हती.
शर्टला, पॅंटला फसाफसा हात पुसत निशी नाईलाजाने परत शाखेकडे निघाला.दोन्ही हात कोपरात दुमडून पंजे आपोआप छातीजवळ आले आणि लगालगा चालतान पंजे जीव नसल्यासारखे हलत राहिले.हालचालीना आपोआप बायकीपणाची झाक आणत.
मागच्या दाराने तो तरातरा शाखेत शिरला आणि समोरच्या सोफ्यावर त्याचे सहकारी खजांची (कॅशियर्स) अनुक्रमे करकेरा आणि आंजर्लेकर अचानक ताठ झाले.
“येऽऽ आला ब् हा ××××× एऽऽनिश्याऽएऽऽआदी इकडे ये! इकडे ये!”
“थांब रे!ऽऽ पहिली कॅश टॅली करूं घेऊ दे मला!”
“एऽऽनिश्याऽ येडेऽ बजा कितनाऽ”
“तो मैं क्या करूं रे करकेर्‍या! बैठा कितना बजे? बारा बजे!”
आंजर्लेकर उठलाच.
“ये ×××ऽऽ आदी आमची कॅश घेऊन टाक्! साल्या गाडी जात्ये आमची.तुला काय तू येकटा.पोरं बाळं आहेत आम्हाला.चलचलचल!”
“एऽऽ घाई करू नकोस हं आंजर्लेकर! हां! माझी कॅश टॅली झाल्याशिवाय-”
“निश्याऽ×××ऽ लीडरको बोलूं? अबी आनेका है वो? बोल! बोलूं?”
“एऽऽ क्या करताय रे तुम? मेरा टॅली नही कुच नही! लपडा हो जायेगा तो मेरेको भरना पडेगा.सुबेसे एक तो हैरान हो गया मैं! एक तो कोई बैठनेको तैयार नही मेन कॅशमें-”
आंजर्लेकर आणखीन चवताळला.
“अर्‍ये ××××× वादले कीती? किती वादले बघ! पातला पात मिन्ट! ××× बाहेर जाऊन खातोस की ××तोस?- अर्‍ये ×××ऽ साडेतीनची गाडी पकडतो आम्ही! रोज!”
“हांऽऽ आणि काय करता? पत्ते खेळत बसता! गाडीत! उतरल्यावर स्टेशनात! घरी!”
“एऽऽतेरीऽऽनिश्याऽऽ- एऽऽ वो देक् लीडर आ गया!”
“किदर है रे किदरे? साला ×× बनाता है मेरेको?
“वो देक्... वो देक् ××... बंड्या के सामने... मस्टरपर सही कर रहा है!”
“एऽऽगोविंदऽऽ गोऽऽविंदऽ हा बघ हा निश्याऽऽ-”आंजर्लेकर ओरडून युनियन लीडर गोविंद भैसाणेला बोलवायला लागला.
लीडर गोविंद शाखेत प्रवेश करतोय असं दिसल्यावरच खालचा बंड्या टुणकन् आपल्या जागेवरून उठून बाजूला झाला होता.आधीच.काऊंटर होते त्या बाजूला उगाचच काहीतरी काम काढून.मस्टर खालच्या बंड्याच्या टेबलावर.गोविंद भैसाणे कर्मचार्‍यांचा नेता.जहाल राजकीय पक्षाचा पाठिंबा असलेली युनियन.गोविंद शहरातल्या कामगार एरियात वाढलेला.पार्श्वभूमी संशयास्पद असं म्हणायला जागा.गोविंदची कचेरीत येण्याची वेळ ही अशी.खालचा बंड्या शानपत.गोविंद सही करताना तो कशाला समोर बसतोय.
बरं काऊंटरजवळ गेल्यामुळे बंड्याचा फायदाच.नेमकी परिसरात रहाणारी दणदणीत प्रौढ कुमारिका आलेली.काऊंटरमागे उभी.बंड्या ’×××× काम’ असं नेहेमीप्रमाणे पुटपुटत काऊंटरमागे दाखल.तिच्याजवळ.जास्तीत जास्त.तिला शब्दात पकडून.हसत.ज्याला महिला अत्त्याचार विरोधी संघटना ते व्हर्बल अब्यूज का काय म्हणून निश्चित हरकत घेऊ शकतील तिथपर्यंत पोचलेला.प्रौढ कुमारिकेचं काही कळण्याच्या पलिकडे असं वागणं.ती खरंच निरागस की तसा आव आणणारी की... कळायला मार्ग नाही...
“गोऽऽविंदऽ हा बघऽऽएऽऽनिश्याऽऽएऽऽ हा नाय् बोल्तो ब् कॅश घ्यायलाऽऽ” आंजर्लेकरचं चालूच.
गोविंद आत्ता कुठे शाखेत प्रवेशलेला.नमस्कार चमत्कार, हास्य झेलत.घामाघूम.डोळे लाल.कपाळ खाली ओढून आणि बुबुळं वर करून रोखून बघण्याची सवय.आल्या आल्या तो एसी युनिटसमोर उभा राहिलेला.त्यानही भागत नाही म्हणून मग फॅनखाली.
इकडे निशीची सव्वाहात फाटलेली.अजून गोविंद भैसाणेला काही ऐकू गेलेलंच नाही!
“ए नको एऽ आंजर्लेकरऽएऽऽप्लीजऽऽ नको सांगू रे त्यालाऽऽ एऽऽ प्लीजऽऽ ओरडू नको रेऽऽ दे! दे कॅश!ऽ एऽप्लीजऽ”
आता करकेर्‍यालाही चेव चढलेला.
“एऽऽ गोईंदऽऽ ये देक् रेऽऽ ये निश्या फॉर्म भी नही भरताय अपना युनियनकाऽऽ कॅशबी नई लेताऽयऽ येऽगोईंदऽऽ...”
“ये चूप बैठ रे करकेर्‍याऽऽ तेरा बी दे कॅश येऽऽ द्येव रेऽ दोनोंका द्येव बाबाऽऽ मेरा कूच होताय होने दोऽऽ लपडा नही मंगताय बाबाऽऽ आज मार्गशीर्षका गुरवार है उपरसेऽ द्येव द्येव बाबाऽऽ एऽऽ”
निशी काकुळतीला आलेला बघून मगच त्याचे शेजारी, सहकारी खजांची ओरडायचे थांबले.खुदूखुदू हसायला लागले.वेड्यासारखे उड्या मारायला लागले.टाळ्या द्यायला, घ्यायला लागले.
खिदळत, निश्याला वर आणखी टपल्या, टिचक्या मारत, नको तिथे चिमटे काढत दोघांनी आपापली उरलेली कॅश निशीच्या डोसक्यावर आदळली.सटकले...

