romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, March 16, 2011

प्रेमाचा आधार

माणूस आयुष्यभर फक्त प्रेमाच्या अवतीभोवती असतो का? अनेक गोष्टी त्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.लहानपणी खेळ असतो. हळूहळू विचारशक्ती तयार होऊ लागते. जगाचं ज्ञान होत असतं.ध्येयं निर्माण होतात.प्रत्येक पातळीवर संघर्ष करावा लागतो.मानसिक, शारीरिक, आत्मिक विकास अपरिहार्यपणे होत असतो.या सगळ्यानी तयार होणार्‍या माणूसपणाच्या पायाशी प्रेमाचा आधार असावा लागतो, त्याशिवाय सगळं फोल असतं.
प्रेम हुरहूर लावतं, प्रेमाचं वादळ अनेक अडथळे पार करायला लावून माणसाला समंजस बनवतं.
या प्रवासातली मजा अशी असते की ’मी’ पणातून प्रेम उत्पन्न होतं, दोघांचं प्रेम हा सहअनुभव होतो.त्यातून तिसरा जन्माला आल्यानंतर प्रेमच पालकत्वाचं रूप घेतं.ज्याच्या किंवा जिच्या बरोबर सहजीवन जगायचं, तो किंवा ती आपल्यासाठी मित्र असतात, तत्वज्ञ असतात, मार्गदर्शक असतात.
स्त्री-पुरूष या विरूद्ध लिंगी आकर्षणातून जन्म घेणारं प्रेम आपली व्याप्ती वाढवत असतं.अनेक व्यापात गुंतलेला माणूस निवृत्तीकडे झुकतो.ही सगळ्या पातळ्यांवरची निवृत्ती असते.आयुष्यभर वाढवून ठेवलेल्या व्यापामुळे नवर्‍याला बायकोकडे खर्‍या अर्थाने बघण्याची फुरसतच झालेली नसते.खरा अर्थ त्याला कदाचित आता कळायला लागलेला असतो.त्याचवेळी कदाचित तिची रजोनिवृत्ती होत असते.तिच्या आयुष्यातला अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा काळ आलेला असतो.दोघांना वेगवेगळ्या कारणाने एकिकडे एकटेपणाची चाहूल लागत असते आणि त्याचवेळी सहजीवनाचा खरा अर्थ कळायला लागतो.आता सहजीवनाची गरज अपरिहार्य होऊ लागते.मुलांचं पालकांवर अवलंबणं संपून त्यांचं स्वतंत्र आयुष्य आकार घ्यायला लागतं.घरातली स्त्री अजून घरातल्या व्यवहारांत, नातवंडांत गर्क असते.निवृत्तीला आलेल्या, निवृत्त झालेल्या पुरूषासमोर काळ आ वासून उभा राहू लागतो.एकटेपणा ग्रासतो.तो आधार चाचपायला लागतो.अनेक दिव्यांमधून गेलेली त्याची स्त्री त्याला जपत असते.हळूहळू समोर दिसायला लागणार्‍या मृत्यूच्या छायेने हे दोन्ही जीव एकमेकाना अगदी घट्टं धरून ठेवायला लागतात.आयुष्यात कधी नव्हे तो एकमेकांचा आधार यावेळी जाणवायला लागतो.भूतकाळातले अनेक प्रसंग, भविष्यातली अनिश्चितता यांनी वर्तमानकाळ कातर होत असतो.आनंदी जोडपी तरीही एकमेकांच्या साथीने, प्रसंगी रूसत, भांडत, प्रेमाने जगत असतात.इतरांना ही करमणूक असते.तरीही या शेवटच्या प्रवासात एकमेकांच्या आधाराने चाललेलं सहजीवन हे भाग्याचंच म्हटलं पाहिजे.या वयातलेही अनेक आघात पचवण्याचं सामर्थ्य या सहजीवनात एकमेकांच्या प्रेमाच्या आधारानेच शक्य होतं.
दोघांमधला कुणीही एक निघून जाणं असह्य करणारं असतं.प्रेमाची महती या आधी कळलेली नसेल तर ती आता कळूनही उपयोग नसतो.
