romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, March 5, 2011

ग्लोबल झालिंया कळे...(८)

निशीच्या केबिनमधला कॅशने भरलेला ड्रॉवर रिकामा झाला रे झाला की ऑफीसर दार ठोठावून तो पुन्हा भरत होता किंवा शेजारचा रसीदी रोखपाल (रिसिविंग कॅशियर) त्याच्याकडे जमा झालेल्या साठ्यातून गड्ड्यावर गड्ड्या फेकत होता.
समोरचे कस्टमर्स... खेकटे, म्हातारे, पेन्शनर्स, प्रोफेसनल्स, सुशिक्षित अडाणी, बिझिनेसमन, त्यांचे मेसेंजर्स... भांडखोर, आचरट, संभावित... बोलत रहाणारे, वेळ खाणारे... इथे मशिनचा लॉग ऑऊट... मग लॉग इनची झकमारी... पुन्हापुन्हा...
... या रोखीच्या आदानप्रदानाने प्रचंड गरगरायला लागल्यावर निशीने डोळ्यावरचा सोडावॉटर काढून ठेवला.स्पंजपॉटची अडचण होत होती.सवय नव्हतीच.बोटावरची थुंकी पुरेशी होती... ती या बोटावरची त्या बोटावर करता येत नाही याचं वैषम्य साजरं करायची ही वेळ नव्हती...
... किती जास्त जातील... कुणाला कमी जातील... कमी दिले तरी बांबू... जास्त दिले तरी बांबू... दिले म्हणजे चुकून गेले तर... संध्याकाळी टॅली होईल न कॅश?... दे चार चारदा मोजून... साले समोरून आत डोकावून बघतात वेळ लागला की... हलकटासारखे काहीतरी बोलतात... चढ चढ चढतात... भांडण केलं की झालं लपडं... आधी झालेलं नसलं तर भांडण झाल्यावर आलेल्या रागातून, गेलेल्या एकाग्रतेमुळे होईल लपडं... शॉर्टकॅशचं... सुपे, सुपे, सुपे, सुपे... राम, राम, हरे, हरे... शिव, शिव... ओऊंम नम:... भिऊ नकोस, ते पाठीशी आहेत... तूच तुझ्या आयुष्याचा चित्रकार...
... बिझीनेस अवर्स संपल्यानंतरही बराच वेळाने समोरची लाईन संपली आज.आज निशी जेवायलाही उठू शकला नाही.जेवायला काय, एक नंबरलासुद्धा!...
निशी जणू चेकच खाऊन संपवतोय हे बघून बाजूच्या अर्धापेमेंट, अर्धारिसिटवाल्या आंजर्लेकरनं पेमेंट केलंच नाही फक्त कॅश स्विकारण्याचं धोरण ठेवलं.तिसरा कॅशियर करकेरा नुसती कॅश स्विकारण्यासाठी बॅंकेने नेमला होताच.आंजर्लेकर-करकेरा जोडी प्रत्येकी एक तास आल्टून पाल्टून जेवायला जाऊन आली.आपापलं काम आवरत निशीकडे बघत हसत बसून राहिली...
समोर खिडकीवर कुणी नाही हे बघून निशीनं खाली घातलेली मान वर केली तेव्हा त्याला चक्कर आल्यासारखं झालं.मग त्यानं सोडावॉटर पुन्हा डोळ्यावर चढवला आणि आपल्या ओटीपोटात जोरात कळ आल्याचं त्याच्या लक्षात आलं.मग त्या उंच मनोर्‍यासारख्या खुर्चीतून उतरण्याचा प्रयत्न त्याने चालू केला आणि आपल्या मांड्या जाम झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.आळस झटकण्यासाठी त्याने दोन्ही हात वर केले.दोन्ही हाताचे कोपरे, एका हाताने शेजार्‍याकडून लागतील तशा गड्ड्या घेऊन घेऊन आणि दुसर्‍या हाताने कॉम्प्युटरवर मारलेले चेक्स व्हेरिफिकेशनसाठी दुसर्‍या बाजूला बसलेल्या ऑफिसरला देऊन देऊन आणि परत घेऊन घेऊन पूर्णपणे निकामी झाले असल्याचं त्याच्या लक्षात आलं.पुन्हा आळसासाठी वर ताणलेले हात झटकन् खाली आणावे लागले कारण ओटीपोटातली न थांबणारी कळ.त्यासाठी ओटीपोट दाबणे.ओटीपोट जास्तच दाबले तर होसपाईप इथेच फुटण्याची भीती.कॅश केबिनमधेच.म्हणजे बंड्या आणि पर्यायाने सगळे ××××× पिच्चरमधे आलेच.
निशी धडपडला.पण ड्रॉवर, केबिन पूर्ण लॉक झाल्याची खात्री करून ओटीपोटाला पकडूनच त्याने टॉयलेटकडे धूम ठोकली.पूर्णपणे मोकळा होताना त्याचा लागलेला श्वास पूर्ववत झाला.
बेसिनच्या नळाखाली जेमेतेम हात धरल्यासारखं करून मग तो तडक शाखेच्या बाहेर पळत सुटला.कुणाच्याही ससेमिर्‍याला दाद न देता.
शाखेच्या मागच्या गल्लीत आला.तपकीरी-काळ्या लांबट गुलाबजामचं का कालाजामचं भलं मोठं हिंडालियमचं ताट बघून त्याची लाळ अनावर झाली.वेताच्या छड्या एकत्रं बांधून तयार केलेल्या उभ्या डमरूच्या आकाराच्या स्टॅंडवर ताट ठेऊन भय्या उभा होता.ते ताट निशीच्या डोळ्यासमोरून हलेना.काय करावं या नादात बराच वेळ रेंगाळल्यानंतर तो दचकला.आज मार्गशीर्षातला गुरूवार.बापरे! उपास सोडायचा.आईबाबांना.आपण खाल्ली इडली.नेहेमीप्रमाणे.वाजले किती?... साडेचार! बापरे! इथेच?... खिशात हात घालून चुळबुळत, खाजवत, घोटाळत रहाणं टळत नव्हतं... त्यात जामवाला भय्या सतत काहीतरी बोलून खायला प्रोव्होक करत होता... नेहेमीप्रमाणे... भय्या कधीच हरायचा नाही...
आधी घरी फोन करून म्हाताराम्हातारीला उशीर होईल म्हणून सांगावं की आधी खाऊन घ्यावं... मरणाची भूक लागलीये... उपास करणं जमत नाही... घरच्याना वाटतं उपास करतो मुलगा... त्याना काय सांगायची कॅशमधे बसण्याची त्रांगडी... काय करावं... छ्या:ऽऽ... शेवटी देवाला सगळं कळतं!... ह्यां!... पण आईबाबांना फोन... च्यायलाऽऽ मरूदेऽऽ आधी खाऊ... ओ भय्याऽऽ च्यायलाऽ द्येव दोन प्लेटऽऽ ओऽऽ अबी उदर किदर देखताय बाबाऽऽ द्येवऽऽ इदरऽऽ
आज भय्याची चांगलीच सरशी होणार होती...
Post a Comment