Saturday, March 5, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(८)

निशीच्या केबिनमधला कॅशने भरलेला ड्रॉवर रिकामा झाला रे झाला की ऑफीसर दार ठोठावून तो पुन्हा भरत होता किंवा शेजारचा रसीदी रोखपाल (रिसिविंग कॅशियर) त्याच्याकडे जमा झालेल्या साठ्यातून गड्ड्यावर गड्ड्या फेकत होता.
समोरचे कस्टमर्स... खेकटे, म्हातारे, पेन्शनर्स, प्रोफेसनल्स, सुशिक्षित अडाणी, बिझिनेसमन, त्यांचे मेसेंजर्स... भांडखोर, आचरट, संभावित... बोलत रहाणारे, वेळ खाणारे... इथे मशिनचा लॉग ऑऊट... मग लॉग इनची झकमारी... पुन्हापुन्हा...
... या रोखीच्या आदानप्रदानाने प्रचंड गरगरायला लागल्यावर निशीने डोळ्यावरचा सोडावॉटर काढून ठेवला.स्पंजपॉटची अडचण होत होती.सवय नव्हतीच.बोटावरची थुंकी पुरेशी होती... ती या बोटावरची त्या बोटावर करता येत नाही याचं वैषम्य साजरं करायची ही वेळ नव्हती...
... किती जास्त जातील... कुणाला कमी जातील... कमी दिले तरी बांबू... जास्त दिले तरी बांबू... दिले म्हणजे चुकून गेले तर... संध्याकाळी टॅली होईल न कॅश?... दे चार चारदा मोजून... साले समोरून आत डोकावून बघतात वेळ लागला की... हलकटासारखे काहीतरी बोलतात... चढ चढ चढतात... भांडण केलं की झालं लपडं... आधी झालेलं नसलं तर भांडण झाल्यावर आलेल्या रागातून, गेलेल्या एकाग्रतेमुळे होईल लपडं... शॉर्टकॅशचं... सुपे, सुपे, सुपे, सुपे... राम, राम, हरे, हरे... शिव, शिव... ओऊंम नम:... भिऊ नकोस, ते पाठीशी आहेत... तूच तुझ्या आयुष्याचा चित्रकार...
... बिझीनेस अवर्स संपल्यानंतरही बराच वेळाने समोरची लाईन संपली आज.आज निशी जेवायलाही उठू शकला नाही.जेवायला काय, एक नंबरलासुद्धा!...
निशी जणू चेकच खाऊन संपवतोय हे बघून बाजूच्या अर्धापेमेंट, अर्धारिसिटवाल्या आंजर्लेकरनं पेमेंट केलंच नाही फक्त कॅश स्विकारण्याचं धोरण ठेवलं.तिसरा कॅशियर करकेरा नुसती कॅश स्विकारण्यासाठी बॅंकेने नेमला होताच.आंजर्लेकर-करकेरा जोडी प्रत्येकी एक तास आल्टून पाल्टून जेवायला जाऊन आली.आपापलं काम आवरत निशीकडे बघत हसत बसून राहिली...
समोर खिडकीवर कुणी नाही हे बघून निशीनं खाली घातलेली मान वर केली तेव्हा त्याला चक्कर आल्यासारखं झालं.मग त्यानं सोडावॉटर पुन्हा डोळ्यावर चढवला आणि आपल्या ओटीपोटात जोरात कळ आल्याचं त्याच्या लक्षात आलं.मग त्या उंच मनोर्‍यासारख्या खुर्चीतून उतरण्याचा प्रयत्न त्याने चालू केला आणि आपल्या मांड्या जाम झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.आळस झटकण्यासाठी त्याने दोन्ही हात वर केले.दोन्ही हाताचे कोपरे, एका हाताने शेजार्‍याकडून लागतील तशा गड्ड्या घेऊन घेऊन आणि दुसर्‍या हाताने कॉम्प्युटरवर मारलेले चेक्स व्हेरिफिकेशनसाठी दुसर्‍या बाजूला बसलेल्या ऑफिसरला देऊन देऊन आणि परत घेऊन घेऊन पूर्णपणे निकामी झाले असल्याचं त्याच्या लक्षात आलं.पुन्हा आळसासाठी वर ताणलेले हात झटकन् खाली आणावे लागले कारण ओटीपोटातली न थांबणारी कळ.त्यासाठी ओटीपोट दाबणे.ओटीपोट जास्तच दाबले तर होसपाईप इथेच फुटण्याची भीती.कॅश केबिनमधेच.म्हणजे बंड्या आणि पर्यायाने सगळे ××××× पिच्चरमधे आलेच.
निशी धडपडला.पण ड्रॉवर, केबिन पूर्ण लॉक झाल्याची खात्री करून ओटीपोटाला पकडूनच त्याने टॉयलेटकडे धूम ठोकली.पूर्णपणे मोकळा होताना त्याचा लागलेला श्वास पूर्ववत झाला.
बेसिनच्या नळाखाली जेमेतेम हात धरल्यासारखं करून मग तो तडक शाखेच्या बाहेर पळत सुटला.कुणाच्याही ससेमिर्‍याला दाद न देता.
शाखेच्या मागच्या गल्लीत आला.तपकीरी-काळ्या लांबट गुलाबजामचं का कालाजामचं भलं मोठं हिंडालियमचं ताट बघून त्याची लाळ अनावर झाली.वेताच्या छड्या एकत्रं बांधून तयार केलेल्या उभ्या डमरूच्या आकाराच्या स्टॅंडवर ताट ठेऊन भय्या उभा होता.ते ताट निशीच्या डोळ्यासमोरून हलेना.काय करावं या नादात बराच वेळ रेंगाळल्यानंतर तो दचकला.आज मार्गशीर्षातला गुरूवार.बापरे! उपास सोडायचा.आईबाबांना.आपण खाल्ली इडली.नेहेमीप्रमाणे.वाजले किती?... साडेचार! बापरे! इथेच?... खिशात हात घालून चुळबुळत, खाजवत, घोटाळत रहाणं टळत नव्हतं... त्यात जामवाला भय्या सतत काहीतरी बोलून खायला प्रोव्होक करत होता... नेहेमीप्रमाणे... भय्या कधीच हरायचा नाही...
आधी घरी फोन करून म्हाताराम्हातारीला उशीर होईल म्हणून सांगावं की आधी खाऊन घ्यावं... मरणाची भूक लागलीये... उपास करणं जमत नाही... घरच्याना वाटतं उपास करतो मुलगा... त्याना काय सांगायची कॅशमधे बसण्याची त्रांगडी... काय करावं... छ्या:ऽऽ... शेवटी देवाला सगळं कळतं!... ह्यां!... पण आईबाबांना फोन... च्यायलाऽऽ मरूदेऽऽ आधी खाऊ... ओ भय्याऽऽ च्यायलाऽ द्येव दोन प्लेटऽऽ ओऽऽ अबी उदर किदर देखताय बाबाऽऽ द्येवऽऽ इदरऽऽ
आज भय्याची चांगलीच सरशी होणार होती...