अजूनही लग्न न करता एकटे राहिलेले दाखवत नसले, मानत नसले तरी पश्चातापाने पोळत असतात.माणसाला गोष्टी मनात दाबून ठेवायची खोड हसते.वरवर हसायची सवय तो करून घेतो.मनात दाबून ठेवलेल्या असंख्य गोष्टी जेव्हा गंभीर स्वरूप घेऊन बाहेर पडू लागतात तेव्हा या गोष्टींची स्पष्ट जाणीव त्याला, इतरांना होते.पन्नाशीनंतरच्या या कालखंडात आधार ही अपरिहार्य गरज असते.तो प्रेमाचा असेल तर सगळंच सुसह्य होतं.तहान लागल्यावर विहीर खणायला घ्यायच्या मानवी स्वभावाला अनुसरून या वयात तो अनेक गोष्टींत, नात्यांत, अनेक माणसांत, पाळीव जनावरांत प्रेम शोधू लागतो.प्रेमाची खोली त्याला आता दिसू लागते, कळू लागते.नारळाच्या आतल्या गोड पाण्या-खोबर्‍याप्रमाणे किंवा फणसाच्या आतल्या गर्‍याप्रमाणे माणसातलं प्रेम आता उफाळून येतं.
आता तो घेण्याचा विचार सोडून देतो.प्रेम देत, वाटत सुटतो.
सगळेच म्हातारे किंवा म्हातार्‍या अशा असतातच असं नाही.काहींच्या स्वभावानं इतकं उग्र रूप धारण केलेलं असतं की शेवटपर्यंत त्याना प्रेमाचा पाझर फुटतच नाही.एकांतात किंवा विशिष्ट व्यक्तीकडे तो कधी ना कधी मात्र फुटत असतो.
नातवंडांवरचं या आजी-आजोबांचं प्रेम दुधावरच्या साईसारखं असतं असं म्हणतात.नातवंडं, शेजारी, संपर्कात येणारी माणसं यांवर माया करणं लग्नाशिवाय राहिलेले, जोडीदार सोडून गेलेले यांनाही चुकत नाही.प्रेम हे सगळ्यांवर करण्याची गोष्ट आहे, ते सर्वव्यापी आहे याची जाण सर्वसाधारणपणे या वयात व्हायला लागते.सगळ्यांनाच ती येते असं नाही.माणसाच्या माणूसपणाला अनेक कंगोरे आहेत.त्याचं महत्व त्यातच तर आहे.
या वयातला सर्वसाधारण माणूस परमेश्वरावर प्रेम करायला लागतो.या आधी तो ते करत आलेला असतोच पण ते हे हवं, ते हवं यासाठी असतं.आता त्याला निरपेक्ष प्रेमाची महती कळायला लागते.जिला दुसर्‍या शब्दात तो भक्ती असं म्हणतो.
अध्यात्म असा बोजड शब्द वापरून तो त्याच्याही मागे लागतो.पण त्याच्याही मुळाशी काय असतं? निरपेक्ष प्रेम.
परमेश्वर, भक्ती असं म्हटल्यावर अजूनही ज्यांच्या अंगावर काटा येतो ते ’अज्ञात व्यवस्थेचं कोडं’ उलगडण्याच्या प्रयत्नाला आणखी जोमाने लागतात.मानवी जीवनाला परिपूर्णता येऊ नये यासाठी प्रयत्न करणारी अज्ञात व्यवस्था म्हणून अखेर परमेश्वरालाच नकारात्मक का होईला मान्यता देतात.त्या अज्ञात व्यवस्थेचं कोडं आजतागायत कोणालाही उकललेलं नाही, उकलण्याची शक्यता दुरापास्त आहे.सामान्य माणसाच्या तर आवाक्याबाहेरची ती गोष्ट आहे.आपल्याला सर्वार्थानं बळ देणारी एक शक्ती आहे असं सामान्य माणूस मानतो.त्या शक्तीवर निरपेक्ष प्रेम म्हणजे भक्ती करण्यात उरलेलं आयुष्य घालवणं त्याच्या हातात उरतं.
सामान्य माणसाला आयुष्यातल्या अनेक अवस्थांमधला प्रेमाचा आधार घेत जगणं अपरिहार्य असतं.सरतेशेवटी आपल्याजवळ असलेल्या प्रेमाच्या न संपणार्‍या साठ्याचं वितरण करत रहाणं त्याला सहज शक्य असतं.त्यानं देऊ केलेला हा प्रेमाचा आधारच त्याच्या पश्चात अमर रहाणार असतो.अनेकांचं जीवन फुलवत रहाणार असतो.
Post a Comment