Friday, February 25, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(७)

आधी ड्रॉवर उघडू? की स्पंजपॉटमधला स्पंज ओला करायला देऊ? की स्टॅंपवरची तारीख बदलू? की कॅश सबसिडरी नोटबुक उघडून त्यात १, २, ३ असे नंबर टाकून ठेऊ? की दार वाजवणार्‍या ऑफिसरकडून कॅश इन हॅंड मोजून घेऊ?... काय नक्की करावं आधी हे न सुचून मुख्य रोखपालाचा अधिभार अचानक सोपवला गेलेला निशी बावचळून गेला.
त्या तशा अवस्थेतच त्याचं लक्षं समोर गेलं.समोरच्या काचेतून पलिकडे.पलिकडे जनता उभी होती.प्राणिसंग्रहालयात नव्यानेच दाखल झालेल्या, आधी कधीही न पाहिलेल्या, बबून नावाच्या माकडाकडे बघत रहावं तशी निशीकडे बघत.त्याचं लक्षं जनतेकडे गेल्याबरोबर एकच ओरडा सुरू झाला.त्या कालव्यातूनच निशीचं पेमेंटचं धुमशान सुरू झालं...
निशीच्या समोरच बॅंकेने सहाय्यार्थ दिलेलं कॉम्प्युटर टर्मिनल.निशी दचकला.आणखी एकदा.आयलाऽऽ दोन-तीन वर्षं झाली पेमेंट काऊंटरला बसून.ढकल ढकल ढकललं बसणं.आता?...
सबसिडरीबुकमधे नंबर लिहिणं वगैरे आता बादच.आता??... गेल्या वर्षभरात सगळ्यांनी मिळून ×× लावल्यामुळे आणि संगणक कमी असल्यामुळे एकदोनदाच संगणक वाट्याला आलेला.मशिन चालू करण्यापासून तयारी...
चालू करायचं बटण कुठलं? हे... आणि... हे असावं... अजून नाही चालू झालं... साली दोन बटणं की तीन... एऽऽ आंजर्लेकरऽऽएऽऽ...एऽऽ करकेराऽऽएऽऽकदमऽऽतू तरीऽऽ... साले कोणी लक्ष देत नाहीत... हाक मारली की हसतात... हे असेल का तिसरं बटण?... दाबूया?... दाबूया की नको?...
समोर उभ्या जनतेमधे कोलाहल माजत चालला आणि दुग्ध्यात पडलेल्या निशीला ते तिसरं बटण दाबावंच लागलं.
... हं... झालं चालू च्यामारी... आता... लॉग इन नेम... हं... आता हं पासवर्ड... आयला आपला पासवर्ड...हंऽहात तिच्याऽऽ... हा नाही?... मग?... हंऽऽहांऽतऽ...
निशीला पासवर्ड आठवेना.आठवलेला पासवर्ड मशिन घेईना.आता शेवटची संधी.ही साधली नाही तर लफडं.मग खालचा बंड्या.त्याच्या शिव्या.बडबड.नको तिथे चिमटे.आणि सगळ्यांचं हसणं.समोर जनता आता प्रक्षुब्ध होऊ लागलेली.निशीनं डोळे मिटून सुपेचं स्मरणं केलं.की बोर्डवरच्या सात-आठ तरी कीज उडून हातात येतील एवढ्या जोरात तो बडवून निशीनं शेवटचा प्रयत्न केला आणि कशी कुणास ठाऊक मशिनला दया आली.
तोपर्यंत समोरच्या काचेखालच्या फटीतून चार पाच हात सरसावले.चेक्स असलेले.
अरेरेरे!... हे काय करत बसलो आपण?... आधी टोकन द्यायला पाहिजे होतं!... छ्याऽऽ प्रत्येकाला टोकन देऊन आधी वाटेला लावलं असतं... छ्या:ऽऽ टोकन स्टॅंड कुठेय? एऽऽकदमऽऽएऽऽ टोकन स्टॅंड कुठेऽऽ-
“आरं एऽऽ निश्याऽऽ भाड्याऽऽ टोकनं कसली द्येत बसलाईस तुज्या कर्माचीऽऽ घ्ये घ्ये च्येक! ड्येबिट कर आन् हान् कॅश च्यामारीऽऽ एऽऽ”बंड्या बाहेर होताच जनतेच्या लाईनजवळ.बंड्याच्या ओरडण्यावर लाईनीतले बहुतेक हसले.
आता काय हसण्यासारखं होतं त्यात? निशी आणखी कावराबावरा झाला.काही न सुचून चुळबुळू लागला.आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी जुलमाने घोड्यावर बसवल्यासारखा गर्दीकडे पाहू लागला.
जनता आता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत होती.
पर्याय नव्हता.गत्यंतर तर नव्हतंच.
चेक घ्यायचा.बघायचा.कॉम्प्युटरवर अकांऊटला मारायचा.ड्रॉवरमधून कॅश उचलायची.चेक घे.बघ.गड्डी फेक.नोट कर.चेक घे.बघ.नोटा सरकव.नोट कर.ते करत असताना कॉम्प्युटरवर लक्ष ठेव.लॉग आऊट होऊ नये म्हणून.झाला तर पुन्हा दोन दोन पासवर्ड... मार.. मशिन चालू कर...
गड्डी कुठली फेकतोएस? पन्नासची की शंभरची? की पन्नासच्या जागी शंभरची?... पाचशे... हजार...बापरे! आज मरणार! छ्या:ऽऽ
आज काही धडगत नाही आपली! हा विचार निशीचा पिच्छा सोडत नव्हता.मग नोटांवरचे गंधी आपल्यालाच बघून हसताएत असं त्याला जाणवायला लागलं...

Monday, January 17, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(६)

निशीच्या खांद्यावर मजबूत हाताची पकड पडली.बंड्या त्याच्या खुर्चीच्या पाठीवर आपला दुसरा हात ठेऊन उभा होता.एकशे एकाव्यांदा दचकून निशीने समोरच्या काळ्या काचेत बघितलं.खालचा बंड्याऽऽ... म्हणजे आता कंबक्तीच...angry red-faced guy
“काय करतूस?”
“का-काय- काही नाही-काही नाही!”
“भडव्याऽऽ यून किती टाईम झाला.. ××× करत काय बसलाईस?”
“कु-कुठे-कुठे-काही नाही!”
“त्येच ×××लं म्हन्तो मी.. त्या समूर..पाववाल्या आन् त्या काळ्या काकडीच्या गप्पा ऐकतूस व्हय?”
“ना- नाही हं साहेब.. अजिबात नाही-नाही”
“मला सांगतुईस व्हय रं भाडखाऊ.. आज ××लेत व्हय मला?... चल!”
“कु-कुठे-कुठे? कुठे?”निशीला घाम फुटून श्वास लागला होता.
“आऽरं चाऽलऽ ऊठ!”
“ये-येतो साहेब- पण-कु-कु-”
“कोंबडं हैस व्हय रं! कुकुकु- चल च्यामायला कॅशमदी! मेनला.पेमेंटमदीऽऽ”
“मे-मेन कॅश!- स-स-साहेब-साहेब-
खालच्या बंड्यानं आपली पकड मजबूत ठेवली नसती तर निशी दाणकन् खाली जमिनीवरच आपटला असता.आता जागेवरून हलणं भागच होतं.निशीनं मनातल्या मनात सुपेचं स्मरण केलं.अडीअडचणीला निशी सुपेकडे जायचा.सुपे पत्रिका बघून, हात बघून शंकानिरसन करायचा.उपाय सुचवायचा.जप मनातल्या मनात चालू केल्यावर निशीला सुचलं.आपले प्रयत्नं सोडता कामा नयेत.उठता उठता थुंकी आवरत तो म्हणाला,
“सा-सा-साहेब-पण टोकेकर-”
“तो भडवा सायेब झालाय आज! ऑफिसरची एक्टिंग हे त्येला!”
“स- साहेब पण मिसाळ-”
“तुला भड्व्या कोन कोन सिनियर हाय त्ये बरूबर म्हाईत! मिसाळ ब्येनं बस्लंय तुज्या आदीच कांपुटरवर! तुज्या मायला तुजं ध्यान त्या पाववाल्याकडं आन् काळ्या काकडीकडं-”
“पण-साहेब-भा- भाई-”
“त्याच्या आयला लागला ×× त्याच्या- तू चलतुस का लाऊ तुला पन-”
“आ- आलो-साहेब- जरा- टॉयलेट-”
“जा मूत भडव्या आन म् येऽऽ”असं म्हणून खालचा बंड्या भर चौकात खदखदा हसावं तसा ग्राऊंडफ्लोअरवरच्या त्या हॉलच्या मधोमध उभा राहून हसला.कोपरय़ातून वीरकर आणि इतर शिपाई बंधूंचा प्रतिध्वनी मागोमाग आलाच.निशीऽऽ निशीऽऽ असं ओरडून कर्मचारीगणही त्यात सामील झाला.
टॉयलेटमधे शिरला तेव्हा निशीचे धाबे दणाणले होते.किंवा धाबे दणाणल्यामुळे त्याला टॉयलेटकडे यावं लागलं होतं.मोकळा होता होता तो झाल्याप्रकाराची संगती लावू लागला.
आज मार्गशीर्षातला गुरूवार.नेमका मार्गशीर्षातला पहिला दिवस.नेमका.कधी नव्हे तो.गेला आठवडाभर लोकांची गटारी.काल मोहरम की ईद की काय ती सुटी.परवा लाईट नव्हते म्हणून सगळे कामं टाकून गूल.नेमका डिसेंबरचा पहिला आठवडा.पहिला आठवडा म्हणजे कॅशमधे तोबा गर्दी.ही पर्वणी साधून नेहेमीप्रमाणे रहाटेने मारलेली दांडी.मेन कॅश काऊंटरवरच्या.पेमेंट करणारय़ा.लाखांमधे...
भाईला बसायला सांगितलं तर- कोण रहाटे? कुठली कॅश? कुठला काऊंटर? असं विचारून खडबडलेल्या चेहेरय़ावर इतके अनभिज्ञ भाव आणेल की आजूबाजूचे सगळे नुकतेच अलिबागहून आलेले आहेत.आणि निर्लज्ज उर्मट चेहेरय़ाने हसत बघत राहील.
परब कळव्याहून, इतक्या लांबून येतो म्हणजे उपकारच.त्याला नेमके जुलाब होत असतील किंवा थंडी भरून आलेली असेल. ’असं पहिल्यांदाच झालं!’ असंही तो नेहेमीप्रमाणे म्हणेल.
दिलीपला नेमकी लंचअवरमधे साखरपुड्याचे फोटो काढायची ऑर्डर असेल.आपण राष्ट्रपतींचे फोटो काढायला जाणार असल्याच्या थाटात तो ते सांगेल.
’ऑन द स्पॉट’ कॅशवरून डाका, दरोडा, लाख, खाक अशा शब्दांचा वाक्यात उपयोग करून भलत्याच अर्थाची म्हण बनवेल.ती खदाखदा हसून किंवा चिडून कानठळ्या बसवणारय़ा आवाजात सुनवत राहील.पर्यायानं बंड्या थंडा होईल.
उत्तम शिंदे कॅश वरून यॅस, फॅस असं काहीतरी जुळवून ज्योक तयार करेल.तो सांगताना दहादा विसरेल.हे सगळं करताना तो सतत तोंड पसरून स्वत:च आपल्या ज्योकवर हसत बसेल.इतका हसेल की समोरचा गप बसेल.
मनू मुत्तमवार, ’कॅशमधे बस!’ या मार्गावरची गाडी भलत्याच मार्गावर घेऊन जाईल.तोंड पाडून, एरंडेल प्यालासारखं हसून, नको तेवढं इंग्रजी बोलून, प्रमाणाबाहेर विनम्र होऊन, अनेक चित्रंविचित्रं स्थानकांवरच अडकून राहील.
जयदेव मिसाळ कामात फास्ट.फास्ट म्हणजे त्याच्यासारखा तोच.असं त्याचं मत.केसांवरून हात फिरवत सगळ्यांच्या आधी येऊन, रिकामी जागा हेरून, अलाऊन्स साधून त्यानं एव्हाना, म्हणजे तासाभरात सगळं काम संपवत आणलेलं असेल.त्याला कसं उठवणार?
कबनुरकर, सावंत, काळे पोरंबाळंवाल्या बाया म्हणून बादच!blue in the face
रहाता राहिले टोकेकर.त्याना ऑफिशिएटिंग.एक्टिंग.
म्हणजे मग...
टॉयलेटमधे मोकळं होता होता निशी इथपर्यंत आला आणि पुन्हा दचकला.कितव्यांदा कुणास ठाऊक.च्यायलाऽऽ... पळालं पाहिजे लवकर कॅश केबिनमधे नाही तर बंड्याचे चिमटे...
कितव्यांदा कुणास ठाऊक निशीने धूम ठोकली आणि तो लॅचशी खडखड करून, झपकन् बंद-उघड होणारय़ा दाराशी झटापट करून कॅश डिपार्टमेंटमधल्या मेन पेमेंट काऊंटर केबिनमधे शिरला.प्रमाणाबाहेर उंच असलेल्या खुर्चीवर चढून बसताना एखाद्या मनोरय़ावर चढावं तसा श्वास त्याला लागला...

Wednesday, January 12, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(५)

युनियन लीडरनी ’चेक्सचं सॉर्टिंग करू नकोस! ते तुझं काम नाही!’ असं वारंवार बजावलेलं निशीला आठवत होतं तरीही तो किमान चार वेळा त्या चेक्सच्या ढिगापर्यंत जाऊन दूर झाला होता.खातेबदल.नियमाप्रमाणे डिपार्टमेंट चेंजचा फार्स दर वर्षा-दोन वर्षांतून होतो तसा यावेळीही झाला होता आणि प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सगळ्यानी मिळून पुन्हा एकदा निशीला घोडा लावला होता.रजाराखीव-लीव्हरिझर्व म्हणून.म्हणजे कमी तिथे तो.पडेल ते काम.पडेल म्हणजे मुद्दाम पाडलं जाईल, केलं जाणार नाही ते...
पाचव्यांदा निशीला रहावलं नाही.कामावर येऊन, नुसतं बसून किंवा रेंगाळून काय करणार? तो बोटांना थुंकी फासून फताफता काउंटरवाईज चेक्सचं सॉर्टिंग करायला लागला.
इतक्यात कॅंटीनचा पोर्‍या चहा घेऊन आला.
“एऽऽ क्या बनाया आज?”
“इटली”पोर्‍या म्हणाला.
“छ्याऽऽ खाया में अभी”असं म्हणून निशी थुंकी उडवत सॉर्टिंग करत राहिला.
कॅंटीनचा पोर्‍या पुढे जाऊन रेंगाळला.सॉर्टिंग करता करता निशीचं लक्ष पोर्‍याकडे गेलं.पोर्‍याचं लक्ष भलतीकडेच.मग निशीचं लक्ष भलतीकडे गेलं आणि त्याचे हात रेंगाळले.ओठांच्या कोपर्‍याशी थुंकी जमा होऊ लागली.लागल्यासारखा श्वास थाडथाड उडू लागला.शरीरातून विचित्रं लहर दौडू लागली.मान, डोकं मागे करून श्वास पूर्ववत करायचा प्रयत्न त्याचं शरीर आपसूक करू लागलं.
पोर्‍यानं मुद्दाम त्या दोघांच्या मधे जाऊन कॉफीचे कप ठेवले.दोघेही परस्परात गुंग.पोर्‍या मुद्दाम रेंगाळला.दोघांच्या भावस्थितीत इवलासाही फरक नाही.पोर्‍यानं मुद्दाम निशीकडे बघितलं.निशी आ वासून त्या दोघांकडे पहात होता.पोर्‍या मुद्दाम निशीसमोरून पास झाला.निशी तसाच.हक्काबक्का.कुणीतरी स्टॅच्यू घातल्यासारखा.छातीत धडधड आणि श्वास खालीवर.
त्या दोघांमधला तो गोरापान, उलटे केस फिरवलेला, स्मार्ट, परधर्मीय पण बाटगेपणाचा शिक्का असलेला.ती कर्मठ धर्माची.काळी, उंच, फेंदारलेल्या नाकाची.चेहेरा वर केला की नाकावरच्या चमकीतली नाकातली गाठ दिसायची.हसरी, कामसू, बांधा बरा.चापून चोपून नेसलेली साडी.
दोघेही आले, बसले की एकमेकांत धुंद असतात... निशीने एकदा मार्क केलं होतं.पुन्हा दोघेही विवाहित.एकमेकांशी नव्हे.तो खूपच पुढाकार घ्यायचा.गोरा.ती हसायची.मनमोकळं बोलायची.एकदा.. निशीने.. त्याना मागच्या गल्लीत पाहिलं होतं.पाठमोरं.त्या, गोर्‍यानं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.इथे निशीच्या अंगातून शिरशिरी गेली.त्याचा हात खांद्यावरून पाठीवर.मग खाली... तेवढं निशीने बघितलं.मग चपापून आजुबाजूला बघेपर्यंत ते गर्दीत कुठल्यातरी गल्लीत दिसेनासे झाले.
तेव्हापासून ते असे बोलत बसलेले दिसले की निशीला श्वास लागायचा.त्याच्या छातीत धडधड व्हायची.तो नाक, कान , डोळे सगळी इंद्रिये एकवटून त्यांचं ते सगळं न्याहाळत बसायचा.
“येऽऽ आलं रं आलंऽऽ...” अशी बंड्याची हाळी कानावर आली आणि निशी भानावर आला.तोपर्यंत चेक सॉर्टिंग सगळं बोंबललं होतं.आता काउंटरवाले आपल्याला भोसडणार लक्ष कुठे असतं तुझं म्हणून.निशी झालेला गोंधळ निस्तारायच्या मागे लागला...साला..यांना मदत करायची..यांचं काम आपणच करायचं..काही चूक झाली की हे आपल्यावरच चढणार...
ते सगळं निस्तारण्याच्या नादात निशीला समोरच्या काळ्या काचेत मागे बंड्याजवळ जमलेली गर्दी दिसली नाही.आजुबाजूला जमत असलेली इतर कर्मचारीमंडळी दिसली नाहीत.त्यांच्यात काय चर्चा चाललीय हे दिसलं नाही...
चारचारदा चेक्स उलटे पालटे करून, त्यांचे चार-पाच वाटे पुन्हा पुन्हा निरखताना त्याने अचानक दचकून आजुबाजूला बघितलं.मग त्याच्या लक्षात आलं.छ्यॉऽ... युनियन लीडर एवढ्या लवकर कुठला यायला?.. पण त्याने पुन्हा आपल्याला असं हे सॉर्टिंगफिर्टिंग, आपलं नसलेलं, काम करताना बघितलं तर.. ××वर लाथ मारीन!.. निशीला युनियन लीडरचा करपटलेला चेहेरा पुन्हापुन्हा आठवत राहिला...
चेक्सचं ते-रामायण-महाभारत-काय ते-हातावेगळं करून बाजूला सारत असताना त्यानं पुन्हा आजुबाजूला बघितलं आणि सकाळपासून मोजून आता साधारण शंभराव्यांदा तो दचकला... च्यायलाऽऽ या सॉर्टिंगच्या नादात आज कोण कोण आलं नाही ते आपण बघितलंच नाही.म्हणजे आज कॉम्प्युटर नसला तर आजही अलाऊन्स नाही.. अरे! इथे! कोण नाही? जाऊया का? नको! तो भाई असेल तर कानफटातच मारेल! घाणेरड्या शिव्या देऊन!.. कबनुरकर असेल तर पुन्हा आपल्या लग्नाचा विषय काढून टोचून बोलत राहिल.. काळे असेल तर ’आईशप्पत’ म्हणून तोंडावर हात ठेऊन बघून हसतच राहिल.. काय करावं.. काय करावं.. कुठे जागा मिळेल.. कोण आपल्याला कसं दटावेल या विचारात निशी चुळबुळत बसल्याजागीच बूड चिकटवून बसून राहिला आणि.. आणि एकशे एकाव्यांदा दचकला.

Sunday, January 9, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(४)

निशी नेहेमीसारखा मागे मागे पहात लोंढ्याबरोबर स्टेशनवर उतरला.गर्दीत कोण पुरुष किती देखणा आहे हे बघत.निशीच्या मागचा पायावर पाय पडल्याने सणकला.लोकलमधे चढण्या, प्रवास करण्या आणि उतरण्याच्या व्यायामाने तो आधीच हिंस्र झालेला.त्याने निशीच्या टपली मारली.“×××× युपीसे आते है साले मरनेको...”
निशी, आता बायका दोन्ही हाताने साडी उचलून चालतात, चालताना कंबर हलवतात, तसा दोन्ही हाताने पॅंट वर धरून जिना चढू लागला.सगळीकडे भिरीभिरी बघत.काही ऑफिसमधले, काही ओळखीचे झालेले खूष झाले ते बघून.सक्काळ सक्काळ साऽऽला मस्तऽ टाईमपास... त्याच्यावर ज्योक करत ग्रुप पुढे निघाला.निशी मुद्दाम मागे राहिला.सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत.ब्रिजच्या विरूद्धं टोकाला तो फुटपाथवर कधी उतरला ते ग्रुपला नाक्यावर पोचल्यावरही समजलं नाही.
निशी पुन्हा भिरीभिरी लगालगा चालत खाऊच्या गाड्या शोधत या वेगळ्या रस्त्याने निघाला.पाच रूपयाला चार इडल्या मिळणार्‍या गाडीसमोर उभं राहून त्याने पंधरा रूपये खर्चं केले.दोनदा चटणी ओतून घेतली.ओठावर साचलेले इडलीचे कण चेहेराभर रूमालाच्या बोळ्याने पसरवत हाऽऽशऽऽहाऽऽशऽहूऽऽ करत पुढे निघाला.पुन्हा भिरीभिरी टुकूटुकू बघत...
नेहेमीच्या मुतारीत शिरल्याशिवाय नेहेमीसारखंच गत्यंतर नव्हतं.शिरतो तर बाजूलाच नेहेमीप्रमाणे उभा ग्राहक म्हातारा, काळा, जाडा, सफेद कपड्यातला मालिक.पॅंटच्या चेनवरून हात फिरवत.निशीकडे मिष्कील नजरेने बघत.गालात जीभ फिरवत.विचित्रं स्मित करत.रोखून बघत.निशीनं हडबडून नजर काढून घेतली.मालिक आवाज करून हसला.तोपर्यंत दोघांच्या पुढ्यातले दोघेही रिकामे झालेले.एकदमच.मागचे हे दोघेही मुतारीत वर चढले.निशी नेहेमीप्रमाणे पॅंटच्या चेनशी झटत.मालिक गालात जीभ घोळवत निशीकडे टक लाऊन.
निशीला संपूर्ण रिलॅक्स व्हायला दोन मिन्टं लागली.त्यानंतरच त्याचं इकडे तिकडे लक्षं गेलं.बाजूलाच मालिक.तो अजून बघतोय.नजर आणखी विचित्रं.निशीला नेहेमीसारखंच पुन्हा एकदा तीव्रतेनं जाणवलं, हा... मालिक, मुतारीत येऊन सगळं जग जे करतं ते न करता भलतंच काहीतरी करत उभा असतो.नक्की!...
सामान आत ढकलून घाईघाईत चेन लावताना निशीची चेन नेहेमीसारखी उघडी रहायला लागली.पॅंट जुनी झालीय... घड्याळाकडे लक्षं गेलं आणि तो अक्षरश: पळत सुटला...
पळताना अचानक त्याच्या लक्षात आलं, अरे… आपण आज हा ट्रान्सपरंट शर्टं घातलाय! आतल्या बनियनची लाईन आणि त्यात कसतरी कोंबलेलं अंगही दिसणारा.तो पटकन् शेजारच्या खुराडेवजा बहुमजली चाळीत शिरला.जिन्याजवळच्या आडोश्यात उभं राहून त्याने खसाखसा अंगातला शर्ट काढला.खांद्यावरच्या बॅगेत बोळा करून कोंबला.बॅगेतला घडीत चुरगळलेला रंगीबेरंगी शर्ट काढून त्याच्याशी झटायला त्याने सुरूवात केली.“सालाऽ हातगाडीवाला दिखताय् ऽसालेऽ कैसे ऐशमें रहते आजकल!” जिन्यावरून उतरणारा माणूस असं म्हणाला आणि कशीबशी शर्टची बटणं लावत, पॅंटची चेन पुन्हापुन्हा वरखाली करून बघत निशीने तिथूनही धूम ठोकली.
ढुंगणाला पाय लाऊन धावत धावत घामाघूम होत तो कचेरीत पोचला तेव्हा सव्वादहा वाजत आले होते.इतक्या लवकर- पहाटे- पोचूनही तो सही करायला मस्टरजवळ गेला नाही.मस्टरमागे खालचा बंड्या.त्यात यावेळी ऑफिसात दोनचार जणांशिवाय कोणीच नाही, म्हणजे बंड्या चेकाळणार.
भलत्याच रस्त्याने, दोन काऊंटर्सच्या सांध्यामधून वाट काढत बंड्याला दिसणार नाही अशा बेताने तो खुर्चीजवळ आला.मान पूर्णपणे खाली घालून.लगबगीने खुर्चीवर बसला.डोळ्यावरच्या सोडावॉटर काढून शर्टच्या वरच्या खिशात कोंबलेला रूमालाचा बोळा काढून आपला चेहेरा खसाखसा पुसायला घेतला.सोडावॉटर पुन्हा डोळ्यावर चढवताना त्याला समोर पिलरवरच्या काळ्या चकचकीत काचेत स्वत:चा चेहेरा, केस, खांदे, रंगीबेरंगी शर्ट, त्याच्या कोपरापर्यंत येऊन लोळणार्‍या बाह्या दिसल्या.रिनोवेशन करून सगळीकडे अशा चकचकीत काळ्या काचा बसवल्यापासून निशी सतत हैराण होत होता.सतत आपलं प्रतिबिंब बघून बघून.शॅ: असं करून तो समोरचं प्रतिबिंब चुकवायला जाई.दिशा बदले.तर, तो बघे त्या त्या दिशेला काळी चकचकीत काच आणि तेच ते प्रतिबिंब...
फायनल शॅ:ऽऽ करून तो उठला.उठावंच लागलं.तेही बंड्याला दिसणार नाही अशा बेताने.
बंड्या पॅंट खाजवत टॉयलेटकडे निघालाय.हे दिसल्यावर तो चटकन् जाऊन मस्टरवर पटकन् सही करून आला.कोपर्‍यातल्या वीरकरांनी निशीऽऽ... अशी मारलेली आरोळी चुकवत तो कपाटामागच्या टेबलाजवळ आला.टेबलावर चेक्सचा भला मोठा ढीग.सवयीने तो चटकन् पुढे झाला.लक्षात येताच तेवढ्याच त्वरेने मागे झाला.कुणाच्या लक्षात आपली हालचाल आली असेल का? असं वाटून भांबावून त्याने आजुबाजूला बघितलं.दोनचार जणांशिवाय कोणी काळं कुत्रं अजूनही आलं नव्हतं.ग्राहकही चाणाक्षं झाले होते.कर्मचारी बंधुभगिनींची वेळ समजून घेऊन त्यानी आपली वेळ मागे लोटली होती...

Wednesday, January 5, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(३)

इकडे भाई हरवल्ये आणि तिकडे बंड्याभोवतालच्या त्या गर्दीखालून कबनुरकर, सावंत आणि काळे बाहेर पडल्या.इतक्यात बाहेर पडले नसते तर गर्दीत कमीतकमी विनयभंग तरी झाला असता असे भाव कबनुरकरच्या चेहेर्‍यावर होते आणि झाला असता तर फक्तं आपलाच झाला असता अशी खुषीही त्यापाठोपाठ उमटली.चेहेर्‍यावरच्या वांगाच्या टिकल्यांमधून ती खुषी चेहेर्‍यावर सर्वत्र उतरली.मग जिवणी उघडली जाऊन समोरचे पिवळे पटाशीचे दातही आत मावेनासे झाले.कबनुरकर हसू लागली होती.
सावंत बाहेर आली ती ब्लाऊजवरची साडीची बॉर्डरलाईन चापूनचोपून बसवत, कुठे काही दिसत नाही ना याची चार चार वेळा खात्री करत.“मी गेली गंऽऽ”असं म्हणत ती चालू पडली.तरातरा चालत वर जाणार्‍या जिन्याजवळ गेलीसुद्धा.
काळे भांबावल्यासारखी.हातात पाण्याची रिकामी बाटली.रंगहीन पंजाबी ड्रेस घातलेली. “आईशप्पत!” असं म्हणून तिनं नेहेमीप्रमाणे तोंडावर हात ठेवला.एकदा गर्दीकडे, एकदा काऊंटरला टेकलेल्या परबकडे, एकदा कोपर्‍यातल्या पाठमोर्‍या तंद्रीतल्या भाईकडे बघत राहिली.’ऑन द स्पॉट’ टॉयलेटकडे चालता झालेला.“एऽऽ ऑन द स्पॉटऽऽएऽऽ”त्याला हाका मारत काळे पुढे झाली पण ऑन द स्पॉटला अशी हाक मारलेली आवडत नसे.तो फेंगडे पाय टाकत चटकन् ’जेन्ट्स’ मधे दिसेनासा झाला.तितक्यात कबुनरकरने काळेच्या दंडाला चिमटा काढला.काळे लहान मुलाच्या पार्श्वभागावर चिमटा काढल्यावर ते जसे ओरडेल तशी चित्कारली.म्हणजे नेहेमीसारखंच.“एऽआईक् नं! तर ’हा’ काल जाता जाता म्हणाला होता, लवकर येईन.पण साफ विसरलाच गं! बघ नं! –आणि बबड्याचे पेन्सिल कलर्स, कुकरचं गास्केट, मेथीची जुडी काही काही आणलंन् नाई गं! केवढी पंचाईत माझी माहितीए! -आणि आईंचं आमच्या तुला माहितीए ना, नुसत्या बसून राहिल्या मी येईपर्यंत- आणि बबड्या झोपेपर्यंत तुला सांगूऽऽ -सारखा अशी झोप, अशी झोप! शेवटी मी सांगितलं त्याला! तू काय करायचं ते कर! मी अशीच झोपणार!”कबनुरकरचा ’माझी माणसं, माझं घर’ चा पहिला एपिसोड सुरू झाला.काळेच्या दंडाला हिसके, चिमटे आणि थापट्या बसतच राहिल्या.त्या दोघी ’लेडिज’ कडे सरकल्या तसा कबनुरकरचा आवाज अधिक अधिक खाजगीत जाऊ लागला.
टॉयलेटला जाणार्‍या त्या वाटेवरच वीरकरांचं टेबल होतं.त्यांच्याभोवती शिपाईबंधू जमलेले.स्लीप्स, चेक्स यांचं बंडल बांधत वीरकर सहकार्‍यांचे मनोरंजन करत.आताही वीरकरांनी ’तू काय करायचं ते कर! मी अशीच झोपणार!’ एवढंच कबनुरकरच्या तोंडचं वाक्यं ऐकलं आणि मंडळात खसखस पिकायला वेळ लागला नाही.
अशावेळी निशिगंध गोरंबे काय करत होता?... निशिगंध गोरंबे!... रहस्यकथेच्या नायकाला शोभेल असं ते नाव.निशी म्हणून त्याला जग ओळखत होतं.चाळीस एक वर्षाचा, बुटका, जाडा.बरेचसे केस पिकलेले.केसांना तेल आहे, नाही.ते विंचरलेले काय धुतलेही आहेत, नाहीत असे.डोळ्यांवर जाड काचांचा, जाड फ्रेमचा चष्मा.
सगळे बंड्याजवळ आणि हा हंड्याजवळ.हंड्याजवळ म्हणजे बंड्यापासून दूर कुठेतरी.कुठेही पण बंड्यापासून जास्तीत जास्त दूर.कालच बंड्याने सणसणीत दम भरला होता.उशीरा येण्याबद्दल.वर छातीवर सणसणीत चिमटा काढून बंड्या खदखदून हसला होता.निशी हो, हो, नाही, नाही म्हणत आधीच घाबरलेला.त्यात बंड्याचा हात आता आपल्या पॅंटीच्या दिशेने येतोय हे कधी नव्हे ते आधीच कळल्यामुळे निशीने धूम ठोकली.बंड्या, त्याच्याजवळ उभे वीरकर, सकाळपासून रात्रीपर्यंत तिथेच असणारा ग्राहक म्हातारा ’मालिक’ आणि तीन चार टगे जोरजोरात हसले होते.
मग आज निशी लवकर आला.सगळ्यांच्या भाषेत भल्या पहाटे.म्हणजे सव्वादहा वाजता.मार्गशीर्षं सुरू झालेला.घरात भयानक गडबड.वडलांना कालच हॉस्पिटलमधून डिसचार्ज दिलेला.आईची कंबर धरलेली.सत्तर-ऐंशी वय म्हणजे हे कॉमनच.घरात परंपरा.श्रावण होताच.आता मार्गशीर्षं.कधी नाही ते सकाळी लवकर, म्हणजे सहा वाजता उठून निशीने बेत रांधला.वरण, भात, कोशींबीर, भेंड्याची भाजी, पोळ्या.तूप, लिंबू आहेत की नाही बघितलं.सोवळ्यानं.बंड्याचा दम आठवून आठवून कालपासून दमायला झालं होतं.निघाला.बंड्या रंगात आला की पॅंट पकडून पोटाला जोरदार चिमटा काढायचा.निशीला आज तो चुकवायचा होता...

Tuesday, January 4, 2011

ग्लोबल झालिंया कळें...(२)

येणार येणार म्हणून गाजत असलेलं सर्क्युलर अखेर आलं आणि खालच्या बंड्यानं जोरदार हाळी दिली, “येऽऽ आलं रं आलंऽऽ”
नुकतीच सही करणारी, सही करून पंख्याचा वारा शोधत घाम पुसणारी, सकाळच्या फ्रेश गप्पा मारत अक्वागार्डभोवती जमलेली-पाणी भरून घेणारी; अशी सगळी कर्मचारी मंडळी खालच्या बंड्याच्या भोवती जमली.
खालचा बंड्या अडमिनिस्ट्रेशन बघायचा.गावरान.धूर्त.कळकटपणाचं सोंग घेतलेला.तो वरच्या मजल्यावरच्या लोन्स आणि अडव्हान्सेसवाल्या मॅनेजरला ’वरचा बंड्या’ म्हणायचा.केबिनवाल्याला ’आतला बंड्या’.सगळी पोरं ’ह्या’ ला ’खालचा बंड्या’ म्हणायची.
क्लिअरिंगवाला टपाल घेऊन आला.खालच्या बंड्यानं ते उघडलं.खालच्या बंड्याच्या मानेत स्प्रिंग बसवलेली असावी.सतत सगळ्याच गोष्टींवर नजर ठेवताना त्याची मान बगळ्यासारखी हाले.आता टपाल चाळतानाही तसंच.खालच्या बंड्याभोवती गर्दी वाढायला लागली.सगळ्यात पुढे, खालच्या बंड्याला खेटून टेन्शनमूर्ती टोकेकर.कानाला लावलेलं मशिन त्यानी लगेच पाळीला चिमटा घेऊन ऑन केलं.सवईनं टकलावरून हात फिरवत फिरवत ते इतके वाकून बघायला लागले की त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन उभा असलेला मनू मुत्तमवार वैतागला,“ओऽ सिनियर सीटीझन! आडवे काय पडताय बंड्यावर? पाताळात जायचा तो!”
“पाताळात की पातळात?”गर्दीतल्या कुणीतरी डाव साधून घेतला पण टोकेकरांच्या कानात ते काही शिरलं नसावं.नंतरचा जोरदार हशा त्यांच्या कानात शिरला आणि ते गर्दीतल्या एक एक माणसाकडे बघत राहिले.
असले विनोद नेहमी उत्तम शिंदे करायचा आणि त्यावर नेहेमी स्वत:च जास्त हसायचा.त्याचं हसणं सगळ्यात शेवटी संपायचं.टोकेकरांचा नेहेमीच गोंधळ होतो म्हणून तो मुद्दाम हसणं वाढवत न्यायचा.टोकेकर पूर्ण कॉन्शस होईपर्यंत तो थांबायचा नाही.
परब नेहेमी गर्दीपासून लांब.काऊंटरला टेकून.हाताची घडी घालून.लोक त्याला इन्स्पेक्टर परब म्हणायचे.परबला सगळ्यांची गंमत बघण्यात रस.कोण काय करतो, तो ते का करतो, नक्की कशासाठी; असा त्याचा ट्रॅक.आपल्याशी बोलणारा काहीतरी लपवून ठेऊनच सांगतोय हे त्याच्या मनात पक्कं.आत्ताही हा खालचा बंड्या उल्लू बनवतोय.असलं सर्क्युलर काय येतंय काय? सगळे बिनडोक उगाच गर्दी करून उभे राहिलेत- अशा अर्थाची उपरोधिक कम तुच्छतेची नजर त्या सगळ्यांकडे टाकून छद्मी हसत तो पंख्याखाली सरकला.
“क्यों परब! मोहल्लेमें गर्दी, चार आनेका भाव?”’ऑन द स्पॉट’ने आल्या आल्या परबच्या पाठीवर थाप मारली आणि स्वत:च ख्याऽ ख्याऽ करून हसला.हा अमराठी.पूर्वीच्या हिंदी सिनेमातल्या खलनायकांसारखी पालुपदं वापरायचा.“ऑन द स्पॉट-गोल्डस्पॉट!”हे नेहेमी.सगळे त्यालाच ’ऑन द स्पॉट’ म्हणायचे.
त्याच्या पाठोपाठ दिलीप आला.कॅमेर्‍याची बॅग सांभाळत.उन्हात काळा होणारा चष्मा गळ्यात लटकवत.त्याचा चेहेरा सदैव फोटो काढण्यासारखा.आपल्याला सगळं कळतं असं समजणारा दिलीप ती गर्दी पाहून भांबावला.चक्कर आलेल्या बंड्याला बहुतेक जागं करताएत म्हणजे बंड्याचे फोटो घेता येतील, या चाणाक्ष व्यवहारी विचाराने त्याचे डोळे चमकले.पण आता बहिर्दिशेला जाण्यात शहाणपणा होता नायतर पंचाईत झाली असती.बॅग ठेऊन स्वत:च्या शहाणपणाच्या ऐटीत दिलीप टॉयलेटकडे वळला.
मग आले भाई.बाजूच्याच बिल्डिंगमधे रहाणारे म्हणून सगळ्यात शेवटी येणारे.“भाई”ही त्याना मिळालेली उपाधी.त्यांच्या कर्तृत्वाची पावती.मध्यमवर्गीयांचा भाई म्हणजे अगदी गेम वगैरे वाजवला नव्हता कुणाचा पण चांगलीच जरब.सध्या सिंह थंड झालेला.पिकनिक्स अरेंज करायला लागलेला.ध्यानी पिकनिक, मनी पिकनिक.अवघे विश्वचि पिकनिक. ’च्यूत्यासारखे काहीतरी इश्यूज् हवेच असतात’ अशा अर्थाची थंड कुत्सित नजर बंड्याभोवतालच्या गर्दीकडे टाकून, एका कोपर्याथत हाताची घडी घालून भाईंनी ध्यान लावलं.या शनिवारची पिकनिक.पटवापटवी सुरू करायला पाहिजे.कस्टमर्सकडून पिकनिकसाठी डोनेशन्स, ’स्टफ’ची सोय, खाणं, चखणा... भाई हरवल्ये...

ग्लोबल झालिंया कळें...

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिकीकरणाची सुरवात होऊन वीस वर्षं उलटून गेली आहेत म्हणे! आपल्याला आजुबाजूला काही जाणवतंय? की सगळं आहे तसंच आहे? किंवा असं असेल! आपल्याला सगळ्याची सवय होऊन गेली असेल!
ग्लोबल झालिंया कळें...ही नवी मालिका सुरू करतोय अभिलेख वर!
आमचं (विनोदी!) आस्थापन.त्यातली तशीच (विनोदी!) पात्रं आणि त्यांनी भरून आणि भारून टाकलेला अवघा विनोद! आमचं आस्थापन अजूनही ग्लोबल होण्याच्या मार्गावर आहे.ग्लोबल होत असताना त्याला जाणवणार्‍या ह्या कळा आहेत की ते ग्लोबल होत असतानाच्या अनुभवातून आपल्याला काही कळणार आहे, आपण काही बोध घेणार आहोत? तुम्हीच ठरवा!